Saturday 13 June 2020

"आपलं घर"

"आपलं घर" ही श्री विजय फाळणीकर संस्थापित आणि समाज पुरस्कृत संस्था, ज्यांचे आई वडील नाही आहेत अशा मुलांची आणि मुलांनी जबाबदारी न घेतल्यामुळे परागंदा झालेल्या आई वडिलांची, काळजी घेणारी म्हणून प्रसिद्ध आहे. पण "आपलं घर" ची आरोग्य सेवा ही येणाऱ्या काळात तिची ओळख होणार आहे हे निश्चित.

आपलं घरच्या डोणजे स्थित आश्रमाशेजारी एक छोटेखानी पण सर्व सोयींनी सुसज्ज असं हॉस्पिटल सध्या कार्यरत आहे. तिथे ओपीडी पेशंट तर तपासले जातातच पण डोळ्यांचे आणि दातांचे सर्व ऑपरेशन हे विनामूल्य केले जातात. याशिवाय पॅथॉलॉजी लॅब आहे आणि नुकतं अल्ट्रा सोनोग्राफी ची सेवा सुद्धा तिथे सुरु झाली आहे.

पुण्यात जरी सर्व मेडिकल सेवा उपलब्ध असल्या तरी इथून तीस किमी लांब गेल्यावर अगदी बेसिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशा गावात डॉक्टर आणि दवाखाना आपलं घरच्या मोबाईल मेडिकल व्हॅन द्वारे पोहोचतात आणि तिथल्या वस्तीच्या गरीब लोकांच्या आजाराची काळजी घेतात.

नुकतंच आपलं घर ने वैद्यकीय सेवा देण्याबाबतीत जी गोष्ट साध्य केली त्याने आपलं घरचे देणगीदार आणि इतर संबंधित लोकांना नक्कीच अभिमान वाटेल.

डोणजे येथे आपलं घर ने एक सुबक आणि सर्व उपकरणं युक्त असं "ब्रेस्ट कँसर सर्जरी सेंटर चालू केलं आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे पेशंट साठी अगदी विनामूल्य ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी इथं केली जाते. सेंटर चालू झाल्यापासून आठ दिवसात तीन यशस्वी सर्जरी झाल्या. डॉ. शेखर कुलकर्णी आणि डॉ ओजस देशपांडे वाधवा यांनी श्री फाळणीकर यांच्या कल्पनेला साथ दिली आणि एक दर्जेदार वैद्यकीय सेवा या परिसरात चालू झाली. आपलं घरचं हे पाऊल येणाऱ्या काळात अनेक उत्तमोत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची नांदी आहे असं म्हणणं चूक ठरणार नाही.

श्री नाना पाटेकर आणि श्री दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे लोक, आणि अनेक संस्था आपलं घर बरोबर संलग्न आहेत. या माध्यमातून देश विदेश चे लोक आपलं घर शी आम्ही जोडू शकलो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की आपलं घरला भेट द्या. मला खात्री आहे, तुम्हाला काम नक्की आवडेल आणि फळणीकरांच्या कर्म यज्ञात हातभार लावू शकाल. 

No comments:

Post a Comment