Thursday 7 April 2016

Disruptive innovation

एका डिस्कशन चा भाग असणार आहे. त्यासाठी एका टर्म बद्दल वाचावं लागलं,  disruptive innovation. कुणी क्लेटन क्रिस्टनसन नावाचे मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहे. हार्वर्ड ला प्रोफेसर म्हणून आहेत. त्यांनी १९९५ साली हे शब्द पहिल्यांदा वापरले. विचित्र वाटतं ना disruptive innovation. म्हणजे असा काही तरी शोध की जो काही प्रचलित गोष्टीला नाहीसं करेल. हे अमेरिकन्स लेकाचे काही तरी शब्द वापरतात आणि त्याच्या भोवती दुनियेला फिरवत राहतात.  हे क्लेटन सर सुद्धा या कन्सेप्ट मुळे स्टीव्ह जॉब्स किंवा आय बी एम च्या आघाडीचे कन्सल्टंट ओळखले जाऊ लागले. You tube वर त्यांचे या विषयावर खूप भाषणं ऐकायला मिळतील.  माणूस एकदम सिम्पल वाटतो आणि श्रवणीय आहे.

 तर असं इनोव्हेशन की ज्यामुळे प्रचलित उत्पादने आणि ते बनवणाऱ्या कंपन्या ह्या इंडस्ट्री च्या क्षितिजावर एक तर मागे पडतात किंवा नाहीशा होतात. मेनफ्रेम कॉम्पुटर ते स्मार्ट फोन हे disruptive innovation चं उत्तम उदाहरण सांगितलं जातं. ह्या प्रवासात कित्येक कंपन्याच्या पाट्या गुल झाल्या. अगदी नोकिया सारखी कंपनी, तिलासुद्धा स्मार्ट फोन चं वादळ समजलं नाही आणि ती पालापचोळ्यासारखी उडाली. जो फोन हातात आहे हे कॉर्पोरेट स्टॅंडर्ड मध्ये प्रतिष्ठेचं लक्षण असायचं तो ब्लॅकबेरी काळाच्या ओघात लुप्त झाला.

गमतीची गोष्ट ही की जेव्हा जेव्हा disruptive innovation मुळे मार्केट मध्ये नवनवीन गोष्टी आल्या तेव्हा त्या सामान्य माणसाच्या आवाक्यात आल्या. ज्या गोष्टी एकेकाळी ही फक्त श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती,  disruptive innovation मुळे त्या गोष्टी समाजाच्या मोठ्या वर्गाच्या वापरात आल्या.

नो फ्रिल एयर लाईन ह्या अशाच disruptive innovation चा प्रकार आहे. यासमोर किंगफिशर ची काय हालत झाली ते आपण पाहतोच आहे. एतिहाद ने हात दिला म्हणून जेट गर्तेतून बाहेर आली, नाहीतर तिचं काही खरं नव्हतं. १९८३ साली मारुती मुळे त्यावेळच्या मध्यमवर्गीयाना चार चाकीची स्वप्न दाखवली तर नुकतंच टाटा नॅनो ने हे स्वप्न अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं. मारुतीने फियाट आणि अँबेसेडर ला म्यूजियम आयटम बनवलं हे आपण जाणतोच.

हे आठवलं या साठी की टेस्ला नावाच्या कार कंपनीने सध्या अमेरिकेत धूम मचवली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि भविष्यात येणारे फ्युएल क्रायसिस याची जाणीव अमेरिकन समाजमनाला झालीच आहे. तोच धागा पकडून टेस्ला ने T3 नावाचं मॉडेल लॉन्च केलं आहे. ही इलेक्ट्रिक कार आहे. ती बनवताना चार्जिंग टाईम, चार्जिंग स्टेशन यावर टेस्ला ने खूप इन डेप्थ काम केलं आहे. Sustainable growth ह्या टॅग लाईन वर अमेरिकन अक्षरश: तुटून पडले आहेत. आपल्या बजाज एम 80 चं बुकिंग होताना जसं लोकांनी लाईन रात्र भर जागून लावली तसंच मॉडेल 3 बुक करताना लोकांनी टेंट मध्ये झोपून गाडी बुक केली. दोन दिवसात तब्बल पावणे तीन लाख बुकिंग झालं आहे. याची तुलना १९१० च्या फोर्ड च्या T मॉडेल शी होऊ शकते. हे सगळं होताना तिथले बिग थ्री मागे पडलेले दिसतात. त्यातल्या त्यात जी एम ने बोल्ट नावाचं मॉडेल आणलं आहे आणि या दोघांच्या चढाओढीत कुणाची सरशी होणार हे २०१८ पर्यंत कळेलच.

सामान्य माणसाच्या आतापर्यंत आवाक्यात नसलेली इलेक्ट्रिक कारची टेक्नॉलॉजी टेस्ला ने disruptive innovation द्वारे अमेरिकन्स पर्यंत पोहोचवली आहे. यथावकाश आपल्याकडे येईल.

खरं तर इलेक्ट्रिक कार ही आपल्याकडे रेवा नावाखाली मैनी नावाच्या कंपनीने १५ एक वर्षांपूर्वी आणली होती. काही वर्षांपूर्वी महिंद्रा ने तिच्यावर कब्जा केला. पण ही कार भारतात लोकप्रिय करण्यात त्याचे उत्पादक सपशेल अपयशी ठरले. कारणं माहित नाही पण ते झालं खरं. आता २०१९-२० ला टेस्ला आपल्याकडे इलेक्ट्रिक कार घेऊन येतील आणि तिचं यश बघून "अरे ही टेक्नॉलॉजी आमच्या कडे २० वर्षांपूर्वी आली होती." असं म्हणत आपलीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत राहू.

जाता जाता: ह्या टेस्ला ला भारतात उत्पादन चालू करण्याचा नेवता घेऊन खुद्द मोदी सर गेले होते. कारण माहित नाही, पण तिथल्या मॅनेजमेंट ने भारतापेक्षा चीन ला पसंती दिली. 

No comments:

Post a Comment