Saturday 25 March 2023

शिक्षण

बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की कमी शिक्षण मिळाल्यामुळे न्यूनगंडत्व हा एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव बनवतं. आणि तो न्यूनगंड, त्यांना व्यावसायिक यश मिळाल्यावर कधी अहंकारात परावर्तित होतो हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. मग व्यवसायामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी आलाच तर त्याचा पाणउतारा करण्याची हे लोक एकही संधी सोडत नाहीत. एखादं भरीव काम लौकिकार्थाने कमी शिक्षित लोकांकडून झालंच तर "बघा,  जास्त शिक्षण न घेऊन सुद्धा मी हे काम केलं की नाही?" असा अहंभाव त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. 

याउलट कमी शिक्षणाचा न्यूनगंड न ठेवता, उच्चशिक्षित लोकांशी कुठलाही बाऊ किंवा आव ने ठेवता हे लोक जेव्हा व्यवहार करतात, तेव्हा कमालीचे प्रोजेक्ट साकार झालेले मी पाहिले आहेत. कोल्हापूर मध्ये सरोज कास्टिंग नावाची कंपनी आहे. त्याचे संस्थापक बापू जाधव हे खूप कमी शिकलेले. पण त्याचा न्यूनगंड ना बाळगता त्यांनी जो मर्सिडीझ आणि कमिन्स ला इंजिन कॉम्पोनंट सप्लाय करण्याचा व्यवसाय उभा केला हे उदाहरण अभ्यास करण्यासारखं. माझे  बिझिनेस मेंटर हे तसे फार शिकलेले नाही आहेत, पण त्यांनी आपल्या पॅशन च्या जोरावर वाचन केलं, स्वतःची थॉट प्रोसेस अप्लाय केली आणि एक स्वतःची स्ट्रॉंग थेअरी बनवली की जी आम्हाला बिझिनेस कसा करायचा ते शिकवते.

जास्त शिकलेल्या लोकांमध्ये जर विनयशीलता असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लागतात. मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे की उच्च शिक्षण हे त्या लोकांना लीन बनवते, त्यांच्या मनात दुसऱ्या बद्दल एम्पँथी तयार करते, ह्युमन इक्वालिटी हे जीवनाचं तत्व बनवतात.  ही लोक कमालीची यशस्वी होतात.

शिक्षण कमी असेल तर तुम्ही "नॉलेज सीकर" बनू शकता आणि भवतालात हे नॉलेज देणारे असंख्य लोक आहेत. त्यांची मदत घ्यायला लाज वाटायचं काही कारण नाही. उच्च शिक्षित असाल तर "नॉलेज गिव्हर" बना. तिथं माज असण्याचं काही कारण नाही.  नॉलेज सीकर आणि नॉलेज गिव्हर यांचं यथोचित कोलॅबोरेशन झालं तर एक अत्यंत सशक्त आस्थापना उभी राहू शकते.  

शिक्षणाबद्दल असा भाव हवा असं माझं मत आहे. त्याचं महत्व वादातीत आहे. पण ते जर नसलं तरी आयुष्य बनवता येतं याबद्दल मनात कुठलीही शंका ठेवू नये असं माझं मत आहे.