Sunday 20 July 2014

परभणी १

काय म्हणावं याला, मंतरलेले क्षण. किंवा योगसाधनेत एक ती अवस्था असते, मेडिटेशन. त्या अवस्थेत म्हणे तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्व problems चा विसर पडतो आणि तुम्हाला एका स्वर्गीय सुखाची अनुभूति होते. काल सकाळी ९:३० वाजल्यापासून सुरू झालेलं मेडिटेशन आज संध्याकाळी ७:३० वाजता संपलं. हो, हो तेच परभणीचे ३६ तास. तब्बल १८ वर्षानंतर आलेल्या माझ्या गावातील व्यतीत केलेले क्षण मला एक अमूर्त आनंद देऊन गेले आणि येणार्या कित्येक वर्षात या आठवणींच्या झोक्यावर मी पुन्हा पुन्हा हिंदोळणार आहे याबाबत मला शंका नाही.

परभणीच्या मित्रांबद्दल मी वेगळे काय लिहीणार. प्रेम, जिव्हाळा या सगळ्या शब्दांचा अनुभव परभणीच्या लोकांकडून अनेक जणांनी घेतला आहे, मी त्याला अपवाद कसा असणार! शिवा आणि निलेशनी घेतलेलं माझं यजमानपद, कर्डेकर डाॅक्टरांची निर्व्याज मैत्री, पोटेकर कुटुंबानी दाखवलेलं आपलेपण, मी केशवराव डंकांचा नातू म्हंटल्यावर RBD चे माझ्या पायाकडे धावलेले हात हे निव्वळ कल्पनातीत होतं. मी काही यांचे आभार मानून ऋणातून उतराई वैगेरे होण्याच्या भानगडीत पडत नाही. ते ओझं राहू द्यावं म्हणतोय, वेळ येईल तेव्हा उतरवीन खांद्यावरून.

बाकी मला एक पटलं की मी पक्का परभणीकर आहे, अगदी ३० वर्षांपासून फारकत घेतली तरीही. अगदी दिलेली वेळ न पाळणे हा गुण माझ्यात देखील तंतोतंत उतरला आहे. फक्त रेल्वेचं भाडं देउन तिकीट काढल्यामुळे त्याच्या वेळा पाळण्याइतका व्यवहार्य अवगुण माझ्यात आला आहे. परभणीकर रेल्वे सुद्धा सोडून देऊ शकतो.

असो, खालील दोन चित्रे माझ्याशी निगडीत. एक माझं आजोळ. यठिकाणी साधारण ३५ वर्षापूर्वी १२ खोल्यांचं घर होतं. त्याच्या बाहेर एक सुंदर बाग़ होती, जिथे केवड़ा, आंबा, चिकू, जांभूळ अशी झाडं होती, असंख्य फुले असायची. उन्हाळ्यात कमीत कमी ३० लोकांची पंगत बसायची. अशा एका स्वर्गीय राजमहालाचं आज असं खंडहर झालेलं बघून मी गलबललोच. पण काय करणार कालाय तस्मै नम:

आणि दुसरं आहे आमचं घर. तिथे आता लहान मुलांची शाळा आहे. मी फोटो काढतोय बघून एका बाईंनी विचारलं कशासाठी, मी कारण सांगितलं. बाई पण चुकचुकल्या अन म्हणाल्या तुमची वास्तु भाग्याची आहे. काय म्हणणार कालाय तस्मै नम: 


No comments:

Post a Comment