Monday 25 January 2016

स्मरणशक्ती

मी पंचविशीत असताना माझी स्मरणशक्ती  फारच भारी होती. कुठलेही फोन नंबर मला लिहून ठेवावेच लागत नसत. टेलिफोन उचलला की बरोबर नंबर डायल केला जायचा. किंवा गाड्यांचे नंबर लक्षात राहायचे. माझ्या बिझिनेस पार्टनर ला याचं फार कौतुक. मला तो नेहमी म्हणायचा "कसला हुशार आहेस रे तू. कसली सॉलिड मेमरी आहे तुझी" हे ऐकलं की मला ही वाटायचं खरंच आपण हुशार आहोत की काय?

चार पाच वेळा अशी स्तुती झाल्यावर, आणि माझ्याही पार्श्वभागाला हरभर्याच्या झाडावर चढल्यामुळे गुदगुल्या झाल्यावर मी विचार केला "खरं तर काय त्याच्यात हुशारी. जी गोष्ट आपण लिहून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा शोधून काढू शकतो, ती लक्षात ठेवण्यात काय कौतुक" आणि तसंही कुणीतरी म्हंटलच आहे "A pale ink reliable than strong memory" मी वाघेला ला हे बोललो. त्यालाही पटलं ते. यथावकाश मोबाईल फोन आले आणि माझी शायनिंग टाकायची संधी कायमची हुकली. आता तर नंबर लक्षात ठेवायची मेंदूतली चीप कायमची करप्ट झाली आहे.

तसं किस्सा सांगताना लोकं साल सांगतात किंवा मी ही काही लिहिताना लिहितो "१९९२ साली मी बंगलोर ला गेलो असताना……" काही जण जबरी इम्प्रेस होतात या स्टाईल वर. "कसं काय आठवतो हो तुम्हाला" ही कॉमेंट की लागलीच मी ही हुशार्या दाखवत "राहतं लक्षात" वगैरे. खरं तर कोण बघायला जाणार हो ते ९२ साली घडलं की ९४ साली. "१९५२ साली नौशादजींनी मला आणि आशा ताईला दीदी बरोबर कोरस गायला सेट वर बोलावलं" हे वाक्य आल्यावर आई म्हणाली "काय आठवतं न हृदयनाथ जी ना" मी गालातल्या गालात हसलो.

काय सांगताहेत त्याच्या कंटेंट पेक्षा आपण या auxiliary गोष्टींना जास्त भुलतो. खरं तर, कुणी विचारलंच, "कशावरून" तिथे उत्तर नसतं.

त्या गाण्याचा कोरस हृदयनाथ जी आणि आशा जी यांनी गायला आहे, ते गाणं मला आठवत नाही पण साल नक्कीच आठवतं. गोची तिथे होते. 

असाच एक फेसबुकीय अविष्कार माझ्या एका बहिणीशी बोलताना झाला. ती खरं तर व्यवस्थित कुठल्या लेखात काय आवडलं, काय नाही हे मला व्यवस्थित समजावून सांगत होती. काही जणांच्या कॉमेंट किती समर्पक असतात वैगेरे. ते नीट समजावून घ्यायच्या ऐवजी, एक भलताच थ्रेड पकडून मी तिला बोलताना हुशारी दाखवत म्हणालो "अगं काय सांगायचं तुला. गेल्या वर्ष दीड वर्षात मी एकालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही आहे" ती ही  माझ्याकडे अपार कौतुकाने वगैरे बघू लागली. पण समजा तिने मला विचारला असतं "कशावरून म्हणतोस हे?" तर सॉलिड फाफललो असतो, नाही?

खरं तर अजून लिहायचं होतं, पण हा फेसबुकचा पफलू जबरी फिट बसला आहे. त्यामुळे थांबतो.

आणि हो, तर प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Thursday 21 January 2016

मायबोली

नील मंडलिक, पृथ्वीराज शिंदे, प्रथमेश कवूर, ध्रुव पुरंदरे हे चार मित्र आहेत. वय ११ ते बारा वर्ष. चौघांचे आई बाप मराठी भाषिक आहेत. ही चार ही पोरं घरात उत्तम मराठी बोलतात. पण गंमत अशी आहे की एकमेकांशी बोलताना मात्र हिंदी बोलतात.

कितीही झालं तरी मराठी भाषेवर माझं प्रेम आहे. अंह, थांबा. अस्मिता वैगेरे भानगडी नाही. गर्व तर त्याहून नाही. पण भाषेची आस्था, तर ती नक्कीच आहे. काय असेल ते असो, इंग्रजी भाषेने मला मोहवून कधीच टाकलं नाही. मान्य आहे, तिथेही अप्रतिम लिखाण आहे. आणि मी त्याला मुकतो आहे. पण हे ही तितकंच खरं की इंग्रजी भाषेमुळे पोटाची भ्रांत मिटली पण हृदयाला हात घातला तो मराठी भाषेनेच. माझं शिक्षण मराठी भाषेत झालं. व्यवसायाचा भाग म्हणून मला इंग्रजी बोलावं लागतं. सतत बोलल्यामुळे त्यातही सहजता आली. पण तिचा वापर फक्त तितकाच.बाकी स्वप्न मराठी भाषेतच पडतात. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळेच सुरेश भट साहेबांनी लिहिलेलं आणि कौशल इनामदारांनी संगीतबद्ध केलेलं  मराठी गीत ऐकताना अंगावर रोमांच उठतात. 

कितीही उंची हॉटेल मध्ये गेल्यावर मी वेटर ला मराठीत खाण्याची ऑर्डर देतो. पोरांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस असे भाव असतात की मी या पोरांचा बाप नसून, गाडीचा ड्रायव्हर आहे. आणि त्याने या पोरांना जेवायला आणलं आहे. 

मुळात आपल्याला उगाच न्यूनगंड असतो इंग्रजी येत नसल्याचा. किंवा ज्यांना चांगलं बोलता येतं, त्यांना अहंगड. बाकी देशात अक्षरश: बोंब आहे पण त्यांच्या बोलण्यातून हे न्यूनत्व आणि गंडत्व जाणवत नाही.  इंग्रजी मातृभाषा असणारा आमचा जेफ माझ्या इंजिनियर ला म्हणाला सुद्धा "Do not feel bad that your English is not good. It is not your mother tongue. And believe me, your English is better than my Marathi."  त्यामुळे कधी कुणी भारी इंग्रजीत काही लिहिलं की स्तिमित होतोही पण काही काळच. पुन्हा वाचण्याची हिंमत होत नाही. पण पुल, वपु, रणजीत देसाई, अनिल अवचट हे पुन्हा पुन्हा वाचले जातात.

अगदी काल औरंगाबाद ला स्पिंडल या टेक्निकल विषयावर भाषण द्यायचं होतं. वीस एक जण होते. मी विचारलं "मराठीत बोलू का" सगळ्यांनी सहमती दाखवली. नेहमीच्या इंग्रजी प्रेझेन्टेशन पेक्षा नक्कीच खुललं आणि मला व लोकांना खूप मजाही आली.

भाषेचं संवर्धन बोली भाषेतून होत असावं. त्यामुळे भाषा टिकवायची असेल तर संवाद मराठीत व्हावे. अर्थात प्रतिवाद ही . मातृभाषेत जितकं व्यवस्थित व्यक्त होता येतं तितकं परभाषेत नाही असं माझं मत आहे. जब्बार पटेल, श्रीराम लागू, सुधा मूर्ती याचं इंग्रजी आपल्याला भावतं याचं कारण मला असं वाटतं की ते विचार मातृभाषेत करत असावेत. तर सांगायचा मुद्दा हा की आपण ही आपल्या भाषेचा मुक्त हस्ते वापर करावा. की मुक्त मुखे म्हणू. काही ठिकाणं माझ्या लक्षात आली आहे तिथे विनाकारण इंग्रजी बोललं जातं. संवादातल्या दोघानाही मराठी येत असतं पण भाषा हिंदी किंवा इंगजी. कोणती ठिकाणं ही?

- पंचतारांकित हॉटेल्स
- मॉल मधील सेल्स ची लोकं.
- McDonald किंवा Domino मधील ऑर्डर घेणारी मुले किंवा मुली
- Inox किंवा तत्सम थियेटर मधील तिकीट देणारी पोरं 
- विमानतळावरचा ग्राउंड स्टाफ. आणि थोड्या फार फरकाने एयर होस्ट वा एयर होस्टेस ही.
- HDFC, ICICI किंवा Citibank अशा बँकेत काम करणारी मंडळी

वगैरे.

काही सूचना आहेत.

- कौंटर वर गिऱ्हाईक आलं की बोलीभाषेच्या तीन ऑप्शन चं कार्ड द्यायचं. मराठी, हिंदी वा इंग्रजी. गिऱ्हाईकाने जी भाषा निवडली त्या भाषेत संभाषण व्हावं.
- विमानाचं तिकीट काढतानाच संभाषणाची कुठली भाषा पाहिजे हे लिहिता यावं. आणि जर ती भाषा बोलणारा स्टाफ असेल तर "आपल्याला ब्रेकफास्ट साठी नॉनव्हेज देऊ की व्हेज" हे सकाळी च कुणी प्रसन्न आवाजात विचारलं, की तब्येत कशी खुश खुश होऊन जाईल, नाही?

तसंही, वर उल्लेखलेल्या लोकांपैकी ७०% टक्के इंग्रजी बोलताना एकदम टिनपाट वाटतात. अहो हे जाऊ द्या, सुरेल गळ्याच्या श्रेया घोषाल ची कधी मुलाखत ऐकली. इंग्रजी बोलण्याच्या नादात, ती तिच्या बोलण्यातल सत्व हरवून बसते.

आणि पुन्हा सांगतो यात आकस कुठेही नाही, पण मायबोली बोलली जावी. हे दहा वर्षाच्या पोरात दुसऱ्या भाषेत बोलण्याचं खूळ डोक्यात घुसलं आहे ते निघून जावं इतकीच इच्छा. बाकी मर्जी आपापली. 

Saturday 16 January 2016

ज्ञान

औरंगाबाद पॉलिटेक्निक तर्फे नांदेडला इंटर कॉलेज क्रिकेट खेळायला गेलो होतो. १९८६ साली. त्याकाळी मौज म्हणजे काय हो. कुठे हॉटेलमधे जाऊन मसाला डोसा खाल्ला तर चार दिवस जिभेवर चव रेंगाळायची आणि १५ दिवस मनात. मँचेस संपल्या. दुसर्यादिवशी आम्ही औरंगाबादला परत जाणार होतो. आम्ही नांदेडमधे त्या रात्री नॉनव्हेज जेवायचं ठरवलं. कॉलेजजवळ एक गोदावरी नावाचं हॉटेल होतं, अजूनही आहे बहुतेक. पण तिथला भपका काही आपल्याला परवडणार नाही म्हणून चालत आम्ही गावात एका हॉटेलला आलो. नॉनव्हेज खाणार म्हणून आधीच मनात हूरहूर. चौघे मित्र आम्ही.

बियर बार होता तो. ते आधीच टेन्शन. थोडं वातावरणाला सरावल्यावर मेनूकार्ड बघू लागलो. आजकाल बारकी पोरं सुद्धा स्वतंत्ररित्या कार्ड बघतात. आम्ही चारी टोणगे एकाच कार्डमधे खुसपूस करू लागलो. खुसपूस म्हणजे काय तर काय परवडतं? उर्दू पद्धतीने कार्डचं वाचन. बेरजा, वजाबाक्या. कुणाजवळ किती पैसे ह्याची चाचपणी झाली. पण ऑर्डर काही तयार होईना. हॉटेलचा वेटर आमची चूळबूळ एका डोळ्यातून बघत असावा. (कालंच एक छान वाक्य वाचलं "When you wait for the waiter in restaurant, actually you are also "waiter"")

आमच्या जवळ येऊन म्हणाला "भाऊ, किती पैसे आहेत तुमच्याजवळ?" उद्याच्या प्रवासासाठी दहा एक रूपये ठेवून आम्ही एकमेकांकडे पाहत म्हणालो "६० रूपये" तर तो म्हणाला "गप्पा मारा तुम्ही. तुमच्या बजेटमधे मी जेवण घेऊन येतो. मेन्यू किंमतीवर ठरवता आहे, इतकी डोकेफोड नका करू"

त्याने मग रितसर चिकन मसाला, रोटी, चारात दोन कोल्ड्रिंक, भात असं सगळं साग्रसंगीत जेवण दिलं. जेवण झाल्यावर बिल आणलं अन म्हणाला "बावन रूपये बिल झालंय, पाच रू रिक्षाला लागतील रातच्याला आणि बाकी टिप म्हणून मला ठेवा"

आम्ही खुशीने त्याला हात मिळवले अन एक मोठं दडपण दुर झाल्यासारखं शीळ वाजवत बाहेर पडलो. रिक्शाचे पाच रूपये वाचवले हे वेगळं सांगायलाच नको.

*****************************************************************************
३-४ वर्षापूर्वीची गोष्ट. बंगलोरहून पुण्याला येत होतो. स्पाईसजेट का असंच कुठलं तरी फ्लाईट होतं. आम्ही तिघे मित्र. मी मध्ये, विंडो ला संजय  आणि aisle ला मनीष . विमान उडल्यावर गप्पा चालू झाल्या. मनीष  आणि संजय एकमेकांशी बोलत होते. विषय होता, एयरलाईन कुठली चांगली ते. आणि गोष्ट चालू होती जेट आणि किंगफिशर बद्दल. मग त्याचं फ्लीट किती यंग आहे, हवाई सुंदरी कशा टापटीप असतात, त्यांचे इन्शुरन्स प्लान किती चांगले आहेत वैगेरे. १५-२० मिनिटे बडबड चालू होती. मी मध्ये बसलेलो. शांतपणे. मनीष मला म्हणाला "यार राजेश, आम्ही दोघं च बोलतोय. तू काहीच बोलत नाही आहेस या विषयावर" मी बोललो "काय बोलणार यावर. अरे जोपर्यंत आपण एयर लाईन चं सिलेक्शन तिकिटाच्या किमतीवर करतो, तो पर्यंत कशाला या बाकीच्या गोष्टीवर तारे तोडायचे."

संजय आणि मनीष गप्प बसले.

अगदी पंचवीस वर्षापूर्वी नांदेडच्या हॉटेलमधे त्या बाबा वेटर ने आम्हाला ज्ञान ऐकवल्यावर आम्ही चार जण शांत झालो तसेच.

Thursday 14 January 2016

खुश

आज मी खूप खुश आहे. जे घडलं असं होऊ शकतं हयाची कल्पना होती. पण ते अगदी इतक्या पटकन होईल असं वाटलं नव्हतं. याआधी सोशल मिडिया च्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली होती. एक गोव्याचे मित्र आहेत, सौदी चे गृहस्थ आहेत, कतार वरून मदत आली. आणि ती योग्य जागी पोहोचली. पण आजची गोष्ट न्यारी.

स्टीव्ह ची पोस्ट आठवते का? तोच माझा मित्र. इंग्लंड चा. जॉब गेला होता त्याचा. त्याच्या पर्सनल मेल वर मेसेज पोहोचला नव्हता.  पोस्ट टाकली होती त्यावर. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याला.

फोन आलेला आज त्याचा. जॉब मिळाला त्याला. ही तर खुशीची गोष्ट आहेच. पण सिलेक्शन झाल्यावर नवीन एम्प्लोयर ने सांगितलं की त्यांनी की स्टीव्ह च्या फेसबुक प्रोफाईल वर त्यांनी ती पोस्ट वाचली. अगदी मराठी  भाग ही भाषांतर करून. मुळातच हुशार आणि कामसू असलेल्या स्टीव्ह च्या व्यक्तिमत्वाची मला वाटलेली  चांगली बाजू लोकांनी वाचली. स्टीव्ह च्या फोन मधून आनंद नुसता ओसंडत होता.

अर्थात, त्या पोस्ट मुळे त्याचं सिलेक्शन झालं असा माझा समज झाला आहे, असं कुणाला वाटत असेल तर अवघड आहे. पोस्ट लिहायचा उद्देश इतकाच की एका चांगल्या माणसाला योग्य जॉब मिळाला. तुमच्या शुभेच्छा कामाला आल्या. आणि मुख्य म्हणजे सोशल मिडिया चा असा उपयोग होऊ शकतो. यापूर्वी मला एकाने सांगितलं होतं की युएस व्हिसा देणारे लोकं फेसबुक प्रोफाईल चेक करतात, तर मी त्यांना वेडयात काढलं होतं.

साधारण अशा उपयोगाची पण वेगळी जुनी पोस्ट खाली टाकतो. ते ही माझ्या बरोबर घडलं आहे. जसंच्या तसं.

********************************************************************************

Man is not born to remain tangled in his unfulfilled or broken dreams. If human mind can dwell in past, it definitely cannot be chained and kept bound there, because he has a divine boon and strength for flying in the future with a vision. To dream, to make those dreams a reality, to put every possible effort in materializing those dreams into actuality and if for unfortunate reasons those dreams get ruined then walking on those shattered pieces with the injured feet full of blood towards reconstructing the same or following a new dream is a human virtue. And just because of this fact human existence acquires a purpose.

कुठे लागतोय का संदर्भ. Conference ची theme होती "Dream, though times are turbulent" मला पण बोलायचं होतं. माझ्या छोट्या भाषणाचा शेवट वि स खांडेकरांच्या माझ्या आवडत्या वाक्याने करावा असं वाटलं. समोर भारताच्या विविध राज्यातून आलेले प्रतिनिधी. त्यामुळे मराठीतून सांगितलं असतं तर काहीच कळलं नसतं. पण इंग्रजीतून सांगायचं म्हणजे मग धूळदाण. अजून प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही पण विचाराने जवळ आलेले खूपच मित्र झालेत फेसबुकवर. वाक्य पाठ होतंच, पाठवलं. आणि मदत तत्पर Shiva Aithal माझ्या मदतीला धावून आले. आणि वरील अनुवाद पाठवला त्यांनी दहाच मिनीटात. टाळ्या खाल्या हे वेगळं सांगायलाच नको. आपलं असं आहे "आयजीच्या जीवावर बायजी उदार"


तुम्ही मूळ वाक्य वाचलं आहेच पण परत तुमच्या reference साठी 

" भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही आहे. मानवाचे मन भूतकाळाच्या साखळदंडा नी करकचून बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखाचे वरदानही लाभले आहे. एखादे स्वप्न पाहणे, ते फुलविणे, ते सत्यसृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले तर रक्ताळलेल्या पावलांनी त्याच्या तुकड्यावरून दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या आयुष्याला अर्थ येतो तो या मुळेच. "


बहुतेक अमृतवेल


मज्जानु लाईफ. 




Wednesday 13 January 2016

ईन बॉक्स

लैच जळायचो मी, इनबॉक्सातल्या चॅटिंगच्या पोस्टीवर. नाही म्हणजे मी एकदम गोरा गोमटा नाही, पण एकदम टाकाऊ पण नाही हो. सहा आठ महिन्यापासून स्मितहास्य असलेलं प्रोपिक लावून ठेवलेलं. पण नाही, कुणी म्हणजे कुणीच मेसेज पाठवायचं नाही. आतुरतेने वाट पहायचो, कुणी मेहेरबान होतंय का ते. पण हाय रे दुर्दैव. गेले दोन वर्ष इमानऐतबारे पोस्टचा रतीब टाकूनही कुणीपण माझ्या इनबॉक्सकडे ढूंकूनही बघीतलं नाही.  इथे कुणी धमक्या देतंय, कुणी स्क्रीन शॉटस लावताहेत, पुरूष म्हणताहेत मी पंचेचाळिसचा, पण चॅटिंग करू नका, कुणी आदरणीय नववृद्धाने पोस्ट टाकली की इनबॉक्सात छळू नका. मी असल्या पोस्टी वाचून पार अगदी निराशेच्या गर्तेत लोटला जायचो. आयला, असं काय सोवळेपण चेहर्यावर चिपकवलं की आपली नोंदही घेऊ नये.

त्यातूनही स्त्री वर्गातल्या कुणी मेसेज पाठवला तर सुरूवातच "राजेशदा" आणि कुणा पुरूषाने मेसेज केलाच तर "सर सीव्ही पाठवू का" असे अगदी शुष्क अन अरसिकतेने नटलेले मेसेजेस. हात शिवशिवायचे, आपण ही "तसल्या" संभाषणाची पोस्ट टाकावी, झालंच तर त्याचा उद्धार करावा पण दैव कायम रूसलेलंच.

शेवटी काल तो सोनियाचा दिनू उगवला. तर ती व्यक्ति सोनिया नावाची मुलगी होती की दिनू होता हे गुलदस्त्यात राहू देऊ. तर त्या व्यक्तिचा आधी दोन तीनदा ही मेसेज आला होता, पण म्या पामरानेच तिकडे दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य गुन्हा केला होता. काल मी दिल्लीत होतो, एकटाच. म्हणजे "हम भी अकेले, तुम भी अकेले और मौसम जवाँ" अशा मोहक अवस्थेत एकटाच पहुडलो होतो. आणि परत मेसेज आला "हाय" सुरूवातीला मी आपला सभ्य माणसासारखा उत्तरं देत राहिलो. पण हळूहळू ती व्यक्ती रंग दाखवू लागली. (साल्या, रंग च दाखवत होती ना, मग अंग दाखवत असल्यासारखं चेकाळतोस कशाला) मधलं संभाषण जाऊ द्या. मुद्द्याचं असं बोलणं झालं की मी व्यक्तिला म्हणालो "हॉटेलच्या रूमवर येण्याआधी मला तुझा फोटो पाहिजे" तर ती व्यक्ती म्हणाली "फोटो नको, तुम्ही त्याचा दुरूपयोग कराल" मी म्हणालो "या संभाषणाचा दुरूपयोग करून मी पोस्ट बनवेल याची भिती वाटत नाही का?" तर व्यक्ति सॉरी म्हणून गायब. साला, खेळ बनता बनता बिघडला.

चांगला २८५० मित्रांचा अन पन्नास एक म्युच्युअल फ्रेंडस असलेलं पण पोपटाचं प्रोपिक असलेलं प्रोफाईल. फुर्रकन उडून गेलं. अनफ्रेंडचे सोपस्कार करू नाही दिले त्या व्यक्तिने. पंधरा वीस दिवसांनी मिठू मिठू करेलही परत, पण लक्ष तर मलाच ठेवावं लागेल. कुणास ठाव आता ही पोस्ट वाचत ही असेल दुसर्या एखाद्या अकाउंट वरून.

दीड एक महिन्यापूर्वी नांदेड सिटीत मॉर्निंग वॉक घेताना एक अनोळखी मुलगा आला. म्हणाला "तुम्ही मंडलिक सर ना. मी तुमच्या सगळ्या पोस्ट वाचतो. खुप पॉझिटिव्ह फिलिंग येतं" हे ऐकल्यावर जितका आनंद झाला त्याच्या कैक पटीने काल मेसेजामेसेजी पाहिल्यावर आनंद झाला. अगदी बुडालेली नौका वर आल्यावर नवर्याला पाहून कलावतीला जितका झाला तितकाच.

आता पुढचा एखादा आठवडा तरी मी आनंदलहरीवर तरंगत असेल हे नि:संशय.

(व्यक्ति हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे लेखात योजला आहे हे चाणाक्ष मित्र मैत्रिणिंच्यी लक्षात आलंच असेल. ती व्यक्ति जरी पुरूष आहे तरीही ते मूळ स्त्रीचं प्रोफाईल असून फेक अकाऊंट पुरूषाचं असण्याची शक्यता गृहीत धरली आहे. आनंदलहरीवर झुलण्यासाठी अशा शक्यता गृहीत धरणं नितांत गरजेचं आहे. फेसबुक्याटिक लिबर्टी म्हणा हवं तर

Monday 11 January 2016

लाईक

लाईक म्हणजे मला तुझी पोस्ट आवडली
आणि लाईक म्हणजे मला तुझी पोस्ट नाही आवडली असंही. 

लाईक म्हणजे हाय
लाईक म्हणजे बाय

लाईक म्हणजे तुझं मला लाईक
म्हणून माझंही तुला लाईक

लाईक म्हणजे कॉमेंटमधे अनुमोदन घे
लाईक म्हणजे प्रतिवाद झेल

लाईक म्हणजे तिथल्या तिथे प्रत्युत्तर
लाईक म्हणजे "इसका जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा"

लाईक म्हणजे सलाम तुझ्या निरागसतेला अन स्पष्टवक्तेपणाला
लाईक म्हणजे स्तिमीत होतो तुझ्या आत्मप्रौढीला अन आत्मनिंदेलाही

लाईक म्हणजे चकित होतो तुझ्या विद्वत्तेने तर कधी सेन्स ऑफ़ ह्युमरने
लाईक म्हणजे दु:खी होतो तुझ्या तिरस्काराने 

लाईक म्हणजे तुझ्याबद्दलचा आदर दुणावला
लाईक म्हणजे तुझा मुर्खपणा पाहून दिग्मूढ झालो

लाईक म्हणजे विचारांनी डोकं घुसळलं
कधी सकारात्मकतेने, तर कधी नकारात्मकतेने

लाईक म्हणजे कधी कागदाचा बोळा
तर कधी पंचवीस हजार रूपये तोळा

लाईक म्हणजे लाईक असतं
कधी तुमचं आमचं सेम असतं
आणि कधी ते सेम नसतं 

आस्तिक

कसं आहे मित्रा, जेव्हा एम एफ हुसेन ना देशाबाहेर जावं लागलं होतं तेव्हा आम्हाला वाईटंच वाटलं होतं पण नग्न देवदेवतांची चित्रं काढून त्यांनीही खाजवून खपली काढली होती याबद्दलही शंका नाही. दीपा मेहता ने फायरमधे सीता आणि राधा ही लेस्बियन जावांची दिलेली नावं मुद्दामून काढलेली आगळीक होती. प्रसिद्धीसाठी केलेली चीप पद्धत होती. धर्म हा आचरणाचा भाग आहे. तो वैयक्तिक पातळीवर ठेवावा हे ही मान्य. सार्वजनिकरित्या त्याचं प्रदर्शन करू नये याबद्दलही सहमत. पण ज्या हिणकस पद्धतीने तु त्याचा जो प्रतिरोध करतोस तो ही निंदनियच. अगदी गणपतीसमोर बेवड्यांच्या नाचाचा निषेध करावा तितकाच. अशा प्रतिरोधाला धार नसते. तिचं आस्तित्वंही तितकंच क्षणभंगुर असतं जितकं तुला आलेल्या धमकीवजा कॉमेंटसचं. कारण दोघांच्याही विचारात उथळपणा आहे. 

खरा नास्तिक तो जो आस्तिकतेचा आदर करतो. त्याचं पालन स्वत: करत नाही पण सत्यनारायणाची पूजा दुसर्याने करण्यास त्यांची ना नसते. दाभोळकर होते असे नास्तिक. दाभोळकर तर फार लांबचं आणि मोठं उदाहरण. पण ही पोस्ट जो लिहीतो आहे तो मी, माझ्या घरातही फार पूजा अर्चा होत नाही. पण लहान भावाच्या घरी होणार्या पूजेला इमानऐतबारे जातो. आमच्या मातोश्री घरात सांग्रसंगीत पूजा करतात, माझी त्याला ना नसते. 

तुझी लिहीण्याची शैली छानच आहे. पण समाजप्रबोधनाचा हा जो तु मार्ग निवडला आहेस तो चुकीचा आहे. अरे आत्मनिंदा हवीच पण इतकीही खाली मान घालणारी नको. अरे ज्या पुरातनकाळातल्या कथांचा उल्लेख करून तु झोडपतोस त्यातल्या एकातरी गोष्टीचा पगडा आजकालच्या समाजमनावर असेल असं तुला खरंच वाटतं का? जर समाजाने ते जोखड जर फेकून दिलं असेल तर त्या गोष्टीचा शिवराळ भाषेत उद्धार करण्यात काय हाशील आहे? आणि जर फेकली नसेल तरी evolution ची प्रोसेस चालू आहे. भारतात ही धर्माचा गर्व बाळगण्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे हे नाकारून कसं चालेल. माझ्या बहुतांश मित्रमंडळींना धर्माचा, जातीचा अभिमान तर नाहीच पण त्याची लाज वाटावी इतकीही वाईट परिस्थिती नाही आहे. 

कुठल्या संख्येनं मुठभर असलेल्या लोकांवरून पुर्ण धर्माला वेठीला धरतो आहेस. हे म्हणजे चार आंबे सड़के निघाले म्हणून अख्ख्या आमराईला कीड लागल्याचा निष्कर्ष काढल्यासारखं आहे. अरे, इथेही लोकं धर्मापासून, जातीपासून दूर रहाण्याचं आवाहान करणारे लोकं आहेतच की. पण भाषेचा नूर बघ. विखाराने पछाडलेली, चार लोकं टाळ्या वाजवतात म्हणून अश्लाघ्य शब्द वापरतोस तू. पण लक्षात असू दे या क्षणिक टाळ्यांचा नाद विरण्याच्या आत तुझे शब्दही दफ़्न झाले असतात. त्या टाळ्यांमुळे हाताला आलेल्या मुंग्या जायच्या आत मेंदूने तुझ्या शब्दांना झिडकारलं असतं. आणि तुला मात्र ती नशा जिवंत ठेवण्यासाठी तुला आलेल्या धमक्यांच्या स्क्रीन शॉटसचा सहारा घ्यावा लागतो. 

आता तु म्हणशील तुझ्या स्टाईलमधे "अरे, इतकं का पोटतिडकीने शहाणपणा शिकवतोस. तुम्ही आपलं साधं वरण भात खाऊन दुपारची वामकुक्षी घ्या" किंवा "एवढी बकबक करण्यापेक्षा नारळ द्या" बरोबर आहे तुझं. दुसरं कुणी असलं तर केलंही असतं ते. पण तुझ्या स्वभावात मानव्याचा अंश दिसतो म्हणून हा खटाटोप. राजेशदा म्हणून साद घालतोस, म्हणून वाटतं की  जयजयकारांच्या कर्कश्श आवाजात कुणी तुझ्यातला माणूस शोधतोय म्हणून ही साद. आता त्याला प्रतिसाद द्यायचं की नाही हे तु ठरवायचं. 

बाकी अनफ्रेंडचं बटन माझी टाईमलाईन उघडली तरी दिसतंच. 

Friday 8 January 2016

विभक्त कुटुंब पद्धती

फार लाडका होतो मी त्या कुटुंबाचा. राजा, राजेश दादा अशा हाकांनी मला बोलावलं जायचं. मला आवडणार्या गोष्टी बनल्या की बाजूला वाटीत ठेवलं जायचं. मोठी माणसं प्रेमवर्षाव करायचे तर घरातल्या लहान मुली माझ्या अंगा खांद्यावर खेळायच्या.

सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला मला बोलावलं नव्हतं. पण योगायोगाने त्यादिवशी मी त्याच हॉटेल मध्ये जेवायला गेलो. माझ्या अत्यंत जिवलग नात्यातल्या मंडळींची मांदियाळी बघितल्यावर मला काही सुधारलं नाही. जेव्हा लक्षात आलं  की आपल्याला या कार्यक्रमाला बोलावलं नाही तेव्हा खूप वाईट वाटलं. माझा विश्वास बसत नव्हता पण असं घडलं होतं खरं.

नात्यांची घट्ट बांधलेली वीण आता उसवत चालली आहे याचा अनुभव पहिल्यांदा आला.

नंतर मात्र सवय झाली. पुण्यात आता कित्येक पुतण्या आहेत, भाच्या आहेत, चुलत बहिणी आहेत अगदी माहेरचं आडनाव मंडलिक असलेल्या, मावस भाऊ आहेत. कुणी फार एकमेकांना फोन करत नाहीत. मदत मागत नाहीत. माझ्याच लक्षात आलं की अरे इथं आपण यांच्या उपयोगाला येऊ शकतो तर मग शक्य ती मदत करतो. एका जवळच्या  भावाला भाड्याचं घर सोडायला सांगितलं. त्याला सांगावं वाटलं नाही "अरे हा प्रॉब्लेम झाला आहे." काही निमित्ताने मी त्याच्या घरी गेलो. कळलं. दुसर्या दिवशी त्याला घर मिळवून दिलं. तेव्हापासून आज पर्यंत कामाशिवाय पठ्ठ्या कधी भेटला नाही.

काम सरल्यानंतर  ते ही विसरून जातात, मी ही विसरतो. कधी समोरासमोर गाठभेट झालीच तर बेमालूम पणे "अरे, काय बरेच दिवसात भेट नाही झाली. फोन नाही." वैगेरे सोपस्कार होतात. आपण कसे बिझी आहोत, फोन करायला ही सुचत नाही असे डायलॉग एकमेकांना ऐकवतो. कुणी सांगतं वानवडी तून जातो पण वेळच नसतो. कुणी तोंडदेखलं कंपनी बघायची म्हणतात, खडकवासल्याला मक्याचं कणीस खायला येतात, पण २०० मीटर कार वळत नाही.  काहीना मदत हवी असते, पण डायरेक्ट मागत नाहीत. कंपनी बघायच्या निमित्ताने येतात आणि म्हणतात "बघ, झालं नाही तरी ठीक, पण हे काम होतंय का सांग, तसं व्हायलाच पाहिजे असं काही नाही". काही लोकांची वेगळीच तऱ्हा.  भेटल्यावर समोरच्याचं काय चालू आहे याचं सोयर सुतक नाही. आमची पोरं, त्यांच्या फॉरेन च्या ट्रिपा, त्यांच्या बायका/जावई, इतक्या गाडया, salary package, पुण्यात flat, त्याच्या वाढलेल्या किमती आणि मग बाय.

मुळात आपण सगळे आत्ममग्न झालो आहोत. मी आणि माझं जग यात मश्गुल आहोत. अगदी मी ही. आर्थिक स्वायत्तता आली आहे. पैसे दिले की गोष्टी मिळतात, कुणाची मदत कशाला हवी? मदत करायला नको म्हणून मग घ्यायला नको. स्वत:च्या गावात हॉटेल मध्ये राहायची पाळी यावी, यातच सगळं आलं. हे वाईट की चांगलं हा मुद्दा वेगळा पण हे घडतं आहे हे खरं.

आणि हे असंच होत जाणार. त्याबद्दल गळे काढण्यात काही मतलब नाही. पोराचं लग्न झालं की तो त्याची वेगळी चूल मांडणार. शक्य झाल्यास आई वडिलांना भेटणार. अन हेच योग्य. माय स्पेस सांभाळायच्या नादात कुणाला डोकं टेकवण्यासाठी खांदा दयायची गरज वाटत नाही.  पंधरा वीस वर्षांनी, म्हणजे आमची पिढी म्हातारी झाल्यावर एकतर एकटी उडणार नाही तर आश्रमात. अमेरिकेत होतंच आहे की. आमचा जेफ म्हणतोच की "I can not imagine my son staying at my home after his marriage" किंवा तो सांगायचा "I tell my ailing father to stay with us. But he (his father) used to say "My sons, I love you all..........but not more than 3 days". शेवटी त्याचे वडील गेले ९२ व्या वर्षी कम्युनिटी सेंटर मधेच. ते जाताना कुटुंबाचा गोतावळा बरोबर होता हेच काय ते नशीब. Close knit family, you know.

गपगुमान म्हातारपणाची सोय करून ठेवावी. पोरांना शिक्षणरूपी वाहन द्यावं मग ते कार म्हणून वापरायचं, की विमान करायचं, की  बैलगाडी हे त्यांचं त्याने ठरवायचं. व्यावहारिक राहायचं. आमचा इंग्लंड च्या स्टीव्ह ने त्याच्या पोरीला सांगितलं की "You will need at least GBP 600 if you stay alone. Instead, you stay with us and pay GBP 300 per month. Mutual benefit." कटकट नाही.

इंग्रजी In Law शब्द मस्त आहे नाही. Father in law, mother in law, son in law, daughter in law. तुम्ही माना अथवा न माना कायद्याने तो तुमचा सासरा, सून, जावई, सासू आहे. कायद्यात राहून फायद्यात राहायचं.

असो. मध्ये कुणी तरी पोस्ट टाकली होती की विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारावी का? तेव्हापासून हे लिहायचं  होतं. तर आता ते तुमच्या हातात नाही आहे. ती स्वीकारावी हेच शहाणपणाचं लक्षण आहे.