Saturday 30 April 2016

चँटिंग

आठवड्यापूर्वीची रात्री अकराची वेळ. आमच्या मंडळी शेजारीच बसल्या होत्या. मी फेसबुकशी चाळा करत बसलो होतो. (आमच्या मंडळी चा अर्थ एकवचनी आदरार्थी घ्यावा. नाहीतर तुम्हाला वाटायचं एक डावीकडे, एक उजवीकडून डोकावते आय पँड वर, असले काहीतरी गोड गैरसमज व्हायचे. आणि चाळा या शब्दावरून विनोद तुम्हाला सुचण्याचे अधिकार माझ्याकडे राखीव आहेत). माझा फेसबुक मेसेंजर वर चँटिंगचा मनसोक्त कार्यक्रम चालू होता. चँटिंग या शब्दाची व्युत्पत्ति चाटणे या शब्दावरून झाली की काय असा माझा घनदाट संशय आहे. समोर अर्थातच स्त्री. नाव काय ठेवावं बरं. सापडलं, रीमा ठेवू. म्हणजे या नावाची माझ्या मित्रयादीत कुणी नाही, ते चेक केलं. या रीमाताईला मी कधीच अनफॉलो केलं होतं. 

तर रीमा सॉलीड पाचकळ काही तरी समोरून लिहीत होती. मला प्रत्युत्तर म्हणून त्या टकलू स्मायली किंवा अंगठा या शिवाय काही शब्दच सुचत नव्हते. सगळे त्यांचंच. म्हणजे प्रश्न ही त्यांचे, उत्तरही त्यांचंच. काहीतरी बोलणार स्वत: आणि परत सॉरी बोलणार की माझा इकडून अंगठा. प्रश्न असले बाळबोध की म्हणजे शप्पथ सांगतो, इथे लिहावेसे पण वाटत नाही. तुम्ही म्हणाल, पावट्या, असलं फालतू बोलत बसतोस अन बाकी वेळेस तर लै बाता ठोकत असतोस. 

बायको हे माझं नाटक पाहत होतीच. रीमाच्या काहीतरी प्रश्नार्थक फ़ालतू मेसेजवर जेव्हा मी परत जीभ काढलेली स्मायली पाठवली अन बायको तडकली. म्हणाली "कसला लाळघोटेपणा करतोस रे. म्युच्युअल फंडाचा NAV कसा कँल्क्युलेट करतात किंवा करन्सी एक्सचेंज रेट कसा ठरवतात असे मी प्रश्न विचारले तर म्हणतोस, इतकं साधं कसं कळत नाही तुला अन प्रश्नाचं उत्तर टाळतोस आणि ही बया असले काहीतरी फ़ालतू डायलॉग टाकतेय अन तु स्मायली पाठवतोस. अनफ्रेंड का नाही करत तिला" 

आता कुणी कितीही पिडलं किंवा अपमान केले तरी मी अनफ्रेंड करणार नाही हा रूल पाळतो आहे मग ही बिचारी रीमा तरी कसा अपवाद असणार? 

मी मग फेसबुकचा चाळा बंद करून झोपलो. देवाशप्पथ. 

मधे सात आठ दिवस, काही तरी निर्बुद्ध मेसेजेस अन माझ्या चित्रविचित्र स्मायलींचा सिलसिला चालू होता. 

काल काय करणी झाली काय माहित पण रीमाचा मेसेज आला "मला नाही वाटत, तुम्ही माझे मित्र होण्याच्या लायकीचे आहात. मी तुम्हाला अनफ्रेंड करणार आहे आज" मी कारण विचारलं, पण काय सांगणार. परत काहीतरी फालतू. 

मी हसत हसत डोळ्यातून पाणी वाहणारी स्मायली पाठवली आणि लिहीलं

"काय बोलणार यावर! तुमच्या डिसीजनचा आदर करण्याशिवाय काहीच करू शकत नाही."

तसंही मी मेसेंजर पट्टु नाही आहे. आणि मला हे धमक्या देऊन लिहावे लागत नाही. पण लोकांनी हे अनुभवलं  आहे. मेसेजेस पाठवण्याबाबत एकदम कंजूष आहे. त्या ऐवजी मला फोन करून बोलणं आवडतं. पाल्हाळ नाही लागत त्यात.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषपरत्वे मी सौंदर्याचा उपासक वगैरे आहे पण. तरीही त्या सुंदर चेहऱ्याच्या वरच्या भागात काहीतरी लॉजिकल बोलण्याची बुद्धी असावी इतकी माफक अपेक्षा आहे.  

वसुली

आता मी त्या कस्टमरचं खरं नाव नाही लिहीत. आणि आडनाव पण नको. तर महेश म्हणू. 

तर महेशचं आमच्या कंपनी ला  काही पेमेंट बाकी होतं. म्हणून मी वसुलीला गेलो होतो. (आयला, काय लिहीलं ना "वसुलीला गेलो होतो" म्हणे. साधं वरण भातावर साजूक तुप अन लिंबाची चतकोर फोड़ पिळून शरीर पोसलेल्याकडून वसुली होत नाही. तुम्ही त्याला पैसे उधार मागायला जाता तसं जायचं). 

तर महेशच्या कंपनीत पोहोचलो. चांगला एकराचा प्लॉट अन प्लॉटच्या एका कोपर्यात दीड एक हजार स्क्वे फूटाची फँक्टरी. जरा गावापासून दूर. मी पोहोचलो तर तसा सन्नाटाच होता. म्हणजे कंपनीत हालचाल असेलही, पण मेन गेट वरून शांत वाटत होतं. मी अंदाज घेत त्या फाटकाची कड़ी उघडली आणि ते भलं मोठं गेट बंद करून पाच सहा पावलं चाललो असेल. महेश असेल का, चेक देईल का, दिला नाही तर काय वाक्य त्याच्या तोंडावर फेकायची याची उजळणी करत होतो. 

आणि कुठुन कुणास ठाऊक पण एक जर्मन शेफर्ड किंवा तत्सम विलायती कुत्रा, कुत्रा कुठला सिंहच तो, माझ्या दिशेने धावत आला. मी त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्याने पाहत असतानाच तो माझ्यापर्यंत पोहोचलाही आणि काही कळायच्या आत माझ्या पोटाच्यावर त्याचे पुढचे पाय ठेवत जीभ बाहेर काढत उभा राहिला. 

थिजणे म्हणजे काय, किंवा गाळण उडणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. कुणी येतं आहे का याची अगतिकतेने वाट पाहत असतानाच त्या श्वानराजाचा मालक, ढेरपोट्या महेश डुलत येताना दिसला. मी कसाबसा बोललो "(भाड्या),अरे लवकर ये ना" कंसातला शब्द अर्थात मनात. तर तो महेश्या म्हणतो कसा "अरे घाबरू नकोस, तो काही करत नाही" असं म्हणत त्याने हाक मारली "शेरू, कम हियर". पाहुण्यासमोर लहान पोराला सांगितलं, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, म्हण तर ते कसं ढिम्म बसून राहतं, तसा तो शेरू तशाच जिभल्या हलवत उभा होता. महेश डुलत आला आणि त्या शेरू नामक धूडाच्या बखोटीला धरत त्याने खाली उतरवलं आणि इतका वेळ रोखून धरलेला जीव भांड्यात पडला. आणि परत तो महेश पचकला, 
"अरे घाबरू नकोस, तो काही करत नाही"

तो शेरू पण तो परत ऑफीसमधे गेला अन मी शेर झालो. म्हंटलं, "पांडू, घाबरू नकोस काय. कुठं मुतायचं असेल तर तो तुला विचारत नाही, चावायचं असेल तर तो तुला विचारणार आहे का? काहीही बोलतोस भावड्या तु" (पांडू च्या ऐवजी त्याचं यमक जुळणारा आणि भावड्या ऐवजी दोन अक्षरं पुढेमागे करून त्याचं संबोधन केलं हे वेगळं सांगायची गरज नाही). 

बसलो ऑफीसमधे. पैसे मागितल्यावर नेहमीचं रडगाणं झालं. मी थोडा आवाज चढवून पैसे कसे द्यावे लागतील हे सांगायला सुरू केलं. तितक्यात त्याने वॉचमन ला विचारलं "शेरूला बांधलं ना रे" 

मला इशारा कळला. पंधरा दिवसाने चेक दे असं ठोक बजावून मी धडधडत्या हृदयाने फाटक उघड़ून कारमधे बसलो. पंधरा दिवसाने पैसे नाही दिलं त्या महेशला कसे शाब्दिक फटकारे मारायचे याची उजळणी करत गाडीला स्टार्टर मारला. 

Wednesday 27 April 2016

बिकट वाट

परवा डिझाईन च्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू घेत होतो. सतीश नावाचा उमेदवार होता. वय साधारण ४५. टेक्निकल स्किल्स एकदम पद्धतशीर होते. करियर डिझाईन मधेच चालू झालं होतं. दोन कंपन्यात काम केल्याचं दिसलं आणि मग टाटा मध्ये सप्लाय चेन चा अनुभव दिसलं आणि मग स्वत: चा बिझिनेस. चार वर्ष तो केल्यावर मग परत एका मिडीयम स्केल कंपनीत प्रोडक्शन बघत होता. आणि मग सध्या एका स्मॉल स्केल कंपनीत परत डिझाईन इंजिनियर आणि एकंदरीत सगळं शॉप बघायचा. मी जरा चकित झालो त्याचा प्रवास बघून.

मी सतिशला विचारलं "का रे बाबा, ह्या अशा उड्या" तर म्हणाला

"मला चॅलेंज घ्यायला खूप आवडतं. आधी मी बेळगाव मध्ये काम चालू केलं. मग वाटलं, मला काही इथं मजा येत नाही. पुण्याला आलो. इथे काम चालू केलं, पण सिनियर बरोबर काही मजा वाटेना. ते अवघड काम काही मला देत नव्हते. मग अचानक मला टाटा चा कॉल आला. टेक्निकल ड्रॉइंग समजून व्हेंडर ला जॉब समजावून सांगावा लागायचा. तिथे डिपार्टमेंट मध्ये साहेब माझ्यावर खार खाऊन असायचा. मग दुसऱ्या डिपार्टमेंटच्या साहेबाने बोलावलं. तिथे मग काही वर्ष काम केलं. पण मग मला अजून चॅलेंजिंग काम करावं वाटू लागलं. बिझिनेस काढला. चार वर्ष बिझिनेस केला. पण कॉम्पीटिशन वाढली. लोकं पैसे बुडवू लागले. आणि तेच तेच काम परत. धंदा बंद केला आणि सध्या या छोट्या कंपनीत काम करतोय. डिझाईन, प्रोडक्शन सगळंच बघतो. पण काय छोटी कंपनी. पण मला अजून मोठं काम हवंय, एकदम बुद्धीला चालना देणारं.  तुमच्याकडे आलोय, कारण मला वाटतंय, तुमच्याकडे काहीतरी चॅलेंजिग काम करायला मिळेल"

मी ऐकलं सगळं, आणि त्याला सांगितलं "काही बोलायच्या आधी मी एका गाण्याच्या पहिल्या दोन ओळी ऐकवतो". त्याच्या कानाला माझ्या फोन चे हेडफोन लावले आणि अनंत फंदी चा फटका ऐकवला

"बिकट वाट वहिवाट नसावी,
धोपट मार्गा सोडू नको
अरे संसारामधी ऐस आपला
उगाच भटकत फिरू नको"

तो उठला अन म्हणाला "मला उत्तर मिळालं. मी जरा विचार करतो आणि मार्ग ठरवतो. अशात मी इतके इंटरव्ह्यू दिले, सिलेक्शन होत नव्हतं. पण काय चुकतं आहे हे कुणी मला सांगितलं नाही. तुम्ही सांगितलं ते. थँक यु"

Moral of story: We should certainly look for challenges in the job, but not at the cost of our career.

Saturday 23 April 2016

हवा येऊ द्या

तो म्हणाला, तुमच्यावर अमक्या तमक्याचा प्रभाव आहे. मी बोललो हा नश्वर देह कुणालाही भाव देत नाही. इथे प्रभाव फक्त स्वतः चा पडतो. अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्यावर ही कुणा येड्या गबाळ्याचा प्रभाव माझ्यावर पडत असेल तर थू माझ्याच जिंदगानीवर.

ते म्हणाले, तू स्वतः ची फार लाल करतोस. मी बोललो, काका, तो तुमच्या डोळ्यावरचा लाल चष्मा काढा जरा!

मध्ये एका WA ग्रुपवर एक मित्र म्हणाला "तू ढमक्याचा भक्त आहेस"

मी बोललो: नाव, राजेश मंडलिक, वय ४८,  रूढार्थाने जग ज्याला मानते तसा दोन पोरांचा बायोलोजीकाल बाप आणि लौकिकार्थाने ४५ जणांच्या कुटुंबियांचा भार वाहणारी कंपनी चालवतो म्हणून पूर्ण पुरुष. कुणा माणसावर भक्ती म्हणाल तर माझ्या आई बापावर आणि त्यानंतर स्वत:वर.

बाकी कुणावर भक्ती, माय फूट. कुणा लुंग्यासुंग्यावर माझी भक्ती न्योच्छावर करण्या इतकी ती स्वस्त नाही आहे. बहोत बेशकिमती चीज है वो!

तो म्हणाला, ओ इतकी बकबक कशाला करता, त्यापेक्षा अनफ्रेन्ड करा ना. मी पिवळ्या रंगाची टकलू स्मायली पाठवली.

आणि लक्षात असू द्या विनोदात सुद्धा दिलेल्या कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही.

थोडक्यात सांगायचं हे की भावड्यानो, चला, हवा येऊ द्या!

आणि हो, भावड्यानो म्हंटलं आहे.  अक्षरांची अदलाबदल न होऊ देण्याची सद्सद्विवेक बुद्धी जागृत आहे याची नोंद घेण्याची लैच नम्रपणे विनंती करतो आहे.

Thursday 21 April 2016

मिथिला ताई

साधारण दोन एक वर्षापूर्वी मी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तशी भित भित. कारण नुकतंच त्यांचं फेसबुकवर घमासान युद्ध झालं होतं. त्यामुळे विनंती स्वीकारतील याबद्दल साशंकता होती. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे त्यांनी ती विनंती स्वीकारायला खूप वेळ घेतला. आणि दोन तीन दिवसात मला त्यांची एक पोस्ट शेयर करण्याची सुरसुरी आली. मी केली.

ज्यांच्या बरोबर त्यांचे वाद झाले होते, त्यांनी त्या शेयर केलेल्या पोस्टवर काही मित्रांनी कॉमेंट टाकल्या. त्यांची टिंगल करण्याच्या. बाईनी तिरमिरीत येउन मलाच उडवलं. मला काही कळलं नाही. मी विचार केला, त्याचं डिसिजन. आणि त्यांचा आदर केला पाहिजे. पण संध्याकळी त्यांची परत फ्रेंड रिक्वेस्ट आली. 

अशी मैत्रीची डळमळीत झालेली सुरुवात आज मात्र गाढ दोस्तीत परावर्तीत झाली हे आश्चर्यच आहे. 

त्यांच्या बद्दल एका मित्रवर्याने पोस्ट टाकली होती. मी तेव्हाच कॉमेंट टाकली होती "यांची प्रतिमा फेसबुकवर जशी आहे त्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत. रोखठोक असल्यातरी, स्वभावाने प्रेमळ असाव्यात. आणि झोकून देणाऱ्या असाव्यात." And believe me, I was not wrong in assessing this lady.

जन्म lलखनौ जवळील एका गावचा. बालपण इलाहाबाद मध्ये. जन्मदात्रीचा त्यांच्या बालपणी मृत्यू. नशिब त्याचं त्यांना मुंबईला घेऊन आलं. लग्न झालं. बाई इंदोर ला गेल्या. आयष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला तितकीच ताकदीने उत्तर देत स्वत:ला आणि स्वत: बरोबर पोटच्या पोरीला अक्षरश: घडवलं. चंदेरी दुनियेत काम करताना स्वत:चे होश जागेवर ठेवत करियर ही बनवलं. आणि ते होत असताना मनस्वी पणे आपली एक स्वत:ची दुनिया बसवली. आणि त्यात समावेश झाला तुमच्या सारख्या साध्या लोकांचा.

मानसशास्त्रीय जाणीवेचा अंदाज देत त्या इतक्या फटकळ का आहेत, भडभडून बोलणं का आहे, हे ही सांगितलं.  बरं सगळं सांगताना अधूनमधून इतिहासाचा व्यासंग ही दिसत होता. रामायण आणि महाभारत च्या प्रचलित कथेपेक्षा त्याला असणारे वेगळे आयाम सहजगत्या उलगडून दाखवले. कुणाची भीडमुर्वत न ठेवता त्या लिहितात आणि तसेच बोलतात ही.

फेसबुकवर अत्यंत कठोर वाटणाऱ्या ताई, स्वत:चा जीवनप्रवास सांगताना डोळ्यातलं पाणी थोपवून धरत होत्या तेव्हा माझ्या मनात कालवाकालव झाली. "तुझ्या सारखं आयुष्य जगणाऱ्या माणसाला काय दिव्यातून जावं लागलं याची मला जाणीव आहे आणि म्हणून मला तुझ्यात माझा भाऊ दिसतो" असं म्हणाल्या तेव्हा मी आपसूक त्यांचे पाय पकडले.

जमलेल्या पंधरा जणांना, माहेरची माणसं भेटल्यासारखं कडकडून भेटल्या आणि अगदी आग्रह करून खाऊ पिऊ घातलं. निरोपाची वेळ आली तेव्हा प्रेमभराने माझा हात हातात घेत म्हणाल्या "तुम्हाला माहित नाही, तुम्हा सगळ्यांना भेटून मला किती आनंद झाला आहे" त्या करडया मनाच्या डोळ्यात तळं साचलेलं दिसलं आणि मी त्यांच्या पाठीवर थोपटल्या सारखं केलं आणि झटकन तिथून बाहेर पडलो. शिगोशिग प्रेमभावात भिजल्यानंतर मला आवंढ्याची चव कशी असते हे जाणून घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.

नतमस्तक ……………मिथिला ताई. 

Saturday 16 April 2016

गजलरंग

काव्य आवडतं. कळतं का, असं विचारलं तर हो म्हणायला जड़ जाईल. पहिल्या फटक्यात वाचून कळणं बर्याचदा अवघड जातं. कुणी सादरीकरण व्यवस्थित केलं तर अर्थ कळायला सोपं पडतं. खरं तर अशा वेळेला ती मनात उतरत जाते. सरसर. 

गजलरंग ला ही अनुभूति बर्याचदा येते. अण्णांनी चालू केलेली ही मुशायरा ची बैठक आता चांगलीच बस्तान बांधत गेली आहे. त्याच्याबद्दल खूप लिहीलं ही गेलं आहे. मी सहा सात मुशायरांना हजेरी लावू शकलो. येणार म्हंटल्यावर अण्णा नेहमीच खुर्चीवर नाव लिहून जागा आरक्षित करतात. पण कंपनीतल्या गजलांची मैफल काही सात वाजेपर्यंत संपत नाही आणि मला नेहमीच कार्यक्रमाला उशीर होतो. 

कालही झाला. गेलो तेव्हा क्रांती सडेकर उर्दू ग़ज़ल सादर करत होत्या. कुठलाही अभिनिवेश न बाळगता अवघड शब्दांची सोपी मांडणी अन स्वभावात सादगी. फोटोवर इतक्या भारी कँप्शन देणार्या क्रांती खुपच शांत आहेत. IAS, अलीबाग़ असं कंसात ज्यांच्या नावापुढे लिहीलं आहे अशा पांढरपट्टे सरांनी भारदस्त आवाजात रचना सादर केल्यावर सुधीर मुळीक बरसले. मुळातच ताकदीचे शब्द लिहील्यावर त्याला परत आत्मविश्वासपुर्ण सादरीकरणाची जोड़ असल्यावर काय उतरतं याचा वस्तुपाठ मुळीक आपल्या तालेवार आवाजात नेहमीच देतात. कालही दिला. 

मुशायरा संपल्याची घोषणा झाली. 

मी हे का लिहीलं याचं कारण पुढे आहे. 

अर्ध सभागृह रिकामं झालं. श्री रामदास फुटाणे कुणा विष्णु सुर्या वाघ नामक गोव्याचे आमदार आहेत, उपसभापति आहेत पण कवीही आहेत, त्यांची मुलाखत घेणार असं सांगण्यात आलं. फुटाणे साहेब काय म्हणतात हे ऐकावं अन निघावं असा विचार केला. (वीस एक वर्षापुर्वी डेक्कन क्वीन मधे माझी सीट त्यांच्या शेजारी होती. सॉलीड गप्पा मारल्या होत्या). प्रस्ताविक बोलून त्यांनी वाघ साहेबांकडे माईक दिला. 

अन पुढचे पाऊण तास आम्ही अक्षरश: चिंब झालो. अस्मिता, गर्व, अभिमान या शब्दांशी फारकत घेतलेलं त्यांचं मराठी भाषेवरचं निस्सिम प्रेम. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून ते कुठल्या फ़ादर स्टीव्हन्स ने मराठीत काय काय लिहून ठेवलं याचे मुखोद्गत संदर्भ. मराठी भावगीताचं इंग्रजी त रूपांतर करण्याइतका त्याही भाषेचा अभ्यास आणि तितकाच मिश्कील स्वभाव. आणि लोकगीतापासून ते गजलेपर्यंत अशा कवितेच्या प्रत्येक प्रांतात मुशाफिरी करण्याची क़लंदर वृत्ती याचं मनोज्ञ दर्शन फक्त ४५ मिनीटात वाघ साहेबांनी उलगडून दाखवलं. काय नव्हतं त्यांच्या कवितेत. अर्थवाही शब्द, त्याला भारदस्त आवाजाची साथ, गेयता, अन सादर करताना टपकणारं भाषेवरचं प्रेम. आपण तर फ़िदा झालो. 

एकदा पावसाळ्यात रायरेश्वरला जाताना निसर्गाचा आनंद लुटताना अवघड चढण आली. ती चढून जावं की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना हिय्या करून वर पोहोचलो आणि धुक्यात हरवलेल्या एका छोट्या तळ्याच्या काठी उमललेल्या पांढर्या फुलांचा मनोहारी अविष्कार दिसल्यावर हरखून गेलो होतो. तसंच काहीसं कालही झालं. 

राजकारणासारख्या अशात बदनाम झालेल्या क्षेत्रात कार्यरत राहूनही आपली संवेदनशीलता बरक़रार ठेवणार्या वाघ साहेबांना आपला मानाचा मुजरा ......... एकदम तहेदिलसे 

Wednesday 13 April 2016

पाहिलं पाऊल

ते दिसतंय ठिकाण अंधुकसं. हो हो तेच. तिथं पोहोचायचं आहे तुला. कसं जमणार म्हणतोस? अरे, काही नाही चालायला लागायचं. त्या आधी वाटेल तुला की नको जायला तिथे. पण झटकून टाक ते विचार. आणि चालू लाग. मध्ये काही संकटं येतील, वाट खाचखळग्याची होईल, पण तू धीर सोडू नकोस. कधी तुला मरणाची तहान लागेल, भीतीने तोंडातून शब्द फुटणार नाहीत, पाय थरथरतील. तेव्हा उडवून टाक मनातले विचार, घे हातात भीतीला अन फेक बाजूला दिसणाऱ्या झाडाझुडपात, पायदळी तुडव त्या अंगातल्या मरगळीला अन चालत रहा त्या ध्येयाच्या दिशेने. थांबू नकोस. मागे वळू नकोस. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुला एकंच करायचं आहे.........तिकडे जाण्यासाठी पाहिलं पाऊल ऊचलायचं आहे. बास!

दुनियादारी

काल मी बंगलोर ला आलो. इथे माझा एक जवळचा मित्र राहतो. कृष्णा नाव ठेवू आपण त्याचं. बरोबर काम करायचो आम्ही. तो मूळ दिल्लीचा. वर्ष सरली, तो आता एका कंपनीचा मोठा अधिकारी झाला आहे. एकटाच राहतो. फॅमिली दिल्लीत.

तो ज्या कंपनीत काम करतो ती मोठी आहे, पण सध्या काम नसल्यामुळे गळपटली आहे. चार सहा महिन्यापासून पगार पण नाही असं ऐकत होतो. त्यानेच मला फोन करून सांगितलं होतं.

काल बंगलोर ला आल्या आल्या माझा फोन झाला त्याच्याशी. दुपारी मी एक्झिबिशन चा स्टॉल सजवत असताना मला त्याचा परत फोन आला "अरे राजेश, मला आताच्या आता दहा हजार रुपयाची गरज आहे. आताच्या आता देऊ शकतोस का? साला पगार नाही झाला चार महिने. अन तिकडे दिल्लीहून बायकोचा फोन आला की महत्वाच्या कामासाठी पैसे हवे आहेत, आजच्या आज"

आता एकदा दोस्ती केली म्हंटल्यावर प्रश्न मिटला. आजकाल क्रेडिट कार्ड मुळे खरं तर कॅश ठेवत नाही, पण सुदैवाने होती. पाच दिवस कंपनीचे तिघे राहणार, त्यांना लागेल कदाचित म्हणून ठेवले होते. लागले तर मी काहीतरी करून जमवू शकत होतो.

एक्झिबिशन चा स्टॉल सजवत होतो. त्यात तो म्हणाला की जरा पिनिया ला ये आणि तिथे आणून दे पैसे. झालं, टॅक्सी केली, धावपळ करत पिनिया ला गेलो आणि त्याला पैसे दिले अन परत गेलो.

दुसऱ्या दिवशी कृष्णा एक्झिबिशन पाहायला आला. मी आणि तो जेवायला गेलो. जेवताना त्याला विचारलं "काय जमलं का काल सगळं?"
तर म्हणाला "जमलं यार, पोराला ट्रिप ला जायचं होतं आणि पैसे भरायची लास्ट डेट होती. पोरगं खूप नाराज झालं होतं. म्हणून बायकोचा फोन आला, काहीही करा, पण पैसे पाठवा" पुढं म्हणाला "तुला लागत नव्हते ना पैसे"

मी म्हणालो "अरे, नाही रे. म्हणजे पोरं पाच दिवस राहणार. एक चेन्नई हुन येणार. त्यांना लागेल म्हणून आणले होते. त्यांच्या कडे असतीलच पैसे, पण सेफ्टी म्हणून आणले होते. आता पुण्याला गेलो की पाठवतो"

इथपर्यंत सगळं व्यवस्थित झालं. पुढं कृष्णा जे बोलला त्याने मात्र चकित झालो.

"अरे, सांगायचं की मला. मी केले असते पैसे कुठून तरी मॅनेज. माझा चुलत भाऊ बंगलोर मधेच राहतो, पण त्याचं घर जरा लांब होतं, म्हणून मी तुला मागितले. तू सांगायचं मला की तुला पैसे लागणार म्हणून. मी जमवलं असतं कसं तरी"

मी चकित तर झालोच पण व्यथित ही झालो. एकदा कृष्णाने पैसे मागितले, मग मी काही मागचा पुढचा विचार नाही केला. कधी परत देणार तेही विचारलं नाही, आज सहा वर्ष झाली तो बंगलोर मध्ये आहे, मग त्याचं मित्र मंडळ जमा नाही का, जे त्याला मदत करतील, मी समजा आज बंगलोर मध्ये नसतो तर त्याने काय केलं असतं. आणि हा म्हणतोय "अरे, इतकं काय मोठं. मी जमवलं असतं कुठून तरी"

धन्य झालो. आईच्यान, पन्नाशी आली, पण दुनियादारी काही कळत नाही राव अजून.

आडनाव

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. नांदेड हुन दोन भाऊ आमच्या घरी बाबांना भेटायला आले होते. त्या दोघांचे वडील बाबांच्या ओळखीचे होते. ते दोघं आता इकडे शिफ्ट झाले होते. म्हणजे एक पुण्यात तर एक सातारा ला. त्यांचं आडनाव घोडके ठेवू. संतोष आणि सुरेश अशी नावं.

सुरेश वेबसाईट डेव्हलपमेंट चं काम करायचा. त्यानं कार्ड दिलं. तर त्यावर त्याचं नाव सुरेश जोशी असं लिहिलं होतं. मी असं का विचारलं. त्याने जे सांगितलं ते विचित्र होतं.

पुण्यात आल्यावर त्याने बाजीराव रोड ला बिझिनेस साठी रेन्ट वर ऑफिस घेतलं. यायला जायला सोपं पडावं म्हणून शनिपार आणि आसपासच्या भागात तो रूम शोधू लागला. आठवडाभर पायपीट केल्यावरही त्याला रूम काही मिळेना. त्याला आश्चर्य वाटत होतं. म्हणजे रूम होत्या पण घरमालक थोड्या गप्पा झाल्यावर, नाही द्यायची म्हणून सांगायचा.

त्याच्या दुसऱ्या एका मित्राला सांगितल्यावर मित्र म्हणाला "तू ब्राह्मण आहेस, पण तुझं हे घोडके आडनाव घोळ करतंय" सुरेश ला रूम तर त्या एरिया मधेच हवी होती. त्याने गॅझेट मध्ये अर्ज करून आडनाव जोशी करून घेतलं.

दोन दिवसात त्याला रूम मिळाली.

संतोष साताऱ्यात एका प्रायव्हेट कंपनीत इंजिनियर म्हणून लागला होता. मी संतोष ला विचारलं "तू ही आडनाव बदलून घ्यायचं की." तर तो म्हणाला की या भागात हे घोडके आडनाव असलेलं बरं पडतं. जास्त कुणी हिणवत नाही.

दोन सख्खे भाऊ. एक सुरेश जोशी तर दुसरा संतोष घोडके.

आम्हा मंडलीक लोकांचं बरं आहे. आम्ही सगळ्यांना आपला माणूस वाटतो.

दिल्लीकर

मी दिल्लीतल्या लोकांबद्दल मनात एक आकस ठेवून होतो. ही लोकं फार agressive असतात, त्यांच्यावर फार विश्वास ठेवू नये, ते लोकांना फसवतात वगैरे. जेव्हा दिल्लीला आपला रिप्रेझेंटेटिव्ह ठेवायचा असं आमच्या मीटिंग मध्ये ठरलं तेव्हा गोर्यांना हा माझा कंसर्न बोलून ही दाखवला. जेफ ने मला विचारलं "Have you  experienced it ever?" दिल्लीच्या रिक्षावाल्यांशिवाय मला असा अनुभव काही आला नाही. पण रिक्षा ड्रायव्हर हे कुठल्या शहरात धड सापडले आहेत? (सन्माननीय अपवाद वगळता). तसे काही सुपरफिशियल नॉलेज असणारे भेटले, पण ते ही सगळीकडेच भेटतात. पण वर सांगितलेले अवगुण असलेली मंडळी मला काही भेटली नव्हती. मी आपलं "I have never experienced. But many people talk of these qualities of Delhites" जेफ म्हणाला "Don't conclude on what other people talk. I am sure you will get right person".

अनिच्छेनेच मी पेपर ला ऍड दिली. दणदणीत रिस्पॉन्स मिळाला. ३० एक लोकं शॉर्टलिस्ट केली. लोकांशी बोललो आणि त्याला गाळणी लावून मग ५ जण निवडली. काल त्यांच्याशी बोललो. चार पाच दिवसात त्यांच्यातला एक फायनल करेल.

या प्रोसेस मध्ये माझ्या दिल्लीच्या लोकांबाबतच्या आकसाच्या धज्जीया उडाल्या. ही पाचही लोकं अत्यंत सॉफ्ट स्पोकन, जीवनाबाबत अत्यंत पॉझिटिव्ह attitude असणाऱ्या, आयुष्यात काय आणि का करायचं याबाबत clarity असणाऱ्या आढळल्या. किंबहुना या पाच जणांपैकी एक जण थोडा डावा निघाला. पण मी उरलेल्या चारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून कुठलीही एक उचलली तर ते कंपनीसाठी लाभदायक ठरेल अशा ताकदीची लोकं निघाली. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चारपैकी दोघं फ्रेशर आहेत. आणि त्या दोघांपैकी एक अत्यंत स्ट्रॉंग कंटेडर आहे. पुण्यापासून इतक्या लांब फ्रेशर घेण्यात थोडी रिस्क असेल पण मी ती बहुतेक घेणार आहे.

यावेळेस मी प्रश्नांचा ढाचा ही बदलला होता. कनव्हेन्शनल एच आर प्रॅक्टिस च्या हिशोबाने ते प्रश्न योग्य होते की नाही हे मला माहित नाही. कारण हे एच आर चं झेंगट आता डोक्यावर घेतलं आहे. त्याचं काही फॉर्मल ट्रेनिंग ही घेतलं नाही. पण नॉलेज पेक्षा एखाद्या परिस्थितीला हाताळताना attitude कसा ठेवेल यावर जास्त भर दिला. खूप विचार करून प्रश्न लिहून काढले होते. इंटरव्ह्यू प्रोसेस मधील एकसुरी पणा टळला आणि त्यात नावीन्यता आली. आणि आता घेणाऱ्या माणसाला जोखून, तोलून मापून नेवता दिला आहे हा विश्वास मनात आला. काही कारणामुळे जर हे सिलेक्शन अपयशी ठरलं तर त्याचं उत्तरदायित्व घेण्याबाबत काहीही वाईट वाटणार नाही, कारण प्रोसेस मध्ये शत प्रतिशत स्वत:ला अप्लाय केल्याची जाणीव असेल.

तेव्हा दिल्लीच्या ग्राहकांनो, आम्ही येतोय तुमच्या शहरात, वर्ल्ड क्लास स्पिंडल रिपेयर सर्व्हिस घेऊन. आणि बाय द वे, आमच्या स्पर्धक कंपन्यानो, तुम्हीही हे लक्षात असू द्या.

(पोस्ट मराठीत लिहिली आहे आणि ती ही फेसबुक साठी. कोण दिल्लीकर हिंदी भाषिक वाचणार नाही म्हणून फुल लाल करून घेतली आहे. एकदम स्टाईल मध्ये. अर्थात माझ्या चाणाक्ष मित्रांना वेगळं सांगायची गरज नाही आहे. 😊😊)

Tuesday 12 April 2016

Social Media

साधारण ६ एक महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी काही कामानिमित्त बडोद्याला गेलो होतो. तिथून मला राजकोट ला जायचं होतं. कामं आटोपून मी संध्याकाळी मुकुंद च्या घरी गेलो. गप्पांचा फड जमवला. माझी ट्रेन रात्री १२:०५ ला होती. दहा वाजता जेवण वगैरे झाल्यावर मुकुंदाने मला स्टेशन ला सोडलं.

स्टेशन ला मी चौकशी केली. माझी ट्रेन राईट टाईम होती, प्लॅटफॉर्म नं ६ वर येणार होती. वेळ असल्यामुळे मी वेटिंग रूम मध्ये जाऊन बसलो. मला आता आठवत नाही, बहुधा ब्लॉग लिहित होतो वा फेसबुक चाळत होतो.

साधारण ११:४५ ला परत प्लॅटफॉर्म तोच आहे याची खातरजमा केली. त्यांनी हे ही सांगितलं की ट्रेन १२ वाजता येईल. मी प्लॅटफॉर्म नं ६ वर जाऊन बसलो.

बरोबर रात्री१२ वाजता ट्रेन आली. मी माझ्या बर्थ पर्यंत पोहोचलो. पाहतो तर तिथे एक स्त्री अगोदर पासून झोपली होती. हिचा कुठला दुसरा बर्थ असेल आणि ती आता काही तरी पाचकळ कारण सांगून बर्थ एक्स्चेंज करायला सांगेल हे मी ताडलं. मी, ओ मॅडम म्हणत त्यांना झोपेतून उठवायचा प्रयत्न केला. दोन चार हाका मारल्यावरही त्यांची झोपमोड नाही झाली. मग अनिच्छेने का होईना, ओ बहेनजी, असा पुकारा केला. कूस बदलून त्यांनी जागं होत माझ्याकडे पाहिलं अन त्यांना बहेनजी संबोधून आपण घोडचूक केली याची जाणीव झाली. पण बाण सुटला होता. त्यांनी मला चेहऱ्यावरच्या बटा सावरत विचारलं "क्या है" मला दोन क्षण त्यांनी फक्त बटा चेहऱ्यावरून बाजूला करत राहव्या असं वाटत राहिलं. पण बहेनजी म्हंटल्याची चूक स्मरत मी म्हणालो "ये मेरा बर्थ है" तर त्या म्हणाल्या "आप फिरसे चेक करो, ये मेराही बर्थ है"

आमचा हा प्रेमळ संवाद चालू असताना, म्हणजे आता भावा बहिणीतला, ट्रेन ने बडोदा स्टेशन सोडलं होतं. एवढया रात्री आता ताईंना त्रास देण्यात काही अर्थ नव्हता. मी आपला टी सी ची वाट पाहत थांबलो.

टी सी आला. मी टेचात स्मार्टफोन वरचा मेसेज दाखवला. तो पण चक्रावला. १२:०५ची ट्रेन असली तरी जो नेहमी तारखेचा होतो तो घोळ पण नव्हता. त्याने परत मेसेज वाचला अन म्हणाला "क्या गुरू, आप गलत ट्रेन में चढे हो. तुम्हारी ट्रेन इसके पीछे आ रही है" मी पाहिलं, माझ्या ट्रेन चा नं १९८१२ होता तर ज्यात बसलो तिचा नं १९८२० होता.

मी खजील झालो. गेल्या २० वर्षात मी अक्षरश: हजारो ट्रेन प्रवास केले. आणि ट्रेन मध्ये चढायची आणि उतरायची वेळ २४ तासातील कुठलीही असायची, पण इतकी घोडचूक पहिल्यांदा झाली.

एव्हाना रात्रीचे १२:३० होऊन गेले. मला टी सी ने सांगितलं "आता आणंद ला उतर, तिथे तुझी मागून येणारी ट्रेन थांबते. एक स्टेशन जाईपर्यंत तुमचा बर्थ आम्ही दुसऱ्या कुणाला देऊ शकत नाही. त्यामुळे तुला बर्थ मिळेल".

त्याने सांगितल्या प्रमाणे केलं आणि माझा पुढचा प्रवास व्यवस्थित पार पडून मी राजकोटला पोहोचलो.

यात काय घडू शकलं असतं?

- मी ज्या ट्रेन मध्ये बसलो होतो किंवा जी माझी निर्धारित ट्रेन होती ती सुपर फास्ट असती आणि आणंद ला न थांबणारी असती तर?

- बडोदा जंक्शन वरून दोन ट्रेन चे मार्ग भिन्न असते तर?

- बाकी ती स्त्री प्रवासी आणि माझ्यातला संवाद कुठं पर्यंत पोहोचला असता, या कल्पनेला इथंच फुल स्टॉप देऊ.

तर मला हा प्रसंग का आठवला? एक पोस्ट बनवायची म्हणून?

तर दोन तीन महिन्यापूर्वी Linkedin वर WA आणि फेसबुक च्या आहारी जाऊन तुमच्या काय चुका होऊ शकतात यावर एक आर्टिकल वाचलं. यात ट्रेन, बस किंवा फ्लाईट चुकू शकतं हे लिहिलं होतं.

आता मी बडोदा स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये ब्लॉग लिहित होतो किंवा फेसबुक खेळत असेल. हे जर करत नसलो असतो तर मी ट्रेन मध्ये चढायच्या अगोदर ट्रेन चा योग्य नं आहे का हे मी चेक केलं असतं का? ब्लॉग वर आर्टिकल लिहित होतो तर त्याच्या विचारात गुंतलो होतो का आणि त्यामुळे चुकीच्या गाडीत चढलो का?

नेमकं आठवत नाही, पण या प्रश्नाची उत्तरं "हो" असण्याची दाट शक्यता आहे.

त्या लेखाचा शेवट ज्या वाक्याने केला तेच इथे परत लिहितो.

Remember, you are not made for social media. It should not control your deeds, actions. You might feel that social media's strings are at your fingertips and you make it dance while using it on smartphone. In fact it is exactly other way round.

Thursday 7 April 2016

"Disruptive Innovation"

I am going to be part of one discussion and in that context I came across term "Disruptive Innovation". When I google this term, I came across interesting personality Mr Clayton Christensen who is management expert at Howard. He is father of this terminology "Disruptive Innovation". Indeed, its a different wording. Innovation, which is disruptive, Mr Christensen's many lectures on the subject are available on You Tube and its a pleasure to listen to this gentleman who looks to be quite humble in nature.

Disruptive innovation leads to creating new market. And if you are not ready to accept it, it is very likely that you are swept away with all together new technology or loose leadership position. A journey from Mainframe computer to smartphone is perfect example of disruptive innovation. And as we all know there have been many companies who closed down as they could not anticipate changes happening around. Even company like Nokia had a big set back in the process and Blackberry has become part of history.

The beautiful part of disruptive innovation is that it allows outcome of it for the masses. The products which are otherwise only few can afford, are made available to middle class or lower middle class people of society. It boosts nation's economy.

I think No frill airline is one such disruptive innovation. You can see what happened to Kingfisher who could not take this form to grow their business. Had Etihad not been come to rescue, even Jet would have nose dived. Middle class people started dreaming of car in 1983 with disruptive innovation that Maruti brought and off late it is further extended by Tata Nano. Fiat and Ambassador who pretended to sleep are now nothing but monuments in Museum.

I was co relating this to recent talk of Tesla who has innovated electric car called T3. American society is well aware of Global warming and future fuel crisis. Tesla management has picked up same thread and launching this electric car. I am sure they must have worked very hard on charging time and charging stations and all other aspects of automobile engineering. Americans loved the tagline Sustainable growth and literally jumped to book by staying whole night in tents. It is said that close to 300000 vehicles are already booked in two days. The whole saga is compared only to Ford when they introduced its famous model T in 1910, another example of disruptive innovation. An electric car, a technology which was not in radius of common man thinking is brought to their door step by Tesla through these magical word Disruptive Innovation. While Tesla is working hard to launch, only GM of big three have worked in parallel and launched Bolt. It would be interesting to see their competition.

In fact electric car is not new concept for India. Maini Motors, which is now taken over by Mahindra has launched Reva fifteen years back. For some unknown reasons, it was never success to boast about. It is very likely that Tesla would come to India and we will for sure awestruck by its success only to say that "Oh! nothing great about it. We had this technology 20 years back". We are otherwise very good in patting own back with achievements which are part of history.  

Disruptive innovation

एका डिस्कशन चा भाग असणार आहे. त्यासाठी एका टर्म बद्दल वाचावं लागलं,  disruptive innovation. कुणी क्लेटन क्रिस्टनसन नावाचे मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहे. हार्वर्ड ला प्रोफेसर म्हणून आहेत. त्यांनी १९९५ साली हे शब्द पहिल्यांदा वापरले. विचित्र वाटतं ना disruptive innovation. म्हणजे असा काही तरी शोध की जो काही प्रचलित गोष्टीला नाहीसं करेल. हे अमेरिकन्स लेकाचे काही तरी शब्द वापरतात आणि त्याच्या भोवती दुनियेला फिरवत राहतात.  हे क्लेटन सर सुद्धा या कन्सेप्ट मुळे स्टीव्ह जॉब्स किंवा आय बी एम च्या आघाडीचे कन्सल्टंट ओळखले जाऊ लागले. You tube वर त्यांचे या विषयावर खूप भाषणं ऐकायला मिळतील.  माणूस एकदम सिम्पल वाटतो आणि श्रवणीय आहे.

 तर असं इनोव्हेशन की ज्यामुळे प्रचलित उत्पादने आणि ते बनवणाऱ्या कंपन्या ह्या इंडस्ट्री च्या क्षितिजावर एक तर मागे पडतात किंवा नाहीशा होतात. मेनफ्रेम कॉम्पुटर ते स्मार्ट फोन हे disruptive innovation चं उत्तम उदाहरण सांगितलं जातं. ह्या प्रवासात कित्येक कंपन्याच्या पाट्या गुल झाल्या. अगदी नोकिया सारखी कंपनी, तिलासुद्धा स्मार्ट फोन चं वादळ समजलं नाही आणि ती पालापचोळ्यासारखी उडाली. जो फोन हातात आहे हे कॉर्पोरेट स्टॅंडर्ड मध्ये प्रतिष्ठेचं लक्षण असायचं तो ब्लॅकबेरी काळाच्या ओघात लुप्त झाला.

गमतीची गोष्ट ही की जेव्हा जेव्हा disruptive innovation मुळे मार्केट मध्ये नवनवीन गोष्टी आल्या तेव्हा त्या सामान्य माणसाच्या आवाक्यात आल्या. ज्या गोष्टी एकेकाळी ही फक्त श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती,  disruptive innovation मुळे त्या गोष्टी समाजाच्या मोठ्या वर्गाच्या वापरात आल्या.

नो फ्रिल एयर लाईन ह्या अशाच disruptive innovation चा प्रकार आहे. यासमोर किंगफिशर ची काय हालत झाली ते आपण पाहतोच आहे. एतिहाद ने हात दिला म्हणून जेट गर्तेतून बाहेर आली, नाहीतर तिचं काही खरं नव्हतं. १९८३ साली मारुती मुळे त्यावेळच्या मध्यमवर्गीयाना चार चाकीची स्वप्न दाखवली तर नुकतंच टाटा नॅनो ने हे स्वप्न अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं. मारुतीने फियाट आणि अँबेसेडर ला म्यूजियम आयटम बनवलं हे आपण जाणतोच.

हे आठवलं या साठी की टेस्ला नावाच्या कार कंपनीने सध्या अमेरिकेत धूम मचवली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि भविष्यात येणारे फ्युएल क्रायसिस याची जाणीव अमेरिकन समाजमनाला झालीच आहे. तोच धागा पकडून टेस्ला ने T3 नावाचं मॉडेल लॉन्च केलं आहे. ही इलेक्ट्रिक कार आहे. ती बनवताना चार्जिंग टाईम, चार्जिंग स्टेशन यावर टेस्ला ने खूप इन डेप्थ काम केलं आहे. Sustainable growth ह्या टॅग लाईन वर अमेरिकन अक्षरश: तुटून पडले आहेत. आपल्या बजाज एम 80 चं बुकिंग होताना जसं लोकांनी लाईन रात्र भर जागून लावली तसंच मॉडेल 3 बुक करताना लोकांनी टेंट मध्ये झोपून गाडी बुक केली. दोन दिवसात तब्बल पावणे तीन लाख बुकिंग झालं आहे. याची तुलना १९१० च्या फोर्ड च्या T मॉडेल शी होऊ शकते. हे सगळं होताना तिथले बिग थ्री मागे पडलेले दिसतात. त्यातल्या त्यात जी एम ने बोल्ट नावाचं मॉडेल आणलं आहे आणि या दोघांच्या चढाओढीत कुणाची सरशी होणार हे २०१८ पर्यंत कळेलच.

सामान्य माणसाच्या आतापर्यंत आवाक्यात नसलेली इलेक्ट्रिक कारची टेक्नॉलॉजी टेस्ला ने disruptive innovation द्वारे अमेरिकन्स पर्यंत पोहोचवली आहे. यथावकाश आपल्याकडे येईल.

खरं तर इलेक्ट्रिक कार ही आपल्याकडे रेवा नावाखाली मैनी नावाच्या कंपनीने १५ एक वर्षांपूर्वी आणली होती. काही वर्षांपूर्वी महिंद्रा ने तिच्यावर कब्जा केला. पण ही कार भारतात लोकप्रिय करण्यात त्याचे उत्पादक सपशेल अपयशी ठरले. कारणं माहित नाही पण ते झालं खरं. आता २०१९-२० ला टेस्ला आपल्याकडे इलेक्ट्रिक कार घेऊन येतील आणि तिचं यश बघून "अरे ही टेक्नॉलॉजी आमच्या कडे २० वर्षांपूर्वी आली होती." असं म्हणत आपलीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत राहू.

जाता जाता: ह्या टेस्ला ला भारतात उत्पादन चालू करण्याचा नेवता घेऊन खुद्द मोदी सर गेले होते. कारण माहित नाही, पण तिथल्या मॅनेजमेंट ने भारतापेक्षा चीन ला पसंती दिली.