Sunday 28 February 2021

विचाराचं क्षितिज

 

भारतातल्या अनेक मोठ्या व्यवसायाने एव्हाना दाखवून दिलं आहे की त्यांनी व्यवसायाचा आर्थिक उद्देश जरी नफा कमावणे असा ठेवला तरी त्या पलीकडे जाऊन त्यांनी त्यांच्या लोकांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विचार केला. हे केल्यामुळे ते व्यवसाय तर मोठे झालेच पण एका मोठ्या प्रवर्गाचा आर्थिक स्तर त्याने उंचावला. 

मोठ्या व्यावसायिकांची ही विचारधारा छोट्या व्यावसायिकांनी अंगिकरण्याची कधी नव्हे इतकी निकड जाणवते आहे. एम एस एम इ क्षेत्रातल्या लोकांनी आता स्वतःचा आर्थिक स्तर उंचावण्यापेक्षा त्यांच्या लोकांना त्यांची आर्थिक उन्नती तसेच एक जबाबदार नागरिक होण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं हे गरजेचं आहे. अन्यथा लोकांचं भलं करण्याच्या नावाखाली त्यांना वापरून घेणारी जमात म्हणजे भांडवलदार या व्याख्येचे आपण दुर्दैवी वाहक असू. 

जर तुम्हाला व्यावसायिक म्हणून घडवायचं असेल तर स्वतः पलीकडे जाऊन विचार करण्याची मानसिकता ठेवणं अपरिहार्य आहे. तुमच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या व्यवसायाची आर्थिक पत आणि स्तर कसा वाढवता येईल हे लक्षात ठेवून जर व्यवसाय वाढवला तर आणि तरच तुम्ही संपन्न, श्रीमंत नव्हे,  आणि तुम्ही ज्या प्रवर्गाबरोबर काम करता तो सशक्त बनण्याची शक्यता आहे. 

हे करण्यासाठी वृद्धीधिष्ठित मानसिकता ठेवणं हे भविष्यात सगळ्यांना फलदयी ठरणार आहे. थोडक्यात व्यवसायाचं प्रारूप असं ठेवायचं की कधीतरी तुम्हाला तो विकायचा आहे. भले तो तुम्ही विकू नका पण व्यवसायाला एक प्रॉडक्ट समजून असं सजवा की ती विक्रीला आहे. मग जसं आपण एखादा प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवला की त्याचं आयुष्य चांगलं असावं, तो प्रॉडक्ट चांगला दिसावा म्हणून डिझाइन करतो, त्याला मेंटेन करता यावं म्हणून काही सुविधा ठेवतो, त्या मानसिकतेने व्यवसायाकडे बघतो. समाधानी कर्मचारी वर्ग, सिस्टम आणि प्रोसेसेस, काम करण्याची जागा स्वच्छ असणे, इन्कम टॅक्स वा सेल्स टॅक्स न चुकवण्याची आर्थिक शिस्त ठेवणे, तुमच्या पेक्षा हुशार लोक व्यवसायात आणणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या निर्णयक्षमतेचे खुल्या मनाने स्वागत करणे,  या काही गोष्टी व्यवसायाला सशक्त बनवतात.

बऱ्याचदा आणि बऱ्याच जणांना असं वाटण्याची शक्यता आहे की व्यवसाय मोठे असतात म्हणून वर नमूद केलं तसं वागतात. खरंतर ते तसं वागतात म्हणून मोठे झाले आहेत. छोट्या व्यावसायिकांनी आता त्यांच्या आकार उकाराबद्दल जास्त विचार न करता आपल्या विचाराचं क्षितिज विस्तारणं, हे जास्त संयुक्तिक असणार आहे. जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण त्या संधीला सामोरे जाताना आपली सनातनी प्रवृत्ती वापरली तर शॉर्ट टर्म फायदा होईलही कदाचित पण शाश्वत व्यवसाय उभे राहणार नाही आणि आज देशाच्या उन्नतीचे आपण जे दिवास्वप्न पाहतो आहे, ते काही दशकांनंतर सुद्धा वास्तव होण्याची शक्यता नाही. 

Saturday 13 February 2021

४ फेब्रुवारी

 नासिकला सीडीओ मेरी ची वसाहत आहे. त्याच्या अलीकडे आमचं विद्युत नगर. मी सीडीओ मेरीच्या शाळेतला विद्यार्थी. त्यामुळे सर्वजण तिथले मित्र. पर्यायाने मित्रांचे आई वडील म्हणजे माझे काका काकू. काही जण मला राजेश म्हणून हाक मारतात तर काहीजण मित्रांसारखे मंडल्या म्हणून बोलावतात. नितीन कुलकर्णी किंवा राजेश गोडबोले ची आई मला न चुकता मंडल्या म्हणून बोलावते. कानाला अन मनाला फार गोड वाटतं  ते. (पॉलिटेक्निक चा मित्र मंगेश पाठक ची आई पण मंडल्या बोलावते). 

पुण्यात माझ्या शाळेतले आम्ही पाच सहा जण आहोत. भेट होत असते अधून मधून. थोडं काका काकूंबद्दल विचारतो. कधी त्यांचीही भेट झाली तर ते मला माझी, वैभवीची ख्याली खुशाली विचारतात. 

मनात विचार आला की या काका काकूंचं एक छोटं गेट टूगेदर करावं. कोविड मुळे जमत नव्हतं. आता जरा भीती कमी झाली म्हणून मग घाट घातला. कंपनीचं आवार मोठं असल्यामुळे गेट टूगेदर  तिथं ठरवलं. त्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद पण लाभतील हा एक स्वार्थ होताच. 

४ फेब्रुवारी वैभवीचा वाढदिवस. मग दिवस तोच निवडला. यावेळेस औक्षण करायला झुंबड उडाली होती. सगळे सत्तरीत, आणि काही तर ८०+ असल्यामुळे, बफे ऐवजी पंगत ठरवली. जेवणाला पण अगदी मराठी मेन्यू ठेवला. 

सगळा कार्यक्रम झाल्यावर पुढील आयुष्यभर पुरतील इतकी आशीर्वादाची शिदोरी जमा झाली. घरी आल्यावर वैभवीने विचारलं "तू सगळ्यांसमोर काही बोलला नाही". काय आणि कसं बोलणार. घशात आवंढा असताना अवघड असतं बोलणं. 

संध्याकाळ एकंदरीत हृदयगंम होती. 



Saturday 6 February 2021

लैंगिक समानता

सध्या संग्राम बिग एफ एम वर एक महत्वाचा मुद्दा घेऊन चर्चा करतोय. तो म्हणजे ऑफिस मधील हेट्रोसेक्शुअल लोकांमधील रिलेशन्स. मी एक इंजिनियरिंग कंपनी चालवतो. सेटको मध्ये आजच्या मितीला ११ लेडीज काम करतात. मी साधारण माझ्या कंपनीच्या अनुषंगाने या बाबतीत माझे अनुभव लिहितो आणि मत पण नोंदवतो. 

पहिली मुलगी आमच्या कंपनीत २०११ साली जॉईन झाली. त्यावेळी आमच्या कंपनीत लेडीज साठी टॉयलेट बनवण्यापासून तयारी होती. सगळ्यात पहिले आम्ही त्या मुलीला कम्फर्ट झोन मध्ये आणलं. जेंडर इक्वालिटी हा प्रकार आम्ही आमच्या कंपनीत अगदी पहिल्या दिवसापासून राबवला. संध्याकाळी काही कारणामुळे त्या मुलीला जर उशिरापर्यंत काम करण्यासाठी थांबवलं तर तिच्या सेफ्टी शिवाय न आम्ही तिला काही स्पेशल ट्रीटमेंट दिली किंवा ती मुलगी आहे केवळ या कारणासाठी ना तिला काही काम करण्यापासून परावृत्त केलं. 

वर्किंग स्पेस मध्ये स्त्री वर्गाला सेफ वातावरण असावं याची जबाबदारी टॉप मॅनेजमेन्ट वर असते. त्यांनी जर आपल्या वागण्यातून स्त्री वर्गाप्रती आदर आणि खेळीमेळीची भावना रुजवली तर तिथे मेल आणि फिमेल एम्प्लॉईज मधील रिलेशन्स हे सौहार्दाचे राहतात असा माझा अनुभव आहे. 

स्पर्श आणि नजर या दोन्ही गोष्टीपलीकडची भावना मुलींना लागलीच कळते. त्या दोन्ही प्रकारात थोडाही प्रॉब्लेम मुलींना वाटलं तर त्या डिसकम्फर्ट झोन मध्ये जातात. मध्ये कुठेतरी वाचलं  होतं  की पुरुषाची खरी मर्दानगी त्यात आहे जेव्हा स्त्रीला त्याच्या सानिध्यात सुरक्षित वाटतं. त्या न्यायाने मला असं वाटतं  की सेटको मधील मेल एम्प्लॉईज हे मर्द आहेत. कारण मुली कंपनीत बेखौफ असतात. 

आणि अर्थात यामागे गेल्या काही वर्षातील समाजाची इव्होल्यूशन प्रोसेस सुद्धा त्याला कारणीभूत आहे. गेल्या अनेक वर्षात मुलगा/मुलगी, स्त्री आणि पुरुष यांच्यामधील स्पर्शाच्या भावनेत चांगल्या अर्थाने बदल झालेले दिसतात. काही ठिकाणी त्याचा गैरफायदा घेतला जातो. पण जर एकुणात परिस्थिती व्यवस्थित पद्धतीने हॅन्डल केली तर वर्क स्पेस मधील वातावरण हे मैत्रीपूर्ण असतं. 

दीड एक वर्षांपूर्वी संग्रामबरोबर एक पॉडकास्ट बनवला होता. मुलींनी कोणत्या प्रकारचं जॉब प्रोफाइल निवडावं. मला असं वाटतं शारीरिक ताकद ज्या ठिकाणी लागते ते सोडून कोणतेही काम मुलींनी करायला हरकत नाही. फेमिनिस्ट असणं म्हणजे निसर्गचक्रामुळे स्त्रिया ज्या परिस्थितीला सामोरे जातात त्याचा आदर करणे. शारीरिक ताकद नसणे किंवा मॅटर्निटी लिव्ह ची गरज ही नैसर्गिक आहे. ते समजून उमजून कामाची आखणी पुरुषांनी करणे यात पुरुषार्थ आहे. 

बाकी वर्क झोन मध्ये कुणाबरोबर प्रेम करणे याबाबत हरकत काही नाही पण एक प्रोफेशनल प्रोटोकॉल म्हणून दोघांपैकी एकाने तो जॉब सोडावा हे माझं मत आहे. कारण प्रोफेशनल अप्रेझल किंवा रिलेशन्स मेंटेन करताना या इमोशनल किंवा सेंटीमेंटल रिलेशन्स आडकाठी बनू शकतात असं मला वाटतं. 

पण काम करताना स्त्री सहकाऱ्यांबरोबर विनाकारण स्पर्श किंवा नजर वाईट ठेवणं हे निषेधार्ह आहे आणि तशा वृत्ती या जागच्या जागी ठेचाव्या हे माझं मत आहे. सुदैवाने आतापर्यंत मला असा अनुभव आतापावेतो आला नाही. (नुकताच एका कॉन्ट्रॅक्ट वरील माणसाचं आम्हाला तसं वागणं वाटलं. आम्ही दुसऱ्या सेकंदाला त्याला घरी पाठवलं). 

जागतिकीकरणाचा आपण भाग आहोतच आणि उद्या जर त्याचा आवाका वाढला तर त्यासाठी एक सशक्त समाज बनवणं ही काळाची गरज असणार आहे, आणि लैंगिक समानता हा अशा प्रोग्रेसिव्ह समाजाचा मोठा गुण आहे. 

Tuesday 2 February 2021

चेतन बच्छाव

 सोशल मीडियामुळे अनेक आनंदी क्षणांचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं आहे त्यात अजून एक भर पडली चेतन बच्छाव लिखित काहूर या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात सहभागी झालो. चेतन पण इंजिनियर आहे आणि माझ्यासाठी तो एक आत्मीयतेचा भाग आहे. "इंजिनियर असूनही इतकं कसं काय लिहितो रे?" हा प्रश्न मला माझ्या नातेवाईकांनी विचारला होता. मला त्यामागचं लॉजिक कळलं नाही. बहुधा यंत्र, बिल्डिंग मटेरियल किंवा कॉम्प्युटर या सारख्या निर्जीव वस्तूंशी खेळताना इंजिनीअरच्या मनातील सजीवतेचा मृत्यू होत असावा असा एक गैरसमज प्रचलित आहे. तो चूक आहे हे अनेक जणांनी सिद्ध केलं आहे. चेतन ने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

प्रकाशन हस्ते होणार म्हणजे पुस्तक वाचायला हवं. वेळ कमी होता, पण काहूरचं वैशिष्ट्य हे की मी ते रविवारी एका बैठकीत वाचून काढलं. पुस्तक उत्कंठावर्धक असल्याशिवाय तसं होत नाही. त्यावरून काहूरचा दर्जा तुमच्या लक्षात येईल. तसा चेतन फेसबुकवर लो प्रोफाइल राहतो. म्हणजे त्याच्या वॉल ची फारशी चर्चा नसते. असं असताना त्याने एक दर्जेदार कादंबरी लिहिली आणि तिचा तितकाच दणकेबाज प्रकाशन सोहळा केला हे नक्कीच कौतुकास्पद. 

काहूर, नायकाच्या दृष्टीने दुःखांतिका आहे, तर नायिकेच्या अनुषंगाने सुखांतिका. लेखकाने चतुरपणे कोण बरोबर, कोण चूक यावर भाष्य टाळलं आहे. त्याने ते बहुधा वाचकांवर सोडलं आहे. पुणेरी भाषेत सांगायचं तर, कादंबरी विकत पण घ्यायची आणि प्रश्नाचं उत्तरही शोधायचं आहे. 😊 नायक-नायिकेमधील प्रेमप्रकरण अजून रंगवलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे पहिल्याच भेटीत दोघांनी चुंबन घेणे हे माझ्यासारख्या नववृद्धाला झेपलं नाही. म्हणजे मी पौगंडावस्थेत असताना चित्रपटात चुंबन दृश्य म्हणजे दोन फुलांनी एकमेकांना स्पर्श करणे. अर्थात आजकालच्या तरुणाईच्या स्पीडला लेखकाचा विचार साजेसा आहे.  

चेतनची पहिली कादंबरी असली तरी त्यात नवखेपणा जाणवत नाही. प्रवाही लेखन आहे. तार्किकतेने चेतनने प्रसंग उलगडले आहेत. एकदम भलतेच रेफरन्स वाचनात येत नाहीत. 

पुस्तक प्रकाशनावेळी सगळं गुडी गुडी बोलायचं नसतं, थोड्या चुका शोधायच्या असतात असा एक प्रघात आहे. त्या सांगायच्या म्हणजे काही व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुका आहेत. प्रिंटिंग मध्ये काही टेक्निकल फॉल्ट आहेत. पण ते पुढच्या आवृत्तीत दूर होतील अशी खात्री आहे. 

प्रकाशक ऋषिकेश वडके, प्रूफ रीडर गजानन परब आणि मुखपृष्ठ कलाकार रोहित लाड यांचेही अभिनंदन. 

अजून असेच नवीन विषय घेऊन चेतनने लेखन प्रवास चालू ठेवावा यासाठी शुभेच्छा. 

अभिनेता राहुल सोलापूरकर, चित्रपट निर्माते भाऊसाहेब भोईर, माजी आमदार विलास लांडे, सैंदाणे साहेब अशा नेते अभिनेते यांच्या मांदियाळीत व्यसपीठ शेअर करायची संधी मिळाली याबाबत चेतनचे आभार.