Saturday, 5 August 2017

नवीन अकौंट

आज सकाळी सातची बंगलोर फ्लाईट होती. पाचला उठलो, फ्रेश वगैरे झालो. उबर बुक केली. निघताना नील झोपेतून उठून कुशीत येऊन विसावला. अत्यंत प्रेमाने त्याला बाय केल्यावर टॅक्सीत येऊन बसलो.

अगदी स्वच्छ टॅक्सी. स्मितहास्य देत चालक गुड मॉर्निंग म्हणाला. त्यात त्याने मंद सुवास असलेली उदबत्ती लावली होती. त्याच बरोबर समोरच्या काचेखाली स्वच्छ कपड्यावर पांढरी फुलं मांडून ठेवली होती. साथीला धारदार आवाजातील किशोरी आमोणकर यांचं गाणं चालू होतं. माझे हात आपसूक जोडले गेले.

एअरपोर्टला काउंटर वर केबिन लगेज चा टॅग देताना तरुणी म्हणाली " I am sure you are not carrying any sharp objects with you" मी म्हणालो "No I don't . Except my brain. Hope you don't mind" कामाच्या गडबडीत ती म्हणाली "इट्स ओके" दोन सेकंदात जोक कळल्यावर खळखळून हसली.

वेब चेक इन केल्यामुळे ऑफिसमधून साध्या पेपर वर बोर्डिंग पास प्रिंट केला होता. असा पास एयरलाइन्स चा भाग फाडताना कसाही फाडतात. मी तो भाग त्या विमानाच्या दरवाजात असणाऱ्या माणसाला फाडायला सोपं पडावं म्हणून आधीच घडी करून ठेवला होता. तो शिस्तीत एका लायनीत फाटलेला बघून तो तरुण पटकन म्हणाला "Oh, this was good one. Thanks".

विमानात माझ्या शेजारी एक सत्तरीच्या काकू बसल्या होत्या. साधारण रेखा कामत सारख्या दिसणाऱ्या. सीट बेल्ट लावता येत नसल्यामुळे कावऱ्या बावऱ्या झालेल्या. मी लावून दिल्यावर डोळ्यातून माया वर्षावली. बंगलोर ला तो सीट बेल्ट काढून देताना हसत म्हणाल्या "Thank you my son"

आता बंगलोरहून चेन्नई ला जाण्यासाठी बंगलोर विमानतळावर जाताना ट्रॅफिक मध्ये बेकार अडकलोय. नशिबाला कोसतोय. मग विचार केला सकाळच्या सुखासीन तीन तासांचं उट्ट निघतं आहे. फिट्टमफाट.

उद्यापासून नवा दिवस आणि नवीन अकौंट.

No comments:

Post a Comment