Thursday, 15 October 2026
Monday, 5 October 2026
मधली ३ वर्षे मी एका सोसायटीत राहिलो होतो. मस्त एका बिल्डिंगची सोसायटी होती. दोन विंग्ज मिळून तीस एक फ्लॅट होते. खालच्या मजल्यावर एक पराग म्हणून इंटरेस्टिंग माणूस राहायचा. पराग त्याचं नाव. एका टेलिकॉम कंपनीतून त्याने पन्नशीच्या आतच व्हीआरएस घेतली होती. मोठा हरफनमौला होता पराग. अनेक क्षेत्रात त्याची मुशाफिरी होती. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होता, एकांकिका लिहायचा, चांगला चित्रकार होता, आवाज कधी कसलेला नसला तरी श्रवणीय होता, अनेक वाद्य वाजवायचा, त्यातही तबल्यावर त्याची चांगलीच हुकूमत होती. व्यवसायाने अभियंता असला तरी कलेचं कुठलंही क्षेत्र त्याला वर्ज्य नव्हतं. त्याची बायको एका कॉलेज मध्ये प्राध्यापिका होती. आणि एकुलती एक मुलगी होती. तीपण अभ्यासात हुशार वगैरे.
व्हीआरएस घेतल्यावर पराग पुण्यातील एकही सांस्कृतिक कार्यक्रम चुकवायचा नाही. तो आणि त्याची बायको शलाका, बालगंधर्व, पंडित फार्म, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, एस एम जोशी इकडे दर्जेदार कार्यक्रमाला दिसायचेच. पराग चं रुळे गावाजवळ एक फार्म हाऊस होतं. तिथं तो मित्र मंडळींना घेऊन मस्त गाण्याच्या, कवितेच्या वगैरे मैफिली जमवायचा. एकंदरीत एखाद्याला हेवा वाटावं असं आयुष्य होतं परागचं. तो काही एच एन आय वगैरे नव्हता. पण पैशाचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून त्याने चांगलं सेव्हिंग्ज करून ठेवलं होतं. वर परत तो सोसायटीचं काम पण करायचा. आणि शलाकाची नोकरी चालूच होती.
छंद म्हणून तो आमच्या भागातल्या पोरांना अगदी अल्पदरात तबला शिकवायचा. दोनच बॅच. एक सकाळी सात ते आठ, दुसरी संध्याकाळी सहा ते सात. साहजिक आहे.
परागच्या खालच्या मजल्यावर एक दीपक म्हणून राहायचा. चाकण च्या एका मल्टी नॅशनल मध्ये जनरल मॅनेजर होता. चाकण ते पुण्यातील घर ये जा केल्यामुळे की कुणास ठाऊक पण हा दीपक कायम कावलेला असायचा. सोसायटीतल्या अनेक लोकांबद्दल त्याला वीस वर्षे राहून सुद्धा काही तक्रार असायची. दोन चार त्याच्यासारख्या त्रस्त समंधांना घेऊन इतर लोकांच्या कागाळ्या करणे हा दिपकचा आवडता छंद होता. मल्टी नॅशनल कंपनीत जनरल मॅनेजर असूनसुद्धा इतक्या कोत्या मनोवृत्तीचा हा कसा काय असा मला नेहमीच प्रश्न पडायचा.
त्यातही परागवर, दीपक विशेष खार खाऊन होता. काय कारण होतं माहित नाही, पण चार दिवस गेले आणि त्याने परागची काही तक्रार केली नाही असं व्हायचं नाही. त्यासाठी कुठलंही कारण पुरायचं. पण त्यातही सगळ्यात आवडतं कारण म्हणजे तबला क्लास ला येणारी मुलं. त्यांचा किलबिलाट, लिफ्टचा वापर, पॅसेज मध्ये असणाऱ्या चपला, तबल्याचा आवाज असं काही न काही कारण घेऊन दीपक सोसायटीतल्या भेटेल त्याला तक्रार करायचा. वर पराग सोसायटी चं काम करत असल्यामुळे तर दीपक ला चान्स च मिळायचा. आमच्या विंग मध्ये परागच्या तबला क्लास ला कुणाचा विरोध नव्हता. सोसायटी मधीलच चार पोरं त्याच्याकडे शिकायला जायची.
गंमत म्हणजे पराग दीपक ला हिंग लावून विचारायचा नाही. आपण बरं अन आपलं काम बरं या न्यायाने हसतमुख चेहऱ्याने लाईफ एन्जॉय करत होता. दीपक मात्र आपण शहणपणाच्या गोष्टी करण्याच्या अविर्भावात मूर्खासारखा वागत राहिला.
पुढं मी ती सोसायटी सोडली. जाताना मी परागला विचारलं सुद्धा की तुला दिपकच्या वागण्याचा राग येत नाही का? पराग म्हणाला की "येतो की पण थोडाच वेळ. मी जे करतो आहे ते प्रामाणिक पणे करतो. दिपकच्या बोलण्याने न माझ्या अंगाला भोक पडतं आणि बाकी सगळ्यांचा विश्वास असल्याने कामात न काही अडथळा येतो. त्यामुळे त्याचा मूर्खपणा त्याने बाळगावा, माझ्याकडे आहे ते मी सांभाळतो"
नंतरच्या आयुष्यात मला दीपक तर अनेक भेटले पण पराग मात्र एखादाच.
Sunday, 6 September 2026
मी ९६-९७ च्या सुमारास मुंबईला मरोळ एम आय डी सी मध्ये इलेक्ट्रोन्यूमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स (इपीएच) मध्ये सील्स विकायला जायचो. तेव्हाच तिचं वेगळेपण माझ्या लक्षात आलं होतं. पुढे मग मी सील्स विकणे सोडून स्पिंडल व्यवसायात उतरलो आणि हायड्रॉलिक्स च्या कस्टमर कडे जाणं बंद झालं. चाकण इंडस्ट्रियल एरिया विकसित झाला आणि तिथे इलेक्ट्रोन्यूमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स ची भली मोठी फॅक्टरी दिसत होती पण आत जाण्याची काही संधी मिळाली नव्हती.
काही वर्षांपूर्वी इपीएच ची जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर इन्ग्रिड रस्किन्हा आय एम टी एम ए च्या कमिटी मध्ये आली आणि आमची काही विषयांवर चर्चा होऊ लागली. मग एके दिवशी इपीएच मध्ये आमची एक मिटिंग ठरली आणि त्या फॅक्टरी चा राउंड घेतला आणि आश्चर्यचकित झालो. नवनवीन टेक्नॉलॉजीज चा वापर करून इपीएच ने अनेक अद्भुत उत्पादने बनवली होती. त्यातही त्यांनी भारतीय डिफेन्ससाठी केलेली अनेक इम्पोर्ट सब्स्टिट्यूट्स बघून तर चकित झालो होतो.
माझे बिझिनेस कोच श्री मनीष गुप्ता यांनी संस्थापित केलेल्या क्रिसलीस इंत्राप्रेन्युअर फोरम मध्ये आम्ही काही विशेष व्यक्तींना भाषणासाठी ज्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून काही वेगळं आणि हटके केलं आहे. इपीएच च्या इन्ग्रिड ने तिथे येऊन तिच्या आर अँड डी प्रणित उत्पादनांची माहिती आणि त्यामागची विचारधारा सांगावी असं मला बऱ्याचदा वाटायचं. पण तशी संधी मिळत नव्हती. शेवटी ३ सप्टेंबर ला ती संधी मिळाली.
अपेक्षेप्रमाणे इन्ग्रिड रस्किन्हा ने व्यासपीठ गाजवलं. त्यातही जेव्हा तिने भारतीय संरक्षणार्थ जी अफलातून प्रॉडक्टस बनवली ते प्रत्येक प्रॉडक्टस बनवताना सभागृहात वाजणाऱ्या टाळ्या थांबत नव्हत्या. जेव्हा त्यांचं प्रेझेंटेशन संपलं तेव्हा तिला स्टँडिंग ओव्हेशन मिळणं हे साहजिक होतं.
हे स्टँडिंग ओव्हेशन मिळण्यामागे अजून एक महत्वाचं कारण होतं. व्यवसाय करता करता इपीएच ने पुण्याजवळ जवळपास एक गावच दत्तक घेतलं आहे. त्या गावाचं जीवनमान सुधरावं म्हणून अनेक उपक्रम इन्ग्रिड च्या वडिलांनी म्हणजे कै अँथनी रस्किन्हा यांनी चालू केले आणि ते सर्व इन्ग्रिड, तिचा भाऊ ऍशले आणि इन्ग्रिड चे यजमान प्रशांत हे समर्थपणे पुढे नेत आहेत.
कार्यक्रम झाल्यावर माझ्या एका मित्राने मला विचारलं की असे स्पिकर्स आणण्यामागचं तुझं मोटिव्हेशन काय आहे?. मी त्याला जे सांगितलं तेच खाली लिहितो.
"मला लघु उद्योजकांनी आपली जुनी विचारधारा सोडून नाविन्याचा अंगीकार करावा असं मला वाटतं. मला प्रामाणिकपणे हे पण वाटतं की ज्या लोकांनी इन्ग्रिड सारखा हटके मार्ग निवडला आहे ते ऐकून नॅनो साईज का होईना पण आपले विचार बदलतील आणि त्यामुळे आपल्या व्यवसायात चांगले बदल घडण्याची शक्यता होते. दुसरा मुद्दा असा की मला नेटवर्किंग मुळे प्रचंड मदत झाली आहे. इन फॅक्ट, मनीष गुप्तांशी माझी ओळख किंवा डॉ आनंद देशपांडे यांनी माझ्या सारख्या छोट्या उद्योजकाचं पुस्तक प्रकाशित करणे हे फक्त नेटवर्किंग मुळे शक्य झालं आहे. आणि मी या मोठ्या लोकांचा वेळ मागतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांचे अनुभव ऐकतो आणि ते माझ्या व्यवसायाशी रिलेट करतो.
या सगळ्या ऋणातून उतराई होण्यासाठी, या सगळ्या लोकांना माझ्यासारख्या उभरत्या उद्योगांनी ऐकावं, आपल्यात बदल आणावा यासाठी प्रयत्न करणे हा अगदी सोपा मार्ग आहे. ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं मी मानतो. मग हे छोटं काँट्रीब्युशन करण्याची मला प्रेरणा मिळते."
असो. जे आहे ते सगळं असं आहे. वृद्धिधिष्टित मानसिकता असणारे उद्योजक उभे राहणे ही काळाची गरज आहे आणि त्यात हा चिमुटभर वाटा.
Saturday, 5 September 2026
बाबू
बाकी उत्पादन क्षेत्रातील लघु उद्योग व्यवसायापेक्षा प्रमाण कमी असलं तरी आमच्याकडे लोक सोडून जातात. त्यातले काही लोक जाताना काहीतरी विचित्र भावना असते. विचित्र म्हणजे काय तर त्यांचा जेव्हा निरोप समारंभ असतो तेव्हा तिथं जावंसं पण वाटत नाही आणि गेलोच तर फारसं बोलावंसं पण वाटत नाही. काहींना तर जबरदस्तीचा राम राम करावा लागतो. पण काही लोक असतात जे कंपनी मध्ये भले काहीच वर्षे काम करतात पण ते करताना त्यांनी १००% रिटर्न्स कामाला दिले असतात. म्हणजे त्यांनी स्वतःचा एक स्लॉट कंपनीत तयार केला असतो. ते जेव्हा सुट्टी घेतात तेव्हा उगाच चुकल्यासारखं वाटतं आणि सोडून जातात तेव्हा त्यांनी जो कंपनीत काळ व्यतीत केला त्याबद्दल एक सुखावह भावना मनात रुंजी घालत असते.
असाच आमचा एक एम्प्लॉयी, त्याचं नाव बाबू. खरं नाव परशुराम राऊत. १७ वर्षे कंपनीत काम केल्यावर त्याने ती सोडण्याचा निर्णय घेतला. तो कंपनीत हेल्पर म्हणून जॉईन झाला आणि हेल्पर म्हणूनच कंपनी सोडली. पण ज्या कामाचा आपल्या इको सिस्टम मध्ये मोबदला सगळ्यात कमी मिळतो, त्या कामात बाबूने मनापासून काम केलं. आमची कंपनी जॉईन करण्याअगोदर अक्षरश: पोती वाहणाऱ्या बाबूने, आमच्या इथे कॉम्पोनंट क्लीन करणे, पॅकिंग करणे, झाडलोट करणे, पाणी भरणे, गाड्या धुणे अशी सर्व कामं केली. मध्ये करोना काळात कँटीन चे इश्यू होते तेव्हा सेकंड शिफ्ट मध्ये पोरांना डबे दिले. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर पोस्ट लिहिली तेव्हा कुणीतरी असं लिहिलं होतं की असा खराच माणूस आहे का, की माझ्या आदर्शवादाच्या सोसातून तो काल्पनिक तयार केला आहे.
गेली काही वर्षे त्याला कमी अंगमेहनतीचं म्हणजे ऑफिस मधील पॅन्ट्री सांभाळण्याचं काम दिलं होतं. त्यामुळे माझ्या कडे कुणी पाहुणे आले तर त्यांचं सरबराई करायचं काम बांबूचं. माझी केबिन मध्ये जर काही एक्स्ट्रा कागदपत्रे दिसली की माझ्या मागे लागून तो गरज नसलेल्या गोष्टी फेकायला लावायचा. जी कामं करण्याची एस ओ पी वगैरे लिहून लोकांना त्याची सवय लावायला लागते ती एस ओ पी बाबूच्या रक्तात भिनलेली होती. कॉमन सेन्स वापरून तो सांगितलेल्या कामात व्हॅल्यू ऍडिशन करून +१ काम करायचा. बाकी त्याची अजून काही वैशिष्ट्य आधीच्या पोस्ट मध्ये सांगितली होती, त्याची लिंक खाली देत आहे.
आता तब्येत फारशी साथ देत नाही आणि त्याही पेक्षा महत्वाचं त्याला झोपूयो मध्ये फ्लॅट घर मिळाल्यामुळे त्याने हडपसर बाजूला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तिकडून कंपनीत ये जा करणं हे अवघडच होतं.
परवा त्याचा निरोप समारंभ झाला. लोक अगदी उत्स्फूर्त पणे त्याच्या बद्दल बोलले. मी पण बोललो, अर्थातच. त्यात कुठलाही कृत्रिम पणा नव्हता, निगेटिव्ह भावनेची थोडीपण भनक नव्हती. व्यावहारिक पातळीवर त्याने कंपनीला शंभर+ टक्के दिलं. पण त्याही पेक्षा त्याचा कंपनीतील वावर हा कंपनीतील सकारात्मकता वाढवणारा होता. आमच्या इथे आल्यावर या पॉझिटिव्ह वाईब्ज चा अनेक जण उल्लेख करतात. बाबू सारखे जे अनेक लोक आमच्या कडे कार्यरत आहेत त्याने ते शक्य होतं. बाबूवर लिंक्ड इन वर पोस्ट टाकली त्यानंतर त्या पोस्टवरच्या कमीच कॉमेंट्स आहेत पण वाचण्यासारख्या आहेत. आणि तीन जणांनी मला फोन करून बाबूचं कौतुक केलं आणि तो सोडून गेला याबद्दल हळहळ व्यक्त केली. यातच त्याच्या कामाबद्दल कल्पना येते.
बाबूचं पुढील आयुष्य हे आरोग्यदायी रहावं याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
Wednesday, 2 September 2026
Monday, 17 August 2026
Saturday, 15 August 2026
Saturday, 1 August 2026
Friday, 31 July 2026
आमच्या मातोश्री पैसे खर्च करण्याबाबतीत तशा सढळ हाताच्या. नातू, आम्ही मुलं, सुना वगैरेंना वाढदिवशी किंवा नातवांना परीक्षेत चांगले मार्क पडले, कुठल्या वास्तुशांती वेळी सटासट पाकीट वाटते. जवळच्या नातेवाईकांना कधी गरज पडली की पैसे काढून देते.
पण असं असलं तरी एका बाबतीत तिला पैसे खर्च झालेले अजिबात आवडत नाही. ते म्हणजे सिटी मध्ये कुठे जायचं असेल तर तिला रिक्षा किंवा कॅब वर पैसे खर्च करणं अजिबात आवडत नाही. ते वाचवण्यासाठी ती कुठलाही आटापिटा करू शकते. म्हणजे आमच्या घरापासून (फातिमानगर) तिला रावेत ला जायचं असेल तर ती मला म्हणते की ड्रायव्हर आधी तुला सोडेल सिंहगड रोड ला आणि मग मला रावेत ला सोडून येईल. मी तिला सांगतो की माझ्या बरोबर कंपनीत येई पर्यंत तू घरून रावेतला पोहोचशील. मी तुला कॅब करून देतो. (त्याचे पैसे पण मीच भरणार असतो खरंतर). पण तिचा तोच हट्ट असतो. कॅब नको, तुला सोडल्यावर ड्रायव्हर मला सोडून येईल. मी तिला हे पण सांगतो की कंपनीतून रावेतला सोडून यायला कारचं जितक्या रुपयाचं पेट्रोल लागतं, तितकेच पैसे कॅब साठी आपल्या घरापासून रावेत साठी लागतात. पण तिला हे गणित काही केल्या कळत नाही. समहाऊ तिच्या डोक्यात ते सिटीबस चे दहा आणि पंधरा रुपयांचे तिकीट फिक्स आहेत. त्यावर ती सिटी अंतर्गत पैसे खर्च करायला नाहीच म्हणते. मी पण आता या विषयावर डोकेफोड करणं बंद केलं आहे.
इतके दिवस मला वाटत होतं की हा प्रकार फक्त सिटी अंतर्गत प्रवासासाठी आहे. पण नुकताच मला अजून एका गोष्टीवर पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येतं हे जाणवलं. ते म्हणजे औषधं. सुदैवाने माझ्या आईची तब्येत ठणठणीत असते. फक्त आता वयोपरत्वे छोटी मोठी आजारपणं उद्भवतात. सगळ्यात आधी तर तिला डॉक्टरकडे यायचंच नसतं. "मला म्हातारीला काय धाड भरली आहे?" हे पालुपद सारखं चालू असतं. आता काही कारणासाठी तिला अक्षरश: भांडण करून डॉक्टर कडे नेलं आणि त्याने ज्या काही भरमसाठ टेस्ट सांगितल्या, त्या प्रत्येक टेस्ट करताना "या डॉक्टर ला काही कळतच नाही. इतक्या कुठं टेस्ट असतात का साध्या आजारासाठी?" हे वाक्य प्रत्येक अर्ध्या तासाने ती म्हणत होती. तब्येतीला काही झालं याच्या कम्प्लिट डिनायल मोड मध्ये. सर्व टेस्ट आणि तपासण्या झाल्यावर आणि त्यातही त्याचे चार्जेस कळल्यावर, जे मी सांगणं टाळत होतो, तिने मला ठणकावून सांगितलं. "यापुढे काहीही झालं तरी ते आपल्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन जायचं." परवा त्या स्पेशालिस्ट डॉक्टर कडे फॉलो अप साठी गेलो होतो आणि त्याने दोन महिन्याने परत बोलावलं तर त्यालाच ऐकवलं "टेस्ट सांगणार नसाल तर येते" नशीब त्या स्पेशालिस्ट डॉक्टर च्या औषधांनी तिला थोडा आराम पडला नाहीतर माझं तिने परत कधीच ऐकलं नसतं. त्याबद्दल डॉक्टर चे आभारच मानायला हवेत.
इथे खुर्चीत बसल्या बसल्या हात वर केला आणि छातीत थोडी कळ आली की घाबरणाऱ्या माझ्यासारख्याची आई तब्येतीच्या बाबतीत इतकी डेअर डेव्हील कशी काय हे एक मला कोडंच पडलं आहे.
Saturday, 25 July 2026
Sunday, 19 July 2026
Friday, 26 June 2026
Wednesday, 24 June 2026
कोरियन मुलगी
Thursday, 4 June 2026
परवाच्या इ व्ही च्या पोस्ट मध्ये अनेक जणांनी मीरा कारचा आणि पर्यायाने पंडितराव कुलकर्णी यांचा उल्लेख केला. अर्थात नेट वर मीरा कार ही शंकर राव कुलकर्णी यांनी बनवली आहे असा उल्लेख आहे. पण मीरा चं चित्र आणि उल्लेख हे आजही फाय च्या वेब साईट वर आहे. म्हणजे पंडितराव आणि शंकरराव कुलकर्णी हे अतिशय जवळचे नातेवाईक असणार आहेत. तर मी आज लिहिणार आहे ते फाय बद्दल. फ्युएल इंस्ट्रुमेंट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (फाय) बद्दल. अतिशय प्रोग्रेसिव्ह ग्रुप असला तरी दुर्दैवाने आमचे फार काही बिझिनेस रिलेशन्स फाय ग्रुप बरोबर एस्टॅब्लिश झाले नाही. त्यामुळे मला फक्त दोन-तीन वेळाच त्यांच्याकडे जाता आलं. त्यामुळे मी जे लिहिणार आहे ते मी जे अनुभवलं आणि थोड्या फार ऐकीव माहितीवर.
फाय ग्रुप जरी १९५३ मध्ये स्थापित झाला तरी तो नावारूपाला आला तो पंडितराव कुलकर्णी यांच्या लीडरशिपखाली. एकुणातच हे कुलकर्णी कुटुंबीय उद्योजकतेचा मापदंड ठरलं आहे. मी जेव्हा फाय ग्रुप मध्ये गेलो तेव्हा पंडितराव हे व्यवसायात जास्त ऍक्टिव्ह नव्हते. पण ज्यांना मी भेटलो होतो ते पंडितरावांबद्दल बोलताना थकत नव्हते. त्यांचं उच्च दर्जाचं तांत्रिक ज्ञान, इचलकरंजी सारख्या छोट्या गावात त्यांनी वसवलेला अत्यंत प्रागितिक औद्योगिक समूह, त्या एका ग्रुप मधून बाहेर पडून तयार झालेले असंख्य उद्योजक, त्यांनी समाजासाठी केलेले अनेक प्रकल्प, फाय फाउंडेशन अवॉर्ड्स अशा एक ना अनेक चित्तरकथा मी ऐकल्या आणि स्तिमित झालो होतो.
अत्यंत साध्या वेशात राहणाऱ्या पंडितरावांकडे अनेक परेदशी डेलिगेट्स वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स वर उत्तर शोधण्यासाठी इचलकरंजी त यायचे. तुम्ही समजू शकता की इचलकरंजी फार व्यवस्थित जगाशी कनेक्ट नव्हतं, पण त्या काळात सुद्धा जगभरातून लोक फाय ग्रुप ला व्हिजिट करायचे.
फाय ग्रुप बद्दल आदर आमच्या मनात अजून एका कारणासाठी आहे. आम्ही ज्या असोसिएशनचे सभासद आहोत ती आय एम टी एम ए, इमटेक्स म्हणून एक औद्योगिक प्रदर्शन भरवते. त्या एक्झिबिशन मध्ये फाय ग्रुप टेक्निकली उत्कृष्ट डिझाईन केलेल्या मशीन ला अवॉर्ड देते. फाय फाउंडेशन चं अवॉर्ड इमटेक्स मध्ये मिळणं हे त्या डिझाईनला मिळालेली सर्वात भारी पोचपावती समजली जाते. भारतीय मशीन टूल बिल्डर्स बद्दल फाय फाउंडेशन चं असणारं ममत्व हे अजून एका वेगळ्या कारणासाठी आहे. इंडियन मशीन टूल बिल्डर्सचे अर्ध्वयू समजले जाणारे साठे साहेबांचे पंडितराव कुलकर्णी यांच्याबरोबर अत्यंत सौहार्दाचे संबन्ध होते. इन फॅक्ट अशी वंदता आहे की साठे साहेबांच्या प्रगती ऑटोमेशन सुरु आणि एस्टॅब्लिश होण्यामागे पंडितरावांचा सक्रिय सहभाग होता. प्रगती ऑटोमेशन ने जगभरात आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या प्रॉडक्टस चा झेंडा रोवला ती कथा भारतीय औद्योगिक क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहे.
मायको बॉश मध्ये काम करणाऱ्या माझ्या एका जवळच्या मित्राने पंडितरावांचा किस्सा सांगितला होता. डिझेल पंप मध्ये लागणारा एक क्रिटिकल कॉम्पोनंट होता ज्याचं मशिनिंग करायला २७ सेकंद लागत होते. लाखांमध्ये लागणाऱ्या या प्रॉडक्ट ची प्रॉडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी इंजिनियर जंग जंग पछाडत होते. फाय ग्रुप त्यांच्याबरोबर कनेक्ट होताच. पंडितरावांकडे तो प्रॉब्लेम घेऊन गेले. काही महिन्यात २७ सेकंद लागणारा कॉम्पोनंट ७ सेकंदात बाहेर पडू लागला. फाय ग्रुप बॉशचा एक महत्वाचा सप्लायर बनला हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पंडितरावांचं हे जे वरच्या लेव्हलचं तांत्रिक ज्ञान होतं ते इतकं प्रसिद्ध झालं की क्वालिटी बद्दल पराकोटीचं आग्रही असणाऱ्या जापनीज लोकांमध्ये पण त्यांचं नाव झालं. कि हिन नावाच्या प्रसिद्ध कार्ब्युरेटर उत्पादकाने फाय ग्रुप बरोबर सामंजस्य करार करून चाकण इथे प्लांट टाकला.
आमच्या इमटेक्स च्या शिवाय फाय फाउंडेशन वेगवेगळे अवॉर्ड्स देतं. त्या पुरस्कर्थ्यांची नावं जर बघितली तर त्याचं महत्व आपल्या लक्षात येईल. त्यांच्याबद्दल वाचताना मला हे पण कळलं की ते भारतातील पहिले (आणि कदाचित एकमेव) लोकनियुक्त नगराध्यक्ष होते.
अर्थात उद्योजकांच्या प्रति जी अनास्था आपण सिद्धांतावर चालणाऱ्या अनेकांबद्दल आपण बघतो ती माझ्या मते पंडितराव कुलकर्णी यांच्या वाटेला पण आली. इचलकरंजी आणि फारतर महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे पण त्या पलीकडे ते जावं असं काही आपण फारसं काही केलं नाही. नेट वर पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
कै पंडितराव कुलकर्णी आणि फाय ग्रुप यांना दिल से सॅल्यूट!
Tuesday, 2 June 2026
तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडे एक भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक कार होती. आणि मी ते पुष्पक विमानसारखं कुठली तरी पुराणातील गोष्ट सांगत नाही आहे तर ही गोष्ट आहे २००० च्या आसपासची. सिटी आहे बंगलोर आणि कंपनीचं नाव आहे मैनी. त्यांच्या इलेक्ट्रिक कारचं नाव होतं रेवा. चेतन मैनी नावाच्या तरुण इंजिनियर ने १९९४ च्या आसपास रिसर्च करून ही कार बनवली होती. रेवा बंगलोर च्या रस्त्यावर तर दिसायचीच पण रिपोर्ट सांगतं की जगभरात २६ देशांमध्ये ती निर्यात पण झाली होती.
जेव्हा जग म्हणत होतं की इलेक्ट्रिक कार हे दिवास्वप्न आहे तेव्हा रेवा शांतपणे आपला मार्गक्रमण करत होती. २००४ च्या आसपास सुरु झालेल्या टेस्ला मुळे अचानक इलेक्ट्रिक कारची जगभरात हवा चालू झाली. इनफॅक्ट रेवा ची दोन वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे अर्थात ती इलेक्ट्रिक होती आणि दुसरं म्हणजे २००९ साली लॉन्च झालेल्या पण नंतर एक अपयशी ठरलेल्या नॅनो इतकीच तिची साईझ होती.
आज इ व्ही स्टार्ट अप चा बोलबाला चालू आहे. पण नव्वदीत चालू झालेल्या मैनी च्या रेवा ला महिंद्रा ने २०१० साली अंगीकृत केलं आणि तीच कार इ २ ओ म्हणून ती कार नव्याने लॉन्च केली. आज महिंद्रा इलेक्ट्रिक कार मध्ये धूम करत आहे, पण त्याची सुरुवात इ २ ओ ने झाली आहे असं म्हणायला स्कोप आहे.
ज्या टेस्ला आणि पर्यायाने इलॉन मस्क चं आज जग गुणगान गात आहे पण त्याने टेस्ला मध्ये शिरकाव करण्याच्या आधी भारतात त्या टेक्नॉलॉजीवर आधारित एक पूर्ण कार भारतीय रस्त्यावर पळत होती. पण आपलं दुर्दैव असं की त्या काळाच्या पुढे असलेल्या टॉक्नॉलॉजीवर ना शासनाने विश्वास ठेवला ना भारतीय समाजाने. आणि कुणास ठाऊक, खुद्द प्रमोटर सुद्धा त्याच्या संशोधनात मागे पडले, कारण पुढे महिंद्रा ने सुद्धा ते ई २ ओ मॉडेल बंद केलं.
असे प्रॉडक्ट यशस्वी करण्यासाठी जी सर्वांगीण उद्योजकीय वातावरण लागतं तिची आपल्याकडे वानवा आहे. अमेरिका जर आज अत्यंत प्रगत देश झाला आहे त्यामध्ये या उद्योजकीय मानसिकतेचा मोठा सहभाग आहे.
Tuesday, 26 May 2026
Thursday, 21 May 2026
Tuesday, 19 May 2026
Friday, 13 March 2026
काही वर्षांपूर्वी मी एक व्हिडीओ बघितला होता. ख्रिश्चन लग्नामध्ये मुलीचे वडील, फादर समोर मुलगा-मुलगी एकमेकांना स्वीकारण्याआधी, एक छोटं भाषण देतात. मला त्या वडिलांची कमाल वाटली. कारण त्या भाषणात विनोद होता, भावना होत्या, अभिमान होता, प्रेम होतं. आणि हे सगळं म्हणताना वडील एकदम कुल होते. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला ते ब्रिट वाटले. त्यांचं भाषण मराठीत लिहिण्याचा मोह आवरत नाही आहे.
वडील म्हणतात
"फिलिप, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने चालू होतात तशी ही पण चालू होते."
"काही वर्षांपूर्वी एक माणूस असतो जो चांगला बाप ही असतो आणि एव्हाना तुला हे कळलंच असेल की तो बाप म्हणजे मीच आहे. तर त्याला एक मस्त मुलगा असतो आणि कुटुंब एकंदरीत आनंदात असतं. एकेदिवशी मला कळतं की माझी बायको पुन्हा एकदा प्रेग्नन्ट झाली आहे आणि लवकरच एक बाळ आमच्या घरात येणार आहे. मग मी देवाकडे प्रार्थना केली. त्याला म्हणालो "देवा, खरंतर सगळं तुझ्यामुळे घडतं. पण येणारं बाळ जर मुलगी असेल तर माझ्यावर कृपा होईल." देवाने माझी प्रार्थना ऐकली. त्या छोट्या परीला मीच माझ्या कुशीत घेतल्यावर मला अपार आनंद झाला."
"मी त्या एंजल कडे बघत अजून एक प्रार्थना केली की "देवा, तिला तिच्या आईसारखं बनव" देवाने माझी ती ही प्रार्थना ऐकली. माझी मुलगी तिच्या आईप्रमाणे अतिशय लाघवी, प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी अशी मोठी होत होती. पण मग माझ्या लक्षात आलं की या मायलेकी माझ्याकडे लक्षच देत नव्हतं. मग मी देवाकडे प्रार्थना केली की "देवा, तिच्यात माझा थोडा तरी अंश उतरू दे." आणि गंमत म्हणजे देवाने माझी ती पण प्रार्थना ऐकली. तुला सांगतो ती ट्रक पण चालवते आणि ट्रॅक्टर सुद्धा. ती गवताचा भारा उचलून ट्रॉली मध्ये सहजपणे लोड करते आणि मनात आलं तर तंबाखू पण चघळू शकते. तुला लक्षात येत आहे की कुठला झंझावात तू गळयात अडकवून घेतो आहेस ते."
"हे सगळं होत असताना तिचं एक स्वतःचं भावनाशील व्यक्तिमत्व घडत होतं, तिची भवतालाबद्दल मतं तयार होत होती, आणि तिची बुद्धी विकसित होत होती. मग देवाकडे पुन्हा प्रार्थना केली "आता पुरे. तू खूप तिच्यावर उपकार केले आहेस. आता अजून एक प्रार्थना. तिला तुझ्यासारखं बनव." आणि काय सांगू तुला, त्याने ते ही ऐकलं. त्याने तिला लोकांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त केलं. ती रुग्णांची सेवा करणारी परिचारिका बनली. ती हे काम अत्यंत प्रेमाने करते. तिने अनेकांना आपल्या सेवाभावी वृत्तीने यमाच्या दारातून अक्षरश: खेचून परत आणलं आहे. आणि अनेकांनी तिचा हात आपल्या हातात धरून शांतपणे या पृथ्वीवरून एक्झिट पण घेतली आहे. तिने या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. ते करण्यासाठी तिने अनेक दिव्य कामं केली आहेत. त्यासाठी जगभर फिरली आहे, डोंगर चढून गेली आहे, रौद्र स्वरूप असलेल्या नदीच्या पात्रात छोट्या बोटीने तिने प्रवास केला आहे आणि युद्धभूमीवर आजूबाजूने बुलेट्स जात असताना जमिनीवर झोपून आपलं रुग्णसेवेचं कर्तव्य बजावलं आहे. तिच्या या वागण्यातून जगात अजून एक सुप्रीम शक्ती आहे याची जाणीव होते."
"हे सगळं छान असलं तरी काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटत आहे. मी देवाकडे पुन्हा, आणि कदाचित शेवटची प्रार्थना केली "माझ्या मुलीवर सुखाचा वर्षाव कर" मग तू तिच्या आयुष्यात आलास. तुला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसतो. त्याबद्दल मी विधात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आज मी माझ्या जवळ असणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुझ्या हातात सोपवत आहे. पण ते करण्याआधी मला तुला सांगायचं आहे की विधाता आणि मी, आम्ही दोघांनी ती आजच्या दिवसासाठी अशी सुंदर बनावी म्हणून अथक प्रयत्न केले आहेत."
"फिलिप, आज माझ्या कन्येचा हात तुझ्या हातात सोपवताना, तुझी हरकत नसेल तर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी आणि विधाता असे दोघेही तिच्या पाठीशी आहोत. तेव्हा तिच्याशी अजिबात पंगा घेऊ नकोस."
Monday, 16 February 2026
Monday, 26 January 2026
आरंभ
Thursday, 1 January 2026
नवीन वर्षाची सुरुवात करताना परत एका गोष्टीचा पुनरुच्चार करावासा वाटतो की भारतीय उत्पादन क्षेत्र हे अतिशय सकारात्मक संक्रमणातून जात आहे. किंबहुना जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर पहिल्यांदाच जगाच्या पाठीवर वेगवगेळ्या क्षेत्रात अनेक घडामोडी एकाच वेळेस घडताना दिसत आहेत. कोविड १९ झालं, रशिया युक्रेन युद्ध झालं, यूरोप मध्ये सीरिया, जॉर्डन, अफगाणिस्तान, लेबनान सारख्या देशातून असंख्य लोक आश्रित म्हणून आले, चीनची एकूणच शक्ती प्रचंड वाढली, तैवान ला त्याने खुले आव्हान दिले तर युरोप मध्ये अनेक देशात चीनने प्रचंड गुंतवणूक केली, अशी परिस्थिती तयार झाली की जग ग्लोबलायझेशन कडून लोकलायझेशन कडे वळत आहे अशी चिन्ह दिसू लागली, जगात क्रमांक एकवर असलेल्या महासत्ता असलेल्या देशाच्या लीडरशिप ने अनाकलनीय निर्णय घेतले ज्यामुळे जगाची दिशा भरकटल्यासारखी वाटली. भारतात सुद्धा बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, ज्यावर मागे लिहिलं होतं. त्याबद्दल परत लिहीत नाही, कारण मूळ विषय सोडून वेगळ्याच गोष्टींवर चर्चा सुरु होते.
आज भारताचे उत्पादनक्षेत्र जीडीपी मध्ये १५% सहभाग नोंदवतं. येणाऱ्या दशकामध्ये हे गुणोत्तर प्रमाण २५% नेण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत.
हे जरी खरं असलं तरी जगात तयार झालेल्या अनिश्चिततेमुळे (मॅनेजमेंट जार्गन मध्ये याला VUCA जग असे संबोधतात. Volatile, Uncertain, Complex, Ambiguous), दोन गोष्टींचा व्यावसायिकाने विचार करावा असं वाटतं. एक तर जगात काय घडतं त्यापासून आपण इम्यून आहोत या गैरसमजातून बाहेर पडावं. दोन दशकांपुर्वी हे बऱ्याच अंशी खरं असेल, पण आता नाही. आणि दुसरं म्हणजे जगात हे जे काही चालू आहे त्या बदलांचा स्वीकार करणे आणि मुख्य म्हणजे त्या बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणण्यात चपळता दाखवणे. आपलं भविष्य सुरक्षित करण्याची शक्यता या मुळे तयार होईल. खात्री नाहीच.
आपल्या उत्पादनाची आणि सेवेची गुणवत्ता यात सातत्याने सुधार आणणे हा आपला मंत्र असायला हवा. भारताची उत्पादकता आणि गुणवत्ता याबद्दल जगात फारसं चांगलं बोललं जात नाही. अर्थात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय भवताल हा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्पादकता या मानसिकतेला दुर्दैवाने पूरक नाही आहे. पण आजूबाजूच्या इको सिस्टम कडे दुर्लक्ष करत व्यवसायाने अंतर्गत पद्धती या इतक्या सशक्त बनवायला हव्यात की बाह्य मूलभूत अवगुणांचा जगाला विसर पडायला हवा. अवघडच आहे ते, पण घडायला हवं.
एक प्रश्न व्यावसायिकाने सातत्याने विचारायला हवा तो म्हणजे "जगात सर्वोत्तम असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा माझ्या व्यवसायाचं नाव घेतलं जातं का?" त्याचं उत्तर देताना मुक्त पणे "हो" येत नसेल तर बाह्या सरसावून सर्वोत्तम बनण्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे.
२०२६ मध्ये पाऊल टाकताना, पुढील दशकात व्यवसायाची भरभराट कशी होईल, याच्या पायाभरणीवर लघु आणि माध्यम उद्योगांनी जोर देण्यात शहाणपण आहे.
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.