सध्या चीन विरुद्धच्या पोस्टची सोशल मीडियावर धूम आहे. भरीस भर म्हणून ते वांगचुक त्यांची पण समिधा टाकत आहेत. ते टिकटॉक जर आपण डाउनलोड केलं नाही तर राष्ट्रद्रोही अशी भावना तयार झाली आहे. आणि मी जे लिहिणार आहे, त्यात हे प्रकार फालतू आहेत असं अजिबात नाही आहे. मी हे पण लिहिणार नाही की जगभरातल्या युनिव्हर्सिटी मध्ये चायनीज विद्यार्थी सध्या टॉप करत आहेत अगदी आपल्या भारतीय मुलामुलींना मागे टाकून.
या लेखात मी हे ही लिहिणार नाही की जेव्हा युरोप मध्ये चार दिवसाचा आठवडा ही मागणी जोर धरत असताना चायनीज लोक दिवसरात्र काम करून देशाला पुढे नेत आहेत. चायनीज जिथे आहेत तिथे असण्याची त्यांची लायकी नाही आहे, असं मला ही वाटतं. शेवटी त्यांनी प्रॉडक्ट डिझाइन कॉपी केले आहेत,मग तीन दशकात ८० कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर खेचलं असेल तर ठीक आहे.
हा लेख आहे भारताने एका क्षेत्रात चीनला कसं नमतं घ्यायला लावलं, त्याविषयी. आणि हा सरकारचा किंवा लष्कराचा विजय नाही. तर भारतातल्या काही कंपन्यांनी चायनीज कंपन्याना केवळ भारतात नव्हे तर जगात कसं झोपवलं, त्याबद्दल हा लेख आहे.
२००० साली मी बजाज ऑटो चा एच आर हेड झालो. मला १०० डिझाइन इंजिनीअर्स घ्यायचे होते, जगातील सर्वोत्तम मोटासायकल्स बनवण्यासाठी. व्हीजेटीआय आणि आर ई सी कॉलेजेस मध्ये इंटरव्ह्यू घेतल्यावर मला दहा इंजिनियर्स निवडता आले. प्रत्येक वेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सांगायचा की मुलांना टेक्नॉलॉजी कंपनीत जायचं असतं. मी विचारायचो, का, इंजिन डिझाइन करणे हे टेक्नॉलॉजी काम नाही आहे का? बहुतेक बँकेसाठी कोबोल कोड लिहिणे हेच त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी काम होतं, इंजिन डिझाइन करणे हे उत्पादन क्षेत्र म्हणत असावे.
त्याच्या पुढच्या वर्षी मी कॉलेजेस ला पत्र पाठवलं "तथाकथित टेक्नॉलॉजी कंपनीपक्षा तिप्पट पगार देईल. मला सर्वोत्तम असे १०० इंजिनियर्स हवेत.". बॉडी शॉपिंग करणाऱ्या कंपन्यांना २००० बॉडीज लागायच्या. त्यांना मी ऑफर केलेली सॅलरी देणं शक्य नव्हतं.
आणि मग बजाज ऑटो चं आर अँड डी डिपार्टमेंट आम्ही उभं केलं. प्रत्येक बॅच मध्ये सोन्याच्या लगडी घेत. सेक्सी मोटारसायकल चं डिझाइन आणि उत्पादन करण्यासाठी आम्ही किंमत मोजली. आमचा निवडीचा रेशो १:१५ होता. इंटरव्ह्यू ला येणारे, अगदी टॉपर्स सुद्धा, निव्वळ दगड होते. पण त्याच दगडाच्या खाणीत आम्ही रत्ने शोधली. त्यांचं इंग्रजी कदाचित कच्चं होतं पण इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल चा जोश होता.
हाच मार्ग दक्षिण भारतात एका कंपनीने वापरला, टिव्हीएस ग्रुप. त्यांनी सुद्धा खणखणीत आर अँड डी डिपार्टमेंट उभं केलं त्यांच्या मोटारसायकल बनवण्यासाठी.
२००५ साली ३०% टक्के कमी किंमतीत, चायनीज मोटारसायकल भारतात उपलब्ध झाल्या. डिलर्स चढाओढीने त्या गाड्या विकू लागले. प्रेसने भारतीय मोटारसायकल कंपन्यांचा शेवट असं भाकीत केलं. पण जास्त नाही, फक्त सहा महिन्यात चायनीज मोटारसायकल कंपन्यांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला, ते परत भारतात न येण्यासाठी.
पुढं मग बजाजने आफ्रिका मार्केटला लक्ष्य केलं. मोटरसायकल ही टॅक्सी म्हणून वापरणाऱ्या आफ्रिकेसमोर दोन पर्याय होते, एक किमती जापनीज बाईक्स किंवा क्वालिटीत रद्दड पण स्वस्त चायनीज बाईक्स चा. चीनच्या किमतीपेक्षा महाग पण उत्तम क्वालिटी च्या बजाज मोटरसायकलने आफ्रिकेत आपलं बस्तान बसवलं. उत्तम वितरण व्यवस्था, सेवा केंद्रे याद्वारे ग्राहकाभिमुख राहत बजाज आफ्रिकेत अव्वल नंबरला आलं आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय टिव्हीएस. चायनीज मोटारसायकल तिथून हद्दपार झाल्या आहेत.
जे या क्षेत्रात झालं ते, टीव्ही, मोबाईल फोन्स, कंप्युटर्स किंवा फार्मा क्षेत्रात का नाही होऊ शकत? तोच देश, तेच लेबर लॉ, तेच इन्फ्रास्ट्रक्चर पण फरक उद्योजकतेच्या मानसिकतेत असावा. सरकार ची धोरणे हा एक प्रश्न आहेच पण भारतीय उद्यजोकांची झापडबंद मानसिकता हे ही एक कारण आहे.
भारतीय बाजारपेठेवर चायनीज वरचष्मा असायला सरकार, जनता आणि व्यावसायिक हे तिघेही कारणीभूत आहेत. आणि हा वरचष्मा का नसावा?
आपल्या आयटीआय झालेल्या मुलाला शॉप फ्लोअर वर काम करायचं नाही आहे, स्टॉक ब्रोकर ला इंजिनीअर पेक्षा जास्त पगार मिळतोय, उत्पादन क्षेत्रातील कंपनीला टेक कंपनी म्हणून मान्यता मिळत नाही आहे, सरकार अजूनही पुरातन लेबर आणि जमीन कायदे बदलायला तयार नाही आहे, आणि उद्योजक गो ग्लोबल च्या गप्पा व्हिस्की चे घोट घेत मारतो आणि कृती शून्य राहतो आणि सरते शेवटी तुम्ही वाचक, हो तुम्हीच, तुमच्या मुलामुलींना शॉप फ्लोअर वर काम करायला प्रेरित करत नाही आहात. हा आपला तसं तर नैतिक भ्रष्टचार आहे आणि त्यामुळेच हे चायनीज आपल्या डोक्यावर बसले आहेत. आपल्याच कचखाऊ वागण्यामुळे आपल्याच घरात येऊन हे चायनीज लोक आपला खिसा रिकामा करत आहेत.
श्री श्रीनिवास कांथेली यांच्या इंग्रजी लेखाचा स्वैर अनुवाद
No comments:
Post a Comment