Thursday 31 July 2014

१९९९-३

हा, तर असं भुकेल्या पोटी आम्ही झुरिक नामक गावी उतरलो. विमानतळावरच्या हॉटेल कडे बघण्याची तर काही सोयच नव्हती. हो, म्हणजे आधीच लोन काढून आलो होतो. कुठे जीवाचं Switzerland करणार नाही का? तिथून मग ट्रेन ने Neuchatel नावाच्या गावाला निघालो. ट्रेन मध्ये नाही म्हणायला एक खाण्याची गाडी फिरायची. आम्ही त्यातला एखादा आयटम उचलायचो, किंमत पाहायचो, गुणाकार करायचो आणि परत ठेवून दयायचो. असाच टाईम पास करत, भुकेल्या पोटी बाहेरचं सृष्टी सौंदर्य न्याहाळत (सौंदर्य घटघटा पित होतो) आम्ही एकदाचे न्युशाटेल नामक गावात येउन पोहोचलो. असं सांगितलं होतं कि हॉटेल रेल्वे स्टेशन पासून खूपच जवळ आहे म्हणजे ७५० मीटर. पण आपल्याला आपली सवय, त्यामुळे आम्ही विचार केला कि दीड ते दोन किमी असेल. म्हणून टयाक्सी केली. ड्रायवर ला पत्ता दाखवल्यावर तो आमच्याकडे भूत बघितल्यासारखा बघू लागला. काहीतरी पुटपुटत आमच्या bags त्याने डिकीत ठेवल्या. आम्ही बसलो आणि बुड हलवत स्थिरस्थावर होईपर्यंत गाडी एका बिल्डींगच्या दरवाजात थांबली. आम्ही शोफर कडे बघून हातवारे करत विचारलं "काय झालं" इंग्रजीचा त्यांच्याकडे दुष्काळ आणि आमच्याकडे आनंद होता. तर तो म्हणाला "हॉटेल". २ ते ३ मिनिटात आम्ही पोहोचलो असू. "९ franks" भोवळच आली मला. तब्बल २७० रु. १९९९ साली ३ मिनिटासाठी २७० रु म्हणजे मुकेश अंबानी च झालो कि हो.

Switzerland म्हणजे अगदी खर्याची दुनिया. सालं चोरीचापाटी चं नाव नाही. एका संध्याकाळी हॉटेल मध्ये खाली सहा वाजता आम्ही बियर पिलो पब मध्ये . आणि जेवायला गेलो बाहेर. साधारण रात्री साडेदहाला पार्टनर नि सिगारेट ओढण्यासाठी पाकिटात हात घातला तर पाकीट कुठे! त्याला लक्षात आलं कि पाकीट पब मध्ये. म्हंटल गेलं, आता कशाला सापडेल. रूम मध्ये दुसरं पाकीट घ्यायला जाणार, तेव्हढ्यात मी त्याला म्हणालो बघू तर पब मध्ये, आणि बघतो तर काय, ते गोल्ड फ्लेक चं पाकीट तिथंच जसं च्या तसं.

झालं, दुसर्या दिवशी पासून ट्रेनिंग चालू. कंपनीत पोहोचलो. सगळं कसं चकाचक. दिवस भर काम करून संध्यकाळी जॉन बरोबर गप्पा मारत होतो. मी विचारलं "बाबा रे, तुमच्या इथे बिल्डींग च्या भोवती compound wall का नाही आहे" त्यांनी विचारलं "ती कशासाठी" मी म्हणालो "अरे, आपली बोर्डर माहिती पाहिजे ना" त्यानी विचारलं "का" मी म्हणालो  "मित्रा, अरे आपल्या जागेला दुसरा कुणी त्याची म्हणू नये म्हणून" तो म्हणाला "त्याची नसताना जागा, तो कशाला म्हणेल माझी आहे म्हणून" मी हात टेकले.

लक्ष्मी रोड वरच्या सार्वजनिक पार्किंग च्या जागेला लोखंडी stand टाकून ती आमचीच आहे असं सांगून जागा अडवणाऱ्या गावचा मी, आणि ८००-१००० किमी तारेचं कुंपण घालून दोन देश विभक्त केलेल्यापैकी एका देशाचा मी रहिवासी, त्याला कसं सांगू भिंतीचं महत्व.जाऊ द्या, तू भला आणि तुझा देश भला.

परतीच्या प्रवासात हॉटेल वरून निघालो. येताना शहाणपणा केला होता. ३ किमी साठी २७० रुपये मोजले होते. विचार केला, समोर स्टेशन दिसतंय कशाला taxi. वाघेला, माझा पार्टनर, तयार झाला. निघालो. पुढे इंग्लंड ला जायचं  असल्यामुळे bags चांगल्या जड होत्या आणि मोठ्या पण. एक लक्षात नव्हतं आलं कि स्टेशन हून हॉटेल ला येताना उतार होता आणि उलटा पूर्ण चढ. मी bags ओढत ओढत वरती स्टेशन ला पोहोचलो. मागे वळून बघतो तर वाघेला बराच मागे. चढावर सिगारेट चा धूर निघत होता. ट्रेन ची वेळ झाली होती. मी सामानासकट वरती. शेवटी मनाचा हिय्या केला, ते सामान तसंच स्टेशन वर सोडलं आणि एकटा खाली आलो. वाघेलाच्या bags घेतल्या आणि वरती चढून आलो परत. माझ्या bags जशाच्या तशा तिथेच. हायसं वाटलं.

तर हि अशी zero crime country. अजूनही तशीच असावी.

१९९९-३

Sunday 27 July 2014

पुन्हा एकदा सिंहगड

त्याचं असं आहे कि हवामानाचा अंदाज घेऊन जवळ काही गोष्टी बाळ्गाव्या याचा मला लहान पणापासून अंदाज च नाही. म्हणजे हिवाळा आहे, जवळ स्वेटर असावा किंवा पावसाळ्यात छत्री बाळगावी. अं ह. एकदा दिल्लीच्या थंडीत असा काकडलो होतो. शेवटी मित्राबरोबर जाऊन एक ज्याकेट विकत घेतलं तेव्हा व्यवस्थित जमलं. तर सांगायची गोष्ट अशी कि आज बर्याच दिवसांनी सिंहगड सर करायचे ठरले. कार नि पायथ्याला गेलो. पाऊस येणार नाही असं वाटत होतं, पण पावसाळ्याचे दिवस आहेत, येईल तर वांदे होतील. तसं ही पावसात भिजायला आवडतं वैगेरे मी फक्त लिहितो. प्रत्यक्षात मला पाऊस पडताना आवडतो पण तेव्हा मी एक तर कार मध्ये पाहिजे किंवा घरात. मनात आलं छत्री असायला हवी होती. आमचा कार सारथी मणीभाई फार हुशार. त्यात मणीभाई गुजराथी. गेले दोन तीन महिन्यांपासून मी गुजराती लोकांबद्दल त्यांनी काही चूक केली तरी काही बोलत नाही मग तो आमचा कार सारथी असो, बिझिनेस पार्टनर असो कि देशाचा पंतप्रधान. तुम्ही बरोबर. असो. तर मणिभाई ने हुशारपणे सीट खाली ठेवलेली छत्री मला दिसली . ती घेऊन मी कूच करता झालो.

मधल्या काही काळात खाणे, पिणे यावर काहीही धरबंद न राहिल्यामुळे वजन वाढलं आहे. त्यामुळे जरा फुदकतच सिंहगड चढलो. नेहमीच्या ठिकाणी पोहे आणि चहाचा कार्यक्रम झाला. आणि गड उतरायला लागलो.

अर्ध्यावर आलो असेल. समोर एक ग्रुप होता. विविध वयोगटातल्या २/३ स्त्रिया आणि ४-५ छोटी मुलं मुली होती. मी त्या ग्रुप च्या जवळ पोहोचताच पावसाची जोरदार सर आली. आज कधी नव्हे ती माझ्याकडे छत्री होती, ती मी झटकन उघडली. हे केल्या केल्या माझ्या अंगावर सुगंधी फुलांची बरसात झाली असं वाटलं. कारण त्या ग्रुप मधील एक साधारण पंचविशीतली  तरुणी वदली "it is so nice to get wet in rain, isn't it" हे ती बहुधा तिच्याबरोबर जे तिचे पुतणे भाचे होते त्यांना म्हणाली असावी. (ती पोरं पोरी म्हणजे तिची स्वतः ची मुलं नसावीत असा मी सोयीस्कर समज करून घेतला. हो, म्हणजेत भावनेत पाप नको). मी माझ्या डोळ्याच्या कडेने तिच्याकडे बघितलं. मी परत एक सोयीस्कर समज करून घेतला कि ती हे वाक्य म्हणताना ती माझ्याकडे तिरप्या नजरेने बघत होती. म्हणजे माझ्यावर तिने एक comment पास केली असा एक मी मला पाहिजे तसा गोड समज करून घेतला.

आणि मग झालं, मी तरंगत च सिंहगड उतरायच्या बेतात होतो. हातातल्या छात्रीबद्दल मला विलक्षण ममत्व वाटू लागलं. हो, म्हणजे तिच्यामुळेच हा सुवर्णकांचन क्षण मी अनुभवला होता. तिला मी जास्त घट्ट पकडावं असं मला वाटू लागलं. (अहो, छत्रीला… छत्रीला). छत्रीला parachute करणार, तो पर्यंत मी खडकाला वळसा घालून अजून खाली उतरलो. आणि मग ते तप्त शिसासारखे शब्द ह्याच कानांनी ऐकले. "Have you seen that Uncle, He is opening up छाता in this beautiful rain. Such a boring"तोच आवाज, तोच ढंग. मी तरुण झाल्याच्या विचारात दंग असताना ते विचार भंग झाले. (कुठंही यमक)

झालं, म्हणजे टेक ऑफ घ्यायच्या आधीच माझं विमान जमिनीवर उतरलं सुद्धा. आणि मग परत जड पायांनी मी नेहमीप्रमाणे गड उतरता झालो.

"गडावरती जाताना छत्री मध्ये वारा भरून तुमचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे गडावर जाताना छत्री घेऊन जाऊ नये" हे माझं उद्याचं स्टेटस.



Friday 25 July 2014

जरा सांभाळून

सध्या बुवा पुण्यात WhatsApp एका प्रथितयश उद्योगपतीचा मेसेज धूम फिरतोय. हो, आणि मी लोकांच्या लेखी एक फसलेला का असेना, उद्योजक आहे, म्हणून आज चौथ्यांदा आला. चला म्हंटल, वाचू या. (WhatsApp च्या तर) नेहमीप्रमाणे मराठी माणसाला rather उद्योजकाला यथेच्छ झोडलय.

सरांच्या मातोश्रीने सांगितलं डॉक्टरांच्या नादी लागू नका. आमच्या पण आईने सेम सांगितलं, पण मी लागलो बुवा नादी आणि एक डॉक्टर गळ्यात बांधून घेतली. (संदेश चांगला आहे, तब्येत चांगली ठेवा).

एकंदर लेख चांगला आहे. उपदेशपर आहे. आपलाच problem असा आहे कि फुकटचा सल्ला आणि आशीर्वाद द्यायलाही आवडत नाही अन घ्यायलाही.

त्यांनी लिहिलं आहे कि अंथरूण पाहून पाय पसरावेत हे काही बिझिनेस मध्ये योग्य नाही. कर्ज नाही काढलं तर धंदा वाढू नाही शकत. असेलही बुवा कदाचित. पण बिझिनेस model वेगळी असू शकतात, सगळीकडे कर्ज लागेलच असंही नाही. या कर्जाच्या नादापायी लोकं बाराच्या भावात गेलेली बघितली आहेत मी. बिझिनेस प्लान, कॅश फ्लो management वैगेरे काही गोष्टी आहेत कि नाही. कि उगाच आपलं तुम्ही यशस्वी झालात म्हणून सरसकट म्हणायचं कर्ज काढत नाही म्हणजे तुम्ही धंदा बरोबर नाही करत.

एका सेमिनार मध्ये पुण्यातली एक कंपनीचा MD (supplier ला payment च्या बाबतीत एकदम दरिद्री) lecture झोडत होता. Capital Expenditure कसं manage करायचं आणि financial institution कडून कसं लोन घेऊन मग working कॅपिटल handle करायचं. मी उभा राहिलो आणि विचारलं "तुमच्या कंपनीने माझे अडीच लाख रु  दोन वर्षापासून थकवले आहेत. त्याबद्दल solution आहे का काही?" मोठ मोठया गप्पा मारताना, खाली काय जळतय ते बघावं जरा.

आता अंथरूण पाहून हात पाय पसरण्यात काय गैर आहे हो. इथं बोंबलायला लोकं आपली बौद्धिक कुवत बघत नाहीत, आर्थिक कुवत बघत नाहीत, बिनधास्त उडी मारतात आणि फसतात. डोकं धरून बसतात. अहो ठीक आहे, काही होत असतील यशस्वी, पण म्हणून सरसकट हा सल्ला!!. You are bound to fail, if you do not have wisdom to put your thoughts in to appropriate actions.


पुढं एकदम रापचिक वाक्य. "आज माझं नाव XXXXX नसलं असतं तर मी अंबानीला मागे टाकलं असतं." हे म्हणजे सेम blue प्रिंट चा dialogue. करा मग नाव चेंज.

शेवट तर फार भारी. तुमच्याकडे पैसे उरत असतील तर काहीतरी चुकतंय. आयला म्हणजे Infosys कडे १० एक हजार कोटीची गंगाजळी आहे FD मध्ये मग ते काय येडे. आणि विजय मल्ल्या, याच्यामागे बँका पळत आहेत आणि तो कुठेतरी मोरिशस च्या स्विमिंग पूल मध्ये ललना बरोबर पोहोतोय तर तो शहाणा.

बरं एवढं करून growth किती achieve करायची तर १०%. म्हणजे inflation rate आहे ७-८% आणि ग्रोथ १०%. म्हणजे effectively २%. एवढया ग्रोथ मध्ये employees ला increment काय द्यायचं, शेंगा.

एखाद्या बंद खोलीतल्या फोरम मध्ये अशा कहाण्या छान वाटतात. पण लक्ष देऊन वाचलं कि कळतं लोच्या आहे. 

आता काय सांगायचं, माणूस मोठा, multifaceted, आपण म्हणजे किस झाड कि पत्ती त्यांच्यासमोर. पण जरा अभ्यासपूर्ण तर लेख असावा, कि उगाच आपलं भावनिक काही तरी फेकायचं. माझ्या हाती अन माझंच ऐक.

आपल्याला तर नाही झेपलं.

जरा सांभाळून

Wednesday 23 July 2014

१९९९ लेख २

हं, पत्र तर आले, पचनी हि पडले. आणि हळूच खिशाकडे हात गेला आणि लक्षात आलं, पाकीट तर रिकामं. तरी बरं पेगार्ड ने तिथला खर्च उचलायची जबाबदारी घेतली. तरी येण्या जाण्याचं तिकीट तर लागणार होतं. त्यावेळेस साधारण किंमत होती २७-२८ हजार रुपये. पार्टनर ची बहिण UK ला राहत होती. rather अजूनही राहते. मग ठरलं तिच्याकडे जायचं. ठरवत तर मार सगळं होतो पण बोंबलायला खिशात पैसे कुठं होते. मग ठरलं आता मागे हटायचं नाही. सारस्वत बँकेला रु ५०००० प्रत्येकी लोन ची मागणी केली. तीही sanction झाली. तिकीट काढणं झालं, Voumard चं निमंत्रण पत्र असल्यामुळे तो विसा झटकन मिळाला. आता UK विसा.

हे UK विसा मिळवणं म्हणजे दिव्यच हो. सतराशे साठ documents. आणि त्यावेळेस ची पद्धत सांगतो.

- विसा application द्यायचा. मग प्रायमरी interview होणार.
- ते documents बघणार आणि सल्ला देणार secondary interview द्यायचा कि नाही.
- मग पैसे भरायचे.
- एकदा पैसे भरले कि तुम्हाला विसा मिळो ना मिळो, पैशावर पाणी.

तर आम्ही गेलो UK विसा च्या ऑफिस मध्ये. Primary Interview साठी उभा राहिलो, त्या बाबांनी ४/५ documents पाहिल्यासारखं केलं आणि सांगितलं तुम्हाला विसा काही मिळणार नाही. मी म्हणालो "ठीक आहे तरी आम्हाला सेकंड interview attend करायचा आहे" तो बोलला "विसा reject झाला तर पैसे वाया जातील" म्हणालो "वाया तर वाया" (जीवावर आलं होतं असं म्हणणं, ६००० रु होते हो)

शक्यतो पहिल्या interview ला जे बेणं येतं ते next interview ला येत नाही. पण आमचं नशीब असं पांडू कि तोच पांडू आला. (आता पहिल्या पांडूनंतर यमक जुळवण्यासाठी मी वेगळं नाव लिहिणार असं वाटलं ना. ठीक आहे जे तुमच्या मनात आहे तेच सही) छद्मी हसत म्हणाला "मी तुम्हाला सांगितलं, नका प्रयत्न करू" मी म्हणालो "तात्या, तू interview  घे, बाकीचं मी बघतो" मुलाखत चालू झाली. बरेच प्रश्न झाले. तरी एक इंटरेस्टिंग प्रश्न सांगतो. मी आणि वाघेला आम्ही दोघंही UK ला जाणार होतो.

विसा:  एकटाच आहे कि अजून कुणी आहे तुझ्याबरोबर
मी: नाही अजून एक आहे.
विसा: बोलव त्याला.
(वाघेला आला)
विसा: हा कोण
मी: वाघेला
विसा: तुझं आणि त्याचं काय relation आहे
मी: पार्टनर आहे माझा तो
विसा: कुठला पार्टनर
मी: अं
विसा: is he your family partner. I mean, do you share same bed
मी: भैसाटला का तू, बिझिनेस पार्टनर आहे

तेव्हापासून मी वाघेलाची ओळख "बिझिनेस पार्टनर" अशीच करून देतो. विसा ऑफिसर म्हणाला "उभा राहा बाहेर, तुम्हाला सांगितलं विसा reject होईल, पासपोर्ट घेऊन जा" पासपोर्ट मिळाला आणि बघतो तर कर गोर्याने विसा दिला होता. तिकीट झालं, विसा झाला. alitalia चं तिकीट. सगळ्यात स्वस्त तेच. स्वस्त तेच आपल्यासाठी हे १९९९ पासून आज पर्यंत चालू आहे. तिकिटावर त्यावेळेस जेवण काय पाहिजे ते लिहायचं होतं. मला काहीही चालतं. हो म्हणजे दोन पायाचा माणूस आणि चार पायाची टेबल खुर्ची सोडून. वाघेलाने सांगितलं आपण asvm सांगू यात. (Asian Special Vegetarian Meal). मी म्हणालो "भाऊ, regular सांग. काही होत नाही" तर नाही AVSM च पाहिजे. मग काय घ्या म्हणालो.

मिलान ला stopover घेऊन मिलान-झुरीक विमानात बसलो. सकाळची वेळ होती. भूक पण दाबून लागली होती. सगळ्या co passengers ला ब्रेकफास्ट serve केला जात होता. मी आशाळभूत नजरेने air होस्टेस कडे बघत होतो. अहो, भुकेमुळे, बाकी काही सुचत नव्हतं. शेवटी विचारलंच "मा जगदंबे, खायला न देण्याची आमच्यावर का अवकृपा होत आहे" तर म्हणाली "थांब बाळा, तुमचं special आहे" बाकीचे लोकं मिटक्या मारत खात होते आणि मी जिभल्या चाटत होतो. AVSM सांगणारा आमचा मित्र तर भुकेने कळवळून अर्धमेला झाला होता. तेव्हढ्यात ती पंचादश वर्षीय ललना दोन हातात दोन ट्रे घेऊन आली आणि किणकिणलि "here is your breakfast. enjoy it" आत्यंतिक आनंदाने, म्हणजे अगदी कलावतीला समुद्रात बुडालेली  नौका वर आल्यावर तिच्या पतीला पाहिल्यावर जितका आनंद होतो तितक्याच, मी झाकण काढलं. तर ते Asian Special Vegetarian Meal याचा ब्रेकफास्ट होता एक ४ इंची पाव आणि त्यामध्ये एक उकडलेल्या वांग्याची स्लाईस. आणि extra special म्हणून आलुबुखार सारखं त्यावर एक फळ. Cherry on the cake. वाघेलाचा चेहरा तर पार उतरला होता. आणि मी गुलुगुलु हसत तो भारी ब्रेकफास्ट हादडत होतो

१९९९ लेख २

कलाकारी

पण मी काय म्हणतो, हौस आहे ना, मग बोलवा ना गायक कलाकारांना गाणी वैगेरे म्हणण्यासाठी पोराच्या वाढदिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला. अहो पण बोलावल्यावर लक्ष देऊन ऐका तर ते काय सादर करत आहेत. ते बिचारे जीवाच्या आकांताने गाणी सादर करतात, आवाज पण तयारीचा आहे, वादक वृंद ही  चांगला आहे, तर मग लक्ष देऊन ऐका तरी. कि आपलं त्यांनी कला पेश करायची आणि तुम्ही त्यांच्या समोरच यजमानांना गिफ्ट देण्यासाठी लाईन लावायची, कडेवरचं पोर कोकालतंय ते कोकलू द्यायचं. नाही म्हणजे ठीक आहे, पैसे मोजलेत तुम्ही कलाकारांना बोलवण्यासाठी. पण म्हणून असं. पाहुणे मंडळी, तुम्ही  जरा समंजसपणा दाखवा.

कलाकार कला सादर करताना त्याच्याकडे लक्ष न देणे यासारखा त्याचा अपमान नाही. आणि तयारीचा असेल तर घोर अपमान. हे कलाकार सुद्धा कसं सहन करतात तेच जाणे.


Sunday 20 July 2014

परभणी १

काय म्हणावं याला, मंतरलेले क्षण. किंवा योगसाधनेत एक ती अवस्था असते, मेडिटेशन. त्या अवस्थेत म्हणे तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्व problems चा विसर पडतो आणि तुम्हाला एका स्वर्गीय सुखाची अनुभूति होते. काल सकाळी ९:३० वाजल्यापासून सुरू झालेलं मेडिटेशन आज संध्याकाळी ७:३० वाजता संपलं. हो, हो तेच परभणीचे ३६ तास. तब्बल १८ वर्षानंतर आलेल्या माझ्या गावातील व्यतीत केलेले क्षण मला एक अमूर्त आनंद देऊन गेले आणि येणार्या कित्येक वर्षात या आठवणींच्या झोक्यावर मी पुन्हा पुन्हा हिंदोळणार आहे याबाबत मला शंका नाही.

परभणीच्या मित्रांबद्दल मी वेगळे काय लिहीणार. प्रेम, जिव्हाळा या सगळ्या शब्दांचा अनुभव परभणीच्या लोकांकडून अनेक जणांनी घेतला आहे, मी त्याला अपवाद कसा असणार! शिवा आणि निलेशनी घेतलेलं माझं यजमानपद, कर्डेकर डाॅक्टरांची निर्व्याज मैत्री, पोटेकर कुटुंबानी दाखवलेलं आपलेपण, मी केशवराव डंकांचा नातू म्हंटल्यावर RBD चे माझ्या पायाकडे धावलेले हात हे निव्वळ कल्पनातीत होतं. मी काही यांचे आभार मानून ऋणातून उतराई वैगेरे होण्याच्या भानगडीत पडत नाही. ते ओझं राहू द्यावं म्हणतोय, वेळ येईल तेव्हा उतरवीन खांद्यावरून.

बाकी मला एक पटलं की मी पक्का परभणीकर आहे, अगदी ३० वर्षांपासून फारकत घेतली तरीही. अगदी दिलेली वेळ न पाळणे हा गुण माझ्यात देखील तंतोतंत उतरला आहे. फक्त रेल्वेचं भाडं देउन तिकीट काढल्यामुळे त्याच्या वेळा पाळण्याइतका व्यवहार्य अवगुण माझ्यात आला आहे. परभणीकर रेल्वे सुद्धा सोडून देऊ शकतो.

असो, खालील दोन चित्रे माझ्याशी निगडीत. एक माझं आजोळ. यठिकाणी साधारण ३५ वर्षापूर्वी १२ खोल्यांचं घर होतं. त्याच्या बाहेर एक सुंदर बाग़ होती, जिथे केवड़ा, आंबा, चिकू, जांभूळ अशी झाडं होती, असंख्य फुले असायची. उन्हाळ्यात कमीत कमी ३० लोकांची पंगत बसायची. अशा एका स्वर्गीय राजमहालाचं आज असं खंडहर झालेलं बघून मी गलबललोच. पण काय करणार कालाय तस्मै नम:

आणि दुसरं आहे आमचं घर. तिथे आता लहान मुलांची शाळा आहे. मी फोटो काढतोय बघून एका बाईंनी विचारलं कशासाठी, मी कारण सांगितलं. बाई पण चुकचुकल्या अन म्हणाल्या तुमची वास्तु भाग्याची आहे. काय म्हणणार कालाय तस्मै नम: 


Saturday 19 July 2014

परभणी

मित्रांनो,

सोशल नेट्वर्किंग साईट मुळे हरवलेले मित्र भेटतात, नातेवाईक एकमेकांच्या contact मध्ये येतात असं ऐकलं होतं. माझ्या बरोबर मात्र एक अघटित घडलं कि मला माझ्या मनातून हरवलेलं गावच पुन्हा मिळालं. परभणी. माझ्या मनाच्या एका कोपर्यात या गावाचे अढळ स्थान आहे. काळ सरकत गेला आणि त्या मनाच्या कोपर्यावर नवीन युगाची, कामाची पुटं चढत गेली, विविध घटनांची जळमट चढत गेली आणि खोटं कशाला सांगू थोडं विस्मृतीत गेल्यासारखं झालं. नाही म्हणायला "तुमचं native कुठलं हो?" या प्रश्नावर माझं उत्तर होतंच "परभणी" एक ठिणगी पडायची आणि तिथेच विझायची. आणि फेसबुक शी संपर्क झाला. पहिले २/३ वर्षं हे काय प्रकरण आहे ते समजण्यात गेले. आणि खरं तर गेल्या एक दीड वर्षात मी यावर active झालो. आणि तुम्हा सगळ्यांची ओळख झाली. Lives in परभणी, माझ्यासाठी Friend Request accept करायला एवढं कारण पुरेसं होतं आणि त्या मैत्रीच्या हाताला नंतर कधीच झिडकारलं नाही अगदी एकाही मित्राला. त्याला कारण ही तसंच. कुणाशी वाद च झाला नाही. आजही मला फेसबुक चे अनेक जण भेटतात आणि मी सांगितलं कि मी मुळचा परभणीचा तर "परभणीत talent ठासून भरलं आहे" हे वाक्य येतंच आणि हि दाद तुम्हाला दिलेली असते.

आणि या पार्श्वभूमीवर माझ्या मनात यायला लागलं, कि आपण परभणीला जायला हवं. खरं तर दोन्ही आजोळ भौतिकदृष्ट्या काळाच्या पडद्यावरून गायब झालेले. बहुतेक नातेवाईक परभणी सोडून औरंगाबाद, पुणे, मुंबई इथे स्थलांतरित आणि हो अमेरिका विसरलं. घर विकलं त्यामुळे मनाला ओढ लागावी असं काहीच राहिलं नाही. नाही म्हणायला एका लग्नासाठी आलो होतो आणि दोनदा नांदेड ला जाताना मुक्ताजीनच आवंढा गिळत दर्शन हि घेतलं. आणि त्याचवेळेला तुमच्या सगळ्यांची आभासी जगात झालेली ओळख दृढ होत गेली. संध्याकाळी laptop सुरु केला कि तुमची नावं दिसायला लागली आणि इतकेच नाही तर तुमच्या पोस्ट/comment वाचताना तुमच्याशी connect होऊ लागलो. आणि मग ठरवलं, कि जायचंच. आणि हा घाट घातला.

जवळचे मित्र, नातेवाईक मला वेडा ठरवत आहेत, असं आभासी जगातल्या लोकांना कुठे भेटायला वैगेरे जायचं असतं का म्हणून. खरं सांगतो, पण मी सुद्धा हे फक्त परभणी आहे म्हणून एवढा उत्साह दाखवतो आहे. असो.

तर स्नेह तर झालाच आहे, तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा

आपला



राजेश मंडलिक

.









माझी थोडक्यात ओळख सांगतो.

राजेश भास्कर मंडलिक, जन्म: २४/०५/१९६८ पेपर वर परभणी ला पण खरं तर नांदेड ला
वडिलांचे नाव: कै भास्कर अनंतराव मंडलिक,  मृत्यू: १८/०६/२००९  वडील , MSEB मध्ये ३८ वर्षे नौकरी करून १९९९ साली Dy EO म्हणून सेवानिवृत्त अत्यंत  लोकप्रिय, मदतीला तत्पर.  कॅन्सर ने मृत्यू
आईचे नाव: कुमुद भास्कर मंडलिक (पूर्वाश्रमीचे नाव: कुमुद केशवराव डंक)
आईचे घर: मुक्ताजीन, परभणी बस स्थानक शेजारी,
आईचे वडील केशवराव डंक ही एक प्रतिष्ठित व्यक्ती होती. मुक्ताजीन मध्ये परभणीतील अनेकांची लग्न झाली आहेत. उन्हाळाच्या सुट्टीत कमीकमी २५ जणांची पंगत असायची. 
वडिलांचे घर: आधी वडगल्ली (बिडकर यांचे घर) नंतर शास्त्रीनगर, पोलिस ground च्या शेजारी. धोंड आणि कहात यांच्या बाजूला.
परभणी, बीड, यवतमाळ, औरंगाबाद, नासिक, पुणे, मुंबई, पुणे असा प्रवास.
शिक्षण: DME (Govt Polytechnic औरंगाबाद १९८६)
             BE Production Engineering (BVCOE पुणे १९८९)
व्यवसाय: SKF आणि Busak+Shamban २००२ त्यानंतर स्वत:चा बिझिनेस Ultra Precision Spindles.
पत्नी: डॉ वैभवी मंडलिक MD Pathology स्वत:ची lab चालवते
मुलगा: यश (Second year mechanical Engg) आणि नील (पाचवी)
भाऊ: उन्मेष मंडलिक BE सिविल स्वत:चा बिझिनेस त्याची पत्नी : अर्चना BE इलेक्ट्रोनिक्स, MSEB मध्ये AE


पहिला चान्स

१९९९, माझा पहिला परदेश दौरा. Switzerland आणि UK. (तसं ९८ ला सिंगापूर ला गेलो होतो, पण इतक्या कमी दिवसाचा होता की जातो म्हणेपर्यंत दरवाजाची घंटी वाजवली होती) याचे खरंतर बरेच क़िस्से आहेत. पण काही गंमतशीर गोष्टी.

आता ५५०० sqft इतक्या प्रचंड जागेवर विस्तारलेल्या माझ्या वटवृक्षाची सुरूवात १९९४ साली सोमवार पेठेतल्या १०० sqft च्या रोपट्या रूपी एका गाळ्यात झाली होती. (भनकला का बे तु. लोकं वाचताहेत म्हणून वटवृक्ष अन काय काय. भयाडा, २० वर्षामधे लोकं हज़ारों कोटींची उलाढाल करतात, ७-८ आॅफीसेस भारतात असतात, एखादं दुसरं परदेशात असतं. अन तु बसला एकाला कवटाळून, गप्प बस) तर दिवसभर प्रथम M 80 नंतर Hero Honda Splendor यावर १०० किमी ची रपेट केल्यावर मी या गाळ्यात धंद्याला बसायचो. (ए, हसू नका रे. असंच म्हणायचं) रात्री ९-९:३० पर्यंत कधी रिकाम्या workbench कडे पाहत तर कधी फालतूचा time pass करत फार कष्ट केले असं दाखवत घरी धापा टाकत पोहोचायचो. नाही म्हणायला गाळा स्वत:चा असल्यामुळे भातुकली सारखा का असेना पण बिझीनेस करत होतो. Hobby  business म्हणतात ना तसंच काहीसं. त्या गाळ्यामधे गाळ्यात गेलो नाही हेच काय नशीब. (धंदा कोटींचा केला नाही कारण हे अशा फ़ालतू कोट्या करण्यातच आयुष्य वाया चाललं आहे) 

१९९९ फेब्रूवारी महिना. अशाच एका रम्य संध्याकाळी आॅफीस मधे माशा मारत बसलो असताना एक टपाल आलं. स्वत: च जावून आणलेल्या कामाशिवाय आणि पर्चेस आॅर्डर शिवाय त्या १०० sqft च्या विशाल आॅफीस मधे खरंतर माशांशिवाय काहीच यायचं नाही. पण आलं, त्यादिवशी ते टपाल आलं. 

उघडलं. आणि आतमधे जो खलिता होता तो वाचून एखाद्या ट्रक रिपेअर करणार्या ला रतन टाटांचं लेटर आल्यावर जसं वाटेल तसंच वाटलं. Switzerland मधील Voumard नावाच्या एका अग्रगण्य मशीन टूल कंपनीच्या पेगार्ड नामक MD चं पत्र होतं. त्या पत्राचा मतितार्थ असा होता: (आज जरा इंग्रजी लिहीण्याचा मूड नाही, त्यामुळे मराठीच सहन करा) 

Dear Mr Mandlik, (इतकं जमतं हो), लुकास टीव्हीएस चेन्नई कडून आम्हाला असं कळलं की तुम्ही आणि Mr Waghela पुण्यात spindle repair करता. तुम्हाला आमचे spindle repair करण्यासाठी आम्ही तुम्हाला training
देऊन तुम्हाला authorize करू इच्छितो आणि त्या कारणासाठी तुम्हाला Switzerland मधील Neufchâtel नामक गावी आमंत्रित करत आहोत. 

एक अर्धा तास तर काही सुधरलंच नाही. पुन्हा पुन्हा वाचत होतो, म्हंटलं कुणी चेष्टा केली की काय. आजच्या वेगवान
communication  च्या जगात जे लिहीलं ते हास्यास्पद वाटेल पण जे आहे ते आहे .

सगळी लिंक लागली. दोन महिन्यापूर्वी लुकास चेन्नई वरून एक माणूस Voumard चा spindle घेऊन आला होता.
Repair करून दिला. पण बोंबलायला बरोबर झाला की नाही, ते कसं कळणार. मला म्हणाला "तुमच्या repair ची quality कशी बघणार" मी म्हणालो "घेऊन जा, चालला तर पैसे पाठवा" (जन्म मराठवाड्यातला, त्यामुळे "आधी पैसे!" हे कधी जमलंच नाही). नंतर पैसे आले म्हणजे मटका बसला होता फ़िट. या लुकासच्या हेड ने Voumard ला लिहीलं असावं "दोघं जण पुण्यात तुमच्या spindle ची वाट लावतात. अजुन वांदे व्हायच्या आत, त्यांना शिकवा, कसे repair करायचं ते" आणि त्यांची परिणिती हे प्रेमपत्र. 

Tuesday 15 July 2014

९४

 आपल्याला आंतरराष्ट्रीय भानगडीतलं काहीच कळत नाही. आता हेच पहा ना

बिचारा शाम्या. रोज मामाच्या हातचे फटके खायचा. आई वडिलांचे छत्र हरवलेल्या पोराचे त्याचा मामा रामराव खूपच हाल करायचा. एक दिवशी तर मरेस्तोवर मारला आणि घराबाहेर टाकून दिला. जायचाच वरती तेव्हढ्यात सुरेश भाऊ नि पाहिलं त्याला, उचलून सरळ हॉस्पिटल ला नेलं. सुरेशभाऊ, वार्ड चा नगरसेवक, एकदम हरहुन्नरी पण महत्वाकांक्षी. त्यानं योग्य ती काळजी घेतली आणि बरं करून रस्त्याच्या कोपऱ्यावर बूट पोलिश करायला जागा दिली आणि सांगितलं "शाम्या, लेका हि जागा तुझी. नीट रहा आता इथं. मागं धोंडीबा चं शेत आहे, पण मी सांभाळून घेतो त्याला. तू काळजी नको करू."

दिवस जाऊ लागले. शाम्या मोठा होऊ लागला. बूट पोलिश करता करता भाजी चा stall लावला. तिथंही जम बसला. शाम्या चा शामराव झाला. पण हे होत असताना धोंडीबा च्या पोरांना त्रास दे, त्याची शेतात जाण्याची पायवाट बळ्काव असले उदयोग चालू असायचे. एव्हाना धोंडीबा चे पोरं मोठी झाली. आडवी जायची शामराव ला पण ताकतीला कमी पडायची म्हणजे आर्थिक. याचं कारण शामराव ची सुरेश भाऊ शी जवळीक. सुरेश साहेब आता मुख्यमंत्री झाले होते, आणि बऱ्याच अंशी त्यांचे पैशाचे व्यवहार शामराव च बघायचा.

शामराव च्या दादागिरीने सुरेशभाऊ चा त्या area त चांगलाच वट जमला होता. तिथं सुरेश साहेब फुल कंट्रोल ठेवायचे.

एके दिवशी कहरच झाला. शेतात येण्याची शाम राव ने पायवाट अडवली म्हणून जाब विचारायला धोंडीबाची पोर गेली तर दणकट अशा शामराव ने त्यांना धुतला. सुरेशभाऊ च्या मदतीने शामराव ला माहित होतं कि आपलं कुणी वाकडं करू शकत नाही ते.

शामराव मारतोच आहे आणि धोंडीबाच्या पोरांचे हाल कुत्रंही खात नाही आहे.

मोसाद फारच डेंजर आहे म्हणे, म्हणून सगळं कोड वर्ड मध्ये.

(शामराव: ज्यू, रामराव: हिटलर, सुरेशभाऊ: अमेरिका, कोपर्याची जागा: इझ्रायल, धोंडीबा चं शेत: Palestine,
पैशाचे व्यवहार: बँकिंग, धोंडीबा आणि त्याची पोर: आताची मरणारी पॅलेस्टिनी जनता)

इतकं करूनही हा मेसेज WhatsApp वर मोसाद पर्यंत पोहोचलाच आणि त्यांनी माझा नंबर शोधून मला परत मेसेज पाठवला

"भैताडा, भारत-पाकिस्तान संबंधात काश्मिर बद्दल तुझं काय मत आहे"

मी: अं, अं........अंSSS

मोसाद: अं, अं काय करतोस, आधी स्वत:च्या देशाबद्दल नीट माहिती घे, मग आमच्या देशाबद्दल बोल.

फोनचा नंबर बदलतोय. नवीन नंबर मिळाला की कळवतोच. 

Thursday 10 July 2014

शुभेच्छा

आठवतीय महिन्या दीड महिन्यापूर्वीची पोस्ट, मदतीसाठी टाकली होती, एका दहा वर्षाच्या मुलासाठी. त्यावेळेस नाव नव्हतं लिहीलं, पण आज सांगतो मानस त्याचं नाव. माझ्या पुतणीचा मुलगा. आजाराचं नाव Extensive Venous Malformation. वेगळाच आजार. काही तज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्यावरून भारतात effective treatment नसल्यामुळे अमेरिकेत Boston Children Hospital मधे treatment घ्यावी असं ठरवलं. आणि मानसच्या आई वडिलांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. हा हा म्हणता एक एक अडथळा पार करत सर्व कुटुंब १४ जुलैला अमेरिकेला रवाना होत आहे. मानसच्या वडिलांनी कसं हे सगळं जमवून आणलं, आपल्या तर डोक्याच्या बाहेरचं आहे बुवा! माझ्या मदतीच्या आवाहानाला साद देउन काहींनी मदतीचा हात पुढे केला तर काहींनी सदिच्छा दिल्यात.  काहींनी उपयुक्त माहिती दिली तर काहींनी दुसरं कोण मदत करू शकतं हे सांगितलं. एकंदरीत सर्व अनुभवलं.(आजकालच्या व्यवहारी जगात मदत मागितली म्हणून unfriend नाही केलं,  हेच नशीब)

या कुटुंबाबद्दल एवढंच म्हणू शकतो की "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा"

मकरंद आणि वृषाली, तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीला मनापासून सलाम आणि हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छा 

Friday 4 July 2014

भेट

स्थळ: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेळ: सकाळची ३;३०

मी रेलींगला टेकून उभा, माझ्या शेजारी तो ४-५ वर्षाचा, हो हर्ष त्याचं नाव
त्याच्या बाजूला त्याची आई तिशीतली. तिच्या डोळ्यात आस नवर्याला भेटण्याची (६ महिन्यानंतर येत असावा)
हर्षच्या डोळ्यात झोप पांगुळलेली.
प्रतीक्षा…… आला……नाही……… निराशा…………हिरमुसणे……. परत वाट पाहणे

आणि आवाज आला "हर्ष चल, बाबा आला" हर्ष पेंगुळलेलाच. परत आवाज "हर्ष चल, बाबा दिसतोय"
पेंगुळलेल्या डोळ्यात थोडी हालचाल. थोडं स्मित.

ओढतच नेलं आईने हर्षला. एव्हाना हर्ष पूर्ण जागा.
trolley ओढत आलेला बाबा. बायकोची आणि त्याची नजरभेट. आनंद साठलेला.

हर्ष आईच्या मागे लपलेला. हळूच बाबांकडे बघणारा. ओळख पटवायची प्रयत्न करणारा.
बाबाच्या डोळ्यात उत्सुकता. हा येत का नाही आपल्याकडे. ६ महिन्यात इतका दुरावा.

बाबाने हात पसरले. ओळख पटली. हर्ष आवेगाने धावत बाबांकडे. आणि क्षणार्धात बाबांच्या कुशीत.
बाबाने हर्षला मारलेली घट्ट मिठी. हर्ष विसावलेला पूर्ण विश्वासाने, आनंदाने.
एका खांद्यावर डोके ठेवून डोळे पुसणारी हर्षची आई.

मी तिथेच रेलिंग च्या जवळ. अनिमिष. धुसर. तो T २ चा झगमगाट विसरून, ब्रम्हांड बघत थिजलेला.

कुटुंबैव वसुधम

भेट 

Wednesday 2 July 2014

Insurance

ह्या अमेरिकेने जगाला काही चांगल्या गोष्टी दिल्या आणि काही वाईटही. या बेकार गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर हे insurance policy. (तसही बेकार गोष्टीबाबत आपल्याला एकदम फर्मास लिहिता येतं) म्हणजे काय विकतात हो, मृत्यूची भितीच ना! तुम्ही मराल तर तुमच्या घरच्यांना आजच्या सारखं जीवन जगायला मिळेल. म्हणजे मी खस्ता खात जगायचं आणि मी मेल्यानंतर घरच्यांनी मजेत राहायचं. मला तर हि काही theory कळली नाही. आता हि मेडिक्लेम policy. माझी, बायकोची आणि दोन्ही पोरांची मिळून एक ५.५-६ लाखाची एका चांगल्या देशी insurance कंपनी ची policy आहे. आठ एक हजार premium आहे. काही वर्षापूर्वी १२००० रुपयाच्या क्लेम ला अक्षता लावल्या. पण ठीक आहे. तर परवा एक मोठया हॉस्पिटल पार्टनर असलेली आणि एका जर्मन शहराचं नाव असलेली  insurance कंपनी आली आणि साधारण तेव्हढंच कव्हरेज असलेली policy दाखवली आणि premium किती तर तेवीस हजार. मी म्हणालो "दादा, आठ हजार कुठे आणि तेवीस हजार कुठे" तर मला वेगवेगळे आजार, त्याचा खर्च आणि काय काय सांगत बसला. म्हंटल "तात्या, आता बास. तू आता जगातले यच्चयावत रोग मला होतील आणि त्याच्यावर उपाय म्हणून हि policy मी घ्यावी असं तुला वाटत असेल तर पुरे" आणि मग त्याला बाय केलं.

आता हि अमेरिकन बाई Rhonda Byrne. तिने Secret लिहिलं. त्याच्यात ती काय म्हणते, तुमच्या मनात पूर्ण विश्वासाने एखादी गोष्ट आली कि पूर्ण universe ते पूर्ण व्हायला मदत होते. आणि मग तुम्हाला कार  घ्यायची इच्छा असेल तर कार पार्किंग ची जागा तयार करा. कार  येईल. आता त्या धर्तीवर मी समजा मेडिक्लेम किंवा life coverage ची insurance policy घेतोय म्हणजे आजारी पडण्याची किंवा खपण्याची तयारी करतो आहे असं होत नाही का?

तेव्हा आपलं worth आपणच ठरवायचं, त्याला सुटेबल अशी policy घ्यायची आणि  शांत बसायचं. जास्त डोक्याला भगभग  करून घ्यायची नाही.