Wednesday, 23 September 2020

भांडवल आणि नफ्याची सायकल

 या सर्व काळात एक मुद्दा फार चवीने चर्चिला जातो आणि तो म्हणजे इतके दिवस नफा कमावला तर आता कामगारांची काळजी घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?

इथे तुम्हाला मी भांडवल आणि नफ्याची सायकल सांगतो. 

व्यवसाय करत असताना नफा साधारण एका टक्केवारीत होतो. हा नफा म्हणजे सगळे खर्च झाल्यानंतर उरलेले पैसे. यात बिझिनेस ओनरचा पगार पण आला. हो, व्यवसायात असताना सुद्धा बिझिनेस ओनरने पगार घेणंच अपेक्षित असतं. 

आता हा जो नफा उरतो तो गुणोत्तर प्रमाणात खूप जास्त असेल तर बिझिनेस ओनर नफ्यातील काही भाग  डिव्हीडंड म्हणून पगाराव्यतिरिक्त घेऊ शकतो. उरलेला भाग हा बिझिनेस मध्येच रोल केला जातो, जो शक्यतो व्यवसाय वृद्धीसाठी वापरला जातो. 

आता छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांना हा डिव्हीडंड प्रकार व्यवसाय चालू केल्यावर अनेक वर्षे घेता येत नाही. कारण व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना पैसे व्यवसायातच ठेवावे लागतात. त्यामुळे व्यावसायिकांकडे आडमाप एक्सेस पैसे असतात ही अंधश्रद्धा आहे. 

दुसरा महत्वाचा कळीचा मुद्दा इथे येतो आणि तो म्हणजे कॅश ची उपलब्धता. छोटे व्यावसायिक हे मोठ्या उद्योगांना माल सप्लाय करत असतात. त्याचे पैसे वेळेत देणे म्हणजे पाप आहे असा एक समज आपल्या व्यवसाय जगतात आहे. त्यामुळे व्यवसाय नफा जरी दाखवत असतील, की जो नोशनल असतो, त्यांच्याकडे कॅश ची वानवा असते. 

या सगळ्या वरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की धंदा पूर्ण बंद असताना एखाद दोन महिन्यापलीकडे व्यावसायिक फिक्स्ड एक्स्पेन्सेस सहन करू शकत नाही. 

मी स्वतःवरून दोन गोष्टी सांगतो. 

मी गेले अठरा वर्षे व्यवसायात आहे, पण एकही वर्ष डिव्हीडंड घेतला नाही आहे. आणि दुसरं म्हणजे, जर आमच्या भारतभरातील ग्राहकांनी आमची सर्व देणी परत दिली तर शून्य बिझिनेस झाला तरी मी सर्व लोकांना किमान एक वर्ष पगार देऊ शकतो. 

टीप: 

१. मी हे जे लिहिलं आहे ते ग्रोथ माइंडसेट ठेवणाऱ्या आणि लेजिटिमेट पद्धतीने बिझिनेस करणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय मनात ठेवून लिहिलं आहे. उत्पादन क्षेत्रातील छोटे व्यावसायिक जे गडगंज दिसतात ते एकतर सॉलिड प्रॉफिट मेकिंग असतात किंवा त्यांच्याकडे पैसे कमावण्याचे दुसरे मार्ग असतात. 

२. आता आलेली परिस्थिती भविष्यात आली तर तिला तोंड देण्यासाठी, सोसायटीला जसा सिंकिंग फंड असतो तसा फंड कंपन्यांनी तयार करणं गरजेचं आहे. 

३. असंच असेल तर मग नोकरी करणं काय वाईट आहे असं वाटू शकतं. पण आहे हे असं आहे. एथिकल आणि लेजिटिमेट पद्धतीने व्यवसाय करणे हे एक तप आहे. पैसेच कमवायचे असतील तर नोकरी करण्यासारखा चांगला मार्ग नाही. व्यवसाय करायचा असेल तर पैसे कमावण्यापलीकडे जाऊन खूप विचार करावा लागतो. 

Monday, 31 August 2020

कार्मिकतेची गरज

 ज्या देशातील बहुसंख्य कर्मचारीवर्ग दोन महिने तंगड्या वर करून घरात बसले असताना परत धार्मिकतेचा पगडा असणाऱ्या सणवारांसाठी सुट्ट्या घेतो, ज्या देशातील बहुसंख्य उद्योजक आणि टॉप मॅनेजमेंट ला आपला उद्योग परत जागेवर कसा यावा यासाठी विचार करण्याची तसदी पण घ्यावी वाटत नाही, ज्या देशातील राजकीय मंडळी सामान्य जनतेचे जीवनमान सुधरवणऱ्या उद्योगांबरोबर चर्चा न करता मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करतात, ज्या देशातील राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी देवाकडे चमत्काराचा धावा करतात, ज्या देशाचे अर्थमंत्री आपल्या नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या परिस्थितीला ऍक्ट ऑफ गॉड म्हणून बोळवण करतात, ज्या देशातील जनता अर्थव्यवस्थेची काळजी न करता राममंदिर झालं म्हणून उन्माद करते आणि आपला बहुसंख्य वेळ हा कुठल्या सेलेब्रिटीच्या आत्महत्या का आणि कशी झाली याची वांझोटी चर्चा करत वाया घालवते,  धार्मिकतेचा पाश जगातील ज्या दोन देशाभोवती आवळला जात आहे त्यापैकी एक आपला देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था डबघाईला जाणार हे सांगण्यासाठी कुठल्या विद्वानांची गरज नाही, 

या देशातील जनतेला समजलं पाहिजे की आपण जो मार्ग निवडला आहे त्याला धार्मिक नव्हे तर कार्मिकतेची गरज आहे. उत्पादकतेचा एल्गार करा नाहीतर फक्त अर्थव्यवस्था कशी डबघाईला गेली आहे याचे मेसेजेस फॉरवर्ड करण्याशिवाय तुमच्या हातात काही उरणार नाही. 


Friday, 31 July 2020

Success/Failure

Its a crime if you dont know reasons of failure. 

It is also crime if you dont know reasons of your success. 

आयुष्यात चुकीचं घडलं की त्याचं पोस्टमार्टेम करायला आपण सदैव तत्पर असतो. कारणं शोधतो आणि एक काउंटर ऍक्शन प्लॅन काढतो. आणि मग त्या प्लॅन वर काम केलं तर काही काळानंतर अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडायची शक्यता असते. आता काही लोक असे असतात की ते हे पोस्टमार्टेम करायच्या मनस्थितीत नसतात. ही लोक त्या भोवऱ्यात गंटांगळ्या खात राहतात. काही लोक असेही असतात की ते अपयशाची कारणं आपण शोधली आहेत असं दाखवतात, प्रत्यक्षात त्यांना स्वतःच्या मूलभूत वृत्तीला बदलायचं नसतं. ही लोक तूच चूक पुनः पुनः करतात आणि शेवटी नशिबाला कोसत राहतात. शेवटची कॅटेगरी म्हणजे ही लोक करणे शोधतात, पण त्या वरील काउंटर प्लॅन ला अंमलात आणत नाही. त्यांचेही वांदे होतात. 

यशस्वी का झालो याचीही कारणं आपण शोधली पाहिजेत. मूळ कारणं. त्याचे दोन फायदे आहेत. आपण तीच थॉट प्रोसेस प्रत्येक प्रश्नाला लावू शकतो. त्यात कदाचित प्रश्नाचा आवाका वेगळा आणि मोठा असेल पण त्याला उत्तर शोधण्याची तार्किक प्रोसेस सेम असू शकते. अशा यशस्वी लोकांनी ही आपली थिंकिंग प्रोसेस शेअर करण्याची मानसिकता जोपासली पाहिजे. किंबहुना ते स्वतःच उत्तरदायित्व समजायला हवं. असं जर झालं तर आमच्या सारखे, जे सुयोग्य मार्गाचं दर्शन घडावं म्हणून धडपडत आहेत, त्यांना काहीतरी दिशा मिळेल. बऱ्याचदा या यशस्वीतेची मूळ कारणं लोकांना सापडत नाही. यश मिळतं पण त्याची थिंकिंग प्रोसेस पाहिजे तशी उतरत नाही. 

Wednesday, 15 July 2020

लाफिंग स्मायली

२०१२ साली जेव्हा सेटको बरोबर आमचं जॉईंट व्हेंचर झालं. करारावर सह्या झाल्यावर आर्ट मिलर, जे त्यावेळेस आमच्या बोर्ड चे चेअरमन होते, त्यांनी मला विचारलं "या जॉईंट व्हेंचर मधून तुला काय मिळवायचं आहे?"

मी म्हणालो "प्रोफेशनल फ्रंट ला काय मिळायचं ते मिळेल, पण पर्सनल फ्रंट ला मला माझ्या आयुष्यातून हरवलेला सेन्स ऑफ ह्युमर परत मिळवायचा आहे." माझं उत्तर अनपेक्षित होतं. त्यांनी मला अर्थ विचारला. त्याला उत्तर म्हणून मी जे सांगितलं ते मला वाटतं की बऱ्याच व्यासायिकांची व्यथा आहे. मी म्हणालो "एक वेळ होती की माझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता, पण या बिझिनेस च्या प्रेशर मुळे तो हद्दपार झाला आहे. बिझिनेस चा फॉरमॅट या जेव्ही द्वारे असा करून द्या, की थोडी लाईट मानसिकता होईल."

असो. हसण्याचं थोडं वावडं आहेच. टीव्हीवर हंगामा किंवा गोलमाल चालू असेल तर नील आणि वैभवी हसून लोटपोट होताना मी मख्खसारखा बसून असतो. एखाद्या ग्रुप मध्ये हसी मजाक चालू असेल तर मला तितकं हसू येत नाही.

इथे फेसबुकवर मला अनेक मित्रांनी दाखवून दिलं की मी बऱ्याचदा पोस्टवर हसरी स्मायली देत नाही. मी हे मुद्दामून करत नाही किंवा पोस्टमधील विनोद दर्जेदार नाही असेही मला वाटत नाही. पण कदाचित ती मानसिकता झाली असेल. पोस्ट वाचत असलो तरी मनात दुसरं काही चालू असेल त्यामुळे यांत्रिक पणे लाईक देत असेल.

अर्थात हसऱ्या स्मायलीचा पूर्ण दुष्काळ असतो असं ही नाही. थोडं राशनिंग होतं हे खरं.

सांगायचा मुद्दा हा की स्मायली न देण्यात माज नाही. कदाचित माझीच आकलनशक्ती कमी पडत असेल. सुधारेल ती ही हळूहळू. पण तो पर्यंत तुम्ही हसत आणि हसवत रहा.
Monday, 22 June 2020

मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र

काम देण्यायोग्य इंजिनीअर्स उपलब्ध नाहीत ही व्यवसायिकांची व्यथा आणि चांगले पगाराचे जॉब्ज उपलब्ध नाहीत ही युवक/युवतींची व्यथा. आणि हे असं घडण्यामागे समाजाचे सर्व कोन कारणीभूत.

ज्या क्षेत्रात तार्किकतेने काम करण्याची अपेक्षा असते अन ते करण्यात कुठल्याही शाखेचा इंजिनीअर चालतो हे लक्षात आल्यावर भोवऱ्यासारखे तमाम स्ट्रीमच्या इंजिनीअर्स ला आपल्याकडे ओढून घेतलेल्या पण त्याबरोबरच कमी वयात आर्थिक स्थैर्य देणारी आय टी इंडस्ट्री, अचानक इंजिनीअर्सची गरज तयार झाल्यावर शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षींनी जन्माला घातलेले इंजिनियरिंग कॉलेजेस, पण त्या कॉलेजेस मध्ये शिक्षणाची क्वालिटी चांगली आहे की नाही याची माहिती न घेता केवळ "पॅकेज" या आकर्षणापोटी घाऊक भावात ऍडमिशन घेणारा आपला समाज, आणि कॉलेजेस वर चांगल्या क्वालिटी एज्युकेशन देण्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी आणि अनास्था असणारं शासन या सगळ्या गोष्टीमुळे नोकरीक्षम इंजिनियर्स ची वानवा या देशात तयार झाली त्यात नवल ते काय? आणि या जोडीला मूल्यांचं अधिष्ठान आपल्या जगण्याला असायला हवं या भावनेचा अभाव याने एकूणात रसातळाला गेलेल्या इकोसिस्टमचा गळा अजून घोटला.

हे वाचताना एक लक्षात असू द्या की  मी व्यथा मांडतो आहे एसएसएमई  च्या अनुषंगाने जिथे आमच्या वाटेला फक्त तिसऱ्या किंवा चौथ्या श्रेणीच्या कॉलेजेस ची मुलं येतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणाईशी संवाद साधणे आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची चळवळ सुरू होणं गरजेचं आहे. असा एक छोटा प्रयत्न औरंगाबादचे अभ्यासू पत्रकार श्री दत्ता जोशी करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नात त्यांनी मला सहभागी करून घेतलं. या संदर्भातील मतं त्यांच्या समवेत मांडली. या पोस्टद्वारे मी आवाहन करतो की मी तर एक छोटा उद्योजक आहे पण जोशींनी अनेक दिग्गज उद्योगपतींना या विषयावर बोलण्यास उद्युक्त केलं आहे. त्यांच्या यू ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि उद्योग जगताच्या एक एम्प्लॉयेबल युथ म्हणून काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्या.

फक्त आणि फक्त मूल्याधिष्ठित समाज सशक्त राष्ट्र घडवू शकतो. 

Wednesday, 17 June 2020

भास्कर मंडलिक

भास्कर अनंतराव मंडलिक, ऑगस्ट १९४१-१८ जून २००९.

बऱ्याचदा माझे नातेवाईक असं म्हणतात, इतक्या जणांवर लिहितोस पण स्वतःच्या वडिलांबद्दल लिहिलं नाहीस कधी ते! आज अकरा वर्षे झालीत त्यांना जाऊन. इतके फादर्स डे झाले. पण धीर नाही झाला.

जे मला माहिती आहे त्यांच्या बद्दल He was man of people. एमएसईबी मध्ये मंडलिक साहेबांना ओळखत नाही असा माणूस विरळा.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये बालपण गेलेलं. कधी बोलायचे नाही ते त्याबद्दल. पाचव्या वर्षी मातृछत्र हरवलेलं. सावत्र आई आणि तिने दिलेला प्रचंड त्रास. फार वर्षांपूर्वी बोलले होते. काटा आला होता अंगावर ऐकताना. ६३-६४ च्या सुमारास लागले एमएसईबी मध्ये. बी एस्सी की  बी ए होते ते. तिसरं वर्ष पण पूर्ण नव्हतं झालं बहुधा. पण दुनियादारीच्या विद्यापीठात विशेष प्राविण्यासह पास  होते ते. त्यामुळे त्यांचं शिक्षण काय हे विचारायची गरज ही पडली नाही.

"नाही" शब्द नव्हता त्यांच्या शब्दकोशात. परभणी, बीड, यवतमाळ, औरंगाबाद, नासिक, पुणे, मुंबई आणि पुणे अशी भ्रमंती झाली. बाकी महाराष्ट्रातल्या तमाम गावांना त्यांनी भेट दिलेली. प्रवासाची आवड मला त्यांच्याकडून मिळाली यात शंका नाही. प्रचंड कामसू. मंडलिक साहेबांना काम दिलं आणि ते झालं नाही अशी तक्रार नाही कधी, वरिष्ठ आणि कनिष्ठ, दोघांकडून.

घरात कायम लोकांचा राबता. ऐंशीच्या दशकात, मराठवाड्यासाठी पुणे म्हणजे परदेश. भास्करचं घर आहे, या इतक्या माहितीवर परभणी आणि इतर गावातून लोक धडकायची आणि काम करून परत जायची.

बिझिनेस या प्रकारावर फार त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्याला कधीही त्यांनी प्रोत्साहन नाही दिलं. किंबहुना विरोधच केला. एसकेएफ ला जॉबला लागताना त्यांनी अगदी आवर्जून प्रयत्न केले. पण व्यवसायाने बाळसं धरेपर्यंत ते कायम साशंक राहिले. व्यवसायाला चार पाच वर्षे झाल्यावर मात्र थोडा विश्वास वाटू लागला त्यांना. मग ते त्यांच्या मित्रांना कौतुकाने कंपनी दाखवायला आणत असत.

या ना त्या कारणाने त्यांची आठवण निघत असतेच. पण अ....अभियंत्याचा च्या प्रकाशन सोहळ्यात आणि आता नवीन कंपनीच्या पूजेच्या दिवशी मात्र त्यांची आठवण प्रकर्षाने झाली. अर्थात पुस्तक प्रकाशन सोहळा त्यांच्या मित्रांच्या डोळ्यातून पाहिला असेलच. कंपनीचं आजचं रूप पाहून मात्र ते हरखून गेले असते हे नक्की.

एम एस ई बी त आयुष्य व्यतीत केल्यावर आम्हा सर्वांचं व्यवसायिक आयुष्य पाहून त्यांना खूप बहुदा टेन्शन यायचं. अर्थात त्या पिढीतल्या लोकांप्रमाणे कधी बोलले नाही. त्यात सुवर्ण सहकारी बँक प्रॉब्लेम मध्ये आली जिथे त्यांनी काही पैसे गुंतवले होते. या सगळ्यांची परिणीती कँसर मध्ये झाली. १८ जून २००९ ला त्यांना देवाज्ञा झाली.

आजही जुन्या नातेवाईकांना आणि परिचिताना भेटल्यावर भास्कर मंडलिक यांच्या आठवणी आवर्जून काढल्या जातात, यावरून ते किती समृद्ध आयुष्य जगले याची जाणीव होते.


Tuesday, 16 June 2020

चीन आणि आपण

सध्या चीन विरुद्धच्या पोस्टची सोशल मीडियावर धूम आहे. भरीस भर म्हणून ते वांगचुक त्यांची पण समिधा टाकत आहेत. ते टिकटॉक जर आपण डाउनलोड केलं नाही तर राष्ट्रद्रोही अशी भावना तयार झाली आहे. आणि मी जे लिहिणार आहे, त्यात हे प्रकार फालतू आहेत असं अजिबात नाही आहे. मी हे पण लिहिणार नाही की जगभरातल्या युनिव्हर्सिटी मध्ये चायनीज विद्यार्थी सध्या टॉप करत आहेत अगदी आपल्या भारतीय मुलामुलींना मागे टाकून. 

या लेखात मी हे ही लिहिणार नाही की जेव्हा युरोप मध्ये चार दिवसाचा आठवडा ही मागणी जोर धरत असताना चायनीज लोक दिवसरात्र काम करून देशाला पुढे नेत आहेत. चायनीज जिथे आहेत तिथे असण्याची त्यांची लायकी नाही आहे, असं मला ही वाटतं. शेवटी त्यांनी प्रॉडक्ट डिझाइन कॉपी केले आहेत,मग तीन दशकात ८० कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर खेचलं असेल तर ठीक आहे. 

हा लेख आहे भारताने एका क्षेत्रात चीनला कसं नमतं घ्यायला लावलं, त्याविषयी. आणि हा सरकारचा किंवा लष्कराचा विजय नाही. तर भारतातल्या काही कंपन्यांनी चायनीज कंपन्याना केवळ भारतात नव्हे तर जगात कसं झोपवलं, त्याबद्दल हा लेख आहे. 

२००० साली मी बजाज ऑटो चा एच आर हेड झालो. मला १०० डिझाइन इंजिनीअर्स घ्यायचे होते, जगातील सर्वोत्तम मोटासायकल्स बनवण्यासाठी. व्हीजेटीआय आणि आर ई सी कॉलेजेस मध्ये इंटरव्ह्यू घेतल्यावर मला दहा इंजिनियर्स निवडता आले. प्रत्येक वेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सांगायचा की मुलांना टेक्नॉलॉजी कंपनीत जायचं असतं. मी विचारायचो, का, इंजिन डिझाइन करणे हे टेक्नॉलॉजी काम नाही आहे का? बहुतेक बँकेसाठी कोबोल कोड लिहिणे हेच त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी काम होतं, इंजिन डिझाइन करणे हे उत्पादन क्षेत्र म्हणत असावे. 

त्याच्या पुढच्या वर्षी मी कॉलेजेस ला पत्र पाठवलं "तथाकथित टेक्नॉलॉजी कंपनीपक्षा तिप्पट पगार देईल. मला सर्वोत्तम असे १०० इंजिनियर्स हवेत.". बॉडी शॉपिंग करणाऱ्या कंपन्यांना २००० बॉडीज लागायच्या. त्यांना मी ऑफर केलेली सॅलरी देणं शक्य नव्हतं. 

आणि मग बजाज ऑटो चं आर अँड डी डिपार्टमेंट आम्ही उभं केलं. प्रत्येक बॅच मध्ये सोन्याच्या लगडी घेत. सेक्सी मोटारसायकल चं डिझाइन आणि उत्पादन करण्यासाठी आम्ही किंमत मोजली. आमचा निवडीचा रेशो १:१५ होता. इंटरव्ह्यू ला येणारे, अगदी टॉपर्स सुद्धा, निव्वळ दगड होते. पण त्याच दगडाच्या खाणीत आम्ही रत्ने शोधली. त्यांचं इंग्रजी कदाचित कच्चं होतं पण इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल चा जोश होता. 

हाच मार्ग दक्षिण भारतात एका कंपनीने वापरला, टिव्हीएस ग्रुप. त्यांनी सुद्धा खणखणीत आर अँड डी डिपार्टमेंट उभं केलं त्यांच्या मोटारसायकल बनवण्यासाठी. 

२००५ साली ३०% टक्के कमी किंमतीत, चायनीज मोटारसायकल भारतात उपलब्ध झाल्या. डिलर्स चढाओढीने त्या गाड्या विकू लागले. प्रेसने भारतीय मोटारसायकल कंपन्यांचा शेवट असं भाकीत केलं. पण जास्त नाही, फक्त सहा महिन्यात चायनीज मोटारसायकल कंपन्यांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला, ते परत भारतात न येण्यासाठी. 

पुढं मग बजाजने आफ्रिका मार्केटला लक्ष्य केलं. मोटरसायकल ही टॅक्सी म्हणून वापरणाऱ्या आफ्रिकेसमोर दोन पर्याय होते, एक किमती जापनीज बाईक्स किंवा क्वालिटीत रद्दड पण स्वस्त चायनीज बाईक्स चा. चीनच्या किमतीपेक्षा महाग पण उत्तम क्वालिटी च्या बजाज मोटरसायकलने आफ्रिकेत आपलं बस्तान बसवलं. उत्तम वितरण व्यवस्था, सेवा केंद्रे याद्वारे ग्राहकाभिमुख राहत बजाज आफ्रिकेत अव्वल नंबरला आलं आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय टिव्हीएस. चायनीज मोटारसायकल तिथून हद्दपार झाल्या आहेत. 

जे या क्षेत्रात झालं ते, टीव्ही, मोबाईल फोन्स, कंप्युटर्स किंवा फार्मा क्षेत्रात का नाही होऊ शकत? तोच देश, तेच लेबर लॉ, तेच इन्फ्रास्ट्रक्चर पण फरक उद्योजकतेच्या मानसिकतेत असावा. सरकार ची धोरणे हा एक प्रश्न आहेच पण भारतीय उद्यजोकांची झापडबंद मानसिकता हे ही एक कारण आहे. 

भारतीय बाजारपेठेवर चायनीज वरचष्मा असायला सरकार, जनता आणि व्यावसायिक हे तिघेही कारणीभूत आहेत. आणि हा वरचष्मा का नसावा? 

आपल्या आयटीआय झालेल्या मुलाला शॉप फ्लोअर वर काम करायचं नाही आहे, स्टॉक ब्रोकर ला इंजिनीअर पेक्षा जास्त पगार मिळतोय, उत्पादन क्षेत्रातील कंपनीला टेक कंपनी म्हणून मान्यता मिळत नाही आहे, सरकार अजूनही पुरातन लेबर आणि जमीन कायदे बदलायला तयार नाही आहे, आणि उद्योजक गो ग्लोबल च्या गप्पा व्हिस्की चे घोट घेत मारतो आणि कृती शून्य राहतो आणि सरते शेवटी तुम्ही वाचक, हो तुम्हीच, तुमच्या मुलामुलींना शॉप फ्लोअर वर काम करायला प्रेरित करत नाही आहात. हा आपला तसं तर नैतिक भ्रष्टचार आहे आणि त्यामुळेच हे चायनीज आपल्या डोक्यावर बसले आहेत. आपल्याच कचखाऊ वागण्यामुळे आपल्याच घरात येऊन हे चायनीज लोक आपला खिसा रिकामा करत आहेत. 

श्री श्रीनिवास कांथेली यांच्या इंग्रजी लेखाचा स्वैर अनुवाद