Monday 19 October 2015

ऑक्टोबरफेस्ट

ऑक्टोबरफेस्ट. 

फार ऐकलं होतं या ऑक्टोबरफेस्ट बद्दल. गँलन्स मधे वाहत जाणारी बियर, ती ज्याच्यात सर्व्ह केली जाते ते साधारण लिटरभरचे मग, बियर सर्व्ह करणार्या मादक ललना, त्यांचं ते एकावेळेस आठ आठ मग एका वेळेस सर्व्ह करण्याचं स्किल आणि काय काय. 

हा ऑक्टोबरफेस्ट म्युनिकला साजरा केला जातो. तिथला एक राजा होता म्हणे. त्याच्या वाढदिवसाला त्याने काही शे वर्षापूर्वी पार्टी दिली होती. १२ ऑक्टोबरला. सुरूवातीला एक दिवस चालणारं हे सेलिब्रेशन मग दोन दिवस, नंतर आठवडा आणि आता काहीतरी तीन एक आठवडे चालतं. म्युनिकमधे बियर खुप ब्र्यु होते. एक म्युनिकर वर्षाला सरासरी १०३ लिटर बियर ढोसतो. झेकनंतर ते जगात दुसर्या नंबरला आहेत असं म्हणतात. आता त्या राजाने जेवण वैगेरे पार्टीला दिलंच असेल. मग ते सोडून हा त्याचा वाढदिवस बियर महोत्सव मधे कसा परावर्तित झाला हे त्यांनाच माहित. म्युनिकमधे आजही मोठ्या ब्रेवरीज आहेत. 

२०११ मधे जर्मनीला गेलो होतो, तेव्हा या फेस्टला जाण्याचा योग आला. 

साधारण एखादा किमीचा रस्ता आहे. कमी जास्त असेल. त्याच्या दोन्ही बाजूला अगडबंब तंबू उभारले असतात. किती मोठे तर साधारण एका तंबूत पाच ते सहा हजार लोकं मावू शकतील असे. काही तंबूधिपती आत जायला तिकीट लावतात तर काही ठिकाणी फुकट एंट्री असते. अर्थातच जिथे तिकीट नसतं तिथे लांब रांगा असतात. रस्त्यावर मेरी गो राऊंड, जायंट व्हील अलियास आकाशपाळणा वैगेरे जत्रेतली खेळणी असतात. बाकी मग आपल्या वडापाव, भेळ, पाणीपुरी सारखे तिथल्या लोकल फुडचे स्टॉल असतात. ते स्टॉल सजवण्यासाठी वेगवेगळ्या भूचर आणि जलचर प्राण्यांची आहुति पडली असते. तंबूमधे फारसं काही खायला मिळत नाही. एक तो गोल शेंगुळ्यासारखा चव नसणारा पदार्थ मिळतो. नाव विसरलो मी त्याचं. 

वेळ कमी असल्यामुळे आम्हाला रांगेत उभं राहणं परवडणारं नव्हतं म्हणून आणि अर्थात म्हणूनच आम्ही तिकीट काढून तंबूत शिरलो. आपल्या नागपूरच्या सावजी मधे जशी आडवी बाकडी टाकलेली असतात तशी असंख्य बाकडी टाकलेली असतात. जागा पटकवायची आणि मग त्या बावारियन ड्रेस घातलेल्या ललना येतात. सध्या मित्रयादीत माझे भाचा-भाची, पुतण्या पुतणी, काकामंडळींचा भरणा असल्यामुळे मी त्या ड्रेसचं आणि ललनांचं जास्त वर्णन नाही करू शकत. या वाक्यावरून काही तज्ञ मंडळींनी प्रतिभा फुलवल्या असतील तर थांबा. तुम्ही जितका विचार करता तितका पण भारी ड्रेस नसतो. फार उत्कंठा ताणली असेल तर गुगल करा. 

आजूबाजूला कलकलाट चालू असतो. त्या गोंगाटात ती बियर मागवायची. बाहेर साधारण ५-६ युरोला मिळणारा टंपास या महोत्सवात ९-१० युरोला मिळतो. जितकं बोलता येतं तितकं बोलायचं. बियर प्यायची. तंबूच्या मध्यभागी एक चौकोनी आखाडाअसतो. जर्मन संगीतावर काही जोडपी तिथे नाचत असतात. त्या गोंगाटाने डोकं दुखायला लागलं आणि बियरचा शेवटचा थेंब घशाखाली उतरला की तंबू सोडायचा. 

बाहेर मग सगळे झिंगलेले तरूण तरूणी दिसतात. त्यांचा आरडाओरडा, विचित्र अंगविक्षेप करत एकमेकांच्या अंगावर झुलणं हे पाहत चालायचं. काही लोकं बियरच्या बाटल्या रस्त्यावरच फोडतात. त्या काचांपासून बचाव करण्यासाठी शूज चांगले हवेत.  

कडेला स्लोपवर हिरवळ लावली आहे. त्यावर टल्लीन लोकं आडवे पडलेले असतात. ज्यांना झेपलेली नसते ते बियर बाहेर काढत बसतात. 

एकंदरीत लाखभर मंडळी दिवसाला बियरप्राशन करतात. फ़ेस्टिवल च्या शेवटी की सुरूवातीला मिरवणूक निघते म्हणे. मी त्याची तयारी बघितली, पण मिरवणूक नाही बघितली. तसंही आपल्यासमोर कुठलीही मिरवणूक फिक्कीच. 

असो. मला काही हा ऑक्टोबर फेस्ट काही झेपला नाही. कारण मदिरा, मग ती ४% वाली असो, ८% किंवा मग ४२% वाली असो, ती घेताना जवळचे मित्र असावेत, गप्पा रंगाव्यात, झालंच तर जुन्या हिंदी गाण्यांची सीडी चालू असावी, मधेच कुणीतरी ती बंद करून स्वत: सूर छेडावेत आणि निरोप घेताना त्या मद्यापेक्षा दोस्तीची नशा मस्तकात भिनलेली असावी. साधारण मी अशा प्रकृतीचा माणूस. मैफल जमावी ती भेटण्यासाठी आणि मग आग्रह नाही, पण साथीला मद्य असेल तर त्याच्या साथीने मैफल सजली तर हरकत नाही अशी आपली मिजास. त्यामुळे परंपरेने साजरा होणारा तो ऑक्टोबरफेस्ट नामक बियर महोत्सव माझ्या लेखी भ्रमनिरस करणारा होता. 

अर्थात परंपरा म्हणून साजर्या होणार्या उत्सवाचं रूप हे ओंगळवाणं झालंय हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. 

No comments:

Post a Comment