Monday 29 September 2014

भाषण

२००५ मधे मी नवीन सोसायटीत रहायला आलो. तिथे चेअरमन म्हणून, किश्शापुरतं त्यांचं नाव सावंत ठेवू, तर सावंतांची निवड झाली. सावंत इतर वेळेस आम्हाला impress करण्यासाठी काहीच्या काही dialogue मारायचे. "माझी मर्सिडीज़ येणार आहे" "माझे यंव फ्लॅट आहेत" हे स्वंत:बद्दल. सोसायटीबद्दल ही जबरी कल्पना असायच्या त्यांच्या
"सगळ्या सोसायटीत CCTV camera लावून टाकू" "सोसायटीत सर्व काॅर्नरला attendance system लावू. वाॅचमन वर लक्ष ठेवण्यासाठी" "कामावर येण्यार्या सगळ्या बायकांचे fingerprints करून घेऊ" "सोसायटीला auto barricade लावून घेऊ, आणि प्रत्येक वाहनाला bar code लावू. गाडी आली की दांडकं वर" "सोसायटीचे हिशोब ठेवायला लॅपटाॅप घेऊन टाकू" एक ना अनेक. सालं आम्ही पण एकदम येडे झालो होतो त्यांच्या एक एक आयडिया ऐकून.

दिवस सरू लागले. सावंत जे काही बकले, त्यातलं काहीच होईना. उलट नवीन सोसायटीत लिफ्ट बंद पडू लागली. पाण्याची बोंब व्हायला लागली. आमची सोसायटी जरा काॅस्मो आहे. बोहरी लोकं जास्त आहेत. त्यांच्याबरोबर बाकी लोकांची भांडणं व्हायला लागली कारण सावंत काहीतरी काड्या लावायचे. सावंतांची मनमानी पण फार वाढली. जो डायसच्या पोरांचे मित्र खेळायला यायचे, त्यावरून सावंत आणि जो ची भांडणं व्हायला लागली.

आम्हा बर्याच लोकांना त्यांचं वागणं पटायचं नाही. काहीवेळेस तर टाळकं सटकायचं, कारण सावंत फक्त बोलायचे, कामाच्या नावाने बोंब.

१५ आॅगस्ट आला. झेंडावंदन झाल्यावर, चेअरमन म्हणून सावंत बोलायला लागले. तीच परत टूरटूर चालू झाली. सोसायटीचं income वाढावं म्हणून त्यांनी अजून दोन मोबाईल टाॅवर सोसायटीच्या टेरेसवर लावण्याचा प्रस्ताव ठेवला आणि हसत हसत म्हणाले "एक वेळ अशी येईल ना, इतके income source आणेल की तुम्हाला सोसायटीचा मेंटेनन्स द्यावा नाही लागणार तर सोसायटी तुम्हाला दर सहा महिन्याला पैसे देईन."

माझ्या डोक्यात तिडीकच गेली. तिरमिरीत अनाहूतपणे मी ओरडलो "आधी ज्या कल्पना मांडल्यात, त्याबद्दल बोला. नंतर बाकीचं बघू"

काल ७ रू प्रति किमीने मंगळयान पोहोचल्याबद्दलचा हसत बालिश विनोद ऐकला, तेव्हा तशाच तिरमिरीत tv channel बदलले आणि Zee tv चा पिक्चर "टाईमपास" बघू लागलो. मेडिसन स्क्वेअर च्या टाईमपासपेक्षा तो बराच sensible आणि सुसह्य होता.
*******************************************************************************

ता क: मी आधीचं एकही भाषण ऐकलं नाही, काही प्रतिक्रिया वाचून वाटायचं की आपण फार काहीतरी मिस केलंय. काल वाटलं, असंच असेल तर बरंच झालं, ऐकलं नाही ते.

कुठल्याही राज्यकर्त्याबद्दल मला आदरंच वाटतो. कारण राज्य करणे हे अवघडंच, जाणीव आहे मला. सिरीयसली खूप कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला, पण अजूनतरी नाही जमलं. जमेलही कदाचित.

अमिताभ गुजरातचे ब्रँड अँम्बेसेडर आहेत. बाकी त्यांनी गुजरातला काय दिलं माहित नाही, सरांच्या देहबोलीत अमिताभची झाक दिसते.

माझे काही प्रत्यक्ष जगण्यातले मित्र मला हसतात, रागावतातही. त्यांना अन फेसबुकवरच्या माझ्या काही आवडत्या मित्रांनाही नम्रपणे सांगतो, की मैत्रीचे आपले ३५ गुण जुळले आहेत, एक जुळला नाही तर फार फरक पडू नये. आणि हो समर्थन द्या, पण त्यांना पितृत्व अन देवत्व नका देऊ. हृद्यात जागा द्या, पण मेंदूत नका देऊ.

असो. लोभ असावा. 

Thursday 25 September 2014

मंगळ यानाच्या निमित्ताने

भावांनो, आधीच सांगतो ते मंगळावर यान गेल्यावर काय मिळणार, त्याचा फायदा काय याबाबतीत आपल्याला काही म्हणजे काहीच माहित नाही. पण विज्ञानाच्या दृष्टीने काहीतरी भन्नाट झालंय हे नक्की. मुलभूत संशोधनाला पण महत्व प्राप्त झाले हे पाहून, ऐकून आनंद झाला.

पण आपण असे भारी कि तिथंही वाद प्रतिवाद झाले. काहींच्या तर वाटेला न जाण्या इतके तकलादू मुद्दे होते, पण एक वाद वाचला. एक ज्येष्ठ फेसबुक मित्र यांनी टाटा अंबानी याचं नाव घेऊन विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल लिहिलं. झालं, एकमेकांची अक्कल निघाली, शेलक्या शिव्या झाल्या. काहींना टाटा नाव लिहिलं म्हणून मिरच्या लागल्या तर अंबानींच नाव लिहिलं म्हणून उकळ्या फुटल्या. माझ्या मते त्यांना संशोधनाबद्दल म्हणायचं होतं. तर मला नाही वाटत आपल्या इथे कुठल्याही गोष्टीवर मुलभूत संशोधन होतं म्हणून. अर्थात अपवाद असतात. पण जगाच्या मानाने एकंदरीत कमीच. आणि ही आजची गोष्ट नाही हो. सांगा बरं गेल्या ६००-७०० वर्षात भारतात काय शोध लागले हो. तर आठवावे लागतील. "विज्ञान जिथे संपते, तिथे अध्यात्म सुरु होते" असलं काहीतरी वाक्य टाकून विज्ञानाधिष्ठित ज्ञानाची बोळवण आपण कित्येक शतकं करत आलो आहे. विज्ञान किंवा संशोधन हा विषय निघाला कि आपण लागलीच ४-५ हजार वर्ष मागे जाऊन "पुष्पक विमान" "बाण म्हणजे क्षेपणास्त्र" "शुन्य आम्ही दिला जगाला" असली काहीतरी इतिहासाला कुरवाळणारी वाक्यं फेकत असतो. मध्ये तर सॉलिड ऐकलं "ते वानारसेनेचा फुगलेलं तोंड म्हणजे oxygen चा मास्क आहे आणि मागचा बाणाचा भाता म्हणजे सिलिंडर" शिशुपालाच्या मागे लागलेलं सुदर्शन चक्र म्हणजे drone attack. मेलो हसून. ते बत्रा काय बकले "कौरवांचा जन्म stem cell technology तून झाला म्हणे. मेडिकल विषय निघाला कि आपली गाडी थेट चरक, सुश्रुत नाही तर भृगु ऋषीपर्यंत जाऊन थांबते. नाही म्हणजे असेलही कदाचित पण त्याचं किती कौतुक. आत्ता काय ते बोला ना दादा. च्यायला १५० वर्षापूर्वीच्या आपल्या खापर पणजोबाचा नाव नाही आठवत आपल्याला आणि कुठे या ५००० वर्षापूर्वीच्या गोष्टींची ऐट झोडायची.

हि ISRO, NCL, TIFR, TISS, IIT, Dr Reddy किंवा Ranbaxy आणि काही बोटावर मोजण्या इतक्या संस्थेत संशोधन चालतं हो. बाकी आनंद आहे. कुठेतरी develop झालेल्या गोष्टी एकत्र करून त्याला commercial apply करून लोकाभिमुख करणे हे उद्योजकाचं काम. आणि ते टाटा, अंबानी, बिर्ला आणि अनंत उदयोजक इमाने ऐतबारे करत आले आहेत. आणि त्यात काही चुकीचं नाही आहे. ते लागणारच. हो, नुसतं संशोधन करत बसले आणि त्याचा मानवजातीला काही उपयोग नाही तर काय चाटायच ते संशोधन. अहो हि छाती दडपवणारी श्रीमंती दाखवणारी आणि वीस बावीस वर्षाच्या पोरात २५००० रु खूळखूळवणारी भारतातली  IT Industry, काय basic research होतं हो तिथे. Microsoft, Intel, Google, Cisco, Oracle   सारख्या कंपन्या संशोधनाचं काम करत असाव्यात आणि ते जगापुढे आणण्याचा काम Infosys, TCS, Wipro करत असाव्यात असं मला पामराला वाटतं.

जर्मनीत एक Fraunhofer Institute म्हणून भन्नाट प्रकार आहे. Private industry आणि जर्मन govt मिळून basic research तिथे sponsor होतं. लागलीच आठवेल तर MP ३ कि pendrive त्याचं बाळ आहे. आमच्या मशीन टूल मधील तर अनेक development तिथे होतात आणि मग जी sponsor कंपनी आहे ती commercialize करते. उगाच नाही जर्मन मशिन्स बघून आपण तोंडात बोटं घालत. इनमिन महाराष्ट्रा एवढया देशात तब्बल २६ Fraunhofer Institutes आहेत.

२०१० ला मिशिगन युनिवर्सिटी त जायचा सुदैवी योग आला होता. प्रोफ मुझुमदार यांना भेटलो होतो. ते additive manufacturing या विषयावर संशोधन करत होते. म्हणजे थोडक्यात सांगतो. आपण बहुतेक machined पार्टस हे material removal पद्धतीने बनवतो. बार असतो, त्याला turning, मिलिंग असे ऑपरेशन करून पार्ट तयार होतो. त्या ऐवजी इथे direct मटेरीअल add करत जायचं लेसर सोर्स नि आणि पार्ट तयार करायचा. सांगायची गम्मत म्हणजे युनिवर्सिटी ने त्यांना परवानगी दिली होती कि बाहेर कंपनी काढा आणि या संशोधनाचं commercialization करा म्हणून.

Research आणि तिथंच त्याचं commercial application अशी उदाहरणं आपल्या देशात असतीलही कदाचित पण जरा विरळ.

तेव्हा मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या संशोधनाला लोकाभिमुख स्वरूप देण्याचं काम उदयोजक करतो आणि ते भारतात उदंड आहेत, ते मग काही ठिकाणी विकत घेतात, कधी मिळालेल्या संशोधनाला expand करतात तर कधी reverse engineering (याला प्राकृत भाषेत चोरी म्हणतात) करतात. पण मुलभूत संशोधक मात्र जगाच्या मानाने कमी. पण त्यात वाईट वाटण्यासारख काही नाही कारण ती कित्येक शतकाची pathology आहे. तेव्हा ह्या rare जमातीपैकी काहींनी मिळून मंगळ यान पोहोचवलंय तेव्हा त्यांचं खुल्या मनानं अभिनंदन करू यात. त्याच्यावर कुठे वाद घालायचे. वाद घालण्यासाठी आपले आवडते विषय आहेत कि, जात आहे, धर्म आहे, राजकारण आहे. "नाहीतर लिहितो "सावरकर हे द्रष्टे नेते होते" चला, चघळू कि ते मजेत.

(सदर लेखाचे लेखक हे अतिशय झिन्गुर असे  उदयोजक आहेत आणि त्यांनी हा लेख अभ्यास न करता फक्त स्वानुभवावर लिहिला आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. उद्योजकांना संशोधक संबोधून त्यांच्या पोटावर पाय देण्याचा आणि संशोधकांच्या मेंदूला हीन लेखण्याचा प्रयत्न त्यांना सहन न झाल्यामुळे पोटतिडकी पायी हा लेख पडला आहे. चूभू देघे)



 मंगळ यानाच्या निमित्ताने

Wednesday 24 September 2014

मज्जानू लाईफ़

- माझी बॅग रेल्वेच्या कुठल्याही क्लासमधून कधीही चोरीला गेली नाही आहे, अगदी सेफ़्टी चेन न लावता. .

- १९९४-२००० ही सहा वर्षं मी मुंबईत लोकलनी बेफाम प्रवास केला आहे. सेकंड क्लास अन first क्लास ने. त्या बेधुंद गर्दीत माझं ना कधी पाकीट चोरीला गेलं ना घड्याळ

- घराच्या बाहेर shoe rack आहे. चपला़, बूट बाहेर असतात त्यामधे. पण कधीही ते चोरीला नाही गेलंय. म्हणजे कुलुप न लावता.

- कर्वे रोड, फ़र्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड इथे मला कधीही पार्किंग साठी झगडावं नाही लागत किंवा लांबवर गाडी लावून तंगडे तोड नाही करावी लागत.

- मी लिफ्टमधे अन लाईट गेली. जनरेटर ही चालू  होत नाही, असं कधीही घडलं नाही आहे.

- जवळच्या मित्राचा फोन आला की कितीही बिझी असलो तरी फोन घेतो आणि आस्थेने त्याला विचारतो अन मग सांगतो "बिझी आहे, नंतर फोन करतो" मग आठवणीने फोन करतो आणि मनसोक्त बोलतो, त्यांचे काही प्राॅब्लेम असेल तर ते solve ही करतो. आणि मग त्याला कधी फोन केला तर "is anything urgent" किंवा फोन उचलल्यावर "I am busy in meeting, call me after some time" असं हलकटपणे बोलणारे मित्रही मला नाही आहेत.

- माझ्याच जीवावर उंच उड्या मारून परत मलाच शहाणपणा शिकवणारे अगदी कुणीच नाही आहे. आणि त्यांनी मला फसवलं ही नाही आहे.

अरे वा, सर्वार्थाने मी सुखी आहे असं तुम्हाला वाटलं ना! तर नाही नाही, माझ्यासोबतही या सर्व गोष्टी घडल्या आहेत. मला दोन चाॅईस होते. एकतर मी हे आठवून जीवाला त्रास करून घ्यायचा किंवा सगळं विसरून आनंदी जगायचं. मी दुसरा पर्याय निवडला.

मज्जानू लाईफ़!! 

Tuesday 23 September 2014

वाहन उद्योग

- Vision without execution is just hallucination.

- Obstacles are those hurdles you see when you take off eyes of your goal

कसली वाक्य आहेत ना मस्त. हेन्री फ़ोर्ड ची. आज फोर्डच्या चेन्नई प्लांटमधे वाचली. हे जगभरातले automobile plants प्रगतीचे द्योतक आहेत. मी गेल्या २० वर्षांपासून वाहन उत्पादन करणार्या कंपन्यांना visit करतोय. त्यांनी या काळात केलेली प्रगती स्तिमीत करणारी आहे. कुठल्याही देशाची manufacturing industry ही automobile industry वर अवलंबून असते हे निर्विवाद. अमेरिकेचं सुद्धा आजचं श्रीमंत रूपडं आणण्यात या इंडस्ट्रीचा मोठा हातभार आहे हे सगळे जाणतात. नंतर मग जापानी कार उत्पादक आले, त्यांनी ज्यावर राज्य केलं आणि आता कोरियन कंपन्यांनी मुसंडी मारली आहे.

भारतात एकेकाळी वाहन उत्पादक आणि त्यांना पार्ट supply करणार्या कंपन्या म्हणजे आनंद होता. अस्वच्छता, शाॅपफ्लोअर वर आरडाओरडा, कुलंटचा विचित्र वास (माणसाच्या अंगातूनही), बकवास कँटीन आणि तिथलं खाणं, कमी पगार असं काहीतरी gloomy चित्र होतं. (टाटा अपवाद). पण मग जापानच्या टोयोटाने "the Toyota way" या पद्धतीने या कंपन्यांची काम करण्याची पद्धती बदलून टाकली. 5 S ने चालू होणारी कार्यप्रणाली ही पार business excellence पर्यंत आली आणि या कंपन्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. Just in time, zero inventory, Kaizen, Pokayoke, total predictive maintenance या वेगवेगळ्या पद्धतींमुळे कंपनींच्या गुणवत्तेबरोबरच तिथे काम करणार्या माणसांचा ही विकास होऊ लागला. Water conservation, energy saving या गोष्टींचा अंगीकार केल्यामुळे natural resources चा जपून वापर करण्याची लोकांना सवय लागली. या सगळ्यांचा परिपाक वाहनांच्या अत्युच्च गुणवत्तेमधे झाली. आज तुमची गाडी व्यवस्थित मेंटेन केली तर धोका देण्याची शक्यता कमी. सँट्रो, स्विफ्ट आणि एटिआॅस मिळून ३३५००० किमी कार चालवली आहे. एकदा बंद पडली आहे. तुमचा अनुभव यापेक्षा वेगळा नसणार आहे.

मी गेले १०-१२ वर्षांपासून चेन्नई ला येतो आहे. ह्युंडाईने इथल्या वेंडर लोकांना ppm rejection मोजायची सवय लावली. Ppm म्हणजे parts per million. १०० त एक पार्ट reject झाला तर त्याचा ppm किती झाला तर १०००० ppm. मी यायचो तेव्हा १००० ppm चालायचं, मग ५०० झालं, मग १००, ५० आणि आता तर इथल्या कंपन्या ० ppm वर काम करत आहेत. म्हणजे १० लाख पार्ट मधे एक पण rejection नाही. खायची गोष्ट नाही दादा. आणि आता तर ही मंडळी parts per billion (ppb) वर काम करत आहेत. (वाचा हो कोटी प्रणाम आणि शुभेच्छा़ वाले).

आज भारतातल्या सर्व कंपन्या या प्रगतीचे साक्षीदार आहेत. टाटा, बजाज आॅटो, मारूती, महिंद्रा,  टीव्हीएस यांची २० वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची अवस्था यात ज़मीन असमानाचा फरक आहे. बजाज चा चाकणचा प्लांट हा एखाद्या पंचतारांकित हाॅटेलपेक्षा काही कमी नाही. ह्युंडाई, फियाट, GM, Ford, Renault हे तर तसेही नवीन प्लांट. ते तर मस्तच आहेत. सगळ्यांच्या कँटीनचा दर्जा बर्यापैकी सुधरला आहे. चांगल्या सवयींचा तिथे वारंवार उल्लेख केला जातो. कमी खा, अन्न वाया घालवू नका. TVS मधे स्वत:च ताट धुवावं लागतं. आज Renault Nissan मधे पाटी पाहिली, today's waste food: 65 kg can serve 110 people. तुम्ही आता यांचे employees पण बघा, एकदम चकाचक असतात.

आज कुठल्याही कंपनीत जा, shop floor एकदम स्वच्छ. मशीन शेजारी बसून जेवा ना, प्राॅब्लेम नाही. सगळ्या गोष्टी जागच्या जागी. फोन, वाटर कूलर, फोर्कलिफ्ट पार्किंग सगळ्या गोष्टींचं marking. Temple of manufacturing excellence वैगेरे गोष्टी अशा लिहीतात ना की वाचल्यावर अंगात positive energy खेळायला लागते.

बजाज आॅटोने औरंगाबाद ला learning centre काढलं आहे. उद्देश काय तर, बजाजचे सर्व प्लांटचे तसेच त्यांच्या suppliers च्या मेंटेनन्स च्या लोकांना मशीनचं बेसिक knowledge मिळावं. आहे की नाही भन्नाट.

माणसामधे Technical skills बरोबरच social values चा अंगीकार करायला शिकवणार्या वाहन उद्योगाला आपला एकदम कडकडीत सलाम.............दिलसे

पुढच्या जन्मी इंजिनियर व्हावं आणि कुठल्यातरी चांगल्या Automobile कंपनीत काम करायला मिळावं. (एक दोन भंगार आहेत अजूनही, नाव काही घेत नाही त्यांचं) 

Thursday 18 September 2014

अंघोळ

अमेरिकेत तैवानीज रूम पार्टनर होता. बेकार घोरायचा. म्हणजे ह्यात रिजन्सी ची अफलातून रूम. पण रात्रभर त्या गुबगुबीत गादीवर मी रात्रभर तळमळत होतो. दुसर्या दिवशी ear plugs दिले तेव्हा कुठे झोप लागली.

रात्री या फेंग ने shower घेतला. मला विचारले "तू नाही घेणार shower रात्री" मी बोललो "नाही" सकाळी मी उठलो तर हा पठ्ठया शर्ट pant वैगेरे घालून मस्त रेडी. संवाद पहा

मी: काय रे भौ, आंघोळ नाही करणार

फेंग: रात्री केली कि आता नाही

मी: मला सकाळीच आंघोळ करावी लागते. तुझी काय हि भंगार पद्धत आहे

फेंग: तुझी पद्धत बेकार.

मी: कसं?

फेंग: तू दिवसभर काम करतोस. घाम गाळतोस. मळून घरी येतोस. मग अंघोळ नको करायला. रात्री त्याने झोप चांगली लागते.

मी: अरे पण सकाळी अंघोळ तर करायला पाहिजे ना!

फेंग: पण का? मी रात्रभर बेड मध्ये असतो. काही कष्ट असतात का? नाही. मग सकाळी कशाला पाहिजे अंघोळ.

मी: (गमतीत) म्हणजे तू रात्री कधी कष्ट नाही करत?

फेंग: (डोळे मिचकावीत) जेव्हा कष्ट करतो तेव्हा सकाळी अंघोळ करतो ना

मी: अरे पण सकाळी देवदर्शन वैगेरे.

फेंग: म्हणजे?

मी: अरे देवाला नमस्कार

फेंग: नाही, आम्ही नाही करत तसलं काही. आणि समजा केला नमस्कार तर काय?

मी: अरे असं कसं. झोपेतून उठल्यावर देवाला नमस्कार करताना अंघोळ केलेली असावी

फेंग: तू असं समज. तू सकाळी अंघोळ केलीस. दुपारी १२ ला झोपलास आणि मग संध्याकाळी उठलास सात वाजता. मग काय देवदर्शन करत नाहीस का? हे सगळे आपले समज असतात. जेव्हा फ्रेश वाटायला पाहिजे तेव्हा अंघोळ. मला रात्री वाटतं, तुला सकाळी बस! बाकी सब बकवास

तोंडात मारल्या सारखं गप्प बसलो. काय करणार मग!! अंघोळ केली त्याच्या नावानं.

Tuesday 16 September 2014

America Diary

आज काल मी सहसा कुत्सित हसत नाही, म्हणजे तसा प्रसंग येत नाही. पण परवा आला. शिकागोत रात्री जेवायला चाललो होतो. Taxi, oh sorry हं, cab मधे मागे दोघं आणि मी समोर ड्रायव्हर च्या शेजारच्या सीटवर मी. गोरा होता ड्रायव्हर. मी थोड्या गप्पा मारल्या. उतरताना त्याने प्रश्न विचारला
"Are you from Pakistan"?
No, I am from India म्हणताना उगाचंच हसलो.
काय करणार या पाकिस्तानने स्वत:ची इतकी वाट लावून ठेवली, की त्याचा नागरिक...
जो है सो है!
****************************************
ब्रझिलियन अन मेक्सिकन दिसायला थोडे आपल्यासारखेच आहेत.
अन वागायलाही..................येडचाप
*******************************************
आम्ही पण भरपूर exhibition मधे participate करतो. इंजिनियरिंग काॅलेजचे खूप स्टुडंटस् बूथवर visit करतात. मी त्यावेळेस त्याच्याशी फारंच तुसड्यासारखा वागतो. त्यांनी काही प्रश्न विचारले की यांना काय समजणार या भावनेने वेळ मारून नेतों. मी असा शहाणपणा दाखवतो की स्पिंडल रिपेअर करण्याचं स्किल मला जन्मापासूनंच आहे जणू.
आज इथे इंजिनियरिंग स्टुडंटस् अमेरिकेच्या exhibition मधे आले होते. त्यांच्या बॅजवर काय लिहीलं ते बघितलं, Future Customer. हो, भावी ग्राहक. कसलं समर्पक आहे ना. Mind your language, he is your potential customer इतकं सगळं ध्वनित होतं. मान गये.
दुसरा फोटो आहे तो एक पन्नाशीचा हुशार automobile engineer चा. आलेल्या चिल्ल्यापिलांना तो गाडीचे principles सहज समजावून सांगत होता. न कंटाळता.
हे असं आहे. पुढची पिढी असं घडवायची ना, ती अशी घडवायची असते, राजा. नुसत्या फुकाच्या गप्पा झोडून नाही.
तेव्हा जानेवारी २०१५ ला Imtex exhibition आहे. Engineering students........You are welcome. You will be given due respect and attention.
आपलं resolution. आणि हो resolution, new year चं असायला पाहिजे असं कुणी सांगितलं.
********************************************************************

मी प्रदर्शनाच्या बूथ वर आलो. हातात ऑफिस ची bag होती. त्यात पासपोर्ट होता. आता परदेशात पासपोर्ट म्हणजे जीव कि प्राण. एक वेळ पैशाचे पाकीट हरवलं तर चालेल पण पासपोर्ट. अं हं. मी जो ला म्हणालो "मला ही ब्याग सुरक्षित ठेवायची आहे कारण त्यात पासपोर्ट आहे." जो म्हणाला "हो बरोबर, चुकून कुणी त्याची इथे ठेवून त्याच्यासारखी म्हणून तुझी उचलून घेऊन जायला नको"
मला खरं तर bag चोरीला जाण्याची भीती होती, जी जो च्या गावीही नव्हती. त्याच्या बोलण्यातून जाणवलं सुद्धा "bag उचलली तर नजर चुकीने"
कसले असतात ना हे अमेरिकन, बावळट  कुठले.
************************************************************************

शिकागो हून डेट्रोइट ला जाताना मोटरसायकल स्वार दिसला हार्ले डेविडसन वर . लेकाच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं. मी बिल ला म्हणालो "अरे, इथे हेल्मेट कंपलसरी नाही" तो म्हणाला "नाही, या स्टेट मध्ये पूर्वी सक्ती होती. पण लोकं भांडले शासनाशी. शेवटी कंटाळून सक्ती उठवली"

थोडक्यात हेल्मेट न वापरण्याचा हट्ट करणारे बावळट लोकं जगात सगळीकडेच असतात, मग ते पुणं असो कि शिकागो.
*****************************************************************************




इंजिनियर्स डे

तसं म्हंटलं तर मी स्वत:ला हाडाचा इंजिनियर समजतो. (अरे, हाड़ हाड़ कोण म्हणतंय) (माझी बायको मात्र हाडाची डाॅक्टर नाही तर ती pathologist आहे अशी दळभद्री कोटी करण्याचा अनावर मोह झाल्यामुळे मुळ पोस्टमधे न लिहीता कंसात लिहीतो). पण त्यामुळेच असेल पण डाॅक्टर्स डे चा जेवढा बोलबाला फेसबुकवर झाला तेव्हढा इंजिनियर्स डे चा नाही झाला असं मला वाटलं. तेव्हा आपलाच डंका आपणच वाजवावा. असो.
परवाच WhatsApp वर इंजिनियरचे गुण म्हणून एक मेसेज आला तो बहुधा college going engineer चा असावा. स्वत:ला अभियंता जमातीचा प्रतिनिधि समजत असल्यामुळे मग मी माझे खालीलप्रमाणे अवगुण लिहीले. मला असं उगाचच वाटतं की ते सर्व इंजिनियर ला लागू असावे.
१) jack of all, master of none ही म्हण पहिला इंजिनियर जेव्हा तयार झाला, तेव्हा प्रचलित झाली असावी.
२) इंजिनियरला कामावरून सुट्टी घेणं म्हणजे पाप वाटतं.
३) इंजिनियरला ५००० रू चा सुट किंवा २०० रूपयाची बनियन घ्यायला सारखाच वेळ लागतो.... ५ मिनीटे
४) इंजिनियर कंपनीच्या कामाला एकाच स्थितप्रज्ञतेने जातो, मग ते स्वित्झर्लंड असो वा मालेगाव.
५) इंजिनियर आर्थिक व्यवहारात मुर्ख असतो.
६) "काय रे अभ्यास केला का?" पोराला इतकं विचारलं म्हणजे बाप म्हणून कर्तव्य पूर्ण झालं असं इंजिनियर मानतो.
७) दात घासण्याचा ब्रश सोडून बाकी ब्रश वापरायला फारसं आवडंत नाही उदा: दाढीचा, शू पाॅलीश आणि रंगाच्या ब्रशशी त्याची विशेष दुश्मनी.
८) इंजिनियरचा कामाचा टेबल हा भरलेला असेल तरच तो काम करतो असं त्याला स्वत:ला वाटत असतं.
९) इंजिनियरला कपडे अंग झाकण्यासाठी, खाणं पोट भरण्यासाठी आणि ड्रिंक्स (घेत असेल तर) डोक्याला मुंग्या येण्यासाठी आहे इतकंच माहित असतं. थोडक्यात त्याला color plus आणि Peter England, ऊँची lobster आणि prawns किंवा glenfidich आणि royal stag यांच्यातील किंमतीच्या फरकाशिवाय दुसरं काहीच कळत नाही.
आणि काडी लावणारा शेवटचा मेसेज. हा मला माझा फेसबुकवरचा प्यारा दुश्मन अनिकेत यांनी पाठवला.
१०) इंजिनियर परदेशी टूरवर बायकोला घेवून जात नाही. एकवेळ तो टूर कॅंसल करेल, पण .....
इंजिनियर असून यामधील एकही गूण नसेल तर तो अपघातानेच या profession मधे आला असावा.
ता.क. सदर गुण हे फक्त पुरूष इंजिनियरचेच आहेत.
तेव्हा सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा. (इथे स्त्री अभियंतापण)

Sunday 14 September 2014

हार्दिक शुभेच्छा़

साधारणत: कंपनी चालवताना customer delight बरोबर, employee satisfaction आणि supplier happiness हे बघणे महत्वाचे असते. (चला हवा येऊ द्या, शहाणपणा पुरे). अहो असे रागवू नका. पुढे जे लिहीणार आहे त्याला थोडा याचा संदर्भ आहे म्हणून. तर सांगत होतो, की एकदा आमची कंपनी कुणा सप्लायर बरोबर connect झाली की सहसा संबंध माझे तुटत नाही. अगदी कंपनी चालू झाल्यापासून माझे तेच vendor आहेत.

तर लेखापुरते त्याचं नाव सतीश ठेवू. सतीशची स्वत:ची कंपनी.  पण अतिशय अस्ताव्यस्त. Disorganized. आमची कंपनी त्याला एक काम offload करायची. मशीनवरून स्पिंडल काढायचा, मग आम्ही रिपेअर करणार, सतीशच्या कंपनीचा माणूस तो लावणार. डील एकदम सोपं. Removal and fitment ची आम्हाला ज्या value ची order मिळेल त्याच्या ७०% पैसे आम्ही सतीशला देणार. व्यवस्थित चालू होतं. त्याचं कामही ठीकठाक.  पेमेंट पण एकदम वेळेवर. बाकी बरेच जण त्याला टोपी लावायचे, पण आम्ही त्याला बोलावून त्याचं account settle करायचो. सगळं बरं होतं पण transaction मधे आनंद नसायचा, समाधान नसायचं.

सतीशकडे एक प्रसाद नावाचा हुशार मुलगा होता. त्याने काही कारणाने साडेतीन वर्षापूर्वी सतीशची कंपनी सोडली. लागोलाग माझ्याकडे आला. म्हणाला

प्र: मी स्वत: काम चालू केलंय, मला काम द्या
मी: अरे तुला माहित आहे, आमचं सतीशकडे contract आहे
प्र: मी त्यांच्या पेक्षा स्वस्तात करेन.
मी: प्रश्न पैशाचा नाही आहे. मी अनेक वर्षापासून सतीशला associate मानतो. केवळ दोन पैसे कमी पडतात म्हणून मी काही सप्लायर बदलणार नाही. हाँ, सतीशकडून जर ethically काही चूक झाली तर मी नक्की तुला बोलवेल.

प्रसाद नंतर येत राहिला, वेगवेगळी कामं आणत राहिला.

इकडे सतीश स्वत: स्पिंडल रिपेअर करतो असं मार्केट मधून कळलं होतं. आम्ही त्याला म्हणायचो "अरे, आम्ही जसं तुला काम देतो, तसं तुला जर कुठलं काम मिळालं, तर रिपेअर आमच्याकडे कर" सतीश हसण्यावरी न्यायचा. वर्षापूर्वी कळलं की सतीश आता आमच्या call वर गेला तरी कस्टमरला सांगायला लागला की तोही स्पिंडल रिपेअर करतो. सांगायचा की मंडलिकला बोलू नका. मी तरीही गप्प बसलो. इतके दिवस कामाचा उरक मस्त होता त्याचा. आता तिथेही गडबड व्हायला लागली.

दोन महिन्यापूर्वी हाईटंच झाली. कस्टमर आला मुंबई हून. काम झाल्यावर जाताना त्याने सतीशचं कार्ड दिलं अन brochure. "Superior Technical Services" Brochure पुर्ण आमचंच ढापलं होतं. आता मात्र माझं टाळकं सटकलं.

प्रशांतला फोन केला. म्हणालो "तुला बोललो तशी वेळ आली आहे. सतीशने business ethics ला तिलांजलि दिली आहे. मी त्याचे calls तुझ्याकडे वळवतो" तोही एका पायावर तयार झाला. आमचं काम uninterrupted चालू झालं.

सतीश, तु मोठा होशीलही. पण हे करताना थोडं तत्वानं वागलास तर बरं होईल. आता म्हणजे काय तर बिझीनेस करण्यापासून मी तुला परावृत्त करू नाही शकत, पण तु मला सांगायचं की मला माझं महत्वाचं, तुम्ही दुसरा माणूस बघा.

असो, हार्दिक शुभेच्छा़ 

Saturday 13 September 2014

HMT


HMT घड्याळ बनवणारी कंपनी बंद पडली अशा पोस्ट वाचल्या. HMT म्हणजे Hindustan Machine Tools. सामान्य माणसाला ती घड्याळामुळे माहिती. पण खरंतर हे मशीन टूल मधील अग्रगण्य नाव. नेहरूंनी manufacturing सेक्टरचं महत्व ओळखलं आणि ज्या काही उद्योगांना प्रोत्साहित केलं, मशीन टूल हे त्यापैकी एक. अन HMT हे अाघाडीचं नाव. नवलखा पैकी एक. बंगलोर, हैदराबाद, पिंजोर, अलवर याठिकाणी हज़ारों एकरमधे वसलेलं. जगातल्या उत्तमोत्तम मशीन्स, technical collaborations, world class infrastructure यांच्या सहाय्याने HMT ने भारतात मशीन टूल व्यवसायाची मूहुर्तमेढ केली, तो व्यवसाय वृद्धींगत केला. आज बंगलोर मशीन टूल व्यवसायाचं भारतातील हब आहे आणि बहुसंख्य technocrats हे HMT च्या मुशीतून तयार झाले आहेत यातंच काय ते आलं. आणि मग त्यातून पुढे HMT ट्रेक्टर आणि घड्याळ्यांचा उद्योग आला. पण ते auxiliary business, मूळ उद्योग मशीन बनवणे.

माझ्या मते १९८५ परत HMT ने आपली पत टिकवून ठेवली होती. पण मग नंतर Fiat आणि Ambassador प्रमाणे त्यालाही उतरती कळा लागली. बदलत्या परिस्थितीला सामोरे न जाता आपल्याच मस्तीत मश्गुल राहण्याचा मुर्खपणा जगभर दिसतो, HMT त्याला अपवाद नाही. राजवाडे, खंडहर झाले, जमिनी बंजर झाल्या. HMT तरीही संस्थानिक राहिले. जागा बिल्डरांना विकून उद्योग तगवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे. भविष्य सगळ्यांना माहिती आहे. कधी अन केव्हा हाच प्रश्न आहे. बातमी वाचायची बास!

हे कितीही खरं असलं तरी Indian Machine Tool Manufacturing च्या development मधे HMT चा सिंहाचा वाटा आहे हेही तितकंच खरं. IMTMA (Indian Machine Tool Manufacturer Association) ही संस्था आज या उद्योगाला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि तिथले कित्येक पदाधिकारी HMT तून काम करून आलेले आहेत यावरून HMT चं महत्व अधोरेखित होईल.

मशीन टूल चा आपला बिझीनेस $1 billion चा आहे तर चायनाचा $ 30 billion. यावरून potential ची कल्पना येईल. मेकॅनिकल किंवा तत्सम इंजिनियर होऊ घातलेल्या मुलांनो आणि मुलींनो, थोडं हात काळे करण्याची तयारी ठेवली तर एक lucrative career option तुमची वाट बघतंय. तशीही employable youth ची या उद्योगाला गरज आहे. अजून एक वस्तुस्थिती. या फिल्डमधे डिझायनर्सची खुपच वानवा आहे. आजही मशीन्सचे उत्तमोत्तम डिझाईन्स बाहेरच्या देशाकडून बेफाम पैसे देऊन आपण विकत घेतो किंवा वर्षानुवर्षे तीच घिसीपिटी टेक्नॉलॉजी कस्टमरवर थोपत राहतो. त्यामुळे कित्येक मशीन टूल कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत किंवा रडतखडत चालू आहेत. नवीन डिझाईन अन टेक्नॉलॉजीचा वापर केला तर उद्योग कसा उर्जितावस्थेत राहतो याचं वाहन उद्योग जिवंत उदाहरण आहे. तेव्हा स्किल डेव्हलपमेंट मधे मशीन टूल डिझाईन या विषयाचं महत्व जाणून जर येणार्या पिढीला त्याची गोडी लावली तर एक भलं मोठं क्षेत्र या नव इंजिनियर्सला कवेत घ्यायला उभं आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही.

एकूण गोळाबेरीज काय, तर खूप घासायची आहे आपल्याला.

© राजेश मंडलिक

Saturday 6 September 2014

सुपारी

खरंतर गणपती विसर्जन आमच्याकडे धार्जिणं नाही. म्हणजे आमचे पूर्वज पुरोगामी विचाराचे होते. (पुरोगामी शब्दाला पर्यायी शब्द सापडला नाही, मला माफ करा पूर्वजांनो). थोडक्यात त्याच मूर्तिची आम्ही दरवर्षी पूजा करावी असं अभिप्रेत  होतं. पण नंतर २० व्या शतकाच्या सुरूवातीला माझ्या पणजोबांनी किंवा खापरपणजोबांनी दरवर्षी नवीन मूर्ती आणायचं ठरवलं असावं. (कुठलं विशेषण वापरू, नाही तर नको राहू देत, शेवटी मी पडलो त्यांचा वशंज) माझे वडील एम एस ई बी त होते (अरे, अरे असं चिडून नका बघू, administrationसाईडला होते). बदली होणारी नोकरी. क्वार्टर मधे रहायचो. जितके वर्ष रहायचो, तितके गणपती जमा व्हायचे. क्वार्टर सोडून जाताना, येणार्या कुटुंबाला सांगून जायचो, मूर्ती तुम्ही विसर्जित करा. १९९९ साली आम्ही स्वत:च्या घरात रहायला आलो. तेव्हापासून मंडळाला देतो, अन सांगतो विसर्जन करा हौदात. कुठे करतात गणपती जाणे. मी आईला सांगावं म्हणतो, की विसर्जन नाही तर एकाच मुर्तीची दरवर्षी पूजा करू यात. पण घाबरतो. याबाबतीत आई फारंच चिडते माझ्यावर.

आता आजचीच गोष्ट घ्या. गौरी विसर्जन झालं. (इथे मात्र त्याच मुर्त्या दरवर्षी पूजतो) निर्माल्य जमा झालं.

आई: वैभवी, जरा ते निर्माल्य सांग लॅबच्या मुलाला टाकण्यासाठी.
मी: मी टाकतो.
आई: नको, तु कचर्याच्या पेटीत टाकतो
मी: अगं, कचराच तो. खरंतर घरातल्याच कचरापेटीत टाकायला पाहिजे. तुला वाईट वाटेल म्हणून कंपनीच्या जवळच्या कचरापेटीत टाकतो.

मी घेऊन जाताना आई काहीतरी पुटपुटते, माज आलाय किंवा तत्सम.

रात्री सलूनला गेलो होतो. (हां हां, ते unisex सलून नाही बरं, आॅल मेन.) डोकं भादरल्यावर मला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं, दरदरून घाम आला, चक्कर आली. रिझवानला बोललो, मला दुकानाच्या बाहेर ने. बाहेर त्याने खुर्ची ठेवली. मी कसाबसा धडपडत त्यावर बसलो. मेडिटेशन मधे कसं तुम्ही वेगळ्या विश्वात जाता (हो, तुम्हीच, मी कधीच नाही) तसं ३-४ मिनीटे मी ट्रान्स मधे होतो. २८ आॅगस्ट ला डाॅ हरदास यांच्या नावाने कडकडीत ₹ ४००० ची पावती फाडली होती. स्ट्रेस टेस्ट, एको, ब्लड रिपोर्ट टकटकीत होते. रिझवानने फुस फुस पंपाने पाणी मारलं अन मी हळू हळू पृथ्वीवर आलो.

घरी आलो, वैभवीने बीपी चेक केलं लो झालं होतं बहूधा. आईला सांगितलं हे सगळं. "करा अजून मस्ती. शिलशिल करत होतास जास्त. तो बघतो आहे वरून. बरोबर झटका दाखवतो" माता उवाच.

आई असं घाबरवते, त्यामुळे लहानपणापासून मी पुरो..... जाऊ दे शिविगाळ नको बाप्पाच्या लेखात
*********************************************************************************

मी, वैभवी आणि नील (वय दहा वर्ष) कुठेतरी निघालो होतो. नील ने ९३.५ एफ एम लावलं होतं. कुणीतरी आर जे, बिनकामाचं हसत ओरडत होतं. आणि तितक्यात संगीताचा महामेरू हनीसिंग यांच्या सुश्राव्य आवाजातलं "चार बोतल व्होडका" हा आजच्या काळातील अभंग चालू झाला. मग मात्र माझी सटकली (हे राम, त्याचंच ना हे पण) आणि मी चॅनेल बदलला. नील वदला " का बदललं" मी बोलल " अरे कसले घाणेरडे शब्द आहेत त्या गाण्याचे. काही अर्थ आहे का त्याला" हे बोलेपर्यंत मी लावलेल्या चॅनेल वर "जलते है जिसके लिएँ, तेरी आँखों के दिये" हे तलतचं नितांत सुंदर गाणं लागलं होतं. नील परत मागच्या सीटवरून करवादला " हं सांगा बरं या गाण्याचा अर्थ. कसलं भंगार गाणं आहे" आता काय बोलणार यावर कप्पाऴ.
********************************************************************************

हे आहे हे असं आहे. पन्नाशीला पोहोचेल मी चार वर्षात. एक मुलगा आणि बाप म्हणून समाजमान्य असलेली बरीच कर्तव्ये पार पाडली आहेत तरीही मागच्या आणि पुढच्या पिढीच्या अडकित्यात सापडलेला असा सुपारीचा खांड आहे.


Tuesday 2 September 2014

चुका

आयुष्य जर परत rewind करून जगायला मिळालं तर खाली दिलेल्या चुका निस्तरायला आवडेल.

- जिथं नाही म्हणायचं होतं तिथं हो म्हणून बसलो आणि जिथे हो म्हणायचं तिथं नाही. (पण काही हरकत नाही मित्रा, तु मला च्युत्या बनवण्याची लिमीट गाठ, मी माझ्याच संयमाची. करू तरी काय शकतो, घंटा)

- स्ट्रेस manage केला असता तर मजा आली असती. आयुष्यभर सिगरेट तर पिलो असतो. (२ या ३ बस इतकंच होतं खरंतर)

- दिलेली वेळ पाळता आली असती तर..................

- कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायला आवडलं असतं. तबला, पहिलं प्रेम किंवा गाणं

- बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस continue करता आलं असतं तर....................

- मुलांना मराठी माधयमाच्या शाळेत किंवा त्यांना मराठीची गोडी.

- बायकोचं माहेरचं नाव continue करू देण्याची धमक हवी होती, वैभवी रविंद्रनाथ सोनईकर

- पोरींची छेड़ काढणारे रोड रोमिओ किंवा बेदरकार गाडी चालवणार्या ड्रायव्हर ला कानठळवणारी मानसिकता अन ताकद पाहिजे होती.

- मूर्तीपूजन अन कर्मकांड जरा कमी करायला हवे होते

- अजाणतेपणी काही चुका झाल्या. थोडक्यात जाणतेपण लवकर आलं असतं तर

काही सुधरवायला अजूनही शक्य आहे, काही बाबतीत सुटलं आता काही धरता येणार नाही.

झाले बुवा दहा.

असंच काहीतरी चालू आहे ना दहा पुस्तकं, दहा मित्र अन अजून काही.

आपल्या वट्ट, दहा चुका