Monday 11 January 2016

आस्तिक

कसं आहे मित्रा, जेव्हा एम एफ हुसेन ना देशाबाहेर जावं लागलं होतं तेव्हा आम्हाला वाईटंच वाटलं होतं पण नग्न देवदेवतांची चित्रं काढून त्यांनीही खाजवून खपली काढली होती याबद्दलही शंका नाही. दीपा मेहता ने फायरमधे सीता आणि राधा ही लेस्बियन जावांची दिलेली नावं मुद्दामून काढलेली आगळीक होती. प्रसिद्धीसाठी केलेली चीप पद्धत होती. धर्म हा आचरणाचा भाग आहे. तो वैयक्तिक पातळीवर ठेवावा हे ही मान्य. सार्वजनिकरित्या त्याचं प्रदर्शन करू नये याबद्दलही सहमत. पण ज्या हिणकस पद्धतीने तु त्याचा जो प्रतिरोध करतोस तो ही निंदनियच. अगदी गणपतीसमोर बेवड्यांच्या नाचाचा निषेध करावा तितकाच. अशा प्रतिरोधाला धार नसते. तिचं आस्तित्वंही तितकंच क्षणभंगुर असतं जितकं तुला आलेल्या धमकीवजा कॉमेंटसचं. कारण दोघांच्याही विचारात उथळपणा आहे. 

खरा नास्तिक तो जो आस्तिकतेचा आदर करतो. त्याचं पालन स्वत: करत नाही पण सत्यनारायणाची पूजा दुसर्याने करण्यास त्यांची ना नसते. दाभोळकर होते असे नास्तिक. दाभोळकर तर फार लांबचं आणि मोठं उदाहरण. पण ही पोस्ट जो लिहीतो आहे तो मी, माझ्या घरातही फार पूजा अर्चा होत नाही. पण लहान भावाच्या घरी होणार्या पूजेला इमानऐतबारे जातो. आमच्या मातोश्री घरात सांग्रसंगीत पूजा करतात, माझी त्याला ना नसते. 

तुझी लिहीण्याची शैली छानच आहे. पण समाजप्रबोधनाचा हा जो तु मार्ग निवडला आहेस तो चुकीचा आहे. अरे आत्मनिंदा हवीच पण इतकीही खाली मान घालणारी नको. अरे ज्या पुरातनकाळातल्या कथांचा उल्लेख करून तु झोडपतोस त्यातल्या एकातरी गोष्टीचा पगडा आजकालच्या समाजमनावर असेल असं तुला खरंच वाटतं का? जर समाजाने ते जोखड जर फेकून दिलं असेल तर त्या गोष्टीचा शिवराळ भाषेत उद्धार करण्यात काय हाशील आहे? आणि जर फेकली नसेल तरी evolution ची प्रोसेस चालू आहे. भारतात ही धर्माचा गर्व बाळगण्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे हे नाकारून कसं चालेल. माझ्या बहुतांश मित्रमंडळींना धर्माचा, जातीचा अभिमान तर नाहीच पण त्याची लाज वाटावी इतकीही वाईट परिस्थिती नाही आहे. 

कुठल्या संख्येनं मुठभर असलेल्या लोकांवरून पुर्ण धर्माला वेठीला धरतो आहेस. हे म्हणजे चार आंबे सड़के निघाले म्हणून अख्ख्या आमराईला कीड लागल्याचा निष्कर्ष काढल्यासारखं आहे. अरे, इथेही लोकं धर्मापासून, जातीपासून दूर रहाण्याचं आवाहान करणारे लोकं आहेतच की. पण भाषेचा नूर बघ. विखाराने पछाडलेली, चार लोकं टाळ्या वाजवतात म्हणून अश्लाघ्य शब्द वापरतोस तू. पण लक्षात असू दे या क्षणिक टाळ्यांचा नाद विरण्याच्या आत तुझे शब्दही दफ़्न झाले असतात. त्या टाळ्यांमुळे हाताला आलेल्या मुंग्या जायच्या आत मेंदूने तुझ्या शब्दांना झिडकारलं असतं. आणि तुला मात्र ती नशा जिवंत ठेवण्यासाठी तुला आलेल्या धमक्यांच्या स्क्रीन शॉटसचा सहारा घ्यावा लागतो. 

आता तु म्हणशील तुझ्या स्टाईलमधे "अरे, इतकं का पोटतिडकीने शहाणपणा शिकवतोस. तुम्ही आपलं साधं वरण भात खाऊन दुपारची वामकुक्षी घ्या" किंवा "एवढी बकबक करण्यापेक्षा नारळ द्या" बरोबर आहे तुझं. दुसरं कुणी असलं तर केलंही असतं ते. पण तुझ्या स्वभावात मानव्याचा अंश दिसतो म्हणून हा खटाटोप. राजेशदा म्हणून साद घालतोस, म्हणून वाटतं की  जयजयकारांच्या कर्कश्श आवाजात कुणी तुझ्यातला माणूस शोधतोय म्हणून ही साद. आता त्याला प्रतिसाद द्यायचं की नाही हे तु ठरवायचं. 

बाकी अनफ्रेंडचं बटन माझी टाईमलाईन उघडली तरी दिसतंच. 

No comments:

Post a Comment