Saturday 5 August 2017

मन

सकाळी झोपेतून आपण उठलो की शरीर आखडलेलं असतं. सुस्तावलेलं शरीर आळोखे पिळोखे देत आपण सूटं करत व्यायामाला जातो. तिथे मग शरीराच्या अवयवांना वजन लावत दिवसभराच्या धकाधकीला त्यांना तयार करतो. घाम वगैरे गाळून दिवसभराच्या शारीरिक श्रमाला एक काउंटर फोर्स सकाळच्या दीड एक तासात तयार होतो. मग रात्री घरी परत येताना शरीरात एक उत्साह राहतो.

वाटतं निद्राधीन होऊ मस्त. पण तसं होत नाही. कारण आपल्याला एक मन असतं.

मनाचं याच्या उलट होतं. एका उत्फुल भावनेनं ते सकाळी जागं होतं. सकाळी च बायको एक हलकेच....... स्माईल देते. बारका अंथरुणातून निघून कुशीत शिरतो. मोठ्याला हाय फाय देत, आईच्या पाया पडत ते मन शरीराबरोबर बाहेर पडतं. मग मात्र दिवसभराचा तणाव, भांडणं, मान अपमान याने संध्याकाळी घरी येईपर्यंत ते पिचलेलं मन गलितगात्र होतं.

मूर्त शरीराच्या गात्राला सकाळी तयार केलेलं असलं तरी थकलेलं अमूर्त असं मन हे त्या गात्रांसमोर सपशेल हार पत्करतं. आणि मग निद्रिस्त होण्याचा डाव उधळून आपण तळमळत राहतो.

ज्या लोकांचं मनावर ताबा असतो ते अलेक्झांडर बनतात. बाकी माझ्यासारखे फेसबुकवर पोस्ट टाकतात.

No comments:

Post a Comment