Wednesday 14 December 2016

वाघेला

युके चा व्हिसा काढायला मी १९९९ ला मुंबई ला गेलो. मी आणि प्रदीप, माझा बिझिनेस पार्टनर, दोघे स्वित्झर्लंड हुन ऑफिशियल काम आटोपून प्रदीपच्या बहिणीला भेटायला युके ला जाणार होतो. इंटरव्ह्यू मध्ये व्हिसा ऑफिसरने विचारलं "are you traveling with someone?" मी म्हणालो "Yes, my partner" तर तो म्हणाला "what partner" मी म्हणालो "What do you mean" तर तो म्हणाला "I mean, do you share same bed". मी ताडकन उडालो. आणि म्हंटलं "No no, he is my business partner".

जोक्स अपार्ट, पण जितका वेळ आपण घरी जागे असतो, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीत असतो. त्यामुळे बिझिनेस पार्टनर हा चांगला मिळणं हे भाग्याचं लक्षण. मी त्याबद्दल भाग्यवंत आहे. बरेच जण विचारतात, तुमची पार्टनरशिप कशी काय टिकली?

बाकी कुठल्याही मुद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघातल्या विसंगती:

- आमच्या दोघातला वयाचा फरक. इतर नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये बहुतेकदा समवयीन मित्रात एकत्र बिझिनेस करण्याची हुक्की येते. माझ्यात आणि प्रदीपच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षाचं अंतर आहे. मग वयोपरत्वे असणाऱ्या महत्वाकांक्षेत फरक आहे.

- मी डोक्यापासून पायापर्यंत मराठी. तर प्रदीप मूळ गुजराती पण जन्मला आणि मोठा झाला पुण्यात.

- प्रदीप अत्यंत शिस्तशीर आणि वक्तशीर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतेक दिवशी त्याच्या रुटीन मध्ये एका सेकंदाचा फरक नसतो. त्याने येण्याची वेळ द्यावी आणि आपण घड्याळ त्या प्रमाणे लावावं. गॉगल केस मध्ये ठेवणे, बॅगेत ठेवणे, त्याची झिप लावणे, ११:३० वाजता न चुकता काही तरी खाणे, दररोज तितकीच सिगरेट पिणे, तितकेच जेवणे आणि बरंच काही. मी याच्या बरोबर उलट. मी एकाच रस्त्याने चार दिवस घरून कंपनीला जाऊ नाही शकत.

- एखादी गोष्ट त्याच पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे प्रदीप चं स्पिन्डल रिपेयर चं स्किल वादातीत आहे. आणि त्याचा आमच्या बिझिनेस ला खूप फायदा होतो. मी मात्र सगळ्याच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान बाळगून आहे. हो हो तेच jack of all........ त्यामुळे आमच्या कोअर स्किल मध्ये मी लक्ष घालत नाही आणि बाकी सपोर्ट सिस्टम मध्ये त्याला लक्ष घालायची गरज पडत नाही.

- बिझिनेस चालू केल्यापासून ते आतापर्यंत प्रदीप ने मला एक पैशाचा, and I mean it, एक पैशाचा हिशोब मागितला नाही आहे.

- कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्यातील संभाव्य धोके त्याला बरोबर लक्षात येतात. पण त्या धोक्यावर मात कशी करायची हे सांगितलं तर त्याच्या मतावर आडून राहण्याचा तो आडमुठे पणा करत नाही. मी सुद्धा काय करायचं यावर ठाम असतो पण कसं करायचं यावर वेगवेगळे मार्ग प्रयत्न  करायला फ्री ठेवतो.

- तो हात, पाय अन डोके शाबूत असेपर्यंत कंपनीत काम करणार आहे. माझी इंजिनियरिंग करिअर पुढील २-४ वर्षात थांबणार आहे. नाही, मी रिटायर नाही होणार, पण काही दुसरे प्लान्स आहेत. (नाही नाही, लेखक पण नाही होणार)

असे खरं तर अनेक मुद्दे आहेत. काही साम्य स्थळे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांचे गुणदोष स्वीकारले आहेत. आमची भांडणं पण प्रचंड झाली आहेत. पण त्या सगळ्यांना ही पार्टनरशीप पुरून उरली आहे. नॉर्मल माणसात असतो तितका अहंकार दोघातही आहे, पण आमच्या पेक्षा कंपनी मोठी आहे हे दोघांच्या ही पक्के लक्षात आहे. नातेवाईक कंपनीत कामाला ठेवायचे नाहीत यावर दोघांचे एकमत आहे.

आज हे सगळं लिहायला हरकत नाही आहे. कारण पुढचं वर्ष हे आमच्या पार्टनर शिप चं रौप्य महोत्सवी वर्ष असणार आणि आता जे काय उरलेले काही वर्षे आहेत त्यात ती तुटणं आता तरी असंभव वाटतं.

आणि हो, तुम्हाला जो पार्टनर माहित आहे तो प्रदीप नाही आहे. तो तिसराच आहे अजून. त्याला भेटायचं असेल तर तुम्हाला कंपनीत यावं लागेल.



प्यासा

काही शब्द असे असतात की ते उच्चारले की त्या संबंधित काही वेगळ्या गोष्टी लक्षात येतात. उदा: वैशाली म्हंटलं की मला पुण्यातील हॉटेल आठवतं किंवा डेक्कन म्हंटलं की डेक्कन क्वीन असं काहीसं.

प्यासा म्हंटलं की मला गुरुदत्त चा सिनेमा आठवतो. कधी पहिला आता आठवत नाही, पण इतका इंटेन्स सिनेमा खूप कमी नंतर पाहण्यात आला.  आणि त्यातील ते गाणं "ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया". एखादं गाणं आपलं मूड बदलवून टाकतं. तसं हे गाणं ऐकलं की आपण कितीही खुश वा रोमँटिक मूड मध्ये असलो तर एक उदासीची छाया मनावर सरसरत जाते. एखाद्या इराण्याच्या हॉटेल मध्ये गेलो की तिथलं वातावरण पाहून कसं डिप्रेशन येतं अगदी तसं च.

साहिर लुधियानवी काय ताकदीचे गीतकार आहेत हे माझ्यासारख्या कानसेनाने वेगळं आळवायची गरज नाही. आणि हे गीत त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्यातल्या त्यात एखाद्याने आपल्याला फसवलं असेल, अन असे प्रसंग भरपूर आले असतात, अन हे गाणं चुकून कानावर पडलं तर मनातील आग डोळ्यातून पाणी बनून कधी व्हायला लागते ते कळत पण नाही.

एकेक शब्द साहिर साहेबांनी तावून सुलाखून निवडला आहे. अंगार नुसता. "तुम्हारी है, तुम ही संभालो ये दुनिया" सांभाळ भाऊ, ही तुझी दुनिया तुलाच लखलाभ.

"वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है," मित्रा, अरे तू काय बोलतोस तुला काही कळतं का? म्हणजे दोस्तीच्या खातीर मी तुला काही म्हणत नाही याचा अर्थ असा नाही की तू मला इतकं मूर्ख समजावं.

मागच्या आठवड्यात असाच झालेल्या फसवणुकीने उद्विग्न झालो असताना हे गाणं ऐकलं अन अक्षरश: तिथर फितर झालो. घरी येऊन नील ला ऐकवलं. १२ वर्षाचा तो. गाणं ऐकल्यावर त्याच्या नजरेत ली उदासी पाहून मी थिजलो अन साहिर साहेबांना मनोमन सलाम केला. त्या शब्दांनी नील च्या मनावर इतकी पकड घेतली की त्याने गाणं शोधून वहीत पूर्ण लिहून पाठ करून टाकलं.

रफी साहेब आणि एस डी आहेत पण कमाल केली आहे ती साहिर लुधियानवी यांनीच.


ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया,
ये इन्सान के दुश्मन समाजों की दुनिया,
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

हर एक जिस्म घायल, हर एक रूह प्यासी,
निगाहों में उलझन, दिलों में उदासी,
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

यहाँ एक खिलौना है इन्सान की हस्ती,
ये बस्ती है मुर्दा परस्तों की बस्ती,
यहाँ तो जीवन से है मौत सस्ती,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

जवानी भटकती है बदकार बन कर,
जवां जिस्म सजते है बाजार बन कर,
यहाँ प्यार होता है ब्यौपार बन कर,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है,
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है,
यहाँ प्यार की कद्र ही कुछ नहीं है,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

जला दो इसे, फूँक डालो ये दुनिया,
मेरे सामने से हटा लो ये दुनिया,
तुम्हारी है, तुम ही संभालो ये दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

क्रेडिट कार्ड

मी पाहिलं क्रेडिट कार्ड १९९० साली घेतलं. सिटीबँक.

१९९४ साली मी सेल्स च्या जॉब मध्ये शिफ्ट झालो.

तेव्हापासून क्रेडिट कार्ड बेधुंद वापरतोय. पण गेल्या २२ वर्षात एकदाही, अँड आय मिन इट, त्याचं पेमेंट ड्यु डेट च्या नंतर भरलं नाही आहे. कारण क्रेडिट कार्ड हा पेमेंट चा ऑप्शन आहे, ते पैसे नाहीत.

सध्या मी तीन कार्ड वापरतो. दोन कंपनीसाठी आणि एक पर्सनल. माझ्या कित्येक देशी अन परदेशी टूर वर मी अक्षरश: एकही रुपया कॅश मध्ये खर्च करत नाही. आज अहमदाबाद मध्ये हॉटेल मध्ये चेक आऊट करताना क्रेडिट कार्ड नव्हतं म्हणून तारांबळ उडाली. तो म्हणाला ए टी एम जवळ आहे, कॅश काढून आणा. मी त्याला बोललो, मी गेल्या सोळा वर्षात ए टी एम मधून पैसे काढले नाही आहेत. हे वाचताना जसं तुम्ही "फेकतोय" असा विचार करताय तसं तो ही म्हणाला. पण ती वस्तुस्थिती आहे, कारचा हॉर्न वाजवत नाही तशीच. अजून पुढे जाऊन सांगतो गेल्या सात वर्षात मी बँकेतून कॅश चार किंवा पाच वेळा काढली असेल. ती ही आमच्या अकौंट्स ऑफिसर ने. सेव्हिंग अकौंटच्या व्यवहारासाठी मी कित्येक वर्षात बँकेत गेल्याचं मला आठवत नाही आहे.

किंबहुना सगळ्यांनी प्लास्टिक मनी चा मुबलक वापर करावा, मी या मताचा आहे. आणि मध्ये अर्थक्रांती नावाची एक टूम निघाली होती. ब्लॅक मनी वर कंट्रोल आणण्यासाठी. ती कितपत व्यवहार्य आहे, या बद्दल शंका आहे. पण प्लास्टिक मनी चा अधिकाधिक वापर हा ब्लॅक मनी वापरात न आणायचा सामान्य माणसाकडे सर्वोत्तम उपाय आहे असं मला वाटतं.

मी कुठंतरी वाचलं होतं की स्कँडेनेव्हीयन देशात ९०% वर व्यवहार प्लास्टिक मनी ने होतात. लक्झेम्बर्ग, स्वीडन, नॉर्वे या देशात बरेच व्यवहार प्लास्टिक मनी ने होतात. हे सारे देश जगातल्या सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम पैकी आहेत. आणि इथे करप्शन लेव्हल कमी आहे. आणि एक गंमत आहे. सगळ्यात मोठ्या करन्सीचं पर कॅपिटा इन्कम चं गुणोत्तर प्रमाण जे लागतं त्या हिशोबाने आपल्या इथे सगळ्यात मोठी नोट शंभर ची असायला हवी.

प्लास्टिक मनी चे फायदे:

१. कॅश बरोबर ठेवावी लागत नाही. त्यामुळे एकदम सेफ.

२. सर्व व्यवहार बिल मागून होतात. त्यामुळे शासनाला टॅक्स जातो.

३. बँकेतून व्यवहार होत असल्यामुळे सर्व गोष्टींची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला माहिती होते. वेगळी स्क्रूटिनी शक्यतो होत नाही.

४. पाकीट जाड नसल्यामुळे पँटच्या मागच्या खिशात पाकीट घालून बसलं तरी हिप च्या अलाईनंमेन्ट मध्ये खूप फरक पडत नाही.

एकंच लक्षात ठेवायचं क्रेडिट कार्ड हा पैशाला अल्टरनेटिव्ह ऑप्शन नसून पैसे देण्याचा एक मार्ग आहे.

अर्थक्रांती

अर्थक्रांती ह्या अनिल बोकील यांच्या कन्स्पेटची स्तुती करणाऱ्या पोस्ट्स वाचल्या.

देशाचं दरडोई उत्पन्न आणि सगळ्यात मोठी करन्सी याचं नातं खूप वर्षांपासून आहे. अर्थक्रांती बद्दल २००२-०४ च्या आसपास वाचलं होतं, पण त्याआधी पासून आपली सगळ्यात मोठी करन्सी १०० असावी असं मांडण्यात आलं होतं. कारण दरडोई उत्पन्न आणि करन्सी याचा रेशो भारताचा खूप कमी आहे.

यातली एक मेख अशी आहे की परत ५०० आणि २००० च्या नोटा येणारच आहेत. त्यामुळे हा ब्लॅक मनी बाहेर काढण्याचा incidental उपाय आहे जो आर बी आय ने १००० ची नोट आणताना केला होता असं आठवतं. फक्त ज्या पद्धतीने आता निर्णय घेतला गेला तो सनसनाटी पूर्ण आहे हे नक्की.

बाकी अर्थक्रांतीच्या वेब साईट वर transaction टॅक्स आणावा वगैरे लिहिलं आहे. आजमितीला तरी ते स्वप्नवत आहे.

बारा वर्षाच्या नील ने सकाळी अंघोळ करून आल्यावर प्रश्न विचारला "बाबा, म्हणजे आता डॉलर चा रेट ६५ आहे, मग हे झाल्यावर डॉलर स्वस्त होईल का?"

एक अज्ञ पोरगं असले प्रश्न विचारतंय. त्यामुळे फेबुवर सज्ञान लोकांच्या इतक्या प्रतिक्रिया येतात, त्यात नवल ते काय?



विनातिकीट

तर झालं असं होतं चार सहावी सातवीतल्या मुली. नागपूर ला आल्या होत्या आंतरशालेय स्पर्धांसाठी. सकाळी ११ ची ट्रेन स्पर्धा वेळेत न संपल्यामुळे चुकली. मग वेट लिस्ट तिकीट काढून संध्याकाळच्या साडेसहाच्या ट्रेन मध्ये बसल्या. बरोबर मास्तर. टीसी ला बर्थ द्यायला जमलं नाही. दोन पोरी ज्या बर्थ वर बसल्या होत्या त्याचा पावशेर लावलेला आठ तासाचा मालक आला अन म्हणाला "चला, पोरीनो जागा खाली करा" पोरींचा मास्तर गायब.

भेदरलेल्या पोरींना माझ्या बर्थवर बसवलं. रात्रीचे दहा वाजलेले. लोअर बर्थ च्या मध्ये खाली फ्लोअर वर जागा असते. सहप्रवाशांच्या मदतीने दोन पोरींचा बिछाना घातला. अजून दोघींची सोय करायची होती.

बाजूच्या कंपार्टमेंट मधला एक जण म्हंटला "इथे पण लोअर बर्थ वर दोन लेडीजच आहेत. याच्या खाली फ्लोअर वर या दोघीना ऍडजस्ट करू शकतो"

दोन मिनिटं तो माणूस काय म्हणाला ते कळलंच नाही. आणि ट्यूब पेटली. जर लोअर बर्थ वर दोन माणसं असती तर रात्री मुलींना त्रास.............

उफ्फ! घरात बहीण अन मी पोरीचा बाप नसल्यामुळे हा मुद्दा माझ्या लक्षात च आला नव्हता.

एकच गोष्ट, पण बऱ्याच मुद्द्यावरून मनात कालवाकालव झाली.

करन्सी

करन्सी नोट प्रिंटिंग हे एक खर्चिक काम आहे. एका विशिष्ट क्वालिटीचा पेपर आणि शाई, सिक्युरिटी चे मुद्दे आणि एकंदरीत प्रिंटिंग प्रोसेस यासाठी एका उच्च प्रतीच्या फॅसिलिटी ची गरज असते आणि ह्याला खूप पैसे ही लागतात. या कारणामुळे बरेच देश करन्सी नोट हे दुसऱ्या देशात छापून घेतात.

भारत, हा जगातला दुसऱ्या नंबर चा करन्सी नोट चा उत्पादक आणि अर्थात ग्राहक ही आहे. असं असूनही आपल्या करन्सी नोट मात्र आपण च छापतो. असं असलं तरी ह्या करन्सी नोट छापण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल, म्हणजे कागद, अगदी आतापर्यंत आपण वेगवेगळ्या देशांकडून आयात करायचो. उदा: करन्सी नोट साठी लागणारा वॉटर मार्क असणारा पेपर आपण जर्मनी च्या Giesecke & Devrient आणि इंग्लंड च्या De La Rue या आणि अजून काही कंपनीकडून विकत घ्यायचो.

भारत साधारणपणे २२००० मेट्रिक टन हा पेपर दरवर्षी वापरतो आणि त्याची एकूण करन्सी उत्पादनाच्या ४०% पेपर ची कॉस्ट असते. सन २०१६ साली रिझर्व्ह बँकने २१०० कोटी नोटा छापल्या आणि त्याचा खर्च साधारणपणे रु ३५०० कोटी इतका आला.

 असा अवाढव्य खर्च असल्यामुळे करन्सी नोट उत्पादनासाठी आपण स्वयंपूर्ण असावं ही विचारधारा शासनाची होती. आधीच्या शासनाने या दृष्टीने काही पावलं उचलली होती. आताच्या शासनाने मेक इन इंडिया योजनेखाली यावर शिक्कामोर्तब केलं. खर्च आणि सुरक्षेच्या कारणास्तव सध्याच्या सरकारने आर बी आय ला पेपर आणि शाई च्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण होण्याचं आवाहन केलं.

आताच्या घडामोडीत आलेल्या ५०० आणि २००० च्या नोटा ह्या म्हैसूर मध्ये आर बी आय च्या प्रेस मध्ये उत्पादित केल्या आहेत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याला लागणारा बराचसा पेपर हा भारतात तयार झाला आहे.

९० एक वर्षांपूर्वी आपण करन्सी नोट बनवायला चालू केली. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यात आलेलं यश हा एक मैलाचा दगड आहे.

१८६२ साली जेव्हा ब्रिटिश लोकांनी करन्सी नोटेची ओळख भारताला करून दिली, तेव्हा ते thomas De La Rue या कंपनीकडून आयात करायचे. आज २०० वर्षांनंतर ही कंपनी जगातली सगळ्यात मोठी करन्सी प्रिंटर आणि त्याचा पेपर सप्लायर आहे.

१९२६ साली ब्रिटिशांनी नासिक मध्ये करन्सी प्रिंटिंग प्रेस उभी केली आणि मग तिथे ५ रुपयाची नोट बनवणं चालूकेलं. पुढे जाऊन याच प्रेसमध्ये १००, १००० आणि१०००० रुपयाच्या नोट बनवल्या. आणि त्या सगळ्यादेशात प्रचलित झाल्या. १९४७ साली ब्रिटिश भारतातून निघून गेले. त्यानंतर कित्येक वर्ष नाशिक ची प्रिंटिंग प्रेस आपली पैशाची भूक भागवत होती. पण जशी इकॉनॉमी वाढत गेली, नाशिकची प्रिंटिंग प्रेस अपुरी पडू लागली.मग  १९७५ मध्ये देवास ला दुसरी प्रेस चालू झाली. या प्रेस मध्ये बनणाऱ्या करन्सीमध्ये अजून काही सिक्युरिटी फीचर्स टाकले गेले. १९९७ पर्यंत या दोन प्रेस करन्सी पुरवत होते. पण लोकसंख्येची वाढ आणि कॅश चा बेधुंद वापर याने आपल्याला हा दोन प्रेस कमी पडू लागल्याआणि मग त्यावेळेसच्या सरकारने जवळपास ३६०कोटी करन्सी  नोटची ऑर्डर काही अमेरिकन, कॅनेडियन आणि युरोपियन कंपनीला दिली. या ऑर्डरची व्हॅल्यू  त्याकाळी रु ३५० कोटी इतकी होती. आपल्यापर्यंत हे पोहोचलं नाही पण सरकारवर या निर्णयाबद्दल खूप टीका झाली होती. पैसे तर खर्च झाले होतेच पणसुरक्षेच्या  दृष्टीने ते धोक्याचं होतं.



यातून धडा घेऊन मग भारत सरकारने पाठोपाठ अजून दोन मिल चालू केल्या, १९९९ मध्ये म्हैसूर इथे  आणि २००० ला पश्चिम बंगाल.



प्रिटिंग प्रेस तर झाल्या पण नोटेसाठी लागणारा पेपर बनवणारी एकमेव मिल भारतात होती, एम पी मध्य ेहोशंगाबाद ला. ही मिल चालू झाली १९६८ मध्ये. पण तिची उत्पादन क्षमता होती २८०० मेट्रिक टन इतकी.आपल्या गरजेच्या प्रमाणात हे उत्पादन खूप कमी होतं.बाकी पेपर  मग आपण जर्मनी, इंग्लंड आणि जपान या देशातून आयात करत होतो. भारत सरकारला आणि आर बी आय ऑफिशियल्स ना याची जाणीव होती. मग होशंगाबाद च्या मिल चं एक्स्पान्शन केलं आणि म्हैसूरला अजून एक पेपर मिल टाकली. आता तयार होणाऱ्या नोटांमध्ये भारतात उत्पादित केलेल्या पेपर चा सिंहाचा वाटा आहे. इम्पोर्ट बिलापैकी रु १५०० कोटी तर वाचलेच, पण सुरक्षेच्या दृष्टीने स्वतः ची करन्सी स्वतःप्रिंट  करणे हे शहाणपणाचं लक्षण आहे हे सांगायला कुण्या तज्ञ माणसाची गरज नाही.

१८६२ साली इंग्लंड मध्ये बनलेल्या करन्सीच्या प्रवासाचंएक वर्तुळ आता पूर्ण झालं आहे. आतापर्यंतचा प्रवासअसा झाला, यापुढील प्रवास कसा असेल ते काळचसांगेल.







निश्चलनिकरण

आतापर्यंत डीमोनेटायझेशन वर वाचून वाचून डोकं पकलं असेल नाही. हे करायला पाहिजे यावर फारसं दुमत नसावं. त्याची पद्धत काय असायला पाहिजे यावर वाद होऊ शकतात. पण हा रोग कॅन्सर सारखा भारतीय समाजात पसरला होता आणि अशा सर्जरी शिवाय पर्याय पण नव्हता. या भयानक रोगावर काही मिळमिळीत उपाय योजना करायची म्हणजे आत्महत्येसारखं होतं.

२००१ पर्यंत आपली कॅश इकॉनॉमी ही जी डी पी च्या दहा टक्के होती. बँकिंग सिस्टम ची वाढ झाल्यामुळे त्यानंतर ती खरं तर कमी व्हायला हवी होती. पण त्याऐवजी ती वाढत गेली आणि तिचं प्रमाण १२% झालं. १.५ ट्रीलियन च्या इकॉनॉमी मध्ये २% वाढ म्हणजे कॅश चा वापर खूप वाढला होता. आणि हे होताना अधिक रकमेच्या नोटांचं प्रमाण बाजारात वाढत गेलं. बाजारातल्या एकूण रकमेच्या ५०० आणि १००० च्या नोटांची किंमत ही ८५% पर्यंत गेली. या प्रकारामुळे एक आभासी अर्थव्यवस्था तयार झाली ज्यामुळे रियल इस्टेट किंवा सोन्याच्या किमती अवाच्या सव्वा वाढल्या. देशाचा पैसा जेव्हा या अनुत्पादित कामासाठी वापरला गेला तेव्हा बँकांची कर्जे महाग झाली आणि छोटा उद्योजक हा मग धंद्यातून पैसे कमावण्याऐवजी जागेचं ट्रेडिंग किंवा फ्लॅट मध्ये पैसे गुंतवून त्याच्या नोशनल वाढीवर आनंद मानू लागला.

हे निश्चलनीकरण जर यशस्वी झालं तर बँकांकडे ३ लाख कोटी रुपये येणार नाहीत. म्हणजे भारत सरकारला छापण्याची परवानगी मिळणार आहे. आणि जर सगळे इकॉनॉमिस्ट ज्या पद्धतीची मांडणी करत आहेत त्यायोगे टॅक्स मधून अजून तीन लाख कोटी रुपये मिळणार आहेत. या अतिरिक्त पैशांमुळे बँकांकडे मोठी गंगाजळी उपलब्ध होईल. व्याज दर कमी होतील हे प्रत्येक अर्थतज्ज्ञ सांगतो आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा माझ्या लेखी छोट्या उद्योजकांना होणार आहे. मोठ्या उद्योजकांना एफ डी आय मुळे परदेशातून अत्यंत कमी व्याज दरात पैसे उपलब्ध होतात पण छोट्या उद्योजकांना मात्र देशी बँक इंटरेस्ट वर अवलंबून राहावं लागतं. आणि इ एम आय मधेच उद्योजकांचा प्रॉफिट दिला जातो.

यशस्वी निश्चलनीकरणानंतर उद्योजकांचा अनुत्पादित गोष्टींमध्ये पैसे गुंतवण्याचा मोह संपेल आणि ते आपल्या बिझिनेस मधून प्रॉफिट कमावण्यावर जोर देतील. आणि एस एम इ जे देशाच्या जी डी पी च्या ४० ते ५०% सहभाग देतात, हे देशाला प्रगतीकडे नेण्यात कारणीभूत राहतील, अशी आशा वाटते.

तसंही अनिश्चतेतेच्या काळात आशावादी राहण्यावाचून आपल्या हातात काय आहे? 

सेल्समन

तसं माझं करिअर एस के एफ मध्ये प्रॉडक्शन इंजिनियर म्हणून चालू झालं. तिथे असताना काहीतरी बिझिनेस करावा असा किडा डोक्यात वळवळू लागला. आणि मी तो पार्टटाइम चालू ही केला. त्याला मदत म्हणून मी १९९४ साली रेसिडेंट इंजिनियर म्हणून सेल्स चा जॉब शोधला. आणि मी खऱ्या अर्थाने सेल्समन झालो.

सेल्समन, ऐकायला कसं वाटतं ना! "नुसते बोलबचन असतात रे" "फेकू असतात" "लाळघोटे असतात" "धंदा मिळवण्यासाठी काय करतील सांगता येत नाही" असे एक ना अनेक पासिंग कॉमेंट्स पास होतात. आज या घडीला माझा मेन डोमेन सेल्स आहे असं सांगितलं की लोकं आदराने बघतात. ते माझ्या सेल्स डोमेन कडे बघून नव्हे तर मॅनेजिंग डायरेक्टर या पदामुळे याची जाणीव आहे मला.  कारण मला माहित आहे, इंडस्ट्री मध्ये किंवा एकुणात सेल्स च्या माणसाला किती टक्के टोणपे खावे लागतात ते. मी ही खाल्ले. कारकिर्दीच्या सुरुवातीला इतके नकार आणि अपमान सहन केले आहेत की काय सांगू तुम्हाला! पण तो एकेक नकार सेल्स च्या माणसाला व्यवसायात स्ट्रॉंग बनवत जातो. नकार पचवणं अवघड असतं आणि म्हणून ह्या जॉबला लोकं कंटाळतात. अन त्यातल्या एम्प्लॉयर ने धंद्याचं प्रोफाइल फालतु ठेवलं असेल तर मग बेकार वांदे. उदा: टेली मार्केटिंग, एम एल एम.

अशा कित्येक कंपन्या आहेत ज्यांचे उंबरठे वर्षानुवर्षे झिजवले. तिथल्या आढ्यताखोर लोकांनी तीन तीन तास केबिनच्या बाहेर बसवून ठेवलं. पण हरलो नाही. बंगलोर मधील अशा एका कंपनीने सातत्याने ३-४ वर्ष अशी ट्रीटमेंट दिली. अन आज गेली सहा वर्षे तीच कंपनी टॉप १० कस्टमरच्या लिस्टमध्ये एक नंबर ला आहे.

जॉब मध्ये असताना पुण्यातल्या एका कंपनीने सकाळी अकराची अपॉइंटमेंट दिली होती. साडेपाच लाखाची ऑर्डर. १९९५ साली ती खूप मोठी ऑर्डर होती, आजही आहे. रात्री साडेआठ वाजता तो एम डी आमच्यासमोर त्याच्या असिस्टंट ला "यांना उद्या सकाळी ९ वाजता बोलाव" असं सांगून तोऱ्यात निघून गेला. दुसऱ्यादिवशी ऑर्डर तर घेतलीच आणि त्यानंतर अशी आमची चटक लावली की  जॉब सोडेपर्यंत त्या कंपनीत मी जायचो तेव्हा पायघड्या टाकायच्या बाकी राहिलं होतं.

आज जवळपास बावीस वर्ष झालीत मी सेल्स मध्ये आहे. दोन रुपयांच्या हायड्रोलीक सील पासून ते सव्वा कोटीच्या आटोमेशन सिस्टम पर्यन्त बरंच काही विकलं. सुदैवाने ज्यांच्या साठी काम केलं ती उत्तम प्रॉडक्टस होती. प्रॉडक्ट ची चांगली क्वालिटी ही पहिली गरज तर आहेच, पण त्याबरोबर कामात कमालीची consistency, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात perseverance, मार्केट बद्दल सजगता, फिरण्याची आवड आणि वर लिहिल्याप्रमाणे येणाऱ्या नकाराने खचून जाता परत दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने दिवसाला सामोरे जाण्याची क्षमता ठेवणे हे गुण अंगिकारले तर तुमची तर उन्नती होतेच, पण ज्या कंपनीसाठी तुम्ही काम करता, ती पण पुढच्या कक्षेत प्रवास करते.

मला स्वतः ला त्यामुळे सेल्स च्या माणसाबद्दल प्रेमादर वाटतो. अगदी सिग्नल वर येणाऱ्या वस्तू विकणाऱ्या लोकांना ही मी हाडतुड करत नाही. टेलिमार्केटिंग वाल्या मंडळींना व्यवस्थित उत्तर देतो. कधीकधी राग आवरत नाही म्हणून चिडतो पण त्यांचा तिरस्कार करत नाही.

तसं बघायला गेलं तर आयुष्यात आपण थोड्या फार फरकाने का होईना, पण प्रत्येकजण सेल्स मन असतो. कोणत्याही नात्यात मग ते प्रोफेशनल रिलेशन असो वा पर्सनल. हो पर्सनल नात्यात ही, एक आई मूल सोडलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्यातले सेल्सचे गुण डिस्प्ले करावे लागतात......मग तुम्ही माना वा न माना. 

निलचा फटका

परवा एम सी सी आय ए च्या हॉल मध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मला पाच मिनिटे बोलायचं होतं. म्हणून मी घरात थोडी तयारी करत होतो. नील कडून रफ पेपर घेतला आणि काय बोलायचं याबद्दल पॉईंट्स लिहून त्याची उजळणी करत होतो. समोर २०० एक इंडस्ट्री प्रोफेशनल्स असणार होते, त्याचं हलकं का होईना दडपण होतं.

माझं सगळं नाटक बघून नील म्हणाला "पप्पा, तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. नाहीतरी तुम्ही बोलत असताना सगळे झोपाच काढत असतील"

हे असं आहे.

घरात असले फॅमिली मेम्बरं आणि फेसबुकवर महेंद्र लोमटे अन सर्जेराव जाधव यांच्यासारखे मित्र असल्यामुळे पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. 

डोक्याला शॉट

तर निश्चलनीकरणावरच्या पोस्टवर येणाऱ्या घमासान कॉमेंटना प्रत्युत्तर दिले. निर्णय कसा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी कशी चुकली आहे, इंटरेस्ट रेट कमी होतील पण शॉर्ट टर्म मध्ये जीडीपी वैगैरे कशी मार खाणार आहे यावर बेधुंद रात्रभर कॉमेंटा कॉमेंटी करून तारवटलेल्या डोळ्यांनी मी कंपनीत पोहोचलो.

आज सकाळी ९ वाजता आमचा सीए दत्त म्हणून समोर उभा होता. मला म्हणाला

"राजेश, तुमचा करंट रेशो १ च्या खाली गेला आहे. काही उपाय करायला हवा"

मी म्हणालो "करून टाका काय उपाय करायचा ते"

सीए: "अहो, उपाय मी काय करणार? तुम्ही करायचा"

मी: अच्छा, पण मग करंट रेशो म्हणजे काय

सीए: अहो मंडलिक, कितीदा सांगितलं, अधून मधून टॅली बघत जा म्हणून. करंट रेशो म्हणजे करंट asset आणि करंट लायबिलिटी याचा रेशो. हा १.३ च्या वर हवा.

मी: पण मग मी काय करू?

सीए: देवा, अहो जरा बॅलन्स शीट बघत जावा कधी तरी. बरं ते जाऊ द्या. मी तुम्हाला सांगितलं की गेल्या दीड वर्षात तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली ती इंटर्नल accruals मधून केली. मी तुम्हाला सांगितलं की हे केलं तर तुमच्या वर्किंग कॅपिटल वर स्ट्रेन येईल. बँक प्रपोजल वर काम चालू केलं का?

मी: अहो, मी कंपनीच्या अकौंट मधून पैसे खर्च केले आहेत.

सीए: पण मी तुम्हाला सांगितलं ना की तुमचा प्रॉफिट जर बँक इंटरेस्ट पेक्षा चांगला असेल तर बॅंकेकडून लोन घेऊन धंदा केलेला शहाणपणाचं ठरतं. कॅश फ्लो त्याने सुधारतो. ही रियालिटी असते. त्यावर लक्ष नाही दिलं तर सप्लायर चं पेमेंट वेळेवर जाणार नाही.

मी: हो, पण सध्या व्यवस्थित आहे ना. वेळ येईल तेव्हा बघू. बाकी हे काय तुम्ही अकौंट्स बद्दल बोलताय त्यावर नंतर बोलू.

तर उसळून सीए म्हणाला "काय हो मंडलिक. तुमच्या फेबु लिस्ट मध्ये आहे मी. तुमच्या कंपनीचं बॅलन्स शीट कसं बघावं ते तुम्हाला धड कळत नाही आणि इकडे फेबु वर तुफान बाण सोडत असता. जरा थोडी कंपनीची काळजी असेल तर आवरा हे."

आयला, काय ही सीए मंडळी डोक्याला शॉट लावतात राव. विकेंड खराब जाणार आता. 

चरणस्पर्श

मी लहानपणापासून वयाने मोठं असलेल्या आणि माझ्या मनात ज्यांच्या बद्दल प्रेमादर आहे अशा  लोकांच्या पाया पडतो. हो, दोन्ही क्रायटेरियात बसली पाहिजे समोरची व्यक्ती. वर्ष सरली. ज्यांचे पाय धरावेत अशा मोजक्या व्यक्ती आजकाल भेटतात.

असो.

एक माझं निरीक्षण असं आहे की पूर्वी पाया पडताना पूर्ण वाकून आम्ही चरणस्पर्श करायचो. मधल्या काही काळात असं बघायचो की लोकं अँकल ला स्पर्श करून नमस्कार करायचे. हळूहळू ते पायाच्या पोटरीला स्पर्श करून नमस्काराचा सोपस्कार पार पाडत होते.

परवा एका लग्न समारंभाला गेलो होतो तिथे आजकालची पोरं, समोरच्या व्यक्तीच्या गुडघ्याला टच करून नमस्कार केल्याचं दाखवत होते.

याच स्पीडने नमस्काराची जागा शरीराच्या वरच्या भागात सरकत गेली तर.............

आवरतो.

😊😊

Monday 12 December 2016

शॉर्ट फिल्म infrences

कालच्या शॉर्ट फिल्मचे मी काढलेले inferences:

- जगात असलेली आर्थिक विषमता. (ह्यात काही नवल नाही म्हणा)

- श्रीमंत आपली संपत्ती सांभाळण्यात मश्गुल आहे तर गरीब आपली गरिबी सावरण्यात.

- आयुष्यात अशी वेळ येऊ शकते की परिस्थितीमुळे श्रीमंत माणसाला आपल्या संपत्तीवर पाणी सोडावं लागतं.

- गरीब शक्यतो जे आपलं नाही त्याची आस ठेवत नाही.

- परिस्थितीमुळे जर संपत्ती गमावली असेल तर परिस्थिती च परत आपल्याला मिळवून देईल याबाबतीत श्रीमंत शेवटपर्यंत आशावादी असतो.

- नियातीपुढे हतबल झाल्यानंतर बहुतांश श्रीमंत माणसं "चला, आतातरी गरिबाला मदत करू" या भावनेने मदत करतात.

- कुणाचं तरी भलं होईल या भावनेने केलेली मदत ही खरं तर आपलं च भलं करत असते, मनाला आनंद देत असते. आनंद, दोघांच्याही मनाला.

- एक शक्यता अशीही असते की तो श्रीमंत मुलगा एक शूज न फेकता त्याच्या बरोबर घेऊन जातो. जगात अशीही मानसिकता असणारे लोकं असतात, "मला नाही मिळत ना, मग तुलाही नाही"

शॉर्ट फिल्म

मध्ये एक भारी शॉर्ट फिल्म बघितली.

एक श्रीमंत बाप आपल्या पोराला घेऊन रेल्वे स्टेशनला जातो. पोराच्या पायात चकाचक पॉलिश केलेले शूज. तिथेच कोपऱ्यात एक दुसरं गरीबाचं पोर बसलेलं. त्या पोराच्या स्लिपरचा पट्टा तुटला असतो. अन तो असोशीने स्लीपर दुरुस्त करत असतो. त्यावेळेस त्याची नजर त्या श्रीमंत पोराच्या चकचकीत शूज कडे जाते. आपल्या गरिबीचं दुःख त्याच्या नजरेतून ओघळतं.

श्रीमंत पोरगं आपल्या बापाचा हात धरून गर्दीतून वाट काढत रेल्वेच्या डब्यात चढतो. गर्दीच्या रेट्यामुळे त्याच्या एका पायातला शूज प्लॅटफॉर्म वर पडतो. अन एका शूज निशी पोरगं डब्यात शिरतो. झालेला प्रकार त्याच्या लक्षात येईपर्यंत रेल्वे सुटते. एक शूज पडला म्हणून पोरगं बोंब मारतं.

गरीब पोराच्या झाला प्रकार लक्षात येतो. तो उठतो अन पळत जाऊन प्लॅटफॉर्म वर पडलेला शूज उचलतो अन त्या पोराला द्यायचा प्रयत्न चालू करतो.

रेल्वे चा वेग वाढतो. गरीब पोरगं पण पळण्याचा स्पीड वाढवतो. हात पुढे करून तो शूज द्यायचा अतोनात प्रयत्न करतो पण अयशस्वी होतो.

आता प्लॅटफॉर्म ची लांबी संपणार असते. आपण तो शूज त्या श्रीमंत पोराला देऊ शकणार नाही म्हणून गरीबाचं पोर दुःखी कष्टी होतं. त्याचवेळेस आता काही शूज ची जोडी आपल्यापर्यंत पोहोचत नाही हे जाणवून ते श्रीमंतांचे पोर नाराज होतं.

दोघांची हतबलता दिसत असतानाच अचानक श्रीमंताचं पोर पायातला दुसरा शूज काढतो अन त्या गरीब मुलाच्या दिशेने प्लॅटफॉर्मवर फेकतो.

फिल्म संपते.

श्रीमंत अन गरीब यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारी ४ मिनिटांची फिल्म.

 Philanthropy comes by force not by choice.

रडतखडत

आता मी त्या कंपनीचं नाव नाही लिहीत, पण या कंपनीत साधारण मी २० एक वर्षांपासून जात आहे. सप्लायर म्हणून. गेली २० वर्ष ही कंपनी रडत खडत चालू आहे. तेव्हापासून सप्लायर च्या पेमेंट ची बोंब आहे. त्यावेळेस माहित असून मी त्यांच्या बरोबर धंदा केला अन अडीच तीन लाख रुपये गमावून बसलो. वेळच्या वेळी पगार मिळत नाही म्हणून तेव्हाही एम्प्लॉयीज ओरडायचे. आज ही ओरडतात. फरक इतकाच आहे की त्यावेळेस काही दिवसांनी पगार उशिरा व्हायचा, आज सहा सहा महिने पगार होत नाही. काही लोकं रिटायर झाले तर त्यांचा पीएफ न देण्याचा क्रिमिनल गुन्हा पण कंपनी करते आहे. इतकं असूनही याचे एम डी वर्किंग कॅपिटल आणि फायनान्स मॅनेजमेंट वर तोंड वर करून लेक्चर झोडतात.

परवा परत मी त्या कंपनीत गेलो होतो. आश्चर्य याचं वाटतं की आज ही त्या कंपनीत गेले २० वर्षे काही लोकं काम करत आहेत. कोणतं मोटिवेशन असतं या लोकांना की ते अशा डचमळत्या कंपनीला सोडत नाही? सालं माझ्या कंपनीत टार्गेट सेल झाला नाही म्हणून मी या वर्षी साधा इंसेंटिव्ह नाही दिला तर लोकं नाक मुरडून काम करत आहेत. अन इथे सहा महिने पगार नाही लोकांना. की या लोकांच्या फायनान्शियल गरजा पूर्ण झाल्यात अन पैशाची गरज नाही. बरं ही मंडळी टेक्निकली कॉम्पिटंट दिसतात. मग यांना दुसरीकडे जॉब न शोधण्याची बुद्धी कशी येत असावी? की बाहेर काही चांगलं होऊ शकतं यावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे?

काही कळत नाही बुवा आपल्याला! 

मी आणि माझं

फक्त स्वतः चं सुख पाहणारी आत्ममग्नता ही एखाद्याच्या अहंकाराइतकीच त्रासदायक असते. अहंकारी माणसं दुसऱ्याचं काहीही ऐकून घेत नाहीत तर आत्ममग्नतेच्या भोवऱ्यात गरगर फिरणारी माणसं हे आपलं सुख जपण्यासाठी समोरचा काहीही म्हंटला तरी ऐकून घेतात.

प्रथमदर्शी थंड दिसणारी ही माणसं खरंतर आपलं सुख जपण्यासाठी अत्यंत लाचार असतात. माझं खाणं, माझं पिणं, माझी वेळ यातच ही मंडळी मश्गुल असतात. आणि त्या कोषात राहण्यासाठी समोरच्याची चिडचिड किंवा त्याने केलेला अपमान हे सहजगत्या पचवून जातात.

अहं पणाच्या आगेत जळणाऱ्या माणसाइतकंच स्वयंसुखाला सोकावलेल्या माणसाचं आपल्या आजूबाजूला बागडणारं अस्तित्व मला तरी डिसकम्फर्टेबल करतं.