Tuesday, 1 March 2016

सापेक्ष

कसं आहे की, कुठल्याही व्यक्तीबद्दलची प्रतिमा ही सापेक्ष असते. म्हणजे आता बघा, एखादा लाचखोर माणूस असेल अन तो बायकोला नवलखा हार आणून देत असेल तर तिच्या नजरेत तो भारीच, नाही का? त्यांचे पोट्टेही त्याच्यावरून जीव ओवाळत असतीलच, नाही का? पण ज्यांच्याकडून पैसे खाल्ले, त्याचा तळतळाट लागेल की हो त्याला.

म्हणजे कसं आहे, तो सलमान. आता परवा तो फिल्मफेयर प्रोग्रॅम मन लावून बघत होतो. अन आला की हा बाबा. फुटपाथ वाल्याला उडवलं अन त्याही पेक्षा रवींद्र पाटलाची स्टोरी. मनातून उतरलेला तो दबंग गडी. आता बच्चन साहेब किंवा माधुरी बाई त्याच्याशी हात मिळवताहेत. एक तर त्यांची काही मजबुरी असावी किंवा मग मला जी सलमान बद्दल चीड असावी ती बच्चन साहेबांना वा नेने बाईना नसावी.

किंवा आता हे संजू बाबा. आमच्या सारख्याना जे वाटतं ते विधु विनोद चोप्रा ला का वाटावं. आमच्या साठी जो देशद्रोह तो त्यांच्यासाठी खेळणं मोडून पुरून टाकलं. आता आम्हाला नाही बघवत मुन्नाभाई, त्याला इलाज नाही.

पण अनिल कपूर अन जॉनी लिव्हर ने दाऊद च्या पार्टीत कमर हलवली ते विस्मृतीत जातं.

आयुष्यभर त्यांनी उत्तमोत्तम गाणी दिली. त्या गाण्यांचं असलेलं गारुड "त्यांनी पेडर रोड वर फ्लाय ओव्हर नाही बनवू दिला" किंवा "आयुष्यभर कुणाला संगीत क्षेत्रात पुढे नाही येऊ दिलं" या आरोपांमुळे दूर नाही होत. तर काही जण त्यावर मात्र पेटतात. स्वतः कुणाला मदत म्हणून छदाम दिलेला नसतो, पण "शासनाने दिलेला प्लॉट तो. हॉस्पिटल साठी त्यात नवल ते काय" किंवा "दुसऱ्याच्या पैशाने बांधलं ते" असं काही जण बिनदिक्कत बोलून जातात. असतात एकेकाची मतं.


समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी झटलेल्या लोकांनी काही स्टेटमेंट केलं की मला नाही वाटत फणा काढून उभं राहायला. बरं मुख्य म्हणजे त्यांना हौस ही नसते मत प्रदर्शित करायची. आम्हीच विचारतो " अण्णा, तुम्ही काय म्हणता?" "ताई तुमचं मत काय?" "आमटे साहेब, तुम्हाला काय वाटतं?" तुम्ही मागं लागता, उत्तर द्या. आणि उत्तर तुम्हाला आवडेल तेच द्यायचं. म्हणजे हे समाजकार्य करणाऱ्या लोकांनी छोटी सुद्धा चूक कारायची नाही, अशी काही लोकांची ठाम धारणा असते.

आम्हाला वाटतो आदर त्यांच्या बद्दल. तुम्हाला नाही वाटत. ठीक आहे, तो तुमचा प्रश्न.

अलोकनाथ अन गोविंदा कुठली ऍड करतात ते माझ्यातरी फुल डोक्यात जातं. दुसऱ्या कुणाला ते योग्य वाटू शकेल. सांगता येत नाही.

हे असं आहे. चांगली कामं आणि वाईट कामं यावर आपण एखाद्याला जोखत राहतो. सामान्यांच्या बाबतीत होतं, पण ते व्यक्त होत नाही. किंवा काही बांधिलकीमुळे आपण तडजोड करतो. कधी तोडतो तर कधी जोडून ठेवतो.

प्रसिद्ध लोकांबाबतीत ते व्यक्त होतं. ते होताना व्यक्तिपरत्वे व्यक्तिसापेक्ष तिरस्काराची किंवा आदराची पातळी बदलत जाते.

काहींची कुणाबद्दल ती अगदीच उथळ असते आणि ही उथळ भावना नेहमी दुसर्याची असते, आपली मात्र अगदी तर्कशुद्ध असते असं प्रत्येकाला वाटतं,  म्हणून वादविवाद होत राहतात.

जाता जाता:

अशी उथळ वक्तव्ये करताना मला दोन गोष्टी माहित असतात:

- एक तर मी जे बोलतो हे त्यांच्या पर्यंत पोहोचणार नसतं.

- आणि पोहोचलंच तरी माझी दखल घ्यायला ते मोकळे नसतात.



No comments:

Post a Comment