Sunday 8 June 2014

मुलाखत

मुलाखत 

आज आणि उद्या कंपनीत walk in interview आहेत. गेल्या १२ वर्षातील ही पाचवी वेळ. सकाळपासून बोलतो आहे विविध लोकांशी.

- काय एक एक कथा असतात़ राव एकेकांच्या. कधी अक्षरश: काटा येतो तर कधी डोळ्यात पाणी. पण मी पण रेटतो बरं का बोलणं. अजिबात कळत नाही त्यांना की मी आतून हललो आहे ते.

- ऐकलं होतं गावातल्या गावात नोकरी करण्याच्या हव्यासापायी मराठी माणूस मागे पडला आहे. सिंहगड रोडवरच नोकरी करायची म्हणून हज़ार रूपये कमी पगारावर यायला तयार आहेत लोकं. भरकटलोच मी.

- हातात जाॅब नसताना पहिला जाॅब सोडण्याची बेडरता वाढीला लागली आहे. (केजरावालांनी या प्रश्नाला राष्ट्रीय बनवले आहे)

- काही व्यावसायिक अतिशय हलकटासारखे लोकांना वागवतात. पगार उशीरा देणे, retention money ठेवणे, pf खाणे. Employee अक्षरश: मेटाकुटीला येतो.

- माझे काही समव्यावसायिक बोंब मारतात, लोकं मिळत नाहीत, हे धादांत खोटं आहे. माझ्या छोट्या कंपनीत तीन लोकं भरायचे आहेत, पहिल्याच दिवशी २० लोकं select केली आहेत. ठरवायचं आहे कुणाला घ्यायचं ते. खरं सांगू धंदा चालू केल्यापासून मला माणसांची कधी उणीव भासलीच नाही. बाकीचे म्हणतात लोकं टिकत नाहीत. माझ्याकडे तोही problem कमी. बारा वर्षात इनमिन ३-४ जण सोडून गेलीत. पगार काही फार जास्त नाही माझ्याकडे, पण social security असावी, माहीत नाही.

असो, शुभेच्छा़ द्या चांगली माणसं मिळण्यासाठी.


 -----------------------------------------------------------------------------------------------------------

झालं, संपलं ते interview प्रकरण. कसली बडबड केली दोन दिवस. शिणलो आहे.

जेव्हा जेव्हा मी interview घेण्याच्या प्रक्रियेतून जातो तेव्हा तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते (याआधी पण जाणवली होती पण हे ब्लॉग/फेसबुक वैगेरे प्रकार नव्हते, म्हणून व्यक्त केले नव्हते) कि आज जे काही आहे ना आयुष्यात ते घरच्यांच्या मुळे आहे. महिन्याचा किराणा, भाजी पाला, gas बिल, लाईट बिल, मुलांच्या admissions, त्यांची आजारपणं, लग्न, साखरपुडा, मुंजीचे कार्यक्रम, आई वडिलांच्या तब्येती कसला म्हणजे कसलाच घोर नव्हता हो जीवाला. म्हणजे तुम्हाला सांगतो वडिलांना cancer झाला होता. त्या तीन चार महिन्याच्या आजारपणात २-३ सुट्ट्या झाल्या असतील माझ्या. सकाळचा त्यांचा कार्यक्रम उरकून मी आणि वैभवी कामाला जायचो. सकाळी ६;३० लाच मी गडबड चालू करायचो. पण बाबांनी कधी कुरकुर नाही केली. खरं तर गेले त्या दिवशीही मी सकाळी कंपनीचा ड्रेस घालून तयार झालो होतो. नंतर काय वाटलं काय माहित, आईला म्हणालो "आज थांबतो घरात" आणि संध्याकाळी सहाला ते गेले. असो. सांगायची गोष्ट अशी कि मला आई वडिलांनी आणि वैभवीने अक्षरश: आधी माझा जॉब आणि नंतर धंद्यासाठी सोडून दिलं होतं आणि होतं का, अजूनही आहे. दौर्यावर जायचं किंवा conference ला जायचं म्हंटला कि मी फक्त सांगतो "निघालो". गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत ("झगमगत्या" असं लिहायचा मोह अनावर होतो, पण किती लाल करून घ्यायची त्याला मर्यादा आहे त्यामुळे आवरतो) घरच्या कामासाठी कंपनीचं काम hamper झालं आहे असं मला तरी आठवत नाही. २०११ साली अमेरिकेला चाललो होतो. संध्यकाळी ६ ला निघायचं आणि सकाळी ११ वाजता मोठा मुलगा football खेळताना डोक्यावर पडला आणि बेशुद्ध झाला. मी कंपनीतून हॉस्पिटल ला पोहोचेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली होती. CT स्कॅन होऊन नंतर सगळं नॉर्मल आहे असाही report आला. वैभवीने सांगितलं "तू जा बिनधास्त. मी बघते" नंतर सगळं सुरळीत पार पडलं.

आणि या पार्श्वभूमीवर लोकांना किती प्रॉब्लेम असतात राव. या कौटुंबिक बाबींसाठी career ची धूळधाण  उडालेले मी किमान १५ जण तरी पहिले. कुणाला आई वडिलांचं आजारपण तर कधी मुलाचं. कधी कौटुंबिक वाद तर कधी भावाने केलेलं कर्ज. एक ना अनेक. बर्याचदा वाटायचं फेकतात कि काय, मग मी नजरेला नजर भिडवायचो आणि ती नाही खोटं बोलत. ऐकायचो, आणि वाटायचं "ये बाबा उदयापासून च कामाला. किती त्रास करून घेशील जीवाला". मनावर दगड ठेवूनच सांगितलं "पुढच्या आठवडयात कळवतो".

थोडक्यात मतितार्थ काय तर, पंख देवाने सगळ्यांनाच दिलेले आहेत पण त्याच्यात उडण्यासाठी बळ तुमच्या कुटुंबातील eco system देते यावर गेल्या दोन दिवसात शिक्कामोर्तब झाले आहे.

चला, गेली तीन चार महिने बेफाम फिरलो आहे. जरा निवांत होतो आता काही दिवस. आज तर थकेपर्यंत विश्रांती घ्यायचा विचार आहे. झोपे मध्येच  दमून बघतो जरा.

No comments:

Post a Comment