Saturday 5 August 2017

Perception

मागच्या आठवड्यात मी रात्री दहा वाजता सारस बागेजवळ ट्राफिक जॅम मध्ये तुफान अडकलो. तिथून हळूहळू लक्ष्मी नारायण थिएटर जवळ पोहोचून वाहतुकीचा तिढा सुटण्याची वाट पाहत होतो. अचानक माझ्या दरवाजावर टकटक ऐकू आली. मी काही विचारायच्या आत त्या माणसाने कारचा दरवाजा उघडला आणि म्हणाला "सर, प्लिज पद्मावती कॉर्नर छोड दिजीए ना" मी म्हणालो "मित्रा, मी उजवीकडे नाही वळणार, तर सरळ जाणार आहे." तर म्हणाला "सर, हेल्प किजिए. साथ मे पेशंट आदमी है"

त्याने दाखवलेल्या दिशेने बघितल्यावर मला एक पायाला प्लास्टर घातलेला वॉकर घेऊन माणूस दिसला. साथीच्या माणसाने परत एकदा अजीजी केल्यावर मी दोघांना गाडीत घेतलं.

तर स्टोरी अशी होती की  दोन दिवसांपूर्वी रशीदचा वाघोलीत ऍक्सिडंट झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन रशीद त्याच्या गावी, म्हणजे बडोद्याला जाण्यासाठी पद्मावती कॉर्नरला त्याच्या मित्राबरोबर रिक्षाने चालला होता. स्वारगेट ओलांडल्यावर लक्ष्मीनारायणच्या चौकात रिक्षावाल्याने ट्राफिक जाम बघून त्या दोघांना सांगितलं, हाच पद्मावती कॉर्नर आहे. आणि लक्ष्मीनारायणच्या समोर सना कोंडुसकर स्टॅन्डला त्याची बस मिळेल असं सांगितलं. कारमध्ये बसल्यावर हेही कळलं की त्यांची बस सुटली होती.

रशीद मला ड्रायव्हरशी बोलायला सांगत होता. मी रशीदला म्हणालो "पहिले ह्या राड्यातून बाहेर निघू. मग मी बोलतो." पंधरा मिनिटे तो खिंड लढवत होता. ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याचे घरचे परेशान होते आणि त्याची नऊ वर्षाची मुलगी लवकर घरी या म्हणून अब्बाला फोन करत होती.

त्याच्या साथीदाराला सांगून मी पोलिसांद्वारे रस्ता काढण्याच्या प्रयत्नात होतो. तिथून बाहेर पडल्यावर सीन असा झाला होता की  बसने कात्रज स्टॉप सोडला होता आणि ड्रायव्हरने रशीदला बसचा नाद सोडायला सांगितला. 

मग मी फोन घेतला. ड्रायव्हर मराठी आहे हे बघून, त्याला सगळी परिस्थिती सांगितली. मी बोललो "गुरु, जिथं आहेस तिथं थांब. मी रामटवतो गाडीला." तो म्हणाला, नवले ब्रिजला थांबतो. पण फक्त दहा मिनिटे.

आणि मी न भूतो न भविष्यती अशी गाडी हाणली. दहाची बारा तेरा मिनिटे झाली, पण ती जीजे डीवाय ७ नंबरची व्हॉल्वो थांबलेली दिसली. मी गाडीतून उतरलो आणि पहिले ड्रायव्हरला धन्यवाद दिले. परत आलो तर रशीद डोळे पुसत उभा होता. त्याची गळाभेट घेत त्याला म्हणालो "जा भेट तुझ्या मुलीला उद्या सकाळी".

या सगळ्या घटनेत माझं दुःख वेगळंच होतं. लक्ष्मी नारायणच्या समोर त्या ट्राफिक जाम मध्ये एक जण कर्णकर्कश्श डॉल्बीच्या भिंतीवर "पप्पी दे, पप्पी दे पारू ला" या गाण्यावर शर्ट काढून नाचत होता. मलाही तसंच विचित्र अंगविक्षेप करत नाचायचं होतं. पण दुसरा एक सण येतोय थोडे दिवसात तेव्हा ती इच्छा पूर्ण करू या भावनेने मी रशीदला घेऊन बाहेर पडलो.

नवले ब्रिज वरून कोंढवा मार्गे मी रात्री साडेअकरा ला घरी पोहोचलो. माझी स्टोरी झोपेत ऐकत वैभवी म्हणाली "या फेसबुकवर पोस्ट जमवण्यासाठी तू अजून काय काय उद्योग करणार आहेस देव जाणे"  

No comments:

Post a Comment