Saturday 27 February 2016

तीन देवींया

माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच गेली. आईची आई परभणीला असायची, त्यामुळे त्या आजीचा सहवास हा तिच्या आयुष्याच्या शेवटी घडला. ती काही काळ आमच्या घरी राहिली तेव्हा. त्यामुळे लहानपणात आजी माझ्या वाटेला कमी आली. पण तरीही तीन आज्या अशा आहेत ज्यांच्या बद्दल माझ्या मनात एक तर आदर आहे नाही तर अतोनात प्रेम आहे. त्या माझ्या सख्या आज्या नाहीत. दोघींचं तर आमच्याशी रक्ताचं नातं नाही आहे, पण आगळे ऋणानुबंध आहेत. त्यांची मुलं वा नातवंडं हे वाचतील तेव्हा त्यांनाही कळणार नाही की माझ्या मनाच्या कोपऱ्यात त्या तीन देव्या विराजमान आहेत ते.

१. धोंड आजी: परभणीला पोलीस ग्राउंड ला लागून जी मोडक सरांची शाळा आहे ते आमचं घर होतं. आमच्या बाजूला धोंड मास्तरांचं घर. त्यांचा मुलगा म्हणजे आमचा विनू काका. लक्ष्मीकांत धोंड हे त्याचं खरं नाव. हो, तोच औरंगाबाद आकाशवाणीतून रिटायर झालाय.

तर आई सांगते की मी लहानपणी धोंड आजींकडेच राहायचो. सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत. मला आठवत नाही ते. २-३ वर्षाचं वय ते. मग आम्ही परभणी सोडून वेगवेगळ्या गावांना फिरलो. पण परभणी आणि औरंगाबाद ला धोंड आजींना भेटायचोच, न चुकता. एकंदरीत आमच्या कुटुंबावरच जीव होता त्यांचा. माया वर्षावणे म्हणजे काय याचा अनुभव आजींच्या प्रत्येक वाक्यातून, कृतीतून यायचा.

औरंगाबाद ला विनू काका आणि आजी जवाहर नगर ला राहायचे. मी तेव्हा १३-१४ वर्षांचा असेल.  एकदा बाबांनी मला त्यांच्याकडे सोडलं आणि ते काही कामासाठी गावात गेले. आजींनी मला त्या दिवशी जेवायला त्यांच्यासमोर पाटावर बसवलं. आणि "खा गो माय" करत जेवण भरवलं. माझं जेवण होईपर्यंत त्या फक्त माझ्या डोळ्यात पाहत होत्या. आजही मला ती नजर आठवली की मी कातर होतो.

प्रेम नावाची संकल्पना या दगड मनात जर असेल तर त्याची रुजवात धोंड आजींनी माझ्या बालपणी केली या बद्दल मला शंका नाही.

२. बीडकर आजी: वडगल्लीतल्या बीडकरांच्या वाडयात मंडलीकांच्या घरात आई सून म्हणून आली. आणि आजींनी तिला पोरीसारखं वागवलं, असं आईच सांगते. या आजीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कितीही वर्षांनी त्यांना भेटलो तरी ते काळाचं अंतर पहिल्या एक दोन वाक्यात मिटवून टाकायच्या. आणि हा गुण बिडकरांच्या नातवापर्यंत उतरला आहे.

परभणीला सातूचं पीठ मिळतं. त्याची आवड मला लहानपणी असावी. नंतर कित्येक वर्ष, म्हणजे मी डिप्लोमा होईपर्यंत मी कधीही परभणीला गेलो की आजी पहिले सातूचं पीठ आणून ठेवायच्या.

त्या बहुधा आमच्या कुटुंबाची विचारपूस करत असाव्यात. कारण आम्ही कधीही भेटलो की त्यांना आमचं काय चालू आहे याची बऱ्यापैकी माहिती असायची.

भास्कर आणि कुमुद मंडलीक यांचा संसार मार्गी लागण्यामागे बीडकर आजींचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळेच २००२ साली आई बाबा जेव्हा युरोप ला पहिल्यांदा परदेश दौऱ्याला गेले तेव्हा मोठ्या कुणाला नमस्कार करावा म्हणून माई अण्णांना भेटले. त्यावेळी त्या चौघात जो मूक संवाद झाला त्याचा मी साक्षीदार होतो. त्या आसवांमध्ये मधली कित्येक वर्ष वाहून गेली. नवीन लग्न झालेल्या आईबाबांवर १९६१ मध्ये बीडकर वाड्यात माई अण्णांनी जसे आशीर्वाद वर्षावले असतील तीच असोशी, त्या दिवशी मला दिसली.

३. बाई आजी: ह्या खरं तर माझ्या आत्या. पण मी त्यांना बाई च म्हणायचो, त्यांच्या मुलांप्रमाणे.  माझ्या अत्यंत आवडीचं आणि मनात आदर असलेल्या कुटुंबापैकी एक. औरंगाबाद चं कुलकर्णी कुटुंब. विल्को, पैठण गेट जवळचं दुकान. मानव्याचा अंश जर माझ्यात अजूनही उरला असेल तर ते यांचं श्रेय.

बाईचं प्रेम म्हणजे गजब होतं. राजेश ला केलेला पदार्थ आवडतो म्हणून वाटीत काढून ठेवणे, कधीही गेलो तरी जेवायला देणे. त्या एकूणच जेवणाची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे आणि तो डायनिंग टेबल चा माहोल माझ्या मनात.

त्यांच्या घरात राहत मी डिप्लोमा झालो आणि मग बी ई होत, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, बाई जाई पर्यंत मी त्यांच्याकडे जात राहिलो, अगदी शेकडो वेळा. आणि जर त्यांच्याकडून मी जर बाहेरगावी जात असेल तर प्रत्येकवेळी, अक्षरश: प्रत्येकवेळी, त्यांनी माझ्या हातावर आणि देवासमोर सुपारी ठेवून मला पसाभर आशीर्वाद दिले आहेत.

 दैनंदिन रगाड्यात त्या तिघी विस्मरणात जातात. पण जेव्हा कधी त्यांचा कुणाचा विषय निघतो तेव्हा हटकून त्यांची आठवण येते आणि मग समोरचं धूसर दिसू लागतं.

आज या तीन देवींया स्वर्गात आहेत. पण आयुष्याची वाटचाल करताना त्यांचे बरसणारे आशीर्वाद मंडलिकांचं अंगण चिंब भिजवून टाकत असतील हे नि:संशय.

Saturday 20 February 2016

ध्यान

सध्या मी ध्यान लावणे या नवीन प्रेमप्रकरणात दंग आहे. ते करताना चेहऱ्यावरचे चे विविध हावभाव होतात त्यावरून "कसलं ध्यान आहे" हा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा असा मला दाट संशय आहे. तर सध्या हे new found love असल्यामुळे मी सगळी नाटकं करतो. म्हणजे खिडक्यांचे पडदे लावणे (हो, मी ध्यान लावताना सुद्धा खिडक्यांचे पडदे लावतो), टिक टिक करणारे घडयाळ दुसऱ्या रूम मध्ये नेवून ठेवणे, नळातून पाण्याचे थेंब पडताना टप टप असा जो आवाज येतो तो बंद करणे, उकडत असेल तरी पंख्याचा स्पीड एक वर ठेवणे (कारण स्पीड दोन नंबर वर ठेवला असता पंखा आवाज करतो), दरवाजा लोटून घेणे असं सगळं काही करतो. हो दरवाजा फक्त लोटून घेतो, कडी लावत नाही.  च्यायला, ते ध्यान करण्याच्या नादात समजा गचकलोच तर दरवाजा तोडण्याचा खर्च नको हा सुज्ञ विचार करतो. (कडी लावत नाही, यावर काही अश्लील विचार आणि प्रश्न फक्त लिहिणाऱ्याच्या मनात यायला परवानगी आहे, वाचणाऱ्याच्या नाही).

तर काल हे सगळे सोपस्कार करून मी ध्यानाला बसलो. मध्ये मध्ये येणाऱ्या अनेक आवाजांकडे दुर्लक्ष करत मी त्यावर श्रद्धा ठेवत ते अर्धा तास पूर्ण कधी होतील याची वाट पाहत होतो. तितक्यात हॉल मध्ये माझा फोन वाजल्याचं मला ऐकू आलं. म्हणजे दुसर्यांसाठी  मला ऐकू नाही आलं. आणि नील काही तरी बोलला असं जाणवलं.

कसंबसं मी ते ध्यान प्रकरण संपवलं. मध्ये एक ते दोन मिनिटासाठी का होईना अंतराळातल्या  निर्वात पोकळीमध्ये हा देह गेला याची अनुभूती घेतली… असं मनाला बजावलं आणि दिवसभरासाठी उर्जा आपल्या देहात शिरली ही भावना मनात साठवत चहा पिण्यासाठी बाहेर आलो.

तितक्यात वैभवी म्हणाली "अरे, तुला कुणाचा तरी फोन आला होता." आता खरं तर मला फोनची रिंग ऐकू आली होती. पण ते दुसर्यांना सांगायचं नसतं. मी साळसूदपणे म्हणालो "हो का? मला नाही कळलं. कुणी तूच घेतला का फोन?" नील फोन वर बोलला हे ही खरं अंधुकसं जाणवलं होतं मला. पण मला ध्यान लागलं होतं याचा पुरेपूर अभिनय करत होतो.

"नाही, मी नाही. नील नेच घेतला होता फोन" वैभवी उवाच. तो पर्यंत तिने चहा पण समोर आणून ठेवला आणि नजरेनेच म्हणाली "हं, गिळा" आम्ही दोघे अजूनही नजरेची भाषा बोलतो, पण ती ही  अशी.

मी तिथूनच नील ला विचारलं "काय रे, कुणाचा फोन होता?"

"कुणी देशपांडे काका होते" नील वदला.

"काय सांगितलंस मग तू?" मी.

नील ने याक्षणी वैभवीकडे बघितलं. ती गालातल्या गालात हसत होती. मला धोक्याची जाणीव झाली. मी नीलला बोललो "हं सांग, काय म्हणालास त्यांना?"

"काही नाही, मी सांगितलं. पप्पा मेडीटेशन करतो म्हणून रूम मध्ये गेलेत पण actually ते  ……………

एक पॉज घेऊन

 ………. बसून झोपलेत"

हे ऐकल्यावर हातातल्या कपातून चहा सांडल्यामुळे पायाला चटका बसला ते अजून एक वेगळंच दु:ख.

Friday 19 February 2016

असा मी, कसा मी

साधारण ७८-७९ ची गोष्ट असेल . बाबा एम एस इ बी त असताना कामानिमित्त बाभळेश्वर ला जायचे. एकदा मी तिथून त्यांच्याबरोबर शिर्डीला गेलो. समोर साईबाबांची धीर गंभीर मूर्ती आणि त्या अख्ख्या मांडपात ८-१० लोकं. दहा एक वय असेल माझं. पण हरखून गेलो होतो. पुढे मग ९१-९२ ला मी थेउर ला गेलो होतो. त्या मंदिरातली शांतता पाहून मी अक्षरश: ट्रान्स मध्ये जायचो. अगदी टोटल ब्लीस.

साधारणपणे माझ्यासारख्या साध्या माणसाच्या श्रद्धेचा धंदा झालेला पहिल्यांदा जाणवलं ते ९८-९९ च्या सुमारास. मी, वैभवी आणि यश पंढरपूर ला गेलो होतो. रांगेत उभं असताना एका पुजार्याने मला एका पूजेबद्दल सांगितलं आणि म्हणाला "रु १५१ होतील" मी तयार झालो. रांगेतून बाहेर काढलं. पुजेसारखं काहीतरी सांगितलं आणि नंतर रांग मोडून गाभाऱ्यात नेलं. तिथल्या पुजाऱ्याने बाकी लोकांना थांबवलं, जी बहुतांश आजूबाजूच्या गावातील गरीब जनता होती. यश ला त्या विठ्ठलाच्या पायावर लोळवलं. ३-४ मिनिटे आम्ही तिथंच गाभाऱ्यात होतो. बाहेर आलो आणि बघतो तर पुजारी एकेकाचा हात धरून ढकलून सेकंदात बाहेर काढत होता. १५१ रुपयांनी भलतीच कमाल दाखवली होती.

त्याआधी कधीतरी  शनि शिंगणापूर ला गेलो. सध्या बरंच काही घडतंय या मंदिरावरून. त्यावेळी गुलशन कुमारने नुकतंच या मंदिराला फ़ेमस करून टाकलं होतं. त्या मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण हे ढोंगीपणाच आणि दांभिकतेच कळस होतं. तिथल्या आंघोळीची नाटकं, ते तेल वाहणं, स्त्रियांना प्रवेश नसणं हे अंगावर येऊ लागलं. तिथे जाण्याचं तेव्हा जे मी नाव टाकलं ते आजतागायत.

 शिर्डी, तिरुपती, तुळजापूर, पंढरपूर याठिकाणी नंतर गेलोही. पण देवाचं आणि माझं कनेक्शन मात्र तिथल्या अनेक घटकांनी तोडलं. अष्टविनायक या धंदेवाईक प्रकारापासून लांब होतं. पण सध्या तिथेही बजबजपुरी मांडली आहे.

सत्यनारायण पूजा हा एक अनाकलनीय विषय. लहानपणी ते कलावती, राजा, व्यापारी यांच्या कथा ऐकून कळायचं नाही, हे कसं शक्य आहे? पण विचारणार कुणाला. आई इतकं भक्ती भावान करायची की गप्प बसायचो. काही वर्षापूर्वी, म्हणजे आई च्या भाषेत मला शिंगं फुटल्यावर, मी हळूहळू तो प्रकार बंद केला. कुणास ठाव ते पाच अध्याय न ठेवता नुसतं मम, आत्मन:, श्रुतिस्मृती, पुराणोक्त हे इतकंच राहिलं असतं तर कदाचित आज ही वर्षातून एकदा का होईना ती पूजा केली असती.

त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या घरावर मजले चढवणाऱ्या नारायण नागबळी ची कथा पण काही वेगळी नाही. अतिशय नियोजनबद्ध मार्केटिंग चालतं त्याचं.

२००४ साली मानसिक स्थिती खराब होती किंवा अगदी सप्टेंबर मध्ये Angioplasty झाल्यावर आई म्हणाली "आज काल तू देवाधर्माचं काही करत नाहीस. मग हे असलं काही तरी होतं. जा एकदा पाया पडून ये." गेलो खरा, पण माझ्या कमकुवत झालेल्या मनाचा वापर करून पूजेचा बाजार मांडणारे सौदागर पाहून, आता काही या श्रद्धेचा भाव लावण्याच्या पद्धतीपुढे आपला काही निभाव लागणार नाही हे लक्षात आलं.

ही चराचर सृष्टी ज्याने बनवली त्या विधात्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवेल ही, पण त्याच्या असण्यावरून माझ्या जगण्यातील कृतींवर जर नियम लागू होत असतील तर तो माझ्या मानसिकतेचा पराभव असेल.

तर दोस्तानो, आहे हे असं  आहे. या मधल्या दलालांनी, तो जो कोणी विधाता आहे, त्याच्यात आणि माझ्यात प्रेमभाव उत्पन्न करण्याऐवजी भीतीची भावना रुजवली. देवळात जाणं म्हणजे, एखाद्या नातेवाईकाच्या कौलारू घरातला एकेकाळचा  सहज वावर, त्यानेच बांधलेल्या पंचतारांकित घरात संभ्रमित, भांबावलेला असा झाला आहे. त्यामुळे "देव आपणात आहे, शीर झुकोवनिया पाहे" असं  म्हणत मी घरातल्या आरशासमोर उभा राहून राहून नमस्कार करण्यात आजकाल धन्यता मानतो आहे.

असा मी, कसा मी 

Tuesday 16 February 2016

Z

एक ट्रेनिंग प्रोग्रॅम चालू होता. ट्रेनर ने चार भूमितीचे आकार सांगितले. सर्कल, त्रिकोण, चौरस आणि चौथा आकार म्हणजे विचित्र होता झेड आकाराचा.

सहभागी असलेल्या लोकांना त्यांनी आवडता आकार कुठला ते लिहायला सांगितले. मग प्रत्येक आकार तो म्हणायचा आणि ज्यांना तो आवडतो त्यांनी  हात वर करायचा.

सर्कल, उपस्थितांपैकी 8 एक जणांनी हात वर केले.

त्रिकोण, 12 जणांनी हात वर केले.

चौरस, 10 जणांनी अनुमती दाखवली.

झेड आकार आवडतो असं सांगणारा मात्र एकंच दिवटा निघाला. सगळे जण त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. त्याला ही खूप अवघडल्यासारखं वाटू लागलं.

त्या ट्रेनर ने प्रत्येक आकाराचा अर्थ सांगायला सुरुवात केली. सर्कल आवडणाऱ्या लोकांचे गुणविशेष, त्रिकोण ज्यांना भावतो त्याची खासियत आणि चौरस ज्यांना आवडतो ते कसं काम करतात हे सांगितलं.

आता राहिला झेड आकाराचा अर्थ. बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर कुतूहल तर ज्याने झेड आकार आवडतो असं सांगितलं त्याला टेन्शन. झेड, हा काय आकार आहे. कुठून ते लिहिलं असंही वाटून गेलं.

ट्रेनर म्हणाला "शक्यतो झेड आकार ज्यांना आवडतो ते हुशार नसतात, पण आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे असतात. आलेल्या परिस्थितीला तोंड कसं दयायचं हे त्यांच्या पटकन लक्षात येतं, कारण ती लोकं रिजिड नसतात, तर adaptable असतात. We should have at least one in the organisation who likes Z shape and we are lucky to have one in our group"

अचानक त्या मुलाकडे सगळे कौतुकाने पाहू लागले. सगळ्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं. अगदी शब्दांच्या गर्दीत, एरवी दुर्लक्षित असलेला समासातला शब्द लक्ष वेधून घेतो, तसंच. 

मानसिकता

माझा एस के एफ चा पहिला पगार 1989 साली रु 1100 होता. त्यावेळी समोसा एक रुपयाला मिळायचा. पिशवीभर भाजीसाठी दहा ते पंधरा रु पुरायचे. हॉटेल मध्ये गेलो असता इडली प्लेट दोन ते तीन रुपयाला असायची.  तिघांनी मिळून नॉन व्हेज खाल्लं तर एकशे दहा ते एकशे वीस रु बिल यायचं. 1996 साली मी जेव्हा हिरो होंडा घेतली तेव्हा गाडीची किंमत पस्तीस हजार होती आणि माझा पगार सतरा हजार होता.

गुणोत्तर प्रमाणात आज ही हे असंच आहे. इंजिनियर ला बर्यापैकी कंपनीत साधारण 15000 हजार मिळतात. म्हणजे हिशोबाला माझ्या पहिल्या पगाराच्या पंधरा पट. चहा आता पंधरा रुपयाला मिळतो. भाजीची पिशवी भरायला 225 ते 250 रु लागतात. तिघे जण नॉनव्हेज जेवायला गेलं तर 1200 रु लागतात. इडली प्लेट 40 रुपयाला मिळते. सात वर्ष नोकरी केली तर जितका पगार मिळतो त्याच्या दुप्पट किमतीत बाईक येते.

मग चुकतंय कुठे. दोन गोष्टीमध्ये हे गुणोत्तर प्रमाण हुकलय. एक घर. वीस वर्षांपूर्वी असलेला पगार आणि घराच्या किंमती याचं प्रमाण विस्कळीत झालं आहे. आणि शिक्षणासाठी मोजावी लागणारी किंमत.

घर लवकर व्हावं या लालसेपोटी आज काल नवीन कमाई चालू केलेला तरुण वा तरुणी होम लोन च्या सापळ्यात आपली मान अलगद अडकवतात. कारण स्वतः चं घर असल्याशिवाय पोराचं लग्न जमत नाहीत. आणि मग महागाई आहे म्हणून त्यांचे आई वडील आवई उठवतात.

आणि दुसरं जे नोशनल आहे, ते म्हणजे जाहिरातींना फासणारी आपली मानसिकता आणि आपल्याच खिशातून पैसे हळूच काढून घेणारे वेगवेगळे avenues. पगार 15000, मोबाईल मात्र 20000 हजाराचा. महिन्याला नेट पॅक. आज मॅकडोनाल्ड, उद्या डॉमिनोज, परवा अजून काही. पेट्रोल 20 रुपयाचं भरणार पण गाडी 70000 हजाराची यामा. हा ग्रिडीनेस. एक गंमत सांगतो. कॅम्प मधल्या बाटा मध्ये 2000 च्या खाली शूज मिळत नाही आणि सिंहगड रोड च्या बाटा मध्ये 1200 च्या वर. आता मला कॅम्पात च जलसा करायचा तर तेवढे वट्ट मोजावे लागतील गुरू.

आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मी आणि माझी पिढी. आमची कमाई तर पंचवीस वर्षांपूर्वी जितकी होती त्याच्या किमान 100 पट झाली आहे. ते सहसा कुणी बोलत नाही पण पंधरा पट महागाई झाली हे मात्र अगदी रटरटून सांगत असतो. ऐसा नही चलेगा बॉस.

खरं तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या प्रमाणात वाढल्या नाही आहेत. आणि तिलाच श्रीमंती म्हणत असावेत.

पेट्रोल, दूध, अन्न धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या किमती कमाईच्या प्रमाणात वाढल्या नाही आहेत.

वाढली आहे ती आपल्या सगळ्यांची हाव. वाढली आहे ती जे आहे त्यात खुश न राहण्याची मानसिकता.

पॅटी

बाहेर फिरलं की एकेक वल्ली लोकं भेटतात. एखादं वाक्य असं टाकतात की आपण चकित होऊन जातो.

२०१० चा अमेरिका दौरा. मी एका 20 जणांच्या ग्रुप चा सदस्य होतो. ग्रुप लीडर म्हणून कन्नडिगा श्री होता. डेट्रॉईट ला आमचा दौरा संपणार होता आणि प्रत्येक जण सेपरेट होणार होता. शेवटच्या दोन दिवसासाठी आम्ही एक मिनी बस घेतली होती. पहिल्या दिवशी इंडस्ट्रियल व्हिजिट आणि दुसऱ्या दिवशी मिशिगन युनिव्हर्सिटी आणि एका अत्यंत हाय टेक युनिट ला भेट. दुसऱ्या दिवशी श्री कल्टी मारून नायगारा ला जाणार होता. म्हणून त्याने मला ग्रुप लीडर केलं होतं. लीडर म्हणजे काय तर आपली मंडळी कुठे टाईम पास करत बसली तर त्यांना शोधून घाई करत बस मध्ये आणायचं.

तर ती मिनी बस आपल्यासारखी नव्हती. म्हणजे आतमध्ये सोफा सदृश सिटिंग व्यवस्था. सगळे समोरासमोर बसून गप्पा मारायचे. अतिशय स्वच्छ आणि चकाचक. आतमध्ये, माईक, म्युझिक सिस्टम, छोटा फ्रीझ, त्यात पाणी बॉटल, कोल्ड ड्रिंक्स वैगेरे. सगळी व्यवस्था. (व्यवस्था कुठली, ते जाणकार सांगू शकतील).

आता पोस्ट ज्या कारणामुळे लिहितोय ते. त्या लांबलचक बस ची चालक, पॅट्रिशिया उर्फ पॅटी. वय वर्ष ६५, अर्थात हा माझा अंदाज. विचारणं शक्यच नाही. बॉब कट, शर्ट पॅन्ट, चेहरा एकदम चकचकीत, त्यावर मिश्किल हास्य, सुस्पष्ट भाषा म्हणजे आपल्याला कळेल अशी, बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास आणि अत्यंत witty व हजरजबाबी.

हॉबी बिझिनेस म्हणून ही भलीमोठी बस चालवायची. आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस. बाकी तिचं आणि नवऱ्याचं फार्म हाऊस होतं. शहरापासून दूर. घोडेस्वारी हा तिचा छंद. पाहिलं प्रेम तो घोडा आणि दुसरं प्रेम म्हणजे ती बस. ज्या पद्धतीने तिने बस ठेवली त्यावरून दिसायचंच ते.

ती बस पळवायची पण कचकचवून. ८०MPh वैगैरे. ती बस आणि रस्ते असे की सालं पोटातलं पाणी हलायचं नाही. प्रयोग नाही केला पण बियर चा ग्लास भरून मधल्या टेबल वर ठेवला तर अजिबात हिंदकळणार नाही.

मिशिगन युनिव्हर्सिटी तुन प्रोफेसर मुझुमदारांच्या कंपनीत जायचं होतं. स्वतः प्रोफेसर त्यांच्या कार मधून येणार होते. आमचा एक सदस्य त्यांच्या कार मध्ये बसला. त्यांनी मला त्यांच्या कंपनीचा एड्रेस दिला. आम्ही सगळे बस मध्ये बसलो. कंपनीचा पत्ता पॅटी च्या हातात देत मी आपल्या मराठमोळ्या स्वाभाविकतेने म्हणालो "just follow that car" तर ती षष्ठादशीय तरुणी चिडण्याचा मोहक अभिनय करत माझ्याकडे बघत म्हणाली "Hey young man, don't ask me to follow any car. This paper is enough to take you there. I drive on my own terms and do not follow any one." असं म्हणत त्या बस सम्राज्ञीने स्टार्टर मारला आणि वाऱ्याच्या वेगाने ते अजस्त्र धूड रस्त्यावरून धावू लागलं.

आज सहा वर्षं झालीत या गोष्टीला, पण कुणी मला "कारने माझ्या मागे या" असं म्हंटलं की त्या पॅटी चा चेहरा डोळ्यासमोर तरळतो.

Wednesday 10 February 2016

अध्यात्म

४० रुपयाला डॉलर असं म्हंटल्यावर त्यांच्याबद्दल माझ्याही मनात अढी तयार झाली होती. पण खरं सांगायचं तर त्या व्यतिरिक्त त्यांच्याबद्दल काही विचित्र गोष्ट काही ऐकवात नाही आली. मग परवा त्यांच्याच संस्थेचा एक Management प्रोग्रॅमही अटेंड केला. सुदर्शन क्रिया हा त्या कार्यक्रमाचा भाग होता. या आधी मेडीटेशन करण्याचा बऱ्याचदा अयशस्वी प्रयत्न केला होता. सुदर्शन क्रिया केल्यावर मात्र मेडीटेशन च्या थोडं का होईना पोहोचलो असं वाटलं. म्हणजे काय ते अनुभूती का काय ते जाणवलं. पण……

खरंच, हा "पण" फार बेकार प्रकार आहे…….

पण तरीही मनात प्रश्न उभे राहिलेच. म्हणजे कसं आहे, की मी जीवनधर्म म्हणून भौतिक सुखाची आस ठेवणारा भांडवलवाद स्वीकारला आहे. मग त्याद्वारे येणारे ताणतणाव, त्याला हाताळण्यात आलेलं अपयश, भविष्याबद्दलची भिती या सगळ्यावर मात करण्यासाठी अध्यात्मात काही मार्ग मिळतो का, याची चाचपणी करत असतो. आणि मग त्या प्रयत्नाचा भाग म्हणून Management प्रोग्रॅम च्या नावाखाली सुदर्शन क्रिया शिकलो. खोटं कशाला सांगू, मला क्रिया आवडली. आणि सकाळच्या व्यायामाचा भाग म्हणून सध्या न चुकता करतो पण आहे.

तर प्रश्न असा आहे की, तुम्ही तर अध्यात्मापासून जीवनप्रवास चालू केला. असं असताना, तुम्ही का भौतिकतेची वाट धुंडाळताय? म्हणजे त्या अध्यात्मिक प्रवासात असं कोणत्या सुखापासून तुम्ही वंचित राहिलात, जे तुम्ही ऐहिक आयुष्यात, भांडवलशाहीत शोधता आहात? एक हजार एकर चा परिसर म्हणे, त्यावर सात एकर चं स्टेज, ३५ लाख लोकं, पंचतारांकित हॉटेल मध्ये कॉन्फरन्स, रु १०० कोटीच्या वर एकूण खर्च. (सात एकर स्टेज वर विश्वास बसत नाही ना. पण आहे म्हणे. एका कोपऱ्यावरून दुसर्या कोपऱ्यात जायला इलेक्ट्रिक व्हेईकल आहे म्हणे) तर अशा एकूण अगडबंब पैशाच्या उधळपट्टीने अध्यात्मिक मार्गावर चालताना मिळालेली मन:शांती ढळत नाही का? असा प्रश्न माझ्या न्यानोसाईज च्या मेंदूत वळवळलाच.  

तुम्हाला खरं ते सांगतो, शंभर लोकांच्यावर गर्दीला जो आपल्या वक्तव्याने खिळवून ठेवतो अशा नगरसेवकालाही आम्ही सलाम करतो. तुम्ही तर लाखो लोकांना जमवता. बरं, आमच्या राजकारण्यांना पैसे देऊन गर्दी जमवावी लागते. तुमच्या इथे मात्र लोकं हजारो रुपये मोजून हजेरी लावतात. त्यामुळे तुमच्या वेगळेपणाबद्दल शंकाच नाही. तुम्ही उभ्या केलेल्या व्यासपीठावर ए पी जे पासून ते पंतप्रधानापर्यंत ते देशोदेशीच्या नेत्यापर्यंत मंडळी तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहतात.  हे असं असलं तरी आमचे डोळे मुकेश अंबानींच antaliya बघताना जितके विस्फारतात तितकेच तुमच्या १००० एकरावर साजरा होणाऱ्या ३५ व्या वर्धापनदिनाबद्दल  ऐकलं की गरगरतात.

तुम्हाला म्हणून आतली गोष्ट सांगतो, हे आम्ही अर्धे भांडवलवादी आणि अर्धे समाजवादी लोकं सुदर्शन क्रियेबरोबर Art of Leaving हळूहळू का होईना शिकतो आहोत. त्यामुळे Art of Living  शिकायला फार कष्ट पडू नये. पण तुम्ही मात्र आमच्यापेक्षा खडतर मार्ग निवडला आहे असं म्या पामराला वाटतं.

चुभूदेघे 

Friday 5 February 2016

चौर्य कर्म

हॉटेल च्या रूम मध्ये बॉडी लोशन, बाथ जेल, किंवा शाम्पूच्या बाटल्या मिळतात. त्या संपल्या नाहीतरी ते अजून आणून ठेवतात. काहींचा वास फारच मस्त असतो. एक्स्ट्रा असल्यामुळे आता मी त्या सराईतपणे घरी नेतो. पण सुरुवातीचे काही दिवस मात्र जेव्हा मी हे घेऊन जायचो तेव्हा घरी आल्यावर मला रात्री झोपल्यावर, रिसेप्शन मध्ये आपली bag चेक केली आहे आणि त्यातून या बाटल्या सापडल्या या गोष्टीवरून मला हॉटेल चे मंडळी यथेच्छ बदडतात आहेत, अशी स्वप्न पडून मी जागा व्हायचो. ही अशी स्वप्न पडणं बंद पडली ते ७-८ वर्षापूर्वी.
झालं असं की आमचा कॉलेज चा एक मित्र होता. त्याचं नाव आपण पक्या ठेवू. तर आमचा हा पक्या हॉस्टेल मध्ये खूप कळकट राहायचा. म्हणजे आम्ही फार स्वच्छ राहायचो असं नाही. पण पक्याची अस्वच्छता दिव्य होती. टॉवेल त्याने कुठलाही रंगाचा घेऊ दे. काही दिवसात त्याचा एकच रंग, काळा. नाशिक पुणे रस्त्यावर त्याचं गाव आहे. ७-८ वर्षापूर्वी मी त्याच्या घरी गेलो होतो. खूप दिवसांनी भेटायला गेलो होतो. थोडया गप्पा झाल्यावर मी पक्याला बोललो, मी जरा फ्रेश होतो.
बाथरूम मध्ये जाताना पक्याने मला सांगितलं "मंड्ल्या, आत दोरीवर टॉवेल आहे तो घे." मी फ्रेश वगैरे झालो आणि तोंड पुसण्यासाठी तो टॉवेल घेतला. मस्त मऊ, टर्किश, ऑफ व्हाईट रंगाचा टॉवेल. मला कौतुक मिश्रित आश्चर्य ही वाटलं. आयला, पक्या सुधारला. कॉलेज मध्ये कसला गचाळ राहायचा. कसला तो टॉवेल असायचा. ह्या विचारात असताना मी मऊ टॉवेल दोरीवर परत वाळत घातला आणि खाली सहज म्हणून लक्ष गेलं तर तिथं टॉवेल वर लिहिलं होतं "हॉटेल सुप्रभा".
हे सगळं आठवलं कारण काल चेन्नै ला होतो. रूम मध्ये चेक इन केल्यावर पाहिलं तर तिथे टी मेकर नव्हता. खरं तर तो असतो तेव्हा मी त्याच्याकडे ढुंकून ही पाहत नाही. पण आता नाही असं दिसलं, की पित्त खवळलं. माझं पित्त असं सोयीस्कर खवळतं. म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा करायला आले की मी गपगुमान पैसे देऊन मोकळा होतो. अशा वेळी ठेचला गेलेला अभिमान हा अशा हॉटेल मध्ये उफाळून येतो. सकाळी टेचात रिसेप्शन ला चार गोष्टी ऐकवून टी मेकर मागवला. आणि चेक आऊट करताना त्यांना परत विचारलं, टी मेकर का नव्हता म्हणून. त्यांनी जे सांगितलं ते भारी होतं.
दहा दिवसापूर्वी एका लग्नासाठी पंधरा रूम पार्टीने बुक केल्या होत्या. त्यापैकी तीन रूम मधले टी मेकर पाहुण्यांनी पळवून नेले होते. टॉवेल, पातळ चादर ठीक आहे. पण टी मेकर? आयला, कठीण आहे.
चला, एका पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवायला निघालो आहे. चेन्नई च्या घटनेचा आदर्श ठेवून घरचा सहाचा काटे चमच्याचा सेट पूर्ण करायला जे दोन कमी पडत आहेत त्याची लेव्हल करावी की काय या घोर विचारात आहे. 😊😊



Wednesday 3 February 2016

रात्र काळी

ते गाणं कधी ऐकलं ते आठवत नाही, पण बहुधा ९२-९३ वगैरे असेल. अशोक हांडेंचा मंगलगाणी दंगलगाणी असावा. ऐकल्या सरशी ते इतकं आवडलं गाणं की ज्याचं नाव ते. बरं पूर्ण गाणं कोरस मध्ये. ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव माहित नाही, ज्यांनी गायलं ते हि प्रसिद्ध नाहीत, ज्यांनी संगीतबद्ध केलं त्यांचा पत्ता नाही. बरं गाण्याचा अर्थ शोधावा तर तो ही कळेना. पण......

पण तरीही या गाण्याची सादगी आपल्याला अक्षरश: स्तिमित करून जाते. यात खूप आलापी नाही, पण जे हलके मुरके आहेत त्यांनी गाण्याची नजाकत वाढवली जाते. इथे नक्कीच गाण्याचा अभ्यास असणारे बरेच जण आहेत, त्यांनी याचा अर्थ सांगावा अन हे गाणं कशावर बेतलं आहे ते पण सांगावं. मी तर हे गाणं काळ्या रंगाची महती सांगणारं आहे असं समजून माझ्या रंगावर खुश आहे. या गाण्यातले शब्द अगदी मस्त निवडले आहेत. कानामध्ये ते गुदगुल्या करतात. अत्यंत कमी ऑर्केसट्रेशन मध्ये सुरेल वादनातलं हे गाणं मनाला भुरळ पाडत राहतं, मोहवत राहतं. एकदा ऐकलं की दिवसभर याची चाल मनात गुंजत राहते.

चार एक महिन्यातून हे गाणं ऐकलं की मी साधारणपणे २० एक वेळा वाजवतो. कट्यार ची गाणी ऐकल्यापासून आमच्या बारक्याला मराठी गाणी आवडायला लागली आहेत. त्यालाही ऐकवलं, तो ही येडा झाला.

रात्र काळी, घागर काळी ।
यमुना जळें ही काळीं वो माय ॥१॥

बुन्थ काळी, बिलवर काळी ।
गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥

मी काळी, कांचोळी काळी ।
कांस कासौळे ते काळीं वो माय ॥३॥

एकली पाण्याला नव जाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी ।
कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ॥५॥

Monday 1 February 2016

हेल्मेट

ज्यांची मनगटाची ताकद फक्त ३० डिग्री Accelerator फिरवण्यात धन्यता मानते. किंवा जे पायाचा उपयोग कारचा स्पीड वाढवण्याइतकाच होतो, असे महापुरूष किंवा रणरागिणी घडू नयेत म्हणून शिक्षणात काही गणितं शिकवावी असं मला वाटतं. 

- पायात ३६५ हाडं असतात, त्यातली २०० तुटली तर किती उरतील? 

- बँकेत अकाउंटला  रू २८४६६ शिल्लक आहेत. अँक्सीडेंटमुळे हॉस्पीटलचं बिल  रू १८२९९ झालं तर शिल्लक किती? 

- ट्रक च्या टायरमधे २.५ kg/cm.cm असं हवेचं प्रेशर असतं. टायरचा एरिया हा ७०० स्क्वे सेमी असतो. तर शरीराच्या कुठल्याही भागावरून चाक जाताना किती फोर्स जनरेट करेल? 

- मेंदूची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती असते? 

- रस्त्यावर पाणी सांडलं असता रस्त्याचा coefficient of friction कितीने कमी होतो? 

- ३०० किलोची मोटरसायकल ८० किमी प्रति तास या वेगाने जात आहे. तर त्याचा इनर्शिया किती होईल? त्याचवेळी समोरच्या बाजूने १०० किलोची स्कुटी ६० किमी प्रति तास या वेगाने येत आहे तर त्याचा इनर्शिया किती होईल? हे दोघं एकमेकांवर आदळले तर किती फोर्स तयार होईल? 

किंवा भाषेचा अभ्यास

Use if and then

If you have brain, then use helmet. 

किंवा काही घोषणा

अरे बघतोस काय, सीटबेल्ट लाव

नाहीतर 

बघतोस काय रागानं, हेल्मेट घातलंय वाघानं. 

सकाळचा मोकळा रस्ता म्हणजे एयरपोर्टचा रन वे वाटतो काहींना.