Monday 3 July 2017

कमीज

"भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी?"

या वाक्याने आपलं भावविश्व व्यापून राहिलं आहे. यावेळी आपण त्या समोरच्या माणसाने कुठल्या परिस्थितीत तो पांढरा शर्ट विकत घेतला, तो पांढरा राहण्यासाठी त्याने काय कष्ट घेतले याचा काही विचार करत नाही. एकच सवाल आपलं डोकं पोखरत राहतो

"त्याला माझ्यापेक्षा जास्त कसं काय मिळालं?"

बरं आपल्याला पांढरा शर्ट मिळाला असतो. त्यावर डाग कसा पडणार नाही याची काळजी घेण्यापेक्षा समोरच्याचा शर्ट कसा आणि कधी घाण होईल यावर आपण कुढत बसतो. अगदी सारासार अन विवेकी बुद्धीचा त्याग करत.

रोलॉन मध्ये नोकरी करत असताना माझ्यानंतर एक मुलगा जॉईन झाला. माझ्यापेक्षा थोडा मोठा आणि अभ्यासात हुशार असावा. बॉसने त्याला थोडा पगार जास्त दिला. मी त्याच्यावर उगाच खार खाऊन असायचो. एकदा मी त्याच्या म्हणजे गणेशाच्या घरी गेलो. आई आणि तो दोघेच. आईने बाकी लोकांचं घरकाम करून गणेशला शिकवलं. त्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न लावून चांगल्या घरी दिलं. लग्न होत असताना गणेश इंजिनियरिंग करत होता. त्याने शिक्षण घेताना कॉलेजजवळ एका बिल्डिंगमध्ये वॉचमन ची नोकरी केली. सहा वाजता कॉलेज करून ड्युटी करायचा अन रात्री एक वाजता सायकल मारत दहा किमी घरी यायचा. सकाळी सातला उठून परत कॉलेजला.

मी सर्द झालो. लाज वाटली माझी मलाच. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. कुणाचा शर्ट माझ्यापेक्षा जास्त पांढरा आहे याची मला असूया कमी वाटू लागली.

बाकी जाऊ द्या हो. अंगात शर्ट घालायला मिळतो हेच नशीब. काही लोकांच्या नशिबी तर ते पण नसतं.

Sunday 2 July 2017

गुंतवणूक

एखादी गोष्ट करायची आहे हे बोलून दाखवणं आणि त्याबद्दल स्वतः च्या क्षमतेवर विश्वास असणं यामध्ये एक दुवा असतो अन तो म्हणजे त्यावर करायची गुंतवणूक. ही गुंतवणूक फक्त आर्थिकच असायला हवी असं काही नसतं. ती कधी वेळेची असते तर कधी प्रयत्नांची. ती गुंतवणूक करताना "ही गोष्ट मला करायचीच" या भावनेवर आपलाच पराकोटीचा विश्वास असणं गरजेचं आहे. तो नसेल तर मात्र तोंडातून वाफा दवडण्यात आपली सगळी उर्जा वाया जाते.

म्हणजे बघा, आपल्याला वाटतं की हे शरीर फिट असायला हवं. आपण बोलून पण दाखवतो तसं. मग त्यावर "प्रयत्न" ही गुंतवणूक करतो का? आपल्याला असं वाटतं की आपले कौटुंबिक नातीगोती ही जिव्हाळ्याची हवी. मग त्यावर "वेळ" नावाची गुंतवणूक करतो का? आपल्याला असं वाटतं की आपला बिझिनेस ग्रो व्हावा. त्यासाठी तर वेळ, प्रयत्न आणि पैसा हा तिघांचीही गुंतवणूक गरजेची असते.

मनात येणाऱ्या विचारांना, भावनेला जर गुंतवणुकीचं पाठबळ दिलं नाही तर ते विचार मग पाटेकर, आमटे, नांगरे पाटील यांच्या नावावर खपवणारे कोट्स बनून राहतात.......व्हाट्स अप अन फेसबुकवर फॉरवर्ड्स च्या रुपात इंटरनेटच्या नभांगणात भिरभिरत राहण्यासाठी.

ट्रॅफिक वीर

आज दुपारी कामासाठी बाहेर निघालो. एक टर्न घेऊन उजवीकडे वळायचं होतं. तो टर्न घेत असताना लक्षात आलं की डावीकडे एक इनोव्हा मी जायची वाट बघत त्या टर्नच्या सहा एक फूट अलीकडे शांतपणे थांबली होती, हॉर्न बिर्न न वाजवता. त्यातल्या ड्रायव्हर ने हलकेच स्माईल देत मला "जा" असं खुणावले.

माझ्या लक्षात आलं हे बेणं काही वर्षे अमेरिकेत किंवा युरोप मध्ये राहून नुकतंच भारतात परत आलंय.

मनात आलं, बेट्या फक्त दोन महिने जाऊ दे.  सिंहगड रोड वर रस्त्याच्या मधोमध घुसाघुस करत यु टर्न मारताना तू जर दिसला नाहीस अन सिग्नल हिरवा व्हायच्या आधी प्या प्या करून हॉर्न वाजवला नाहीस तर नावाचा राजेश नाही.

बाहेर राहून कितीही शिस्त वगैरे शिकून आलास तरी ती विसरवण्याची ताकद या देशाच्या ट्रॅफिक सिस्टम मध्ये आहे, हे लक्षात ठेव. कळलं का तात्या!

छत्री

आज कधी नव्हे ते सिंहगडावर छत्री घेऊन गेलो होतो. कंपनीची गॅंग होती बरोबर. त्यांना सिंहगडावर थांबायचं होतं. मला काही कामामुळे परत यायचं होतं. मी एकटाच सिंहगड उतरत होतो. सहसा मी कधी छत्री घेऊन गेलो की पाऊस पडत नाही. आज पडला. तुफान पडला. छत्री असल्यामुळे डोकं फार भिजलं नाही. बाकी कपडे भिजले.

उतरत असताना माझ्या छत्रीची सिंहगड चढणाऱ्या दुसऱ्या एका छत्रीला टक्कर झाली. मी सॉरी म्हणण्यासाठी माझी छत्री बाजूला करून दुसऱ्या छत्रीधारी व्यक्तीकडे बघितलं तर ती एक पंचादश वर्षीय ललना होती. (बाकी मी वर्णन करत नाही. अशा वेळेस भेटणाऱ्या साधारणपणे कशा दिसतात याची तुम्हाला एव्हाना कल्पना आली आहे. म्हणजे तेच आपलं अप्रतिम सौन्दर्य वगैरे)

सॉरी म्हणून पुढे निघून आल्यावर मला तो जुन्या पिक्चर मधील सीन आठवला. जितेंद्र-लीना चंदावरकर वगैरे. दोन छत्रीचा एकमेकांना स्पर्श आणि मग सूचक वगैरे.

सहसा मी छत्री घेऊन जात नाही. पण आज छत्रीचा चांगला वापर झाला. म्हणजे डोकं वगैरे अजिबात भिजले नाही. थोडे कपडे भिजले. पण तितकं चालायचंच.

LinkedIn

हे लिंकड इन आणि फेसबुक यांच्या न्यूज फीड अल्गोरिदम मध्ये बराच फरक आहे असं वाटतं. म्हणजे एखादी पोस्ट हिट गेली तरी फेसबुकवर बरेचसे लाईक्स हे मित्रयादीतून पडतात. मित्रयादीत नसलेल्या लोकांकडून पण लाईक चं नोटिफिकेशन येतं, पण त्यांची संख्या कमी असते. अर्थात ज्यांचे फॉलोअर्स खूप अशा सेलेब्रिटी मंडळींचं हे प्रमाण वेगळं असावं.

लिंकड इन वर एक पोस्ट टाकली होती आठ एक दिवसांपूर्वी. ती अजून चालू आहे. १२५,००० वगैरे व्ह्यूज पडले आहेत. आतापर्यंत १६५० वगैरे लाईक्स आले आहेत. त्यातील खूप कमी जण मित्र यादीत असतील. बाकीचे सगळे बाहेरचे. सेकंड किंवा थर्ड लेव्हल कनेक्शन वाले.

बहुधा फेसबुक आणि लिंकड इन याच्या ऑडिअन्स मध्ये फरक असावा. त्यामुळे असेल कदाचित. पण मी आश्चर्यचकित झालो हे नक्की.

लिंकड इन वर मी आज पावेतो स्क्रीन शॉट टाकून एखाद्याची पोलखोल करण्याचा उद्योग मी आजपर्यंत नव्हता बघितला. तो आज पहिला. फेसबुक अन लिंकड इन मध्ये ते एक साम्य दिसलं बुवा.

अदरवाईज, लिंकड इन वर एकंदरीत चटपटीत पणा, खमंग पणा जरा कमी असतो. पण इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट मार्केटिंग, जॉब पोस्टिंग या व्यवसायाच्या निगडित गोष्टीसाठी लिंकड इन हे फेसबुकपेक्षा खूप बरं पडतं.

(लिंकड इन अन फेसबुक मधील फरक अधोरेखित करण्याचा अविर्भाव पोस्ट मध्ये असला तरी मंडलिकला लिंकड इन वर त्याची पोस्ट कशी पॉप्युलर झाली हे खरं तर सांगायचं होतं असा निष्कर्ष जर कुणी काढत असेल...........तर तो बरोबर आहे)

😊😊

आपलं घर

फळणीकरांनी मला दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचं अभिनंदन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. मी दोन सेकंदात हो म्हणालो. अर्थात प्रमुख पाहुणे म्हणून बिरुद मिरवण्याची ती जागा नाही. मी तसं म्हणालो ते फळणीकर सरांच्या प्रेमापायी. मला आपलं घरला यायला मनापासून आवडतं. त्या मुलामुलींना भेटायला आवडतं. चहूबाजूने ओरबाडून घेणाऱ्या बाहेरच्या जगातून आल्यावर, इथली सादगी बघितली की मी मोहरून उठतो.

सरांनी मला मुलांना मार्गदर्शन करायला सांगितलं. गंमत आहे की नाही. अजून ज्याला त्याच्याच मार्गाचं दर्शन झालं नाही आहे त्याला हे काम, मार्गदर्शन. पण जे काही अनुभवलं त्यावरून दोन शब्द सांगायचा प्रयत्न केला. पण तो ही फसला.

अत्यंत प्रतिकुलतेतून ही मुलं फाळणीकरांच्या वळचणीला आली. त्यांच्या विशाल पंखाखाली ह्या चिमुकल्या पंखांना बळ मिळालेलं पाहून मन भरून आलं. कुठलीही आगा पिछा नसलेली ही मुलं आपलं घरला येतात काय, फुलतात काय अन तयार होतात काय या विश्वाच्या अफाट पसाऱ्याचा एक भाग होण्यासाठी. अन त्या अमर्त्य अशा क्षणांचा मी एक मर्त्य साक्षीदार. सगळंच अद्भुत. निःशब्द झालो. मी आधी एकदा याच मुलांशी तास एक भर संवाद साधला आहे, पण आज नाही जमलं.

पण ठीक आहे, कधी कधी शब्द आवंढ्याबरोबर गिळले तर चालतं, नाही का?

मानवतेच्या या मंदिरात मी कितीवेळा आलोय, याची गणती नाही. दरवेळेस भारावून परत येतो. आजचा दिवस ही त्याला अपवाद नव्हता.



एमनसी ते देशी

बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेपोटी काही जण खूप मोठी कंपनी सोडून एखादी छोटी कंपनी जॉईन करतात. त्यात काही चुकीचं आहे असेही नाही. पण सहसा हे यशस्वी होत नाही. त्याला काही कारणं आहेत.

एकतर मोठ्या कंपन्या, थोडक्यात मल्टी नॅशनल, ह्या सिस्टम ड्रीव्हन असतात. त्या सिस्टम्स, प्रोसेसेस खूप अभ्यास करून लागू केल्या असतात. ते करण्यासाठी अंतर्गत आणि बहिर्गत तज्ञ मंडळी काम करत असतात. त्या सिस्टमने आखलेल्या सीमेच्या आत राहून काम करत राहिलं की रिझल्ट्स येत जातात. तुम्ही फार क्रिएटिव्ह नसलात तरी चालून जातं. काम करण्यात शिस्त असेल तर सिस्टम तुम्हाला रिझल्ट्स आणण्यात मदत करते.

छोट्या कंपन्या या पर्सन ड्रीव्हन असतात. तिथे एकतर सिस्टम्स नसतात. तुम्हाला सिस्टम्स लावाव्या लागतात. पण त्या लावण्यासाठी कंपनीच्या मालकाची मानसिकता असावी लागते. त्याउपर तुम्हाला ही क्रिएटिव्ह असावं लागतं. त्या सिस्टम्सचे रिझल्ट दिसायला वेळ लागतो. कंपनीच्या मालकाने जर सिस्टम्स लावण्यासाठी पैसे खर्च केले असतील  तर तो ते रिझल्ट बघण्यासाठी उतावीळ झाला असतो. ते जर आले नाहीत तर तो ह्या मोठ्या कंपनीतून आलेल्या माणसावर आगपाखड करू लागतो.

त्यामुळे जर कुणी मोठ्या कंपनीत काम केलं असेल, अन त्यातल्या त्यात ती जर मल्टी नॅशनल असेल, तर त्याने देशी आणि छोट्या कंपनीत जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा. मल्टी नॅशनल च्या सिस्टम्स मध्ये तुम्ही फार काही लुडबुड करू शकत नसल्यामुळे नैराश्य येतं. आणि या नैराश्यावर मात करण्यासाठी मग हा प्रोफेशनल निम्म्या किंवा पाव टर्नओव्हर च्या कंपनीत जायचं ठरवतो. पण तिथं त्याची गत आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी होते.

एखाद्या मल्टी नॅशनल चा अनुभव आहे आणि तिथल्या सिस्टम्स पेक्षा कुणाला वेगळं करून दाखवायची खाज असेल तर त्याने छोटी कंपनी स्वीकारताना त्याच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचं स्वातंत्र्य मिळेल का याची खातरजमा करून घ्यावी नाहीतर सरळ स्वतः चा बिझिनेस टाकावा.

मल्टी नॅशनल सारख्या कंपन्या हे अदरवाईज पर्सनल आणि कुटुंबाचं आयुष्य भौतिकदृष्ट्या सुखी करण्यासाठी आदर्श जागा आहे, असं माझं मत आहे......अगदी सोन्याचा पिंजरा वगैरे म्हंटलं तरीही.