Wednesday, 22 May 2019

लाल्या

लाल्या,

बास! आता पुरे झालं. नियतीने तुझ्या आयुष्याचा खेळ केलाय, पण त्याला तू पुरून उरलास. आता याच्या पुढचं आयुष्य तू मनमुराद जग. जगरहाटी च्या मागे फरफट पुरे झाली.

स्वतःची तब्येत सांभाळ. दणदणीत बँक बॅलन्स कर. ज्या कौटुंबिक इको सिस्टमने तुझी वाताहत केली त्या सिस्टम ला आता निरोप दे.

पारमार्थिक होण्यासाठी आधी स्वार्थी होणं गरजेचं आहे. ते तू होच. विमानात सुद्धा हवेचा दाब कमी झाला तर दुसऱ्याला मास्क लावायच्या आधी स्वतःला मास्क लावायला सांगतात. त्यामुळे दुसर्यांना मदत करण्याआधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या बलशाली बनव.

तुझ्या आयुष्याच्या जात्याचा एक दगड आहे कर्मकांड आणि एक दगड आहे स्वार्थी मानसिकतेचा. खुट्टा फिरवतोय तो विधाता अन भरडला जातोय तो तू. आता बास! तो खुट्टा घे तुझ्या हातात. त्या कर्मकांड वाल्या दगडाला बनव तुझं आर्थिक स्थैर्य अन स्वार्थी सिस्टम ला बनव तुझं मानसिक स्थैर्य. अन ते जातं फिरवल्यावर एक कसदार दळण येऊ दे.

तुझ्या संसाराच्या सहाणेवर दुःख उगाळतात तुझीच लोक. आणि ज्यांनी तुला सहारा द्यावा तेच फासतात दुःखाचे लेप तुझ्या अंगभर.

त्या नियंत्याने तर अन्याय केलाच तुझ्यावर पण जित्याजागत्या जवळच्या लोकांनी पण मानसिकदृष्ट्या तुला लुटलं. उंटावरून शेळ्या हाकत मानभावीपणे सल्ले द्यायला फार अक्कल लागत नाही. समारंभपूर्वक जेवण झाल्यावर भरल्या पोटी पान खाऊन मारलेल्या पिचकारी इतकीच त्यांची किंमत.

तू ही तितक्या तटस्थपणे त्याकडे बघ.

आणि हो आता भिऊ नकोस, कारण तुझ्या पाठीशी कुणीच नाही आहे.

माझं म्हणशील तर मी तुझ्या पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लावून उभा आहे.

तू फक्त आवाज दे आणि हा तुझा मित्र हजर होईल.

अरे, आयुष्यात अवघड प्रश्न समोर आले आणि हतबुद्ध वाटलं तर लाल्या, मी तुला डोळ्यासमोर आणतो. इतकं तर मला तुझ्यासाठी करावंच लागेल मित्रा.

तुझ्या गावी आलो की भेटूच.


Wednesday, 15 May 2019

याला तयारी पाहिजे

गिरीश कुलकर्णीना मी आश्वस्त केलं की मी त्याची पूर्ण काळजी घेईन. माझ्या कंपनीत आहे तो, काळजी करू नका.

तो मला म्हणाला, मला इंजिनियरिंग करायचं आहे. मी त्याची पटकन ऍडमिशन घेऊन टाकली. मग कौन्सिलर म्हणाला दोन्ही एकत्र नाही करू शकणार. एकतर कॉलेज नाहीतर काम. त्याने काम निवडलं.

पोरगं हुशार, मेहनती. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊ लागला. मलाही स्वतःबद्दल बरं वाटू लागलं.

एकदा आजारी पडला, वजन कमी होऊ लागलं. सरळ घरी घेऊन आलो. तब्येत चांगली झाली असं वाटल्यावर चार दिवसांनी रूमवर जाऊ दिलं.

मी अशात निवांत झालो. आयुष्य माझ्यासमोर घडत होतं.

काही दिवसांपूर्वी आला. म्हणाला बीई चे ऍडमिशनचे पैसे परत द्यायचे आहेत. मी म्हणालो, मी विसरलो ते. एखाद्या संस्थेला दे. ठीक आहे म्हणाला.

एक महिन्यापूर्वी त्याने राजीनामा दिला. मित्र म्हणवणाऱ्या एका स्पर्धक कंपनीने त्याला उचलला. आणखी दोघे घेतले. त्यांचं ठीक आहे, पण हा पोरगा पण.....धक्का बसला.

राम कडे गेलो. कैफियत मांडली. निर्विकार चेहऱ्याने मला राम ने एक कागद सरकवला. विंदांची गझल होती. 

अग्नीमुळे प्रगती घडे,
हे अन्नही त्याने शिजे,
चटका बसे केव्हातरी,
त्याला तयारी पाहिजे

पुष्पे, फळे अन सावली,
वृक्षातळी या गावली
काटा अभवित टोचता,
त्याला तयारी पाहिजे

आपुल्या चुकांना आपण
इतरांस त्या दिसती परि
त्याचीच चर्चा व्हायची,
त्याला तयारी पाहिजे

केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे.

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे

ही कवितेची ताकद. चार तास भडभड बोलून जे सांगता येईल ते काही ओळीत. विंदा तुम्ही कालातीत आहात. निरोपाचे दोन शब्द ही घ्यायची तसदी पोराने घेतली नाही हे विसरलोय आणि कामाला निघालोय. 

Tuesday, 14 May 2019

अमेरिका

अमेरिकन जेफ हा जर इथल्या समाजाचा प्रतिनिधी आहे असं मानलं तर हा देश जगाच्या इतक्या पुढं का आहे याचा मी विचार केला. काही जाणवलेल्या गोष्टी.

१. इनोव्हेशन: मला असं वाटतं की इनोव्हेशन हा अमेरिकेचा, खरंतर प्रत्येक प्रगत देशाचा आत्मा आहे. याआधी प्रत्येक ट्रिप मध्ये मी हॉटेल मध्ये राहिलो. मात्र डिसेंबर १८ मध्ये मी अभिजित बिडकर, शिल्पा केळकर, कॅनडात माझी बहिण स्वाती आणि या ट्रिप मध्ये जेफच्या घरी राहिलो. नाही म्हणायला मध्ये एकदा डेट्रॉईट मध्ये पल्लवी सप्रे कडे गेलेलो, पण ते दोन एक तासासाठी. या सर्व वास्तव्यात मला सगळ्यात जास्त काही भावलं असेल तर जगणं सुसह्य करणाऱ्या अत्यंत नाविन्यपूर्ण आणि कल्पक गोष्टी. वाईन बॉटल चा कोर्क ओपनर, टिन डब्याचं झाकण उघडण्यासाठी चकतीची सूरी, वेगवेगळ्या पदार्थासाठी अलग चाकू, छोटी गारबेज कॉम्पॅक्ट करणारी मशीन, ब्लेड विरहित फॅन्स ही रोजच्या जगण्यातील. बाकी टेस्ला, ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, थ्री एम या जगातल्या सर्वोत्कृष्ट इनोव्हेटिव्ह कंपन्या इथल्याच. थ्री एम ने तर अक्षरशः हजारो इनोव्हेटिव्ह प्रोडक्टस अमेरिकेला अन पर्यायाने जगाला दिले. पोस्ट इट, स्क्रोच बाईट, यु क्लिप ही पटकन पाठवलेली.

मी जेव्हा इथल्या सेटको मध्ये फिरतो तेव्हा अशीच कल्पक इक्विपमेंट बघायला मिळतात. अन त्यामुळेच या लोकांची उत्पादकता खूप जास्त आहे. उदा: इथे महिन्याला १२० स्पिंडल रिपेयर करण्यासाठी १२ जण आहेत तर भारतात तीस जण.

२. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता: प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट. अगदी फूड प्रोडक्ट पासून ते युटिलिटी गोष्टी ते इंडस्ट्रीयल गुडस यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वोत्कृष्टतेचा ध्यास हा जागोजागी दिसून येतो.  मी यावेळेस जेफच्या घरात अनेक गोष्टी हाताळल्या. उदा: वॉटर बोट, फिशिंग बोट, कयाकिंग बोट, त्यासाठीचा डॉक, ग्रील, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक कुकिंग, वॉर्ड रोब, खिडक्याचे ब्लाइंडज, दरवाजे. सगळीकडे गुणवत्ता एक नंबर. आपल्याकडे या गोष्टी उपलब्ध आहेत, फक्त त्याची प्राईस मोजायची तयारी नाही. सेकंड क्वालिटी मालाला आपण कमी किमतीत घेतो, स्वीकारतो आणि अडकतो. चलता है, हे ग्राहक म्हणून आपण स्वीकारलं आहे म्हणून उत्पादक पण तसं वागतात.

थोडक्यात सर्वोत्कृष्ट गुणवत्ता हा माईंड सेट आहे.

३. स्वयंशिस्त आणि स्वच्छता: कुठंही दिखावा नाही पण ही या लोकांची जीवनप्रणाली आहे. अगदी सांगायचं तर जेवण बनवल्यावर सर्व गोष्टी घासून पुसून जागच्या जागी ठेवणं, सर्व बाथरूम मध्ये नॅपकिन, टॉवेल, लिक्विड सोप हे जागच्या जागी असणे, कचऱ्याची तीन बिन्स मध्ये इमानेइतबारे विभागणी करणे, एक सुका कचरा, दुसरा रिसायकल कचरा आणि तिसरा कंपोस्टिंग. वेळेच्या शिस्ती बद्दल तर मला बोलायचा अधिकारच नाही. अक्षरशः दोन एक वर्षांपूर्वी पर्यंत मला लाज वाटावी इतका नालायक होतो वेळ पाळण्याबद्दल.

इतक्यांदा कार पार्क करताना मी बघितलं. पण प्रत्येकजण, प्रत्येकवेळी अँड आय मीन इट, पार्किंग रेषेला समांतर.

अख्खी बोट पुसली आम्ही रविवारी दुपारी. पंधरा वर्षे झालीत बोटीला पण आजही नवी कोरी दिसते ती. मी आणि यश राहिलो ती रूम आम्ही आवरून ठेवली पण मला खात्री आहे, उद्या अटलांटा हुन जेफ सिनसिनाटी ला जाताना वाट वाकडी करून टेनेसी ला जाणार, ती रूम आवरणार. आणि हा सेटको चा प्रेसिडेंट आहे. मुख्य म्हणजे या गोष्टींचं अवडंबर नाही.

या चार मूलभूत गोष्टी अमेरिकन समाजात ठासून भरलेल्या आहेत आणि त्यामुळे ही खऱ्या अर्थाने महासत्ता आहे.

मला न आवडणाऱ्या दोन गोष्टी:

१. ऊर्जेचा प्रचंड अपव्यय: या बाबतीत हा देश विचार का करत नाही हा मला नेहमी प्रश्न पडतो. युरोप या बाबतीत अमेरिकेच्या कैक पटीने सजग आहे. रात्रंदिवस इथले लाईट ढनढन जळत असतात. याबाबतीत हे इतके मागासले आहेत की रूम मध्ये लाईट स्विच ऑफ करणारी रूम की पण नसते. कुणीही नसताना टीव्ही, फॅन, एसी कायम चालू असतात. ऊर्जा वाचवणारी मास ट्रान्सपोर्ट सिस्टम या देशाला माहीत नाही. सगळे जण कार घेऊन फिरत असतात. अन ते ही अगडबंब कार्स. कमीतकमी २ लि ते ६ लि इंजिन पर्यंत.

२. खाण्याचे दणदणीत पोर्शन: कुठल्याही हॉटेल मध्ये गेलो की मला अक्षरशः भीती वाटते, दणकन किती खायला देतील ते. बरेच जण तितकं संपवतात अन काही जण टाकून देतात.

असो. माझ्या मध्यमवर्गीय समाजवादी मनाला आणि भांडवलवादी मेंदूला जाणवलेल्या या गोष्टी.

वयाची पन्नाशी पालटली पण एकदा आपण आयुष्यभरासाठी विद्यार्थी आहे असं ठरवलं की स्वतःमध्ये बदल घडवणाऱ्या गोष्टी शिकता येतात हेच प्रवासाचं फलित आहे असं मला नेहमीच वाटतं.

Wednesday, 8 May 2019

डोनाल्ड

सिनसिनाटी एअरपोर्ट पासून माझं हॉटेल साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. रस्त्यात एक अपघात झाला होता. त्यामुळे मला जवळपास एक तास लागला. उबर टॅक्सी केली होती. डोनाल्ड नाव होतं ड्रायव्हरचं. साधारण पंचावन्न वगैरे वय असावं.

डोनाल्ड गप्पा मारत होता. तो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होता त्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. जगातल्या घडामोडीबद्दल त्याला ज्ञान होतं. भारताबद्दल त्याला माहिती होती. मी डोनाल्डला विचारलं "उबर टॅक्सी चा बिझिनेस करण्याआधी, तू काय करत होता?".

त्याने जे उत्तर दिलं, ते ऐकून मी सर्द झालो. तो म्हणाला "आयएनजी मध्ये मी फायनान्स चा व्हाईस प्रेसिडेंट होतो. आणि त्यानंतर अकसा मध्ये." मी आपल्या मराठी मानसिकतेला जागून त्याला विचारलं "इतक्या चांगल्या पगाराची नोकरी तू का सोडली?".

डोनाल्ड म्हणाला "भविष्यात मला जितके पैसे लागतील ते माझे जमा झाले होते. मला फक्त आजचा खर्च भागवायची गरज होती. माझ्या फायनान्स जॉब मध्ये टेन्शन होतं आणि तितक्या पैशाची गरज नव्हती. उबर बिझिनेस हा परफेक्ट ऑप्शन होता. मला पैसे मिळतात, अनेक ठिकाणी फिरायला मिळतं आणि तुझ्यासारख्या लोकांना भेटता येतं. मला नातू आहेत. फॅमिली साठी मला वेळ देता येतो."

मला हेवा वाटला त्याचा. एखाद्याचं सरळ कौतुक करायचं नाही हा माझा बाणा. त्याला जागत मी म्हणालो "आजकालच्या जगात उबर, एअर बीएनबी सारख्या खूप संधी मिळतात. त्यामुळे असे निर्णय घेता येतात......."

मला मध्ये थांबवत डोनाल्ड म्हणाला "अशा संधी आज असतात असं नाही. माझे वडील एमआयटी चे सिव्हिल इंजिनियर होते. स्वतःचा बिझिनेस होता त्यांचा. पण १९८५ साली त्यांनी सिव्हिल बिझिनेस बंद केला अन कारण हेच. त्यांच्या भविष्यासाठी लागतील तितके पैसे जमा झाले होते. पुढचे पंचवीस वर्षे त्यांनी फूड ट्रक चालवला. आज ते ८७ वर्षाचे आहेत. आणि लाईफ एन्जॉय करत आहेत."

मी विचारलं "तुझ्या मुलांसाठी काही एक्स्ट्रा पैसे कमवावे असं तुला वाटत नाही का?"

तर तो पटकन म्हणाला "नाही! मला त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यांच्या साठी पैसे कमवून मला त्यांच्या पंखातील बळ कमी करायचं नाही. I strongly believe that giving money more than children deserve  is biggest de-motivator for them."

गप्पा मारताना हॉटेल आलं.

आयुष्य शिकवणारे मास्तर कुणाच्या रूपात कुठं भेटतील हे सांगता येत नाही.