Friday 21 February 2020

राम निष्ठा

दहा बारा वर्षांपूर्वी आमच्या कंपनीत एकजण म्हणाला की आपण गणेशोत्सव चालू करू यात. रीतसर अर्ज वगैरे घेऊन परवानगी मागत होता.

मी  समजावून सांगितलं की तू काही वर्ष आहेस कंपनीत आणि मी ही काही अमरत्व घेऊन आलो नाही. आज मी तुला परवानगी दिली तर तू उपकारार्थ आज आभार मानशील, मला ही फार मोठा तीर मारल्यासारखं वाटेल. पण उद्या काही कारणास्तव बिझिनेस डाऊन झाला किंवा मॅनेजमेन्ट मध्ये खांदेबदल झाला आणि नवीन मॅनेजमेंट ला गणेशोत्सव काही कारणामुळे नको असेल तर तुम्हा लोकांना ते चालणार नाही. आज दिलेली परवानगी आपले लोक हक्क म्हणून गाजवू लागतील अन कंपनीतील वातावरण विनाकारण बिघडेल. कारण आपल्या लोकांना आज दिलेली मुभा ही उद्या हक्क म्हणून गाजवायची वाईट खोड आहे.

तेव्हा आपण धर्माधिष्ठित सणांचं कौतुक फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यापुरतं मर्यादेत ठेवू यात. बाकी जे काय सण बिन साजरे करायचे ते सुट्टी घेऊन आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत साजरे करू यात.

असो. हे झालं कंपनीचं.

वैयक्तिक पातळीवर तर मी आता कुठल्याही सणाबद्दल, जयंतीबद्दल, पुण्यतिथीबद्दल कुठलीही भावना स्वतः व्यक्त करत नाही. माझा धर्म, माझे महापुरुषातले आदर्श हे माझ्यासाठी लखलाभ. त्याबद्दलचा माझा आदरभाव, प्रेम, निष्ठा, भक्ती ही माझ्यापुरती मर्यादित. ती दुसऱ्या कुणाचीही असावी याबाबत अट्टाहास तर सोडाच, पण इच्छा प्रदर्शित करण्याबाबत आता घृणा वाटते.