Wednesday, 13 April 2016

आडनाव

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. नांदेड हुन दोन भाऊ आमच्या घरी बाबांना भेटायला आले होते. त्या दोघांचे वडील बाबांच्या ओळखीचे होते. ते दोघं आता इकडे शिफ्ट झाले होते. म्हणजे एक पुण्यात तर एक सातारा ला. त्यांचं आडनाव घोडके ठेवू. संतोष आणि सुरेश अशी नावं.

सुरेश वेबसाईट डेव्हलपमेंट चं काम करायचा. त्यानं कार्ड दिलं. तर त्यावर त्याचं नाव सुरेश जोशी असं लिहिलं होतं. मी असं का विचारलं. त्याने जे सांगितलं ते विचित्र होतं.

पुण्यात आल्यावर त्याने बाजीराव रोड ला बिझिनेस साठी रेन्ट वर ऑफिस घेतलं. यायला जायला सोपं पडावं म्हणून शनिपार आणि आसपासच्या भागात तो रूम शोधू लागला. आठवडाभर पायपीट केल्यावरही त्याला रूम काही मिळेना. त्याला आश्चर्य वाटत होतं. म्हणजे रूम होत्या पण घरमालक थोड्या गप्पा झाल्यावर, नाही द्यायची म्हणून सांगायचा.

त्याच्या दुसऱ्या एका मित्राला सांगितल्यावर मित्र म्हणाला "तू ब्राह्मण आहेस, पण तुझं हे घोडके आडनाव घोळ करतंय" सुरेश ला रूम तर त्या एरिया मधेच हवी होती. त्याने गॅझेट मध्ये अर्ज करून आडनाव जोशी करून घेतलं.

दोन दिवसात त्याला रूम मिळाली.

संतोष साताऱ्यात एका प्रायव्हेट कंपनीत इंजिनियर म्हणून लागला होता. मी संतोष ला विचारलं "तू ही आडनाव बदलून घ्यायचं की." तर तो म्हणाला की या भागात हे घोडके आडनाव असलेलं बरं पडतं. जास्त कुणी हिणवत नाही.

दोन सख्खे भाऊ. एक सुरेश जोशी तर दुसरा संतोष घोडके.

आम्हा मंडलीक लोकांचं बरं आहे. आम्ही सगळ्यांना आपला माणूस वाटतो.

No comments:

Post a Comment