आज अंबिका टाकळकरच्या आरंभ संस्थेच्या नवीन वास्तूला भेट देताना अगदी हेच घडलं. २०१२ च्या सुमारास काहीतरी माझ्या डोक्यात खूळ आलं आणि पाच सहा समाजसेवी संस्थेसोबत माझा संवाद चालू झाला त्यापैकी आरंभ एक. या सर्वांशी माझी ओळख झाली तेव्हा असं काही अफाट काम समाजात चालू आहे हे पचवून घ्यायला बराच काळ गेला. आरंभ मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो, कदाचित २०१५-१६ मध्ये तेव्हा ऑटिझम च्या मुलामुलींसाठी अंबिका ने उभं केलेलं काम बघून मी स्तिमित झालो होतो. ती वास्तू, मुलंमुली, त्यांना झालेली व्याधी आणि आपल्या अथक प्रयत्नाने ऑटिझम ला पराभूत करू या निर्धाराला वाहून घेतलेली अंबिका आणि तिची टीम हे सगळं पाहून नतमस्तक झालो होतो.
मग या ना त्या कारणाने अंबिका बरोबर बोलत गेलो. मी पहिल्यांदा जिथे गेलो होतो, तिथून तिने संभाजीनगर च्या पोद्दार शाळेच्या शेजारी संसार हलवला आणि आता तिने वाळुंज पासून पैठण बाजूला ३.५ किमी आत आरंभ साठी जी नवीन संस्था बांधली ती म्हणजे तिने संस्थेसाठी पाहिलेल्या स्वप्नांचा, स्वमग्न आणि गतिमंद मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे म्हणून उत्तम, उदात्त करता येईल त्या प्रयत्नांचा विलोभनीय आविष्कार आहे.
मी अंबिका ला म्हणालो सुद्धा की रस्त्यावरून मला पहिल्यांदा आरंभ ची बिल्डिंग दूरवरून दिसली, तेव्हा पहिली भावना ही आली की तिने घेतलेल्या झेपेने कमालीचा आश्चर्यचकित झालो. आणि ज्या कल्पकतेने तिने आणि आर्किटेक्ट राजेश चौधरी यांनी ती देखणी वास्तू उभी केली आहे तिला तोड नाही. अर्थात हा प्रवास सोपा नव्हताच. निसर्गनिर्मित, मानवनिर्मित आणि करायचं तर उत्तमच या तिनेच स्वतःला दिलेल्या आव्हानामुळे तयार झालेल्या प्रश्नांना अंबिकाने मोठ्या निर्धाराने उत्तरं शोधली. उदात्त, उन्नत याच्या बरोबरीने पारदर्शक कामाला कुठून तरी आर्थिक आणि मानसिक पाठबळ मिळतंच याची प्रचिती पुन्हा एकदा अंबिकाची गाथा ऐकल्यावर आली. पुढच्या महिन्यापासून आरंभ चा प्रवास या नवीन वास्तुतून नवीन उमेदीने पुढे चालू राहणार आहे.
ममता ताई, फळणीकर सर, अशोक, गिरीश कुलकर्णी सर आणि अंबिका सारखे लोक खऱ्या अर्थाने तारे जमीन पर आहेत. ही सगळी लोक आपल्याला ओळखतात, आपुलकीने संवाद साधतात ही खूप सुखावह भावना आहे.
अंबिका, बाळासाहेबआणि त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यासाठी पियुष मिश्रा चे शब्द उसने घेऊन म्हणतो
"आरंभ है प्रचंड"
No comments:
Post a Comment