Sunday 27 April 2014

क़िस्सा गमतीचा

क़िस्सा गमतीचा (सहजच आठवला Mandar Kale यांच्या पोस्टवरून, पण त्यांच्याही लक्षात येणार नाही, कुठल्या पोस्टवरून ते)

१९९७-९८ असावं. मुंबईहून आलो होतो. डेक्कन क्वीन ने. (डेक्कनचं नाव घेतलं की मी आजही काॅलेजमधल्या एखाद्या सुंदर मुलीची आठवण आल्यासारखा लाजतो. काय ते crush काय म्हणतात ना तसंलंच काही तरी). शिवाजीनगरला उतरलो. हो, तेव्हा चतुश्रूंगीसमोर, विद्यापीठ रस्त्यावर रहायचो. (नाही म्हणजे घर होतं बरं का MSEB चं quarter, नाही तर तुम्ही म्हणणार............). रिक्शाने जायचं होतं. पुण्यातल्या रिक्शावाल्यांशी कसं वागायचं हे एव्हाना मी शिकलो होतो. समोर जणू मर्सिडीज़ उभी आहे, माझ्यासाठी या टेचात निघालो. (हिरो होंडाने संचार होता तेव्हा). एक जण आला मागे "कुठं जायचं".
मी "चतुश्रूंगी"
तो: मीटरवर १० रू द्या.
मी: ५ देईल
तो: ठीक आहे. या.

रिक्शा मिळाली (अवार्ड मिळाल्याच्या अविर्भावात). निघालो, असं म्हणेपर्यंत रिक्शा राहुलच्या समोरच्या पेट्रोल पंपावर जाउन थांबली. बर्यापैकी लाईन होती तिथे.

मी: काय हो
रिक्शाधिपती: पेट्रोल संपत आलं आहे, भरावं लागेल
मी: अहो, दाढ़ी करायचा धंदा काढला तर वाटी वस्तरा नको का बरोबर.
तो हसला फक्त.
मी: (घड्याळ्याकडे बघत) खूपंच वेळ लागतो हो. (खरंतर माझा एक डोळा मीटरकडे होता. तिथला flag पडला की कसंतरीच व्हायचं)
रि: (थोडा जरबेनंच) ट्रेनला १० मिनिटे उशीर झाला असता तर बोलला असता का काही. गपगुमान बसलाच असता ना?
सवाल बिनतोड होता.
मी: अहो दादा, ट्रेनचा ड्रायव्हर आला नव्हता माझ्यामागे निमंत्रण देत "या, बसा माझ्या गाडीत म्हणून"
उत्तर पण बिनतोड होते. नंबर आला, पेट्रोल भरले. त्याने किक मारली (खरंतर हात वापरतात, किक का म्हणावं) आणि म्हणाला
"इथं भेटलात वर नका भेटू"

मी: वर कसं भेटणार, तुम्ही स्वर्गात अन मी नरकात

मागं वळून त्यानं smile दिलं. ५ मिनीटात आलंच घर. पैसे दिले. मीटरच्यावरचे ५ रू त्याने परत दिले, म्हणाला "स्वर्गात जागा दिल्याबद्दल"

मी काही म्हणेपर्यंत गिअर टाकून गेलाही तो!!

No comments:

Post a Comment