Saturday, 16 January 2016

ज्ञान

औरंगाबाद पॉलिटेक्निक तर्फे नांदेडला इंटर कॉलेज क्रिकेट खेळायला गेलो होतो. १९८६ साली. त्याकाळी मौज म्हणजे काय हो. कुठे हॉटेलमधे जाऊन मसाला डोसा खाल्ला तर चार दिवस जिभेवर चव रेंगाळायची आणि १५ दिवस मनात. मँचेस संपल्या. दुसर्यादिवशी आम्ही औरंगाबादला परत जाणार होतो. आम्ही नांदेडमधे त्या रात्री नॉनव्हेज जेवायचं ठरवलं. कॉलेजजवळ एक गोदावरी नावाचं हॉटेल होतं, अजूनही आहे बहुतेक. पण तिथला भपका काही आपल्याला परवडणार नाही म्हणून चालत आम्ही गावात एका हॉटेलला आलो. नॉनव्हेज खाणार म्हणून आधीच मनात हूरहूर. चौघे मित्र आम्ही.

बियर बार होता तो. ते आधीच टेन्शन. थोडं वातावरणाला सरावल्यावर मेनूकार्ड बघू लागलो. आजकाल बारकी पोरं सुद्धा स्वतंत्ररित्या कार्ड बघतात. आम्ही चारी टोणगे एकाच कार्डमधे खुसपूस करू लागलो. खुसपूस म्हणजे काय तर काय परवडतं? उर्दू पद्धतीने कार्डचं वाचन. बेरजा, वजाबाक्या. कुणाजवळ किती पैसे ह्याची चाचपणी झाली. पण ऑर्डर काही तयार होईना. हॉटेलचा वेटर आमची चूळबूळ एका डोळ्यातून बघत असावा. (कालंच एक छान वाक्य वाचलं "When you wait for the waiter in restaurant, actually you are also "waiter"")

आमच्या जवळ येऊन म्हणाला "भाऊ, किती पैसे आहेत तुमच्याजवळ?" उद्याच्या प्रवासासाठी दहा एक रूपये ठेवून आम्ही एकमेकांकडे पाहत म्हणालो "६० रूपये" तर तो म्हणाला "गप्पा मारा तुम्ही. तुमच्या बजेटमधे मी जेवण घेऊन येतो. मेन्यू किंमतीवर ठरवता आहे, इतकी डोकेफोड नका करू"

त्याने मग रितसर चिकन मसाला, रोटी, चारात दोन कोल्ड्रिंक, भात असं सगळं साग्रसंगीत जेवण दिलं. जेवण झाल्यावर बिल आणलं अन म्हणाला "बावन रूपये बिल झालंय, पाच रू रिक्षाला लागतील रातच्याला आणि बाकी टिप म्हणून मला ठेवा"

आम्ही खुशीने त्याला हात मिळवले अन एक मोठं दडपण दुर झाल्यासारखं शीळ वाजवत बाहेर पडलो. रिक्शाचे पाच रूपये वाचवले हे वेगळं सांगायलाच नको.

*****************************************************************************
३-४ वर्षापूर्वीची गोष्ट. बंगलोरहून पुण्याला येत होतो. स्पाईसजेट का असंच कुठलं तरी फ्लाईट होतं. आम्ही तिघे मित्र. मी मध्ये, विंडो ला संजय  आणि aisle ला मनीष . विमान उडल्यावर गप्पा चालू झाल्या. मनीष  आणि संजय एकमेकांशी बोलत होते. विषय होता, एयरलाईन कुठली चांगली ते. आणि गोष्ट चालू होती जेट आणि किंगफिशर बद्दल. मग त्याचं फ्लीट किती यंग आहे, हवाई सुंदरी कशा टापटीप असतात, त्यांचे इन्शुरन्स प्लान किती चांगले आहेत वैगेरे. १५-२० मिनिटे बडबड चालू होती. मी मध्ये बसलेलो. शांतपणे. मनीष मला म्हणाला "यार राजेश, आम्ही दोघं च बोलतोय. तू काहीच बोलत नाही आहेस या विषयावर" मी बोललो "काय बोलणार यावर. अरे जोपर्यंत आपण एयर लाईन चं सिलेक्शन तिकिटाच्या किमतीवर करतो, तो पर्यंत कशाला या बाकीच्या गोष्टीवर तारे तोडायचे."

संजय आणि मनीष गप्प बसले.

अगदी पंचवीस वर्षापूर्वी नांदेडच्या हॉटेलमधे त्या बाबा वेटर ने आम्हाला ज्ञान ऐकवल्यावर आम्ही चार जण शांत झालो तसेच.

No comments:

Post a Comment