Saturday 5 August 2017

उद्देश आणि उद्दिष्ट

नोकरी करत असताना बऱ्याचदा धंद्यात उडी मारण्याचा निर्णय घेताना नोकरीत मिळणारा आताचा पगार हा एक मोठा अडसर असतो. आता मला इतके मिळत आहेत मग धंद्यातून मिळतील का हा प्रश्न डोक्याची कुतरओढ करत असतो अन मग धंद्यात उडी मारण्याचं डिसीजन आपण लांबणीवर टाकत जातो.

नोकरीतून धंदा चालू करताना दोन पद्धती फॉलो करता येतात.

एक म्हणजे सिक्सथ सेन्स वापरून धंद्यात उडी घ्यायची. आणि मग येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत त्याची घडी बसवायची. हे आपण बऱ्याचदा स्वतः हुन करत नसतो. कुणीतरी प्रेरणा देतं, अशी उडी मारण्यासाठी किंवा मग कुणीतरी ढकलतं. ते लहानपणी एखादा मामा विहिरीवर किंवा आजकालच्या जमान्यात स्विमिंग पूल वर कसं भाच्याला ढकलतो पोहायला, अगदी तसं. हे रिस्की असतं. आपण गटांगळ्या खातो, नाका तोंडात पाणी जात. पण बहुतेकवेळा हातपाय मारून पोहायला शिकतो. आणि मग एकदा पोहायला शिकलो की त्यासारखा आनंद दुसरा नाही. धंद्याचं अगदी असं असतं. एकदा का बिझिनेस योग्य पद्धतीने कसा करावा हे कळलं की मग त्यासारखा आनंद नाही. मग आपण वेगवेगळे एक्सपरिमेन्ट करत जातो बिझिनेस मध्ये. कधी मुटका मार, कधी श्वास धरून पाण्याखाली थांब, कधी समर सॉल्ट शिक, कधी सूर मारायची. ह्या सगळ्या टेक्निक्स शिकल्या की बिझिनेस फक्त निखळ आनंद देत राहतो.

इथे मला एका जुन्या इंग्लिश म्हणीची, जी सध्या वॉरन बफे च्या नावाने फिरत आहे, आठवण येते. Never test the depth of water with both feet. हे अगदी खरं आहे. एका पायाने अंदाज घ्यायचा की पाणी किती खोल आहे. आणि किनाऱ्यावर उभं राहायचं. दोन्ही पाय वापरले की सडकून आपटायला होतं आणि बऱ्याचदा तर पाण्याच्या प्रवाहात वाहून जायची पण शक्यता असते. अगदी पाण्याची खोली जास्त नसेल तरीही. नोकरी आणि धंदा यात डायलिमा असणारे लोकांपैकी जे एका पायाने पाण्याची खोली जोखत राहतात ते किनाऱ्यावर राहतात, स्पर्श करणाऱ्या हुळहुळणाऱ्या पाण्याचा आनंद घेत. म्हणजे नोकरी करतात. त्यापैकी जे लोकं घाबरत पाण्याच्या खोलीचा दोन्ही पायाने अंदाज घ्यायला जातात ते धंद्यात वाहून जातात आणि मग बिझिनेस हा काहीतरी अवघड प्रकार आहे असा गैरसमज करून बसतात.

त्यापेक्षा दणकून उडी मारावी पाण्यात. पाण्याचा बॉयन्सी फोर्स तर असतो वरती ढकलायला.

आता दुसरी कॅटेगरी. पगारा इतके पैसे मी बिझिनेस मधून कमवू शकेल का असा विचार करणाऱ्यांसाठी. तर सांगतो, सुरुवातीला असे मिळत नाही. मुळात तुमचा बिझिनेस चा उद्देश तो आहे का याचा प्रश्न एकदा विचारायला हवा. आणि उद्देश म्हणजे उद्दिष्ट नव्हे. उद्दिष्ट पैसे मिळवणे असू शकतं. पण उद्देश वेगळा असू शकतो. तो काय आहे हे शोधण्यासाठी "मी हा बिझिनेस का करतो?" या प्रश्नाचं उत्तर शोधा. आणि येणाऱ्या उत्तराला परत "का" हा प्रश्न विचारा. असं साधारण दहा वेळा करा. मग तुम्हाला तुमच्या बिझिनेस चा मूळ उद्देश कळेल. आणि बहुतेकवेळा येणाऱ्या उत्तराचा आणि पैसे कमावण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. मग तसं असेल तर आता मिळणाऱ्या पगाराचा विषय येतो कुठे?

मागच्या आठवड्यात एसकेएफ ला गेलो होतो. तिथे एक जुना मित्र भेटला. म्हणाला "काय राव तू! आता एसकेएफ ला असतास तर प्लांट हेड सारखी तुझी पोझिशन असती. पगार पण दणकून असता"

आता या मंडळींनी सध्या माझं काय चालू आहे हे पाहिलं नसतं. त्यांच्या लेखी मी अठ्ठावीस वर्षापूर्वीचा राजेश मंडलिक असतो. आणि पगारच म्हणाल तर माझ्यापेक्षा माझे मित्र जे आता एसकेएफ चे सिनियर मॅनेजर + असतील, त्यांचा पगार जास्त असेलही. पण बिझिनेसचा उद्देश हा त्यापेक्षा मोठा असतो.

बिझिनेस करताना एक अभिमानाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की ज्याला आपण क्रिएशन ऑफ वेल्द किंवा डिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्द म्हणतो ती आपल्यामुळे बिझिनेसमध्ये जास्त होते. आपल्या अंगातील अंगभूत बिझिनेस मॅनेजमेंट च्या स्किलमुळे आपल्याशिवाय अजून एक, दहा, शंभर, हजार, दहा हजार, लाख कुटुंबाची एको सिस्टम उभी करण्याचं पुण्य आपण कुवतीनुसार आपल्या गाठीशी बांधत असतो. ही भावना एकदा मनाशी बाळगली की मग नोकरी, तिथला पगार या गोष्टी गौण होतात.

म्हणून म्हणतो, उद्देश समजून घ्या. उद्दिष्ट तुमच्या पायाशी लोळण घालतील.

No comments:

Post a Comment