Monday 22 June 2020

मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र

काम देण्यायोग्य इंजिनीअर्स उपलब्ध नाहीत ही व्यवसायिकांची व्यथा आणि चांगले पगाराचे जॉब्ज उपलब्ध नाहीत ही युवक/युवतींची व्यथा. आणि हे असं घडण्यामागे समाजाचे सर्व कोन कारणीभूत.

ज्या क्षेत्रात तार्किकतेने काम करण्याची अपेक्षा असते अन ते करण्यात कुठल्याही शाखेचा इंजिनीअर चालतो हे लक्षात आल्यावर भोवऱ्यासारखे तमाम स्ट्रीमच्या इंजिनीअर्स ला आपल्याकडे ओढून घेतलेल्या पण त्याबरोबरच कमी वयात आर्थिक स्थैर्य देणारी आय टी इंडस्ट्री, अचानक इंजिनीअर्सची गरज तयार झाल्यावर शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षींनी जन्माला घातलेले इंजिनियरिंग कॉलेजेस, पण त्या कॉलेजेस मध्ये शिक्षणाची क्वालिटी चांगली आहे की नाही याची माहिती न घेता केवळ "पॅकेज" या आकर्षणापोटी घाऊक भावात ऍडमिशन घेणारा आपला समाज, आणि कॉलेजेस वर चांगल्या क्वालिटी एज्युकेशन देण्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी आणि अनास्था असणारं शासन या सगळ्या गोष्टीमुळे नोकरीक्षम इंजिनियर्स ची वानवा या देशात तयार झाली त्यात नवल ते काय? आणि या जोडीला मूल्यांचं अधिष्ठान आपल्या जगण्याला असायला हवं या भावनेचा अभाव याने एकूणात रसातळाला गेलेल्या इकोसिस्टमचा गळा अजून घोटला.

हे वाचताना एक लक्षात असू द्या की  मी व्यथा मांडतो आहे एसएसएमई  च्या अनुषंगाने जिथे आमच्या वाटेला फक्त तिसऱ्या किंवा चौथ्या श्रेणीच्या कॉलेजेस ची मुलं येतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणाईशी संवाद साधणे आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची चळवळ सुरू होणं गरजेचं आहे. असा एक छोटा प्रयत्न औरंगाबादचे अभ्यासू पत्रकार श्री दत्ता जोशी करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नात त्यांनी मला सहभागी करून घेतलं. या संदर्भातील मतं त्यांच्या समवेत मांडली. या पोस्टद्वारे मी आवाहन करतो की मी तर एक छोटा उद्योजक आहे पण जोशींनी अनेक दिग्गज उद्योगपतींना या विषयावर बोलण्यास उद्युक्त केलं आहे. त्यांच्या यू ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि उद्योग जगताच्या एक एम्प्लॉयेबल युथ म्हणून काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्या.

फक्त आणि फक्त मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र घडवू शकतो. 

Wednesday 17 June 2020

भास्कर मंडलिक

भास्कर अनंतराव मंडलिक, ऑगस्ट १९४१-१८ जून २००९.

बऱ्याचदा माझे नातेवाईक असं म्हणतात, इतक्या जणांवर लिहितोस पण स्वतःच्या वडिलांबद्दल लिहिलं नाहीस कधी ते! आज अकरा वर्षे झालीत त्यांना जाऊन. इतके फादर्स डे झाले. पण धीर नाही झाला.

जे मला माहिती आहे त्यांच्या बद्दल He was man of people. एमएसईबी मध्ये मंडलिक साहेबांना ओळखत नाही असा माणूस विरळा.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये बालपण गेलेलं. कधी बोलायचे नाही ते त्याबद्दल. पाचव्या वर्षी मातृछत्र हरवलेलं. सावत्र आई आणि तिने दिलेला प्रचंड त्रास. फार वर्षांपूर्वी बोलले होते. काटा आला होता अंगावर ऐकताना. ६३-६४ च्या सुमारास लागले एमएसईबी मध्ये. बी एस्सी की  बी ए होते ते. तिसरं वर्ष पण पूर्ण नव्हतं झालं बहुधा. पण दुनियादारीच्या विद्यापीठात विशेष प्राविण्यासह पास  होते ते. त्यामुळे त्यांचं शिक्षण काय हे विचारायची गरज ही पडली नाही.

"नाही" शब्द नव्हता त्यांच्या शब्दकोशात. परभणी, बीड, यवतमाळ, औरंगाबाद, नासिक, पुणे, मुंबई आणि पुणे अशी भ्रमंती झाली. बाकी महाराष्ट्रातल्या तमाम गावांना त्यांनी भेट दिलेली. प्रवासाची आवड मला त्यांच्याकडून मिळाली यात शंका नाही. प्रचंड कामसू. मंडलिक साहेबांना काम दिलं आणि ते झालं नाही अशी तक्रार नाही कधी, वरिष्ठ आणि कनिष्ठ, दोघांकडून.

घरात कायम लोकांचा राबता. ऐंशीच्या दशकात, मराठवाड्यासाठी पुणे म्हणजे परदेश. भास्करचं घर आहे, या इतक्या माहितीवर परभणी आणि इतर गावातून लोक धडकायची आणि काम करून परत जायची.

बिझिनेस या प्रकारावर फार त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्याला कधीही त्यांनी प्रोत्साहन नाही दिलं. किंबहुना विरोधच केला. एसकेएफ ला जॉबला लागताना त्यांनी अगदी आवर्जून प्रयत्न केले. पण व्यवसायाने बाळसं धरेपर्यंत ते कायम साशंक राहिले. व्यवसायाला चार पाच वर्षे झाल्यावर मात्र थोडा विश्वास वाटू लागला त्यांना. मग ते त्यांच्या मित्रांना कौतुकाने कंपनी दाखवायला आणत असत.

या ना त्या कारणाने त्यांची आठवण निघत असतेच. पण अ....अभियंत्याचा च्या प्रकाशन सोहळ्यात आणि आता नवीन कंपनीच्या पूजेच्या दिवशी मात्र त्यांची आठवण प्रकर्षाने झाली. अर्थात पुस्तक प्रकाशन सोहळा त्यांच्या मित्रांच्या डोळ्यातून पाहिला असेलच. कंपनीचं आजचं रूप पाहून मात्र ते हरखून गेले असते हे नक्की.

एम एस ई बी त आयुष्य व्यतीत केल्यावर आम्हा सर्वांचं व्यवसायिक आयुष्य पाहून त्यांना खूप बहुदा टेन्शन यायचं. अर्थात त्या पिढीतल्या लोकांप्रमाणे कधी बोलले नाही. त्यात सुवर्ण सहकारी बँक प्रॉब्लेम मध्ये आली जिथे त्यांनी काही पैसे गुंतवले होते. या सगळ्यांची परिणीती कँसर मध्ये झाली. १८ जून २००९ ला त्यांना देवाज्ञा झाली.

आजही जुन्या नातेवाईकांना आणि परिचिताना भेटल्यावर भास्कर मंडलिक यांच्या आठवणी आवर्जून काढल्या जातात, यावरून ते किती समृद्ध आयुष्य जगले याची जाणीव होते.


Tuesday 16 June 2020

चीन आणि आपण

सध्या चीन विरुद्धच्या पोस्टची सोशल मीडियावर धूम आहे. भरीस भर म्हणून ते वांगचुक त्यांची पण समिधा टाकत आहेत. ते टिकटॉक जर आपण डाउनलोड केलं नाही तर राष्ट्रद्रोही अशी भावना तयार झाली आहे. आणि मी जे लिहिणार आहे, त्यात हे प्रकार फालतू आहेत असं अजिबात नाही आहे. मी हे पण लिहिणार नाही की जगभरातल्या युनिव्हर्सिटी मध्ये चायनीज विद्यार्थी सध्या टॉप करत आहेत अगदी आपल्या भारतीय मुलामुलींना मागे टाकून. 

या लेखात मी हे ही लिहिणार नाही की जेव्हा युरोप मध्ये चार दिवसाचा आठवडा ही मागणी जोर धरत असताना चायनीज लोक दिवसरात्र काम करून देशाला पुढे नेत आहेत. चायनीज जिथे आहेत तिथे असण्याची त्यांची लायकी नाही आहे, असं मला ही वाटतं. शेवटी त्यांनी प्रॉडक्ट डिझाइन कॉपी केले आहेत,मग तीन दशकात ८० कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर खेचलं असेल तर ठीक आहे. 

हा लेख आहे भारताने एका क्षेत्रात चीनला कसं नमतं घ्यायला लावलं, त्याविषयी. आणि हा सरकारचा किंवा लष्कराचा विजय नाही. तर भारतातल्या काही कंपन्यांनी चायनीज कंपन्याना केवळ भारतात नव्हे तर जगात कसं झोपवलं, त्याबद्दल हा लेख आहे. 

२००० साली मी बजाज ऑटो चा एच आर हेड झालो. मला १०० डिझाइन इंजिनीअर्स घ्यायचे होते, जगातील सर्वोत्तम मोटासायकल्स बनवण्यासाठी. व्हीजेटीआय आणि आर ई सी कॉलेजेस मध्ये इंटरव्ह्यू घेतल्यावर मला दहा इंजिनियर्स निवडता आले. प्रत्येक वेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सांगायचा की मुलांना टेक्नॉलॉजी कंपनीत जायचं असतं. मी विचारायचो, का, इंजिन डिझाइन करणे हे टेक्नॉलॉजी काम नाही आहे का? बहुतेक बँकेसाठी कोबोल कोड लिहिणे हेच त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी काम होतं, इंजिन डिझाइन करणे हे उत्पादन क्षेत्र म्हणत असावे. 

त्याच्या पुढच्या वर्षी मी कॉलेजेस ला पत्र पाठवलं "तथाकथित टेक्नॉलॉजी कंपनीपक्षा तिप्पट पगार देईल. मला सर्वोत्तम असे १०० इंजिनियर्स हवेत.". बॉडी शॉपिंग करणाऱ्या कंपन्यांना २००० बॉडीज लागायच्या. त्यांना मी ऑफर केलेली सॅलरी देणं शक्य नव्हतं. 

आणि मग बजाज ऑटो चं आर अँड डी डिपार्टमेंट आम्ही उभं केलं. प्रत्येक बॅच मध्ये सोन्याच्या लगडी घेत. सेक्सी मोटारसायकल चं डिझाइन आणि उत्पादन करण्यासाठी आम्ही किंमत मोजली. आमचा निवडीचा रेशो १:१५ होता. इंटरव्ह्यू ला येणारे, अगदी टॉपर्स सुद्धा, निव्वळ दगड होते. पण त्याच दगडाच्या खाणीत आम्ही रत्ने शोधली. त्यांचं इंग्रजी कदाचित कच्चं होतं पण इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल चा जोश होता. 

हाच मार्ग दक्षिण भारतात एका कंपनीने वापरला, टिव्हीएस ग्रुप. त्यांनी सुद्धा खणखणीत आर अँड डी डिपार्टमेंट उभं केलं त्यांच्या मोटारसायकल बनवण्यासाठी. 

२००५ साली ३०% टक्के कमी किंमतीत, चायनीज मोटारसायकल भारतात उपलब्ध झाल्या. डिलर्स चढाओढीने त्या गाड्या विकू लागले. प्रेसने भारतीय मोटारसायकल कंपन्यांचा शेवट असं भाकीत केलं. पण जास्त नाही, फक्त सहा महिन्यात चायनीज मोटारसायकल कंपन्यांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला, ते परत भारतात न येण्यासाठी. 

पुढं मग बजाजने आफ्रिका मार्केटला लक्ष्य केलं. मोटरसायकल ही टॅक्सी म्हणून वापरणाऱ्या आफ्रिकेसमोर दोन पर्याय होते, एक किमती जापनीज बाईक्स किंवा क्वालिटीत रद्दड पण स्वस्त चायनीज बाईक्स चा. चीनच्या किमतीपेक्षा महाग पण उत्तम क्वालिटी च्या बजाज मोटरसायकलने आफ्रिकेत आपलं बस्तान बसवलं. उत्तम वितरण व्यवस्था, सेवा केंद्रे याद्वारे ग्राहकाभिमुख राहत बजाज आफ्रिकेत अव्वल नंबरला आलं आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय टिव्हीएस. चायनीज मोटारसायकल तिथून हद्दपार झाल्या आहेत. 

जे या क्षेत्रात झालं ते, टीव्ही, मोबाईल फोन्स, कंप्युटर्स किंवा फार्मा क्षेत्रात का नाही होऊ शकत? तोच देश, तेच लेबर लॉ, तेच इन्फ्रास्ट्रक्चर पण फरक उद्योजकतेच्या मानसिकतेत असावा. सरकार ची धोरणे हा एक प्रश्न आहेच पण भारतीय उद्यजोकांची झापडबंद मानसिकता हे ही एक कारण आहे. 

भारतीय बाजारपेठेवर चायनीज वरचष्मा असायला सरकार, जनता आणि व्यावसायिक हे तिघेही कारणीभूत आहेत. आणि हा वरचष्मा का नसावा? 

आपल्या आयटीआय झालेल्या मुलाला शॉप फ्लोअर वर काम करायचं नाही आहे, स्टॉक ब्रोकर ला इंजिनीअर पेक्षा जास्त पगार मिळतोय, उत्पादन क्षेत्रातील कंपनीला टेक कंपनी म्हणून मान्यता मिळत नाही आहे, सरकार अजूनही पुरातन लेबर आणि जमीन कायदे बदलायला तयार नाही आहे, आणि उद्योजक गो ग्लोबल च्या गप्पा व्हिस्की चे घोट घेत मारतो आणि कृती शून्य राहतो आणि सरते शेवटी तुम्ही वाचक, हो तुम्हीच, तुमच्या मुलामुलींना शॉप फ्लोअर वर काम करायला प्रेरित करत नाही आहात. हा आपला तसं तर नैतिक भ्रष्टचार आहे आणि त्यामुळेच हे चायनीज आपल्या डोक्यावर बसले आहेत. आपल्याच कचखाऊ वागण्यामुळे आपल्याच घरात येऊन हे चायनीज लोक आपला खिसा रिकामा करत आहेत. 

श्री श्रीनिवास कांथेली यांच्या इंग्रजी लेखाचा स्वैर अनुवाद

Saturday 13 June 2020

"आपलं घर"

"आपलं घर" ही श्री विजय फाळणीकर संस्थापित आणि समाज पुरस्कृत संस्था, ज्यांचे आई वडील नाही आहेत अशा मुलांची आणि मुलांनी जबाबदारी न घेतल्यामुळे परागंदा झालेल्या आई वडिलांची, काळजी घेणारी म्हणून प्रसिद्ध आहे. पण "आपलं घर" ची आरोग्य सेवा ही येणाऱ्या काळात तिची ओळख होणार आहे हे निश्चित.

आपलं घरच्या डोणजे स्थित आश्रमाशेजारी एक छोटेखानी पण सर्व सोयींनी सुसज्ज असं हॉस्पिटल सध्या कार्यरत आहे. तिथे ओपीडी पेशंट तर तपासले जातातच पण डोळ्यांचे आणि दातांचे सर्व ऑपरेशन हे विनामूल्य केले जातात. याशिवाय पॅथॉलॉजी लॅब आहे आणि नुकतं अल्ट्रा सोनोग्राफी ची सेवा सुद्धा तिथे सुरु झाली आहे.

पुण्यात जरी सर्व मेडिकल सेवा उपलब्ध असल्या तरी इथून तीस किमी लांब गेल्यावर अगदी बेसिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशा गावात डॉक्टर आणि दवाखाना आपलं घरच्या मोबाईल मेडिकल व्हॅन द्वारे पोहोचतात आणि तिथल्या वस्तीच्या गरीब लोकांच्या आजाराची काळजी घेतात.

नुकतंच आपलं घर ने वैद्यकीय सेवा देण्याबाबतीत जी गोष्ट साध्य केली त्याने आपलं घरचे देणगीदार आणि इतर संबंधित लोकांना नक्कीच अभिमान वाटेल.

डोणजे येथे आपलं घर ने एक सुबक आणि सर्व उपकरणं युक्त असं "ब्रेस्ट कँसर सर्जरी सेंटर चालू केलं आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे पेशंट साठी अगदी विनामूल्य ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी इथं केली जाते. सेंटर चालू झाल्यापासून आठ दिवसात तीन यशस्वी सर्जरी झाल्या. डॉ. शेखर कुलकर्णी आणि डॉ ओजस देशपांडे वाधवा यांनी श्री फाळणीकर यांच्या कल्पनेला साथ दिली आणि एक दर्जेदार वैद्यकीय सेवा या परिसरात चालू झाली. आपलं घरचं हे पाऊल येणाऱ्या काळात अनेक उत्तमोत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची नांदी आहे असं म्हणणं चूक ठरणार नाही.

श्री नाना पाटेकर आणि श्री दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे लोक, आणि अनेक संस्था आपलं घर बरोबर संलग्न आहेत. या माध्यमातून देश विदेश चे लोक आपलं घर शी आम्ही जोडू शकलो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की आपलं घरला भेट द्या. मला खात्री आहे, तुम्हाला काम नक्की आवडेल आणि फळणीकरांच्या कर्म यज्ञात हातभार लावू शकाल. 

Tuesday 9 June 2020

भानगडी करोनाच्या

शप्पथ सांगतो राव, येड पळलंय. नाय म्हणजे ऐकायचं कुणाचं.

काल पर्यंत सांगत होते की जून मध्ये पिक फिगर पोहोचेल करोनाची आणि मग डाउनवर्ड ट्रेंड चालू होईल. आता सांगत आहेत की जुलै मध्ये पिक फिगर पोहोचेल आणि सप्टेंबर पर्यंत करोना राहील.

कधी सांगतात एअर बॉर्न ट्रान्सफर होणार नाही. वजन जास्त असल्यामुळे खाली फ्लोअर वर पडेल. कुणीतरी मध्येच म्हणतं, नाही एअरबॉर्न ट्रान्सफर होतं, कुठेही सांभाळून रहा.

कुणी म्हणतं मास्क जास्त वापरू नका. ऑक्सिजन इन टेक चा प्रॉब्लेम होईल. कुणी म्हणतं एन ९५ वापरू नका, कॉटन चा मास्क वापरा. कुणी म्हणतं मास्कच्या आऊटर सर्फेस वर व्हायरस असू शकतो. कुणी म्हणतं, आतल्या सरफेस वर राहतो.

कुणी म्हणतं मेटल फेसवर व्हायरस जिवंत राहतो, कुणी म्हणतं फॅब्रिक वर जिवंत राहतो.

कुणी म्हणतं मॉरटॅलिटी  रेट बाकी व्हायरस पेक्षा कमी आहे आणि इथे तर दिवसेंदिवस भयप्रद डेथ स्टोरीज ऐकायला मिळतात.

कुणी म्हणतं एरिया सील आहे, जावं तिथून तर काहीही सापडत नाही आहे.

औषधाच्या बाबतीत कहर झालाय. व्हिटॅमिन सी खा, डी खा. अर्सेनियम खा, कंफ्यूर खा, लिंबू पिळून पाणी प्या, हळद टाकून दूध घ्या, स्टीम घ्या, गरम पाणी घ्या.

थंड असते म्हणून बियर पिऊ नका, व्होडका पिल्याने रशियन लोकांचा डेथ रेट कमी आहे.

एसी असेल तर डक्ट मधून दुसरीकडे व्हायरस जाऊ शकतो, म्हणे.

मध्येच कुणीतरी फ्रान्सचा व्हिडीओ दाखवतं की सगळे हॉटेल्स गर्दीने तुडुंब वाहत आहेत.

कुणी दुसऱ्याच आजारासाठी ऍम्ब्युलन्स बोलावतं आणि दवंडी पिटली जाते पेशंट करोना पॉझिटिव्ह आहे म्हणून.

मायला, एक गाव अन बारा भानगडी झाल्या आहेत या करोनाच्या.