Wednesday 23 July 2014

१९९९ लेख २

हं, पत्र तर आले, पचनी हि पडले. आणि हळूच खिशाकडे हात गेला आणि लक्षात आलं, पाकीट तर रिकामं. तरी बरं पेगार्ड ने तिथला खर्च उचलायची जबाबदारी घेतली. तरी येण्या जाण्याचं तिकीट तर लागणार होतं. त्यावेळेस साधारण किंमत होती २७-२८ हजार रुपये. पार्टनर ची बहिण UK ला राहत होती. rather अजूनही राहते. मग ठरलं तिच्याकडे जायचं. ठरवत तर मार सगळं होतो पण बोंबलायला खिशात पैसे कुठं होते. मग ठरलं आता मागे हटायचं नाही. सारस्वत बँकेला रु ५०००० प्रत्येकी लोन ची मागणी केली. तीही sanction झाली. तिकीट काढणं झालं, Voumard चं निमंत्रण पत्र असल्यामुळे तो विसा झटकन मिळाला. आता UK विसा.

हे UK विसा मिळवणं म्हणजे दिव्यच हो. सतराशे साठ documents. आणि त्यावेळेस ची पद्धत सांगतो.

- विसा application द्यायचा. मग प्रायमरी interview होणार.
- ते documents बघणार आणि सल्ला देणार secondary interview द्यायचा कि नाही.
- मग पैसे भरायचे.
- एकदा पैसे भरले कि तुम्हाला विसा मिळो ना मिळो, पैशावर पाणी.

तर आम्ही गेलो UK विसा च्या ऑफिस मध्ये. Primary Interview साठी उभा राहिलो, त्या बाबांनी ४/५ documents पाहिल्यासारखं केलं आणि सांगितलं तुम्हाला विसा काही मिळणार नाही. मी म्हणालो "ठीक आहे तरी आम्हाला सेकंड interview attend करायचा आहे" तो बोलला "विसा reject झाला तर पैसे वाया जातील" म्हणालो "वाया तर वाया" (जीवावर आलं होतं असं म्हणणं, ६००० रु होते हो)

शक्यतो पहिल्या interview ला जे बेणं येतं ते next interview ला येत नाही. पण आमचं नशीब असं पांडू कि तोच पांडू आला. (आता पहिल्या पांडूनंतर यमक जुळवण्यासाठी मी वेगळं नाव लिहिणार असं वाटलं ना. ठीक आहे जे तुमच्या मनात आहे तेच सही) छद्मी हसत म्हणाला "मी तुम्हाला सांगितलं, नका प्रयत्न करू" मी म्हणालो "तात्या, तू interview  घे, बाकीचं मी बघतो" मुलाखत चालू झाली. बरेच प्रश्न झाले. तरी एक इंटरेस्टिंग प्रश्न सांगतो. मी आणि वाघेला आम्ही दोघंही UK ला जाणार होतो.

विसा:  एकटाच आहे कि अजून कुणी आहे तुझ्याबरोबर
मी: नाही अजून एक आहे.
विसा: बोलव त्याला.
(वाघेला आला)
विसा: हा कोण
मी: वाघेला
विसा: तुझं आणि त्याचं काय relation आहे
मी: पार्टनर आहे माझा तो
विसा: कुठला पार्टनर
मी: अं
विसा: is he your family partner. I mean, do you share same bed
मी: भैसाटला का तू, बिझिनेस पार्टनर आहे

तेव्हापासून मी वाघेलाची ओळख "बिझिनेस पार्टनर" अशीच करून देतो. विसा ऑफिसर म्हणाला "उभा राहा बाहेर, तुम्हाला सांगितलं विसा reject होईल, पासपोर्ट घेऊन जा" पासपोर्ट मिळाला आणि बघतो तर कर गोर्याने विसा दिला होता. तिकीट झालं, विसा झाला. alitalia चं तिकीट. सगळ्यात स्वस्त तेच. स्वस्त तेच आपल्यासाठी हे १९९९ पासून आज पर्यंत चालू आहे. तिकिटावर त्यावेळेस जेवण काय पाहिजे ते लिहायचं होतं. मला काहीही चालतं. हो म्हणजे दोन पायाचा माणूस आणि चार पायाची टेबल खुर्ची सोडून. वाघेलाने सांगितलं आपण asvm सांगू यात. (Asian Special Vegetarian Meal). मी म्हणालो "भाऊ, regular सांग. काही होत नाही" तर नाही AVSM च पाहिजे. मग काय घ्या म्हणालो.

मिलान ला stopover घेऊन मिलान-झुरीक विमानात बसलो. सकाळची वेळ होती. भूक पण दाबून लागली होती. सगळ्या co passengers ला ब्रेकफास्ट serve केला जात होता. मी आशाळभूत नजरेने air होस्टेस कडे बघत होतो. अहो, भुकेमुळे, बाकी काही सुचत नव्हतं. शेवटी विचारलंच "मा जगदंबे, खायला न देण्याची आमच्यावर का अवकृपा होत आहे" तर म्हणाली "थांब बाळा, तुमचं special आहे" बाकीचे लोकं मिटक्या मारत खात होते आणि मी जिभल्या चाटत होतो. AVSM सांगणारा आमचा मित्र तर भुकेने कळवळून अर्धमेला झाला होता. तेव्हढ्यात ती पंचादश वर्षीय ललना दोन हातात दोन ट्रे घेऊन आली आणि किणकिणलि "here is your breakfast. enjoy it" आत्यंतिक आनंदाने, म्हणजे अगदी कलावतीला समुद्रात बुडालेली  नौका वर आल्यावर तिच्या पतीला पाहिल्यावर जितका आनंद होतो तितक्याच, मी झाकण काढलं. तर ते Asian Special Vegetarian Meal याचा ब्रेकफास्ट होता एक ४ इंची पाव आणि त्यामध्ये एक उकडलेल्या वांग्याची स्लाईस. आणि extra special म्हणून आलुबुखार सारखं त्यावर एक फळ. Cherry on the cake. वाघेलाचा चेहरा तर पार उतरला होता. आणि मी गुलुगुलु हसत तो भारी ब्रेकफास्ट हादडत होतो

१९९९ लेख २

No comments:

Post a Comment