नवीन वर्षाची सुरुवात करताना परत एका गोष्टीचा पुनरुच्चार करावासा वाटतो की भारतीय उत्पादन क्षेत्र हे अतिशय सकारात्मक संक्रमणातून जात आहे. किंबहुना जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर पहिल्यांदाच जगाच्या पाठीवर वेगवगेळ्या क्षेत्रात अनेक घडामोडी एकाच वेळेस घडताना दिसत आहेत. कोविड १९ झालं, रशिया युक्रेन युद्ध झालं, यूरोप मध्ये सीरिया, जॉर्डन, अफगाणिस्तान, लेबनान सारख्या देशातून असंख्य लोक आश्रित म्हणून आले, चीनची एकूणच शक्ती प्रचंड वाढली, तैवान ला त्याने खुले आव्हान दिले तर युरोप मध्ये अनेक देशात चीनने प्रचंड गुंतवणूक केली, अशी परिस्थिती तयार झाली की जग ग्लोबलायझेशन कडून लोकलायझेशन कडे वळत आहे अशी चिन्ह दिसू लागली, जगात क्रमांक एकवर असलेल्या महासत्ता असलेल्या देशाच्या लीडरशिप ने अनाकलनीय निर्णय घेतले ज्यामुळे जगाची दिशा भरकटल्यासारखी वाटली. भारतात सुद्धा बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, ज्यावर मागे लिहिलं होतं. त्याबद्दल परत लिहीत नाही, कारण मूळ विषय सोडून वेगळ्याच गोष्टींवर चर्चा सुरु होते.
आज भारताचे उत्पादनक्षेत्र जीडीपी मध्ये १५% सहभाग नोंदवतं. येणाऱ्या दशकामध्ये हे गुणोत्तर प्रमाण २५% नेण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत.
हे जरी खरं असलं तरी जगात तयार झालेल्या अनिश्चिततेमुळे (मॅनेजमेंट जार्गन मध्ये याला VUCA जग असे संबोधतात. Volatile, Uncertain, Complex, Ambiguous), दोन गोष्टींचा व्यावसायिकाने विचार करावा असं वाटतं. एक तर जगात काय घडतं त्यापासून आपण इम्यून आहोत या गैरसमजातून बाहेर पडावं. दोन दशकांपुर्वी हे बऱ्याच अंशी खरं असेल, पण आता नाही. आणि दुसरं म्हणजे जगात हे जे काही चालू आहे त्या बदलांचा स्वीकार करणे आणि मुख्य म्हणजे त्या बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणण्यात चपळता दाखवणे. आपलं भविष्य सुरक्षित करण्याची शक्यता या मुळे तयार होईल. खात्री नाहीच.
आपल्या उत्पादनाची आणि सेवेची गुणवत्ता यात सातत्याने सुधार आणणे हा आपला मंत्र असायला हवा. भारताची उत्पादकता आणि गुणवत्ता याबद्दल जगात फारसं चांगलं बोललं जात नाही. अर्थात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय भवताल हा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्पादकता या मानसिकतेला दुर्दैवाने पूरक नाही आहे. पण आजूबाजूच्या इको सिस्टम कडे दुर्लक्ष करत व्यवसायाने अंतर्गत पद्धती या इतक्या सशक्त बनवायला हव्यात की बाह्य मूलभूत अवगुणांचा जगाला विसर पडायला हवा. अवघडच आहे ते, पण घडायला हवं.
एक प्रश्न व्यावसायिकाने सातत्याने विचारायला हवा तो म्हणजे "जगात सर्वोत्तम असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा माझ्या व्यवसायाचं नाव घेतलं जातं का?" त्याचं उत्तर देताना मुक्त पणे "हो" येत नसेल तर बाह्या सरसावून सर्वोत्तम बनण्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे.
२०२६ मध्ये पाऊल टाकताना, पुढील दशकात व्यवसायाची भरभराट कशी होईल, याच्या पायाभरणीवर लघु आणि माध्यम उद्योगांनी जोर देण्यात शहाणपण आहे.
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment