Saturday 27 February 2016

तीन देवींया

माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच गेली. आईची आई परभणीला असायची, त्यामुळे त्या आजीचा सहवास हा तिच्या आयुष्याच्या शेवटी घडला. ती काही काळ आमच्या घरी राहिली तेव्हा. त्यामुळे लहानपणात आजी माझ्या वाटेला कमी आली. पण तरीही तीन आज्या अशा आहेत ज्यांच्या बद्दल माझ्या मनात एक तर आदर आहे नाही तर अतोनात प्रेम आहे. त्या माझ्या सख्या आज्या नाहीत. दोघींचं तर आमच्याशी रक्ताचं नातं नाही आहे, पण आगळे ऋणानुबंध आहेत. त्यांची मुलं वा नातवंडं हे वाचतील तेव्हा त्यांनाही कळणार नाही की माझ्या मनाच्या कोपऱ्यात त्या तीन देव्या विराजमान आहेत ते.

१. धोंड आजी: परभणीला पोलीस ग्राउंड ला लागून जी मोडक सरांची शाळा आहे ते आमचं घर होतं. आमच्या बाजूला धोंड मास्तरांचं घर. त्यांचा मुलगा म्हणजे आमचा विनू काका. लक्ष्मीकांत धोंड हे त्याचं खरं नाव. हो, तोच औरंगाबाद आकाशवाणीतून रिटायर झालाय.

तर आई सांगते की मी लहानपणी धोंड आजींकडेच राहायचो. सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत. मला आठवत नाही ते. २-३ वर्षाचं वय ते. मग आम्ही परभणी सोडून वेगवेगळ्या गावांना फिरलो. पण परभणी आणि औरंगाबाद ला धोंड आजींना भेटायचोच, न चुकता. एकंदरीत आमच्या कुटुंबावरच जीव होता त्यांचा. माया वर्षावणे म्हणजे काय याचा अनुभव आजींच्या प्रत्येक वाक्यातून, कृतीतून यायचा.

औरंगाबाद ला विनू काका आणि आजी जवाहर नगर ला राहायचे. मी तेव्हा १३-१४ वर्षांचा असेल.  एकदा बाबांनी मला त्यांच्याकडे सोडलं आणि ते काही कामासाठी गावात गेले. आजींनी मला त्या दिवशी जेवायला त्यांच्यासमोर पाटावर बसवलं. आणि "खा गो माय" करत जेवण भरवलं. माझं जेवण होईपर्यंत त्या फक्त माझ्या डोळ्यात पाहत होत्या. आजही मला ती नजर आठवली की मी कातर होतो.

प्रेम नावाची संकल्पना या दगड मनात जर असेल तर त्याची रुजवात धोंड आजींनी माझ्या बालपणी केली या बद्दल मला शंका नाही.

२. बीडकर आजी: वडगल्लीतल्या बीडकरांच्या वाडयात मंडलीकांच्या घरात आई सून म्हणून आली. आणि आजींनी तिला पोरीसारखं वागवलं, असं आईच सांगते. या आजीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कितीही वर्षांनी त्यांना भेटलो तरी ते काळाचं अंतर पहिल्या एक दोन वाक्यात मिटवून टाकायच्या. आणि हा गुण बिडकरांच्या नातवापर्यंत उतरला आहे.

परभणीला सातूचं पीठ मिळतं. त्याची आवड मला लहानपणी असावी. नंतर कित्येक वर्ष, म्हणजे मी डिप्लोमा होईपर्यंत मी कधीही परभणीला गेलो की आजी पहिले सातूचं पीठ आणून ठेवायच्या.

त्या बहुधा आमच्या कुटुंबाची विचारपूस करत असाव्यात. कारण आम्ही कधीही भेटलो की त्यांना आमचं काय चालू आहे याची बऱ्यापैकी माहिती असायची.

भास्कर आणि कुमुद मंडलीक यांचा संसार मार्गी लागण्यामागे बीडकर आजींचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळेच २००२ साली आई बाबा जेव्हा युरोप ला पहिल्यांदा परदेश दौऱ्याला गेले तेव्हा मोठ्या कुणाला नमस्कार करावा म्हणून माई अण्णांना भेटले. त्यावेळी त्या चौघात जो मूक संवाद झाला त्याचा मी साक्षीदार होतो. त्या आसवांमध्ये मधली कित्येक वर्ष वाहून गेली. नवीन लग्न झालेल्या आईबाबांवर १९६१ मध्ये बीडकर वाड्यात माई अण्णांनी जसे आशीर्वाद वर्षावले असतील तीच असोशी, त्या दिवशी मला दिसली.

३. बाई आजी: ह्या खरं तर माझ्या आत्या. पण मी त्यांना बाई च म्हणायचो, त्यांच्या मुलांप्रमाणे.  माझ्या अत्यंत आवडीचं आणि मनात आदर असलेल्या कुटुंबापैकी एक. औरंगाबाद चं कुलकर्णी कुटुंब. विल्को, पैठण गेट जवळचं दुकान. मानव्याचा अंश जर माझ्यात अजूनही उरला असेल तर ते यांचं श्रेय.

बाईचं प्रेम म्हणजे गजब होतं. राजेश ला केलेला पदार्थ आवडतो म्हणून वाटीत काढून ठेवणे, कधीही गेलो तरी जेवायला देणे. त्या एकूणच जेवणाची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे आणि तो डायनिंग टेबल चा माहोल माझ्या मनात.

त्यांच्या घरात राहत मी डिप्लोमा झालो आणि मग बी ई होत, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, बाई जाई पर्यंत मी त्यांच्याकडे जात राहिलो, अगदी शेकडो वेळा. आणि जर त्यांच्याकडून मी जर बाहेरगावी जात असेल तर प्रत्येकवेळी, अक्षरश: प्रत्येकवेळी, त्यांनी माझ्या हातावर आणि देवासमोर सुपारी ठेवून मला पसाभर आशीर्वाद दिले आहेत.

 दैनंदिन रगाड्यात त्या तिघी विस्मरणात जातात. पण जेव्हा कधी त्यांचा कुणाचा विषय निघतो तेव्हा हटकून त्यांची आठवण येते आणि मग समोरचं धूसर दिसू लागतं.

आज या तीन देवींया स्वर्गात आहेत. पण आयुष्याची वाटचाल करताना त्यांचे बरसणारे आशीर्वाद मंडलिकांचं अंगण चिंब भिजवून टाकत असतील हे नि:संशय.

No comments:

Post a Comment