Friday, 31 October 2025


विंदा, पाडगावकर आणि बापट हे पूर्वी एक कवितेचा कार्यक्रम करायचे. कधी बघण्याचा योग आला नाही पण खूप लोकप्रिय होता असं ऐकून आहे. थोडं अवघडच काम आहे, कवितेच्या माध्यमातून तीन तास लोकांना खिळवून ठेवणं. वीस एक वर्षापूर्वी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी आणलेला आयुष्यावर बोलू काही हा आगळावेगळा कार्यक्रम तुफान यशस्वी झाला. सौमित्र आणि अजून काही समकालीन कवीनी या फॉर्म मधे प्रयोग केले आणि रंगत आणली. 

याच पठडीतील पण बहुधा असा प्रयोग पहिल्यांदाच केला असावा की बासरी आणि काव्य यांचं फ्युजन. वैभव जोशी आणि अमर ओक यांचा "ऋतू बरवा". एखादा कार्यक्रम सुरू झाल्यापासून पहिल्या मिनिटाला तुमच्या मनाची पकड घेतो ती तीन तासाने "आता विश्वात्मके देवे" ने शेवट झाला की सैलावते. मधल्या काळात वैभव आणि अमर ओक आपल्याला वेगवेगळ्या प्रवाहातून नेत राहतात. एकही सादरीकरण टाळ्यांच्या कडकडाटाशिवाय संपलं नाही आणि अंगावर काटा यावेत असे अनेक क्षण कार्यक्रमात येतात. 

अमर ओक यांना अनेक वेळा टीव्ही वर बघितलं आहे. प्रत्यक्ष पहिल्यांदाच ऐकलं. आपल्या वाद्याचा आब राखत, आदर ठेवत ज्या वेगवेगळ्या गाण्याच्या धून त्यांनी बासरीद्वारे ऐकवल्या त्या केवळ लाजवाब. सगळ्यात कहर केला जेव्हा त्यांनी "युवती मना" जेव्हा सादर केलं. शब्द तर कळत होतेच पण अनेक ठिकाणी मधल्या जागा सुद्धा त्यांनी अशा नजाकतीने पेश केल्या की क्या बात है. असे विस्मयचकित करणारे अनेक क्षण आपल्या जादुई कलेतून देत राहतात. 

बाकी वैभव जोशींबद्दल मी काय लिहावं? शब्द तर त्यांना वश आहेतच पण त्यामागचा भाव जेव्हा ते उलगडून सांगतात, त्यामागच्या विचारधारे बद्दल सांगतात, तेव्हा ती कविता आपल्यात भिनत जाते. वैभव स्वतःच्या च नव्हे तर इतर कवींच्या कवितेबद्दल फार आत्मियतेने बोलतात हे सुद्धा कार्यक्रमात ओघाने येतं, तेव्हा आपल्याला कळतंच. (कधी वेळ झाला तर त्यांचा स्पृहा जोशी बरोबरचा एक व्हिडिओ आहे, बालकवींची औदुंबर कविता समजावून सांगताना. कमाल आहे). 

या निरुपणाचं महत्व कळतं ते भरतीचा माज नाय आणि ओहटीची लाज नाय हे ऐकताना. या कवितेचा इतका भडिमार झाला आहे की ती ऐकताना आता बोअर होईल की काय अशी शंका येते. पण वैभव त्या मागचा भाव सांगतात आणि ती मग आपल्याला नव्याने कळत जाते. पुरिया धन "श्री" ओक सादर करतात आणि त्याला जोडून वैभव मग सौ रागाची जेव्हा "आज कुठली भाजी आहे" वर गाडी नेतात तेव्हा बहार येते. मनाला उभारी देणारी "उजाडलेला दिवस पहिला, याहून मोठे सुख ते काय" याद्वारे अंतर्मुख करून जातात.  बरं ते सगळं सादर करताना कधी तात्विक वाटतं तर कधी सात्विक वाटतं. 

या दोघांशिवाय चार वादक आहेत. तबला, ढोलकी, ऑक्टपॅड आणि की बोर्ड. 

No comments:

Post a Comment