Sunday 27 July 2014

पुन्हा एकदा सिंहगड

त्याचं असं आहे कि हवामानाचा अंदाज घेऊन जवळ काही गोष्टी बाळ्गाव्या याचा मला लहान पणापासून अंदाज च नाही. म्हणजे हिवाळा आहे, जवळ स्वेटर असावा किंवा पावसाळ्यात छत्री बाळगावी. अं ह. एकदा दिल्लीच्या थंडीत असा काकडलो होतो. शेवटी मित्राबरोबर जाऊन एक ज्याकेट विकत घेतलं तेव्हा व्यवस्थित जमलं. तर सांगायची गोष्ट अशी कि आज बर्याच दिवसांनी सिंहगड सर करायचे ठरले. कार नि पायथ्याला गेलो. पाऊस येणार नाही असं वाटत होतं, पण पावसाळ्याचे दिवस आहेत, येईल तर वांदे होतील. तसं ही पावसात भिजायला आवडतं वैगेरे मी फक्त लिहितो. प्रत्यक्षात मला पाऊस पडताना आवडतो पण तेव्हा मी एक तर कार मध्ये पाहिजे किंवा घरात. मनात आलं छत्री असायला हवी होती. आमचा कार सारथी मणीभाई फार हुशार. त्यात मणीभाई गुजराथी. गेले दोन तीन महिन्यांपासून मी गुजराती लोकांबद्दल त्यांनी काही चूक केली तरी काही बोलत नाही मग तो आमचा कार सारथी असो, बिझिनेस पार्टनर असो कि देशाचा पंतप्रधान. तुम्ही बरोबर. असो. तर मणिभाई ने हुशारपणे सीट खाली ठेवलेली छत्री मला दिसली . ती घेऊन मी कूच करता झालो.

मधल्या काही काळात खाणे, पिणे यावर काहीही धरबंद न राहिल्यामुळे वजन वाढलं आहे. त्यामुळे जरा फुदकतच सिंहगड चढलो. नेहमीच्या ठिकाणी पोहे आणि चहाचा कार्यक्रम झाला. आणि गड उतरायला लागलो.

अर्ध्यावर आलो असेल. समोर एक ग्रुप होता. विविध वयोगटातल्या २/३ स्त्रिया आणि ४-५ छोटी मुलं मुली होती. मी त्या ग्रुप च्या जवळ पोहोचताच पावसाची जोरदार सर आली. आज कधी नव्हे ती माझ्याकडे छत्री होती, ती मी झटकन उघडली. हे केल्या केल्या माझ्या अंगावर सुगंधी फुलांची बरसात झाली असं वाटलं. कारण त्या ग्रुप मधील एक साधारण पंचविशीतली  तरुणी वदली "it is so nice to get wet in rain, isn't it" हे ती बहुधा तिच्याबरोबर जे तिचे पुतणे भाचे होते त्यांना म्हणाली असावी. (ती पोरं पोरी म्हणजे तिची स्वतः ची मुलं नसावीत असा मी सोयीस्कर समज करून घेतला. हो, म्हणजेत भावनेत पाप नको). मी माझ्या डोळ्याच्या कडेने तिच्याकडे बघितलं. मी परत एक सोयीस्कर समज करून घेतला कि ती हे वाक्य म्हणताना ती माझ्याकडे तिरप्या नजरेने बघत होती. म्हणजे माझ्यावर तिने एक comment पास केली असा एक मी मला पाहिजे तसा गोड समज करून घेतला.

आणि मग झालं, मी तरंगत च सिंहगड उतरायच्या बेतात होतो. हातातल्या छात्रीबद्दल मला विलक्षण ममत्व वाटू लागलं. हो, म्हणजे तिच्यामुळेच हा सुवर्णकांचन क्षण मी अनुभवला होता. तिला मी जास्त घट्ट पकडावं असं मला वाटू लागलं. (अहो, छत्रीला… छत्रीला). छत्रीला parachute करणार, तो पर्यंत मी खडकाला वळसा घालून अजून खाली उतरलो. आणि मग ते तप्त शिसासारखे शब्द ह्याच कानांनी ऐकले. "Have you seen that Uncle, He is opening up छाता in this beautiful rain. Such a boring"तोच आवाज, तोच ढंग. मी तरुण झाल्याच्या विचारात दंग असताना ते विचार भंग झाले. (कुठंही यमक)

झालं, म्हणजे टेक ऑफ घ्यायच्या आधीच माझं विमान जमिनीवर उतरलं सुद्धा. आणि मग परत जड पायांनी मी नेहमीप्रमाणे गड उतरता झालो.

"गडावरती जाताना छत्री मध्ये वारा भरून तुमचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे गडावर जाताना छत्री घेऊन जाऊ नये" हे माझं उद्याचं स्टेटस.



No comments:

Post a Comment