Sunday 26 December 2021

कसं काय जमतं?

 ललिता जेम्स चा दुसरा प्रश्न मला होता, तू इतका फिरतोस, आपलं घर च्या मिटिंग करतोस, कधी कविता म्हणतो, खेळतोस, वर फेसबुकवर टाईमपास पण करतोस, मग बिझिनेस कधी करतोस? ही एकतर कॅम्लिमेंट होती किंवा अशी शंका असू शकते की, खरंच तुझं बरं चालू आहे की..... 

यावर मी पण विचार केला की हे कसं जमत गेलं. कारण उशिरा येण्याच्या सवयीप्रमाणे इथं सुद्धा आनंदी आनंद होता. समोर येणारं काम करायचं आणि दिवसभर बिझी असल्यासारखं दाखवायचं, ही माझी रेग्युलर प्रॅक्टिस होती. मागच्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या एम जी सरांच्या कोर्सनंतर जादू झाली. 

साधारण २०१६ च्या नोव्हेंबर मध्ये आमचा व्हिजन बोर्ड तयार झाला. ज्यामध्ये मूळ सिद्धांत, मूळ उद्देश, मिशन स्टेटमेंट आणि एकंदरीत व्यवसाय आणि स्वतः याची होडी कशी हाकायची याच्याबद्दल असणारे समज, गैरसमज दूर होऊ लागले. भविष्याबद्दलचं जे धूसर चित्र आहे ते स्पष्ट होऊ लागलं. त्यांनतर जसे वर्ष जाऊ लागले, त्याबद्दलची भूमिका आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट दिसू लागले. हे एकदा झालं की , येणाऱ्या कामांची प्रायोरिटी ठरवणं सोपं होऊ लागलं. अर्थात हे एका रात्रीत झालं नाही तर त्यावर सातत्याने काम करत गेलो. 

सध्या आयुष्यात अगदी स्पेसिफिक गोष्टी करतो आहे. सेटको व्यवसाय आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, बाकी बिझिनेस ओनर्स बरोबर डिस्कशन, कॉलेजेस मध्ये जाऊन तरुणाई बरोबर चर्चा,  आपलं घर बरोबर अगदी जुजबी काम, स्वतःची तब्येत, फॅमिली आणि मित्रांबरोबर पार्टी वा गेट टुगेदर या सहा गोष्टीभोवती माझं लाईफ विणलेलं आहे. 

वरील गोष्टीशिवाय दुसरं काहीही करायचं असेल तर मी चेक करतो की वरीलपैकी काही ऍक्टिव्हिटी त्या दिवशी प्लॅन आहे का? नसेल तरच ती गोष्ट करायचं ठरवतो. अन्यथा नाहीच. 

या सगळ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य व्यवसायाला. तिथं माझी गरज असेल तर नंतरच्या चारही गोष्टीला मी दुय्यम स्थान देतो. यात तब्येत हा प्रकार पकडला नाही आहे.  तब्येतीच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज या कुठल्याच कामाच्या आड येत नाही, अपवाद फक्त सकाळी विमानप्रवास असेल तर. तो असेल तरच माझा व्यायाम होत नाही. 

राहता राहिला सोशल मीडियाच्या पोस्ट कधी लिहितो. लिंक्ड इन च्या पोस्ट मी कंपनी वेळेत टाकू शकतो कारण त्याने शक्यतो कंपनीचा ब्रँड पॉप्युलर व्हावा ही अपेक्षा असते आणि मी लिहितो पण त्या अनुषंगाने. फेसबुक वापरण्याच्या वेळ जनरली सकाळी पाच ते साडेपाच, रात्री आठ ते साडेनऊ यापैकी एक, सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल तसं, आदरवाईज विमानप्रवास. 

असो. मोठा निबंध झाला. पण अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर तीन गोष्टी:

- व्हिजन बोर्ड तयार करणे (सगळ्यात अवघड काम)

- कामाची प्रायोरिटी ठरवणे (खूप अवघड काम)

- कामाचं डेलिगेशन करणे. माझ्यापेक्षा जी कामं दुसऱ्याला चांगली येतात, ती मी देऊन टाकली नाही. गंमत म्हणजे दुसऱ्यांपेक्षा मला चांगली जमणारी कामं आता एका बोटावर मोजण्याइतकी उरली आहेत. (अवघड काम)

एकदा ही अवघड कामं जमली की आयुष्य सोपं होऊन जातं. 

Thursday 4 November 2021

दिवाळी 2021

मागच्या नोव्हेंबर पासून पोटात दुखत होतं. बरेच उपाय झाले, चांगले डॉक्टर पण झाले. काही दिवस बरं वाटायचं आणि नंतर परत दुखायचं. शेवटी काल एन्डोस्कोपी केली आणि कारण कळलं. थोडं इन्फेक्शन आहे. पण सगळं कंट्रोल मध्ये आहे. 

काल काहीतरी निदान झाल्यामुळे आणि त्यावर ठोस उपाय कळल्यामुळे आज सकाळी जरा खुशीतच रेसकोर्सला चालायला गेलो. नेहमीपेक्षा वेग जरा जास्तच होता. पोटात अजूनही दुखत असल्यामुळे जॉगिंग न करता वेगात चालायचं हेच ठरवलं होतं. रेसकोर्सचा राउंड पूर्ण झाल्यावर घरी परत येत असताना एक स्त्री माझ्या मागून जॉग करत आली. 

वयाने माझ्यापेक्षा जरा जास्तच असावी. चेहरा घामाने निथळत होता. माझ्याकडे हसत म्हणाली "गुड मॉर्निंग जंटलमन". मी चपापलो. एखाद्या स्त्रीने असं डायरेक्ट ग्रीट केलेलं मला फारसं आठवत नाही. मी पण गुड मॉर्निंग म्हणत त्यांना ग्रीट केलं. अस्खलित इंग्रजीत मला म्हणाल्या "तुझ्यामुळे मी आज इतकं जॉगिंग केलं" माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहत म्हणाल्या "I was trying to beat you entire round of racecourse. Finally, I could beat you now". दोन्ही थम्स अप मी त्यांना काँग्रॅच्युलेशन्स म्हणालो. 

"Have a great day ahead" म्हणत त्या त्यांच्या घराकडे वळल्या. मी यु टू म्हणत पुढे निघालो खरा, आणि वळून त्यांना म्हणालो "wish me luck for rest of the year" आता त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. ते बघत मी त्यांना म्हणालो   "It was terrible 18 months. Counting every wish to come out of it." आता थम्स अप द्यायची वेळ त्यांची होती. बेस्ट लक माय फ्रेंड म्हणत त्या गेल्या. 

जिम ब्रोझ, माझा अमेरिकन मित्र ३१ जानेवारी २०२० ला भारतात होता. तो म्हणाला पण होता त्यावेळी. "करोना बद्दल तुझं काय मत आहे". मी म्हणालो "आमच्या इथं अगोदरच इतके डेडली व्हायरस आहेत, हा करोना आमचं काही करू शकत नाही". पुढच्या अठरा महिन्यात माझ्या त्या स्टेटमेंटच्या धज्जीया उडाल्या. आणि न भूतो न भविष्यती असा उत्मात या चायनीज व्हायरस ने केला. (परवा झूम कॉल मध्ये जिमने माझ्या डायलॉग ची आठवण करून दिली. मी त्याला २४ फेब्रुवारीला ट्रम्प भारतात बागडायला आले होते, त्याची आठवण करून दिली.) 

सुदैवी आहोत की आपण जिवंत आहोत. अनेकांनी त्याला तोंड देताना सॉलिड फायटिंग स्पिरिट दाखवलं आहे. आणि नेव्हर गिव्ह अप अटीट्युड सुद्धा. अनेकांनी या काळात आपल्याला व्यवसायाला नुसता जगवलं नाहीतर रॉक सॉलिड पद्धतीने तोलून धरलं. यातून तरलो आहोच तर आता कुठल्याही प्रश्नाला सामोरे जाण्याची ताकद या अठरा महिन्यांनी दिली. कोणतंही सजग मानव्य या काळात अधिक जबाबदार झालं आहे. अवलोकन केलं तर त्याच्या विजिगिषु वृत्तीची जाणीव त्याला सतत होणार आहे. 

तुम्हाला ही दिवाळी आणि येणारे वर्ष हे सुखाचे, निरामय आरोग्याचे जावो हीच प्रार्थना 

Tuesday 26 October 2021

टिकली

 करोना मुळे माझा आणि समीरचा बिझिनेस स्लो डाऊन मध्ये आला. एक दिवशी असाच कटिंग चहा पीत असताना, समीर म्हणाला "आजकाल फूड इंडस्ट्रीला बरे दिवस आहेत. माझ्याकडे लाडू बनवणारा एक चांगला रिसोर्स आहे. लाडू बनवायचा व्यवसाय चालू करू यात. तू थोडे पैसे टाक, मी थोडे टाकतो."

मलाही फार काही रिस्क वाटली नाही. समीरच्या रिसोर्स डेव्हलप करायच्या स्किलमध्ये मला काही शंका नव्हती. व्यवसाय चालू झाला आणि हळूहळू चांगल्या ऑर्डर्स मिळू लागल्या. लाडू एकदम चांगल्या चवीचे होते यात काही वादच नव्हता. 

सणवाराचे दिवस चालू झाले आणि ऑर्डर्स वाढल्या. गेल्या दोन महिन्यापासून जवळपास ५०० किलो महिन्याला लाडू ची ऑर्डर करत होतो. समीर सगळं सांभाळत होता. मी नेटवर्किंग करत काही रेफरन्स पाठवत होतो.

कालच्या रविवारी मी आमच्या किचनवर व्यवसाय कसा चालू आहे ते बघावं म्हणून धडकलो. असंच अकौंटस वगैरे बघत असताना एक स्त्री तिथं आली. म्हणाली "आम्हाला काही समाजसेवी संस्थांसाठी वाटायला २५० किलो लाडू लागणार आहेत. तुम्ही बनवून देऊ शकता का?" समीर तिथं जवळच होता. धावत आला आणि बाईंशी चर्चा करू लागला. कधी लाडू लागणार, पॅकिंग कसं हवं, प्रति किलो रेंट किती वगैरे.

पंधरा दिवसाचं काम एकाच दिवसात मिळणार होतं. मीही जरा उत्साहात होतो. 

इतक्यात घात झाला. लक्षात आलं की बाईंनी कपाळावर टिकली लावलीच नाही आहे. मी समीरला म्हणालो "थांब, नो बिंदी नो बिझिनेस". 

सम्या माझ्याकडे बघून ओरडला "आर यु आउट ऑफ युअर माईंड?". मी त्याला टेबलपासून लांब घेऊन गेलो आणि म्हणालो "नियम म्हणजे नियम. ज्यांनी टिकली लावली नाही त्यांच्याकडून काही घेणार नाही अन त्यांना काही विकणार नाही. ठरलं म्हणजे ठरलं". 

समीर मला खाऊ की गिळू नजरेने पाहत म्हणाला "लगा, पंधरा दिवसांची ऑर्डर आहे अन तू ती घेणार नाही म्हणतोस." 

मी माझ्या मतावर ठाम राहिलो. बाईंच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्या म्हणाल्या "विचित्र कारणासाठी तुम्ही घरात आलेली लक्ष्मी परत पाठवताय. ठीक आहे, तुमची मर्जी." आणि त्या धाडकन निघून गेल्या.

समीर माझ्यावर सॉलिड भडकला अन त्यानं माझा हिशोब करून त्या किचन मधून हाकलून दिलं. 

मी समीर ला ब्लॉक करू की नुसतं अन फ्रेंड करू हा विचार करत बसलोय. तेवढ्यात समीरचा मला मेसेज आला "फेसबुकवर आपली मैत्री झाली, आणि तिथल्या हॅश टॅग मुळे तुटली." असो. 


Friday 15 October 2021

फळणीकर

त्यांची आणि माझी ओळख तशी २०१३-१४ पासून. इंडस्ट्रीच्या लोकांची समाजसेवेची व्याख्या चेक फिलॉन्थरोपी ला येऊन संपते. त्या न्यायान मी त्यांच्या सानिध्यात आलो. त्यांच्या म्हणजे विजय फळणीकर, आपलं घर या संस्थेचे सर्वेसर्वा, ज्यांनी मला समाजासाठी चेक नाही तर टाइम फिलॉन्थरोपी जी जास्त गरज आहे हे ठसवलं. 

मला काही अवलिया म्हणावे असे लोक भेटले आहेत. फळणीकर त्या संज्ञेला पूरपेर जागतात. एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगलेला हा माणूस. त्यांच्या पराजय नव्हे विजय या पुस्तकात त्याबद्दलची माहिती आलीच आहे. त्यांचं खडतर बालपण, मग बेफाट तारुण्य, मुलाच्या मृत्यूपुढे हतबल पिता आणि नंतरची आपलं घर ची वाटचाल. हे सगळं कमाल  आहे. त्यापलीकडे जाऊन फळणीकर मला भावतात ते म्हणजे झपाट्याने कामाचा उरक असणारा माणूस. त्यांच्या शब्दकोषात "नाही" हा शब्दच नाही. आणि मुख्य म्हणजे एकदा काम हातात घेतलं कि ते संपल्याशिवाय हे गृहस्थ जीवाला उसंत म्हणून देत नाही. अक्षरश: अर्जुनाला जसा फक्त डोळा दिसतो त्याप्रमाणे त्यांना फक्त आणि फक्त हातात घेतलेलं काम दिसतं. 

गेल्या काही वर्षात अशा अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. ब्रेस्ट कँसर सर्जरीचं युनिट आपलं घर मध्ये चालू करायचं असं त्यांच्या डोक्यात आलं. आल्यापासून नेट ४३ दिवसात त्यांनी ते छोटेखानी सुसज्ज ओटी आणि तिथं लागणाऱ्या अद्यावत उपकरणासह त्यांनी उभं केलं. पॅथॉलॉजी लॅब चालू करायचं असं त्यांनी ठरवलं. कुठून ती रेडी टू युज शेड मागवली, सकाळी शेड आली, संध्यकाळी सहा वाजता लॅब सुरु. होस्टेलच्या प्रांगणात अँफी थिएटर सुरु करायचं त्यांच्या मनात आलं. काही नाही, दिवस रात्र त्याचाच ध्यास. बरं ही माझी खाज, म्हणून संस्थेकडून काही किमती इक्विपमेंटचा खर्च न करता तो त्यांनी स्वतः केला, पण सुसज्ज असं छोटं थिएटर उभं केलं. करोना काळात २० ग्रोसरी किट्स बनवू म्हणून मी त्यांना विनंती केली. ती तर त्यांनी पूर्ण केलीच. पण पुढं जवळपास सातशे किट्स गरिबांना वाटली. सांगली पूर, आताचा चिपळूण पूर अशा काही नैसर्गिक आपत्तीनंतर नेहमी पुढे. आतासुद्धा त्यांनी आपलं घर मध्ये २८ बेड चं हॉस्पिटल उभं करण्याचं ठरवलं. ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता देमार काम करत आहेत. परत हे सगळं एकहाती. आपलं घर मध्ये विश्वस्त मंडळ आहे, पण सगळ्यांचे छोटे मोठे उद्योग. त्यामुळे सर्व गाडा काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते एकटे ओढतात. मी तर त्यांना नेहमी म्हणत असतो की ते जर आमच्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये काही व्यवसाय करत असते तर त्यांनी धुव्वाधार काम करत तो व्यवसाय कुठल्या कुठं नेला असता. अर्थात आपलं घर चं स्थान पण वादातीत आहे. 

आपलं घर म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्य आहे. वाहून घेतलं आहे त्यांनी. कुठलाही रेफरन्स त्यांना द्या, शेवटी ते गाडी बरोबर आपलं घर शी संबंधित एखादया मुद्द्यावर चर्चेची गाडी आणून ठेवतात. एकेक क्षण ते संस्थेसाठी वेचतात. कधी कधी वाईटही वाटतं. कारण त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचा झालेला भ्रमनिरस पण कळतो. एव्हाना मला एक कळलं की एकवेळ नफा करणारी कंपनी चालवणं सोपं, पण इमानेइतबारे समाजसेवी संस्था चालवणं अवघड. एक दोन वर्षाची पोरं येतात, त्यांचं आयुष्य तुम्ही घडवता आणि काहीजण नंतर संस्थेकडे पाठ फिरवून जातात, ते पुन्हा कधी परत न येण्यासाठी. फार अवघड फिलिंग असतं ते. तसा माणूस शौकिया मिजाजचा. पण संस्थेसाठी त्यांनी स्वतःला अंतर्बाह्य बदललं. स्वतःचे छंद, मौजमजा हे बंद कपाटात कुलूप लावून ठेवले आहेत. फळणीकरांचे अनुभव पाहून माझे आयुष्याबद्दलचे अनेक दृष्टिकोन बदलले. 

पराकोटीची पारदर्शकता, म्हंटलं तर त्यांचा गुण आणि म्हंटलं तर अवगुण. पण गुणावगुणांची बेरीज वजाबाकी केली तर फळणीकर जिंकले आहेत. आज फळणीकरांनी प्रोजेक्ट तयार केला आणि तो पैशासाठी अडला असं सहसा होत नाही. विप्रो मेडिकेअर सारख्या कडक ऑडिट करणाऱ्या चॅरिटेबल संस्थेनी आपलं घर च्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात काही पैशाचा विनियोग करायचा ठरवलं यातच सगळं काय ते आलं. 

गेले पाच एक वर्षे झालीत, फळणीकरांनी मला आपलं घर चं ट्रस्टी म्हणून काम करायची संधी दिली. मी काम म्हणजे काय हो, ते जे काम करतात, तेव्हा त्यांच्या हाताला हात लावून मम् म्हणायचं. नाही म्हणायला, करोना काळात, पुण्यात असल्यामुळे थोडं काम करू शकलो. पण लॉक डाऊन उठल्यावर माझी भ्रमंती चालू झाली त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यात मनोजगतं आपलं घर मध्ये जाऊ नाही शकलो. पण कुणास ठाऊक, याच आयुष्यात फळणीकरांच्या खांद्याला खांदा लावून एखादा तुफानी प्रोजेक्ट आपल्या हातून व्हावा अशी मनोमन इच्छा आहे. 

फळणीकर सर, तुमचं काम प्रेरणादायी आहे वगैरे फॉर्मल शब्द वापरत नाही. एकच सांगतो, तुम्ही मला मित्र समजता हे एक माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. 

तर अशा या वादळी आयुष्याचा आज हिरकमहोत्सवी वाढदिवस. त्यांना एकदम दिलसे शुभेच्छा. 


Thursday 14 October 2021

टाटा ग्रुप

 एअर इंडिया ची टाटा ग्रुप मध्ये घरवापसी या घटनेबद्दल एव्हाना बरंच काही बोलून झालं आहे. १९३२ मध्ये जे आर डी नी स्थापन केलेली टाटा एअरलाईन्स, १९४६ च्या सुमारास झालेलं तिचं एअर इंडिया हे नामकरण, १९५२ साली राष्ट्रीयीकरण करत भारत सरकारने तिचे केलेलं टेक ओव्हर, १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी अयोग्य पद्धतीने जेआरडी ना केलेले पदमुक्त, १९८० साली इंदिरा गांधींनी परत जेआरडींना परत बोर्ड वर आणणे या गोष्टी या निमित्ताने खूप चर्वितचर्वण झाल्या. 

यावर्षी जेव्हा एअर इंडिया टाटा ग्रुप ने भारत सरकारकडून परत विकत घेतली तेव्हा प्रथेप्रमाणे या कराराबद्दल अनेक वाद उत्पन्न झाले. अगदी गेले दीडशे वर्ष भांडवलशाहीचा राष्ट्रोन्नती साठी उपयोग करणाऱ्या टाटा ग्रुपच्या उद्देशावर पण शंका उत्पन्न केल्या गेल्या. काही राजकीय पक्षांनी आपल्या विचारधारेला जागत "शासनाने टाटा ग्रुप ला फुकटात एअरलाईन दिली" अशी टीका पण केली. 

एअर इंडियाचं खाजगीकरण करावं लागेल याची जाणीव २००० च्या सुमारास झाली. नव्वदच्या दशकात भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आणि जेट एअरवेजचा उदय झाला. राष्ट्रीय एअरलाईन असणाऱ्या एअर इंडियाच्या डोमेस्टिक एअरलाईन, जी इंडियन एअरलाईन्स च्या नावाने ओळखली जायची तिला एक जबरदस्त आव्हान जेटच्या रूपाने उभं राहिलं. जो पर्यंत शासनाचा वरदहस्त होता तोपर्यंत एअर इंडिया अगदी जोमात होती. एअरलाईन चालवणे हे शासनाचे काम नाही हे नेहरूंना सुनवणाऱ्या जेआरडींच्या सल्ल्याची आठवण २००० साली अटलबिहारी वाजपेयी यांना झाली असावी आणि त्यांनी एअर इंडियाच्या ४०% शेअर खाजगी कंपन्यांना विकण्याचा ठराव मांडला.

त्यावेळेसही टाटा ग्रुप शिवाय लुफ्तानसा, सिंगापूर एअरलाईन्स सारख्या आंतरराष्ट्रीय विमाणकंपन्यांनी बोली लावली होती. पण शासनाकडे ६०% शेअर्स आणि त्यायोगे निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग आणि त्याकाळी असणाऱ्या ट्रेड युनियन चा असणारा खाजगीकरणाला विरोध या कारणामुळे प्रकरण बारगळलं. पुढे २००३ मध्ये एअर डेक्कन चा उदय आला आणि भारतात लो कॉस्ट एअरलाईनची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यापाठोपाठ इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट, सहारा सारखे लो कॉस्ट एअरलाईन तर जेट बरोबर किंगफिशर फुल सर्व्हिस एअरलाइन्स ने भारतीय आकाश गजबजून गेले.

एकेकाळी पूर्ण मार्केट शेअर असणाऱ्या एअर इंडिया चा जेट च्या उदयानंतर ३०% च्या खाली आणि नो फ्रिल च्या एअरलाईनच्या शिरकवानंतर १५% च्या खाली आला. त्यात २००७ मध्ये केवळ आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी आणि थोड्याफार नफ्यात चालणारी एअर इंडिया आणि तोट्यात चालणारी इंडियन एअरलाईन्स याचं एकत्रीकरण केलं आणि या शासन अंगीकृत व्यवसायाची घरघर चालू झाली.

त्यांचा तोटा वर्षागणिक वाढू लागला. आताच्या व्यवहारात ₹ ४०००० कोटी चं उत्तरदायित्व सरकारने घेतलं यासाठी आरडाओरड करणाऱ्या लोकांनी एक लक्षात घ्यायला हवं की २००७ पासून आतापर्यंत एअर इंडियाचा एकत्रित तोटा हा ₹ ११०००० कोटी इतका आहे आणि हे नुकसान कारदात्यांचं झालं आहे.  नाही म्हणायला २००४ ते २०१४ या युपीए शासनाच्या काळात खाजगिकरणावर फारशी चर्चा झाली नाही पण फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग प्लॅन बनवला पण त्यात कुणाचा फायनान्स रिस्ट्रक्चर झाला हे सर्वज्ञात आहे. 

२०१४ नंतर एकुणात तोट्यात असणाऱ्या शासनाचे अंगीकृत व्यवसायात निर्गुंतवणूक करण्याची विचारधारा जोर पकडू लागली. २०१७ साली एअर इंडिया मधील मॅजोरीटी स्टेक खाजगी कंपनीला देण्यासाठी निविदा उघडली गेली पण त्यात पूर्ण पारदर्शकता नसल्यामुळे आणि त्या संबधित काही उद्योगावर शासनाचे नियंत्रण असल्यामुळे कुणाही खाजगी कंपनीने निविदेत सहभाग नोंदवला नाही आणि ती योजना पूर्ण बारगळली. 

२०२० नंतर या निर्गुंतवणूकच्या विचारांनी जोर पकडला. एव्हाना एअर इंडिया चा तोटा दिवसाला ₹ २० कोटी या वेगाने वाढत होता. तिला खाजगी कंपनीकडे सुपूर्त करणे किंवा बंद करणे या शिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. एकूण तोटा साधारण ₹ ६१००० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. 

या आधीच्या खाजगीकरणाच्या योजनेत ज्या कारणाने अडथळा निर्माण झाला त्यावर बारकाईने काम करण्यात आलं. हे करण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती लागते ती सद्य सरकारातील मंत्री मंडळाने दाखवली आणि एक एअर इंडिया चा खाजगीकरणाचा मार्ग मोकळा झाला.

टाटा सन्स ने टालास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे एअर इंडिया घेण्यावर ₹ १८००० कोटींची बोली लावली. त्यापैकी ₹ १५३०० कोटी कंपनीची देणी देण्यासाठी वापरले जातील तर भारत सरकारला ₹ २७००  कोटी मिळतील. ₹ ४३००० कोटी रुपयांचं उत्तरदायित्व अजून शासनाकडे आहे. त्यासाठी ₹ १४००० कोटी हे एअर इंडियाच्या स्थावर मालमत्तेची विक्री करून उभे केले जातील तर बाकी सोवेरीयन बॉण्ड्स मधून. पुढील एक वर्षासाठी एअर इंडिया च्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार नाही. त्यांनंतर मात्र टाटा ग्रुप निर्णय घेतील त्याप्रमाणे मॅनेजमेंट ची संरचना करण्यात येईल.

टाटा ग्रुप ने हा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतला असं वाटण्याची शक्यता आहे. पण एक लक्षात घ्यायला हवे की टाटा ग्रुप भांडवलशाही आणि समजोन्नती याचा सुवर्णमध्य साधत असतील तरीही ते कसलेले उद्योजक आहेत. येणाऱ्या काळात जर त्यांना फायदा दिसत नसेल तर त्यांनी एअर इंडिया पदरात पाडून घेण्यासाठी बिड केलंच नसतं. इतके मोठे निर्णय हे भावनेच्या आहारी न जाता व्यवसायिक गणितं जर कंपनीच्या हितासाठी सुटत असतील तर त्या पद्धतीने प्रपोजल दिलं असणार यात काही शंका नाही. टाटा ग्रुप कडे याद्वारे एअर इंडियातील सर्व म्हणजे ११७ विमानांची मालकी येईल. त्याबरोबरच ४००० राष्ट्रीय आणि १८०० आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग त्यांच्यासाठी खुले होतील, 

अजून एक महत्वाचा फायदा टाटा ग्रुपला होणार आहे आणि तो म्हणजे त्यांच्या अनेक व्यवसायाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या व्यावसायिक वाढ होणार आहे. टीसीएस, टाटा मोटर्स, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स या आणि यासारख्या अजून काही कंपन्यांना एअरलाईनच्या अनुषंगाने व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

टाटा ग्रुप ने एअर लाईन व्यवसायातील त्यांची इच्छा कधीही लपवून ठेवली नाही. आणि का त्यांनी त्या व्यवसायात उतरू नये? त्यांच्या रक्तात तो व्यवसाय आहे. एअर इंडिया आपल्या पदराखाली घेण्याआधी टाटा ग्रुप ने एअर एशिया या टोनी फर्नांडीस या मलेशिया स्थित उद्योगपती प्रणित कंपनीत मेजोरीटी स्टेक घेतला तर सिंगापूर एअरलाईन्स बरोबर एअर विस्तारा चालू केली. आज एअर इंडिया, एअर एशिया आणि एअर विस्तारा या तिघांचा प्रवासी शेअर एकत्र केला तर २८% होईल आणि इंडिगो ला एक आव्हान उभे राहील. अर्थात एअर इंडियाचा आंतराष्ट्रीय उड्डाणाचा अनुभव खूप जास्त. दुबई, सिंगापूर सारख्या कमी अंतराशिवाय लांब पल्ल्याच्या टाटा ग्रुप एअर इंडिया आणि विस्तारा च्या साहाय्याने अधिराज्य गाजवणार यात शंका नाही.  एअर इंडिया चा  विमानांचा ताफा आणि १३००० लोकांची अत्यंत ताकदवर टेक्निकल टीम याद्वारे एअर इंडियाचा हरवलेला दैदिप्यमान इतिहास टाटा ग्रुप आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर परत आणू शकतील याबद्दल सामान्य जनमानसात शंका नाही.

Monday 4 October 2021

एअर इंडिया

टाटा- एअर इंडिया वरून काही पोस्ट वाचायला मिळाल्या, म्हणून जरा लिहावंसं वाटलं.  

एव्हाना सगळ्यांना हे माहिती आहेच की भारतातील पहिले कमर्शियल विमान पायलट आहेत जे आर डी  टाटा. आपल्या कल्पक उद्योजकतेवर जेआरडी यांनी १९३२ साली भारतात एअरलाईन सर्व्हिस ची मुहूर्तमेढ रोवली. कराची ते मुंबई अशी फ्लाईट, नंतर पुढे चेन्नई पर्यंत सेवा देऊ लागली. नाव होतं त्याचं, टाटा एअरलाईन्स. 

१९४६ साली जेव्हा स्वातंत्र्याचे पडघम वाजू लागले, त्यावेळी जेआरडी  यांनी कंपनीचं नाव बदललं आणि ती झाली एअर इंडिया. त्याच वेळेस तिचे शेअर पण विक्रीला आले. 

१९५२ साली राष्ट्रीयीकरणाच्या नावाखाली नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शासनाने एअर इंडिया टेक ओव्हर केली. नेहरू आणि जे आर डी खरंतर एकमेकांचे मित्र. भांडवलशाहीचा राष्ट्रोन्नतीसाठी उपयोग करणाऱ्या जे आर डी यांनी जेव्हा नफ्याबद्दलचा उल्लेख केला, तेव्हा नेहरूंनी त्यांना सुनावलं "माझ्याशी बोलताना नफा या शब्दाचा उल्लेख करू नका. फार घाणेरडा शब्द आहे तो". त्या काळात सुद्धा जेआरडीनी नेहरूंना स्पष्टपणे सांगितलं होतं की, एअरलाईन चालवणं हे शासनाला जमणार नाही. नोकरशाही ची कीड लागली तर साऱ्या बिझिनेस वर उदासीनतेचं मळभ येईल. पण नेहरूंनी तो सल्ला सपशेल धुडकावून लावला आणि एअर इंडिया शासनाचा अंगीकृत व्यवसाय झाला. नाही म्हणायला डॅमेज कंट्रोल म्हणून जेआरडीना एअर इंडिया चं अध्यक्षपद दिलं. पुढच्या २५ वर्षात जेआरडींच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने जगभरात एक जबरदस्त एअरलाईन म्हणून नाव कमावलं. 

जेआरडीनी एअर इंडिया मध्ये प्रचंड कष्ट केले, आणि ती नावारूपाला आणली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सेट केल्या. पूर्ण एशिया मध्ये पहिलं बोईंग ७०७ आणण्याचं श्रेय एअर इंडिया चं. गौरीशंकर नाव दिलं होतं त्याला. साऊथ ईस्ट आशिया मध्ये एअर इंडियाचा चांगलाच दबदबा होता. कॅथे पॅसिफिक किंवा सिंगापूर एअरलाईन्स, इंडस्ट्री स्टँडर्डचा बेंचमार्क म्हणून त्या काळात एअर इंडिया कडे पहायच्या. आपल्या पाच पन्नास उद्योगाच्या रगाड्यात आपला ५०% वेळ जेआरडी एअर इंडिया साठी द्यायचे. नानी पालखीवाला, रुसी मोदी, जेजे इराणी, अजित केसकर, दरबारी सेठ, डी आर पेंडसे अशी बाकी व्यवसायासाठी फौज बनवणाऱ्या जेआरडी नी एअर इंडिया ची धुरा स्वतः सांभाळली, यात काय ते समजून घ्या. आर्थिक परतावा शून्य असताना सुद्धा. जेआरडी असेपर्यंत जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन मध्ये एअर इंडिया चं स्थान अग्रणी होतं. 

प्रोग्रेसिव्ह भांडवलशाहीला आपला दुश्मन समजण्याची ही जुनी खोड १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी अजून जोरकस दामटली. २१३ लोक एअर इंडिया च्या अपघातात मरण पावले. झालं ते वाईट पण मोरारजी भाईंनी त्याचा वापर केला तो जेआरडी सारख्या धुरंधर माणसाला एअर इंडिया तून अतिशय अपमानास्पद रीतीने काढण्यासाठी. कधी वेळ मिळाला तर त्याच्या दुर्दैवी कहाण्या अनेक ठिकाणी वाचायला मिळतात, त्या नक्की वाचा. जेआरडी सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला कूपमंडूक वृत्तीच्या राजकारण्यांनी दिलेली वागणूक ही भारतीय उद्योगातील अत्यंत लांच्छनास्पद घटना आहे, असं मला वाटतं. जेआरडी यांना पायउतार व्हावं लागलं. ही बातमी देताना लंडन मधील एका न्यूजपेपर मध्ये मथळा होता "Unpaid Air India Chief is sacked by Desai". आपलं मूल कुणी हिसकावून घेतलं अशी त्या काळात जेआरडी ची भावना होती. 

पुढे १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी जेआरडीना परत एअर इंडियाच्या बोर्डवर आणलं. मेंबर म्हणून, चेअरमन म्हणून नाही. १९८२ साली जेआरडीनी आपल्या पहिल्या कराची मुंबई या विमानप्रवासाची गोल्डन ज्युबिली साजरी केली, तोच प्रवास करत. ते ही  एकट्याने. प्रवास पूर्ण झाल्यावर मार्क टुली या पत्रकाराने विचारलं "शंभरावा वाढदिवस असाच साजरा करणार का?" क्षणभराचा वेळ न दवडता तो ७८ वर्षाचा  तरुण पायलट म्हणाला "का नाही, नक्कीच करणार. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे." 

कुणास ठाऊक २०३२ साली, भारतातील पहिल्या विमानप्रवासाची शताब्दी एअर इंडियाचं बोर्ड टाटांच्या नेतृत्वाखाली साजरी करत असेल हा काव्यगत न्याय असेल. आता भले भारत सरकार, एअर इंडिया टाटांच्या पंखाखाली देणार की नाही याबाबत उलटसुलट तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण पूर्ण डबघाईला आलेल्या एअर इंडिया चा जुना दैदिप्यमान इतिहास परत अनुभवायचा असेल तर टाटा या उद्योगातील मेरूमणीच्या हातात त्याची धुरा देणं हे अत्यंत संयुक्तिक धोरण असणार याबाबत शंका नाही. 

जाता जाता: जेआरडींचा अपमान केला म्हणून आता एअर इंडिया काहीही करून घ्यायचीच असं काही नसणार आहे. शेवटी हा अनेक वर्षे चालवायचा व्यवसाय आहे. त्यात आर्थिक गणितं सुटत असतील तरच त्यात टाटा गुंतवणूक करतील, हा साधा सरळ हिशोब आहे. 

राजेश मंडलिक 

(सदर लेखक हे लघुउद्योजक असून प्रोग्रेसिव्ह भांडवलशाही चे मायक्रो प्रतिनिधी आहेत. राजकीय किंवा एअरलाईन उद्योगाचे अभ्यासक अथवा विश्लेषक नाही आहेत)


संदर्भ: शशांक शहा, हरीश भट, आर एम लाला, गिरीश कुबेर यांची टाटा ग्रुप बद्दलची पुस्तके. 


Monday 6 September 2021

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

खरंतर या विषयावर लिहिणार नव्हतो. पण राहवलं नाही, लिहून टाकतो. 

एका एकवीस वर्षाच्या तरुणाला भेटलो आणि जर त्याला मी तरुणाईचा प्रतिनिधी मानलं तर या सोशल मीडियाच्या ओव्हरडोस पायी अनेकांचं वारू भरकटलं आहे की काय अशी शंका मनाला चाटून गेली. दोन प्रॉब्लेम वाटले. एकतर हे ऑनलाईन जोश टॉक्स वगैरेचं प्रमाण जास्त झालं की काय असं वाटून गेलं. टेड टॉक, जोश, स्वयंम वगैरे गोष्टी ऐकायला छान आहेत, पण सर्वच यशस्वी माणसं आयुष्यात काहीतरी अतरंगी निर्णय घेऊनच वर आली आहेत असा एक बेकार गैरसमज तरुणांमध्ये पसरला आहे का, हे तपासायला हवं. आयुष्य खरंतर सोपं आहे. अगदी दोन अधिक दोन चार इतकं. पण काही जण दो और दो पाच करण्याच्या भानगडीत पडतात आणि काही जण तर जिथं बेरीज करायला हवी तिथं आकडे तेच घेऊन गुणाकार करायला जातात आणि फसतात. इन्कम मल्टिप्लाय करायला पाहिजे किंवा एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स हवेत वगैरे गोष्टी बोलायला सोप्या आहेत. पण प्रत्यक्षात आणणं अवघड. आणि मुख्य म्हणजे या गोष्टी तुम्ही विशीत काय बोलताय? या मार्केट मध्ये उभं राहण्यासाठी नॉलेज बेस तर बनवा. हा नॉलेज बेस तुम्ही यु ट्यूब अन फेसबुकवरून जर बनवत असाल तर बेसिक मध्ये घोळ झाला आहे. 

एक निर्वाणीची गोष्ट सांगतो, बॉस. 

ते भले "You should work smart and not hard" वगैरे टाळ्याखाऊ वाक्य म्हणून ठीक आहे. पण इथं घासावी लागते. ओल्ड स्कुल ऑफ थॉट वाटेल, पण कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे ब्रीदवाक्य कपाळी कोरून ठेवा. कितीही टेक्नॉलॉजी येऊ द्या, पण ती जर परिश्रमाला पर्याय म्हणून तुम्ही वापरात असाल तर एक मोठा खड्डा खणत आहात हे ध्यानात असू द्या. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. व्यवसाय असो की नोकरी, त्याचे बारकावे काय आहेत हे जाणून घ्यावं लागतात. आज जर तुम्ही कालच्यापेक्षा गुणवत्तेमध्ये सुधारला नसाल तर तुमचा उद्याचा काळ धोक्यात आहे हे सांगायला कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

"Find out the job that you love and you dont have to work for a day in your life" या सारखं भंपक वाक्य नाही दुसरं. ते थ्री इडियट मध्ये पहायला आणि ऐकायला बरं आहे. पण वास्तव असं नसतं. तुम्हाला असं मिळालं तर स्वतःला लकी समजा. पण याउलट जे काम मिळालं त्यावर प्रेम करत आयुष्य बनवलं तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. 

अजून एक च्युत्या वाक्य सांगतो. "Why to work for others when you can work for your own". व्यावसायिक बना हो, पण ते होण्यामागे जर हे वाक्य तुमची प्रेरणा असेल तर गंडला आहात तुम्ही. व्यवसायामध्ये अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. कस्टमर, सप्लायर, लोक, बँकर, इन्व्हेस्टर. ही सगळी लोक आपल्याला लागत असतात. आणि जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा हे सर्व पाठीशी उभे राहण्यासाठी खूप पुण्याई कमवावी लागते. जेव्हा सगळं तुमच्या फेवर मध्ये असतं तेव्हा एथिक्स चा एपिटोम गाठावा लागतो. तो जर नसेल आणि तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम तयार झाले तर हिवाळ्यात छत्री ऑफर करणारे लोक धो धो पाऊस असताना सुद्धा छत्री हिसकावून गायब होतात. 

तेव्हा भावड्यानो, सोशल मीडिया काही चांगलं चुंगलं वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी नक्कीच आहे. पण उगाच तिथल्या कहाण्या ऐकून स्वतःचं करिअर प्लॅन करू नका. त्याची सत्यासत्यता पडताळून घ्या. जरी आम्ही पन्नाशीतले लोक येडे वाटलो तरी त्यांच्यातल्या चार लोकांशी बोला. ते सांगतात त्यावर स्वतःचं डोकं वापरा. नांगरे पाटील सर, तांदळे सर, कथळे मॅडम यांच्या स्टोरीज भारी आहेत पण त्याच्या मागे काही खंबीर थॉट प्रोसेस असते. कुणी गावभर हिप्पी सारखं उंडारतं म्हणून तुम्ही पण बोंबलत फिरू नका. त्यांच्या आजच्या स्टेटसला भुलू नका तर त्या प्रोसेस वर काम करा रे बाबांनो.  

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. 





 

Saturday 21 August 2021

कैफियत

समीरने आमच्या कंपनीत राजीनामा दिला. एक्झिट इंटरव्ह्यू च्या वेळेस तो माझ्यासमोर बसला. आणि पार डोळ्यात पाणी वगैरे आणून आमच्या कंपनीतले प्रॉब्लेम सांगू लागला. मी त्याला थांबवलं आणि म्हणालो "पहिले ते डोळ्यातून पाणी येणं थांबव. तू चालला आहेस, तर आणि काही प्रॉब्लेम असेल तर राग येऊन सांग. पण कुठल्याही प्रकारचं गिल्ट फिलिंग मला येईल असं बोलू नको. कारण तुझे ग्रीव्हन्सेस असतील किंवा डिसऍग्रिमेंट पण असतील. आमचीही काही चूक झाली असेल ते मान्य आहे. पण तुझ्या डोळ्यातून पाणी यावं इतका काही मी वाईट वागत नाही."

असं बऱ्याचदा होतं, नाही? एखादा/दी, आपणावर विनाकारण इमोशनल अत्याचार करत अशी काही स्टोरी बनवतं की आपण काही फार मोठा गुन्हा केला आहे. आपल्याला काही कारण नसताना दोषी ठरवून पाश्चातापाच्या कटघर्यात उभं राहायला भाग पडतात आणि अत्यंत काहीतरी पुचाट कैफियत हिरीरीने मांडत असतात. 

झालं आहे असं की स्वतःवर काम करता करता स्वतःच्या वागण्याबद्दलची थॉट प्रोसेस इतकी क्लिअर झाली आहे की कुठल्याही संबंधाला, मग ते एम्प्लॉयर-एम्प्लॉयी असो, की कस्टमर-सप्लायर हे प्रोफेशनल रिलेशन्स अथवा मैत्रीचं, नात्यातील (अगदी आई मुलाचं) हे पर्सनल रिलेशन्स , सांभाळताना माझ्याकडून पूर्ण न्याय माझ्या बाजूने दिला जाईल अशी जीवनप्रणाली बनली आहे. 

थोडक्यात सांगायचं आहे की आता पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन्स मेंटेन करत मी सुद्धा ३०/३२ वर्षे व्यतीत केली आहेत. कळत्या वयापासून हटवादीपणा, मानापमान, तिरस्कार,  स्वार्थ या सगळ्यांपासून दूर राहायचा प्रयत्न केला आहे. या तीन दशकात कुणाला पैशाला फसवलं नाही, जाणून बुजून कुणाला थर्ड लावला नाही, एखादं काम अंगावर घेतलं तर त्याच्या रिटर्न्स ची फारशी अपेक्षा न ठेवता ते पूर्ण करायचा मनापासून प्रयत्न केला आहे, कुणाचा ठरवून अपमान केला नाही, स्वतःचा फायदा व्हावा म्हणून फारसं कधी खोटं बोललो नाही. असं असताना काही वर्षांपूर्वी पर्यंत लोकांच्या कैफयतीना मी सिरियसली घ्यायचो आणि बिनकामाच्या गिल्टपायी विनाकारण तळमळत बसायचो. 

आता मात्र गेल्या पाच वर्षात बराच बदललो आहे. फॉर गुड. एव्हाना खात्री आहे की आपली बाजू खणखणीत आहे. हे मानण्यात माज नव्हे तर स्वतःवरचा विश्वास आहे. आतापर्यंत जो जगण्याचा मार्ग निवडला आहे त्याचं ते फलित आहे. या सगळ्यांचा, गर्व नव्हे, पण अभिमान नक्की आहे. 


a1

Tuesday 3 August 2021

भारी रविवार

 लाईफ पण सध्या इतकं धाकड झालं आहे की चांगलं वाटून घ्यायला आजकाल फार लांब जावं लागत नाही. ही मंडळी आजूबाजूला बागडत असतात. 

काल रविवारी, राहुल करूरकरांबरोबर तरुणाईच्या संवादाचं शेवटचं सेशन होतं. कंपनीतूनच ऑनलाईन बोलत होतो. नवीन काम अथवा व्यवसाय चालू करताना इंडस्ट्रीच्या अपेक्षा काय असतात यावर बोलत होतो. पहिलाच मुद्दा होता, घेतलेल्या कामाची १००% जबाबदारी घेणे. त्याचं उदाहरण द्यायला मला फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीतील मनीषा ढमाले एकटी रविवार असून कंपनीत काम करत होती. तिच्याकडे कंपनी एमआयएस अपडेट करायचं काम आहे. ३१ जुलै ला शेवटचा दिवस असल्यामुळे तिला वेळ मिळाला नव्हता. तिला कुणीही न सांगता, ती एकटी फक्त ते काम पूर्ण करायला आली होती. 

"Leave legacy at workplace" हा बोलण्याचा मुद्दा होता. कामाच्या ठिकाणी आपली छाप सोडणे हे फक्त टॉप मॅनेजमेंट च्या लोकांचं काम आहे असा एक सार्वत्रिक समज आहे. आमच्या इथे मॅनेजमेन्ट टीम चांगली तयार होतेच आहे, पण अशी छाप कुणी अगदी हेल्पर पण पाडू शकतो. हे शोधण्यासाठी मला परत फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीत सध्या कुणी अशी छाप पाडत असेल तर तो म्हणजे आमचा हेल्पर बाबू. काल तो ही कंपनीत आला होता आणि त्याची जी कामं नव्हती ती पण कुणीही न सांगता करण्यासाठी तो रविवारी आला होता. त्याचीही ओळख तरुणाईला करून दिली. 

सेमिनार संपवून घरी आलो. तर व्हाट्स अप वर प्रियांका डंक कुलकर्णी ची स्टोरी होती. प्रियांका म्हणजे माझी सख्खी मामेबहिण. तिच्या खडतर प्रवासाचा मी पण साक्षीदार आहे. हा लेख तिच्या इंजिनियरिंग च्या सरांनी लिहिला आहे. त्याआधी मी का नाही लिहिला याचं मला वाईट वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की वाचा. 

लेखाची लिंक 

https://www.ravindrajoshi.com/2021/07/blog-post_31.html?m=1

आणि शेवटचा फोटो आहे, कलाम सरांनी पत्राची पोच दिल्याचा. त्यांची पुण्यतिथी होती त्यादिवशी तो फोटो मेमरीत दिसला. लिंक्ड इन वर टाकला. तिथलं अल्गोरिदम कळत नाही. ३ लाख लोकांनी ते पत्र पाहिलं. हजारो लोकांनी प्रोफाइल व्ह्यू केलं. प्रोफेशनल मीडिया नीट वापरला तर कंपनीचा ब्रँड कसा तयार होतो त्याची झलक. 

(दुसर्याबद्दल लिहिता लिहिता शेवटी मंडलिकांनी स्वतःची लाल केलीच असं जर कुणाला वाटत असेल तर..........ते बरोबर आहे. त्याबाबत आपण हयगय करत नाही) 

Thursday 29 July 2021

जेफ

जेफ २००७ साली संपर्कात आला. नंतर २०१२ साली सामंजस्य करार झाला, सेटको आणि आमच्या अल्ट्रा प्रिसिजन मध्ये. तो घडवून आणण्यात जेफचा मोठा वाटा. तेव्हापासून जेफ आणि मी सातत्याने बोलत आलो. कधी प्रत्यक्ष भेटीत तर कधी फोन कॉल वर. आज जे काही आम्ही आहोत त्याचा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता जेफ आहे. उत्साहाचा धबधबा म्हणजे जेफ. गेल्या ९ वर्षात मी त्याला कधीतरी थोडं दडपणाखाली पाहिलं पण त्याचा मूड नेहमी अप बीट असायचा. 

माझ्यात धोका पत्करण्याची क्षमता कमी आहे असं मला सारखं वाटतं. पण जेफ मध्ये ती माझ्यापेक्षा कमी आहे असं मला अनेक महिने वाटायचं. पण माझ्या लक्षात आलं की एखादी कल्पना पूर्ण समजून घेण्यात तो खूप वेळ घेतो. पण एकदा त्याला पटली की तो मनापासून पूर्ण पाठिंबा द्यायचा आणि ती कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वाटेल ती मदत करायचा. 

सेटको अमेरिकेच्या अनेक लोकांनी अमेरिकन लोकांच्या स्वभावाच्या माझ्या अनेक समजाला सुरुंग लावले. पण जेफने त्या सगळ्यांवर कडी केली. मी बुसाक शामबान नावाचा एक अमेरिकन प्रॉडक्ट १९९४ ते २००२ खूप विकला. त्यावेळेस खूप अमेरिकन लोकांबरोबर मी भारतभर फिरलो. त्यांच्या कंजुषीपणाच्या कथा मला आठवल्या तर आजही हसायला येतं. याउलट जेफ इतका सढळ हात असणारा अमेरिकन माझ्या पाहण्यात नाही. हे पाश्चात्य लोक बाहेर आपल्याशी लाख चांगलं बोलतील पण पाहुणचार करायला घरी नेणं वगैरे अगदी दुरापास्त, असा माझा समज होता. पण जेफने दोन वर्षांपूर्वी मला आणि यशला त्याच्या टेनेसीतल्या फार्महाउस ला तीन दिवस नेलं आणि तुफान बडदास्त ठेवली. 

माझा मुलगा यश अमेरिकेत शिक्षण घेत होता. त्याचं करिअर मार्गाला लागतं आहे की नाही याची काळजी माझ्यापेक्षा जेफला जास्त असायची. माझ्याशी आणि यश बरोबर कायम त्या विषयावर बोलायचा. यश किंवा माझ्या बिझिनेस पार्टनर ची मुलगी, सेटको मध्ये यावी ही त्याची आंतरिक इच्छा. पण यशने त्याबद्दल जेव्हा फार काही इंटरेस्ट दाखवला नाही तेव्हा माझ्याइतकं जेफला पण वाईट वाटलं. इतकं होऊनही जेव्हा नुकताच यशला जॉब लागला, तो रेफरन्स जेफनेच दिला. आता आम्ही दोघे बिझिनेस पार्टनरची मुलगी सेटको ला जॉईन होते का याची आतुरतेने वाट पाहतोय. 

तर असा हा जेफ ३० जून २०२१ ला निवृत्त झाला. याची तयारी त्याने किती आधीपासून चालू केली असेल, असं तुम्हाला वाटतंय. तर तब्बल आठ वर्षे. त्याने त्याचा सक्सेसर आणला, आमच्याशी तो या विषयावर बिनदिक्कत बोलायचा, एक्झिट प्लॅन वर चर्चा करायचा. आणि ती घडवून पण अशी आणायचा की जणू काही एखादा महत्वाचा बिझिनेस प्लॅन डिस्कस करतोय. म्हणजे त्यात पूर्ण व्यावसायिकता असायची आणि जणू एखादी मशीन आणणं हे ग्रोथ साठी जसं महत्वाचं आहे तसं मी सेटको सोडणं हे पण ग्रोथ साठी गरजेचं आहे असा सूर असायचा. जोर का झटका धीरेसे लगे या न्यायाने त्याने मला डायरेक्टर बोर्ड वरून पण पायउतार होतो आहे असंही सांगितलं. थोडक्यात त्याने हे सगळ्या जबाबदारीतून मुक्त होणं याचा माझ्यासारख्या इमोशनल माणसाला त्रास होणार नाही  अशा पद्धतीने घडवून आणलं. एखाद्या जबाबदारीला ग्रेसफुली कसा निरोप द्यायचा याचा त्याने वस्तुपाठ घालून दिला. समाधानाची बाब इतकीच आहे की आहे की तो अजूनही आमच्या ऍडव्हायजर बोर्ड वर आहे. 

आजही माझ्या अमेरिकन बोर्डबरोबर झूम मिटिंग होतात. पण सध्यातरी जेफ त्या मीटिंगमध्ये नसतो. मिटिंग संपते. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ऍडव्हायजर बोर्ड वर असल्यामुळे तो परत येईल ही आशा आहेच. तो पर्यंत वाट पाहणं इतकंच माझ्या हातात आहे. त्याचा निरोपसमारंभ करण्यापेक्षा ही वाट पाहणे बरा पर्याय आहे. 

Saturday 3 July 2021

"पैसा"

एका प्रोग्रॅमच्या तयारीसाठी "पैसा" या विषयावर मला विचार करायला सांगितलं. 

खरंच, पैसा म्हणजे एक आयटम आहे. भले भले त्याच्या चुंगळ मध्ये येऊन फसतात. कुणाच्या नादी लागल्यावर कसं आपलं आयुष्य आपण पणाला लावतो. पैशाचा पण असाच नादखुळा असतो. त्या नादामुळे कितीदाही ठासली गेली तरी कळत नाही. बरं, तिथं लागलीच दुखत पण नाही. दुखलेलं दिसत पण नाही. बऱ्याच काळाने कळतं की आपला कार्यक्रम झाला आहे. 

पूर्वी मला अशा लोकांचा राग यायचा. आजही असंख्य लोक या व्यसनापायी देशोधडीला लागलेली मी पाहतो. कधी कधी ते व्यसन कुणाचं सुटल्यासारखं वाटतं, पण दिखाऊपणाचा मुखवटा गळल्यावर मनाचा जेव्हा तळ दिसतो, तेव्हा पैशाच्या मोहाचा अमीबा तिथं वळवळताना दिसतो. आता मला त्यांचा राग येत नाही, कीव वाटते, दया येते. अनुभवातून शहाणपण घेण्याची अक्कल आपण ठेवत नाही आणि ग्रीड नावाच्या कीड ला घट्ट कवटाळून बसतो. पुन्हा पुन्हा त्या पैसा नामक मोहाच्या भोवऱ्यात गरागरा फिरत राहतो. आणि ही वावटळ साधीसुधी नसते. तुमच्या बरोबर अनेक लोकांचं आयुष्य बरबाद करते. 

त्यापेक्षा चोर उचक्के परवडतात. मला काही लोक माहित आहेत. खुलेआम भ्रष्टाचाराचं समर्थन करतात आणि अमाप पैसे खातात आणि उडवतात. कुणी त्यांचं झाट वाकडं करू शकत नाहीत. पण तोंडात हरिनाम आणि प्रत्यक्षात मात्र शेण खायचं, लफडं या मंडळींचं होतं. 

याउलट, काही लोकांना मात्र पैशाला किती आणि कुठवर महत्व द्यायचं याचं चांगलं शहाणपण असतं. लौकिक जगात भले त्यांना येडे समजत असतील, पण असल मध्ये पैसा त्यांच्या घरी पाणी भरत असतो. ते पैशाच्या तालावर नाचत नाहीत. पैशाचा विनियोग कसा करायचा याची कला त्यांनी आत्मसात केली असते. पैसा त्यांच्याकडे आकर्षित होईल इतके हे लोक काळाच्या ओघात स्मार्ट बनत जातात. या लोकांना त्यांच्या खिशात किंवा बँकेत किती पैसे आहेत याची पडलेली नसते. ते जर कामात असतील आणि पैसा दारावर टकटक करत असेल, तर ते पैशाला बाहेर उभा रहा म्हणून सांगतात. त्यांचं काम ही इतकं उदात्त असतं की पैसा सुद्धा त्यांनी दार उघडेपर्यंत वाट पाहत थांबतो. 

What is enough money या प्रश्नाचं उत्तर सापडणं गरजेचं आहे. काहींना हे उत्तर लवकर सापडतं, काहींना उशीरा. पण जेव्हा सापडतं, तो क्षण राजहंस होण्याचा असतो. काही दुर्दैवी बदकांना मात्र मरेपर्यंत याचं उत्तर सापडत नाही. काही लोकांना कागदाच्या तुकड्यावरील गव्हर्नर च्या सहीचं महत्व माहिती असतं, तर काहींची नजर ही फक्त १००, २००, ५००, २००० हा आकड्याभोवती फिरत राहते, मग भले तो कागदाचा तुकडा कितीही चुरगळलेला असू द्या. 

आपल्याकडे दोन पर्याय आहेत. 

सुखासीनतेवर भक्ती करत, स्वार्थ हा जगण्याचा सिद्धांत मानत पैशाच्या मागे पळायचं की एक चांगला उद्देश ठेवून आपलं अस्तित्व हे जगण्यालायक बनवत इतकं सशक्त व्हायचं की पैसा तुमच्या मागे पळत आला पाहिजे. 

(जो प्रोग्रॅम डिझाईन होतो आहे तो १४-२० वयोगटासाठी आहे, पण त्यांच्यासमोर ही भाषा बोलू शकणार नाही म्ह्णून इथे लिहून टाकलं)


Thursday 17 June 2021

तिसरा लेख

 "मूल जन्मल्यावर ते सात वर्षे माझ्या हवाली करा. आणि मी तुम्हाला ते काय म्हणून घडवायचं ते घडवू शकतो" असं कुणीतरी फेमस शास्त्रज्ञ म्हणून गेलाय. थोडक्यात काय तर वयाच्या सात वर्षापर्यंत माणसाच्या पुढील आयुष्याचा प्रोग्रॅम लिहून पूर्ण होतो. तो बदलायचा असेल तर मग प्रचंड कष्ट आहेत. याचा संदर्भ पुढच्या पॅरा मध्ये आला आहे.

सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे त्यांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. 

नोकरी सोडून व्यवसायात जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी, मूळ सिद्धांत काय हवेत हे थोडं स्वानुभवावरून सांगतो. माझीच केस स्टडी यासाठी घेतो की मी सुद्धा मूळचा पक्का नोकरदार माणूस. फासे पडत गेले आणि आज लघुउद्योजक म्हणून का होईना पण ओळखला जातो आहे. काही मुद्दे मांडतो, बघा तुम्हाला पटतं का ते!. आणि तुम्हाला काही सांगण्याचा अविर्भाव न ठेवता एक स्वगत म्हणून माझे विचार फक्त मांडतो. 

१. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी फॅन्सी प्रकार आहे असं कधीही ठेवलं नाही. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" किंवा "दुसऱ्यांची ऑर्डर घ्यायची आपल्याला नाही आवडत"  असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू केला नाही. बहुतेक  व्यवसाय हे अक्षरश: नशिबाने चालू झाले आहेत. माझ्याही ध्यानी मनी नसताना व्यवसाय चालू झाला, तो रुजला आणि फुलला. व्यवसाय उभे राहतात ते नाविन्यपूर्ण कल्पनेवर किंवा नावीन्यपूर्ण पद्धतीवर. 

२. व्यवसायात यशस्वी कुठलाही प्रस्थापित फॉर्म्युला नाही आहे. बरं एका यशस्वी बिझिनेसचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची गॅरंटी नाही. पण गाईडलाईन्स नक्की आहेत. त्या जर फॉलो केल्या तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच. The best university to learn business is to do business. 

३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा सुविचार शाळेत वाचल्यावर आपण विसरतो. व्यवसायात आलो आणि हा सुविचार ठळक अक्षरात, दररोज दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवला. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे. "मला सगळं कळतं" किंवा "मी जे करतो तेच बरोबर" या करोनाला ६ फूट दूर ठेवलं. या डोक्यावर कुठलीही हॅट नाही आहे. कुठलीही कल्पना ऐकण्यासाठी, स्वीकारू की नाही हा पुढचा प्रश्न, हा मेंदू रिकामा आहे.

४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं. ते बरोबर की चूक यावर विचार नाही केला. विश्वास ठेवा, बऱ्याचदा चूक निर्णय हे निर्णय न घेण्यापेक्षा फायदेशीर असतात. निर्णय घेणं उद्यावर ढकलले नाही. एकदा तुम्ही वेळेत निर्णय घ्यायला शिकला की मग क्रिझवर मांड ठोकल्यावर प्रत्येक बॉल जसा बॅटच्या मधोमध बसतो तसा दरवेळी निर्णय योग्य घेतला जातो असा माझा अनुभव आहे. 

५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही. "Planning without action is just hallucination." हे कुणीतरी म्हणून गेलं आहे.

६. Perseverance beats genius. एखादं काम हातात घेतलं की त्याचा पूर्ण कार्यक्रम करून टाकायचा. आर या पार. 

७. दिवसा स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवला. आज १९ वर्षे झालीत. आजही स्वप्नं बघणे चालूच आहे. आणि अजून एक जाणवलं इतक्या वर्षात. एक स्वप्न जगात एकाच वेळी दोन माणसं बघत नाहीत. 😊 

वरील सात मुद्द्यात पहिले दोन हे वास्तव आहे आणि नंतर आलेले पाच सूत्र आहेत, व्यवसायात येण्याचे. हे मला जाणवलेले. दुसर्यांचे वेगळे असतील. रिकॅप म्हणून खाली लिहितो

1. Unlearning
2. Decisiveness and no procrastination 
3. Action
4. Perseverance
5. Dream. 

वि स खांडेकरांच्या अमृतवेल मधील भारी वाक्य उद्धृत करतो आणि आवरतो. 

भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही आहे. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं  वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत यावं म्हणून धडपडणं, या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलानं दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या आयुष्याला अर्थ येतो तो यामुळेच.

तिसरा लेख 



Sunday 23 May 2021

आयुर्वेद, ऍलोपॅथी आणि कॉमन मॅन

 मी एक कॉमन मॅन आहे. माझी तब्येत चांगली रहावी यासाठी मी प्रयत्नशील असतो. त्यासाठी उपलब्ध आणि विश्वासार्ह अशा कोणत्याही पॅथी चा मी वापर करतो. आयुर्वेद आणि ऍलोपॅथी यापैकी काहीही मला त्याज्य नाही आहे. 

माझ्या दोन अँजिओप्लास्टी झाल्या आहेत. दुसरी झाल्यावर मी आयुर्वेद आधारित हार्ट केअर सेंटर मध्ये पाच दिवस राहून आलो आहे. तिथं सुद्धा मी स्ट्रेस टेस्ट केली आहे. 

अगदी अशात माझं पोट प्रचंड दुखत होतं. ऍलोपॅथी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली. एक अँटी बायोटिक ने काम केलं. पण ते बंद केलं की परत काही दिवसांनी पोट दुखायचं. सोनोग्राफी आणि सी टी पण केलं. शेवटी डॉ क्षितिजा जुजम यांनी आयुर्वेदिक औषधे दिली आणि त्याने परिस्थिती नियंत्रणात आली असं वाटतं. आताही करोना काळात मी आयुर्वेदिक औषधे प्रिव्हेन्शन म्हणून घेतो आहे. 

एक कॉमन मॅन म्हणून मला एव्हाना कळून चुकलं आहे की आयुर्वेद हे पण एक औषध शास्त्र आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात त्याचा खूप चांगला उपयोग होतो. मात्र शरीराचा ब्रेकडाऊन मेंटेनन्स झाला तर ऍलोपॅथी ला पर्याय नाही. कॉमन मॅन म्हणून हे ही मला जाणवतं की ऍलोपॅथी कडे सर्व प्रश्नावर उत्तरं आहेत, खर्चिक असतील, पण आहेत. 

हे असं आहे यावर माझं एक निरीक्षण आहे. कोणताही ऍलोपॅथी च्या डॉक्टर्सना मी आयुर्वेदा विरुद्ध बोलताना पाहिलं नाही आहे. त्यांच्या काही कॉन्फरन्स अटेंड करण्याची मला संधी मिळाली. ते केस स्टडीज घेतात आणि त्यावर चर्चा करतात. बाकी कुठल्याही पॅथी चा तिथं थोडाही उल्लेख होत नाही. 

याउलट आयुर्वेदिक डॉक्टर्स आयुर्वेदाची  महती सांगताना ऍलोपॅथी ला हमखास शिव्या घालतात. यात काही सन्माननीय अपवाद असतीलही, पण अगदी स्वतःला आयुर्वेदाचे शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्या डॉक्टरांचं भाषण ऐकताना ऍलोपॅथी वरील टीकेचं गुऱ्हाळ ऐकताना डोकं पकलं होतं. त्या.।।. आयुर्वेद आधारित प्रसिद्ध हार्ट केअर सेंटर मध्ये संध्याकाळी एक मिटिंग व्हायची. त्याची सुरुवात अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी कसं बकवास आहे याने सुरू व्हायची. अगदी माझ्या मित्राने करोना वर एक औषध काढलं असं यु ट्यूब वर आलं. त्यातही त्याने ऍलोपॅथिक औषधाने बरं न झालेल्या रुग्णांना मी बरं केलं असं नमूद केलं होतं. आपला मोठेपणा सांगण्यासाठी समोरचा लहान आहे हे सांगणं हास्यास्पद असतं हे सांगण्याची कुणा तत्वज्ञाची गरज नाही आहे. 

योग आणि आहारशास्त्र हे अजून दोन वेगळे विषय आहेत. योगाचा भारतात उदय झाला आहे असं आपण मानतो. आयुर्वेद शास्त्राला ते जितकं पूरक आहे तितकं ते ऍलोपॅथी ला पण पूरक आहे. अनेक ऍलोपॅथिक डॉक्टर्स हे योग आणि आहार शस्त्राचा अंगीकार करताना दिसतात. रिव्हरसिंग हार्ट डिसीज या जग प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक डीन ओर्निश हा ऍलोपॅथी डॉक्टर होता पण त्याने हृदयविकारावर जे उपाय सांगितले ते योग आणि आहार शास्त्र आधारित आहेत. पुण्यात प्रसिद्ध हृदरोग डॉक्टर हेच उपाय सांगतात. डॉक्टर संचेती सारखे निष्णात डॉक्टर योग चं महत्व खुलेआम भाषणात सांगतात. डॉ अभय बंग यांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकात जी जीवन शैली सांगितली आहे ती आहार आणि योग संबंधित आहे.

योग शास्त्रावर प्रभुत्व असणाऱ्या रामदेव बाबाचं "ऍलोपॅथी हा मूर्खपणा आहे" हे म्हणणं हाच एक मोठा मूर्खपणा आहे.  ज्या पद्धतीने बीजेपीने सरदार पटेलांना आपला नेता म्हणून हायजॅक केलं आहे. तसंच योगप्रवीण रामदेव बाबाने आयुर्वेदाला हायजॅक केलं आहे. आयुर्वेदवर आधारित त्याने बिझिनेस उभा केला, पैसे छापले हे त्यांना लखलाभ. पण ज्या ऍलोपॅथी ने मागील काही दशकात अभूतपूर्व संशोधन करत प्रगती केली, त्याला प्रति संशोधनाने विरोध न करता, "उचलली जीभ लावली टाळ्याला" या प्रकारच्या  विधिनिषेध शून्य विधानाचा निषेध करावा तितका कमी आहे. तो निषेध समाजातील कॉमन माणसाने तर करावाच पण आयुर्वेदिक डॉक्टर्सची जर काही असोसिएशन असेल तर तिनेही करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. कोणत्या पॅथी मध्ये संशोधन आणि प्रगती झाली आहे यावर त्यांनी सांगोपांग विचार करता चित्र समोर आहे. 

तळटीप: माझे सासू सासरे हे योगप्रविण आहेत आणि निगडी प्राधिकरण मध्ये योग शिकवतात, मेव्हणी डॉ क्षितिजा जुजम ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि योग विशारद आहे. तिचं क्षितिज योग सेंटर हे आमच्या भागातील एक प्रसिद्ध योग प्रशिक्षण केंद्र आहे. माझी बायको ही एम डी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि ती गेले पंचवीस वर्षे स्वतःची लॅब चालवते. मी स्वतः क्षितिजा कडून आणि काही आयुर्वेदिक डॉक्टर मित्रांकडून योग्य ती आयुर्वेदिक औषधे घेतो तसेच योग शिकलो आहे. प्राणायाम, वाफ घेणे, जलनेती हे ही मला चांगलं जमतं. वैभवीचे मित्र आणि मैत्रिणी हे त्यांच्या क्षेत्रातील माहीर ऍलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. माझी स्वतःच्या दोन अँजिओप्लास्टी, वडिलांचे कँसर प्रकरण, आणि हे चालू करोना प्रकरण याचा मी कुठल्या पॅथी ने काय फायदा होतो याचे ठोकताळे बांधले आहेत. ते ठोकताळेच आहेत, दावे नाही आहेत. कारण मी इंजिनियर आहे, मेडिकल प्रोफेशनल नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कुणी या दोन पॅथीवरून माझी शाळा घेण्याची शक्यता आहे म्हणून आधीच सांगून टाकलं.

Saturday 15 May 2021

कृतज्ञ

आठ एप्रिलला कंपनीत सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यात काही लक्षण नसणाऱ्या पण पॉझिटिव्ह केसेस आल्या. आणि त्यानंतर लाईनच लागली. पुढच्या केसेस मात्र लक्षण दाखवणाऱ्या. 

ही कंपनीतील तऱ्हा तर बाहेर अनेक जवळचे परिचित पॉझिटिव्ह. त्यात मित्र आले, नातेवाईक आले, मित्रांचे नातेवाईक, कंपनीतल्या एम्प्लॉईज चे नातेवाईक आले. दररोज कुणाचा तरी फोन. कुणी होम आयसोलेशन मध्ये तर कुणी हॉस्पिटल मध्ये दाखल. कुणाचं टेम्परेचर कमी होत नाही तर कुणाचा ऑक्सिजन कमी होतोय. 

आणि यामध्ये तीन दुर्दैवी मृत्यू. माझी मावशी कुसुम आंबेकर, आमच्या इंजिनियर चे वडील, आणि पुण्याबाहेरील मित्र. 

डोक्याचं पार भजं झालेलं. गेल्या पाच सहा दिवसांपासून परिस्थिती बरी आहे. या पूर्ण सव्वा महिन्यात काही लोकांची प्रचंड मदत झाली. ही पोस्ट खास त्यांच्यासाठी. 

सगळ्यात आधी डॉ विनोद भारती. रायझिंग मेडिकेअर नावाचं हॉस्पिटल आहे त्यांचं खराडी मध्ये. लहान भावाच्या टेलिफोनिक ट्रीटमेंट पासून त्यांच्याशी मी बोलत होतो. सेटको च्या सर्व केसेस ची सरांनी टेलिफोन वर ट्रीटमेंट सांगितली. सगळ्यांना त्यांचा नंबर देण्याऐवजी मीच मधला मेडिएटर बनलो. भारती सरांनी माझ्या फोनला उत्तर दिलं नाही असं क्वचितच घडलं. 

या व्यतिरिक्त दोन डॉक्टरांचा उल्लेख करायचा आणि तो म्हणजे डॉ प्रकाश कोयडे आणि डॉ शीतल श्रीगिरी. कोयडे डॉक्टर स्वतः पॉझिटिव्ह झालेले आणि हॉस्पिटल मधून नुकतेच घरी आलेले. जिथं म्हणून मला वाटायचं की अजून कुणाला तरी ओपिनियन विचारायला हवं, मी सरळ कोयडे डॉक्टरांना फोन करायचो आणि माझ्या शंका विचारायचो. त्यांनी कधीही निराश केलं नाही. डॉक्टर शीतलशी मी ऑक्सिजन प्लांट बद्दल फोन करायचो. त्यात मी तिला सांगितलं की मित्राच्या भावाचं टेम्परेचर खाली येत नव्हतं. शीतल डॉक्टरने त्यावर हॉस्पिटल मध्ये इलाज केला आणि पेशंट बरा झाला. 

मित्रवर्य जयंत विद्वंस याने राव हॉस्पिटल मध्ये एचआरसीटी ची सर्व्हिस झटपट दिली, तर घरच्या पॅथॉलॉजिस्ट डॉ वैभवी आणि  तिची मैत्रीण व्ही केअर पॅथ लॅब ची डॉ शिल्पा यांनी  टेस्ट करून दिल्या. 

डोकं विचार करून जास्त जड झालं, तर फळणीकर सर होतेच. "कधीही सांगा हो, मी आहे तुमच्या मदतीला" हे ते सात शब्द मला बळ देऊन जायचे. आणि अधून मधून सकारत्मकतेचं इंजेक्शन द्यायला हक्काचे एम जी सर होतेच. यु ट्यूब चॅनेल वर कुठलं तरी लेक्चर काढायचं आणि ऐकत बसायचं.  

एकूण परिस्थिती निवळली आहे. कंपनीतील अलमोस्ट सर्वजण बरे झाले आहेत. 

काही कटू आठवणी आहेत. त्या लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. 

वरील उल्लेखलेल्या सगळ्यांप्रति मी कृतज्ञ आणि आयुष्यभरासाठी ऋणी आहे.  

Friday 14 May 2021

इंदू जैन

मृत्यू या विषयी इतके स्पष्ट आणि मोहक विचार फार कमी वेळा वाचनात आले. इंदू जैन यांचा  मूळ इंग्रजी लेख फारच सुंदर आहे. त्यात अभिप्रेत असलेला अर्थ पोहचवू शकलो नाही याबद्दल शंका आहे. पण तरीही अनुवाद करण्याचं धारिष्ट्य केलं आहे. चूभूदेघे. मूळ इंग्रजी लेख १४/०५/२०२१ टाइम्स ऑफ इंडिया च्या मुख पृष्ठावर आहे  


मृत्यू हा जगण्याच्या कलेचा एक भाग आहे. माझं सारं आयुष्य आरामात गेलं, पण खरी गंमत चार भिंतीबाहेरचं जे जग आहे त्यात मी अनुभवली.  आयुष्यातील प्रत्येक क्षण मी भरभरून जगले आहे आणि त्यायोगे अनुभवल्या जाणाऱ्या शांततेने माझं आयुष्य परिपूर्ण झाले आहे. 

अर्थात प्रत्येक जण अनुभवतो तसं मला सुद्धा काही मनासारखं नाही घडलं तर असमाधानी वाटतं. पण अशा प्रत्येकवेळी मी स्वतःलाच प्रश्न विचारते "हे घडलं खरं. पण त्यावर नाराज होऊन मला स्वतःला शिक्षा देणं हे खरंच गरजेचं आहे का?" उत्तरादाखल माझ्या मनातील नकारात्मक भाव कुठल्या कुठे पळून जातात. मला त्यामुळे खात्री वाटते की माझं इथलं तात्पुरतं वास्तव्य संपताना मी तर आनंदी असणारच, पण त्याही पेक्षा पुढील प्रवासाची मला प्रचंड उत्कंठा आहे. 

मृत्यू या प्रकाराबद्दल अनेकांना कुतूहल आहे, मला ही आहेच. पैलतीरावर काय आहे हे कुणाला माहिती नाही, पण काहीतरी नाविन्यपूर्ण असणार हे तर नक्की. ते अनुभवण्याची मला आस आहे. मृत्यूला कवटाळण्यास मी पण अधीर आहे. फक्त त्याच्या कानात मला हळूच सांगावंसं वाटतं "थोडं थांब. मी येणार तुझ्याबरोबर. पण त्याआधी मला या शय्येवर व्यवस्थित जुळवून घेऊ दे. उशी नीट करू दे आणि माझ्या रजईमध्ये निवांत होऊ दे." 

माझ्या मित्र मैत्रिणींना या शेवटच्या प्रवासाची पूर्ण कल्पना दिली आहे. जे माझ्या जवळचे आहेत आणि मला पूर्ण ओळखून आहेत त्यांचं सांत्वन करण्याची गरज पडणार नाही. त्यांना माहिती आहे की ज्या असोशीने मी जगण्यावर अतोनात प्रेम केलं, त्याच उत्सवी मन:स्थितीत मी मृत्यूला सुद्धा कवटाळणार आहे. माझ्या जवळच्या लोकांबरोबरच, ज्यांच्यामुळे मी परिपूर्णतेच्या पायऱ्या चढले त्या गुरूंना पण याची कल्पना आहे. ज्यांना माझ्या निर्गमनाचं दुःख होईल त्यांच्या बद्दल मला नम्र सहानुभूती वाटते. त्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही की पैलतीरावर मी किती खुश आणि आंनदी असणार आहे ते!

जर मला कुणी माझी शेवटची इच्छा विचारली तर मी हेच सांगेन की माझ्या निधनाची बातमी कुणाला सांगू नका. "इंदू कुठं आहे?" असं कुणीही विचारू नये. कारण जिथं कुठं आनंद असेल, जिथं कुठं हास्याची लकेर असेल, त्या प्रत्येक लकेरीत माझं अस्तित्व असणार आहे. या वसुधेवर माझा शेवटचा प्रवास हा कसाही होऊ दे, पण पंचमहाभूतांची छेड  काढत मी मृत्यूच्या बाहुपाशात विसावणार आणि या अनंतात विलीन होईल. 


इंदू जैन 

Tuesday 11 May 2021

मेडिकल जुगाड

आमच्या इंजिनियरिंग मध्ये काही प्रोसेस चा आम्हाला अंगीकार करावा लागतो की ज्या प्रासंगिक असतात. ती प्रोसेस वापरून आम्ही तो विशिष्ट प्रश्न सोडवतो सुद्धा. हा प्रश्न आम्हाला पुन्हा पुन्हा जेव्हा दिसतो, तेव्हा त्याचं उत्तर म्हणून  त्याची एस ओ पी (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बनवावी लागते की ज्यामुळे जेव्हा कधी ते प्रॉब्लेम स्टेटमेंट पुढे आलं तेव्हा त्याचं उत्तर म्हणून ती एस ओ पी आम्ही वापरतो. 

जर आम्ही प्रासंगिक सोल्युशन काढलं तर त्याला आपण जुगाड म्हणतो. आणि जर त्याची एस ओ पी बनवली तर ते कायम स्वरूपी उत्तर बनतं. 

आपण असे जुगाड अनेक बघितले आहेत ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. तो कोण पिल्लई होता ज्याने कुठली पानं टाकून पेट्रोल ला रिप्लेसमेंट म्हणून क्लेम केलं होतं. अख्ख्या भारताला येडं केलं होतं. भारतात असे अनेक प्रॉडक्टस बनतात जे स्केलेबल होत नाहीत आणि जुगाड म्हणून राहतात.

पिल्लईच्या विरुद्ध उदाहरण ज्यांनी त्यांचं जुगाड एक सोल्युशन म्हणून सिद्ध केलं आणि ते म्हणजे पॅडमॅन  अरुणाचलम. ज्यांनी सॅनिटरी नॅपकिन या प्रकाराचा पाठपुरावाच केला नाही तर एक उत्पादन म्हणून प्रसिद्ध केलं आणि दक्षिण भारतात स्त्रियांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल केला. 

सध्या करोना काळात असे अनेक मेडिकल जुगाडू प्रसिद्ध होत आहेत. त्यातल्या त्यात अल्कोहोल चे दोन  जुगाड व्हाट्स अप च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याला रीतसर संशोधनाचा कुठलाही पुरावा नाही आहे. पाच पन्नास पेशंटवर प्रयोग करून ते सोल्युशन म्हणून द्यायचा प्रयत्न करतात. हे प्रचंड धोकादायक आहे. 

यामागे एक कारण आहे. करोना ने सर्व प्रचलित मान्यतांना धुडकावून लावलं आहे. एक वर्षापेक्षा जास्त झालं आहे पण करोना भारतात निवांत बागडतो आहे. कुठलाही मेडिकल प्रोटोकॉल हा छातीठोकपणे सांगू शकत नाही की करोना रिपोर्ट पाहून मी गॅरंटी देऊ शकतो की मी याला या प्रोटोकॉल ने बरं करेन. आणि त्यामुळेच या "वन टाइम सोल्युशन" ला काहीकाळ प्रसिद्धी मिळते आणि नंतर ते कुठल्या तरी क्लाउड वर जाऊन स्क्रॅप होतं. 

त्यामुळे असल्या कोणत्याही व्हाट्स अप मेसेज च्या नादी लागून जीव धोक्यात टाकू नका. कारण या उपचारांची सॅम्पल साईझ आणि काळ हा फार छोटा आहे. त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन नाही आहे. आधी पेशंटची परिस्थिती काय होती आणि नंतर काय झाली याची माहिती ही कुठल्या संस्थेत सबमिट झाली नाही आहे. त्या मेसेजवर आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. आमच्या इंजिनियरिंग मध्ये या जुगाड मुळे कुणाच्या जीवाचा खेळ करत नाही. केला तरी अगदीच अपवादात्मक. पण इथे लोकांच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे धोका गंभीर आहे. 

योग्य डॉक्टर्स चा सल्ला घ्या, सोशल मीडिया च्या एखाद्या पोस्टवरून कुठलेही आडाखे बांधू नका आणि त्या वर आंधळा विश्वास ठेवू नका, सांख्यिकी शास्त्रावर विश्वास ठेवा, कोणत्या प्रोटोकॉल ने जास्त लोक बरे होत आहेत त्याची माहिती घ्या आणि लॉजिकल विचार करा. 

तळटीप: माझे सासू सासरे हे योगप्रविण आहेत आणि निगडी प्राधिकरण मध्ये योग शिकवतात, मेव्हणी डॉ क्षितिजा जुजम ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि योग विशारद आहे. तिचं क्षितिज योग सेंटर हे आमच्या भागातील एक प्रसिद्ध योग प्रशिक्षण केंद्र आहे. माझी बायको ही एम डी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि ती गेले पंचवीस वर्षे स्वतःची लॅब चालवते. मी स्वतः क्षितिजा कडून आणि काही आयुर्वेदिक डॉक्टर मित्रांकडून योग्य ती आयुर्वेदिक औषधे घेतो तसेच योग शिकलो आहे. प्राणायाम, वाफ घेणे, जलनेती हे ही मला चांगलं जमतं. वैभवीचे मित्र आणि मैत्रिणी हे त्यांच्या क्षेत्रातील माहीर ऍलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. माझी स्वतःच्या दोन अँजिओप्लास्टी, वडिलांचे कँसर प्रकरण, आणि हे चालू करोना प्रकरण याचा मी कुठल्या पॅथी ने काय फायदा होतो याचे ठोकताळे बांधले आहेत. ते ठोकताळेच आहेत, दावे नाही आहेत. कारण मी इंजिनियर आहे, मेडिकल प्रोफेशनल नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कुणी या दोन पॅथीवरून माझी शाळा घेण्याची शक्यता आहे म्हणून आधीच सांगून टाकलं.

योग ला मी योगा म्हणत नाही, हे लक्षात आलं का तुमच्या? 

Monday 10 May 2021

कहाण्या

पुण्यातील परिस्थिती जरी स्टेबल होत असली तरी अजूनही खूप पॉझिटिव्ह केसेस येत आहेत. भय इथले संपत नाही या ओळीप्रमाणे लोक अजूनही खूप घाबरत आहेत. कृपया खालील केसेस वाचा ज्या गेल्या पंधरा दिवसात बऱ्या झाल्या आहेत. 

१. वय २८, सी आर पी सुरुवातीला चांगला होता, पण नातेवाईकाच्या मृत्यूचा स्ट्रेस आला आणि तो डायरेक्ट १०० वर पोहोचला. ऑक्सिजन ८८. वेळेत योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि पेशंट घरी आलाय. 

२. वय ३२, सी आर पी ०. ८ आणि एच आर सी टी ९. दुसऱ्या आठवड्यात सी आर पी पोहोचला २५ आणि  एच आर सी टी १३. योग्य ट्रीटमेंट मिळाली पेशंट हॉस्पिटल मधून घरी आलाय. 

३. वय ६०, डी  डायमर १२५००, एच आर सी टी १७. योग्य वेळेत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट. खूप सुधारणा आहे. बहुतेक एका आठवड्यात डिस्चार्ज मिळेल. 

४. वय ८०, इतर व्याधींनी ग्रस्त. केवळ होम आयसोलेशन ने ओके. योग्य ट्रीटमेंट, योग्य वेळात मिळाली. 

५, वय ४५, एच आर सी टी २५/२५. पेशंट ला योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि पेशंट बरा झालाय. 

६. वय ५२, ऑक्सिजन खाली वर होतोय. ट्रीटमेंट मिळाली. आता स्टेबल झाला आहे. 

या मनघडन कहाण्या नाही आहेत तर समोर घडलेल्या केसेस आहेत. सर्व परिचित आहेत. 

हे सर्व पाहत असताना काही गोष्टी कळल्या आहेत, त्या तुमच्याशी शेअर कराव्या असं वाटलं. 

१. भीती पासून दूर रहा. पेशंट ठीक होणार हा विश्वास मनात ठेवा. (पेशंट ने आणि त्याच्या नातेवाईकाने) 

२. वेळेत ट्रीटमेंट घ्या. कुठंही दिरंगाई करू नका. 

३. हॉस्पिटल आणि डॉक्टर्स वर विश्वास ठेवा. तुम्ही मरावं अशी ट्रीटमेंट मुद्दामून कुणी देत नाही. स्वतःहून हॉस्पिटल बदलण्याचा निर्णय घेऊ नका. डॉक्टर ने जर असमर्थता व्यक्त केली तरच हॉस्पिटल बदला. 

४. एक कुणी डॉक्टर फॉलो करा. चार ठिकाणी ओपिनियन विचारू नका. तुमचं कन्फ्युजन वाढेल आणि निर्णय स्लो घेतले जातात. 

५. आधी काही आजारासाठी ट्रीटमेंट घेतली म्हणून करोना ट्रीटमेंट चा प्रोटोकॉल टाळू नका. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर  करोना ची औषधे घ्या. 

६. नातेवाईक पेशंटला ट्रीट करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. 

बाकी एस एम एस ची त्रिसूत्री सतत लक्षात असू द्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे आपल्या हातात आहे. लसीकरण झालं आहे किंवा करोना होऊन गेला म्हणून बेफिकीर राहू नका. रस्त्यावरचे अपघात रोखणे हे हॉस्पिटल चं काम नाही आहे, ते आपल्या वागण्यावर अवलंबून आहे. करोना चं पण तसंच आहे. मास्क आणि फिजिकल डिस्टन्स ठेवणे हे अजूनही चालू ठेवा. शारीरिक आणि श्वसनाचे व्यायाम करा. करोनाचा पराभव करा. 


Thursday 6 May 2021

करिअर

 एखादं करिअर दणदणीत घडण्यासाठी अंगभूत हुशारी, प्रचंड कष्ट करायची तयारी आणि तिसरा एक महत्वाचा फॅक्टर असतो आणि तो म्हणजे कौटुंबिक इको सिस्टम जी तुमच्या करिअर ला पूरक असली पाहिजे. आज मला इंडस्ट्री मध्ये जवळपास ३२ वर्षे झालीत आणि मागे वळून बघताना (३२ वर्षे झालीत म्हणजे मी हे लिहू शकतो) असं जाणवतं की आईने दागिने गहाण ठेवून (की विकून) आम्हा दोघा भावांचं शिक्षण केलं हे मोठं योगदान आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आमच्या आई बाबांनी करिअर ला बाधा येईल असं कुठलंही वर्तन ठेवलं नाही. घरात असणाऱ्या लग्न मुंजी, आजारपण, किंवा कुणाच्या निधनसमयी भेटायला जाणे यासाठी त्यांनी मला कधीही फोर्स केलं नाही. इतकंच काय पण बाबांच्या आजारपणात मला आठवतं  तसं ते गेले त्या दिवशी मी फक्त घरी थांबलो होतो. हॉस्पिटल ला ऍडमिट होते तेव्हा मी नक्कीच जायचो, पण दिवसभर काम करून. तो पर्यंत आई, वैभवी, उन्मेष असं आम्ही आलटून पालटून ड्युटी करायचो. पण कामाला  कुणीही सुट्टी घेतली नाही. 

आमच्या आईचं पण अगदी सेम. अगदी अलीकडची गोष्ट सांगायची म्हणजे, करोना लसीकरणासाठी मी सकाळी साडेसहाला जाऊन नंबर लावला. आईला फोन केला. ती माउली सकाळी सात वाजता आली. मी घरी जाऊन आंघोळ, कंपनीचा ड्रेस वगैरे घालून निल ला घेऊन आठला पोहोचलो. मग तिला बसायला सांगितलं. टोकन घेतलं. तिला प्रोसिजर समजावली. आई म्हणाली "तू जा कंपनीत. मी करते सगळं व्यवस्थित." नीलला तिच्याबरोबर थांबवलं होतं. साडेनऊला त्याचा ऑनलाईन क्लास होता. आईने त्याला पण घरी पाठवलं. लस घेतली आणि एकटी घरी आली. मुलगा किंवा नातू सोबतीला थांबला नाही म्हणून तक्रार.... शून्य. 

वैभवीचा पण तसाच सपोर्ट असतो. काही खरेदीचं नाटक नाही, फार छानछोकीचं आयुष्य नाही, कुठं बाहेर फिरायला ते माझ्या सोयीने.  १९९४ ला माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. आणि मी सेल्स जॉब घेतला. १९९४ते २००२ मी महिन्यातील १२ ते २२ दिवस बाहेर असायचो. पण तक्रार नाही.  २००५ ला घर बदललं. तिने जी तारीख ठरवली त्या दिवशी नेमकं एका ब्रिटिश माणसाबरोबर मला बंगलोर ला जावं लागलं. कामवाल्या बाईबरोबर वैभवीने, आठ महिन्याचा निल बखोटीला बांधून घर शिफ्ट केलं. सगळ्यात कहर २०११ ला झाला. त्या दिवशी मला संध्याकाळी सहा वाजता अमेरिकेला जायचं होतं. मी सकाळी कंपनीत गेलो होतो. (हो, मी बऱ्याच फॉरेन ट्रिप ला कंपनीत बॅग घेऊन जातो आणि तिथून मुंबईला). तर सकाळी बारा वाजता यश फुटबॉल खेळताना पडला डोक्यावर आणि बेशुद्ध नोबल हॉस्पिटल ला ऍडमिट. मी धावपळ करत पोहोचलो. तो पर्यंत तो शुद्धीवर आला होता. मी वैभवीकडे फक्त पाहिलं, तिने सांगितलं "तू जा, मी सांभाळते". 

असे अजून किमान पन्नास प्रसंग सांगू शकतो. कुणी या जगण्याला मनस्वी म्हणतं, कुणी जबाबदारीचं. काहीही असलं तरीही फॅमिली सपोर्ट इको सिस्टम सणसणीत आहे म्हणून बाह्य जगात इतक्या उड्या मारू शकतो. 

थोडक्यात सांगायचं काय तर करिअर घडवायचं असेल तर कुटुंबाचा सहभाग लागतोच. फक्त त्याला रिटर्न म्हणून तुम्ही सुद्धा इमानइतबारे काम करून त्याचे पांग फेडायला हवेत असं मला वाटतं. 

Tuesday 27 April 2021

देवत्व

२००९ ची गोष्ट आहे. माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं. मुलगा लंडन चा होता, त्यामुळे पाहुणे तिकडून मुंबईला आले होते. मला मित्राने त्या पाहुण्यातील काही लोकांची काळजी घ्यायला सांगितली होती. त्यात काही लोक ऐंशी च्या वयाचे होते. सकाळच्या चहापासून ते त्यांना कारमध्ये बसवायचं, सामान लोड करायचं, कार्यालयात त्यांना काय हवं नको ते पाहायचं हे सगळं मी फार आवडीने केलं. हे करत असताना मी काही फार वेगळं करतोय असं ही मला वाटत नव्हतं.  

लग्नाचा सोहळा संपला. निरोपाची वेळ आली. आणि न भूतो न भविष्यती असा प्रसंग घडला. त्या लंडन मधील पाहुण्यातील बाबुभाई मकवाना म्हणून मुलाचे काका आणि त्यांचं कुटुंबीय हे माझ्या आई बाबांच्या समोर अक्षरश: हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. ऐंशी वर्षाच्या बाबूभाईंनी माझ्या बाबांची गळाभेट घेतली आणि म्हणाले "तुमच्या पोटी देव जन्माला आला आहे." तो प्रसंगच इतका हृदय होता की मला सुद्धा गदगदून आलं. 

परवा एका मित्रवर्याने फार छान आणि सौम्य शब्दात सांगितलं की देवत्व तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. त्यावर विचार करत असताना मला हा प्रसंग आठवला. प्रत्यक्ष जीवनात असे अनेक प्रसंग आले जिथे लार्जर दॅन लाईफ अशा प्रतिमेत अडकायची भीती होती. मला वैयक्तिक असं वाटतं की त्यापासून मी सुदैवाने लांब आहे. त्या भावनेला माझ्या कक्षेच्या बाहेर ठेवलं आहे. आणि जर प्रत्यक्ष आयुष्यात ही परिस्थिती आहे तर या आभासी जगात तिथं अडकण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. 

असं सांगावं लागतं हे खरंतर विचित्र आहे. कारण या आधी पण मी एकदा नमूद केलं होतं की इथल्या लाईक्स अन कॉमेंट्स काही क्षण आनंद देत असतीलही. पण खरा आनंद मला माझ्या बिझिनेस मध्ये काही जबराट घडलं तर होतो. एखाद्या कस्टमर ने ऍप्रिसिएशन लेटर पाठवलं तर मी दिवसभर हवेत असतो. कंपनीतल्या पोरांनी जर काही कारणामुळे कुठल्या निर्णयाची स्तुती केली तर मी सातवे आसमान वर पोहोचतो.  खूप कमी वेळा होतं  ते, पण जेव्हा होतं  तेव्हा मोगॅम्बो खुश होतो. 

मुळात मी स्वतः देवत्वाच्या गाभाऱ्यात फार कमी जणांना बसवतो. या पृथ्वीवर आणलं म्हणून आई वडिलांना देव मानतो. त्याव्यतिरिक्त फार कमी व्यक्ती आहेत ज्यांना मी देव मानतो. आणि जे आहेत ते आज जगणारे जिते जागते माणसं आहेत. त्यात काही समाजासाठी काम करणारे आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही मेंटॉर्स आहेत. त्यांचं कवित्व पण फार लिमिटेड गातो. त्यांना गाभाऱ्यात ठेवत नाही किंवा त्यांची आरती पण गात नाही.  इतिहासातल्या लोकांबद्दल आदर आहे, त्यांनी केलेल्या कामातून काही शिकतो सुद्धा. पण त्या शिकवणीचा उपयोग पायरी म्हणून करतो आणि त्यावर उभं राहून भविष्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्यातील कुणालाही देवत्व देण्यास मन धजावत नाही. 

थोडक्यात सांगायचं म्हणजे देवत्वाच्या कसोटीवर मी स्वतः लोकांना फार तावून सुलाखून घेतो. आणि या फेसबुकवरची कसोटी फारच तकलादू आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. इथं जर कुणी ते तथाकथित देवत्व द्यायचा प्रयत्न केला तर त्याला तिथंच झटकून द्यायची मानसिकता अगदी पुरेपूर बाळगून आहे, याची खात्री बाळगावी. 

इथं खऱ्याखुऱ्या मानव्याचा अंगीकार करायला आयुष्य कमी पडतंय. ती देवत्वाची खोटी झूल हवी कशाला? 

सकारात्मकता

माणसाने या काळात सकारात्मक राहावे काय? असा प्रश्न प्रसाद ने विचारला. सरळ उत्तर द्यायचं असेल तर, हो. किंवा थोडा प्रश्नाच्या रूपात उत्तर द्यायचं असेल, तर दुसरा चॉईस काय आहे?

एका गोष्टीपासून दूर राहायचं असेल ती म्हणजे टॉक्सिक सकारात्मकता. करोना चालू झाला होता तेव्हा ते एक डॉक्टर म्हणत होते, कुठला करोना, काय आहे ते वगैरे वगैरे. (ते डॉक्टर पण करोना ने गेले असं ऐकलं मी). ही झाली विषारी सकारात्मकता. किंवा आजच्या तारखेला याच फाजील आत्मविश्वासापायी अखिल भारतातील नेत्यांचं वर्तन. किंवा ते हरिद्वार..... जाऊ दे नकोच तो विषय. ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी बऱ्याचदा सौम्य निगेटिव्हिटी पेक्षा घातक असते. 

जेवण करत असताना दाताखाली खडा आला तर आपण तो तसाच चावत पुढे जात नाही. आणि चिडून खाणं पण सोडत नाही. जसा तो खडा आपण फेकून देतो आणि पुन्हा जेवायला चालू करतो त्याच पद्धतीने एखाद्या घटनेमुळे नकारत्मकता वाटली तर तिचा त्याग करणं आणि पुन्हा आपलं काम जोमाने चालू करणं आणि  काही गोष्टी आपण बदलू शकणं हे केवळ दुरापास्त आहे,  त्या कोणत्या आहेत हे ओळखून त्याच्यापासून दूर राहणं यात शहाणपण आहे, असं मला वाटतं. 

काही लोकांची  सकारात्मकता फसवी पण असते. तोंडदेखले ही लोक खूप उत्साही आणि चैतन्याने सळसळली आहेत असं वाटतं. ही मंडळी खूप भ्रामक जगात वावरत असतात. म्हणजे अगदी गणपत वाणी बिडी पिताना, चावायाचा नुसतीच काडी, म्हणावयाचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, या कवितेप्रमाणे ही लोक कल्पनेचे फक्त इमले चढवत असतात आणि या काल्पनिक जगात खुश राहतात. प्रत्यक्षात मात्र कशात काय अन फाटक्यात पाय अशी परिस्थिती असते. (राजकारणी लोकांच्या मागे धावणारे कार्यकर्ते याचं परफेक्ट उदाहरण आहे) 

नकारात्मकता बऱ्याचदा झेलता येते. फक्त ती आपली थोडी एनर्जी खाते. पण आपल्या कृतिशील निर्णयामुळे तिला झाकोळता येते. प्रॉब्लेम येतो तो निराशावादी लोकांना हाताळताना. शक्यतो निराशावादी लोक हे सायलेंट किलर असतात. ते एकूणच वातावरण गढूळ करून टाकतात. ही लोक घाबरट असतात. सौम्य निराशावाद वाढला की त्याचं रूपांतर डिप्रेशन नावाच्या रोगात होतं. आणि त्याचे एक्स्ट्रीम परिणाम आपण सगळे जाणतो. 

असो. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या प्रश्नाला हाताळताना कृतिशील निर्णय ज्यामुळे घेता येतात ती सकारात्मकता. आणि तिचा अंगीकार मी, तुम्ही आणि सर्व भवतालाने घ्यायला हवं असं मला वाटतं. 

Sunday 18 April 2021

मत्सर

ज्या लोकांचं पगार पाणी घरी राहून काम करत चालू आहे, ती मंडळी सोडली तर प्रत्येकाला लॉक डाऊन नको आहे. असं नाही की त्यांना या व्हायरस चा धोका माहिती नाही. त्यांना अगदी याची परिणीती मृत्यू होऊ शकते , ही पण जाणीव आहे. पण तरीही हा धोका पत्करायला ते तयार आहेत. (उत्पादन क्षेत्र हे याचं जिवंत उदाहरण आहे. जमेल तितकी काळजी घेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज चालू ठेवल्या आहेत). 

आदर्शवत जगात घरी राहणं किंवा बाहेर जाऊन रोजीरोटी कमावणे यातला पाहिजे तो चॉईस करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला हवं. 

सध्या हा चॉईस फक्त राजकारण्यांना आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बिनधास्त बाहेर जातात. नुसते बाहेर जात नाहीत तर लाखो जनतेला रॅलीज आणि सभांच्या नावाखाली एकत्र पण आणतात. सत्तेची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 

वर्षभर अभ्यास करणाऱ्या पोरांच्या परीक्षा हे लोक रद्द करू शकतात पण एकाही राजकारण्याने एखादी निवडणूक रद्द करा किंवा पुढं ढकला अशी मागणी केल्याचं ऐकवात नाही. म्हणजे अगदी २८८ विधानसभेच्या जागा असलेल्या राज्यातील एक पोटनिवडणूक देखील नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की तिथले दिवंगत आमदार हे पोस्ट कोविड आजारामुळे निधन पावले. 

आणि हो, सर्व धार्मिक मेळे हा राजकारणाचा भाग आहे. इथं कुणीही अपवाद नाही. तो सगळाच प्रकार इतका थर्ड रेट आहे की त्यावर काही लिहावंसं पण वाटत नाही. निरिच्छ भावना आहे त्याबद्दल. हे सगळं घडवून आणणाऱ्या राजकारणी लोकांच्या पोलादी पंजात आपल्या सारख्या सामान्य जनतेचा जीव अडकला आहे, ऑक्सिजन आणि रेमेडिसीविर पेक्षा पण ही पकड दुर्दैवी आहे. मला आता राजकारणी लोकांचा राग येत नाही, तर त्यांना बाहेर जाऊन  जो काही उच्छाद मांडायचा आहे त्याबद्दल त्यांचा मत्सर वाटतोय. 

डॉ भूषण शुक्ला यांच्या पोस्टचा स्वैरानुवाद

Friday 9 April 2021

करोना डायरी भाग ४

ज्या घोषणेची आम्ही वाट पाहत होतो ती झाली आणि ती म्हणजे ३ मे ला कंपनी चालू करायची. पुणे/पिंपरी चिंचवड शहर सोडलं तर ग्रामपंचायतीत असणारे बिझिनेस चालू करा असं पेपर मध्ये छापून आलं. तसंही माझ्याकडे फार्मा कंपनीच्या लेटर मुळे कंपनी चालू करता येईल असं पत्र होतं. आणि नांदेड गाव ग्रामपंचायतीत येत असल्यामुळे  मी कंपनी नक्की चालू करू शकत होतो आणि तशी आम्ही केलीही. पण दुपारी चार वाजता पोलीस आले आणि सांगितलं की कंपनी चालू करता येणार नाही. मी परवानगी दाखवली, मिन्नतवारी केली. पण पाळणाऱ्यांसाठी नियम म्हणजे नियम. औट घटकेची खुशी एक दिवस घेतली आणि पुन्हा शटर बंद केलं. 

शेवटी गंगेत घोडं न्हालं आणि १३ मे ला कंपनी चालू करायची परवानगी मिळाली. नियमावलीत असंख्य गोंधळ होते, त्याला सामोरे जात कंपनी चालू केली. सगळ्यात मोठा प्रश्न होता मॅनपॉवर चा. बरेच लोक घरी जाऊन बसले होते. त्यांना परत पुण्यात आणायचं होतं. अनेक फोन आणि झूम कॉल्स च्या मदतीने त्यांना परत यायचं आवाहन केलं. हो ना करता करता, साधारणपणे १० जून पर्यंत ९०% जनता कंपनीत आली होती. 

सगळ्यात पहिले आर्थिक ताळेबंद आणि मग ऑर्डर फ्लो चा आढावा घेतला. सर्व टीम बरोबर मिटिंग केली. काम कसं करायचं त्याचा आराखडा आखला. आणि मग पुढील नऊ महिन्यात तिन्ही प्लांट चे सेल्स आणि ऑपरेशन चे लोक यांनी अभूतपूर्व काम केलं. 

आमचा बिझिनेस सेगमेंट तसा छोटा. स्पिंडल रिपेयर किंवा उत्पादन हा काही खूप मोठा सेगमेंट नाही आहे. मार्केट साईझ लहान. पण त्या मध्ये सुद्धा कल्पकतेने आणि कष्टाने सेल्स डिपार्टमेंट ने ऑर्डर्स आणल्या आणि ऑपरेशन डिपार्टमेंट ने त्याला तितकीच तोलामोलाची साथ देत कंपनीचा बिझिनेस जागेवर आणला. 

पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होतं. आणि ऑर्डर्स मिळवायला कस्टमर ला भेटणं तर गरजेचं होतं. माझी एर्तीगा आणि आमच्या प्लांट हेड ची स्विफ्ट आणि सोबतीला एक ड्रायव्हर. सेल्स च्या पोरांनी कस्टमर व्हिजिट चा धडाका लावला. गुजरातेत राजकोट पर्यंत, हैद्राबाद, बेळगाव, नागपूर इथपर्यंत पोरं कार ने जायचे. नाशिक, औरंगाबाद,कोल्हापूर आणि मुंबई तर अक्षरशः "जरा शिवाजीनगर ला जाऊन येतो" इतक्या सहजतेने टूर मारायचे. 

कंपनीतल्या सर्व ऑपरेशन डिपार्टमेंट ने सुद्धा तुफान काम केलं. प्रोडक्शन, असेंम्बली, टेस्टिंग, व्हेंडर डेव्हलपमेंट या सगळ्यांनी चौफेर काम करत सेल्स ऑर्डर ला यथायोग्य न्याय दिला. 

कुठलीही आर्थिक चणचण जाणवली की पलीकडचे लोक ज्या भूभागाकडे मृत गुंतवणूक म्हणून बोट दाखवायचे, त्याचे पैसे कंपनीत टाकून ते तोंड बंद करायचं असं मी आणि वाघेला ने ठरवलं. पण पैसे होते कुठे आमच्याकडे? शेवटी वाघेला ने मॅनेज केले आणि माझ्या बाबतीत चमत्कार झाला की ज्यायोगे मी पण पैसे उभे करू शकलो. परत एकदा आम्ही पलीकडच्या लोकांना पुरून उरलो. 

या सगळ्याचा परिणाम काय झाला आणि रिझल्ट कसे आले, ते पुढच्या भागात. 


करोना डायरी भाग ४ 



Wednesday 7 April 2021

महापाप

मागच्या वर्षी तीन महिने करोनाने इतकी ठासून मारली आणि कामधंदे बंद ठेवले तरी लोकांच्या अकला जागेवर आल्या नाही आहेत बहुधा. सरकार सांगतं आहे कीं उत्पादन क्षेत्र चालू राहील तरी मानभावीपणे लोक विचारतात "मग आता फॅक्टरी बंद ठेवायची का?". धंदे बंद करायची घाई मला असं वाटतं सरकारपेक्षा या फॅक्टरी मालकांनाच असावी. यामागची मनोभूमिका कळण्यापलीकडे आहे. म्हणजे काय यांच्या अकौंट पैसे पडून आहेत की यांचे कामगार यांना पगार मागत नाहीत. मला तर काही यांची पत्रास लागत नाही. 

आज एक बिझिनेस ओनर आला, "शनिवारी बंद ठेवायची का कंपनी?" का रे बाबा? अरे, शासनाला तुमच्यामुळे जीएसटी मिळतो ना, मग ते कशाला बंद ठेवायला सांगतील? त्यांच्या तिजोरीत पैसे नको का यायला? मग ते येणार कुठून? तुम्ही आम्ही काम केलं तर येणार ना? मग लागलीच व्यवसाय बंद ठेवण्याची भाषा तुम्ही स्वतःहून का करता? 

इथं बिचारे हॉटेल व्यावसायिक धंदा चालू रहावा म्हणून आर्जव करताहेत. डोळ्यात पाणी आणून विनवण्या करत आहेत. अन तुम्हाला परवानगी मिळत आहे तर काहीतरी कारण काढून तुम्ही बंद करायच्या गोष्टी करता? 

वेगवेगळे उपाय करा कि! कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर करा. लोकांचं लसीकरण लवकर करता येईल का याची चाचपणी करा. एकत्र या, एखादी कॉमन प्लेस ठरवून वैद्यकीय तपासणी करा. सगळं करा आणि व्यवसाय चालू ठेवा. कर्मचाऱ्यांना आश्वस्त करा, त्यांच्या मनातील करोनाची भीती काढा. मास्क द्या, सॅनिटायझर द्या, कुणाला बरं वाटत नसेल तर सुट्टी द्या. कस्टमर बरोबर संवाद साधा. व्यवसाय चालू ठेवण्याच्या दृष्टीने काय करता येईल ते सगळं करा.  

मान्य आहे, सुलतानी संकट आहे. प्रॉब्लेम गहिरा आहे. त्याला लढायची ताकद आपण काम करून आणायची आहे. लॉक डाऊन हा प्रकार नियम न पाळणाऱ्यांसाठी आहे. जे इमानेइतबारे नियम पाळतात, मास्क लावतात, स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेतात त्यांनी इकॉनॉमी रोलिंग ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करायला पाहिजे. आणि उत्पादनक्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की उत्पादन थांबलं नाही पाहिजे. ऑल रेडी दोन वर्षे आपली लागली आहे, पहिलं वर्ष मंदीमुळे आणि दुसरं वर्ष करोनामुळे. आता बाहेर आलो आहे तर परत गर्तेत जायची का मानसिकता ठेवता? आता आपलं विचार आणि आचार असे गुंफले पाहिजे की समाजाचं आर्थिक चक्र हे फिरतं राहिलं पाहिजे. ते थांबलं तर तुम्ही आम्ही तर तरून जाऊही, पण समाजातील एक मोठा प्रवर्ग प्रॉब्लेम च्या खाईत लोटण्याचं महापाप आपल्या डोक्यावर येईल इतकं ध्यानात ठेवा. 


Sunday 4 April 2021

करोना डायरी भाग ३

भाग २ संपला होता "त्यांची कटकट थांबल्यावर एक त्यांना मेल लिहिली, त्याचा मराठी अनुवाद पुढच्या पोस्टमध्ये. " या वाक्याने. तर जे लिहिलं त्याचा स्वैर अनुवाद थोडी काटछाट करून दिला आहे.

"नमस्कार. 

गेले काही दिवस आपल्यात घमासान चर्चा चालू आहे आणि चर्चेचा रोख हा आहे की हे वर्ष कसं खराब जाणार आहे, आणि त्या अनुषंगाने आपण आपला वित्त पुरवठा आणि नफा तोटा पत्रक व्यवस्थित कसा राहील या दृष्टीने काही निर्णय घेतले. हे सगळं करताना मानसिकदृष्ट्या मी थकलो होतो कारण आजवर, व्यवसायाची उतरंड होईल या दृष्टीने मी कधीही निर्णय प्रक्रियेवर काम केलंच नव्हतं. आपण मात्र चर्चेचा रोख असा ठेवला की आपण आपल्याच निर्णयक्षमतेवर शंका घेतल्या. 

आता पर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यात दोन तीन वर्षे अशी गेली जेव्हा वृद्धी करण्यात अडथळे आले. त्या काळातही मी हा तात्पुरता काळ आहे असं समजून नियोजन हे वृद्धिधिष्ठित ठेवलं. पण अर्थात हे वर्ष अजब आहे. इतकी खराब परिस्थिती कधीच नव्हती. असं असलं तरीही आपण जरा काही काळ नकारात्मकता बाजूला ठेवू शकतो का? आणि काही अशा गोष्टी शोधू शकतो का ज्यायोगे आपण या परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकू.? आपली वृद्धिधिष्ठित मानसिकता बरकरार ठेवू शकतो का? 

अन्यथा आपण या निराशावादी विचारात डुंबत राहिलो तर परिस्थितीने तयार केलेल्या भोवऱ्यात आपण गरागरा फिरू ज्यायोगे आपण आपली धूळदाण उडवायला कारणीभूत राहू. 

आपल्याला आता दोन मार्ग आहेत. एकतर मेंदूवर नैराश्याची पुडं चढवायची आणि असे निर्णय घ्यायचे की ज्याने परिस्थिती अजून चिघळेल. (जसं लोकांना काढणं) अन्यथा दुसरा मार्ग हा आहे की या नैसर्गिक आपत्तीला स्वीकारायचं आणि त्यावर मात करण्यासाठी काही उपाय शोधायचे की ज्यायोगे आपण हे वाईट दिवस सरल्यावर येणाऱ्या संधीचं आपण सोनं करू शकू! मी दुसऱ्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे आणि मी सर्वाना आवाहन करतो आपण सर्वानी मला यामध्ये साथ द्यावी." 

हे असं काही तरी पलीकडच्या लोकांना कळवलं. त्यातली पोटतिडिक बहुधा जाणवली असावी. आणि माझ्या मागचा लोक कमी करण्याचा ससेमिरा पूर्णच बंद झाला. आणि व्यावसायिक उद्दिष्ट पूर्णतः सामोरे आले. याच पद्धतीच्या अनेक मेल्स मला माझ्या अन्य सहकार्यांना पाठवाव्या लागल्या. वस्तुस्थितीची जाणीव देत, भविष्य आशादायी असेल यावर माझा सगळा संवाद बेतला होता. यामध्ये घशात माझे शब्द अडकले आणि ते म्हणजे एप्रिल आणि मे च्या पगारात २५% कपात होईल हे सांगताना. अर्थात डिसेंबर नंतर आम्ही हे परत देणार होतो पण तरीही हे सांगताना मन फार जड झालं खरं. आमची गॅंग पण इतकी भारी त्यांनी एका शब्दाने नाराजी व्यक्त केली नाही पण जे काही आम्ही सांगितलं, त्याचा खुल्या मनाने स्वीकार केला. 

अजून एका गोष्टीवरून माझं डोकं पकलं होतं. सामंजस्य करार होताना कंपनीच्या पदरात एक आमचा प्लॉट आला होता. पण या पाश्चात्य मंडळींना व्यवसाय करायचा तो फक्त भाड्याच्या जागेत. कुठलंही विस्तारीकरण करायचं आणि त्यासाठी पैशाची चणचण जाणवली की ही मंडळी त्या भूभागाकडे बोट दाखवायची. म्हणायची ही मृत गुंतवणूक आहे. याला विका. पण ते जरा तिरपांगडं प्रकरण असल्यामुळे विकलं जात नव्हतं. 

एप्रिलचा शेवटचा आठवडा उजाडला. व्यवसाय परत कधी चालू याची काही कल्पना येत नव्हती. एव्हाना आमच्या ऑनलाईन सेमिनारने पूर्ण देशात धूम मचवली होती. चेन्नई पासून ते परवाणु पर्यंत आणि इकडे पुण्यापासून ते जमशेदपूर पर्यंत आम्ही कस्टमर कनेक्ट चा धडाका लावला. आणि याबरोबर कंपनीतल्या सर्वांशी झूमद्वारे कनेक्ट होतोच. शारीरिक आणि श्वसनाचे व्यायाम, जलनेती, व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्या, वाफ घेणे याबाबतच्या सूचना किंवा काही ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्ही सतत एकमेकांशी बोलत राहिलो. 

ते भूभाग प्रकरण आणि या सगळ्या निराशेच्या गर्तेत असताना एकदा कंपनी सुरु झाल्यावर आमचा व्यवसाय कसा जागेवर आला, या संदर्भांतील गोष्ट पुढच्या भागात. याच काळात मी माझं "लीडरशिप" बद्दलची मतं आमच्या लोकांसमवेत शेअर केली. जमली तर त्या मेलचा अनुवाद पण देतो. 





सुरेश-

"झाले बहू, होतील बहू, या सम हाच" ही उक्ती सार्थ करणारा माझा भाऊ, सुरेश पाठक, २८ मार्च ला आम्हाला सगळ्यांना दुःखसागरात लोटून निघून गेला. खूप आठवणी आहेत त्याच्या. त्याच्या मनाचा मोठेपणा हा की आयुष्यभर सर्वांचे फक्त सद्गुण पाहणारा तो. कोणाविषयी काही वावगं बोललं तरी लागलीच म्हणणार "जाऊ दे गं, आपण आपलं कर्तव्य करावं आणि बाकी सोडून द्यायचं." निरागस हसणारा आणि दुसर्यांना हसवणारा. त्याच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर फेर धरून नाचत आहेत. 

माझ्या काकांना चार मुलं आणि आत्यालाही चार मुलंच. आजी माझ्या वडिलांना म्हणायची "इथं हैद्राबाद मध्ये आठ मुलंच आहेत. तुझ्या चार मुलींपैकी एक इकडे पाठवून दे." त्या आजीच्या आग्रहामुळे माझी रवानगी परभणीहून हैद्राबाद ला झाली, माझ्या काकांकडे, म्हणजे सुरेशच्या वडिलांकडे. तेव्हा मी दुसरीत होते. हैद्राबाद मोठे शहर. काका आणि आत्या, दोघांचे घर सुलतान बाजारात होते. घराजवळ डावरे स्कुल होती. त्या शाळेत सुरेश, अत्याचा मुलगा शरद आणि मी असे सारे जायचो. हैद्राबाद मोठं शहर, त्यामुळे मी थोडी घाबरायची. पण सुरेश माझ्या पाठीशी असायचा. मला मार्क चांगले मिळायचे. तो वैतागायचा. म्हणायचा "तुला जास्त मार्क मिळतात म्हणून मला मी अभ्यास कमी करतो म्हणून सगळे बोलतात.तू जरा अभ्यास कमी करत जा." शाळेतून घरी येताच आम्ही लगेच खेळायला बाहेर पळायचो. सर्व भावात मी एकटी बहीण. पण विटीदांडू, लगोरी, पतंग उडवणे या सगळ्या खेळात मला सहभागी करून घ्यायचे. गच्चीवर तो पतंग उडवायचा आणि मी त्याच्या मागे चक्री घेऊन फिरायची. या सगळ्यामुळे मी खेळात अगदी प्रवीण झाले आणि शाळेत टीमची कर्णधार झाले. 

पुढे मग भाषावार प्रांतरचनेत हैद्राबाद आंध्र प्रदेश मध्ये गेलं आणि मराठवाडा महाराष्ट्रात आलं. त्यावेळेस माझे काका, सुरेशचे वडील सीतारामपंत पाठक, हे मुंबईला कोर्टात रजिस्ट्रार म्हणून गेले आणि मी परभणीत परत आले. कारण मुंबईत जायची माझी डेअरिंग नव्हती. अर्थात सुरेश पुन्हा आयटीआय करण्यासाठी आमच्या घरी परभणीला आला. त्यामुळे आमची जुगलबंदी चालूच असायची. पुढं माझं लग्न झालं आणि मी मंडलिक झाले आणि सुरेश चं लग्न वाशिमच्या माळोदे घरातील सुनीताशी झालं. सुनीता वहिनी पण सुगृहिणी. सुरेशने आई वडिलांची प्रचंड सेवा केली आणि वहिनींनी त्याला तितकीच साथ दिली. घरात कायम पाहुण्यांची वर्दळ असायची. वहिनी आणि सुरेश खूप आदरातिथ्य करायचे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. मला दोन मुले. अनेक दिवाळी आणि राखीपौर्णिमा ला आम्ही भेटत राहिलो. बहीण भावाचं नातं अजून घट्ट होत गेलं. आम्ही पुण्यात आलो, अन सुरेश आमच्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमाला हजर व्हायचा. सकाळी यायचा, दहा ते दुपारी चार आम्ही हास्य जत्रेत मश्गुल असायचो. रात्री तो परत ठाण्याला जायचा. 

मध्ये दुर्दैवाने त्याच्या मुलाचे, सचिनचे, निधन झाले. पण त्याची वाच्यताही तो कुठे करत नसे. ते दुःख तो कधीच कुरवाळत बसला नाही. त्याला त्याच्या सर्वच भाच्यांचं विशेष कौतुक. माझ्या मुलांचा पण त्याला खूप अभिमान. त्यांचं शिक्षण, व्यवसाय याचा त्याला विलक्षण अभिमान होता. राजेशने कुठं कविता म्हंटली, किंवा त्याचं कॉलेज मध्ये भाषण वगैरे झाले की सुरेश मला आवर्जून फोन करायचा आणि राजेशची भरभरून स्तुती करायचा. उन्मेषच्या बांधकामाच्या व्यवसायाचं त्याला कौतुक होतं. त्यानेच बांधलेली राजेश ची फॅक्टरी बघायची त्याची इच्छा अपुरी राहिली. 

त्याची मुलगी सुचेता ही खऱ्या अर्थाने कन्यारत्न आहे. जावई तुषार आणि नातू अथर्व यांचा त्याला सार्थ अभिमान. अथर्व आणि त्याचं नातू-आजोबाचं नातं मोठं मोहक होतं. सुचेताच्या सासूबाईंची पण तो नेहमी तारीफ करायचा. हे कौटुंबिक सुख मात्र त्याला भरभरून मिळाले, याचं मला समाधान वाटतं. 

त्याचा जवळपास मला दररोज फोन असायचा, सकाळी आठच्या सुमारास. दररोज फोन आला तरी आम्हाला गप्पाना कधीच तोटा नव्हता. अथर्वची अमेरिकेतली खबरबात, परभणीतील मुक्ताजीनचे सोनेरी दिवस, हैद्राबादच्या आठवणी, इतर नातेवाईकांची चौकशी असे अनेक विषय असायचे. आयुष्य हसून खेळून जगायचं हे मी त्याच्याकडे बघून शिकले. त्याच्यापेक्षा मोठ्यांशी आणि वयाने लहान असणाऱ्यांशी तो एकाच सहजतेने बोलायचा. कुठल्याही दुःखाला न गोंजारता, दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानणारा असा माझा भाऊ!

लहानपणी मला एकटीला सोडून तू  पळत निघायचा आणि मग काका किंवा आत्या तुला बोलायचे की बेबीला एकटं सोडून का पुढे पळतोस. आताही परत मला एकटीला सोडून पुढे निघून गेलास. स्वर्गात असणारे काका आणि आत्याचे बोल खाशील तिथे पण, की इथेही बेबीला एकटं सोडून निघून आलास. लहानपणी परत यायचास, आता मात्र तू परत येणार नाहीस आणि मी तुझ्या आठवणी काढत रडत बसणार! त्याशिवाय काय उरलं आहे माझ्या हातात?

जन्मोजन्मी हाच भाऊ मिळो!

 कुमुद मंडलिक

Saturday 3 April 2021

करोना डायरी भाग २

लॉक डाऊन चा पिरियड जसा वाढत गेला, आणि कंपनीतले सगळे कर्मचारी एक तर त्यांच्या गावी घरी पोहोचले होते किंवा पुण्यात असतील तर ते घाबरले होते. सगळ्यात पहिलं आव्हान होतं ते त्यांच्या मनात विश्वास जगवायचा की कंपनी त्यांच्या पूर्ण पाठीशी असेल. त्या विश्वासाची त्यांना गरज होती की माहिती नाही, कदाचित मलाच त्याची गरज जास्त होती. जिथं शक्य आहे तिथं प्रत्यक्ष भेटून किंवा झूम द्वारे मी त्यांच्या संपर्कात राहिलो. त्याद्वारे आम्ही काही ट्रेनिंग सेशन्स प्लॅन केले. काही टेक्निकल, सेल्स, सॉफ्ट स्किल्स हे विविध विषय घेऊन आम्ही लोकांशी सतत बोलत राहिलो. 

दुसरं आम्ही ग्राहकांशी संपर्कात राहण्याचा एक अभिनव प्रोग्रॅम आखला. आमच्या बिझिनेस च्या अनुषंगाने आम्ही एक सेमिनार बनवला होता "Why do spindles fail and how to prevent it". हा विषय घेऊन आम्ही मग ऑनलाईन सेमिनार केला. लॉक डाऊन काळ आणि नंतर बिझिनेस जागेवर येईपर्यंत आम्ही ३० पेक्षा जास्त वेळा सेमिनार घेतला आणि तब्बल ३००० पेक्षा जास्त ग्राहकांशी संपर्कात आलो. इतकं काम तर आम्हाला इन पर्सन भेटायचं असलं असतं तर कमीत कमी दीड वर्षे गेली असती

हे सगळं करत असताना एक वेगळा प्रश्न उभा राहिला. आमच्या तिकडच्या सहकार्यांनी मला दबाव आणला की नोकर कपात करा म्हणून. एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यात मला दररोज संध्याकाळी फोन यायचा आणि काही भलतीच आकडेमोड करून मला सांगण्यात आलं की कमीत कमी वीस लोक कमी कर. इथं दोन फॅक्टस होत्या. एकतर मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात, व्यवसाय बरोबर चालत नाही म्हणून कुणाला काढलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय असलेल्या माझ्या कर्मचाऱ्यांना केवळ ही नैसर्गिक आपत्ती आली म्हणून काढून टाकायचं हे मूळ सिद्धांताला धरून नव्हतं. शेवटी याच लोकांच्या जीवावर ही कंपनी भारतात नंबर एक ची आणि जगातल्या पहिल्या पाच मध्ये नावारूपाला आलेली आहे ही वस्तुस्थिती मला माहित होती.

सुरुवातीला मी त्यांना शाब्दिक विरोध केला. मग शासनाने केलेलं आवाहन दाखवलं, तरीही ही मंडळी काही ऐकत नव्हती. शेवटी मला एक परिपत्रक सापडलं ज्यात शासनाने अशा व्यवसायिकांवर कारवाई करू हा नियम त्यांना दाखवला. हे लोक जर घाबरत कशाला असतील तर ते कायद्याला. थोडं त्यांच्या मागणीतला जोर कमी झाला. पण कटकट चालू होती. 

शेवटी मी त्यांना उपाय सांगितला की एप्रिल आणि मे मध्ये आपण पगार कपात करू २५% आणि जेव्हा कार्यक्रम जागेवर येईल तेव्हा परत देऊन टाकू, डिसेंबर २० नंतर. त्यांचा लागलीच पुढचा प्रश्न आला की त्याने वित्त पुरवठा सुधारेल पण तोटा तर कायम राहील. त्यांना काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलं. एक क्षणाचाही विचार न करता मी त्यांना सांगितलं की माझा आणि व्यवसायिक सहाध्यायी यांचा पगार आपण अर्धा करू आणि ती तात्पुरती कपात नसेल तर बुक्स मध्ये अकौंटिंग करायचंच नाही. एप्रिल २०२० पासून ते मार्च २०२१ पर्यंत. 

याद्वारे तुमचा नफा जागेवर राहील. 

पण माणूस एकही काढणार नाही यावर ठाम राहिलो. आणि त्या शब्दाला जागलो सुद्धा! त्यांची कटकट थांबल्यावर एक त्यांना मेल लिहिली, त्याचा मराठी अनुवाद पुढच्या पोस्टमध्ये. 

करोना डायरी भाग २

Thursday 1 April 2021

करोना डायरी भाग १

 २१ मार्च २०२० ला मी कंपनीत घोषणा केली की  आठ दिवस कंपनी बंद राहील. शासनाचा आदेशच होता तो. मार्च मध्ये जे ठरवलं ते झालं नाही पण एप्रिल दणक्यात सेल करू असा विचार करत मी घरी आलो. पण जसा आठवडा जात गेला, हे जाणवलं की  लॉक डाऊन वाढवला जाणार. 

३१ जानेवारी २०२०ला आम्ही नवीन प्लांट चं उदघाटन केलं. अख्खा फेब्रुवारी शिफ्टिंग मध्ये गेला. १ मार्चला आम्ही मोठ्या जोमाने नवीन प्लांट मध्ये काम चालू केलं आणि त्याच्या दुसऱ्याच आठवड्यात टाळेबंदीची चर्चा चालू झाली. बोलता बोलता ती लागू झाली पण. 

परिस्थिती अवघड होती. नुकताच बांधलेला आधीपेक्षा तिप्पट मोठा प्लांट. तिथं झालेला खर्च, आणि या मोठ्या प्लांटच्या अनुषंगाने आ वासून उभे राहिलेले नवीन खर्च, सगळे आकडे डोळ्यसमोर नाचू लागले. हेच सगळं टेन्शन घेऊन बसलो असतो तर मानसिक स्थिती फार खराब झाली असती. या विचारात असतानाच आमच्या आपलं घर चे अन्नदानाचे फोटो ग्रुप वर आले. पहिले मी फळणीकर सरांना फोन केला आणि त्यांच्या या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करायची तयारी दाखवली. 

२८ मार्च ते तीन एप्रिल मी आपलं घरच्या ऍम्ब्युलन्स बरोबर रस्त्यावरील निराधार लोकांना अन्नदान करत फिरलो. वेगळाच अनुभव होता तो. भुकेली लोक अक्षरश: गाडीची वाट बघत थांबले असायचे. अन्नदानाचं काम आहे म्हंटल्यावर पोलीस लोक पण पटकन सोडून द्यायचे. 

तीन एप्रिल ला संध्याकाळी मला आमच्या एका फार्मा कस्टमर कडून त्यांच्या स्पिंडल ची मागणी आली. हा स्पिंडल अर्धवट आमच्याकडे झाला होता. पहिले दोन तीन दिवस तर काही सुधरलंच नाही. कस्टमर ने आम्हाला रीतसर पत्र दिलं होतं, की  हा पार्ट इसेन्शियल कमोडिटी खाली येतो तर सेटको ला कंपनी चालवायची परवानगी द्या. पण त्या पत्राचा वापर कसा करायचा हेच माहिती नव्हतं. आणि कंपनीतील मुलं सुद्धा घाबरली होती. काहीजण त्यांच्या गावी जाऊन पोहोचली होती. जी होती त्यांची कंपनीत यायची तयारी नव्हती. 

या सर्व दिवसात काही ना काही कारणाने कंपनीत यायचो. शेवटी काही रिसोर्सेस कडून फार्मा कस्टमरच्या पत्राचा वापर करून कंपनी कशी चालवायची याची माहिती घेतली. तीन दिवस कलेक्टर ऑफिस, डी आय सी ऑफिस आणि मामलेदार कचेरी अशा चकरा मारल्या आणि साधारण ११ एप्रिल रोजी मामलेदार कचेरी खडकमाळ इथं माझं कंपनी चालवायचं लेटर मिळालं. त्या ऑफिस मध्ये एक मेन ऑफिसर मॅडम होत्या. मी तिथं असताना त्यांना कुणा तलाठ्याच्या फोन आला की पीडीएस खाली मिळणारं अन्नधान्य त्यांच्या ऑफिस ला पोहोचलं नाही आहे आणि स्वतःचे पैसे घालून त्यांना नागरिकांना ग्रोसरी द्यावं लागतं. मॅडम मला म्हणाल्या "ओ इंडस्ट्रीवाले, तुम्ही लोकांनी पण थोडी मदत करायला हवी या कामाला. हे आमचे तलाठी किती लोकांना देणार धान्य." 

इथं परत फळणीकर सर मदतीला धावून आले. आपलं घर आणि सेटको च्या मदतीने आम्ही वीस किट्स तयार केले आणि डोणजे गावातील तलाठीकडे सुपूर्त केले. आपलं घरने एव्हाना हे काम तसंही चालू केलं होतं. मी सोशल मीडियावर हे किट्स प्रकरण टाकल्यावर अनेक जणांनी मदत पाठवली. आपलं घरच्या सेवेतून आणि या छोट्या मदतीतून कार्यक्रम संपला तेव्हा ८०० ग्रोसरी किट्स चं वितरण झालं होतं. अर्थात यात मोठा सहभाग आपलं घर चा होता. नकारात्मक वातावरणात काहीतरी आपण भरीव करू शकतो या भावनेला उभारी मिळाली. 

इकडे फार्मा इंडस्ट्रीचा स्पिंडल रीतसर परवानगी घेऊन सप्लाय केला आणि चौदा एप्रिल ला टाळेबंदी अजून वाढवली अशी बातमी आली. त्या दिवसापर्यंत कंपनीचे बहुतेक कर्मचारी आपापल्या गावी पोहोचले होते. करोना ची भीती आता गडद झाली होती. 

संकट गहिरं झालं होतं. त्याला सामोरं कसं जायचं याचे विचार डोक्यात घोंगावू लागले. 


करोना डायरी भाग १ 

Wednesday 31 March 2021

असा मी

 मी जे लिहिणार आहे त्यावर फारसा कुणाचा विश्वास बसेल का याबद्दल मी साशंक आहे. एका मित्राच्या पोस्टवरून हे लिहावसं वाटलं. कदाचित मामाच्या मृत्यू मुळे मी थोडा कातर ही झालो असेल. 

का कुणास ठाऊक, पण गेल्या काही वर्षात माझ्या मनात कुणाबद्दल कटुता किंवा तिरस्कार राहत नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे की माझ्याबरोबर सगळं छान घडलं आहे. काही लोकांनी फसवलं आहे, दगा दिला आहे, काहींनी पैशाला टोपी लावली आहे, काहींनी मानसिक त्रास दिला आहे, एकाने तर मी मरावं अशी जाहीर इच्छा प्रकट केली आहे. पण या कुणाच्याही बद्दल माझ्या मनात तिरस्काराची भावना नाही आहे. मी या सगळ्यांशी व्यवस्थित बोलतो, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करतो. 

काही लोकांचा चॉईस आहे की त्यांनी माझ्याशी बोलणं टाकलं आहे, ते माझा फोन उचलत नाहीत, किंवा मला बोलणं टाळतात, त्यामुळे आणि फक्त त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकत नाही. पण कधी काळी ते माझ्याशी बोललेच तर जुनं सगळं विसरून परत त्यांच्याशी बोलण्याची मानसिकता तयार झाली आहे. यामध्ये सर्व कॅटेगरी आहेत. काही मित्र आहेत, जुने सहकारी आहेत, नातेवाईक आहेत. 

आयुष्यात काही घटना घडल्या आहेत, ज्याने हा अंतर्बाह्य बदल घडून आला आहे. त्यात सगळ्यात जास्त फरक ७ जुलै २०१९ ला अपघातात जे चार सहकारी निधन पावले त्याने पडला आहे. ६ जुलै ला ज्या लोकांबरोबर संध्यकाळी हसी मजाक करत होतो, ते बरोबर अकरा तासांनी या जगात नव्हते हा धक्का फार जबर होता. आणि मग "जिवंत आहेस ना, मग सगळे प्रश्न आपण सोडवूं शकतो" ही एक भावना मनात तयार झाली. काही फरक वाचनाने आला आहे तर काही वेगवेगळ्या लोकांना ऐकल्यामुळे झाला आहे. 

इथं फेसबुकवर सुद्धा माझी कुणाला सहन करायची ताकद जबरदस्त आहे. दोन तीन लोकांना मी लिस्ट मधून उडवलं होतं, कारण माझ्या मते फार बालिश वागत होते. काहींनी मला उडवलं होतं, आहेही. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मी त्यांच्याशी एकदम निवांत बोललो आहे. ते जर हे पोस्ट वाचत असतील तर त्यांच्या लक्षात येईल. 

अजून एक महत्वाची जाणीव झाली आहे. काही व्यक्तीबरोबर माझा व्यवहार हा चुकीचा झाला आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांची मी कधी माफी मागू शकेल की  नाही ही शंका आहे. पण त्या सर्वानी, अँड आय मीन  इट, अगदी सगळ्यांनी मला माफ केलं आहे. म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं आहे की मी त्यांच्याशी अक्षम्य व्यवहार केला आहे हे त्यांच्या लक्षात पण नाही आहे. इन फॅक्ट काही त्यातील बऱ्याच व्यक्ती या मला आदर्श मानतात. 

काहींच्या लेखी हे चुकीचं असेल, काही लोक याला आत्मस्तुती म्हणतील, काही लोक खिल्लीही उडवतील. मी असा का झालो, कसा झालो हे माहिती नाही, पण झालोय खरा! जे आहे ते आहे. 


असा मी 


Sunday 28 March 2021

सुरेश सीतारामपंत पाठक

 तो यायचा परभणीच्या मुक्ताजीन मध्ये, सायकल रिक्षातून. आणि मग आम्ही भाचे मंडळी जाऊन त्याच्या ढेरी वर गुद्दे मारायचो. जी असोशी, जे प्रेम त्याने सत्तर ते ऐंशीच्या दशकात दिलं, त्यात तसूभरही बदल झाला नाही पुढच्या चार दशकात. आणि हे माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येकासाठी. काही लोक अशी असतात की त्याच्या संपर्कातल्या प्रत्येकाला वाटतं की त्याचं आणि माझं नातं जरा स्पेशल आहे. तीन व्यक्ती येऊन गेल्या आयुष्यात, शरद मंडलिक, विलास कुलकर्णी आणि तो, माझा मामा सुरेश सीतारामपंत पाठक. 

सुरेश मामाच्या घरी गेलो की सॉलिड कौतुक ओसंडायचं, त्याच्या शब्दातून, कृतीतून. हक्कानं पाया पडायला लावायचा आणि भरभरून आशीर्वाद द्यायचा. काही लोकांच्या पाया पडायचं म्हणजे मनात फक्त येतं की पाठीला व्यायाम होतोय आणि काही लोकांचे पाय पकडताना पाठीच्या कण्याला वाकायची आज्ञा आपसूक होते. मामा दुसऱ्या कॅटेगरी मधला होता. 

माझ्या आईचा लाडका भाऊ. तसा चुलत, पण सख्ख्याच्या पलीकडे. कारण ती त्या चार भावंडांबरोबर मोठी झाली हैद्राबादला. आमच्या घराबरोबर अजब प्लाटॉनिक प्रेम होतं त्याचं. १८ जून २००९ ला सकाळी त्याला कळलं मी बाबांची तब्येत बरी नाही म्हणून सुट्टी घेतली. तर केवळ मी सुट्टी घेतली म्हणजे प्रकरण सिरीयस आहे हे जाणून साडे तीन तासात, दुपारी दोनच्या सुमारास तो घरी आला. संध्याकाळी पाच वाजता बाबा गेले. 

मला राजा म्हणणाऱ्या फार कमी व्यक्ती, त्यात तो एक. अन तो मला राजा सारखी ट्रीटमेंट पण द्यायचा. ठाण्याला गेलो अन मी श्रीरंग सोसायटीत त्याच्या घरी गेलो नाही असं क्वचित व्हायचं. अगदी चहा बिस्कीट घेण्यासाठी अर्ध्या तासासाठी का होईना मी जाऊन यायचो. त्याला जाम अभिमान होता माझा. सेटको, त्या अनुषंगाने भारतात आणि परदेशात माझं फिरणं, अ.....अभियंत्यांचा पुस्तक, इथे फेसबुकवरील लिखाण ही प्रत्येक गोष्ट त्याने भरभरून एन्जॉय केली. माझ्यासमोर आणि इतर नातेवाईकांसमोर तो बिनदिक्कत माझं या सगळ्यांसाठी बेफाम कौतुक करायचा. 

सगळ्यांवर निरामय प्रेम करणारा एक भाविक, कुणाचाही मृत्यू वेदनादायी असतोच पण सुरेश मामाच्या बाबतीत असं काही लिहायला हात धजावत नाही आहेत. 

दररोज रात्री गादीवर चादर टाकताना तुझी ती एक सुरकुती न पडणारी चादर आठवत राहील, दर गणपतीला तुझी ती आरास आठवत जाईल, कुणाही मोठ्याचा आशीर्वाद घेताना तुझे ते "येत जा रे राजा, बरं वाटतं" हे शब्द कानात गुंजन करतील, कुणाही मोठ्यांची सेवा या हातून घडलीच तर तू आजोबांची जी काळजी घेतली ती बेंचमार्क म्हणून सतत मनात राहील. 

माहिती आहे, आपली भेट आता होणार नाही, कारण तू अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहेस. पण वी ऑल विल नेव्हर मिस यु, Suresh मामा.  कोणत्या ना कोणत्या कारणाने तू आम्हाला सतत आठवत राहशील. मला माहिती आहे, तुला इंग्रजी फार आवडत नाही पण काय करणार घसा दुखत असताना आणि कॉम्प्युटर चा स्क्रीन अंधुक दिसत असताना भावना व्यक्त करण्यासाठी इंग्रजीचा सहारा घ्यावा लागतोय. 

Saturday 27 March 2021

एक्झिट

२०१५ मध्ये जेव्हा माझी दुसरी प्लास्टी झाली तेव्हा मी स्वतःवर जाम वैतागलो होतो. विचार यायचा, सालं आपण इतकं काम करतोय पण त्यामुळे तब्येत जर खराब होत असेल तर काय उपयोग? मी सेटको बोर्डाला रीतसर सांगून टाकलं की मला या जबाबदारीतून मुक्त करा. अर्थात हे मी निराशेतून लिहिलं होतं. मी जास्त लावून धरलं असतं तर कदाचित मला बोर्डाने सोडलं पण असतं, पण रणछोडदास म्हणून ओळखला गेलो असतो. कारण सेटको वजा राजेश मंडलिक यासाठी काहीच तयारी नव्हती. 

मग माझी मनीष गुप्ता सरांशी ओळख झाली ज्यांनी बिझिनेस करण्याचा स्ट्रक्चर्ड फॉरमॅट शिकवला, ज्यामध्ये सक्सेशन प्लॅनिंग किती गरजेचं आहे याची समज आली. २०१७ पासून त्यावर काम केलं, आणि कंपनीत दुसरी आणि तिसरी फळी तयार केली. आज २०२१ मध्ये परिस्थिती अशी आहे की  जरी मी कंपनीचा निरोप घेतला तरी कंपनी व्यवस्थित चालेल, किंवा कुणास ठाऊक जास्त चांगल्या पद्धतीने चालेल. आणि मुख्य म्हणजे हे निरोप घेणं फार सकारात्मक मोड वर असेल. माझ्या मनात कुठलाही गिल्ट नसेल, आणि एक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान असेल. 

मला असं नेहमीच वाटत आलं आहे की चांगल्या पद्धतीने निरोप घेणं ही पण एक कला आहे. आणि जर हा निरोप निराशा वा वेदना देणारा न देता, पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये झाला तर त्या निर्णयाचा आदर होतो. 

बिझिनेस चालू करण्याच्या अगोदर मी दोन जॉब केले, एक एस के एफ आणि दुसरा रॊलॉन. दोन्ही जॉब पैशासाठी नव्हे तर काही विशिष्ट कारणासाठी सोडले. आजकालच्या मुलामुलींना हे वाचायला थोडं विचित्र वाटेल पण दोन्ही चेंजओव्हर मध्ये मी आधीपेक्षा कमी पगार घेतला. तर सांगायचं हे की एसकेएफ सोडून २६ वर्षे झाली आणि रॊलॉन सोडून १८, पण आजही तिथले कलिग्ज संपर्कात आहेत. त्याचं कारण हेच की निरोप घेताना कुणाच्याही मनात कटुता नव्हती, आणि नंतरही व्यवसायाची पद्धत अशी ठेवली की कधीही कुणी समोर आलं तर तोंड चुकवून जावं लागणार नाही. 

माझ्या अजून एक लक्षात आलं आहे की आपली गरज इथे संपली आहे हे ताडता यायला हवं आणि ते तर अगदी एक तासाच्या भेटीत सुद्धा लागू होतं. विधात्याकडे मी नेहमी एक प्रार्थना करतो की कुणीही जा म्हणण्याच्या अगोदर मला तिथून निघायचं धैर्य आणि सुबुद्धी द्यावी. 

थोडक्यात काय तर पृथीवरची आपली एक्झिट आपल्या हातात नाही आहे पण ती सोडून प्रत्येक ठिकाणच्या एक्झिट वर आपलं नियंत्रण हवं. 

Monday 15 March 2021

निर्णयप्रक्रिया

आयुष्याच्या पटावर एव्हाना एक गोष्ट कळून चुकली आहे की यशस्वीतेचा ठप्पा एखादा निर्णय बरोबर घेतला तर लागत नाही. त्यासाठी अनेक निर्णय हे योग्य घ्यावे लागतात. त्याप्रति येण्याची प्रोसेस ही शिकण्याची गोष्ट आहे. बरेचदा ज्यांचे निर्णय बरोबर येतात, "त्यांना नशीब साथ देतं" अशी एक पासिंग बाय प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्या क्षमतेचं, त्यांनी भूतकाळात चुकीच्या निर्णयातून काही शिकून त्या प्रोसेसला समजून घेण्यात आणि त्यावर अंमलबजावणी करण्यात जी मॉडेस्टी आणि हुशारी दाखवली असते, त्याची अक्षरश: बोळवण करून टाकतो. 

एखाद्यावर अपयशी असा ठप्पा लावण्याची कुणी घाई करत नाही. पण काही लोक त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतात. त्यावर काम करण्यासाठी नियती अनेक संधीही देते, पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत, आपल्या मेंदूची कवाडं काही तरी विचित्र मान्यतांवर आधारित घट्ट बंद करून ठेवतात. त्याच्या बिजागिरीना आता गंज चढलेला असतो. पण आपण काही त्यावर काम करत नाही आणि मग एका चुकीमुळे छोटा तयार केलेला खड्डा हळूहळू मोठा होत जातो. "नशीब साथ देत नाही" असं आपल्याच नाकर्तेपणाचं सार काढून त्या खड्ड्यात सपशेल शरणागती पत्करतो. 

वाईट वाटतं, कधी कधी रागही येतो. आत्ममग्नतेचं भूत यांच्या मानगुटीवर इतकं भीषण सवार असतं की त्याला आव्हान देण्याची सुद्धा समोरच्याला भीती वाटावी. काळाच्या कसोटीवर या लोकांची झालेली अधोगती बघवत नाही. त्यांच्या क्षुद्र मानसिकतेवर आता चीड येत नाही, आता त्यांच्यावर दया येते. 

Give, as if you are going to die tomorrow.....Take, as if you are left with many years to live इतकं सोपं गणित आहे आयुष्याचं. हे खरंतर असं असताना ग्रीड हा प्रकार त्याला आपण इतकं अवघड करून टाकतो की समीकरण सुटता सुटत नाही. 

म्हंटलं तर फार अवघड नाही आहे. पण सुर्याखालील सर्व गोष्टीची मला माहिती आहे या भ्रमात माणूस गेला की त्या गैरसमजूतीला छेद देणं हे दुरापास्त होतं. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको याचा खरा अर्थ निर्णयप्रक्रिया आत्मसात करण्याविषयी आहे. त्याची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ती समजून घेण्याविषयी आहे. जो जिता वोही सिकंदर यातील सिकंदर बनण्याची आहे. 


#चिंतनातून 



Friday 12 March 2021

गैरसमज

गैरसमज  

एखादा अपघात होऊन रस्त्यावर काचा पडल्या असतील तर गाडी चालवताना त्या काचा टाळण्यासाठी उगाच त्याला वळसा घालून गाडी चालवू नये. अशा काचांवरून गाडी नेली तर टायर पंक्चर होत नाही. 

कारचा ए सी बंद चालू करून गाडी चालवली तर ऍव्हरेज चांगलं मिळतं हा एक मोठा गैरसमज आहे. कारचा ए सी एकतर कायम चालू ठेवा नाहीतर कायम बंद ठेवा. फारतर त्याचं तापमान कमी जास्त करू शकता. 

शॉवर ने अंघोळ केली असता बदलीपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं याचं मला फार अपराधी वाटायचं. 

एअरहोस्टेस याचं मराठी भाषांतर हवाईसुंदरी चूक आहे. तिला फारतर हवाई यजमानीण किंवा हवाई परिचारिका किंवा हवाईसेविका म्हणू शकतो. 

लिफ्ट ने खाली जायचं असेल तर डाऊन ऍरो दाबावा. अप ऍरो दाबून आत गेल्यावर जर वरच्या मजल्यावर कुणी लिफ्ट कॉल केली असेल तर आश्चर्य व्यक्त करू नये. 😊
हॉर्न न वाजवता गाडी चालवणं हे जितकं वाटतं तितकं अवघड नाही आहे.
क्रेडिट कार्डचे बिल आल्यावर दुसऱ्या दिवशी भरलं आणि शेवटच्या दिवशी भरलं काय, फरक काहीच पडत नाही. शेवटच्या दिवशी भरलं म्हणून खूप फायदा झाला असं होतं नाही. चुकून जर हे बिल एक दिवस उशिरा भरलं तर नुकसान जबर होतं मात्र. 😊
उन्हाळ्यामध्ये टाकी फुल करू नये. जास्त तापमानामुळे पेट्रोल उडतं आणि एव्हरेज कमी मिळतं हा एक मोठा गैरसमज आहे. 😊😊


Sunday 28 February 2021

विचाराचं क्षितिज

 

भारतातल्या अनेक मोठ्या व्यवसायाने एव्हाना दाखवून दिलं आहे की त्यांनी व्यवसायाचा आर्थिक उद्देश जरी नफा कमावणे असा ठेवला तरी त्या पलीकडे जाऊन त्यांनी त्यांच्या लोकांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विचार केला. हे केल्यामुळे ते व्यवसाय तर मोठे झालेच पण एका मोठ्या प्रवर्गाचा आर्थिक स्तर त्याने उंचावला. 

मोठ्या व्यावसायिकांची ही विचारधारा छोट्या व्यावसायिकांनी अंगिकरण्याची कधी नव्हे इतकी निकड जाणवते आहे. एम एस एम इ क्षेत्रातल्या लोकांनी आता स्वतःचा आर्थिक स्तर उंचावण्यापेक्षा त्यांच्या लोकांना त्यांची आर्थिक उन्नती तसेच एक जबाबदार नागरिक होण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं हे गरजेचं आहे. अन्यथा लोकांचं भलं करण्याच्या नावाखाली त्यांना वापरून घेणारी जमात म्हणजे भांडवलदार या व्याख्येचे आपण दुर्दैवी वाहक असू. 

जर तुम्हाला व्यावसायिक म्हणून घडवायचं असेल तर स्वतः पलीकडे जाऊन विचार करण्याची मानसिकता ठेवणं अपरिहार्य आहे. तुमच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या व्यवसायाची आर्थिक पत आणि स्तर कसा वाढवता येईल हे लक्षात ठेवून जर व्यवसाय वाढवला तर आणि तरच तुम्ही संपन्न, श्रीमंत नव्हे,  आणि तुम्ही ज्या प्रवर्गाबरोबर काम करता तो सशक्त बनण्याची शक्यता आहे. 

हे करण्यासाठी वृद्धीधिष्ठित मानसिकता ठेवणं हे भविष्यात सगळ्यांना फलदयी ठरणार आहे. थोडक्यात व्यवसायाचं प्रारूप असं ठेवायचं की कधीतरी तुम्हाला तो विकायचा आहे. भले तो तुम्ही विकू नका पण व्यवसायाला एक प्रॉडक्ट समजून असं सजवा की ती विक्रीला आहे. मग जसं आपण एखादा प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवला की त्याचं आयुष्य चांगलं असावं, तो प्रॉडक्ट चांगला दिसावा म्हणून डिझाइन करतो, त्याला मेंटेन करता यावं म्हणून काही सुविधा ठेवतो, त्या मानसिकतेने व्यवसायाकडे बघतो. समाधानी कर्मचारी वर्ग, सिस्टम आणि प्रोसेसेस, काम करण्याची जागा स्वच्छ असणे, इन्कम टॅक्स वा सेल्स टॅक्स न चुकवण्याची आर्थिक शिस्त ठेवणे, तुमच्या पेक्षा हुशार लोक व्यवसायात आणणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या निर्णयक्षमतेचे खुल्या मनाने स्वागत करणे,  या काही गोष्टी व्यवसायाला सशक्त बनवतात.

बऱ्याचदा आणि बऱ्याच जणांना असं वाटण्याची शक्यता आहे की व्यवसाय मोठे असतात म्हणून वर नमूद केलं तसं वागतात. खरंतर ते तसं वागतात म्हणून मोठे झाले आहेत. छोट्या व्यावसायिकांनी आता त्यांच्या आकार उकाराबद्दल जास्त विचार न करता आपल्या विचाराचं क्षितिज विस्तारणं, हे जास्त संयुक्तिक असणार आहे. जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण त्या संधीला सामोरे जाताना आपली सनातनी प्रवृत्ती वापरली तर शॉर्ट टर्म फायदा होईलही कदाचित पण शाश्वत व्यवसाय उभे राहणार नाही आणि आज देशाच्या उन्नतीचे आपण जे दिवास्वप्न पाहतो आहे, ते काही दशकांनंतर सुद्धा वास्तव होण्याची शक्यता नाही. 

Saturday 13 February 2021

४ फेब्रुवारी

 नासिकला सीडीओ मेरी ची वसाहत आहे. त्याच्या अलीकडे आमचं विद्युत नगर. मी सीडीओ मेरीच्या शाळेतला विद्यार्थी. त्यामुळे सर्वजण तिथले मित्र. पर्यायाने मित्रांचे आई वडील म्हणजे माझे काका काकू. काही जण मला राजेश म्हणून हाक मारतात तर काहीजण मित्रांसारखे मंडल्या म्हणून बोलावतात. नितीन कुलकर्णी किंवा राजेश गोडबोले ची आई मला न चुकता मंडल्या म्हणून बोलावते. कानाला अन मनाला फार गोड वाटतं  ते. (पॉलिटेक्निक चा मित्र मंगेश पाठक ची आई पण मंडल्या बोलावते). 

पुण्यात माझ्या शाळेतले आम्ही पाच सहा जण आहोत. भेट होत असते अधून मधून. थोडं काका काकूंबद्दल विचारतो. कधी त्यांचीही भेट झाली तर ते मला माझी, वैभवीची ख्याली खुशाली विचारतात. 

मनात विचार आला की या काका काकूंचं एक छोटं गेट टूगेदर करावं. कोविड मुळे जमत नव्हतं. आता जरा भीती कमी झाली म्हणून मग घाट घातला. कंपनीचं आवार मोठं असल्यामुळे गेट टूगेदर  तिथं ठरवलं. त्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद पण लाभतील हा एक स्वार्थ होताच. 

४ फेब्रुवारी वैभवीचा वाढदिवस. मग दिवस तोच निवडला. यावेळेस औक्षण करायला झुंबड उडाली होती. सगळे सत्तरीत, आणि काही तर ८०+ असल्यामुळे, बफे ऐवजी पंगत ठरवली. जेवणाला पण अगदी मराठी मेन्यू ठेवला. 

सगळा कार्यक्रम झाल्यावर पुढील आयुष्यभर पुरतील इतकी आशीर्वादाची शिदोरी जमा झाली. घरी आल्यावर वैभवीने विचारलं "तू सगळ्यांसमोर काही बोलला नाही". काय आणि कसं बोलणार. घशात आवंढा असताना अवघड असतं बोलणं. 

संध्याकाळ एकंदरीत हृदयगंम होती.