Tuesday 31 March 2020

जॉर्ज कार्लीन

जॉर्ज कार्लीन नावाचा एक अमेरिकन स्टँड अप कॉमेडियन आहे. अमेरिकन जीवनशैलीचे त्याने आपल्या शैलीत वाभाडे काढले आहेत. त्याचा व्हिडीओ मी इथे पोस्ट करू शकत नाही, पण त्याच्या बोलण्याला आपण रिलेट करू शकतो.

जॉर्ज म्हणतो की अमेरिकन्स लोक आपल्या जीवन शैलीत मश्गुल आहेत. आणि त्यात तुम्ही तुमचं चांगल्या आरोग्याच्या स्वातंत्र्याला हरताळ फासत आहात. तुम्ही ज्या पद्धतीने राहता आहात, त्यात एखादा व्हायरस तुमची वाट लावू शकतो. बहुसंख्य अमेरिकन्स हे सिक्युरिटी, हायजिन, स्वच्छता, आणि विषाणू पासून सुरक्षितता याने झपाटले गेले आहेत.

तो पुढे म्हणतो "मला कळत नाही, या देशात व्हायरस बद्दलची कमालीची भीती कधी आणि कुठे आली? अमेरिकन मीडिया हा सतत वेगवेगळ्या व्हायरस ची भीती अमेरिकन्स लोकांच्या मनात रुजवत असतो. आणि मग तुम्ही लोक हे घास, ते धु या कामात गढलेले राहता. अन्न खूप जास्त शिजवतात आणि सारखे हात धूत राहतात आणि विषाणूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हेच मुळात मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि हा मूर्खपणा इतका वाढीला लागला आहे की जेलमध्ये इंजेक्शन देऊन कॅपिटल पनिशमेंट द्यायचं असेल तरी ते आधी अल्कोहोल ने दंड साफ करतात. इथे प्रत्येक जण अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी विचित्र काळजी घेत असतो. अख्ख्या अमेरिकेत फूड पॉयझनिंग च्या वर्षात फक्त ९००० केसेस होतात."

"ही आमची इम्यून सिस्टम दिली आहे, तिला ताकदवर बनवण्यासाठी काही विषाणू आजूबाजूला असणे गरजेचं आहे. तुम्ही जर तुमचा देह पूर्ण स्टेराइल (निर्जंतुक) बनवला, आणि देव न करो असा कुठला सुपर व्हायरस तुमच्या बॉडीत शिरला तर त्याला दोन हात करण्याची ताकद तुमच्यात नसणार आहे. त्याचा परिणाम एकच. मृत्यू. कारण एकंच. तुमच्या इम्यून सिस्टमची तुम्हीच वाट लावली आहे."

पुढं जॉर्ज म्हणतो "माझ्या स्वतःबद्दल सांगतो. न्यूयॉर्क मध्ये मी लहान असताना हडसन नदीत पोहायचो, तेव्हा ती नदी कुठली तर तो निव्वळ नाला होता. आणि आज जर कुठला विषाणू मला त्रास देत नसेल तर त्याचं कारण एकंच की त्या नाल्यासदृश नदीत मी पोहलो आहे आणि त्यामुळे माझी रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. मी स्वतःला विषाणूपासून अजिबात रोखत नाही इतकं की जर चुकून माझ्याहातून काही अन्नपदार्थ फ्लोअर वर पडलाच तर मला तो उचलून खायला अजिबात लाज वाटत नाही. कुणी माझ्या बाजूला खोकलं किंवा शिंकलं तर मला भीती वाटत नाही, मी माझ्या टॉयलेटचे सीट कव्हर पण झाकत नाही. मला त्यामुळे खोकला, सर्दी, डोकेदुखी, ताप असा कुठलाही आजार होत नाही. याचं कारण माझी इन बिल्ट इम्यून सिस्टम इतकी स्ट्रॉंग आहे की कुठलाही विषाणू माझ्यात शिरला तर माझी सिस्टम त्याचा खातमा करून टाकते."

पुढं तो जे बोलतो ते तुम्हीच ऐका. म्हणजे मी लिहू शकत नाही ते.

करोना चालू झाला तेव्हा मी नीलला म्हणालो "असं वाटतंय, एखाद्या कचरा कुंडीच्या इथं जावं आणि त्यात डुक्कर कस लोळतो तसं मनसोक्त लोळावं. असले खत्रूड विषाणू अंगात आणावेत की सालं करोना त्याला घाबरून पळून जावा."

जॉर्ज कार्लीन चा व्हिडीओ पाहिल्यावर निल म्हणाला "तुमचे आणि त्याचे विचार किती जुळतात ना?"

तो व्हिडीओ आपल्या मुलाबरोबर स्वतःच्या जबाबदारीवर पहावा. त्याची भाषा डेंजर वाईल्ड आहे आणि खतरनाक शिव्या आहेत हा वैधानिक इशारा आहे. 

Monday 30 March 2020

इव्होल्यूशन प्रोसेस

या वर्षामध्ये एका वेगळ्याच गोष्टीचा मी अनुभव घेतो आहे.

माझा स्वभाव तसा खूप टेन्शन घेणारा. आणि ते टेन्शन घ्यायला काही सीमा पण नाही. कुठं म्हणून खुट्ट झालं की माझ्या झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. मग अगदी कंपनीत मी कुणाला झापडून काढलं, किंवा कुणाकडून तरी अगदी छोटी पण मूर्खपणाची चूक झाली अन त्यामुळे नुकसान झालं, झालंच तर कुण्या मित्रानं काही तरी फालतू पासिंग बाय कॉमेंट केली, कुणावर मी विश्वास टाकला अन त्या विश्वासाला तडा देणारं कुणी वागलं की झालं. मी नुसता तळमळत राहतो. बरं इथं गंमत अशी की माझं किंवा कंपनीचं या प्रोसेस मध्ये जे पैशात नुकसान होतं त्याची मला तसूभर चिंता नसते. पण माझी विचारगंगा ही "हे का झालं" यावर सारखी कोसळत राहते.

कंपनी चांगली चालू असेल तर ही अशीच चांगली चालेल की काही प्रॉब्लेम येईल या विचाराने मी कायम अस्वस्थ असतो. कंपनी चांगली चालू नसेल तरी मग मी विचार करत बसतो की काय केल्याने परिस्थितीत सुधारणा होईल. एकंदरीत "मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो" अशी माझी बारा महिने अवस्था असते.

आणि याच स्वभावामुळे माझ्या दोन प्लास्टी झाल्या. कारण माझी लाईफ स्टाईल ही काही फार अंदाधुंद नव्हती. आता तर नाहीच आहे. एक जेवणाची वेळ न पाळणे आणि चमचमीत खाणे हे सोडलं तर वयाच्या ४३ व्या वर्षी प्लास्टी व्हावं असं काही कारण नव्हतं. मला जाणवतं की फक्त आणि फक्त स्ट्रेस मॅनेज करण्याच्या अपयशामुळे मला हा आजार लागला.

यावर्षीही मी वर उल्लेखलेल्या गोष्टींनी चिंतीत असतो. पण २०१९-२० या आर्थिक वर्षात दोन जबरी धक्के बसले. एक ७ जुलै २०१९ ला एका अपघातात माझे चार सहकारी गमावले. आणि दुसरं या करोना मुळे बिझिनेस तात्पुरता बंद करावा लागला. त्या अपघातावेळी सुद्धा मी ती घटना कळल्यावर, म्हणजे सकाळी अकरा पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत सांत्वनापलीकडे होतो. पण एकदा मी त्या घटनेची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र पूर्ण धैर्याने त्या घटनेला आणि त्यानंतरच्या आलेल्या परिणामाला सामोरे गेलो. अर्थात यामध्ये घरची लोक, लहान भाऊ उन्मेष आणि कंपनीतल्या सहकाऱ्यांची साथ होतीच.

आता सुद्धा करोना मुळे रेव्हेन्यू बंद झालाय, खर्च चालू आहेत, लॉकडाऊन कधी संपणार माहित नाही, त्यांनतर काय आव्हानं उभी राहणार याचा अंदाज नाही, तरीही आश्चर्यकारक रित्या मला त्याचं अजिबात टेन्शन येत नाही आहे. उलट वर सांगितल्याप्रमाणे क्षुल्लक मानवी संबंधातील ताणतणावामुळे रात्र जागवणारा मी आता मात्र व्यवस्थित झोपतो आहे. आता त्या मागे भावना काय आहे, वयोमानानुसार मानसिक स्थिती सुधारली आहे का, की गेले चार वर्षांपासून स्वतःला मेंटली स्टेबल बनवण्याचे जे कॉन्शस प्रयत्न चालू आहेत त्याचा परिणाम आहे का, की जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्यावर आपण डोकेफोड करू नये असं काही झालं आहे का,  याचा काही तपास लागत नाही आहे. पण असं झालं आहे खरं.

माझी बहीण मानसी देशमुख ही मानसोपचार तज्ञ आहे. तिनेही मला एकदा तिच्या क्लिनिकवर लोकांशी संवाद साधायला बोलावलं होतं, स्ट्रेस मॅनेज कसा करावा, हा विषय होता. तेव्हा तिथेही मी हेच सांगितलं की चार वर्षांपूर्वी मी कार्यक्रमाला असतो ते प्रेक्षक म्हणून आणि न की वक्ता म्हणून.

असो. माणसाचं आयुष्य ही  एक इव्होल्यूशन प्रोसेस असते असं म्हणतात, आणि मी त्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतो आहे हे निःसंशय.



  

Friday 27 March 2020

संकल्प

आजच्या मितीला करोना हा विषय निघाला की दुसरा शब्द मनात येतो अन तो म्हणजे चीन. एकेकाळी अत्यंत मागास असलेल्या या देशाने नव्वदीत कात टाकायला सुरुवात केली आणि बघता बघता गेल्या तीस वर्षात तो एक प्रबळ महासत्ता म्हणून नावारूपाला आला. भौतिकतेच्या कसोटीवर त्याने केलेली प्रगती ही नेत्रदीपक आहेच आणि अचंबित करणारी सुद्धा.

पण या सगळ्या प्रगतीला एक दुसरी काळी बाजू आहे. आणि ती म्हणजे तिथलं कम्युनिस्ट शासन, त्यांनी वेगवगेळ्या पद्धतीने अवलंबलेली मानवी मूल्यांना हरताळ फासणारी त्यांची कार्यपद्धती. व्यवसायाच्या निमित्ताने मला दोन वेळा चीनला जाण्याची संधी मिळाली. अमेरिका, युरोप किंवा तैवानच्या मानाने माझ्या चीनला जास्त चकरा नाही झाल्या. पण चायनीज व्यावसायिकांशी संभाषण मात्र खूपदा करावे लागले. आणि खोटं कशाला सांगू, या संपन्न देशातील अनुभव पाहून माझ्या पदरी घोर निराशा पडली. ती का पडली, कशामुळे मी या देशाबद्दल फार आग्रही नाही याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मी काही खूप मोठा उद्योजक नाही आहे, त्यामुळे माझ्या मताला फारशी किंमत नाही हे मला माहित आहे आणि काही शे लोकांना भेटल्यावर पूर्ण देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे हि कळतं. पण या काही शे व्यावसायिकांमध्ये किमान एखादी तरी आदर्श केस निघावी. पण तिथेही निराशाच पदरी आली.

चीन च्या आणि आपल्या उत्पादनाचा जर तौलनिक अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की चीन हा लो कॉस्ट आणि हाय व्हॉल्युम असे प्रॉडक्टस आपल्याकडे पाठवतो. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की याची क्वालिटी जर खराब असेल, आणि ती बहुतेकदा असतेच, तर त्याविरुद्ध दाद मारायला काही यंत्रणा नाही आहे. पण मुळात त्याची किंमत इतकी कमी असते की त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आपली इच्छा होत नाही. मुख्य म्हणजे त्या खराब क्वालिटी चा आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठं नुकसान होत नाही. आणि त्यामुळे आपण बेफिकीर राहतो. २००५ मध्ये मी चीन मध्ये एक लगेज आणि ब्लेझर घेतला होता. लगेज तर इथे येईपर्यंत तुटलं आणि तो स्वस्त ब्लेझर इतक्या भंगार क्वालिटी चा सापडला की मोन्यूमेन्ट म्हणून लटकवून ठेवला आहे.
ह्या उलट आपला भारत देश. लॉ व्हॅल्युम पण हाय कॉस्ट आणि क्वालिटी मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची, अशा प्रॉडक्टस मध्ये जगभर लोकप्रिय आहे. याचं मोठं उदाहरण म्हणजे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री. दशकापूर्वी मोठी बातमी आली होती, चायनीज उत्पादक येणार म्हणून. पण भारतीय उद्योजक लोकांच्या कल्पकते समोर आणि राजकीय इच्छाशक्ती समोर चायनीज भारतात प्रवेश पण करू शकत नाही. इतकंच नाही तर ऑटोमोबाईल मध्ये लागणाऱ्या मेकॅनिकल पार्टस मध्ये सुद्धा भारतातील उत्पादकांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वरचष्मा टिकवून ठेवला आहे.
मी ज्या इंडस्ट्री ला रिप्रेझेन्ट करतो तो मशीन टूल इंडस्ट्री. अतिशय कॅपिटल इंटेनसिव्ह. इथे सुद्धा चायनीज कंपन्या शिरकाव नाही करू शकल्या. त्या देशाचं अंतर्गत कंझमप्शन हा जरी एक इश्यू असला तरी चायनीज प्रॉडक्ट ची खराब क्वालिटी हा एक मोठा मुद्दा आहे. 
सगळ्यात बेकार गोष्ट या चायनीज लोकांची आणि ती म्हणजे अतिशय खालच्या पातळीची विश्वासार्हता. एका पंजाबी उद्योजकाला चायनीज कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर च्या डील मध्ये करोडो रुपयाला कसा गंडा घातला याची सुरस कथा आहे . माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला एका निर्जन गावात बिझिनेस डील फायनल करण्यासाठी नेलं आणि धाकदपटशा करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अक्षरश: जीव वाचवून पळून यावं लागलं होतं. मी सुद्धा तीस एक चायनीज बिझिनेस प्रोफेशनल्स बरोबर संवाद साधला आहे. इतक्या टीचभर लोकांशी बोलून सगळ्या देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे कळतं मला, पण मी ज्यांना भेटलो त्यातले बहुतेक सुमार बुद्धिमत्तेचे आणि आढ्यताखोर असे वाटले. चायनीज लोकांनी कसं गंडवलं याच्या अजून चार पाच कथा माझ्या पोतडीत आहेत. दुसऱ्यांच्या बौद्धिक संपदेचा आदर आणि आर्थिक शिस्त नावाचा प्रकार या चायनीज मंडळींच्या जवळपास ही फिरकत नाही. आपल्याकडे जे प्रॉडक्टस सप्लाय केले जातात ते खूप कमी प्रॉफिट मार्जिन वर बनतात. पण थोडंही काही बिघडलं की ते दिवाळखोरी घोषित करतात. पण ती केल्यावर त्यांना वाळीत टाकलं जात नाही तर तिथलं राजकीय सपोर्ट आणि बँकिंग सिस्टम त्यांना परत दिवाळखोरी करण्यासाठी उभं करते.
आपल्याला जे चांगले चायनीज प्रॉडक्टस मिळतात ते पाश्चात्य आस्थापनेखाली बनले जातात. त्याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे Apple. फॉक्सकोन नावाच्या तैवानीज काँट्रॅक्ट उत्पादकाबरोबर apple चे बिझिनेस मॉडेल बेजोड आहे.
अत्यंत राक्षसी म्हत्वाकांक्षेने झपाटलेल्या चीन ला मानवता विरोधी वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार आहे. त्यांच्या एकुणात वर्क कल्चर पेक्षा आपल्या भारतात उन्नत मान व्हावी अशी वस्तुस्थिती आहे.
थोडक्यात सांगायचं तर चीन जसा आहे तसाच राहिला तर ते त्यांच्यासाठी कबर खणत आहेत. आणि तसं नाही झालं तरी त्यांची तथाकथित डोळे दीपावणारी प्रगती त्यांनाच लखलाभ. 
ही झाली चीनची निगेटिव्ह बाजू. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून काही चांगल्या गोष्टी असाव्यात. अंदाज तर नक्कीच बांधू शकतो. सगळ्यात मुख्य म्हणजे ते एका गोष्टीने झपाटले आहेत. आणि ते म्हणजे जगात अव्वल नंबर होणे. ते ही एका कुठल्या क्षेत्रात नाही. तर जी काही क्षेत्रे आहेत, तिथे सगळीकडे पहिला नंबर. उत्पादन, सर्व्हिस, बांधकाम, अंतराळ, रेल्वे, खेळ, बायोटेक्नॉलॉजी, मिलिटरी तुम्ही नाव घ्या आणि त्यांना जगात अव्वल व्हायचं आहे. मग त्यातून "जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग" किंवा "५० मजली बिल्डिंग अकरा दिवसात" किंवा "जगातली सगळ्यात वेगवान रेल्वे" किंवा "ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त पदके" अशा टाईपच्या सगळ्या बातम्या चीनच्या संदर्भांत आजकाल आपण ऐकतो. ही भावना तिथलं स्वनियुक्त सरकार लोकांच्या गळ्यात अडकवण्यात कमालीचं यशस्वी झालं आहे. त्यामुळे चीनमधील प्रत्येक स्त्री पुरुष हे व्यापार उदीम वाढवण्यासाठी कायम झटत असतात. मग त्यात "वर्क एथिक्स" वगैरे ते पासंगाला पण वापरत नाहीत. येनकेनप्रकारेण, किंवा इंग्रजीत बाय हुक ऑर क्रूक असं म्हणतात, त्यांना जगात वरचष्मा प्रस्थापित करायचा आहे हे जाणवतं. 

हा करोना व्हायरस येण्याच्या अगोदरच अमेरिका आणि चीन यांच्यात ट्रेड वॉर चालू झालं होतं. अन त्यातूनच अमेरिकेनं चीनच्या मालावर २५% इम्पोर्ट ड्युटी लावली. त्याने चीन बिथरलं. तिथला बराचसा बिझिनेस हा इतर साऊथ ईस्ट एशियन देशात गेला. भारतालाही त्याचा फायदा झाला. ह्या अशा व्यापारयुद्धाच्या मधेच ही करोनाची भानगड उत्पन्न झाली. 

करोनाची साथ ओसरल्यानंतर जग हे वेगळं रूप धारण करेल यात शंका नाही. ह्या व्हायरसच्या मागे चीनची भूमिका ही संदिग्ध आहे. ज्या म्हणून आंतरराष्ट्रीय षडयंत्र च्या सुरस कथा ऐकायला येत आहेत, त्यात किती तथ्य आहे, यावर भाष्य करण्याइतका माझा अभ्यास नाही. पण एक मात्र मी ठामपणे म्हणू शकतो की जरी हे जैविक शस्त्र म्हणून बनवलं नसेल तरीही चीन या प्रकरणात हात झटकू शकत नाही. त्या व्हायरसचे परिणाम काय होतील याची कल्पना चीनला नसणे हा तकलादू भाबडा आशावाद जरी ग्राह्य धरला, तरी सारं जग मात्र चीनला आरोपीच्या कटघरात उभं बघतोय. आणि इथे भारताला संधी आहे. 

चीनला पर्याय म्हणून अनेक देश उभे राहणार आहेत. मेक्सिको, इंडोनेशिया, आफ्रिकन प्रदेश, ईस्ट युरोप आणि भारत हे प्रबळ दावेदार असावेत असं मला वाटतं. आणि भारताने त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. ही संधी का आहे याची काही तार्किक करणे आहेत. 

१. भारताची शिक्षणपद्धती ही कितीही विवादास्पद असली तरी मनुष्यबळ उपलब्ध होण्याइतकी नक्कीच चांगली आहे.
२. इंग्रजी भाषेचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो. 
३. मेक्सिको सारखी गुन्हेगारी संस्कृती नाही आहे. 
४. कितीही वाद असले तरी लोकशाही आहे. 
५. चीनच्या मानाने आपण बऱ्यापैकी "एथिकल वर्क प्रॅक्टिसेस" वर विश्वास ठेवतो. 
६. आपल्या अकौंटिंग पद्धती या पाश्चात्य देशांनी मान्य केल्या आहेत. 
७. कामाची आवड आहे. आठवड्याला ४८ तास काम करणारा आपला एकमेव देश असावा. 
८. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण कम्युनिकेशन या क्षेत्रात चांगली मुसंडी मारली आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 
९. लेबर कॉस्ट ही आजही आपली बऱ्यापैकी कमी आहे. सध्या चीनच्या निम्मी आहे. 
१०. फ्रुगल पद्धतीने म्हणजे काटकसरीने काम करायची आपल्याला सवय.   

या गोष्टीमुळे चीनला पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात आपल्या भारत देशाला प्राधान्य मिळेल असा मला विश्वास आहे. अर्थात आपले काही कच्चे दुवे पण आहेत. त्यावर एक राष्ट्र म्हणून, समाज म्हणून आपण जर काम केलं तर आपली विश्वासार्हता अजून वाढेल. ते मुद्दे खालीलप्रमाणे: 

१.  व्यवसाय पूरक प्रणाली अजून आपल्याकडे तयार नाही आहे. या मध्ये बँकिंग सिस्टम आणि कस्टम्स याचा प्रामुख्याने समावेश होतो. कर रचना हा  प्रश्न जीएसटी मुळे बऱ्यापैकी सुटला आहे. 
२. पायाभूत सुविधे मध्ये अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. वीज आणि दळणवळण यात आपण खूप मागे आहोत. रस्ते आणि रेल्वे मार्ग यात प्रचंड काम करण्याची गरज आहे. रस्ते ही शासनाची बाब असली तरी एक समाज म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इमानेइतबारे काम करून चांगल्या प्रतीचे रस्ते बनवण्याचं उत्तरदियत्व आपल्या अंगावर घ्यावं. 
३. स्वच्छतेचा अभाव हा एक खूप मोठा दुर्गुण आहे. स्वच्छ इंडिया ही फक्त घोषणा न राहता आपली जीवन प्रणाली बनावी. 
४. चीनपेक्षा आपली विश्वासार्हता चांगली असली तरी त्यात सुधारणेला वाव आहे. 
५. मूलभूत संशोधन आपण करत नाही. 
६. एक समाज म्हणून आपण व्हॅल्यू सिस्टम डेव्हलप करू शकलो नाही. त्यामुळे एक ब्रँड म्हणून आपला देश खूप मागे आहे.

एकंदरीत वरील आणि अजून काही मुद्दे असतील, तर त्यावर आपण जर काम केलं तर भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून पुढील दशकात वाटचाल करेल असं वाटतं. चीन इतकी राक्षसी महत्वाकांक्षा आपल्याला नको आहे, पण भांडवलवाद आणि समाजवाद याची योग्य सांगड घालून आपल्या देशातील मोठा प्रवर्ग हा गरिबी रेषेच्या वर ओढण्याची संधी आपल्याला आहे या बाबत मला शंका नाही. श्रीमंत लोक हे जास्त श्रीमंत झाले तर देशाची प्रगती झाली असा एक गैरसमज आहे. याउलट एक देश हा प्रगतीपथावर तेव्हाच जातो जेव्हा गरीब प्रवर्ग हा मध्यमवर्गात ओढला जातो. 

करोनाचं संकट नक्कीच टळेल, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना बळ येवो ही सदिच्छा आणि मुख्य म्हणजे त्यानंतर ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यावर काम करून आपला देश सुदृढ बनवू हा संकल्प करू यात. 



Saturday 21 March 2020

कॉपी

आम्ही स्पिंडल रिपेयर चा बिझिनेस २००२ साली चालू केला. २०१५ पर्यंत आम्ही स्वतःला कधीही स्पिंडल उत्पादक म्हणवून घेतलं नाही. असं नाही की आम्ही स्पिंडल बनवायचो नाही. आम्ही त्याचं उत्पादन करायचो पण ते आमच्या प्रॅक्टिकल नॉलेज आणि कस्टमर इनपुट्स वर.

तसं बघायला गेलं तर स्पिंडल रिपेयर करण्यासाठी आमच्या कडे जगातील उत्तमोत्तम कंपनीचे स्पिंडल यायचे. आणि ते रिपेयर करायला आम्हाला अगदी शेवटच्या पार्ट पर्यंत स्ट्रीप डाऊन करावा लागायचा. मनात आणलं असतं तर प्रत्येक पार्टचं रिव्हर्स इंजिनियरिंग करून आम्ही जगातले सर्वोत्कृष्ट स्पिंडल आम्ही कॉपी करून आमचे प्रॉडक्ट म्हणून विकू शकत होतो. पण आम्ही तसं कधी केलं नाही.

त्यामागे एक कारण आहे. नवीन स्पिंडल चं उत्पादन करण्यासाठी चांगलं डिझाईन असणं गरजेचं आहे, असं आम्हाला नेहमीच वाटत आलं. मी किंवा माझा पार्टनर, डिझायनर नसल्यामुळे आम्ही त्या वाटेला गेलोच नाही आणि स्पिंडल उत्पादन हा नेहमीच स्पिंडल रिपेयर ला सहाय्यक बिझिनेस राहिला.

२०१२ ला सेटको बरोबर जॉईंट व्हेंचर झाल्यावर मात्र गोष्टी बदलल्या. आमच्याकडे लेजिटिमेंट स्पिंडल डिझाइन्स आले सेटको कडून. हे कुणाचे कॉपीड किंवा चोरलेले ड्रॉइंग्ज नव्हते. मग आमचाही उत्साह दुणावला. आम्ही डिझाईन अँड डेव्हलपमेंट हे डिपार्टमेंट चालू केलं. आज आमच्या कडे पाच डिझाईन इंजिनियर्स आहेत आणि अजून काही डिझायनर्स घेण्याचा प्लॅन आहे. माझ्या बिझिनेस पार्टनर चं प्रॅक्टिकल नॉलेज आणि डिझायनर्स चं थेअरिटीकल, याच्या जोडीला सेटको चा सपोर्ट, यामुळे नवनवीन स्पिंडल डिझाइन्स करू लागलो. आजमितीला आम्ही वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी, म्हणजे मिलिंग, ग्राइंडिंग किंवा स्पेशल पर्पज साठी, महिन्याला ३० ते ३५ स्पिंडल उत्पादित करतो.

आणि मला हे लिहायला अभिमान वाटतो की हे सर्व डिझाइन्स आमच्या इंजिनियर्स ने बनवले आहेत. कुणास ठाऊक, लवकरच आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चालू करू.

पाय घसरून केवळ पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्यांचे स्पिंडल कॉपी करण्याची आम्हाला नक्कीच संधी होती. पण आम्ही तो मार्ग निवडला नाही.

दुसऱ्यांचे प्रॉडक्टस कॉपी करून कुणी श्रीमंत होईलही कदाचित, पण संपन्न होणार नाही.