Tuesday 8 August 2017

इंडियन रेल्वेज

तर झालं असं की मी एका ग्रुप बरोबर दोन आठवड्यापूर्वी रेल्वे ने दिल्लीला चाललो होतो. निझामुद्दीन एक्स्प्रेसने. २४ जण होतो. आमच्यातल्या एकाला, सुहास नाव ठेवू, रात्री दोन वाजता पोटात कळवळून दुखायला लागलं. काही काळ वेदना सहन केल्यावर त्याने मला तीन वाजता उठवलं. सुहासची तीन वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. त्याची रात्री अवस्था बघून मला वाटलं की हार्टचाच प्रॉब्लेम आहे की काय! एक सव्वा तास जवळ असणाऱ्या पेनकिलर ने आम्ही ट्राय केला काही फरक पडतो का ते! पण नाही उपयोग झाला. शेवटी मी टीसी शोधला, प्रवाशांमध्ये कुणी डॉक्टर आहे का विचारायला. मराठी भाषक होता तो. कुणाही नावामागे डॉ असं लिहिलं नव्हतं.

टीसी म्हणाले "काळजी नका करू. साडेचारला इटरसी येईल. आपण इटारसी ला रेल्वे चा डॉक्टर बोलावू."

मी अवाक. सकाळी साडेचार ला रेल्वेचा डॉक्टर?

त्यांनी माझ्यासमोर इटरसीला फोन करून पीएनआर, बर्थ नंबर सगळं सांगितलं. आणि मला सांगितलं बर्थजवळ जाऊन थांबा.

डॉक्टर काही येणार नाहीत याच तयारीने मी बाकी काय करता येईल या विचारात आलो. ग्रुप मधील बाकी लोकं पण प्रयत्न करत होते. कुणी सुहासच्या बायकोशी फोनवरून त्याच्या आजाराबद्दल धीर देत होते, माहिती विचारत होते.

साडेचारला इटरसी आलं आणि टीसी, डॉक्टर, दोन माणसं असा लवाजमा आला. पन्नासच्या दशकातल्या पिक्चर मध्ये जशी डॉक्टर ची बॅग होती, तशी बॅग होती. डॉक्टर ने चार पाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या त्यातून काढल्या. त्यात वेदनाशामक गोळ्या, उलटीरोधक गोळ्या लिहून दिल्या. हार्टशी संबंधित काही नाही हे पण सांगितलं. हा सगळा प्रकार होईपर्यंत दहा मिनिटे गेले. रु २५० फीस घेतली, ऑफिशियल. आणि मगच रेल्वेला जायचा सिग्नल मिळाला.

डॉक्टरच्या अवतारावरून त्या औषधात काही दम नसावा असं वाटलं. पण चॉईस नव्हता. माझे अंदाज सपशेल चुकवत सुहासला चांगलं वाटू लागलं.

पुढे साडेसहाला भोपाळला आम्ही ट्रेन सोडली आणि सव्वा आठच्या फ्लाईट ने मी आणि सुहास दिल्लीला गेलो ती गोष्ट वेगळी. ते बरंच झालं.

पण सांगायचा उद्देश हा की रेल्वे मध्ये ही सर्व्हिस आहे आणि तिचा वापर फार इफेक्टिव्हली होतो.

इंडियन रेल्वेज

आय एम लव्ह इन इट.

(बाय द वे, मी विचारलं ही प्रभूंची कृपा वगैरे का. तर त्यांनी सांगितलं, नाही, ही सर्व्हिस खूप वर्षांपासून आहे. अगदी सी के जाफर शरीफ रेल्वे मंत्री होते तेव्हा पण होती. हो, म्हणजे आधीच सांगून टाकलं)

Saturday 5 August 2017

Perception

मागच्या आठवड्यात मी रात्री दहा वाजता सारस बागेजवळ ट्राफिक जॅम मध्ये तुफान अडकलो. तिथून हळूहळू लक्ष्मी नारायण थिएटर जवळ पोहोचून वाहतुकीचा तिढा सुटण्याची वाट पाहत होतो. अचानक माझ्या दरवाजावर टकटक ऐकू आली. मी काही विचारायच्या आत त्या माणसाने कारचा दरवाजा उघडला आणि म्हणाला "सर, प्लिज पद्मावती कॉर्नर छोड दिजीए ना" मी म्हणालो "मित्रा, मी उजवीकडे नाही वळणार, तर सरळ जाणार आहे." तर म्हणाला "सर, हेल्प किजिए. साथ मे पेशंट आदमी है"

त्याने दाखवलेल्या दिशेने बघितल्यावर मला एक पायाला प्लास्टर घातलेला वॉकर घेऊन माणूस दिसला. साथीच्या माणसाने परत एकदा अजीजी केल्यावर मी दोघांना गाडीत घेतलं.

तर स्टोरी अशी होती की  दोन दिवसांपूर्वी रशीदचा वाघोलीत ऍक्सिडंट झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन रशीद त्याच्या गावी, म्हणजे बडोद्याला जाण्यासाठी पद्मावती कॉर्नरला त्याच्या मित्राबरोबर रिक्षाने चालला होता. स्वारगेट ओलांडल्यावर लक्ष्मीनारायणच्या चौकात रिक्षावाल्याने ट्राफिक जाम बघून त्या दोघांना सांगितलं, हाच पद्मावती कॉर्नर आहे. आणि लक्ष्मीनारायणच्या समोर सना कोंडुसकर स्टॅन्डला त्याची बस मिळेल असं सांगितलं. कारमध्ये बसल्यावर हेही कळलं की त्यांची बस सुटली होती.

रशीद मला ड्रायव्हरशी बोलायला सांगत होता. मी रशीदला म्हणालो "पहिले ह्या राड्यातून बाहेर निघू. मग मी बोलतो." पंधरा मिनिटे तो खिंड लढवत होता. ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याचे घरचे परेशान होते आणि त्याची नऊ वर्षाची मुलगी लवकर घरी या म्हणून अब्बाला फोन करत होती.

त्याच्या साथीदाराला सांगून मी पोलिसांद्वारे रस्ता काढण्याच्या प्रयत्नात होतो. तिथून बाहेर पडल्यावर सीन असा झाला होता की  बसने कात्रज स्टॉप सोडला होता आणि ड्रायव्हरने रशीदला बसचा नाद सोडायला सांगितला. 

मग मी फोन घेतला. ड्रायव्हर मराठी आहे हे बघून, त्याला सगळी परिस्थिती सांगितली. मी बोललो "गुरु, जिथं आहेस तिथं थांब. मी रामटवतो गाडीला." तो म्हणाला, नवले ब्रिजला थांबतो. पण फक्त दहा मिनिटे.

आणि मी न भूतो न भविष्यती अशी गाडी हाणली. दहाची बारा तेरा मिनिटे झाली, पण ती जीजे डीवाय ७ नंबरची व्हॉल्वो थांबलेली दिसली. मी गाडीतून उतरलो आणि पहिले ड्रायव्हरला धन्यवाद दिले. परत आलो तर रशीद डोळे पुसत उभा होता. त्याची गळाभेट घेत त्याला म्हणालो "जा भेट तुझ्या मुलीला उद्या सकाळी".

या सगळ्या घटनेत माझं दुःख वेगळंच होतं. लक्ष्मी नारायणच्या समोर त्या ट्राफिक जाम मध्ये एक जण कर्णकर्कश्श डॉल्बीच्या भिंतीवर "पप्पी दे, पप्पी दे पारू ला" या गाण्यावर शर्ट काढून नाचत होता. मलाही तसंच विचित्र अंगविक्षेप करत नाचायचं होतं. पण दुसरा एक सण येतोय थोडे दिवसात तेव्हा ती इच्छा पूर्ण करू या भावनेने मी रशीदला घेऊन बाहेर पडलो.

नवले ब्रिज वरून कोंढवा मार्गे मी रात्री साडेअकरा ला घरी पोहोचलो. माझी स्टोरी झोपेत ऐकत वैभवी म्हणाली "या फेसबुकवर पोस्ट जमवण्यासाठी तू अजून काय काय उद्योग करणार आहेस देव जाणे"  

जीएसटी

म्हणजे इन्व्हॉईस बनवायचं. मग त्यावर पाहिले एक्साईज टॅक्स लावायचा. ते झालं की मग त्यावर वॅट लावायचा.

इंट्रा स्टेट बिझिनेस असेल तर एक्साईज लावायचा मग त्यावर सीएसटी लावायचा.

वॅट काही वस्तूंचा ६% तर काहींचा १३.५%

सीएसटी २%

पण जर कुणी सी फॉर्म देऊ नाही शकलं तर मात्र वॅट त्या राज्याच्या टॅक्स स्ट्रक्चर प्रमाणे. १२.५ वा १३.५%.

सी फॉर्म आहे असं सांगून जर कुणी मटेरीयल उचललं आणि तो फॉर्म दिला नाही तर पेनल्टी ज्याने सी फॉर्म दिला नाही त्याला नाही बसत. तर सप्लायर ला बसते.

वॅट हा व्हॅल्यू अँडेड असतो. म्हणजे जितका कस्टमर कडून कलेक्ट करतो आणि जितका सप्लायर ला पे करतो त्यातला फरक शासनाला द्यावा लागतो. सीएसटी मात्र जितका कलेक्ट करतो तितका द्यावा लागतो.

सर्व्हिस टॅक्स हा यापेक्षा वेगळा असतो. एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स हे एकाच हेड खाली किंवा डिपार्टमेंट कडे येत असला तरी सर्व्हिस टॅक्स चा सेट ऑफ हा एक्साईज च्या अगेंस्ट घेता येत नाही.

एखादी अशी सर्व्हिस असेल की जिथे तो पार्ट रिपेयर करायला काही मटेरियल लागत असेल उदा: इलेक्ट्रिक मोटार चं रिवाईंडिंग. मग टोटल बिलाच्या काही भागावर सर्व्हिस टॅक्स. अन कॉपर वापरलं जातं म्हणून काही भागावर वॅट.

इम्पोर्ट करताना कस्टम ड्युटी शिवाय एक काउंटर वेलींग ड्युटी. तिचा रेट एक्साईज इतका. त्याचा सेट ऑफ एक्साईज च्या अगेंस्ट घ्यायचा.

वॅट, सीएसटी, सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईजचे चार रिटर्न फाईल करायचे महिन्यातून एकदा. त्यातले एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स चा महिन्याच्या पाच तारखेच्या आधी तर वॅट आणि सीएसटी चा पंधराच्या आधी.

एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्सचे ऑडिटर वेगळे. वॅट आणि सीएसटी चे वेगळे.

तुम्हाला दोन चॉईस आहेत.

एक तर जीएसटी मुळे या सगळ्यांवर काय परिणाम झालाय याचा थोडा अभ्यास करा.

नाहीतर हॉटेलची बिलं नाचवत त्यावर जीएसटी मुळे महागाई कशी वाढली हे बोंबलत फिरा.

चॉईस इस युवर्स.

नवीन अकौंट

आज सकाळी सातची बंगलोर फ्लाईट होती. पाचला उठलो, फ्रेश वगैरे झालो. उबर बुक केली. निघताना नील झोपेतून उठून कुशीत येऊन विसावला. अत्यंत प्रेमाने त्याला बाय केल्यावर टॅक्सीत येऊन बसलो.

अगदी स्वच्छ टॅक्सी. स्मितहास्य देत चालक गुड मॉर्निंग म्हणाला. त्यात त्याने मंद सुवास असलेली उदबत्ती लावली होती. त्याच बरोबर समोरच्या काचेखाली स्वच्छ कपड्यावर पांढरी फुलं मांडून ठेवली होती. साथीला धारदार आवाजातील किशोरी आमोणकर यांचं गाणं चालू होतं. माझे हात आपसूक जोडले गेले.

एअरपोर्टला काउंटर वर केबिन लगेज चा टॅग देताना तरुणी म्हणाली " I am sure you are not carrying any sharp objects with you" मी म्हणालो "No I don't . Except my brain. Hope you don't mind" कामाच्या गडबडीत ती म्हणाली "इट्स ओके" दोन सेकंदात जोक कळल्यावर खळखळून हसली.

वेब चेक इन केल्यामुळे ऑफिसमधून साध्या पेपर वर बोर्डिंग पास प्रिंट केला होता. असा पास एयरलाइन्स चा भाग फाडताना कसाही फाडतात. मी तो भाग त्या विमानाच्या दरवाजात असणाऱ्या माणसाला फाडायला सोपं पडावं म्हणून आधीच घडी करून ठेवला होता. तो शिस्तीत एका लायनीत फाटलेला बघून तो तरुण पटकन म्हणाला "Oh, this was good one. Thanks".

विमानात माझ्या शेजारी एक सत्तरीच्या काकू बसल्या होत्या. साधारण रेखा कामत सारख्या दिसणाऱ्या. सीट बेल्ट लावता येत नसल्यामुळे कावऱ्या बावऱ्या झालेल्या. मी लावून दिल्यावर डोळ्यातून माया वर्षावली. बंगलोर ला तो सीट बेल्ट काढून देताना हसत म्हणाल्या "Thank you my son"

आता बंगलोरहून चेन्नई ला जाण्यासाठी बंगलोर विमानतळावर जाताना ट्रॅफिक मध्ये बेकार अडकलोय. नशिबाला कोसतोय. मग विचार केला सकाळच्या सुखासीन तीन तासांचं उट्ट निघतं आहे. फिट्टमफाट.

उद्यापासून नवा दिवस आणि नवीन अकौंट.

डिझाइन

काही गोष्टी बनवताना कसल्या गंडल्या असतात ना.

बऱ्याच बेसिन चे नळ असे असतात की पाणी बेसिनमध्ये पडतच नाही. नळाचं तोंड हे बेसिन मध्ये न उघडता अलीकडे. हात धुताना निम्मे पाणी प्लॅटफॉर्म वर सांडतं.

आज एक नळ सर्वणाभवन मध्ये पाहिला. बेसिन पासून बरोबर एक फूट वर. पाणी सोडलं की थेंब उडून शर्टवर.

आमच्याकडे एक लिक्विड डिस्पेन्सर बसवला आहे. कॅन्टीलिव्हर. म्हणजे लिक्विड सोपं काढण्यासाठी नॉब दाबला की लोड स्टँडवर. दोन महिन्यात तुटला. बाकी जे लोकं डिस्पेन्सर मध्ये लिक्विड सोप न विसरता ठेवतात, मला त्यांच्या बद्दल अतीव आदर आहे. आणि नॅपकिन स्टॅन्ड वर तो दिसला तर पाय धरावे वाटतात.

बऱ्याच ठिकाणी युरिनल मध्ये फ्लश होण्यासाठी नॉन कॉन्टॅक्ट सेन्सर असतात. त्याला हात लावायची गरज नसते. तरीही ते भिंतीतून निखळून पडले असतात.

माझ्या वॉर्ड रोब च्या दरवाजाला मॅग्नेट लावले होते. ते उघडताना खूप ताकद लावावी लागते. दरवाजा उघडण्यासाठी इतके नाजूक हँडल दिले होते की दोन महिन्यात ते हातात आले.

मी एक खुर्ची तिच्या दिसण्यावर लुभुन सात एक हजाराला घेतली. तिचं डिझाइन असं आहे की त्यावर बसून काम केलं की खांदे दुखतात. पहिल्यांदा तोंड दाबून मार सहन केला. आता रिसेप्शनला ठेवून दिली.

वापरात येणाऱ्या गोष्टींचं तगडं डिझाइन साठी मी रेल्वे ला मानतो. च्या मारी लाखो लोक तो बर्थ उघड बंद करतात पण त्याची चेन कधी तुटत नाही. त्यांचे इलेक्ट्रिकल उपकरणं डिसी करंट वर असतात. म्हणून नॉर्मल माणसं चोरून नेऊ शकत नाही. नाहीतर फॅन, लाईट दिसलेच नसते आपल्याला. तेजसची स्टोरी ऐकलीच आपण.

कुठलीही गोष्ट फंक्शन मध्ये आणताना सोयीची असली पाहिजे आणि तिचं आयुष्य चांगलं हवं. यात प्रॉडक्ट डिझाइयनर चं स्किल असतं. तसं जे बनवतात त्यांना कडक सॅल्यूट.

उद्देश आणि उद्दिष्ट

नोकरी करत असताना बऱ्याचदा धंद्यात उडी मारण्याचा निर्णय घेताना नोकरीत मिळणारा आताचा पगार हा एक मोठा अडसर असतो. आता मला इतके मिळत आहेत मग धंद्यातून मिळतील का हा प्रश्न डोक्याची कुतरओढ करत असतो अन मग धंद्यात उडी मारण्याचं डिसीजन आपण लांबणीवर टाकत जातो.

नोकरीतून धंदा चालू करताना दोन पद्धती फॉलो करता येतात.

एक म्हणजे सिक्सथ सेन्स वापरून धंद्यात उडी घ्यायची. आणि मग येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत त्याची घडी बसवायची. हे आपण बऱ्याचदा स्वतः हुन करत नसतो. कुणीतरी प्रेरणा देतं, अशी उडी मारण्यासाठी किंवा मग कुणीतरी ढकलतं. ते लहानपणी एखादा मामा विहिरीवर किंवा आजकालच्या जमान्यात स्विमिंग पूल वर कसं भाच्याला ढकलतो पोहायला, अगदी तसं. हे रिस्की असतं. आपण गटांगळ्या खातो, नाका तोंडात पाणी जात. पण बहुतेकवेळा हातपाय मारून पोहायला शिकतो. आणि मग एकदा पोहायला शिकलो की त्यासारखा आनंद दुसरा नाही. धंद्याचं अगदी असं असतं. एकदा का बिझिनेस योग्य पद्धतीने कसा करावा हे कळलं की मग त्यासारखा आनंद नाही. मग आपण वेगवेगळे एक्सपरिमेन्ट करत जातो बिझिनेस मध्ये. कधी मुटका मार, कधी श्वास धरून पाण्याखाली थांब, कधी समर सॉल्ट शिक, कधी सूर मारायची. ह्या सगळ्या टेक्निक्स शिकल्या की बिझिनेस फक्त निखळ आनंद देत राहतो.

इथे मला एका जुन्या इंग्लिश म्हणीची, जी सध्या वॉरन बफे च्या नावाने फिरत आहे, आठवण येते. Never test the depth of water with both feet. हे अगदी खरं आहे. एका पायाने अंदाज घ्यायचा की पाणी किती खोल आहे. आणि किनाऱ्यावर उभं राहायचं. दोन्ही पाय वापरले की सडकून आपटायला होतं आणि बऱ्याचदा तर पाण्याच्या प्रवाहात वाहून जायची पण शक्यता असते. अगदी पाण्याची खोली जास्त नसेल तरीही. नोकरी आणि धंदा यात डायलिमा असणारे लोकांपैकी जे एका पायाने पाण्याची खोली जोखत राहतात ते किनाऱ्यावर राहतात, स्पर्श करणाऱ्या हुळहुळणाऱ्या पाण्याचा आनंद घेत. म्हणजे नोकरी करतात. त्यापैकी जे लोकं घाबरत पाण्याच्या खोलीचा दोन्ही पायाने अंदाज घ्यायला जातात ते धंद्यात वाहून जातात आणि मग बिझिनेस हा काहीतरी अवघड प्रकार आहे असा गैरसमज करून बसतात.

त्यापेक्षा दणकून उडी मारावी पाण्यात. पाण्याचा बॉयन्सी फोर्स तर असतो वरती ढकलायला.

आता दुसरी कॅटेगरी. पगारा इतके पैसे मी बिझिनेस मधून कमवू शकेल का असा विचार करणाऱ्यांसाठी. तर सांगतो, सुरुवातीला असे मिळत नाही. मुळात तुमचा बिझिनेस चा उद्देश तो आहे का याचा प्रश्न एकदा विचारायला हवा. आणि उद्देश म्हणजे उद्दिष्ट नव्हे. उद्दिष्ट पैसे मिळवणे असू शकतं. पण उद्देश वेगळा असू शकतो. तो काय आहे हे शोधण्यासाठी "मी हा बिझिनेस का करतो?" या प्रश्नाचं उत्तर शोधा. आणि येणाऱ्या उत्तराला परत "का" हा प्रश्न विचारा. असं साधारण दहा वेळा करा. मग तुम्हाला तुमच्या बिझिनेस चा मूळ उद्देश कळेल. आणि बहुतेकवेळा येणाऱ्या उत्तराचा आणि पैसे कमावण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. मग तसं असेल तर आता मिळणाऱ्या पगाराचा विषय येतो कुठे?

मागच्या आठवड्यात एसकेएफ ला गेलो होतो. तिथे एक जुना मित्र भेटला. म्हणाला "काय राव तू! आता एसकेएफ ला असतास तर प्लांट हेड सारखी तुझी पोझिशन असती. पगार पण दणकून असता"

आता या मंडळींनी सध्या माझं काय चालू आहे हे पाहिलं नसतं. त्यांच्या लेखी मी अठ्ठावीस वर्षापूर्वीचा राजेश मंडलिक असतो. आणि पगारच म्हणाल तर माझ्यापेक्षा माझे मित्र जे आता एसकेएफ चे सिनियर मॅनेजर + असतील, त्यांचा पगार जास्त असेलही. पण बिझिनेसचा उद्देश हा त्यापेक्षा मोठा असतो.

बिझिनेस करताना एक अभिमानाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की ज्याला आपण क्रिएशन ऑफ वेल्द किंवा डिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्द म्हणतो ती आपल्यामुळे बिझिनेसमध्ये जास्त होते. आपल्या अंगातील अंगभूत बिझिनेस मॅनेजमेंट च्या स्किलमुळे आपल्याशिवाय अजून एक, दहा, शंभर, हजार, दहा हजार, लाख कुटुंबाची एको सिस्टम उभी करण्याचं पुण्य आपण कुवतीनुसार आपल्या गाठीशी बांधत असतो. ही भावना एकदा मनाशी बाळगली की मग नोकरी, तिथला पगार या गोष्टी गौण होतात.

म्हणून म्हणतो, उद्देश समजून घ्या. उद्दिष्ट तुमच्या पायाशी लोळण घालतील.

मन

सकाळी झोपेतून आपण उठलो की शरीर आखडलेलं असतं. सुस्तावलेलं शरीर आळोखे पिळोखे देत आपण सूटं करत व्यायामाला जातो. तिथे मग शरीराच्या अवयवांना वजन लावत दिवसभराच्या धकाधकीला त्यांना तयार करतो. घाम वगैरे गाळून दिवसभराच्या शारीरिक श्रमाला एक काउंटर फोर्स सकाळच्या दीड एक तासात तयार होतो. मग रात्री घरी परत येताना शरीरात एक उत्साह राहतो.

वाटतं निद्राधीन होऊ मस्त. पण तसं होत नाही. कारण आपल्याला एक मन असतं.

मनाचं याच्या उलट होतं. एका उत्फुल भावनेनं ते सकाळी जागं होतं. सकाळी च बायको एक हलकेच....... स्माईल देते. बारका अंथरुणातून निघून कुशीत शिरतो. मोठ्याला हाय फाय देत, आईच्या पाया पडत ते मन शरीराबरोबर बाहेर पडतं. मग मात्र दिवसभराचा तणाव, भांडणं, मान अपमान याने संध्याकाळी घरी येईपर्यंत ते पिचलेलं मन गलितगात्र होतं.

मूर्त शरीराच्या गात्राला सकाळी तयार केलेलं असलं तरी थकलेलं अमूर्त असं मन हे त्या गात्रांसमोर सपशेल हार पत्करतं. आणि मग निद्रिस्त होण्याचा डाव उधळून आपण तळमळत राहतो.

ज्या लोकांचं मनावर ताबा असतो ते अलेक्झांडर बनतात. बाकी माझ्यासारखे फेसबुकवर पोस्ट टाकतात.

पार्कातल्या कविता

कालची संध्याकाळ अद्भुत गेली. स्वरूपा आणि नंदूचा "पार्कातल्या कविता" हा कार्यक्रम पु ल देशपांडे गार्डन मध्ये होता. कार्यक्रम विंदांना समर्पित होता. मला निमंत्रण होतं. विंदांच्या कविता मला आवडतात अन हे स्वरूपा ला माहीत आहे.

आठ  ताकदीचे कवी/कवियत्री होते. अन सगळ्यांनी नितांत सुंदर कविता पेश केल्या. काही गझल, मुक्तछंद, गेय कविता हे कवितेचे वेगवेगळे फॉर्म सादर झाले. सुप्रिया जाधव, निर्मिती, वैभव देशमुख यांना आधी ऐकलं होतं. बाकीच्यांना पहिल्यांदाच ऐकलं.

आणि मग नंदूने माझ्या नावाचा पुकारा केला. विंदांच्या कविता सादर करण्यासाठी. स्वरूपा ने निमंत्रण देताना थोडी कल्पना दिली होती. पण इतक्या तालेवार कवी/कववीयत्रीच्या मांदियाळीत मी खरं तर दबकलोच होतो. समोर म भा चव्हाण बसले होते, दत्तप्रसाद रानडे होते आणि त्यांचे वडीलही होते. बरं मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वाला माणूस. फार तर उद्योजकतेवर बोलणारा. कविता म्हणाल तर एक हौस म्हणून वाचतो. लोकांच्यासमोर म्हणाल तर खर्डेघाशीच्या एका कार्यक्रमात म्हंटलेल्या. पण ते आपले सगळे मित्रच.

इकडेतिकडे विखुरलेलं अवसान गोळा करत तीन कविता सादर केल्या. "माझ्या मना बन दगड", "असा मी कसा मी" आणि "तेच ते तेच ते". सुदैवाने तिन्ही कविता मला पाठ आहेत. लोकांना आवडल्या. अन मलाही आवडल्या.

नंतरचे पंचेचाळीस मिनिटं मात्र चांदण्यांची बरसात होत गेली. पहिले म भा चव्हाण सरांनी एकच पण वडिलांवर अफलातून कविता सादर केली.

आणि मग दादा रानडे, जे वयाने सत्तरीच्या घरात असतील,  यांनी पुढील अर्ध्या तासात कवितेच्या हर एक फॉर्मचा एकेक दागिना पेश केला, त्याने सारेच मुग्ध झालो. जागा सोडून त्यांचे कधी त्यांचे पाय धरले हे कळलंच नाही.

समारोप उत्तेकर यांनी तन्वीर सिद्दिकी च्या अत्यंत समर्पक कवितेने केला.

नंदूने कार्यक्रमाचा फ्लो मस्त मेंटेन केला.

तरंगत घरी आलो.

रात्री झोपल्यावर बरेच वर्षांनी कंपनी, बिझिनेस याव्यतिरिक्त वेगळीच स्वप्नं पडली.

अशी स्वप्नं अधूनमधून पदरात पाडून घ्यावी.

छान वाटतं.

सोशल मीडिया

परवा आय के एफ ने आयोजित केलेल्या डिजिटल मार्केटिंग च्या सेमिनार ला गेलो होतो. एस इ ओ आणि इतर बाबींचं महत्व यावर चर्चा झाल्यावर सोशल मीडिया बिझिनेस साठी कसा उपयुक्त आहे यावर आयोजकांनी आणि काही प्रतिनिधींनी मतं मांडली.

मी म्हणालो "लिंक्ड इन ठीक आहे, पण फेसबुक वर धार्मिक, जातीय आणि राजकीय आदर्शवादावर घमासान युद्ध होतं. म्हणजे एखाद्या कस्टमर ला माझी राजकीय मतं आवडत नसतील तर तो माझी ऑर्डर कॅन्सल करू शकतो." पुढे जाऊन मी हे ही म्हणालो की एखादा आपला एम्प्लॉयीचं कडवं धार्मिक किंवा जातीवरचं मत मालकाला आवडत नसेल तर त्या नोकरदाराच्या नोकरीवर गदा येऊ शकते किंवा उलटं होऊ शकतं.

माझ्या या म्हणण्यावर असा प्रतिवाद केला गेला की प्रत्येकाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असतं. आठ तास नोकरी केल्यावर त्याने काय विचार करावा अन काय लिहावं, it is none of your business.

पटलं मला ते.

पण बरोबर हे ही मनात आलं की आपला समाज इतका प्रगल्भ असता तर आपण भविष्यात महासत्ता होऊ अशा आशेवर जगलो नसतो. तर आपण आज खरंच जागतिक महासत्ता असलो असतो.

डिजिटल मार्केटिंग

त्या डिजिटल मार्केटिंगच्या सेमिनार ला मला आयोजकांनी बोलावलं ते मी माझ्या बिझिनेस मध्ये डिजिटलचा वापर कसा केला ते सांगण्यासाठी. आशिष दलियाने, जो आय के एफ चा ओनर आहे, त्याने माझी कहाणी डिजिटल सक्सेस स्टोरी वगैरे म्हणून उपस्थितांना सांगितलं. ते ऐकून मीही चकित झालो. ते असो. पण जी गोष्ट मी तिथे सांगितली ती इथे सांगतो.

आपल्या बिझिनेसची माहिती जगाला व्हावी म्हणून मी माझी पहिली वेबसाईट बनवली २००३ साली. त्या वर्षी माझा टर्नओव्हर होता रु ११ लाख फक्त. आणि वेबसाईट वर खर्च केला होता वीस ते बावीस हजार. धाडसच ते. पण केलं.

ती बनते ना बनते तोच बिझिनेससाठी मी पहिली इआरपी बनवली. बनवणारे पण नवखे आणि मला तर इआरपी चा फुल फॉर्म पण माहीत नव्हता. सहा महिने अमृत नावाच्या डेव्हलपर बरोबर काम केलं आणि ती इन्स्टॉल केली. पुढे चार वर्षे वापरली. मला तिचा प्लॅटफॉर्म माहीत नाही, लँग्वेज माहीत नाही. पण बनवून घेतली. आजही मनात आणलं तर मी ती वापरू शकतो. मला आठवतंय टर्न ओव्हर ला जस्टीफाय करू शकेल अशी ही ऍक्टिव्हिटी नव्हती. तरी केली.

त्या नंतर परत आशिष नवीन प्रपोजल घेऊन आला. एस इ ओ. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हा नवीन प्रकार होता माझ्यासाठी तेव्हा. पण याहू, गुगल, अल्टाव्हिस्टा या त्यावेळेसच्या फेमस सर्च इंजिन वर आपलं नाव पहिल्या पाचमध्ये दिसायला हवं यासाठी एस इ ओ सर्व्हिस घ्या. ती पण घेतली.

२०१२ पर्यंत मी त्यांची सर्व्हिस घेतली. बख्खळ पैसे ही मोजले. त्यांनतर सेटको ला आमची साईट डायरेक्ट झाली. एस इ ओ, गुगल ऍड वर्ड्स या सगळ्या खर्चातून माझी सुटका झाली.

आताही मी लिंक्ड इन, डिजिटल इ मेलर या द्वारे मार्केटिंग करतो. पैसे ही खर्च करतो. आशिष चं म्हणणं असं की माझी कंपनी ग्रो होण्यामागे हे प्रयत्न पण कारणीभूत आहेत. माझा आणि माझ्यासारख्या छोट्या उद्योजकांना हा नेहमी प्रश्न पडतो की खरंच या माध्यमातून धंदा वाढतो का? ते शोधण्याची काही सायंटिफिक पद्धत आहे का? की कंपनी वाढते म्हणून हे खर्च, एस इ ओ सर्व्हिस विकणारे त्याला गुंतवणुक म्हणतात, मी बोकांडी बसवून घेतो.

हे प्रश्न मी बरेच ठिकाणी विचारले. पण कुणीही समाधानकारक उत्तर देऊ नाही शकले.

हिंदी

एम जी सर,

कैसे बेदिल इंसान हो आप
हाँ, यही लगा आज मुझे सुबह टहलते हुए
कितना अस्वस्थ लग रहा था
फेफड़ों में इतना सारा ऑक्सिजन भरने के बाद
बाहर खड़ी कार का एक्झॉस्ट चला सकते हो क्या?
साँसों में थोड़ा कार्बन डाय आक्साईड भर दूँ
शायद ठीक लगेगा मुझे

आज गया था दूर वादियों में कहीं
सूखें पत्ते चुभ रहे थे मुझे
स्पोर्ट्स शूज़ के सोल को छेदते हुए
कोई फूलों की सुगंध नाक में टटोलते हुए निकल पड़ी
यहाँ कोई कचरा ले जाने वाले ट्रक की व्यवस्था नहीं कर सकते क्या, एम जी सर !

और ये आवाज़ पंछियों की
कैसा ग़लत लग रहा था कानो को ये सुरीलापन
कैसे जीते है यहाँ के लोग
लाउड्स्पीकर की बेसुरी आवाज़ में अपने अपने भगवान को ना पुकारते हुए
ताजूब लग रहा है मुझे

और ताज़ुब लग रहा है मुझे इस बात का भी
ऐसे भी जीता है कोई सत्तर साल का एक नौजवान ?
बीस एकर में फैली हुई एक बंजर ज़मीन को हरे खेती से भरकर
अपने पोते पोती की उम्र कि बच्चों को खाना परोसते हुए
आनंद पाकर ख़ुद तृप्ति की डकार लेते हुए

और ये क्या लगा दिया आपने कि इसके समा जाइए उसको अपने गले लगा लीजिए
कल के ब्रेक्फ़स्ट में पापाजी से कहके
थोड़ा अहंभाव, ज़रा चिड़चिड़ापन हमें परोसिए
तो हम तैयार हो जाएँगे रोज़मरा ज़िंदगी जीने के लिए

क्या एम जी सर
ये कहा लेकर आगये आप हमें
जीते जी आपने तो हमें स्वर्ग ही दिखा दिया

कैसे बेदिल इंसान हो आप ?
एम जी सर

मुक्तेश्वर

मागील एक आठवडा मी एका अद्भुत वातावरणाचा साक्षीदार होतो. आमचे बिझिनेस कोच मनीष गुप्ता यांच्या एका अप्रतिम कोर्समध्ये सहभागी व्हायची मला संधी मिळाली. कोर्सचं नाव होतं माय लाईफ. हा कोर्स उत्तराखंड मध्ये मुक्तेश्वर नावाच्या डोंगराच्या पायथ्याशी सरांच्या घरीच झाला. आम्ही २२ सहभागी, सर, सरांच्या पत्नी आणि आमची एकहाती सरबराई करणारे सरांचे सत्तरीतले वडील. आणि सरबराई या शब्दाचा अर्थ जसाच्या तसा घ्यायचा. पंचवीस जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हा गृहस्थ एकट्यानं बनवायचा. (सरांची आई, मुलांची काळजी घ्यायला पुण्यात होती). जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टींपैकी बऱ्याच गोष्टी अंकल त्यांच्या वीस एकर जागेवर स्वतः च पिकवतात. दुधाच्या मिठाई सकट. त्यासाठी आठ दुभत्या गाई आहेत त्यांच्याकडे.

पागल झालो आम्ही बावीस जण तिथे. वीस वर्षाच्या मुलामुलीपासून ते साठी पर्यंतचे स्त्री पुरुष तिथे सहभागी झाले होते. तिथला सूर्यास्त, नीरव शांतता, दर्याखोऱ्यातून निसर्गाचं विलोभनीय दर्शन, मुक्तेश्वरच्या डोंगरावरून हिमालयाचं दिसणारं भव्य रूप या प्रत्येकावर खरंतर स्वतंत्र लेख होतील.

एका सकाळी मी एकटाच खोल दरीत चालून आलो. भारावून परत आलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच हिंदीत लिहिलं. अक्षरशः एका बैठकीत पंधरा मिनिटात सरसर उतरत गेलं.  सर हिंदी भाषिक असल्यामुळे हिंदीत लिहावं वाटलं.

दहा मिनिटे इकडे तिकडे केल्यावर थोडं विचित्र वाटायला लागलं. जाणवलं की, माझं मराठी भाषेवर मनापासून प्रेम आहे. मग पटकन त्याचा मराठीत अनुवाद करून टाकला. तेव्हा कुठे शांत वाटलं.

एम जी सर, किती निष्ठुर माणूस आहात तुम्ही,
हो, हेच वाटलं आज सकाळी फिरताना
किती अस्वस्थ वाटत होतं मला
फुफुस्सात इतका सारा ऑक्सिजन भरल्यावर
बाहेर उभ्या कारचा एक्झॉस्ट चालू करता का
श्वास भरून कार्बन डाय  ऑक्साईड घेईन म्हणतो
बहुतेक बरं वाटेल मग मला

आज गेलो होतो त्या खोल दरीमध्ये
मातीत पडलेले वाळके पत्ते टोचत होते हो
स्पोर्ट्स शूजच्या सोलला छेदून जात
फुलांचा एक आगळाच गंध नाकाला स्पर्शून गेला
इथे तुम्ही न उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या कुंडीची व्यवस्था नाही करू शकत का, एम जी सर

आणि या पक्ष्यांचे आवाज
कसं वाटतं ना कानाला ही चित्र विचित्र किलबिलाट ऐकल्यावर
कशी जगतात लोकं इथे
लाऊडस्पीकर वरून पहाटे बेसूर आवाजात आपापल्या देवाला बोलावल्याशिवाय
आश्चर्य वाटतंय मला

आश्चर्य वाटतंय मला याचंही
कुणी एक सत्तरीतला तरुण असं कसं जगू शकतो
वीस एकरात फैलावलेल्या खडकाळ जमिनीचं
वनराईत रूपांतर करत, एकहाती तिला सांभाळत
आणि वर आपल्या नातवंडांच्या वयाच्या मुलामुलींना
प्रेमभराने जेवण भरवत, स्वतः तृप्तीचे ढेकर देत

आणि हे काय लावलंय तुम्ही, एम जी सर
याच्या गळ्यात पड, त्याची उराउरी भेट घे
उद्याच्या ब्रेकफास्टमध्ये बाबांना सांगून
थोडा अहंकार, जरा चिडचिड द्यायला सांगा
आम्ही सज्ज होऊ मग आमचं जीवन जगण्यासाठी

छ्या एम जी सर, हे कुठे घेऊन आलात तुम्ही आम्हाला
जिवंतपणी स्वर्गवासीच झालो आम्ही तर

किती निष्ठुर माणूस आहात तुम्ही
एम जी सर.