Saturday 20 February 2016

ध्यान

सध्या मी ध्यान लावणे या नवीन प्रेमप्रकरणात दंग आहे. ते करताना चेहऱ्यावरचे चे विविध हावभाव होतात त्यावरून "कसलं ध्यान आहे" हा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा असा मला दाट संशय आहे. तर सध्या हे new found love असल्यामुळे मी सगळी नाटकं करतो. म्हणजे खिडक्यांचे पडदे लावणे (हो, मी ध्यान लावताना सुद्धा खिडक्यांचे पडदे लावतो), टिक टिक करणारे घडयाळ दुसऱ्या रूम मध्ये नेवून ठेवणे, नळातून पाण्याचे थेंब पडताना टप टप असा जो आवाज येतो तो बंद करणे, उकडत असेल तरी पंख्याचा स्पीड एक वर ठेवणे (कारण स्पीड दोन नंबर वर ठेवला असता पंखा आवाज करतो), दरवाजा लोटून घेणे असं सगळं काही करतो. हो दरवाजा फक्त लोटून घेतो, कडी लावत नाही.  च्यायला, ते ध्यान करण्याच्या नादात समजा गचकलोच तर दरवाजा तोडण्याचा खर्च नको हा सुज्ञ विचार करतो. (कडी लावत नाही, यावर काही अश्लील विचार आणि प्रश्न फक्त लिहिणाऱ्याच्या मनात यायला परवानगी आहे, वाचणाऱ्याच्या नाही).

तर काल हे सगळे सोपस्कार करून मी ध्यानाला बसलो. मध्ये मध्ये येणाऱ्या अनेक आवाजांकडे दुर्लक्ष करत मी त्यावर श्रद्धा ठेवत ते अर्धा तास पूर्ण कधी होतील याची वाट पाहत होतो. तितक्यात हॉल मध्ये माझा फोन वाजल्याचं मला ऐकू आलं. म्हणजे दुसर्यांसाठी  मला ऐकू नाही आलं. आणि नील काही तरी बोलला असं जाणवलं.

कसंबसं मी ते ध्यान प्रकरण संपवलं. मध्ये एक ते दोन मिनिटासाठी का होईना अंतराळातल्या  निर्वात पोकळीमध्ये हा देह गेला याची अनुभूती घेतली… असं मनाला बजावलं आणि दिवसभरासाठी उर्जा आपल्या देहात शिरली ही भावना मनात साठवत चहा पिण्यासाठी बाहेर आलो.

तितक्यात वैभवी म्हणाली "अरे, तुला कुणाचा तरी फोन आला होता." आता खरं तर मला फोनची रिंग ऐकू आली होती. पण ते दुसर्यांना सांगायचं नसतं. मी साळसूदपणे म्हणालो "हो का? मला नाही कळलं. कुणी तूच घेतला का फोन?" नील फोन वर बोलला हे ही खरं अंधुकसं जाणवलं होतं मला. पण मला ध्यान लागलं होतं याचा पुरेपूर अभिनय करत होतो.

"नाही, मी नाही. नील नेच घेतला होता फोन" वैभवी उवाच. तो पर्यंत तिने चहा पण समोर आणून ठेवला आणि नजरेनेच म्हणाली "हं, गिळा" आम्ही दोघे अजूनही नजरेची भाषा बोलतो, पण ती ही  अशी.

मी तिथूनच नील ला विचारलं "काय रे, कुणाचा फोन होता?"

"कुणी देशपांडे काका होते" नील वदला.

"काय सांगितलंस मग तू?" मी.

नील ने याक्षणी वैभवीकडे बघितलं. ती गालातल्या गालात हसत होती. मला धोक्याची जाणीव झाली. मी नीलला बोललो "हं सांग, काय म्हणालास त्यांना?"

"काही नाही, मी सांगितलं. पप्पा मेडीटेशन करतो म्हणून रूम मध्ये गेलेत पण actually ते  ……………

एक पॉज घेऊन

 ………. बसून झोपलेत"

हे ऐकल्यावर हातातल्या कपातून चहा सांडल्यामुळे पायाला चटका बसला ते अजून एक वेगळंच दु:ख.

No comments:

Post a Comment