Wednesday 30 December 2015

चिंतन

तसं बघायला गेलं तर मला सख्खी बहिण नाही. त्यामुळे माझ्या बालपणी मी आणि माझा भाऊ. ज्या गावात माझं लहानपण गेलं, म्हणजे यवतमाळ, औरंगाबाद आणि नाशिक, तिथेही आजूबाजूला मुली नव्हत्या. घरात कधी चुलत किंवा मावस बहिणी वैगेरेे असायच्या पण त्या काही दिवसांसाठी. भेटलो की जेव्हा चुलत मावस भावांशी लवकर कनेक्ट व्हायचो तेवढा बहिणींशी नाही व्हायचो. आणि मग मैत्री व्हायच्या आत, किंवा ती दृढ व्हायच्या आत सुट्टी संपायची. साधारणपणे अशी माणसं अशा वातावरणात मोठी होतात ती स्त्रीबद्दल दोन भावना बाळगतात, एक तर ती भोग्य आहे नाहीतर पूजनीय आहे. मी ही त्याला अपवाद नाही. नाही म्हणायला सहावी ते दहावी को एड मधे शिक्षण झालं पण साधारणत: त्या वयात मुलींबद्दल दोन भावना, एकतर राखी बांधायची नाही तर लाईन मारायची. निखळ मैत्री, निरालस भावनांपासून मी कोसो दूर होतो. तसंही भिन्न लिंगी व्यक्तिबद्दल आकर्षण नाही असं म्हणणं दांभिकपणा झाला. पण समाजाला बांधून ठेवणारे संस्कार, भिती, आदर, निर्व्याज प्रेम या आकर्षणावर मात करतात आणि संबंध मैत्रीपूर्ण रहाण्यात मदत होते.

माझी या भावनांशी ओळख झाली ती बीजे मेडिकलला. तिथले पोरं पोरी टाळ्या काय द्यायचे, पाठीत काय मारायचे, बाईकवर बसून फिरायचे. आधीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर आणि औबादच्या मुलींचा दुष्काळ असलेल्या कॉलेजमधून आलेला मी विस्मयचकित होऊन जायचो. पण माझं मन काही प्रगल्भ झालं नाही दोन अडीच वर्षातच फुलत असलेल्या सुंदर मैत्रीच्या नात्याला तिलांजली दिली आणि प्रेमाकर्षणात बद्ध झालो. पुढे तिच्याशीच लग्न झालं आणि आता आम्ही मित्र मैत्रिणीसारखे राहतो हे म्हणणं म्हणजे त्यावेळेसच्या उथळ विचारांवर पांघरूण घालणं झालं.

अशी नाती कशी असतात याचा खर्या अर्थाने अनुभव घेतला तो लग्नानंतर. वैभवीला एक सख्खी बहिण, आणि सख्ख्याइतकंच घट्ट नातं असलेल्या तिच्या मामे आणि मावस अशा चार बहिणी. या सगळ्यांच्या सहवासात मला भिन्नलिंगी व्यक्तिंशी निखळ मैत्री म्हणजे काय याचा अनुभव आला. या सर्व मुलींशी, म्हणजे आता बायका झाल्यात त्या, माझे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत.  त्यामुळे "साली आधी घरवाली" हा डायलॉग विनोद म्हणून बरा वाटला तरीही पंचवीशित मिळालेल्या या निरपेक्ष नात्याला धक्का पोहोचतो म्हणून मी तो कटाक्षाने टाळतो. बाकी माझी पत्नी याबद्दल माझ्यापेक्षा फारच संतुलित आहे. मुलगी, बहिण, सून  किंवा आई म्हणून तिने जपलेली नाती ही  माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित सांभाळली आहेत. मागे एकदा लिहिल्याप्रमाणे, "समाज सापेक्ष रूढार्थाने कमी कर्तृत्ववान असलेल्या माझ्या पत्नीच्या मागे तिच्यात दडलेली एक अत्यंत यशस्वी आई आहे, आणि तथाकथित कर्तृत्ववान असलेल्या माझ्या मागे माझ्यातला तितकाच अयशस्वी बाप आहे."

अगदी थोडक्यात सांगायचं तर  निखालस मैत्री करण्याचा गुण उपजत माझ्यात नव्हता तर आयुष्याच्या तरुण ते गृहस्थ या कालावधीत  हा मी अक्षरश: कमावला आहे. आता तर पन्नाशी आली आणि त्यात अशा मैत्रीपूर्ण नात्याला मी व्यवस्थित जोपासलं आहे. त्यामुळे परवा एकाने पोस्ट टाकली "बायकोच्या भावाला भाऊ म्हणतो, तर बायकोच्या मैत्रिणीला बायको का म्हणू नये" माझ्या कडून पटकन लिहिलं गेलं "कारण  बायको तुमच्या मित्राला नवरा म्हणत नाही"

असो.  खूप तारे तोडले. एक लास्ट कन्फेशन. जर सख्खी बहीण घरात असती किंवा मला मुलगी असती तर आता आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त सेन्सिबल आणि रिस्पोन्सिबल माणूस असलो असतो.

(सदर पोस्ट हे गुरुविंदर सिंग यांच्या पोस्ट वर आधारित प्रकट चिंतन आहे. त्यात फेसबुकवरील इनबॉक्स Chatting वरून काही वाद, संवाद, प्रतिवाद होतात, यातून तयार झालेली thought प्रोसेस आहे. अगदीच सांगायचं झालं  तर माणूस हा मुळात चांगला असतो, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तो कदाचित चुकीचं वागू शकतो या जुन्या धारणेवर विश्वास ठेवावा) 

Sunday 20 December 2015

बघा बुवा

नाही म्हणजे बघा तुम्हाला पटतं का ते! आता शासनाने हे सगळी थेरं बंद करावीत. म्हणजे एक पंधरा वर्षासाठी. जे आरक्षण आहे ते राहू द्यावे, कुठली स्मारकं बांधू नये, कुठली बंदी टाकू नये. मंदिर, मशीदींवरचे लाऊडस्पीकर ही ठेवावे. बोंबलू द्यावं लोकांना. काय झालं आहे की संख्याशास्त्र (Science of statistics) आणि तर्कशास्त्र (Science of probability and logic) याची नुसतीच तोंडओळख नाही तर पुर्ण डेव्हलप शास्त्र दिमतीला असताना भरतखंडाची झालेली अधोगति अभूतपूर्व आहे. वाहनांसाठी लागणार्या रस्त्यांची लांबी रूंदी (हा खरं तर आशियाचा प्रॉब्लेम झाला आहे), एखाद्या गावाला लोकसंख्येनुसार किती पाणी लागेल यांचे ठोकताळे, इंडस्ट्री किंवा शेतीसाठी योग्य विभागाचं वर्गीकरण या सगळ्या गोष्टींना गेल्या पंधरा वीस वर्षात मुठमाती मिळाली आहे. चाकण एरियात एका कंपनीची बिल्डींग बनवण्यासाठी खोदकाम चालू असताना आठ फूटावर भरभक्कम पाणी लागलं. हे सगळं पाणी पंप लावून ओढून फेकून दिलं. आमचं सामान्य ज्ञान अगदीच जुजबी. पण काहीतरी चुकलं हे वाटलं.  

काय आहे, आपले राज्याचे अन देशाचे प्रमुख बाहेरच्या देशातल्या लोकांना धंदा करण्यासाठी आमंत्रण देत फिरताहेत. पण त्यांनी जरा त्यांच्या कुणा लेफ्टनंटला काही मुलभूत गोष्टींवर ध्यान द्यायला सांगितलं तर बरं पडेल. रस्ते, पाणी, वीज या अगदी बेसिक गोष्टींचा अजूनही पायपोस नाही आहे. एक मोसम पाऊस झाला नाही तर अख्ख्या महराष्ट्राच अक्षरश: तोंडचं पाणी पळालं आहे. शेती कारणं दुरापास्त झालं आहे.

शप्पथ सांगतो, आम्हाला मॉल नको, डी मार्ट नको, मँकडोनाल्ड/केएफसी ची आम्हाला हौस नाही. आमचं जगणं सुसह्य करा बुवा! मुळात तुम्हाला सांगतो लोकांना धर्मावर आणि जातिवर विचार करायला वेळच नका देऊ हो. काही  मूलभूत गोष्टींना बरोबर घेऊन विकासाचं अधिष्ठान घेतलं की लोकांना सार्वजनिक रित्या गणपती बसवायला वेळ मिळणार नाही, रिक्षा स्टँडवर सत्यनारायण घालता येणार नाही. आमचे म्हणजेच साहेब हे ही लोकं विसरतील अन बघतो काय, मुजरा कर ही घोषणा ही इतिहासजमा होईल. 

आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ज्या कंपन्यांच्या दारात तुम्ही निमंत्रणपत्रिका वाटत फिरता आहात त्या कंपन्या तुमच्या केबिनच्या बाहेर इन्व्हेस्टमेंट प्रपोज़ल घेऊन उभे राहतील. म्हणजे लोकांनी उद्योग उभारायची प्रोसेस हे साध्य असावं. विकासाचं त्याला आपण साधन समजत असू तर आपण फार मोठी चूक करतो आहोत. 

आधीच्या शासनकर्त्यांनी देशाचा विकास साधताना एका निधर्मी राष्ट्राला सर्वधर्मसमभाव साधणारा देश म्हणत खोल गर्तेत ढकललं. त्यांच्या मित्रपक्षांनी भ्रष्टाचाराची कास धरली. त्या सगळ्यांना कंटाळून लोकांनी नवीन शासनाला विकासाचं अधिष्ठान घ्यायला निमंत्रित केलं पण साध्य आणि साधन याची गल्लत झाली असं वाटतंय 

Friday 18 December 2015

नेते अभिनेते

माझे एक ओळखीचे पुढारी आहेत. म्हणजे आता मला ओळखणार नाहीत पण एक काळ होता जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो. मित्राचे वडीलच तसे ते. एकदम साधा सरळ माणूस वाटायचा मला. आणि बोलतानासुद्धा आपल्या सगळ्यांचे वडील जसे मायेने, पोराच्याबद्दल काळजीने बोलतात, तसेच बोलायचे. जोक्सही मारायचे.

पुढे जाऊन कळलं की त्यांनी एका बँकेचं लोन घेऊन बँकेला गंडवलं. मला प्रश्न पडला की यांच्या रेल्वेनं कुठं आणि कधी पटरी सोडली असेल.

शरद पवार साहेब, लालूप्रसाद यादव किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ही मंडळी सुद्धा तरूणपणी ध्येयवादी असावीत. या सगळ्यांच्या आयुष्यात काय घडलं असेल की यांच्या प्रत्येक कृतीवर उत्तरआयुष्यात प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. ज्यांचं नाव लिहायला पण लाज वाटते असे आजचे राष्ट्रवादीचे नेते, जे एकेकाळी शिवसेनेचे होते, भ्रष्टाचाराच्या दलदलीत आज आकंठ बुडले आहेत तेसुद्धा नव्वदीच्या अगोदर तडफदार म्हणून प्रसिद्धच होते की!

राममनोहर लोहियांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले लालूप्रसाद यांचा चारा घोटाळा हा आपल्याला अचंबित करून टाकतो. त्यांनी रेल्वेची खरंतर वाट लावली, हावर्डमधे भाषण दिले हे खोटं लिहीलं, मिसाबद्दलही काही प्रवाद निर्माण केले. बिहारच्या जनतेने त्यांच्या पारड्यात मत दिलं हे ठीक आहे पण महाराष्ट्रात त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर सोशल मिडीयात कौतुक केलं जातं हे मात्र आश्चर्यकारक आहे. असो. मला स्वत:ला मात्र लालूप्रसाद अजिबात झेपत नाहीत. नाही नाही, त्यांच्या तथाकथित गावंढळपणाचं अजिबात हसू येत नाही. आपण भाजपविरोधक आहोत म्हणून लालूप्रसाद यांच्यासारख्या भ्रष्ट माणसाचं कौतुक करायला आमची बुद्धी भ्रष्ट नाही.

बाकी वर उल्लेख केलेले मान्यवर नेते हे कलासक्त आहेत, सुजाण आहेत पण तरीही सत्तेचा प्रश्न आला की विलासरावांना शिवसेना जवळ करावी लागली. सत्ता हातात आली की महाजनांनी रिलायन्स बरोबर साटलोटं जुळवलं. महाजनांचं कर्तृत्व अन वक्तृत्व वादातीत होतं. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण ते असले असते तर भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत त़्यांचं नाव बरच वर असलं असतं.  पुण्यातल्या कुठल्याही बिल्डरचं नाव घ्या, मग ते लवासा असो, पंचशील असो, मगर असो की काकडे असो, पवार साहेबांचं नाव जोडलंच जातं. मुंडे साहेबांच्या अपघाती निधनानंतर वाद प्रवाद झालेच होते. या सगळ्या प्रकारात शतप्रतिशत तथ्य नसलं तरी धूर निघतो म्हणजे आग तर लागली असेलच की कुठेतरी. पुन्हा एकदा असो.

पण या सगळ्यांच्या आयुष्यात एक पॉईंट असा नक्कीच येत असेल की जिथे आपल्या सामान्य लोकांच्या भाषेत पाय घसरला आणि मग सत्ता, त्यासाठी पैसा कमावण्यासाठी वाटाघाटी आणि तडजोडी चालू झाल्या असतील.

अभिनेते अन खेळाडू यांच्या बाबतीत ही होतं हे. कधी पैशाच्या बाबतीत तर कधी ते तारे तोडतात तर कधी अजून कुठल्या गोष्टीसाठी. परवा गिरीश कर्नाड बकले, ओम पुरी डोमेस्टिक व्हायोलन्स साठी प्रसिद्ध आहेत, अझर जडेजा ने पैसे खाऊन तोंड काळं केलं. शायनी अहुजा ने मोलकरणीवर बलात्कार केला तर संजय दत्त ने या प्रकारातला कहर केला. देशद्रोहाचा गुन्हा केला. मेरूमणीच तो.

तर असो. पाय सगळ्यांचा घसरतो, पण नेते जेव्हा भरकटतात तेव्हा सामान्य माणसांच्या जगण्याशी त्यांचा संबंध येतो. म्हणून त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्याचा मोह होतो.

सँट्रो

भौतिक सुखांची जरी आस ठेवली नाही तरी ती जेव्हा आली तेव्हा त्यांना झिडकारलं ही नाही. गरज पडत गेली तसं काही गोष्टी घेत गेलो. आता मग गरजा वाढत गेल्या का? तर हो. ज्या जीवनधर्माचा अंगीकार केला तिथे वाहन, मोबाईल ही गरज होती अन त्यामुळे आपसूक त्या गोष्टी आल्या.

माझी पहिली कार सँट्रो. सप्टेंबर २००० ला घेत ली. त्याआधी मी हिरो होंडा स्प्लेंडर वर लढाईला जायचो. दिवसाला १०० किमी. उन, थंडी, वारा, पाऊस. काहीही असलं तरी योग्य ती आयुधं घेऊन रपेटी माराव्याच लागायच्या. सुटका नाही. जुलै २००० ची गोष्ट असेल. पेण जवळ वडखळ नाक्याला इस्पात इंडस्ट्रीजमधे कस्टमर कॉल होता. दोन तीनदा मी आधी लाल डब्याने गेलो होतो. पण घाटात लोकं उलट्या करायचे. मला कंटाळा यायचा. घरात मी बसने जातो सांगून स्प्लेंडर सरळ पेणच्या रस्त्याला घातली. (कसलं टेचात लिहीलं ना. जणू मर्सिडीज चालवतो आहे). कॉल करून साधारण तीनला परत निघालो. आणि खोपोली येईपर्यंत आभाळ भरून आलं. बोरघाट चढायला चालू केला आणि रपरप पाऊस चालू झाला. दहा पंधरा मिनीटातच मुसळधार पाऊस. असा की रेनकोटच्या आतले कपडे ही चिंब भिजले. नखशिखांत भिजणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला. उर्वरित घाट माहिती असलेले सगळे स्तोत्र म्हणून पुर्ण केला आणि लोणावळ्याला पोहोचल्यावर पहिला निर्णय घेतहहोती
कार घ्यायची.

६ सप्टेंबर २००० ला मी सँट्रो घेतली. ह्युंडाई भारतात येऊन तीन एकच वर्षं झाली होती. मित्रांनी सांगितलं, मारूती घे म्हणून. पण मी सँट्रो वर ठाम होतो. त्यातही डार्क ग्रे कलर. लोकांनी अजुन नाकं मुरडली. संजय ह्युंडाईला कारची डिलीव्हरी घ्यायला गेलो तर सेल्समन म्हणाला "वहिनींना बोलवा. कारची चावी एकत्रच हातात देतो" इथं मुळात पहिल्या कारचं मला काही फारसं कौतुक नव्हतं अन वहिनींना तर त्याहून नाही. कार आणायला मी एकटाच गेलो. कसलं येडं आहे असे भाव तोंडावर आणत त्या सेल्समनने कारची डिलिव्हरी दिली.

पण एकदा कार घरी आल्यावर मात्र मी त्यातून बेधुंद फिरलो. मुंबई, नासिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि पुण्यातले आजूबाजूचे कस्टमर. वारू चौफेर उधळला होता. कामाबरोबरच कौटुंबिक सहलीही पुष्कळ केल्या. सँट्रोबरोबर दोस्तीच झाली माझी. पाच वर्षं झाल्यावर मी ह्युंडाईला कृतज्ञता  व्यक्त करणारं पत्रंही लिहीलं. एकंदरीतच वाहनांचं माझ्या आयुष्यातील स्थान हे नात्यातल्या लोकांइतकंच महत्वाचं आहे. अन का नसणार हो? दिवसातले अडीच ते तीन तास मी गाडीत बसणार अन गेले इतक्या वर्षात तिने एकदाही मला दगा देऊ नये हे आश्चर्यकारक नव्हे काय! पुढे २००५ ला वैभवीसाठी कार घेताना मी ह्युंडाई अॅसेंटला प्रधान्य दिलं.

२००७ च्या सुमारास डिझेल इंजिनची उपयुक्तता माझ्या नजरेत आली. पेट्रोलवरून डिझेलवर शिफ्ट झालो तर महिन्याला त्यावेळेस ८ हजार रूपयाचं सेव्हिंग होणार होतं. पैसे बचतीसाठी मी गॅस सिलींडर सँट्रोला लावलं, पण मजा नाही आली. शेवटी मी सँट्रो विकून स्विफ्ट घ्यायचा निर्णय घेतला. तब्बल १६५००० किमी फिरलो मी त्यातून. अनेक तणावाच्या, सुखाच्या, दु:खाच्या प्रसंगानंतर भावनेच्या लाटांवर या कार मध्ये मोकळा झालो.

निर्णय घेतला खरा पण जेव्हा नवीन मालक गाडी घ्यायला आला त्या दिवशी सकाळपासून खुपच हूरहूर लागली होती. असं वाटत होतं, काहीतरी घडावं आणि तो माणूस कारची डिलीव्हरी घ्यायला येऊच नये. पण असं व्हायचं नव्हतं. तो आलाच. सह्यांचे सोपस्कार झाल्यावर थरथरत्या हाताने किल्ली दिली मी. जणू मुलीला लग्नमंडपातून निरोप एखाद्या बापाच्या मनात जसे भाव असतील तसा मी कातर झालो. मला काही कळायच्या आत तो सँट्रो घेऊन गेलाही. कंपनीच्या अंगणात मी एकटाच उभा होतो. इतका वेळ सांभाळलेलं अवसान माझ्या डोळ्यातून घळाघळा ओघळत होतं.

तीन एक वर्षापूर्वी दापोडीच्या इथे माझं लक्ष एका सँट्रोवर गेलं MH 12 AN 5374. हो, माझीच डार्लिंग कार . मी कचकचून ब्रेक दाबत थांबलो. मी प्रेमाने तिच्या बॉनेटवर हात फिरवताना तिचा आताचा मालक आला. तुसडेपणाने  म्हणाला "क्या है" मी त्याला माझी कथा सांगितली, पहिली कार अन काय काय. फोटो काढू का विचारलं. चेहर्यावर अविश्वासाचे भाव ठेवत तो हो म्हणाला. "संभालके रखना दोस्त" असं म्हणत त्याचा प्रेमभराने हात दाबला. माझी पाणावलेली नजर बघत भांबावल्या अवस्थेत त्याने मला निरोप दिला.

आजीचा सल्ला

मी लहान असताना माझी आजी आमच्याकडे रहायची. मला खेळण्याचा खूप नाद. त्यात माझे मित्र असे अतरंगी होते की मी अभ्यासाला बसलो, की बिल्डींगच्या खाली उभे राहून विशीष्ट आवाजात शिट्टी मारायचे. ती शिट्टी ऐकली की माझ्या मनात चलबिचल व्हायची. आईबाबा घरात असतील तर काही तरी कारण सांगून मी घरातून पसार व्हायचो. परत जेव्हा यायचो तेव्हा आईची बोलणी खाऊ नये म्हणून गुपचूप अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसायचो. आमची आजी डोळ्याच्या कोपर्यातून ही सगळी माझी नाटकं बघायची. दहावीला फक्त मित्र खेळायची म्हणून मी पण खेळायला जायचो. ज्याला आजकाल पिअर प्रेशर म्हणतात ना, साधारण तोच प्रकार. मित्र असं वागतात ना, मग आपणही तसंच वागायचं.

एके दिवशी घरात कुणी नसताना आजीने मला तिच्या समोर बसवलं आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाली "हे बघ राजेश, मी काय बोलते ते लक्ष देऊन ऐक. मी बघतेय की गेले काही महिने तु फक्त मित्र असं करतात म्हणून तसं वागतोयस. हे तुझ अभ्यास अर्धवट टाकून खेळायला जाणं हा तुझा पिंड नाही आहे. पण मित्रांच्या वागण्याचालण्याचं, बोलण्याचं तु अंधानुकरण करतो आहेस. तुझे काही मित्र असे आहेत की ज्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि मग ते खेळायला येत आहेत. तर काही जण असे आहेत की ज्यांना अभ्यासाचा काही गम नाही आहे. ते दिवसभर टिवल्याबावल्याच करत असतात. पण तु न या गावचा न त्या गावचा. त्यामुळे तु मनात आधी पक्क कर, कसं वागायचं ते. म्हणजे अभ्यास पूर्ण करून मैदानात उतरायचं की त्या दुसर्या मुलांसारखं फुकाचा टाईमपास करण्यासाठी चकाट्या पिटायच्या ते. जा आता."

काही वर्षांनी आजी देवाघरी गेली. पण तिचा सल्ला मी कायम लक्षात ठेवला. मग कॉलेजमधे मित्रांच्या हेयरस्टाईलची कॉपी केली, किंवा सिगरेट पिली किंवा कधी पिअर प्रेशर खाली कंपनीच्या पार्टीत ड्रिंक्स घेतले आणि हे पुन्हा पुन्हा घडलं की घरी आल्यावर फोटोतली आजीची नजर मला बेचैन करायची. आणि मग फक्त मित्र हे करतात, ते असं बोलतात,  म्हणून मी पण करायचं हे लागलीच टाळायचो.

आज मी ४७ वर्षाचा आहे. माझी आजी जाऊन कित्तेक वर्ष झाली. पण तिचा सल्ला मी फेसबुकवरही काटेकोरपणे पाळतो. त्यामुळे सहसा पिअर प्रेशरमुळे चालू वादाच्या मुद्द्यावर केवळ मित्र लिहीतात म्हणून मी लिहीत नाही, काही आदरणीय मित्र लिहीतात म्हणून मग मी पण इतक्या मंडळींना नारळ दिला असंही  लिहीत नाही. आजीची शिकवण आयुष्याच्या या टप्प्यावर कामाला येईल असं कधी वाटलंही नव्हतं.

माझी आजी फारच हुशार होती, नै. 

Sunday 13 December 2015

व्यक्तिचित्रण

महेंद्रभाईंनी व्यक्तिचित्रण दिंडी काढली पण काही कारणामुळे ते लांबचा पल्ला गाठू शकली नाही. कारण का ते कळलं नाही. कदाचित वाद होण्याची शक्यता म्हणून लोकांनी टाळलं असेल. प्रविणने मला दोनदा आवाहन केलं पण काही कारणामुळे जमलं नाही. आज ठरवलंच की लिहून काढायचं म्हणून. अन माझा दुसरा प्रॉब्लेम असा होता की मला अनेक लोकांबद्दल लिहायचं होतं. आता त्यातून कुणाबद्दल लिहायचं हा प्रश्न सोडवण्यात बरेच दिवस गेले. मित्रपरिवार मोठा झाला आहे. बरं सगळे एकाहून एक सरस. त्यांचं लिखाण, पोस्टवरच्या कॉमेंटस या अफलातून असतात.  तरीही त्यांच्यापैकी सात निवडले आहेत. तेच का निवडले, तर कारण नाही. चिठ्ठ्या टाकल्या आणि सात उचलल्या असं समजा.

सप्तसुर

१. निर्भयसिंह जाधव: फेबु खेळायला चालू केल्यावर हा गृहस्थ मित्रयादीत आला. याचे चार मित्र आहेत, सध्या त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलंय असं दिसतंय. पण हे पाच जण मिळून फुल दंगा घालायचे. निर्भय एखादा मुद्दा  टाकायचा, म्हणजे पेटवायचा आणि बाकी त्यावर फुंकर मारायचे. नाही, फुंकर विझवायची नाही तर धगधगायची. याची राजकीय समज त्याच्या वयाच्या मानाने खूप चांगली आहे. तो स्वत:च्या मतांवर ठाम असतो. प्रसंगी हेकेखोरही असतो. त्यामुळे त्याने खुप सिनियर मित्र गमावले. आता तो खूप लो प्रोफाईल असतो. मला फेबुची गोडी लावण्याचं पाप निर्भयला लागलं आहे.

२. सौ स्मिता गानू जोगळेकर.: मी फेबुवर फार ताई वैगेरे कुणाला संबोधत नाही. तीन चार जणी असतील. पण त्यांनी ती पदवी त्यांच्या लिखाणातून अन वेळोवेळी माझ्यावर वर्षावलेल्या आशिर्वादातून कमावलेली आहे. स्मिताताई, तिच्या लिखाणाबद्दल, स्वभावाबद्दल मी काय बोलणार? वादातीत आहे ते. फेबुवरून डिअॅक्टिवेट होतो मधे. तेव्हा दोघी जण कायम संपर्कात होत्या, त्यापैकी एक स्मिताताई. फेबुवर  नसताना तिच्याशी जी मेलामेली झाली तो माझ्या संग्रही एक अमूल्य ठेवा आहे. मी जेव्हा कधी तिला भेटेल तेव्हा तिचे पाय धरण्यासाठी हा ताठ पाठीचा कणा एका सेकंदात वाकेल याबाबत शंका नाही.

३. बालाजी सुतार: एक प्रथितयश लेखक, एक भावस्पर्शी कवी अन त्यावर कडी करणारा त्यांचा गुण म्हणजे एक मोठा माणूस. ते ललित लिहीतात तेव्हा त्यांच्या शब्दातून शीतल चांदणे बरसते अन जेव्हा धगधगतात तेव्हा त्याच शब्दातून आग लागते. अत्यंत संतुलित विचारसरणी, ती मांडण्याची विलक्षण वाचनीय हातोटी अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाची गळाभेट घेण्याची इच्छा आहे. ती कधी पूर्ण होईल याची वाट पाहतो आहे.

४. दिलीप लिमये: दोन गुरू लोकं भेटले आहेत. एक विनोदाची पखरण करणारे उदय जोशी अन दुसरे ललित लेखन ताकदीने उतरवणारे दिलीप लिमये. लिमयेंच्या मित्रयादीत फार मंडळी नाहीत बहुधा. ते पण लाईक गेमपासून दूर आहेत. पण त्यांचं लिखाण हे खिळवून टाकणारं असतं. संग्रही प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाला शब्दात गुंफतातही ते छान. भेटण्याचा वादा झाला आहे, बघू कधी योग येतो ते. अंगठा मागणार नाहीत असे वाटते.

५. राहुल बनसोडे.: हा माणूस विद्वान आहे. कमी वयात त्याने कमावलेला आवाका हा स्तिमित करणारा आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राष्ट्रीय अन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. तो जितक्या ताकदीने रूपक लिहीतो तितक्याच जोरकसपणे ललित आणि त्यापेक्षाही इंटेन्सिटीने इकॉनॉमिक आर्टिकल लिहीतो. नाही म्हणायला त्याच्या काही पोस्ट डोक्यावरून जातात, त्यातल्या त्यात तो जेव्हा झाडबुके बनून लिहीतो तेव्हा. पण ठीक आहे. चालतं ते. सुगम संगीताच्या मैफिलीत  ऐकताऩा एखाद दुसरं शास्त्रीय गाणं आपण ऐकतोच की!

६. श्रेणिक नारदे/नरडे/नारडे: नको असलेले आडनाव खोडून टाक रे. हा मुलगा अद्भूत लिहीतो. ग्रामीण बाज त्याने चपखल उचलला आहे. पुढचं वाक्य काय असेल याची कायम उत्कंठा लागलेली असते. ट्विस्ट इतके देतो की सुरूवात कुठून करतो आणि संपते कुठे हे मजेशीर असते. श्रेणिकने लिहीत राहिला तर थोड्याच दिवसात त्याचं पुस्तक अत्रे सभागृहात विकायला दिसेल अशी मला खात्री आहे.

७. मयूर लंकेश्वर: विद्रोही लेखन म्हणजे नामदेव ढसाळ इतकंच माहिती होतं. इथे फेबुवर सतीश वाघमारेंच्या लिखाणाने त्याची खर्या अर्थाने ओळख झाली. आणि आता मयूर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतो आहे. काही सामाजिक विषयांवर माझी तोंडओळख आहे, पण आरक्षण या विषयावर माझं कुठलंही ठाम मत अजून झालं नाही. पण मयूरचा आरक्षण या विषयावरच्या लेखाने काही गोष्टी कळल्या. काही वेळा विरोध करताना त्याचा तोल जातो खरा, पण त्याने मयूरच्या विचारांचं महत्व कमी होत नाही.

ज्यांना भेटलो नाही अशांपैकीच लिहायचं ही अट होती. त्यामुळे काम थोडं सोपं झालं.  या सातही जणांना भेटलो नाही आहे मी. बाकी १०० एक लोकांना भेटलो आहे मी. आमचा परभणीकर ग्रूप आहे, खर्डेघाशी मंडळी आहेत. एका कुणाचं नाव लिहीत नाही पण ज्यांचं लिखाण अन त्यांचे विचार मेंदूला चालना देतात अशी अनेक मंडळी आहेत. काही जण इतक्या भन्नाट कॉमेंट टाकतात की मूळ पोस्ट झाकोळावी.  कधीकधी वैयक्तिकरित्या विसंवादी सूर लागतोही. पण विचारांची सरमिसळ जेव्हा होते तेव्हा या विसंवादी, संवादी सूरांमधून एक सिंफनी तयार होते आणि राजेश मंडलिक च्या मनाचा ऑर्केस्ट्रा सूरमयी तार छेडतो. 

Monday 7 December 2015

पेट्रोलपंप

आता मात्र मला वेशभूषा आणि ओव्हऑल पर्सनालिटी सुधरवायची वेळ आली आहे. कुणीही टिंगल उडवायला लागलं आहे माझी. आता हेच पहा ना. शनिवारी मुंबईहून पुण्याला येत असताना एक्सप्रेस हाय वे च्या पेट्रोलपंपावर डिझेल भरायला थांबलो. कारमधून बाहेर पडलो तर समोरून दिपीका, करीना, प्रियांका सदृश मॉडेल्सचा कळप मला दिसला. हो म्हणजे अगदी तशाच, बारीक अंगकाठीच्या, देहयष्टीच्या, अल्प आणि तोकड्यावस्त्रांकिता.

खिशातून पाकीट काढण्याची कृती करत असतानाच, पंपावरचा डिझेल भरणारा मुलगा मला म्हणाला "साहेब, झिरो फिगरकडे बघा" मी वदलो "बघतोय" तर म्हणतो कसा "अहो साहेब, पंपाच्या झिरो फिगरकडे बघा" आणि मग टाळी देण्यासाठी हात पुढे केला.

असो. काही तळटीपा

- डिझेल मिळत असून त्याला फ्युएल पंप न म्हणता पेट्रोल पंप का म्हणतात?

- कार कुठली तर ती टोयोटा एटिऑस आहे. किती देते या प्रश्नाचं उत्तर इनबॉक्समधे मिळेल.

- अंगकाठी आणि देहयष्टी हे दोन्ही समानार्थी शब्द असले तरी इंम्पँक्ट जास्त पडावा यासाठी योजले आहेत. अल्प आणि तोकडे हे समानार्थी शब्द नसून एकमेकांना पुरक शब्द आहेत.

- साहेब असं तोंडदेखलं म्हंटला तरी त्या पोर्याला मी सेटको कंपनीचा ड्रायव्हर वाटलो असण्याची दाट शक्यता आहे. हे दोन शीट लोणावळ्याला सोडता का असं विचारलं नाही नशीब.

- तोंडावरचे खजील भाव लपवण्यासाठी मी पंपावर पाकीट खाली पाडून उचलण्याचा अभिनय केला. त्याचप्रमाणे मूळ पोस्ट मुळे माझ्याबद्दल काही चूकीचे मत तयार होऊ नये म्हणून भरकटवण्यासाठी तळटीपा लिहील्या आहेत हे चाणाक्ष मित्रांच्या लक्षात आलेच असेल.

- चाणाक्ष मित्र, वाचक नाही याची विशेष नोंद घ्यावी.

Sunday 6 December 2015

Steve Warner

२००५ साली वेस्टविंड शी बिझिनेस रिलेशन प्रस्थापित झाले तेव्हा आम्ही मार्क टेरेल शी संभाषण करायचो. एखादं वर्ष झालं असेल, अचानक एक दिवशी सकाळी फोन आला. "मार्क ने वेस्टविंड सोडली आहे. तुमचं अकौंट आता स्टीव्ह बघेल."

स्टीव्ह वार्नर, भेटलो होतो मी त्याला. अत्यंत सरळ माणूस. टिपिकल ब्रीट. स्पष्टवक्ता, हजरजबाबी आणि विनोदाला खळखळून दाद देणारा. माझे अन त्याचे मैत्रीचे ऋणानुबंध जुळू लागले, तो पुण्याला आला होता आमची सर्विस ऑडीट करण्यासाठी. आणि मग तो त्यानंतर येतच राहिला. आणि दिवसभराच काम संपलं की आम्ही गप्पा मारायचो विविध विषयांवर. भारत, इंग्लंड, चर्च, मंदिर, धर्म, क्रिकेट.  अगदी  स्वत:च्या कुटुंबाबद्दल सुद्धा. युके मध्ये फ्यामिली चे काय प्रॉब्लेम आहेत आणि तो ते कसे हाताळतो, हे ही सांगायचा. क्रिकेट मध्ये इंग्लंड ची किंवा भारताची धुलाई झाली की आमच्या मेल्स वाचनीय असत. तसाही  सुर्याखालील कुठलाही विषय आम्हाला वर्ज्य नसायचा.

तो आला की आमची म्हैसूर ची व्हिजीट असायचीच. मग आधी बंगलोर, हॉटेल ला राहणे. आणि मग दुसर्या दिवशी सकाळी कारने म्हैसूर ला. चार तास प्रवास. गप्पांमध्ये एक मिनिट खंड नाही पडायचा. मी झोपलो असेल तेव्हाच आम्ही थांबायचो. मंगळावर यान पाठवलं तेव्हा स्टीव्ह म्हणाला "इतकी गरिबी असताना कशाला तुम्हाला असा उपद्वयाप पाहिजे, ५०० कोटीचा." मग मी त्याला पन्नास फुट ही उंच न उडणाऱ्या रॉकेट वर कसे हजारो कोटी रुपये आम्ही खर्च करतो, कुंभमेळ्यावर कसे जमून पैशाची उधळपट्टी करतो, विविध धर्माच्या यात्रेवर कशी सबसिडी देतो हे सांगितलं आणि मंगळावर काय मिळेल ती गोष्ट वेगळी पण या जोखडातून मुक्तता होऊन विज्ञानधीष्ठीत दृष्टीकोन येण्यासाठी हे कसं गरजेचं आहे ते सांगितलं. पटलं त्याला.

मधे कलाम सर गेले तेव्हा त्यांच्या सहीचं लेटर कव्हर फोटो म्हणून मी लावला होता. त्याच आठवड्यात तो पुण्याला आला होता. मला म्हणाला "कलाम सरांची पोच आली ते ठीक आहे, पण तु लिहीलंस काय पत्रात"
ब्लॉगवर असलेलं ते पत्र त्याला वाचायला दिलं. आधीच ब्रिटीश अन त्यात आमचं दिव्य इंग्रजी. तो गालातल्या गालात हसला यात काही नवल नव्हतं. मी विचारलं, का हसतोस म्हणून. तर म्हणाला "तुझ्या इंग्रजीच्या मास्तरांनी व्याकरणावर खूप भर दिला असं वाटतं. असं इंग्रजी इंग्लंडमधे साधारणपणे मागच्या पिढीतले लोक लिहायचे. आता असं कुणी लिहीत नाही. पण एक सांगतो, मला तुझं इंग्रजी वाचल्यावर मला असं वाटलं की मनात येउन ही मी असं लिहू शकणार नाही."

त्याच्या कामात ही अत्यंत चोख आणि हुशार. बाकी वेळेस आम्ही इतर काही बोलत असलो तरीही कामाच्या वेळी बाकी भंकस नसायची. वेस्टविंड प्रती त्याची प्रचंड निष्ठा. कंपनीला धक्का बसेल असेल असं कुठलंही वर्तन त्याच्याकडून घडलं नाही. आणि आमचं सर्व्हिस सेंटर वर्ल्ड क्लास राहावं म्हणून तो नेहमीच प्रयत्नशील राहिला. खूप वेळा आउट ऑफ वे जाऊन आम्हाला मदत ही केली. कधी वादही झाले, पण मर्यादेत राहून. आमच्या कंपनीचं आता जे बरं स्टेटस आहे त्यात वेस्टविंडचा, खरं तर स्टीव्ह चा नि:संशय वाटा आहे हे नक्की. 

दोन आठवड्यापूर्वी  सांगितलं त्याने की, वेस्टविंड ने त्याला सांगितलं की बिझिनेस कमी झाल्यामुळे त्याचा जॉब धोक्यात आला आहे. मला वाटलं की, ठीक आहे, कंपनीने हूल उठवली असेल. पण दैव काही पलटल नाही. परवा स्टीव्ह ची मेल आली निरोपाची. मी काही त्याला उत्तर देऊ शकलो नाही, म्हणजे इच्छाच झाली नाही. स्टीव्ह शिवाय वेस्टविंड, मी कल्पना च करू शकत नाही. 

काळाचं चक्र फिरत राहील. स्टीव्ह सारखा सदगुणी माणूस नोकरीला लागेलही अजून कुठे. कुणास ठाऊक,  त्या चक्रात फिरताना स्टीव्ह शी भेट होईल च होईल. नक्कीच. 

Hi Steve, 

I wrote a mail on your personal e mail id. But it looks that it has not reached you. 

This post is dedicated to our friendship, your professional working at Westwind and most important to your nature as sensible human being. 

I could have written this post in English. But it is said that emotions are better expressed in mother tongue. Do not try to translate it in to English. It looses aura of expressions. No no, don't worry. I have mentioned all good things about you. 

I can only say that it was pleasure working with you for past 9 years. And who knows, we will meet again for some or the other reason. 

Wish you every success in your assignment. 

Rajesh

Saturday 28 November 2015

नागपूर ट्रॅव्हेलॉग

नागपूरला भाच्याचं लग्न झालं. त्यासाठी आलो होतो. काही निरिक्षणं:

- गरीबरथ ट्रेनमधील साईड मिडल बर्थ हा लै म्हणजे लैच बेकार प्रकार आहे. ज्या कुणी ही आयडिया दिली त्याला खूप शिव्याशाप. लालूंच्या काळात हे आलं म्हणून त्यांनाही माझा तळतळाट.

- दुथडी भरून वाहणारी नदी आजही मनाला खूप आनंद देते आणि तलावाच्या बाजूने घेतलेला मॉर्निंग वॉकही.

- नागपूरमधील लोकं पुण्यातल्या लोकांपेक्षा व्यवस्थित ट्राफीक सिग्नल पाळतात.

- मला नवरदेवाच्या बाथरूममधे दाढी आंघोळ करायला मिळाली. मला या कामाच्या प्रसाधनात अंगाला लावायचा साबण, डोक्याला लावायचे पॅराशूटचे खोबरेल तेल आणि फार फार तर एखादा शांपू इतकीच आयुधं माहिती आहेत. तिथं बेसीनवर असलेल्या २० एक विविध नावाच्या अन चित्रविचित्र आकाराच्या प्लास्टिक बॉटल्सने मला फारंच न्यूनत्व आलं. (बाथरूमचा सीन असल्यामुळे मी आधी चुकून न्युडत्व असं लिहीलं होतं. लागलीच एडिट केलं)

- आजकालच्या  लग्नातील झकपकपणा, श्रीमंती माझ्या अंगावरती येतात आणि डोक्यातही जातात. १९९१ साली फेबु असलं असतं तर माझ्या मावशीच्या काकांनी किंवा बाबांच्या मावसभावानी माझं लग्न लावल्यावर हाच डायलॉग स्टेटस म्हणून टाकला असता का?

- मी अधूनमधून लवकर सद्य कामातून रिटायर होण्याचा विचार करतो. लग्नाचा अवाढव्य खर्च बघून काही काळ या निर्णयावर मी डळमळीत झालो. एक जण म्हणाले, "तुला काय काळजी आहे. दोन्ही मुलंच तर आहेत तुला"

- प्रवासात वापरलेले कपडे बोचके भरून बॅग भरणारा मी आणि प्रवासात वापरलेल्या कपड्यांची घडी आमच्या इस्रीवाल्यापेक्षाही भारी घालून अत्यंत सुबक बॅग भरणारा माझा लहान भाऊ उन्मेष. एकाच आईबापाच्या पोटी इतके परस्परविरोधी स्वभावाचे दोन दिवटे जन्मणं हे अजबच. उन्मेष जरी काटेकोर तरीही तो दिवटाच.

- फेबुवर मित्रयादीत असलेल्या हरीदादाने माझ्या लिहिण्यापेक्षा पोस्टवर येणार्या मित्रांच्या कॉमेंटस जास्त खुमासदार असतात असे म्हंटले. मला माझ्या मित्रयादीचा अभिमान वाटला. कुणी अभिमानाऐवजी मत्सर असेही वाचू शकते. माझी काहीच स्तुति केली नाही म्हणून हरीदादाचा थोडा रागही आला.

- आदरातिथ्याच्या बाबतीत यजमानांच्या आसपासही मी पोहचू शकत नाही. रादर आमच्या मातोश्री सोडल्या तर कुणीच नाही.

- गुगल मॅप भारतातल्या सगळ्या शहरात गंडवतो. रस्त्यावरच्या माणसाला पत्ता विचारण्याची पद्धत ही अजूनही सगळ्यात विश्वासार्ह आहे.

- रिक्षावाल्याचा माज बघून मी ठरवलं की यापुढे स्टेशनपासून इतक्या अंतरावरचं हॉटेल शोधायचं की तिथे एकतर पायी पोहोचता आलं पाहिजे नाहीतर टॅक्सी लागली पाहिजे.

- नागपूरचं रेल्वे स्टेशन हे पुण्याच्या रेल्वे स्टेशनपेक्षा खूप चांगलं आहे.

- चालत्या ट्रेनमधे मोबाईलवर मराठी टाईप करणे अवघड आहे. अर्थात चालत्या ट्रेनमधे कुठलाही आधार न घेता टॉयलेट मधे लघवी करण्यापेक्षा सोपे आहे.

- तरीही आज इतकी वर्षं प्रवास केल्यावरही माझ्या मनात भारतीय रेल्वेबद्दल प्रेम आणि आदर अबधित आहे. 

Friday 20 November 2015

B & B

"Please do not smoke here. We would rather die out of natural cause"

हो, असंच लिहिलं होतं त्या रूम मध्ये. ज्यूड आणि डेरेक चं बेड and ब्रेकफास्ट. गाव पूल डोर्सेट यु के.

युरोप मध्ये हा एक भन्नाट प्रकार आहे. B&B. भारताचा रुपया खूपच अशक्त असल्यामुळे युरोपात  हॉटेल मध्ये राहणं हे खूपच महाग प्रकरण आहे. त्याला उपाय हा B & B. मी अनेकवेळा या बी and बी मध्ये राहिलो आहे आणि बहुतेकवेळा माझा अनुभव चांगला होता. एकदा ह्यानोवर मध्ये मात्र फारच बेकार अनुभव आला होता.

पण पूल, यु के मधला अनुभव अगदी लक्षात राहण्याजोगा. ज्यूड आणि डेरेक एक जोडपं. मी भेटलो, म्हणजे २००६ मध्ये, दोघांचं वय असेल पासष्टीच्या आसपास. मला डेरेक घ्यायला आले होते, पूल रेल्वे स्टेशन वर. मला घेऊन आले, या B &B  वर. आजूबाजूला गर्द झाडी. आणि त्यामध्ये हे एक टुमदार घर. नवरा बायको आणि तीन रूम होत्या गेस्ट साठी. एक खाली ग्राउंड फ्लोर ला आणि अजून दोन पहिल्या मजल्यावर. मला दिलेली रूम, अत्यंत स्वच्छ. बेड वर बसल्यावर समोरच हे वर लिहिलेलं वाक्य. टॉयलेट एकदम टापटिपिचं. ड्राय बाथरूम हा प्रकार प्रचलित असल्यामुळे जमिनीवर कारपेट. रूम मधेच एक कॉफी मेकर.

ज्यूड, साधारण पासष्टीची तरुणी. आपल्या रेखा कामत आठवतात का? साधारण त्यांच्यासारखा चेहरा. नेहमी मिश्किल हास्य. अत्यंत हजरजबाबी. सुस्पष्ट आवाज. आणि ब्रिटीश बाई आहे, मग इंग्रजी बद्दल मी पामर काय बोलणार? एकुलता एक मुलगा होता त्यांना. तो त्याच्या संसारात मग्न होता. एका किलोमीटर वर रहायचा. पण पाश्चात्य प्रथेप्रमाणे त्याची चूल वेगळी होती.

ज्यूड काकू मला संध्याकाळी विचारायच्या "बाळा, तुला उदया ब्रेकफास्ट ला काय हवंय?" आता इंग्रजी ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेड ओम्लेट. माझा अत्यंत आवडता. मग मी जास्त प्रयोग नाही करायचो. टोस्ट ऑम्लेट. तर कधी स्क्राम्बल्ड एग   म्हणजे आपली भुर्जी. टेबल वर सफरचंद, संत्र, केळ वगेरे फळं ठेवली असायची. ज्यूड काकू सकाळी सकाळी तयार होऊन कामाला लागायची. डेरेक कडे बाहेरची खरेदी करायची वर्दी असायची. सकाळी सात वाजता सगळा ब्रेकफास्ट तयार असायचा. साधारण साडे सात वाजता मी नाश्ता करायचो. ज्यूस चा एक मोठा ग्लास दयायची. आणि मग चहा. साथीला मस्त गप्पा. ती मला भारताबद्दल विचारायची. मी यथाबुद्धी तिला उत्तर दयायचो. ज्यूड आणि डेरेक ला गोव्याबद्दल फार आकर्षण. मी त्यांना म्हणालो, या पुण्याला. मी घेऊन जातो तुम्हाला गोव्याला. तर म्हणाली "I can not use flight toilet for so many times."

एकंदरीत चार दिवस राहिलो मी. गप्पा मारल्या. पण ज्यूड आणि डेरेक हे पूर्ण प्रोफेशनल होते. ना  त्यांनी कधी माझ्याशी एका मर्यादे पलीकडे गप्पा मारल्या ना मला जास्त जवळ येऊ दिलं. भारतात परत निघताना मी प्रेमभराने ज्यूड आणि डेरेक चे आभार मानले. त्यांना म्हंटल, तुम्ही मला घरची आठवण अजिबात येऊ दिली नाही. "it is always nice to have guests like you." असं म्हणाले ते.

Value for money म्हणजे याचा अनुभव घेत मी तिथून परत निघालो.

साधारण याच धर्तीवर आपल्याकडे झो रूम आणि ओयो रूम असे दोन बिझिनेस चालू झाले आहेत. पण जणू हा बिझिनेस कसा करू नये याचा वस्तुपाठ दोघेही दाखवत आहेत.

मी ओयो दिल्लीत बुक केली होती, गुरगाव ला. मी पोहोचलो तेव्हा तिथे चेहऱ्यावर इस्त्री फिरवलेला माणूस बसला होता. म्हणाला "पैसा अडवान्स लगेगा." बुकिंग.कॉम वर पैसे चेक औट च्या वेळेस दयायचे असं लिहिलं होतं. दोन मिनिटे हुज्जत घातल्यावर मी त्याला कार्ड दिलं तर म्हणाला "कॅश देना पडेगा. कार्ड मशीन बंद है." मी म्हणालो माझ्याकडे कॅश नाही आहे. तर म्हणाला "आधा किमी पर ए टी एम, है  कॅश लाईये". कॅश दिली. सकाळी ब्रेकफास्ट साडेसात ला तयार ठेव अस सांगून मी झोपलो तर सातला पंटर उठला  आणि नंतर नाश्ता म्हणून काहीतरी टाईमपास आणून ठेवलं.

मुंबईत झो रूम बुक केली. पत्ता विचारण्यासाठी फोन केला तर म्हणाला "झो रूम वाल्यांशी माझी भांडणं आहेत. तुम्ही तिथे advance पैसे भरले आहेत. मी काही तुम्हाला रूम देऊ शकत नाही" हे संभाषण रात्री दहाचं. एरिया कुठला तर मरोळ नाका. शेवटी आठ तासाच्या झोपेसाठी ५००० रुपयाची मुंबई केली.

खरं तर घरात एक दोन रूम एक्स्ट्रा असतील तर बेड & ब्रेकफास्ट उदयोग करणे हा अतिशय चांगला  मार्ग आहे. थोडी कल्पकता आणि थोडे कष्ट घेतले तर अतिशय उत्तम पद्धतीने अर्थार्जन होऊ शकते. 

Wednesday 18 November 2015

टूर टूर

भारतात फॅमिलीला घेऊन कुठं फिरायला जायचं म्हंटलं की मी जास्त ट्रॅव्हल कंपनीच्या नादाला लागत नाही. अहो काय करणार. गेली २१ वर्ष मी भारतभर प्रवास करतो आहे. त्यामुळे ट्रेनप्रवास किंवा विमानप्रवास कसा करावा याचे ठोकताळे डोक्यात फिट आहे. तिकीट काढणं वैगेरे प्रकारात तर इतकी प्रोफिशियंसी आली आहे की कसलेला ट्रॅवल एजंट पाणी भरेल. टॅक्सी कशी ठरवावी हे सगळं व्यवस्थित माहित आहे. बरं त्यात माझा अवतार असा की टॅक्सीचालकाला मी त्याचा व्यवसायबंधू वाटतो. मग एक न्हावी दुसर्या न्हाव्याचं डोकं भादरताना जी आत्मीयता दाखवत असतील तोच भाव टॅक्सीचालक माझ्याप्रति दाखवतात. बाकी लॉजबुकींग इंटरनेट मुळे खूपच सोयीस्कर झालं आहे. त्यामुळे भारतात मी कुठल्याही टूर कंपनीकडून फिरलोच नाही. अगदी काश्मीर, कुलू मनाली, हैद्राबाद, चंदीगढ-अमृतसर, गोवा, कर्नाटक ह्या सगळ्या सहली मी प्लान केल्या आणि यशस्वी पणे पूर्ण केल्याही.

२०११ साली मी कुटुंबासमवेत थायलँडला गेलो होतो (थायलँड आणि फॅमिलीबरोबर. ख्याख्याख्या). टूर कंपनीकडून केलेली ही पहिली यात्रा. विदेश प्रवास होता म्हंटलं नाटक नको. कुठे पटायामधे चुकलो बिकलो असतो तर मग पुन्हा पुन्हा चुकत राहिलो असतो.

यावर्षी दिवाळीत जीवाची दुबई करायचं ठरवलं. वैभवीचा फार आग्रह होता की टूर कंपनीबरोबर जावं. मला तसंही आवडतं. वैभवी आणि पोरं, ते स्विमींग, सकाळचा दणदणीत ब्रेकफास्ट, फोटो काढणे या उद्योगात दंग असतात. आणि मी ग्रूपमधील बाकीच्या मंडळींशी गप्पा मारण्यात मश्गुल होतो. अर्थात, पुरूषमंडळींशी. पण जी टूरप्राईस सांगितली त्यानंतर एक तास आम्ही एकमेकांशी बोललो नाही. वैभवी म्हणाली, आपण केरळला जाऊ.  मी बोललो, तुझं दुबईचं बजेट सांग. तिने सांगितलं. मी म्हणालो, मी जमवतो यात. तर म्हणाली, यापेक्षा छदाम जरी जास्त लागला तर मी आयुष्यात तुझ्याबरोबर ट्रीपला येणार नाही. मी डन केलं.

स्वत: सगळी बुकींग केली. स्पाईसजेट चं विमान (इंटरनॅशनल नो फ्रील म्हणजे लैच बोरिंग असतं), बुकींग.कॉम वरून हॉटेल ठरवलं, बुर्ज खलिफा, डेझर्ट सफारी, फरारी वर्ल्ड (Ferrari चा उच्चार फरारी करायचा म्हणे, फेरारी नाही), Dhow Cruz वैगेरे इंटरनेट वरून ठरवलं. लोकल टुर तिथे जाऊन बुक केली. पाच दिवस जलसा करून आलो. हॉटेल च्या रेट मध्ये ब्रेकफास्ट फ्री नव्हता. आजकाल मी वाय फाय फ्री आहे का ते बघतो. ब्रेकफास्ट नंतर. त्यामुळे काही तडजोडी कराव्या लागल्या. पण असो.

स्वत: बुकिंग करायचे काही फायदे आहेत. एकतर तुम्हाला दुनियादारी कळते. परत ती धावपळ नाही हो. सकाळी ८ ला तयार व्हा. या ठिकाणी फक्त ४५ मिनिटे बस थांबणार. आणि एखाद्या ठिकाणी आडमाप वेळ. आता त्या थायलंड च्या ट्रीप मध्ये डायमंड च्या factory त तीन तास थांबवलं. इथे मला कुठलीही, म्हणजे कुठलीही, खरेदी करायला दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. बरं, इथे घ्यायचं काय तर डायमंड. म्हणजे आनंद. डायमंड बेकरी तून खारी आणि चिकन sandwich आणण्याशिवाय माझा डायमंड या शब्दाशी तिळमात्र संबंध नाही. आम्ही आपला तिथलं पाण्याचं कारंजं बघत वेळ घालवला. दुसरं म्हणजे आपल्याला पाहिजे ते खाता येतं. या दुबई ट्रीप मध्ये इटालियन, अरेबिक अहो एवढंच काय पण पाकिस्तानी हॉटेलात जेवलो. अर्थात हे सगळं शक्य झालं कारण दुबई ही बर्यापैकी टुरिस्ट फ्रेंडली कंट्री आहे.

अर्थात काही तोटे पण आहेत. मुख्य म्हणजे सेफ्टी. परमुलुखात कुटुंबाला घेऊन एकटं फिरायचं म्हणजे टेन्शन. बरं ट्रीप ठरवणारा, म्हणजे आमच्यातला मी, बिझी असतो हो. taxi आली की नाही, जेवायला हॉटेल कुठलं, कुठल्या कार्यक्रमाचं तिकीट काढायचं हे सगळं ठरवावं लागतं. परत तो गुणाकार. गुणिले १८ ते ९० मध्ये माणूस पार अर्धा होऊन जातो. परत इतकं करून पोरं आणि बायको खुश असायला पाहिजे हो. पण ज्याला आवडतं हे काम तो एन्जॉय करतो.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे बजेट क्रॉस झालं आहे. पण मी आयडिया करून मी सांगितलं की बजेटच्या आत जमलं म्हणून. खरं सांगितलं असतं तर वैभवी म्हणेल, की आता परत टूर कंपनीबरोबर जायचं तर मी माझ्या आवडत्या अनुभवाला मुकेल.


टूर टूर 

Sunday 15 November 2015

Religion

Organised religion is excellent stuff for keeping common people quiet. It is what keeps the poor from murdering the rich."

-Napoleon Bonaparte

मधे मेलवर हे वाक्य आलं. नेपोलियन म्हणाला असं लिहीलं आहे. Authenticity माहित नाही. पण शांतपणे वाचलं तर जाणवतं की मोठा गहन अर्थ आहे, नाही?

म्हणजे विचार करा की जगात धर्मच नाही आहे तर मग गरीब आणि श्रीमंत देशात मारामार्या झाल्या असत्या. अमेरिका आणि व्हिएतनाम किंवा मग रशिया विरूद्ध अफगाणिस्तान वैगेरे. पण धर्म आला आणि मग गरीब लोकं श्रीमंतांना मारायच्या ऐवजी एका धर्माचे लोक दुसर्या धर्माच्या लोकांना मारू लागले. मग ११ सप्टेंबर झालं, २६/११ झालं आणि परवा पॅरीस ही घडलं. कम्युनिझम चा जगातल्या बर्याच देशाने त्याग केला आणि गरीब-श्रीमंत असा संघर्ष संपुष्टात आला. धर्मवादी राजकारण जगात चालू झालं आणि मग मध्यमवर्गीय आपल्याच बांधवांना मारू लागले.

नेपोलियन च्या काळात हे वाक्य संयुक्तिक असेलही पण आज मात्र हे बदललं आहे. त्यामुळे धर्मामुळे कॉमन माणसं शांत झालेत हे इतिहासजमा होईल आणि ते अशांत झालेत हे खरं होईल.

भारताचं संविधान म्हणतं की आपण निधर्मी राष्ट्र आहोत. कुठलाही धर्म नं मानणारं राष्ट्र. वैयक्तिक लेवलवर माना तुम्ही धर्म पण राष्ट्र म्हणून निधर्मी.  सर्वधर्मसमभाव हा निधर्मीचा विरूद्धार्थी शब्द. पण कॉंग्रसेने हे समानार्थी शब्द म्हणून भारतीय समाजकारणात रूजवले. आणि गडबड झाली. मग तुम्ही महाआरती करा म्हणून लाऊडस्पीकर वरून त्यांनी बांग द्यावी. हे महापुरूष मग आमचेही महापुरूष. यांच्या मिरवणुका मग त्यांच्याही मिरवणुका. यांच्यासाठी रस्ते बंद मग त्यांच्यासाठी रस्ते बंद. एकंदरीत धर्म नावाचं सोंग आपल्या मानगुटीवर बसवलं.

बाकी सत्ताधार्यांबद्दल बोलायलाच नको. त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी तर जाहीररित्याच सांगितलं आहे की हे हिंदूराष्ट्र आहे म्हणून. प्रश्नच मिटला मग.

पण आपल्याला धर्मावरून भडकवणारे श्रीमंत लोकं स्वत: त्यापासून चार हात लांब आहेत. श्रीमंत राजकारणी आणि नेते यांचं वैयक्तिक चालचलन पाहिलं तर हे लक्षात येईल.

त्यामुळे सध्यातरी

Organized religion is an excellent stuff to create unrest among common people. It is what instigating poor people of one religion to kill poor people of other religion.

असं झालं आहे

Saturday 7 November 2015

टाटा

साधारण ९९-२००० ची गोष्ट असावी. आम्ही ट्रक च्या इंजिनला लागणारं सील बनवलं होतं आणि ते आम्हाला टेल्को मध्ये ट्रायल साठी द्यायचं होतं. प्रकरण मोठं होतं. त्याचं डिसिजन कॉर्पोरेट मधून होणार होतं. त्या बद्दलची माहिती देण्यासाठी आमची मिटिंग ठरली टेल्को च्या कॉर्पोरेट मध्ये अर्थात बॉम्बे हाउस मुंबई ला.

मी, माझा बॉस बोनी, आमच्या दोघांचा बॉस संजीव आणि एक अमेरिकन डग ग्रेग अशी वरात बॉम्बे हाउस ला पोहोचली. सकाळी दहाची मिटिंग.  आजकाल बऱ्याच कॉर्पोरेट ऑफिस मध्ये श्रीमंतीचा भपका दिसतो. पण बॉम्बे हाउस मध्ये अजिबात दर्प जाणवत नाही. सादगी भी कयामत की अदा होती है या ओळीप्रमाणे आपल्यावर त्या इमारतीच्या वयाचं, तिथल्या साधेपणाचच दडपण येतं. परीटघडीचे कपडे घातलेले अधिकारी निमुटपणे सिक्युरिटी कडून चेकिंग करून घेत होते.

आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो. आमची ज्यांच्याशी मिटिंग होती त्यांचं आडनाव ही टाटा च होतं, आम्ही मिटिंग रूम मध्ये बसलो. बऱ्यापैकी मोठी रूम होती. चहा वैगेरे सोपस्कार चालू झाले. एकमेकांची ओळख करून घेताना माझा मराठवाडी स्वभाव चाळवला आणि विचार आला की हे टाटा म्हणजे रतन टाटा यांचे कोण? माझ्या मनातलं संजीव बोलून गेला "I think everyone must have asked you this question. Any relation with.........." तर ते टाटा वदले "just coincidence. nothing else" आतापर्यंत जोरात धडधडणार माझं हृदय जरा सावकाश चालायला लागलं.

बोनी ने laptop बाहेर काढला अन प्रेझेन्टेशन चालू करणार तितक्यात एक पारशी बाई घाई गडबडीत आमच्या रूम मध्ये आली आणि म्हणाली "Sorry gentleman, but Mr Ratan Tata would like to hold other important meeting in this room. You will have to shift other room." आम्ही पटापटा सगळ्या गोष्टी उचलल्या. आणि बाजूच्याच रूम मध्ये शिफ्ट झालो.

आमची तासाभराची मीटिंग झाली. आणि परत निघालो. ऑफिस मधल्या एका लेन मधून चालत असतानाच समोरून ते भारदस्त व्यक्तिमत्व आलं. Doyen ऑफ Indian Industry. रतन टाटा. असं कुणी व्यक्ती अचानक समोर आली की मी थिजतो, दातखीळ बसते. आमचा एमडी संजीव मात्र एकदम झकास गडी. त्याने झटकन हात पुढे केला आणि म्हणाला "Good morning Mr Tata" ते पण थांबले. आणि आम्हा सगळ्यांवर नजर फिरवत म्हणाले "Good morning Gentlemen". साधेपणा तरीही टाटा ग्रुपच्या या रुबाबदार सर्वेसर्वा समोर मी अक्षरश: नतमस्तक झालो. Capitalist by brain, socialist at heart ही उक्ती या भारतीय इंडस्ट्री च्या अर्ध्वयू ला तंतोतंत लागू होते.

त्यानंतर २००३-०४ साली मला बॉम्बे हाउस ला ४-५ वेळा जावं लागलं. दरवेळेला मी त्या मंदिरात जाऊन आलो भारावलेल्या अवस्थेत असायचो. कदाचित जेआरडी, दरबारी सेठ, रूसी मोदी, सुमंत मुळगावकर, अजित केरकर, शापूरजी पालनजी, रतन टाटा  अशा व्हिजनरीज च्या वास्तव्याने पावन झालेल्या या वास्तूत पुढील कित्येक वर्षं पुरेल अशी ऊर्जा ठासून भरलेली असावी.

पुण्यात टेल्को चं पीई डिविजन आहे. तिथले ढाळे साहेब माझ्या मित्र यादीत आहेत. आता सोडली आहे त्यांनी टाटा मोटर्स. त्यांनी मला कधी कामासाठी बोलवलं आणि मी गेलो नाही असं फार कमी वेळा झालं. त्यांनी खूप बिझिनेस दिला असंही नाही पण मी नेहमीच गेलो. तर ढाळे साहेब, आज कबुली देतो की मी टाटा मोटर्स ला यायचं कारण हा बिझिनेस नसून टाटा मध्ये आपल्याला जायला मिळावं हे सुप्त आकर्षण होय.

असो. पुढचा जन्म जर मानव योनीत झाला, अन त्याहून ही परत Mechanical Engineer झालो तर टाटा ग्रुप मधल्या कुठल्यातरी कंपनीत काम करायला मिळावं हीच इच्छा.

माझं एक खूप आवडतं वाक्य आहे "भारतीय रस्त्याची नाळ जर कुणी ओळखली असेल अशा दोन कंपनी आहेत, एक बाटा आणि दुसरी टाटा"

टाटायन पुस्तकाचं परीक्षण आलं आहे आज. पुस्तक ऑर्डर करावंच लागणार.

टाटाचं नाव असलेल्या स्फुटात दिवाळीच्या शुभेच्छा देता याव्यात हा एक सुखद योगायोग.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 

Thursday 5 November 2015

पारिजातक

लहान गावातून मी नुकताच या मोठया गावात आलो होतो. घर तसं शहराच्या बाहेरच होतं. चार दिवस आवराआवरी केल्यावर मी माझा सकाळचा मॉर्निंग वॉक चालू केला. माझ्या घरापासून तीनशे मीटर चालल्यावर मला पारिजातकाचा मंद सुवास आला. आणि थरथरत्या पण स्पष्ट आवाजात स्तोत्राचा स्त्रीचा आवाज ऐकू आला. सकाळच्या वेळेला पारिजातकाचा दरवळ आणि पार्श्वभूमीवर स्तोत्र.  अहाहा. मनाला प्रसन्न वाटलं. आवाजाच्या दिशेने लक्ष गेल्यावर एक साधारण पंचाहत्तरीच्या बाई दिसल्या. पाठमोऱ्या होत्या. पाठीमागे त्याचं टुमदार घर दिसलं. तीन एक खोल्यांचं. छोटं आंगण. अंगणात गवत अन छोटीसी बाग. बागेच्या एका कोपऱ्यात पारिजातकाच झाड. मी पुढे चालत गेलो.

दुसर्या दिवशी चालताना परत तो पारिजातक दरवळला. आज मला त्या बाई दिसल्या. निमगोर्या, कपाळावर कुंकू, गळ्यात मण्याच मंगळसूत्र, टापटिपीत नेसलेली साडी, चेहऱ्यावर प्रसन्न स्मित. हातात परडी. परडीत पारिजातकाची फुलं वेचून ठेवलेली. भिडस्त स्वभावाचा मी हसावं की नसावं अशा मनस्थितीत पुढे निघून गेलो.

दोन तीन दिवस हे असंच चालू राहिलं. स्मित हास्याची हलकी देवाणघेवाण व्हायची. चौथ्या दिवशी मात्र बाई च म्हणाल्या "काय म्हणतोस? कसा आहेस " त्यांनी हे म्हणे पर्यंत मी पुढे निघून गेलो. आणि त्यामुळे मी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं आणि चालत राहिलो. मनात आलं. "किती हलकट आहे मी. ऐकूनही मी दुर्लक्ष केलं" मनाला दिवसभर रुखरुख लागली. ती थांबली, दुसऱ्या दिवशी. सकाळीच गेलो. सुवासिक पारिजातक आणि बाईंचं स्मित. त्या परत म्हणाल्या "काय म्हणतोस, कसा आहेस?" प्रश्नाची वाटच पाहत होतो. लागलीच मी म्हणालो "मजेत. तुम्ही कशा आहात?". त्याही म्हणाल्या "मस्त" आणि हे म्हणताना त्या अजून हसल्या. थोडा सुरकुतलेला त्यांचा चेहरा अजूनच छान दिसला. जाताना त्यांनी माझ्या हातावर त्यांनी अर्धी ओंजळ पारिजातकाची फुले दिली.

मग हा सिलसिलाच चालू झाला. मी जाणार, बाई कधी नमस्कार तर कधी सुप्रभात म्हणणार. मीही हसून प्रतिसाद देणार. त्या अर्धी ओंजळ पारिजातक देणार. मी शीळ वाजवत पुढे चालायला जाणार. परवा कंपनीत मला प्रमोशन मिळालं. काल मी हसऱ्या चेहऱ्याने गेलो. पाया पडलो. म्हणालो "नमस्कार करतो आई." त्यांनी सुद्धा हातातली परडी बाजूला ठेवली. तोंडभरून आशीर्वाद दिले. खरखरता हात माझ्या गालावरून फिरवला आणि म्हणाल्या "सुखी रहा". आणि ओंजळभर पारिजातक हातावर ठेवले.

आज सकाळी मी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक ला निघालो. आज बघतो तर पारिजातकाचा सडा जमिनीवरच सांडलेला होता. फुलं होती, पण तो नेहमीचा सुवास दरवळत नव्हता. घराच्या फाटकापाशी मला Ambulance उभी दिसली. दोघं-तिघं लगबग करत होते. मी विचारलं, काय झालं म्हणून. पण कोणी उत्तर दिलं नाही. तेवढयात एक वृद्ध गृहस्थ आले. माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले "काल रात्री शकुंतला उठली पाणी पिण्यासाठी. पाणी पिलं आणि परत झोपली ते न उठण्यासाठीच." मी हतबुद्ध झालो. थोडा तोल गेला म्हणून बाजूच्या दरवाजाचा सहारा घेतला. त्या वृद्ध गृहस्थाने माझ्या पाठीवर हलकेच थोपटून माझंच मूक सांत्वन केलं.

स्ट्रेचर आलं. बाई शांतपणे पहुडल्या होत्या. चेहऱ्यावरचं स्मितहास्य तसंच होतं. त्यांच्या शेजारी पारिजातकाची फुलं ठेवली होती. तिथे मात्र तोच परिचित सुवास दरवळला. त्या वासागणिक माझ्या तोंडून शब्द पडले "सुप्रभात. कशा आहात?" पण आज बाईनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. स्ट्रेचर Ambulance मध्ये गेलं. झटकन दरवाजा बंद झाला आणि मला काही कळायच्या आत ती शववाहिका गेली सुद्धा.

मी भेलकांडत निघालो. थोडयावेळाने घरी पोहोचलो. गालावर सुकलेले अश्रू चेहऱ्यावर पाणी उडवून धुऊन टाकले.

मला तशी बागकामाची फारशी आवड नाही. पण समोरच्या अंगणात जरा पारिजातकाचं झाड लावावं म्हणतोय. कुणास ठाव, एक दिवस हा पारिजातकही बहरेल. आणि माझी मॉर्निंग वॉक ची दिशा विरुद्ध झाली तरी पारिजातकाच्या दरवळातून  शकुंतला बाईंचा "सुखी रहा" हा आशीर्वाद माझ्यावर सतत वर्षावत राहील.

मूळ इंग्रजी लेख: शिल्पा केळकर. (हा मूळ लेखाचा अनुवाद नव्हे तर रुपांतर आहे)

Sunday 1 November 2015

कन्फेशन

कामाच्या निमित्ताने माझ्या काही परदेशवार्या झाल्या. अर्थात त्याचं काही कौतुक नाही म्हणा. काम आहे, जावं लागतं, इतकंच. ल्योचा पुढं आहे. परदेशात जाऊन आलो की नातेवाईक (त्यातल्या त्यात आई) विचारतात "काय आणलं तिकडून" आता मी जातो, काम करतो अन परत येतो. संध्याकाळी हॉटेलला आलो की लागलीच होस्टने जेवण ठेवलं असतं. बरं आपला पडला भिडस्त स्वभाव. त्यांच्या गावीही नसतं की याला काही खरेदी करायची असेल, मग मीही काही बोलत नाही. 

काही लोकांना कसली हौस असते. माझा एक मित्र आहे. तो फॉरेनला जाऊन आला की बँग भरून सामान आणतो. चॉकलेटस, कपडे, सोवेनियर्स, खेळणी अन काय काय. एकदा मी इटलीला निघालो. तर मला येऊन म्हणाला फेरारीच्या शोरूम मधून एखादं छानसं कारचं मॉडेल आण की. ते मॉडेल अगदी हुबेहूब असतं. दरवाजे उघडतात, स्टियरिंग वळतं. मी गेलो, मिलानमधे दुकान शोधत. साधे वरण आणि भातावर पोसलेल्या या मनाला वाटलं की असेल २००० रू पर्यंत किंमत. तर ती कार तब्बल ९००० रू ला. नशीब, पैसे होते तितके. त्याच्या हॉलमधे विराजमान आहे कार. 

त्याच ट्रीपमधे आमचे बंधुराज म्हणाले "आठवण म्हणून पिसाच्या लिनिंग टॉवरची प्रतिकृति माझ्यासाठी घेऊन ये." मी आणली. आई म्हणाली "अरे, एकाच्या ऐवजी दोन आणल्या असत्या तर तुझ्या घरात फार अडचण नसती झाली" आता मला नाही आवडत ते सोवेनियर्स गोळा करायला. काय करणार मग.  

सुरूवातीला कौतुकाने आणायचो मी काही कपडे पोरांसाठी. पण गणित पक्कं असल्यामुळे गुणीले ६०/७०/९० पटकन व्हायचं. आणि मग तो वर उल्लेख केलेला वरण भात सळसळायचा. गुणाकार झाल्यावर मेंदूला किमतीची एक हलकीशी किक बसायची. मग दर ट्रीपगणिक हे माझं काहीतरी आणणं कमी होत गेलं. आजकाल तर मी चॉकलेट वैगेरे पण नाही आणत. सुरूवातीला मित्रांसाठी दारूच्या बाटल्या आणायचो. आता त्याचा ही कंटाळा येतो. कुणी अगदी आठवणीने सांगितलं तर आणतो, नाहीतर रिकाम्या हाताने येतो. आणि तसंही 12 years old Glenfidich किंवा Chivas Regal आणि आपल्या दुकानात मिळणारी सिग्नेचर किंवा Antiquity यातल्या चवीतला फरक काही मला कळत नाही. 

सुदैवाने वैभवीलाही फार काही आवड नाही या खरेदी प्रकरणाची.  बोंबलायला परदेशात मी जातो तेव्हा मंडईत जाताना जसा नवर्याला निरोप देतात तसं ती बाय करते. खरेदी बिरेदी फार लांबची गोष्ट. थोडा फार आमचा बारक्या नाराज होतो, पण अर्धाच दिवस. बाप आल्याच्या आनंदात तो ते दु:ख पटकन विसरून जातो. 

आणि दुसरी गोष्ट साईट सिइंग. एखाद्या डेलिगेशन बरोबर गेलो अन त्यांनी काही प्लान केलं असेलच तर. पण मी एकटा असेल तर मात्र नाही जात कुठं. त्यामुळे अमेरिका, चायना, तैवान, स्वित्झरलॅंड, इंग्लंड या देशात फार काही मी बघितलं नाही आहे. जर्मनी आणि सिंगापूर थोडं बघितलं. जर्मनीत अमोल-प्रितीआणि प्रियांका-अनंत या जोड्यांनी फिरवलं तेच.
हे अमेरिकन्स किंवा तैवानीज पुण्याला येतात तेव्हा शब्दाने म्हणत नाही की अजिंठा वेरूळ बघू, किंवा ताजमहाल बघू, गोव्याला जाऊ. काहीच नाही. मग मलाही त्यांना म्हणावसं वाटत नाही, की जरा फिरून येऊ म्हणून. 

तसंही स्वित्झर्लंड मध्ये कुठे आल्प्स पर्वताची हिमशिखरे बघताना आवडती व्यक्ती शेजारी नसेल तर त्या उत्तुंगतेच काय कौतुक? अमेरिकेतली Grand Canyon तिथल्या स्काय Walk वरून किंवा नायगारा धबधबा बघताना बारक्याचे विस्फारलेले डोळे जर नसतील कुठली आली मजा? कदाचित नियतीच्या मनात हे ही असेल की हे सगळं फिरण्यासाठी कुटुंब बरोबर असावं. तेव्हा मात्र सॉलीड मजा येईल हे नक्की.

कन्फेशन 

Sunday 25 October 2015

Insatiable People

लोकांना खुश ठेवणं ही एक अवघड कला आहे. मागणं, मग ते जास्त किंवा कमी, हे प्रत्येकाच्या स्वभावात असतं. त्यातला त्यात काही मंडळी अशी असतात की त्यांना सतत आपल्याकडून काहीतरी हवे असते. ते कधीही खुश नसतात.

कोण आहेत अशी लोकं? तर ग्राहक, साहेब किंवा मालक, पालक म्हणजे आई वडील, शिक्षक आणि शेवटचं, हे म्हणजे जरा controversial आहे, आणि ते म्हणजे पत्नी. 

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, ही  मंडळी तुमच्या कडून सातत्याने अजून चांगलं करण्याची अपेक्षा बाळगून असतात. आणि अपेक्षाच का, तर ते तुम्हाला सतत excellence achieve करण्यासाठी तुमच्या पाठी असतात. स्वत:चा विकास वा,  excellence हे काय साध्य नव्हे तर ते तात्विक आहे. जीवनप्रणाली आहे. कुणीही १००% परफेक्ट असू नाही शकत. त्यामुळे ही मंडळी सतत तुम्हाला तुमच्यातल्या अवगुणांची आणि तुम्ही अजून कसं चांगलं करू शकता याची आठवण करून देत असतात. तुमची हयगय न करता. 

साधारणपणे हे असं घडतं. ही लोकं तुमच्या साठी एक साध्य, म्हणजे goal, ठरवतात. आणि मग ते साध्य गाठण्याची विनंतीवजा आज्ञा देतात. (हे जसेच्या तसे घ्यावे, विनंती वजा आज्ञा. विनंती त्यात नसतेच). तुम्ही पेटून कामाला लागता, आणि आश्चर्यकारक रित्या ते साध्य गाठता. तुम्ही चार बोटं हवेत चालता. आणि त्याचवेळेस हे असमाधानी लोक, तुम्हाला सांगतात "ठीक आहे, हे तुला जमलं, पण हेच काम तू चांगल्या पद्धतीने करू शकत होतास." 

पाठीवर शाबासकी ची थाप पडावी म्हणून मी सारं आयुष्य वाट बघितली. आज माझं वय ५८ आहे, पण अजून वाट बघतोच आहे. These are the people who kept moving the goal posts, further away from me, whenever I reach them.

ग्राहक, हा जो तुम्हाला कामाचा मोबदला देतो तेव्हा तो किंमत मात्र जास्त वसूल करतो. यालाच म्यानेजमेंट च्या भाषेत value for money संबोधित असावेत. त्या value ला काही वरची पातळी असते का? तर नाही. भक्कम, टिकाऊ, जास्त, जोमदार हे सगळं कस्टमर ला हवं असतं, पण ते ही अत्यंत किमती दरात. परत हे सगळं लवकर आणि हा व्यवहार होताना तुम्ही मात्र त्याच्याशी शांत पणे बोलायचं, चिडायचं नाही. गमतीची गोष्ट ही कि कस्टमर ला हा त्याचा हक्क वाटतो.

मालक किंवा साहेब. हे तज्ञ, विद्वान. या मंडळीना पृथ्वीवरच सगळं माहिती असतं. ते पगार देतात तेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्या हाताखालचे काम करणारे हे त्यांनी जणू विकत घेतले आहेत. कंपनीतल्या लोकांसमोर नवनवीन आव्हानं ते टाकत असतात त्यामागचं खरं कारण हे असावं की त्यांनाच माहित नसतं, त्यांना काय हवं असतं. यातल्या काही जणांना जन्मत: च लोकांवर हुकुम गाजवणे येत असावे, काही जण हा अवगुण आत्मसात करतात. बरेच मालक लोकं हे खरं तर बावळट असतात पण त्यांच्या हातात सत्ता असते आणि त्यापुढे त्यांचा मूर्खपणा झाकोळला जातो. बऱ्याच ज्युनियर लोकांना त्यांच्या साहेबाबद्दल वाटत असतं "आयला हे बेणं इतकं येडपट आहे तरीही देव याच्यावर इतका मेहेरबान का आहे."

ह्या साहेब मंडळीना रिझल्ट तर दाखवायचा असतो. त्यांच्या पेक्षा हुशार सब ओर्डीनेट मिळाले की यांच्या झोपा उडतात, 'अरे तो आपल्यापेक्षा पुढे जाईल की काय" या विचाराने. नाहीतर मग या मालक मंडळींच्या आजूबाजूला "होयबा" ग्यांग असते. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, हे मालक किंवा साहेब नावाची जमात नेहमी कावलेली असते.

(७२% लोकं, साहेब चांगला नसल्यामुळे जॉब बदलतात)

पालक आपली अधुरी स्वप्ने मुलांनी पूर्ण करावीत ही अपेक्षा ठेवून असतात. मुलांवर काही पालक इन्वेस्टमेंट म्हणून खर्च करतात. आणि मग त्यांच्याकडून रिटर्न्सची, मग ते सोशल behavior असो की खरेखुरे आर्थिक रिटर्न्स असो, अपेक्षा ठेवतात.

आई वडील आपल्या मुलांवर इतकं  प्रेम करतात की ते मुलांसाठी काहीही करू शकतात, पण भावना हीच की मुलांनी आपण सांगितलं तसं राहिलं पाहिजे. खलिल जिब्रान चं एक मस्त वाक्य आहे "मुलं भले तुमच्या मुळे जन्माला येत असतील, म्हणून तुमचा त्यांच्यावर हक्क आहे असं समजू नका."

चांगले आणि खराब असे दोन्ही प्रकारचे  शिक्षक असतात. चांगला शिक्षक हा नेहमी असमाधानी असतो. त्यांच्या विद्यार्थाने अजून चांगलं परफॉर्म केलं पाहिजे असं शिक्षकाला सतत वाटत राहतं. मग ते परीक्षेत असो वा  जीवनात. शिक्षकाचे असमाधान मात्र हे पवित्र आणि शुद्ध असते. त्यांचे असमाधानी असणे हे आपल्याला हवेहवेसे वाटते.

शेवटची क्याटेगरी म्हणजे पत्नी. अत्यंत हुशार आणि ग्रेट माणसांना बायकोच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकात दम येतो. बऱ्याचदा बायकोला काय हवं आहे हेच माणसाला कळत नसतं. बऱ्याच वेळा पत्नीला असं वाटत राहतं की आपल्या माणसाने यशस्वी व्हावं. पण त्यासाठी काय पापड बेलावे लागतात हे त्यांना कळत नाही. आणि मग ती सारखं त्याच्या मागे लकडा लावते "हे करा, ते करा. तिचा नवरा असं काम करतो. तुम्हाला काही करायलाच नको. हात पाय हलवायला नको ब्लाह  ब्ला" बऱ्याचदा यातून काही घडत नाही.

मी तर म्हणतो समाजात स्त्रियांपेक्षा जास्त यशस्वी पुरुष दिसतात याचं महत्वाचं एक कारण हे ही असावं की बायकांना पत्नी नसते.

ही  असमाधानी मंडळी आपल्या कडून काम करून घेतात  कधी सकारात्मक तर कधी हात पिरगळून. यांची चूक ही  असते की आपल्यावर हे मालकी हक्क गाजवतात. तुमची एखादया वस्तूवर मालकी असते पण व्यक्तीवर नाही. अगदी गुलामाचं उदाहरण घेतलं तर तुमचे हुकुम त्याचं शरीर पाळत पण त्याच्या मनावर तुम्ही कधीच अधिराज्य गाजवू शकत नाही.

हा असा मालकी हक्क गाजवणं हे समोरच्या माणसाच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखं आहे. काळाच्या कसोटीवर अशा माणसांच्या आयुष्यात अपयश दिसते.

याउपर जी लोकं आजूबाजूच्या लोकांमध्ये विश्वास तयार करतात, त्यांच्यातल्या स्व ला ललकारतात त्यांच्याकडून दूरगामी परिणामकारक कार्य होते. Self motivated, proactive आणि contented लोकं ही यशस्वी असतात.

मी बऱ्याचदा या असमाधानी, सदैव मला टोकणार्या लोकांवर वैतागतो. पण खरं सांगू, ह्या लोकांना माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. मी आज जो आहे त्यामध्ये ह्या सगळ्या मंडळीचा हातभार नक्कीच आहे.

- Gurvinder Singh 



Friday 23 October 2015

Some interesting stuff

आमच्या सेटको कंपनीची parent कंपनी आहे होल्डन. तिथे एक रॉजर मरे नावाचा  माणूस आहे. स्वत: खूप काम करून आता तो व्हाईस प्रेसिडेंट आहे. परवा आला होता कंपनीत. manager लोकांचं ट्रेनिंग घ्यायला. हो उदया तेच सांभाळणार नाही का कंपनी. रॉजर मरे, आम्ही त्याला गमतीत राम्याच म्हणतो. बोलला तो काल दसऱ्याच्या मुहूर्तावर. मलाही म्हणाला "तुला जमत असेल तर ये" मी ही  गेलो. जे बरे वाटले असे काही points लिहून काढले. म्हंटल तुमच्याशी शेयर करावेत.

Why this talk?:

You all three are Managers of the company. As company grows, you will have to shoulder more responsibility. While doing this, you have to acquire different qualities. I am citing my own example as I started my journey same like you and reached to this position. Rajesh could have hired consultant to tell you all these things. But it would have been more expensive. Why to spend when same thing is available for free.? So all the points which, I will be telling you are the principles which I followed. If you like it, try to acquire. If you do not like it, God has given you two ears. Let it enter from one and go out from other. No worries. But one thing I can assure you that you will be benefitted out of this, irrespective of fact if you are in Setco or in some other company.

1. Doers Vs Managers: So far you have proven that you are doer. You can work to the satisfaction of company. But you have followed orders so far. You have done something at the order or request of someone else. Now you have to manage the things. You have to get the things from some one else. You have to take decisions.

2. Owning the responsibility: Now physically you will not be performing or physically carrying out some activity. Some one else will physically act on your behalf, on your order, on your request. But still responsibility of his action lies with you. Responsible for some one else's action is more difficult than actually working with your own hands,

3. Trust the people to the extent that he should think twice before cheating you and if he does, he should carry that guilt for lifetime. Cheating is not always in relation with money. It can be something related to not keeping promise. People will fool you time and again. But still trust the people.

4. Walk the talk: When you say yes, just do it. Do not say yes, when you want to say no.

5. Be open to change. Do not resist change. Change is always for good. Change is short term. Transformation is long term. Change is starting point of transformation.

6. Cash flow is reality. Profits are notional.

7. Act. Action is more important, even if it proves wrong, than not acting at all. The consequences of mistakes out of action is normally of lesser magnitude than not acting. You have to break an egg if you want to eat an omelet.

8. Be proactive and not reactive: Ask question to the situation before it creates questions for you. Do not react if situation creates heap of problem. You landed up to situation because you were not proactive earlier. Do not run away from problems. When you run away from problem you are actually running away from solution.

9. Speak out then and their itself. Do not let things accumulate in your heart. Otherwise it acts as lava. It erupts. It damages front person but it equally damages you.

10. Think on broader scale. Do not let your thought process hover around you and your family. Think beyond that. Think for your colleagues, society and nation.

11. Be open to other's ideas. Do not block your mind that you are only right person in this world. There are many situations where your perception towards it are far away from reality. Or there could be situation where you are also right and other person too. Accept it.

12. Be customer centric to the best possible extent. But do not let it  challenge your own being which is honest, integral to the work. Customer is the king but you are not queen.

13. Aim to goal. Simply dribbling a ball will not allow you to lift a trophy. Pushing a ball in to net will.

14. An employee who works as if he is an employer of company normally reaches in top bracket of the company or starts his own business. An employer who works as an employee normally takes company to new heights. Be an employee, be an employer.



Monday 19 October 2015

ऑक्टोबरफेस्ट

ऑक्टोबरफेस्ट. 

फार ऐकलं होतं या ऑक्टोबरफेस्ट बद्दल. गँलन्स मधे वाहत जाणारी बियर, ती ज्याच्यात सर्व्ह केली जाते ते साधारण लिटरभरचे मग, बियर सर्व्ह करणार्या मादक ललना, त्यांचं ते एकावेळेस आठ आठ मग एका वेळेस सर्व्ह करण्याचं स्किल आणि काय काय. 

हा ऑक्टोबरफेस्ट म्युनिकला साजरा केला जातो. तिथला एक राजा होता म्हणे. त्याच्या वाढदिवसाला त्याने काही शे वर्षापूर्वी पार्टी दिली होती. १२ ऑक्टोबरला. सुरूवातीला एक दिवस चालणारं हे सेलिब्रेशन मग दोन दिवस, नंतर आठवडा आणि आता काहीतरी तीन एक आठवडे चालतं. म्युनिकमधे बियर खुप ब्र्यु होते. एक म्युनिकर वर्षाला सरासरी १०३ लिटर बियर ढोसतो. झेकनंतर ते जगात दुसर्या नंबरला आहेत असं म्हणतात. आता त्या राजाने जेवण वैगेरे पार्टीला दिलंच असेल. मग ते सोडून हा त्याचा वाढदिवस बियर महोत्सव मधे कसा परावर्तित झाला हे त्यांनाच माहित. म्युनिकमधे आजही मोठ्या ब्रेवरीज आहेत. 

२०११ मधे जर्मनीला गेलो होतो, तेव्हा या फेस्टला जाण्याचा योग आला. 

साधारण एखादा किमीचा रस्ता आहे. कमी जास्त असेल. त्याच्या दोन्ही बाजूला अगडबंब तंबू उभारले असतात. किती मोठे तर साधारण एका तंबूत पाच ते सहा हजार लोकं मावू शकतील असे. काही तंबूधिपती आत जायला तिकीट लावतात तर काही ठिकाणी फुकट एंट्री असते. अर्थातच जिथे तिकीट नसतं तिथे लांब रांगा असतात. रस्त्यावर मेरी गो राऊंड, जायंट व्हील अलियास आकाशपाळणा वैगेरे जत्रेतली खेळणी असतात. बाकी मग आपल्या वडापाव, भेळ, पाणीपुरी सारखे तिथल्या लोकल फुडचे स्टॉल असतात. ते स्टॉल सजवण्यासाठी वेगवेगळ्या भूचर आणि जलचर प्राण्यांची आहुति पडली असते. तंबूमधे फारसं काही खायला मिळत नाही. एक तो गोल शेंगुळ्यासारखा चव नसणारा पदार्थ मिळतो. नाव विसरलो मी त्याचं. 

वेळ कमी असल्यामुळे आम्हाला रांगेत उभं राहणं परवडणारं नव्हतं म्हणून आणि अर्थात म्हणूनच आम्ही तिकीट काढून तंबूत शिरलो. आपल्या नागपूरच्या सावजी मधे जशी आडवी बाकडी टाकलेली असतात तशी असंख्य बाकडी टाकलेली असतात. जागा पटकवायची आणि मग त्या बावारियन ड्रेस घातलेल्या ललना येतात. सध्या मित्रयादीत माझे भाचा-भाची, पुतण्या पुतणी, काकामंडळींचा भरणा असल्यामुळे मी त्या ड्रेसचं आणि ललनांचं जास्त वर्णन नाही करू शकत. या वाक्यावरून काही तज्ञ मंडळींनी प्रतिभा फुलवल्या असतील तर थांबा. तुम्ही जितका विचार करता तितका पण भारी ड्रेस नसतो. फार उत्कंठा ताणली असेल तर गुगल करा. 

आजूबाजूला कलकलाट चालू असतो. त्या गोंगाटात ती बियर मागवायची. बाहेर साधारण ५-६ युरोला मिळणारा टंपास या महोत्सवात ९-१० युरोला मिळतो. जितकं बोलता येतं तितकं बोलायचं. बियर प्यायची. तंबूच्या मध्यभागी एक चौकोनी आखाडाअसतो. जर्मन संगीतावर काही जोडपी तिथे नाचत असतात. त्या गोंगाटाने डोकं दुखायला लागलं आणि बियरचा शेवटचा थेंब घशाखाली उतरला की तंबू सोडायचा. 

बाहेर मग सगळे झिंगलेले तरूण तरूणी दिसतात. त्यांचा आरडाओरडा, विचित्र अंगविक्षेप करत एकमेकांच्या अंगावर झुलणं हे पाहत चालायचं. काही लोकं बियरच्या बाटल्या रस्त्यावरच फोडतात. त्या काचांपासून बचाव करण्यासाठी शूज चांगले हवेत.  

कडेला स्लोपवर हिरवळ लावली आहे. त्यावर टल्लीन लोकं आडवे पडलेले असतात. ज्यांना झेपलेली नसते ते बियर बाहेर काढत बसतात. 

एकंदरीत लाखभर मंडळी दिवसाला बियरप्राशन करतात. फ़ेस्टिवल च्या शेवटी की सुरूवातीला मिरवणूक निघते म्हणे. मी त्याची तयारी बघितली, पण मिरवणूक नाही बघितली. तसंही आपल्यासमोर कुठलीही मिरवणूक फिक्कीच. 

असो. मला काही हा ऑक्टोबर फेस्ट काही झेपला नाही. कारण मदिरा, मग ती ४% वाली असो, ८% किंवा मग ४२% वाली असो, ती घेताना जवळचे मित्र असावेत, गप्पा रंगाव्यात, झालंच तर जुन्या हिंदी गाण्यांची सीडी चालू असावी, मधेच कुणीतरी ती बंद करून स्वत: सूर छेडावेत आणि निरोप घेताना त्या मद्यापेक्षा दोस्तीची नशा मस्तकात भिनलेली असावी. साधारण मी अशा प्रकृतीचा माणूस. मैफल जमावी ती भेटण्यासाठी आणि मग आग्रह नाही, पण साथीला मद्य असेल तर त्याच्या साथीने मैफल सजली तर हरकत नाही अशी आपली मिजास. त्यामुळे परंपरेने साजरा होणारा तो ऑक्टोबरफेस्ट नामक बियर महोत्सव माझ्या लेखी भ्रमनिरस करणारा होता. 

अर्थात परंपरा म्हणून साजर्या होणार्या उत्सवाचं रूप हे ओंगळवाणं झालंय हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. 

Sunday 18 October 2015

बदल

बदल हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. ऑनलाइन खरेदी विक्री हा या बदलाचाच परिपाक आहे. 

एकदा देशाने ठरवलं की आपण जागतिकीकरणाचा भाग आहोत, हे झाल्यावर हे अपरिहार्य होतं. त्यात सद्य सरकारवर आगपाखड करून काही फायदा नाही. कॉंग्रेसचं सरकार असलं असतं तरी हे घडलंच असतं. बरं त्यात आपण चीनसारखे साम्यवादी नाही. त्यामुळे बाहेरच्या देशातील तंत्रज्ञान आणि पद्धती याला आपणच पायघड्या घातल्या आहेत. 

आता याला तोंड द्यायचं कसं? तर याला एकच उपाय आणि तो म्हणजे या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या व्यवसायात बदल करणे. यासाठी भविष्यावर नजर ठेवणं गरजेचं आहे. आणि ही नजर ३० वर्षापुढची नसली तरी चालेल. पण ५ ते १० वर्षाच्या कालखंडात आपल्या व्यवसायावर परिणाम करणारं काय घडू शकेल याचा ठोकताळा मांडणं गरजेचं आहे. SWOT Analysis बद्दल तुम्ही ऐकून असालच. Strength, opportunities, weakness, threats या मांडल्या की हे जमतं. अवघड नाही फार. 

रिटेल क्षेत्रातील उदाहरण द्यायचं झालं तर कोपर्यावरचं लक्ष्मी सुपर मार्केट. बदलत्या परिस्थितीनुसार तो मारवाड़ी माणूस अंडी विकतो की नाही? आता तो भाज्या ठेवू लागला, फळं ठेवू लागला. उद्या तो फ्रोझन चिकन ठेवू लागला तर आश्चर्य वाटायला नको. 

तुम्हाला एक कार्पोरेट उदाहरण देतो. रिस्ट वॉच, मला असं वाटतं की हे भविष्यात लुप्त होईल. अशी शंका मी एका कॉन्फरंसमधे टायटनचे एमडी श्री भास्कर भट यांना बोलून दाखवली. त्यांनी ती खोडून काढली. पण १२५ कोटी लोकसंख्येंच्या देशात मोनोपोली असलेली कंपनी ज्वेलरी, आय वेअर, परफ़्यूम अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उड्या मारत आहे, त्याचं कारण काय असावं मग? 

अजून एक उदाहरण देतो. एयर डेक्कनचं. कँप्टन गोपीनाथ नावाच्या तुमच्या आमच्या सारख्याच दिसणार्या अन वागणार्या माणसाने एयर डेक्कन ही नो फ्रील विमानसेवा चालू केली. बरं नुसतीच चालू केली नाही तर, फुलवली. त्यांच्या कृपेने आज माझ्यासारखा लहान उद्योजकही बाहेर गावाचा प्रवास विमानाने करतो. अत्यंत नेटक्या पद्धतीने चालवणार्या गोपीनाथांनाही विजय मल्ल्या नावाचं वादळ ओळखता नाही आलं. आणि भारतीय विमानसेवेत फ़ादर ऑफ़ लो कॉस्ट एयरलाईन म्हणून गौरवल्या गेलेल्या गोपीनाथ साहेबांचं नाव एयर डेक्कन नावासहित दशकभरात आकाशात नाहीसं झालं. 

आता तुमच्या उद्योगाबद्दल मला जास्त कळत नाही, म्हणून त्याबद्दल जास्त तारे तोडत नाही. पण हे बदल ओळखल्याशिवाय आणि त्यानुसार अंमलबजावणी केल्या शिवाय लॉंगटर्म बिझीनेसमधे टिकणं अवघड आहे. 

डान्सबार

काही गोष्टी वेगळ्यावेगळ्या करायला काही हरकत नाही. तुम्ही सिगरेट पिऊ शकता. ट्रेन ने प्रवास करू शकता. पण ट्रेनमधे प्रवास करताना सिगरेट पिणे निषेधार्ह आहे. बंदी वैगेरे नंतर.

तसंच डान्सबार हे डान्स आणि बारचं लेथाल कॉम्बीनेशन आहे. म्हणजे तुम्ही डान्स बघू शकता. तुम्ही बारमधे ही जाऊ शकता. अगदी बेशक. पण बारमधे जाऊन डान्स बघणे निषेधार्ह. बंदी वैगेरे नंतर. 

डान्स आपण बघतोच की. सुरेखा पुणेकरांची लावणी बघतो, त्यांच्या दिलखेचक अदांवर शिट्ट्याही मारतो. कथ्थक की भरतनाट्यम मधे अरंगेत्रम असतं, ते ही बघतो. नृत्यांगनेनी गिरकी मारली की टाळ्याही वाजवतो. 

बाकी पैसे उडवायचे म्हंटलं तर गणपतीच्या मिरवणूकीत ताशा वाजवला म्हणून त्यावरून पैसे ओवाळतो. 

पण या किंवा अशा गोष्टी बारमधे करतो तेव्हा ते झेपत नाही. याचं कारण म्हणजे बारमधे डोक्यावर दारूचा अंमल असतो. बारबालेला इशारे करणारा, तिच्यावर पैसे उडवणारा माणूस हा तो स्वत: नसतो, तर त्याच्यातला "तो दुसरा" असतो. मेंदूवर नियंत्रण नसलेल्या गोष्टींचं समर्थन कसं करणार. मुळात हा प्रश्न बारबालांचा नसून तिथं शुद्ध हरपलेल्या बुभूक्षितांचा आहे. नितीमत्ता ही बारबालांना लागू होतच नाही. तिचा विचार करावा तिथे येणार्या माणसांनी. (आता इथे कुणी म्हणेल, की "तो दुसरा जो असतो तोच खरा. बाकी तर तुम्ही मुखवटा चढवला असता. हा न संपणारा युक्तिवाद आहे) 

दारू पिऊन मृत्युपत्रावर सही केली तर ग्राह्य असते का? नाही. तिथं शुद्धीवर नसता. ते कोर्टाला मान्य नाही. मग दारू पिऊन पैसे उडवणे हे कसं ग्राह्य बुवा? की फक्त तिथे सही करावी लागत नाही म्हणून ते ग्राह्य. 

ते लिहीलं आहे ना कवितेत "अखेर होता पहाट गेला, एक आमच्यामधला निघोनी. गेला कोण न कोण राहिला, हे मज आता जन्मभराचे कोड़े पडले" दारूच्या अंमलाखाली पैसे उडवणार्या माणसाला दुसर्या दिवशी जर रोज़ हे कोड़े पडत असेल तर मग त्याचं समर्थन कसं करणार.? 

बाकी बंदी वैगेरे हे शासन, न्यायालयाच्या गोष्टी. आपण मत व्यक्त करणारे, मतदार. 

डान्स चालेल, स्वत:ही खूप हात पाय हलवलेत. 

बारही चालेल. चालेल! पळेल. 

पण डान्सबार. ते नको बा! 

Thursday 15 October 2015

कन्फ़ेशन

कन्फ़ेशन

मी रोलॉन नावाच्या कंपनीत काम करत होतो. स्टार्ट अप व्हेंचरच्या पहिल्या काही एम्प्लॉयीजपैकी एक. तेव्हा गबरू तरूण होतो. सळसळतं रक्त. जवानीचा जोश होता. कडक डाफरायचो ऑफीसच्या लोकांवरती. याला झाप, त्याची धुलाई कर. काही लोकांच्या मनात माझ्याबद्दल कुतूहल युक्त भिती होती तर काही लोकं टरकून होते. मी पण कुणाची भीडमुर्वत न ठेवता "अरे, तुझं चुकलं. तुला अक्कल नाही." "त्या कस्टमरकडे गेला नाहीस. बुद्धी शेण खाते का तुझी" "कोटेशन असं का बनवलंस, ढगोळा आहेस का?" चुक झाली तर समोरच्याची हेटाई करायचो. माझ्या कामात चोख होतो त्यामुळे टॉप मँनेजमेंटची मर्ज़ी होती. माझ्याकडून चुका होत नव्हत्या असं नाही पण बॉस आणि एम डी मला असं नाही बोलायचे. 

एक प्रशांत नावाचा सिनीयर जॉईन झाला कंपनीत. बी टेक, आयआयएम. माझ्यापेक्षा १५ एक वर्षं सिनीयर. वयाने आणि पोझिशनने सिनीयर असला तरी मी कंपनीचा जुना माणूस असल्यामुळे मी फारच टेचात होतो. दिवस सरले, वर्षं गेली. माझा हेटाळणीयुक्त आवाज ऐकत प्रशांतने कंपनीत जम बसवला. त्यात तो मोजकंच बोलणारा. बरं ते ही मुद्देसूद. त्यात आक्रस्ताळेपणा नाही. आपण बरं, आपलं काम बरं. हळूहळू प्रशांत ऑफीसच्या कंपूत लोकप्रिय होऊ लागला. 

माझ्या नजरेत सालं त्या प्रशांतचा चांगूलपणा खुपू लागला. तसा तो माझ्याशी नीटच बोलायचा. मीच त्याच्याशी खुस्पट काढायचो. थोडं काही चुकलं की मी लागलीच म्हणायचो "अरे, तुझं हे चुकलं" स्पष्टपणे. पण माझा तोंडपट्टा तिथं थांबायचा नाही. लागलीच "तुझ्यासारख्या सिनीयर माणसाला कळायला पाहिजे" हे वरती. त्यातही बाकीच्या कलीग्जबरोबर असणारे त्याचे संबंध हेही माझ्या नाराजीचं कारण होतं. सेल्स मिटींगमधे बॉस प्रशांतच्या प्रेझेंटेशन ची खुप तारीफ़ करायचे. माझा जळफळाट व्हायचा. मी अजून चिडून पासिंग कॉमेंटस करायचो. 

मी मुक्ताफळे उधळत राहिलो, प्रशांत बिचारा झेलत राहिला. 

२००० साली प्रशांतने आमची कंपनी सोडली. त्याची फेअरवेल पार्टी होती. दोन पेग रिचवल्यावर प्रशांतने मला बाजूला घेतलं. म्हणाला "तुला इतके दिवस मी काही बोललो नाही. आज बोलतो. तु तरूण आहेस, मेहनती आहेस. अंगात काही करून दाखवण्याची जिगर आहे. तु बोलतोस तेव्हा मुद्देही स्पष्ट सांगतोस. पण ते सांगताना समोरच्याची अक्कल काढून जो धसमुसळेपणा करतोस ना तो बेकार आहे. तुझे शब्द जरी फटकळ असतील तरी विचार फारच फुटकळ आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुला स्पष्टवक्तेपणा आणि दुसर्याला अपमानित करून खाली दाखवणारा दीडशहाणपणा यातला फरक कळत नाही." 

त्याचा निरोप घेताना हलकेच हात दाबला. यावेळेस माझ्याकडून फक्त कृतज्ञता व्यक्त होत होती. आणि साश्रूनयन फक्त सॉरी म्हणत होते. 

मी तर तेव्हापासून दुसर्या वर विनाकारण भुंकणार्या मनावर लैच खतरनाक वॉचडॉग लावून ठेवला आहे. 

खरंय, स्पष्टवक्तेपणा आणि दुसर्याला अपमानित करून खाली दाखवणारा दीडशहाणपणा यातला फरक बर्याच जणांना कळत नाही.
.
.
.


तर मित्रा हे असं आहे. तु विद्वान, लॉजीकल विचारांचा बादशहा. इतके वर्षाच्या मैत्रीतल्या वादसंवादाची देवाणघेवाण आठव. आणि जर तुझी सदसदविवेक बुद्धी खांद्यावरच्या भागात शिल्लक असेल तर तुझ्याकडून साश्रू बिश्रू नयनाने नाही,  साधा निरोप तर दे. आता तुझं निर्ढावलेलं आणि सारखा अपमान करायला सोकावलेलं मन निरोपही मीच द्यावा अशी जर अपेक्षा करत असेल तर मग मित्रा, तु फारच कमकुवत मनाचा मालक आहेस.



Monday 12 October 2015

काळा पैसा

काळा पैसा, आजकाल बरंच बोललं जातंय. विनोद होताहेत. या काळ्या पैशामुळे एका विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ते म्हणजे घराच्या किमती. विविध क्षेत्रातील मंडळींच्या अनअकाऊंटेबल पैसे जनरेट करण्याचा हव्यास हा एकंदरीतच समाजाला घातक ठरत आहे. 

यातली बड़ी धेंडं ही या पैशातून एकतर जमिनी विकत घेत आहेत किंवा बिल्डरच्या संगनमताने अथवा स्वत: बिल्डर बनून टोलेजंग इमारती बांधत आहेत. लागणार्या पैशाला बँकेच्या इंटरेस्ट चा ससेमिरा नसल्यामुळे घरं किंवा जमिनी विकण्याची कुणाला घाई नाही आहे, उलट भाव चढतेच आहेत. हे चढ़ते भाव बघून आमच्यासारख्या व्यावसायिक बंधूंना तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. मग कंपनीतला पैसा सायफन करून जमिनी नाही तर घरं विकत घेत आहेत. फिजीकली इतकी cash किंवा सोने बाळगण्यापेक्षा जमिनीत किंवा घरात गुंतवणूक करणं सोपं पडतं. "Asset झाली" असं काही जण गोंडसपणे तर काही जण अभिमानाने मिरवत आहेत. आणि मग कंपनीच्या होणार्या प्रॉफिट वर कॉलर टाईट करण्याऐवजी जमिनीच्या चढ्या किंमतीवर चर्वितचर्वण करण्यात आम्ही लोकं धन्यता मानत आहोत. हाच प्रकार डॉक्टर, वक़ील, कंपनीचे उच्चपदस्थ यांच्याबाबतीत ही होतो आहे. 

या विनाकारण जमिनी बाळगण्यामुळे अनेक शेतजमिनी नुसत्या पडून आहेत. त्याच्या किंमती आवाक्याबाह्रेर गेल्यामुळे धान्य आणि भाजी उत्पादक इच्छा आणि तंत्र असूनही या उत्पादनाचा विस्तार करू शकत नाही आहेत. असलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळात दरवर्षी वाढणार्या खर्चाची हातमिळवणी त्यांना करावी लागते. 

नवीन व्यावसायिक स्वत:ची जागा असण्याच्या लालसेपायी पैसे मशीनरी मधे टाकण्याऐवजी जमिनीत अन जागेत टाकत आहेत. जी नॉनप्रॉडक्टिव्ह गुंतवणूक आहे. त्यामुळे कंपनीच्या ग्रोथवर मर्यादा येत आहेत. 

यामुळे सामान्य माणसाचा पगार आणि घराच्या किंमती यातील गुणोत्तर प्रमाण वाढत चाललं आहे. घर घ्यायचं असेल तर गावाबाहेर घ्यावं लागत आहे. त्याचे दुष्परिणाम अजून वेगळे. 

भिन्न क्षेत्रातल्या लोकांनी तयार केलेल्या काळ्या पैशांच्या राशीमुळे अशा विचित्र दुष्टचक्रात आपण सापडलो आहोत. भूतकाळात लोकांनी जमा केलेला काळा पैसा उकरून काढण्याच्या वल्गना सरकार करतं आहे ते ठीक आहे. पण ती पापं शहरी मंडळींनी पचवली आहेत. भविष्यासाठी मात्र हा काळा पैसा जनरेटच होऊ न देण्याची यंत्रणा सरकारने उभी केली तर रियल इस्टेट चा हा फुगा फुटून त्याच्या विषम किंमती या आपण जगणार्या लाईफ़ क्वालिटीच्या समप्रमाणात येतील. 

आताची परिस्थिती ही मात्र अजब आहे. 

Saturday 10 October 2015

साध्या माणसाची साधी प्रेमकहाणी भाग 2

धडधडतं हृदय सांभाळत राम लेडीज हॉस्टेल ला पोहोचला. लाजत, मुरकत चंदेरी उभीच होती. खाली मान घालून ती हळूच "हो" म्हणाली. राम्याच्या मनात उधाण माजलं.

आणि मग तो प्रेमाचा सिलसिला चालू झाला. सारस बाग, चतुश्रुंगी, पाषाण लेक, बनेश्वर, युनिवर्सिटी अशा अनेक जागा त्यांच्यातील गुजगोष्टीच्या साक्षीदार झाल्या. नाही म्हणायला दोघे फिरायचे, पण रमायचे ग्रुप मध्ये. एकतर बीजे ची मंडळी नाही तर शाळेची ग्यांग.

दोघे असतील तेव्हा अशी हॉटेलं निवडून काढायचे की जिथे शांतता असेल. गप्पा छाटता येतील. अशा हॉटेल मधील वेटर पण ओळखीचे झाले होते. Law कॉलेज रोड ला आशियाना नावाचं हॉटेल होतं. तिथल्या वेटर ला ऑर्डर ही दयावी लागायची नाही. न सांगता तो प्रत्येक गोष्ट उशीरा आणायचा. बिल ही. बाय म्हणताना हसायचा.

८९ ला रामचं बजाज औरंगाबाद ला सिलेक्शन झालं होतं. १३ जण जॉईन व्हायला गेले. १२ जण सिलेक्ट झाले, राम्याची दांडी उडाली, मेडिकल मध्ये. हाय बीपी. आयला वयाच्या २१ व्या वर्षी हाय बीपी?. रम्याला पुण्यात नोकरी मिळाली. इकडे चंदेरी pathology मध्ये गचकली. तो दुसर्यांदा दिल्यामुळे एमडी ती patho मधेच झाली. बहुतेक विधिलिखित असावं. राम्याने पुण्यात रहावं असं चंदेरीला मनातून वाटत असावं अन अभियंता असलेल्या राम्याला क्लिनिकल ब्रांच असलेली साथी झेपली नसती असं देवाला वाटलं असावं.

राम आणि चंदेरी आता खूप फिरू लागले. वेगवेगळे ट्रेक, शिरूर च्या पी एच सी ला जा. तळेगावला चंदेरीची इंटर्नशिप होती. राम लोकल ने जायचा. रात्री बेरात्री परत यायचा. हे असं सगळं असल्यावर घरी तर कुणकुण लागणारच. राम्याने तर घरात खडा टाकून ठेवला होता.

थोडी गडबड उडाली चंदेरीच्या घरी. म्हणजे जेवताना चुकून  हिरवी मिरची खाल्ल्यावर पाणी पिण्यासाठी जितकी उडते तितकीच. टापटिपीच्या चंदेरीने अजागळ अशा राम्याला जीवनसाथी म्हणून निवडलं होतं. प्रेम आंधळं असतं या म्हणीचा चंदेरीच्या घरच्यांना प्रत्यय आला.

१८ ऑगस्ट ९१ ला राम आणि चंदेरीचा साखरपुडा झाला. अन २१ ऑगस्ट ला, राम्याच्या ध्यानी मनी नसताना कंपनीत कन्फर्मेशन चं लेटर मिळालं. त्याच्या प्रस्तावित तारखेपेक्षा १३ महिने आधी. चंदेरी सारख्या गुणी आणि सालस मुलीच्या गळ्यात धोंडा पडताना तिच्या आयुष्यात थोडा उजेड असावा याची विधात्याने तरतूद केली.

२ डिसेंबर १९९१ ला राम आणि चंदेरी बंधनात अडकले. "लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या आ आ " हे गाणं जणू त्याच्यासाठी बनवलं असं रामला वाटू लागलं. अजूनही वाटतं.

 राम आणि चंदेरी गेली २४ वर्ष दररोजच्या आयुष्यात नवनवीन प्रेमकहाण्या रचत आहेत.

चंदेरी जणू रामचं वैभव आहे


Friday 9 October 2015

साध्या माणसाची साधी प्रेमकहाणी भाग १

ती, साधारणत: आठवीत आली असेल राम्याच्या वर्गात. तसं तिची दखल घ्यावी असं काही विशेष नव्हतं. चष्मा होता डोळ्यावर. चंदेरी काड्यांचा. म्हणून राम्या आणि त्याचे मित्र  तिला चंदेरी चिडवायचो. तिचं अस्तित्व जाणवलं दहावीला. शाळेत दुसरीच आली. कुणाच्या मनात नसताना. थोडं आश्चर्य व्यक्त झालं. पोरं पोरी पुढच्या शिक्षणाला लागले. राम्या गाव सोडून दुसर्या गावाला गेला. चंदेरी त्याच्या ध्यानात राहील अशी सुतराम शक्यता नव्हती. परत गावी आल्यावर ती दिसायची त्याला. साईबाबा सारखा केसाचा टोप केला होता तिने. राम्याला साईबाबा वर आधीच राग. तो तिला बघून न बघितल्यासारखा करायचा.

पुढच्या शिक्षणासाठी राम्या पुण्यात आला. त्याचा कंपुही जमला होता. प्रताप, नितीन, रागो, बंट्या, प्रसाद. अनुराधा आली होती मेडिकल ला. पाटली म्हणायचे तिला. बीजे मध्ये. तिला भेटायला पत्या आणि राम्या गेले. पाटली म्हणाली "अरे, ती चंदेरी पण आहे इथेच. चला भेटू यात." राम्या चकित झाला. चंदेरी ची प्रगती पाहून. त्याला वाटलं नव्हतं ती इतकी हुशार असेल म्हणून. बीजे त येण्या इतकी.

सुरुवातीला दोन अडीच महिन्यातून राम्या जाऊ लागला. बरोबर gang असायचीच. वर्ष सरलं. दुसर्या वर्षापासून फ्रिक्वेन्सी वाढली, बीजेच्या लेडीज होस्टेलला जायची. पोरांच्या कंपू बरोबर पाटली आणि चंदेरी गप्पा छाटू लागले. कधी नाही म्हणायला सीमा किंवा रागो ची बहिण मेधा असायचे.

राम्याच्या लक्षात आलं, चंदेरी हुशार तर होतीच पण बीजे मध्ये ती चटपटीत पण झाली होती. शाळेच्या ग्रुप मध्ये रमायची पण तिची तेव्हढीच gang बीजेची पण होती. सॉलिड मोठी. ती तिथेही प्रिय असावी. खूप भटकायची.

आणि दीड एक वर्षानंतर ते चालू झालं असावं. रामची स्कूटर हळूच बीजे कडे वळू लागली. साथीदार असायचेच. पण आता तो एकटा बर्याचदा कल्टी देऊन तिला भेटू लागला. रामचे बीजेत मित्र होते, तेव्हा जायचा तो तिथे. समोरून ती आली कि याचं हृदय धडधडू लागे. चंदेरी मार्केट यार्ड च्या इथे काही क्लास ला जायची. राम्याने रस्ता ताडला होता. एकदा हळूच मुद्दामून त्या डायस प्लॉट च्या इथे त्याने स्कूटर तिच्या गाडीला आडवी घातली आणि दाखवलं असंच काही कामाला आला होता अन योगायोगाने भेटला. चंदेरी उतरली आणि रामच्या मागे गाडीवर बसून पावभाजी खायला निघाली. रामला खूप गुदगुल्या झाल्या.

एकदा तर कहर झाला. राम लेडीज हॉस्टेल ला गेला. तर कळलं ती नाही. मित्र मैत्रिणीबरोबर पिक्चर ला गेली. कुठल्याशा इंग्रजी पिक्चर ला. राम ला तर तिला भेटायचं होतं. येडा झाला पार. त्याने ताडलं, अलका टॉकीज ला असणार. पिक्चरच्या नंतर कुठेतरी खाणार. त्यावेळेला चाणक्य फ़ेमस होतं. राम्याने विचार केला, ही सगळी मंडळी तिथं हादडत असतील. देवाचं नाव घेत जिना चढून गेला. साल्या रामची विल पॉवर इतकी स्ट्रॉंग कि ती त्याला दिसली बीजेच्या पोरा पोरींसोबत. याने नेहमीचा कुणाला तरी शोधत आल्याचा अभिनय केला अन तिच्याबरोबर वेळ घालवला. रामला खूप गुदगुल्या झाल्या.

एक जुनी मैत्रीण रामच्या घरी आली. तर रामची आई म्हणाली "अशी सून आण राम्या" तर राम आईला म्हणाला "चंदेरी सारखी चालेल का?" आई काही बोलली नाही. रामने ताडलं, पपलू फिट बसला.

धडधडत्या अंत:करणाने राम्याने पत्याला सांगितलं, चंदेरीबद्दलच्या भावना. पत्या म्हणाला, नेक काम मे देरी नही करनेका! त्याने लागलीच राम्याच्या भावना तिला सांगितल्या. राम दूर झाडाखाली उभा होता. ती म्हणाली उद्या सांगते. रामला वाटत होतं आग दोनो तरफ लगी है. हो म्हणायला पाहिजे. संध्याकाळी पत्या घरी गेला. राम्या काही निमित्ताने क्याम्पात थांबला. सॉलिड टेन्शन मध्ये होता तो. रात्र झाली. एकटाच विल्स किंग पीत क्याम्पातून अशोक नगर ला चालत आला. त्याला झोप येईना. रात्रभर हॉल मधेच खुर्चीवर बसला. टक्क जागा.

क्रमश:


मूड

काल सकाळी माझा मूड जरा खराब लागला होता. हे नाटक झालं आहे आयुष्याचं. अत्यंत गुणी बायको आहे, सोन्यासारखी पोरं आहेत, कंपनी भारतात एक नंबरला आहे म्हणजे कुणीही हेवा करावं असं मला लाईफ दिलं आहे विधात्यानं. आणि आमच्या थोबाडावर मात्र "चिंता करतो विश्वाची" असले दरिद्री भाव. आणि मग ते नळ्या तुंबवायच्या अन काय काय. जाऊ द्या, नको तो विषय.

तर सांगत होतो की मूड खराब लागला होता. कारने ऑफीसला निघालो.  अन विविधभारतीवर चार गाण्याची बरसात झाली की साला चिंब भिजलो.

पहिलंच गाणं आशा भोसलेंच्या धारदार आवाजातलं खुबसुरत चं पिया बावरी हे लागलं. तुम्हाला खरं सांगू, या गाण्यातील अशोककुमारच्या आवाजातील चार ओळी मला जास्त आवडतात. पहिल्या कडव्याच्या नंतर तो म्हणतो खरं, पण प्रत्येक कडवं संपलं की मला वाटतं की आता अशोककुमार चालू होईल आणि मै हारी जा जा री म्हणत ओळ संपेल.

दुसरं गाणं लागलं किशोरच्या आवाजातलं "हंसिनी, मेरी हंसिनी" हे अत्यंत मधाळ गाणं. अंगावर मोरपिस फिरवल्यासारखं. इतकं सुंदर गाणं हे जहरीला इन्सान असं भयानक नाव असलेल्या चित्रपटातलं आहे हा एक विचित्र योगायोग.

तिसरं लागलं, चितचोरमधलं आजसे पहले आजसे ज्यादा. येसुदास, काय बोलणार. मला आठवतं आहे, मी चितचोरची कॅसेट आणली होती. मी तिला सलग इतक्यांदा वाजवली की खराब झाल्यावरच थांबलो.

आणि चौथं गाणं होतं लताबाईंच्या आवाजातलं अभिमान चं गाणं अब तो है तुमसे जिंदगी अपनी. पूर्ण सपर्पण.

अशी एकाहून एक सरस गाणी. ऑफीसला पोहोचेपर्यंत फ्रेशच झालो.

काहीही म्हणा, त्या विविध एफ एम चॅनलच्या एकसुरी असुरांपेक्षा विविधभारती बेस्टच.

विविधभारती

I am love'n it.

Tuesday 6 October 2015

गोवा

कुटुंबाबरोबर फिरायला गेलो की बोलताना ज्या गमती जमती होतात, त्या नंतर ही कधी आठवल्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलल्याशिवाय राहत नाही.

मला दोन मुलं. एक यश आणि नील. यश अबोल तर नील बोलबच्चन. मूड असेल तर यश बोलतोही. त्यातल्या त्यात नील नाही तर मग वैभवी असेल तर पठ्या खुलतो. नील मात्र कधीही सुटलेला असतो.

३ ऑक्टोबर ला असंच आम्ही चौघेही निघालो. परत तीच कथा. मागे वैभवी अन दोन पोरं. दंगा घालताहेत. अन समोर मी ड्रायव्हर च्या शेजारी. तोंड थिजवून बसलेला. जणू काही सगळ्या जगाचं ओझं माझ्याच डोक्यावर आहे. डोक्यात नाना तऱ्हेचे विचार पण कान मात्र मागच्या सीटवर. आश्चर्य करत बसलेलो, वैभवी इतकं छोटया गोष्टीत मी का आनंदी राहू नाही शकत. असो. ते जाऊ दया. नेहमीचं रडगाणं आहे ते.

तर सांगत होतो की, गोव्याचा विषय निघाला. कोण कितीवेळा गेलं आहे ते. नील म्हणाला "मी तीन वेळा गेलो आहे." यश म्हणाला "हो मी बहुतेक तीन वेळा गेलो" वैभवी म्हणाली "मी पाच वेळा गेले आहे. आणि पप्पा तर किती वेळा गेलेत काय माहित?"

हे ऐकल्यावर नील म्हणाला "मम्मी, पण माझ्यापेक्षा दोन वेळा जास्त तु कधी गेलीस?"

"अरे एकदा तु बॉर्न नव्हता झालास"

"अच्छा, आणि अजून एकदा कधी"

"तेव्हा मी आणि पप्पा दोघेच गेलो होतो. तु आणि दादू दोघंही बॉर्न नव्हते झाले" इति वैभवी.

दोन सेकंदातच, डोळ्यातील बुब्बुळं गरागरा फिरवत चेहर्यावर मिश्कील भाव आणत नील वदला

"ओहो, म्हणजे तुम्ही दोघेजण हनीमूनला गोव्याला गेला होता का?"

हो, असं वैभवी म्हणाली.

इथे मात्र थिजलेला मी सावध झालो आणि सोलापूर रस्त्यावरची शेती, उस याबद्दलची माहिती नीलला सांगू लागलो. नाहीतर विषय चालू राहिला असता आणि हे आमचे कनिष्ठ चिरंजीव वदले असते

"मग त्यावेळेस तुम्ही दोघं गोव्यात फिरले की नाही. की रूममधेच होते चारही दिवस"

आजकालच्या पोरांचं काही सांगता येत नाही हो. चापलूस लेकाचे.

Tuesday 29 September 2015

रेपोरेट

१९९६-९७ ची गोष्ट आहे. मी रोलॉन हायड्रॉलिक्सचा टेक्निकल सेल्स इंजिनियर होतो. विंडसर, इंजेक्शन मोल्डिंग मशीन मॅन्युफॅक्चरर, माझा मोठा कस्टमर. त्यांचं एक मशीन फेल झालेलं दमण मधे. सेलो कंपनीत. खुर्च्या, टेबलं बनायची प्लास्टिकची.

मशीन मेन हायड्रॉलिक सिलिंडर फेल झाला म्हणून झोपली होती. माझ्या कंपनीचे सील वापरले म्हणून मी, विंडसर चा सर्विस इंजिनियर आणि एक गानू म्हणून डिझाईन इंजिनियर अशी तिघा जणांची वरात सेलोला पोहोचली. बाय द वे या गानू मंडळींशी माझं तेव्हापासून जमतं, अगदी ऑपोझिट पार्टीचे असले तरी.

सेलोचे सीईओ राठोड म्हणून होते. एकदम खडूस माणूस. पहिले तर तिघांना सॉलीड धुतला. आणि मग विंडसरच्या एम डी ला सांगितलं, जोवर मशीन चालू होत नाही हे तिघं इथच राहतील. ओलीसच समजा.

मी शॉपफ्लोअर ला गेलो. तिथली सिच्युएशन बघून मी चक्रावून गेलो होतो. जमिनीपासून रूफ टॉप पर्यंत खुर्च्या लागल्या होत्या. मशीन जिथे होती ती जागा फक्त रिकामी होती बाकी नजर जाईल तिथे खुर्च्या. मी तिथल्या मॅनेजरला बोललो "भाऊ, इथे बुड टेकवायला जागा नाही आणि तुझ्या साहेबाला प्रोडक्शन काढायचंच आहे. मशीन चालूच पाहिजे. खुर्च्या कुठे ठेवणार? हे गणीत काय आहे?" तर म्हणाला "दादा, असं आहे. राठोड साहेबांनी जर खुर्चीमागे २५ पैसे कमी केले की मार्केटमधे हवा होते. आणि रात्रीतून सुपडा साफ होतो. दोन दिवस आहात तुम्ही. बघालच."

दुसर्या दिवशी सकाळी मी पाहतो तो मैदान साफ . खुर्च्या गायब. मी विचारलं "ही काय जादू?" तर मॅनेजर म्हणाला "राठोड साहेबांची कमाल, हमाल दे धमाल. २५ पैसे रेट कमी केला खुर्चीचा अन रात्रीतून डीलर्सने उचलल्या सगळ्या खुर्च्या".

१८ वर्षापूर्वी २५ पैसे कमी केल्याने मार्केटमधे असं काय घडलं की उलथापालथ झाली हे कळलं नाही. आज रेपोरेट ५० पॉईंटने कमी झाला म्हणून मार्केटमधे खुशी की लहर का पसरते हे कळत नाही. बँकाचे रेट ०.४ टक्क्याने कमी झाले की मंडळी ४% रेट कमी झाल्यालारखी का उछलकूद करतात, ते ही समजत नाही.

राम, तु अडाणी होतास अन अडाणीच राहणार. 

पंजाब

पंजाबात गेला आहात का तुम्ही. ज्यांच्या घरी तुम्ही जाल तिथे चहाच्या अगोदर एक ताट फिरतं त्यात एकतर काजू, बदाम असे वाटीत मांडून ठेवले असतील. नाहीतर मग काजू असलेले गुड डे सारखे बिस्कीट किंवा मग ओरियो वा डार्क फँटसी सारखे जे मी दुकानाच्या शोकेस मधे फक्त बघू शकतो असे बिस्कीट मांडून ठेवले असतात. पारले जी किंवा मारी पंजाबात फक्त डॉक्टर ने प्रसिक्रिप्शनवर लिहून दिले तर खात असावेत. हे नाही तर मग हलदीरामचे वेगवेगळे चिवड्यांचे प्रकार वाटीत मांडून ठेवतात. त्याचा बकाणा मारून झाला की मग एक टंपास भरून चहा येतो. आपल्यासारखा मराठी माणूस इतकं रैमटवल्यावर गारेगार पडून जातो. यात मग कधी समोसे असतात किंवा कचोरी. एवढं सगळं झाल्यावर मग सरदारजी जेव्हा म्हणतात "चलो अब खाना खाते है" तेव्हा मला भोवळ यायची बाकी राहते.

दोनच महिन्यापूर्वी लुधियानाला ज्यांच्याकडे असा पाहुणचार झोडला असे दोन सरदारजी मनजीतसिंग आणि बलविंदरसिंग परवा कंपनीत आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्यांच्या पाहुणचाराला स्मरून चहा सांगितला. कोपर्यावरचा शंकर्या चहा किटलीत घेऊन आला. आणि मग तो पुण्यातला ३० मिली आणि ६० मिली या कुप्रसिद्ध मापाच्या मधला ४५ मिली चा पंख्याच्या वार्याने उडणार्या प्लास्टिकचा कप समोर ठेवत त्यात किटलीने चहा ओतला. मी ही ऐटीत दोघा सरदारजीना सांगितले "लिजीए चाय" तर दोघे सरदारजी एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसू लागले. मी म्हंटलं "मनजीतजी, क्या हुआ?" तर मनजीतजी हसत म्हणाले "ओय राजेशजी, ये क्या दिया आपने। इससे तो मेरी मुँछे भी गिली ना होगी"

मी खजील झालो. ते गेल्यावर माणसाला तडक मार्केटमधे पाठवून क्रॉकरी मागवून घेतली अन रीतसर कपात चहा बनवायला लागलो.

या एकदा चहाला कंपनीत. टी बॅग्ज देतो. हो आणि एका ऐवजी दोन टी बॅग्ज घ्यायला काही हरकत नसते. नाहीतर परत एखादा सरदारजी सुनवायचा "राजेशजी, इससे अच्छा तो ये होता के गरम पानीही पिला देते"