Thursday 5 July 2018

बेरोजगारी




फ्रेश इंजिनियरच्या बेरोजगारीबद्दल मागे एकदा लिहिलं होतं. त्या संदर्भात अजून काही.

इंजिनियर्सचा तुफान सप्लाय हा नियंत्रणात आला नाही तर ती एक सामाजिक समस्या होणार आहे, किंबहुना झाली आहे. पालक आपल्या मुलासाठी कष्टाने मिळवलेले पैसे खर्च करतात आणि त्याला इंजिनियर बनवतात. त्यांना वाटतं की इंजिनियर साठी ढीगभर जॉब पडले आहेत. बरं या पालकांना आपण हेही सांगू शकत नाही की तुमच्या मुलाला वा मुलीला फर्स्ट क्लास वा डिस्टींक्शन मिळालं म्हणजे फक्त मार्क आले आहेत. आदरवाईज त्यांना इंजिनियरिंग चं अगदी बेसिक नॉलेज पण नाही आहे. या इंजिनियरिंग नावाच्या मृगजळामागे धावू नका हे माझं पालकांना आणि त्यांच्या मुलांना कळकळीचं आवाहन आहे.

अमेरिकेत वार्षिक लाख इंजिनियर्स बाहेर पडतात आणि त्यांच्या इकॉनॉमी ची साईझ आहे १५ ट्रिलियन डॉलर्स. भारताची इकॉनॉमी आहे ट्रिलियन डॉलर्स, आणि तिथे बनतात १५ लाख इंजिनियर्स.


पूर्वी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला घाऊक भावात इंजिनियर्स लागायचे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या कोअर ब्रँच च्या मुलामुलींना इथे जॉब मिळायचे. गेल्या काही वर्षात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र हे ज्या वेगाने वाढलं त्याच्या कैक पटीने इंजिनियर्स मुलं मुली भारतात तयार झाले. 

आणि मग आय टी सेक्टर ने भरमसाठ मुलं मुली घ्यायला सुरुवात केली. ज्या वेगाने त्यांनी इंजिनियर्स घेतली त्याने एके काळी तुटवडा तयार झाला होता. पण अलीकडच्या काही काळात हा वेग मंदावला. आणि जसं हे क्षेत्र विकसित होत गेलं, आय टी क्षेत्रात त्या स्ट्रीमची गरज भासू लागली. एके काळी मिळेल त्या ब्रॅन्चचे इंजिनियर्स नोकरीला ठेवणाऱ्या आय टी कंपन्या आता सिलेक्टिव्ह बनल्या. 

भारतात रोजगार उत्पन्न करणाऱ्या बहुतांश क्षेत्रात इंजिनियर्सची गरज नाही. पर्यटन क्षेत्र, फायनान्स, व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स आणि शेती या क्षेत्रात इंजिनियर्स लागत नाही. 

जीडीपीच्या ६०% उत्पादन देणाऱ्या क्षेत्रात इंजिनियर्स लागत नाहीत तरीही आज बऱ्याच युवक युवतींना इंजिनियर व्हायचं आहे. हे भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. 

मागणी कमी आणि सप्लाय जास्त. बरं जो माल बाहेर पडतोय त्याची क्वालिटी चांगली नाही. टॉपची शंभर दीडशे कॉलेजेस सोडली तर बाकी आनंद आहे. आपण कशासाठी इंजिनियर होत आहे त्याचा या पोरापोरींना पत्ता नाही. 

माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो आणि त्याच्या पालकांनो, इंजिनियरिंग पदवी ही स्वस्त नाही आहे. तिथले मार्क्स जरी आजकाल स्वस्त झाले असले तरी दहा बारा लाखाचा चुराडा करून ते मिळतात. आणि जेव्हा गरीब पालक हे पैसे खर्च करतात तेव्हा त्यांनी पोटाला चिमटा काढला असतो हे ध्यानात असू द्या. त्यांच्या या कष्टाच्या कमाईला जेव्हा पाय फुटतात त्याला न्याय मिळणार का, यावर सखोल अभ्यास करून निर्णय घ्या. 

एक समाज म्हणून  आपण जर सरधोपटपणे हा मार्ग निवडत असू तर वर्षाला हा देश पैशाचा अपव्यय तर करत आहेच, वर एक ताकदीचं मनुष्यबळ निष्क्रिय करत चाललो आहोत. 

(हे लिहिताना श्री सुनील जेजीत यांच्या  इंग्रजी लेखाची मदत घेतली आहे)




Saturday 30 June 2018

Fortis


गुणवत्तेच्या जगात आपलं स्वागत आहे!

फोर्टिस केबल्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय वायर्स आणि केबल्स उद्योगक्षेत्रातील एक तरुण कंपनी आहे. २०१७ साली चालू झालेल्या फोर्टिस चे मुख्य कार्यालय पुणे इथे आहे. फोर्टिस वेगवेगळ्या क्षेत्रातील वायर्स, आणि केबल्स उत्पादित करते ज्यांचा वापर गृह प्रकल्प तसेच औद्योगिक इमारती यासाठी तर होतोच पण दूरसंचार क्षेत्रात पाण्याखाली जाणाऱ्या तारा तसेच वाहन उद्योग व रेल्वे साठी लागणाऱ्या तारांचं उत्पादन पण फोर्टिस करते.   

या क्षेत्रात फोर्टिसने नुकताच  प्रवेश केला आहे आणि त्याचे काही फायदे आहेत. आम्ही अगदी कोऱ्या पाटीवर लिहायला चालू केलं आहे आणि त्यामुळे आम्ही उच्च गुणवत्ता धोरण अवलंबलं आहे. आणि त्यामुळेच आमचे उत्पादन हे इतरांपेक्षा वेगळे ठरते. जरी उत्पादनाची प्रोसेस अवघड आहे किंवा आमचं प्रॉफिट मार्जिन कमी आहे तरी त्याचा परिणाम आम्ही गुणवत्तेवर होऊ देत नाही आणि याबाबत आम्ही सदैव दक्ष असतो.  


होमफोर्ट, जे आमच्या गृहप्रकल्पासाठी लागणाऱ्या तारांचं ब्रँड नेम आहे आणि फ्लेक्सिफोर्ट, हे औद्योगिक इमारतींसाठी वापरल्या जाणाऱ्या तारांचं नाव आहे, ही दोन्ही उत्पादने ३ PRO तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादित केली जातात. त्या वायर्सचे कोअर हे उष्णता रोधक आहेत आणि ८५ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वापरू शकता, तीन थरांमध्ये त्याचं इन्सुलेशन आहे ज्यामुळॆ करंटची गळती कमी होते आणि त्याचबरोबर त्या विशिष्ट इन्सुलेशन मुळे सुरक्षेची हमी जास्त मिळते. 

या प्रॉडक्टस बरोबर वाहन उद्योग, रेल्वे आणि दूरसंचार उद्योगासाठी लागणाऱ्या वायर्स मध्ये सध्याच्या प्रचलित गुणवत्तेच्या आणि सुरक्षेच्या मापदंडापेक्षा आम्ही वरचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला आहे.  

आमचा प्रवास नुकताच चालू झाला आहे, पण खूप काही घडलं आहे. एका वर्षातच आम्ही गुणवत्ता, वातावरण आणि सुरक्षेशी निगडित BIS, CE, ERDA, CPRI, RoHS तसेच ISO 9001, 14001, 18001 आणि TS16949 ही प्रमाणपत्रं प्राप्त केली आहेत. आणि वर उल्लेख केलेल्या सर्व केबल्स आणि वायर्स चं उत्पादन जोमाने चालू केलं आहे. येणारं भविष्य उज्वल आहे याबद्दल शंका नाही. 

आपण आता एकमेकांशी संलग्न असणार आहोत आणि आम्ही तुम्हाला आमची कथा, भविष्याबद्दलचे प्लॅन्स आणि उत्पादनाविषयी माहिती देणारंच आहोत. पण सगळ्यात आधी फोर्टिस वर विश्वास ठेवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देतो. फोर्टिस कुटुंबात आपलं स्वागत आणि त्या निमित्ताने एक किट आपल्याला पाठवत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा ही विनंती. फोर्टिस च्या प्रॉडक्टसची विक्री करण्यासाठी हे किट उपयुक्त असेल याबाबत खात्री आहे. 

भविष्यातील दमदार आणि यशस्वी व्यावसायिक संबंधासाठी आपण एकमेकांशी कटिबद्ध राहू यात. 


आपला 



अय्याज हमीरानी 
व्यवस्थापकीय संचालक
फोर्टिस केबल्स प्रायव्हेट लिमिटेड  



Sunday 24 June 2018

मिलेनियल्स

Millennial ही  एक वेगळी संज्ञा जन्माला आली आहे. म्हणजे साधारण १९८० नंतर जन्माला आलेले. या शतकात जे वर्क फोर्स मध्ये जॉईन झालेले.

बिझिनेस ओनर्स या नवयुवकांकडून लॉयल्टीची अपेक्षा करतो. डेडिकेशन ची अपेक्षा ठेवतो. पण बिझिनेस ओनर्स हे विसरतो की हे आजकालचे युवक मोबदल्यात हेच एम्प्लॉयर कडून अपेक्षा ठेवत असतात. आणि त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही. व्यावसायिक आणि त्याचा एम्प्लॉयी यातील संबंध हे एकमेकांप्रती विश्वास आणि कमिटमेंट यावर अवलंबून असतात. यात "एकमेकांप्रती" हे फार महत्वाचं आहे. याच मिलेनियल्सला थोडं जरी पाठबळ त्याच्या बॉस कडून दिसलं तर त्यांचा उत्साह अनुभवणं ही आनंदाची बाब असते.

ज्या म्हणून ठिकाणी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जाते तिथं कामं पण व्यवस्थित होतात. काम झाल्यावर वेळेत घरी जायला मिळतं का? पगार पाणी वेळेवर होतात का, ट्रेनिंग मिळतं का, माझ्या कामावर विश्वास ठेवून मला काम करण्याचं स्वातंत्र्य आहे का? माझ्या कामाबद्दल व्यवस्थित फीडबॅक दिला जातो का की उगाचच अपमानित केलं जातं हे सगळे प्रश्न मिलेनियल कायम विचारत असतो. त्याचं उत्तर सकारात्मक असलं की तो जीव तोडून मेहनत करतो.

जेव्हा या मिलेनियलला व्यवस्थापनाचं पाठबळ मिळतं तेव्हा त्यांचा हॅपिनेस कोशंट हा एक आगळी उंची गाठतो आणि त्यानेच कंपनी यशस्वी होण्याची शक्यता वाढते. कंपनीतील लीडर आणि त्याचा सहकारी यांच्यातील व्यवसायिक संबंध सुदृढ राहण्यासाठी दोघांनीही जीवतोड मेहनत करणं गरजेचं असतं. असं जर घडलं जर घडलं तर कंपनी यशस्वी होताना त्याची प्रोडक्ट क्वालिटी, मार्केट मधील त्यांचं स्टँडिंग आणि एकुणात कार्य संस्कृती यात खूप सकारात्मकता दिसते.

एक कर्मचारी म्हणून जेव्हा त्याच्या अपेक्षा वेळच्या वेळी लीडर ला सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. या प्रकारच्या संवादामध्ये जेव्हा सुस्पष्टता असते तेव्हा बरेच इश्यू हे समाधानकारकरित्या हाताळण्याची शक्यता निर्माण होते.

मिलेनियल्स, एक आगळी वेगळी जमात. उत्साहाने फसफसणारी. फीडबॅक व्यवस्थित पोहचवला तर त्यावर जीव तोडून काम करणारी, तुम्ही जर त्यांना पाठबळ दिलं, त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तर आकाशात झेपावणारी.

Thursday 12 April 2018

रोजगार लायकी

परवा आयटीआय ला टेक्निशियन मुलं घ्यायला गेलो होतो. पंचवीस कंपन्या हजर होत्या. अन मुलं आली होती दहा. तिथले ऑफिसर सांगत होते, टाटा ग्रुप ला २५० मुलं पाहिजेत, पण मिळत नाही आहेत.

आयआयटी च्या मुलांचं पण लागलीच प्लेसमेंट होत असावं.

म्हणजे थोडक्यात आयटीआय ते आयआयटी चेन मध्ये वांदे झालेत ते डिप्लोमा आणि बीई मुलांचे.

याला काही कारणं आहेत. 

एकतर इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक उदंड झाले आहेत. आणि त्यातून तयार होणाऱ्या लोकांची क्वालिटी संशयतीत आहे. डिप्लोमा मुलं तर अक्षरशः कुठलाही जॉब करायला तयार असतात. काम कुठलंही चांगलं, पण घेतलेल्या शिक्षणाला न्याय देणारं तर असावं. जी कामं आय टी आय टेक्निशियन करू शकतो तीच कामं डिप्लोमा वा ग्रॅज्युएट इंजिनियर ने करण्यात काय मतलब आहे. हेल्परचं काम मागायला येतात हो. वाईट वाटतं. 

त्यात सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्री वाल्या मंडळींनी ही मुलं पळवायला चालू केली. कोअर ब्रँच करायची आणि की बोर्ड बडवत बसायचा, याला काय अर्थ आहे. फक्त मॅथ्स शिकल्यामुळे लॉजिक चांगलं या एका क्वालिफिकेशन वर प्रोग्रामर बनत गेले आणि कोअर विसरत गेले. पोरांची भौतिक स्थिती सुधारली पण शैक्षणिक विषमता तयार झाली. 

आम्ही इंडस्ट्रीवाल्यानी सुद्धा यावर तात्पुरते उपाय योजले. जे मिळतात ते घ्या. आणि अजून कमी पगार देऊन घ्या. आणि मग त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी लेव्हलचं काम द्या. 

पोरं पोरी सुद्धा सुखनैव जीवनाला चटावले. त्यांनीही धोंडा पाडून घेतला पायावर. आता तिथे अनिश्चितता तयार झाल्यावर साळसूदपणे म्हणतात "I want to make career in core". 

एकंदरीत एकेकाळी ज्या इंजिनियरिंग साखळी चा बोलबाला होता, त्याचं आज हसं झालंय. त्या चेन मधील डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट ह्या सगळ्यात कमजोर कडी आहेत. आणि या अधोगतीला समाजातील प्रत्येक घटक, अगदी तुम्ही, मी, शिक्षणसम्राट, इंडस्ट्रीवाले, हे सगळे जण कारणीभूत आहेत. 

आपल्याकडे बेरोजगारी या प्रश्नापेक्षा रोजगारासाठी लायक युवक उपलब्ध आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. 

Friday 23 March 2018

नितीन कारंजकर

नितीन कारंजकर, बंट्या म्हणायचो आम्ही त्याला. नासिकच्या सीडीओ मेरी शाळेचा माझा क्लासमेट. त्याचं  नाव घेतलं की  त्याचा मला कडक ऑन ड्राइव्ह आठवतो आणि रनिंग बिटवीन विकेट. खो खो मध्ये पण सॉलिड होता तो. रादर कुठल्याही मैदानी खेळात बंट्याची लेव्हल वरची असायची.

गणितात पण किडाच तो. त्याच्या बरोबर अभ्यास करायला मिळावं म्हणून मी शाळेत नेहमीच धडपड करायचो.

एकंदरीत रोल मॉडेल होता तो माझा. हेवाच वाटायचा मला त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि त्याच्या फिटनेसचा.

दहावीला आमची मैत्री आणिक घट्ट झाली. वि भा देशपांडेंच्या क्लासला एकत्र जायचो. वेळ मिळेल तसा टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळायचो. सीडीओ च्या ग्राउंडवर अभ्यासाबरोबरच बाकीही भरपूर गप्पा व्हायच्या. दहावीला तो वर्गात तिसरा आणि गणितात पहिला आला. गणितात मला बंट्याइतकेच मार्क मिळाले म्हणून काय ग्रेट वाटलं होतं!

बंट्याचं वाचन अफाट होतं. आम्ही अधाशासारखी पुस्तकं वाचून काढायचो. आयुष्यात मी जर कधी चोरी केली असेल तर ती बंट्याबरोबर लायब्ररीतल्या पुस्तकांची. वाचनाचा झपाटाच तसा  होता. पुस्तकं इमानेइतबारे परत नेवून पण ठेवली. 

दहावीला मी औरंगाबादला गेलो. डिप्लोमा साठी. तो पुण्याला आलं. पॉलिटेक्निक मध्ये त्याचं काय बिनसलं माहित नाही पण एका वर्षात तो नासिकला आला आणि त्याने अकरावीला ऍडमिशन घेतली. बारावीला कचकावून मार्क काढले अन तो सीओईपी ला सिव्हिलला जॉईन झाला. मी सुद्धा पुण्यात भारती विद्यापीठात आलो. आमची मैत्री पुन्हा बहरली. नाशिकहून पुण्यात आलेल्या आमचा एक ग्रुप बनला. नतावाडीला नामदेव शिंपी समाजाचं हॉस्टेल होतं. तिथं राहायचा तो. वेळोवेळी भेटलो, फिरलो, गप्पा मारल्या, टवाळक्या केल्या. 

इंजिनियर झाल्यावर बंट्या नासिकला करिअर घडवायला गेला अन मी पुण्यातच राहिलो.

नंतर काय घडलं ते कळलं नाही पण लौकिकार्थाने आयुष्यात सगळे जसे सेटल होतात तसा बंट्या नाही झाला. का कुणास ठाऊक पण त्याने लग्न केलं नाही. जॉब न करता त्याने कॉन्ट्रॅक्टरशिप चालू केली. धंदा तो करत होता पण ज्याला धंद्याचा मौसम म्हणतात तो त्याने अनुभवला नसावा. थोडा तुटक पण झाला होता तो.

अर्थात आमची मैत्री बरकरार राहिली. म्हणजे नाशिकला मी गेलो अन बंट्याला भेटलो नाही असं क्वचितच व्हायचं. एक तास का होईना, त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिस मध्ये चहा प्यायचो, जिवाभावाच्या गोष्टी करायचो अन मग पुण्याला निघायचो.

आता मात्र मी नासिकला गेलो की बंट्याला नाही भेटणार, म्हणजे भेटू नाही शकणार.

काल, बंट्या उर्फ नितीन कारंजकर गेला. रस्त्यात आडव्या आलेल्या माणसाला वाचवताना तो पडला आणि त्याला हेड इंज्युरी झाली. एका आठवड्याची झुंज संपली. त्याबरोबर एका मित्राला मुकलो. माझा एकेकाळचा आयडॉल अनंतात विलीन झाला.

आय विल मिस यु मित्रा.

आणि खरं सांगू मित्रा, तुला जे आयुष्य लाभलं त्यापेक्षा तुझी पत खूप जास्त होती. तुझं आयुष्य बनवताना त्या विधात्याचं काहीतरी चुकलंच. . . . . . . . . . . . आणि मृत्यू देताना सुद्धा.

ला

Tuesday 20 March 2018

एक इनोव्हेशन इंडेक्स म्हणून प्रकार असतो. ब्लूमबर्ग नावाची संस्था आहे, ज्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला हा रिपोर्ट सबमिट केला आहे. त्या इंडेक्स मध्ये खालील देशाचा समावेश आहे. आणि तो का, याचं कारण पण दिलं  आहे.


१. साऊथ कोरिया: साऊथ कोरियाच्या पर कॅपिटा उत्पादन क्षमतेसाठी त्यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.

२. स्वीडन: स्वीडन मध्ये ग्रॅज्युएट होणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. (पर कॅपिटा)

३. सिंगापुर: त्यांची शिक्षण पद्धती ही  जगात वाखाणली जात आहे.

४. जर्मनी: हाय टेक स्टार्ट अप चं सध्या जर्मनी मध्ये उधाण आलं आहे.

५. स्वित्झर्लंड: मूलभूत संशोधनाच्या जगातल्या सर्वोत्तम प्रयोगशाळा या देशात आहेत.

६. जपान: मिड साईझ कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन, पर्यायाने पेटंट्स मिळवत आहेत.

७. फिनलँड: या देशाच्या सरकारने ज्ञानाधिष्ठित उपक्रमांची विधेयकं पास केली आहेत.

८. डेन्मार्क: रिनेव्हेबल एनर्जी (सोलार, विंड, टायडल एनर्जी वगैरे) या क्षेत्रात जगातील सर्वोत्तम टेक्नॉलॉजी डेन्मार्क कडे उपलब्ध आहे.

९. फ्रान्स: या देशाच्या सरकारने डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी इनोव्हेशनला मदत करण्यासाठी १३ बिलियन डॉलर्स चा इन्व्हेस्टमेंट फंड उभा केला आहे.

१०. इझ्राएल: मूलभूत संशोधनासाठी (आर अँड डी) जगात सगळ्यात जास्त गुंतवणूक या देशाने केली आहे.


या लिस्ट मध्ये येण्यासाठी तुमच्या देशात काय पाऊलं उचलली जात आहेत?

विकसित देश  या गोष्टींमुळे बनतो राजा!

Monday 12 February 2018

स्वगत

मला तुझ्यातला सर्वोत्तम तू पाहायचा आहे.

जेव्हा विधाता माझ्या अपेक्षेपेक्षा माझ्यावर जास्त वर्षाव करतो तेव्हा आत्मसंवाद काहीतरी वेगळं सांगत असतो.

जेव्हा आपल्या मनासारखं घडत नसतं, खूप प्रयत्नांती अपयश दिसतं, तेव्हा एकाग्रतेने काम करत गाडी रुळावर येण्याची वाट पाहण्याशिवाय आपल्यासाठी काय उरतं?

आत्मवंचना तर हे सांगत असते की "अरे आज इतकं आनंदी का वाटतंय? काही चुकलं का आयुष्यात?"

कधी कधी असं वाटतं की आयुष्याची गती इतकी हळू का आणि मग मन घुटमळत राहतं आपण घेतलेल्या योग्य आणि अयोग्य निर्णयाभोवती, आणि वास्तव आ वासून उभं राहतं.

स्वप्नवत बदल आपल्याला खुणावत राहतात पण आपण भौतिक सुखासीनतेची आस धरतो.

दोन पावलं पुढे तर एक मागे. तेच प्रयत्न. अविरत. येणाऱ्या वादळाला तोंड देण्यासाठी. 

भविष्यात खुश राहण्यासाठी वर्तमानाची सत्य परिस्थिती हाताळताना भूतकाळातील अनुभवाचा आसरा घेतो. 

मेंदू आणि मन यातील बरोबर कोण हे ठरवताना बऱ्याचदा मानसिक स्वातंत्र्याचा त्याग करावा लागतो. 

एखाद्या गोष्टीवर झोकून दिलं की भव्य दिव्य होण्याची शक्यता निर्माण होते. 

तू जो आहेस तसाच रहा, विटेवर वीट चढवत जा. अक्षरश: 

- स्वगत




Wednesday 31 January 2018

जगवते ती लेक

मधुरा आणि टीम ने सादर केलेल्या अभिवाचनाचा गाभा होता लग्न प्रसंग आणि त्यातली मुख्य पात्रं होती मुलगी आणि मुलीचा बाप. गंमत म्हणजे सादर करणाऱ्या आमच्यापैकी कुणालाही मुलगी नाही.

मुलीबद्दलची भावना व्यक्त करणाऱ्या कविता आम्हाला पाहिजे होत्या. नक्कीच असतील, पण आम्हाला सापडल्या नाही. मग मी माझा मित्र अतुल वाघ याला गाठलं आणि त्याला गळ घातली की एखादी कविता लिहिली असशील तर दे. त्याने एक नाही तर एकाहून एक सरस अशा तीन कविता दिल्या. त्यातली  खाली दिलेली कविता मला खूप आवडली. हितेश आणि मीराताईंनी पण एकदम झकास सादर केली. तुम्हालाही आवडेल



झाले भावविश्व संपन्न
हा जन्म स्तोत्र मानून
त्या नात्याची साधक
जगवते ती लेक

चंद्रकलेचे भाग्य
सूर्योदयाची साक्ष
हे दिव्यत्व वैश्विक
जगवते ती लेक

दाटला तो नभ
घोटले ते प्रेम
इरादा तो नेक
जगवते ती लेक

पाहिले ते स्वप्न
हासले ते क्षण
गुंफिला श्वास प्रत्येक
जगवते ती लेक

आठवांचा मोहोळ
भावनांचा कल्लोळ
बुद्धीची द्योतक
जगवते ती लेक