Thursday 31 March 2016

मैफील

नील ला आजकाल मराठी हिंदी गाण्यांची आवड निर्माण झाली आहे. आणि त्या कट्यार मुळे परत शास्त्रीय वगैरे. काल काहीतरी गुणगुणत होता. मी विचारलं, काय म्हणतोस. तर म्हणाला "केतकी गुलाब जुही".

आज सकाळी नील माझ्या बरोबर कंपनीत निघाला. कार मध्ये बसायच्या अगोदर "सरणार कधी रण" ऐकून झालं. मग म्हणाला "मला भीमसेन जोशींचं गाणं ऐकायचं आहे"  मी त्याला "टाळ बोले चिपळीला" हे गाणं लावून दिलं. गाणं संपल्यावर तो म्हणाला "Bhimsen Joshi is the greatest singer" मध्ये एक ओळ त्यांची नाही हे ही त्याला कळलं. राम कदमांच्या तोंडून ऐकलेला वसंतराव आणि भीमसेनजींच्या दोस्तीचा किस्सा त्याला सांगितला.

मग लागलं "माझे माहेर पंढरी" गाणं संपल्यावर मी विचारलं "काय बोलतो" तर म्हणाला "काय बोलणार यावर? काही बोलताच येत नाही आहे" दोन मिनिटे शांत बसल्यावर परत म्हणाला "मला असं वाटतंय की ट्राफिक जाम व्हावी. आपण त्यात अडकावं. आणि ही गाणी ऐकत बसावं"

तिसरं गाणं लागलं "तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल" एव्हाना तो येडा झाला होता बहुतेक. गाणं संपल्यावर हात जोडत म्हणाला "भीमसेन जोशी तर तानसेन ला ही हरवतील. मला तर त्यांची पूजा करावीशी वाटते"

मला म्हणाला "मला क्लासिकल गाणं शिकण्याचा क्लास लावायचा आहे" मी काही बोललो नाही. तबल्याचा क्लास अर्धवट सोडून त्यांनी मला तोंडघशी पाडलं होतं. आता चार वेळा म्हंटल्याशिवाय मी परत चूक करणार नाही.

कात्रज मागे पडलं. मी एक शेवटचा घाव टाकायचं ठरवलं. त्याला सांगितलं "भीमसेनजींच्या दोन शिष्यांची तुला जुगलबंदी ऐकवतो. जयतीर्थ मेवुंडी आणि आनंद भाटे" सौभाग्यदा लक्ष्मी भारम्मा. आठ नऊ मिनिटांची सुरांची बरसात आहे. न्हाऊन निघतो आपण चिंब. त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की तो ही नखशिखांत भिजला आहे. म्हणाला "मेवुंडी भीमसेन जोशींसारखं गातात. भाटेंचा आवाज वेगळा आहे"

कंपनी आली. परवाच एक नवीन शब्द नीलने ऐकला होता, तो वापरत म्हणाला "I am mesmerised"

मी पण अंगावर आलेले काटे झाडत पाऊण एक तासाच्या मैफिलीची सांगता केली. सुरांचं मंदिर झालेल्या कारमधून कर्म मंदिरात प्रवेश करता झालो. आणि दैनंदिन कामाला सुरवात केली.

No comments:

Post a Comment