Sunday 30 April 2017

Reputation and Charecter

कालच्या पोस्टमधील शेवटच्या वाक्याबद्दल अजून लिहा असा मेसेज आला. त्यामुळे जितकं मला कळतं तितकं लिहितो. 

आपली प्रतिष्ठा (reputation) ही दुसऱ्यांच्या सापेक्ष असते. तर चारित्र्याची (charecter) मालकी आपली स्वतः ची असते. प्रतिष्ठेचा उदोउदो हा दुसर्यांना प्रभावित करण्यासाठी होतो. समोरच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल आदर, भीती, दरारा निर्माण करण्यासाठी आपण प्रतिष्ठेचं वलय आपल्या आजूबाजूला तयार करतो. चारित्र्य हे मात्र स्वतः साठी असतं. एक माणूस म्हणून आपल्या नजरेत मी कसा आहे ते चारित्र्य. त्याला उदोउदो करावा लागत नाही, वलय पण तयार होत नाही. ते फक्त असतं. प्रतिष्ठित माणसं चारित्र्यवान असतीलच याची खात्री नसते. 

प्रतिष्ठेची साथ सावलीसारखी असते.  वेळ बदलेल तशी सावली मोठी छोटी होते. ती फक्त प्रकाश असेपर्यंत साथ देते. अंधार झाला की सावली साथ सोडते.  प्रतिष्ठा फक्त गोष्टी चांगल्या असतील तोवर साथ देते. क्रायसिस, एखादी चूक, मोह याला बळी पडल्यावर ती धुळीला मिळते. 

चारित्र्याला काही मोजमाप नसतं. एकतर ते असतं किंवा नसतं. ऊन, थंडी, दिवस, रात्र ते तुमच्याबरोबर असतं. तुमच्याकडे कुणाचंही लक्ष नसताना, तुम्ही एकटे असताना तुमचं वागणं जे घडवतं ते चारित्र्य. एकटंच बसून आपण जेव्हा स्वतः बद्दल विचार करतो "मी कसा आहे?". त्याचं उत्तर म्हणजे आपलं चारित्र्य. ते उत्तर भीषण असतं म्हणून आपण विचार करत नाही आणि मग प्रतिष्ठेला चारित्र्य समजून स्वतः ला फसवत राहतो. 

आणि कालचं वाक्य परत लिहितो. 

बऱ्याच वेळा परिस्थिती अशी येते की प्रतिष्ठा जपण्याच्या नादात आपण चारित्र्य गमावून बसतो. 

(जिच्या आयुष्यात तुफान स्ट्रगल चालू आहे, त्या व्यक्तीचा आताच फोन झाला. त्या व्यक्तीला टॅग करायचा मोह टाळतो. पण ही पोस्ट तिला समर्पित)

No comments:

Post a Comment