Monday 4 October 2021

एअर इंडिया

टाटा- एअर इंडिया वरून काही पोस्ट वाचायला मिळाल्या, म्हणून जरा लिहावंसं वाटलं.  

एव्हाना सगळ्यांना हे माहिती आहेच की भारतातील पहिले कमर्शियल विमान पायलट आहेत जे आर डी  टाटा. आपल्या कल्पक उद्योजकतेवर जेआरडी यांनी १९३२ साली भारतात एअरलाईन सर्व्हिस ची मुहूर्तमेढ रोवली. कराची ते मुंबई अशी फ्लाईट, नंतर पुढे चेन्नई पर्यंत सेवा देऊ लागली. नाव होतं त्याचं, टाटा एअरलाईन्स. 

१९४६ साली जेव्हा स्वातंत्र्याचे पडघम वाजू लागले, त्यावेळी जेआरडी  यांनी कंपनीचं नाव बदललं आणि ती झाली एअर इंडिया. त्याच वेळेस तिचे शेअर पण विक्रीला आले. 

१९५२ साली राष्ट्रीयीकरणाच्या नावाखाली नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शासनाने एअर इंडिया टेक ओव्हर केली. नेहरू आणि जे आर डी खरंतर एकमेकांचे मित्र. भांडवलशाहीचा राष्ट्रोन्नतीसाठी उपयोग करणाऱ्या जे आर डी यांनी जेव्हा नफ्याबद्दलचा उल्लेख केला, तेव्हा नेहरूंनी त्यांना सुनावलं "माझ्याशी बोलताना नफा या शब्दाचा उल्लेख करू नका. फार घाणेरडा शब्द आहे तो". त्या काळात सुद्धा जेआरडीनी नेहरूंना स्पष्टपणे सांगितलं होतं की, एअरलाईन चालवणं हे शासनाला जमणार नाही. नोकरशाही ची कीड लागली तर साऱ्या बिझिनेस वर उदासीनतेचं मळभ येईल. पण नेहरूंनी तो सल्ला सपशेल धुडकावून लावला आणि एअर इंडिया शासनाचा अंगीकृत व्यवसाय झाला. नाही म्हणायला डॅमेज कंट्रोल म्हणून जेआरडीना एअर इंडिया चं अध्यक्षपद दिलं. पुढच्या २५ वर्षात जेआरडींच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने जगभरात एक जबरदस्त एअरलाईन म्हणून नाव कमावलं. 

जेआरडीनी एअर इंडिया मध्ये प्रचंड कष्ट केले, आणि ती नावारूपाला आणली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सेट केल्या. पूर्ण एशिया मध्ये पहिलं बोईंग ७०७ आणण्याचं श्रेय एअर इंडिया चं. गौरीशंकर नाव दिलं होतं त्याला. साऊथ ईस्ट आशिया मध्ये एअर इंडियाचा चांगलाच दबदबा होता. कॅथे पॅसिफिक किंवा सिंगापूर एअरलाईन्स, इंडस्ट्री स्टँडर्डचा बेंचमार्क म्हणून त्या काळात एअर इंडिया कडे पहायच्या. आपल्या पाच पन्नास उद्योगाच्या रगाड्यात आपला ५०% वेळ जेआरडी एअर इंडिया साठी द्यायचे. नानी पालखीवाला, रुसी मोदी, जेजे इराणी, अजित केसकर, दरबारी सेठ, डी आर पेंडसे अशी बाकी व्यवसायासाठी फौज बनवणाऱ्या जेआरडी नी एअर इंडिया ची धुरा स्वतः सांभाळली, यात काय ते समजून घ्या. आर्थिक परतावा शून्य असताना सुद्धा. जेआरडी असेपर्यंत जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन मध्ये एअर इंडिया चं स्थान अग्रणी होतं. 

प्रोग्रेसिव्ह भांडवलशाहीला आपला दुश्मन समजण्याची ही जुनी खोड १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी अजून जोरकस दामटली. २१३ लोक एअर इंडिया च्या अपघातात मरण पावले. झालं ते वाईट पण मोरारजी भाईंनी त्याचा वापर केला तो जेआरडी सारख्या धुरंधर माणसाला एअर इंडिया तून अतिशय अपमानास्पद रीतीने काढण्यासाठी. कधी वेळ मिळाला तर त्याच्या दुर्दैवी कहाण्या अनेक ठिकाणी वाचायला मिळतात, त्या नक्की वाचा. जेआरडी सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला कूपमंडूक वृत्तीच्या राजकारण्यांनी दिलेली वागणूक ही भारतीय उद्योगातील अत्यंत लांच्छनास्पद घटना आहे, असं मला वाटतं. जेआरडी यांना पायउतार व्हावं लागलं. ही बातमी देताना लंडन मधील एका न्यूजपेपर मध्ये मथळा होता "Unpaid Air India Chief is sacked by Desai". आपलं मूल कुणी हिसकावून घेतलं अशी त्या काळात जेआरडी ची भावना होती. 

पुढे १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी जेआरडीना परत एअर इंडियाच्या बोर्डवर आणलं. मेंबर म्हणून, चेअरमन म्हणून नाही. १९८२ साली जेआरडीनी आपल्या पहिल्या कराची मुंबई या विमानप्रवासाची गोल्डन ज्युबिली साजरी केली, तोच प्रवास करत. ते ही  एकट्याने. प्रवास पूर्ण झाल्यावर मार्क टुली या पत्रकाराने विचारलं "शंभरावा वाढदिवस असाच साजरा करणार का?" क्षणभराचा वेळ न दवडता तो ७८ वर्षाचा  तरुण पायलट म्हणाला "का नाही, नक्कीच करणार. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे." 

कुणास ठाऊक २०३२ साली, भारतातील पहिल्या विमानप्रवासाची शताब्दी एअर इंडियाचं बोर्ड टाटांच्या नेतृत्वाखाली साजरी करत असेल हा काव्यगत न्याय असेल. आता भले भारत सरकार, एअर इंडिया टाटांच्या पंखाखाली देणार की नाही याबाबत उलटसुलट तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण पूर्ण डबघाईला आलेल्या एअर इंडिया चा जुना दैदिप्यमान इतिहास परत अनुभवायचा असेल तर टाटा या उद्योगातील मेरूमणीच्या हातात त्याची धुरा देणं हे अत्यंत संयुक्तिक धोरण असणार याबाबत शंका नाही. 

जाता जाता: जेआरडींचा अपमान केला म्हणून आता एअर इंडिया काहीही करून घ्यायचीच असं काही नसणार आहे. शेवटी हा अनेक वर्षे चालवायचा व्यवसाय आहे. त्यात आर्थिक गणितं सुटत असतील तरच त्यात टाटा गुंतवणूक करतील, हा साधा सरळ हिशोब आहे. 

राजेश मंडलिक 

(सदर लेखक हे लघुउद्योजक असून प्रोग्रेसिव्ह भांडवलशाही चे मायक्रो प्रतिनिधी आहेत. राजकीय किंवा एअरलाईन उद्योगाचे अभ्यासक अथवा विश्लेषक नाही आहेत)


संदर्भ: शशांक शहा, हरीश भट, आर एम लाला, गिरीश कुबेर यांची टाटा ग्रुप बद्दलची पुस्तके. 


No comments:

Post a Comment