Tuesday 26 May 2020

टाईमपास.

१९९४ पासून मी सेल्स मध्ये काम करतोय. एक आठवड्यापेक्षा सलग मी पुण्यात राहिलो आहे असं मला आठवत नाही. पण या कोविड ने ते करून दाखवलं. १४ मार्च ला मी दिल्लीहून पुण्यात आलो. कोविड चं सावट एव्हाना गडद व्हायला लागलं होतं. २० मार्च ला मी चेन्नई ला जायचो होतो, पण पोस्टपोन करून १६ एप्रिल तारीख केली. नंतर मात्र प्लॅन कॅन्सल केला.

१५ मे च्या सकाळी मी अमेरिकेला जायचो होतो, सहकुटुंब. आणि आज परत निघणार होतो. पण आपण काही ठरवतो आणि करोनाच्या मनात काही वेगळं होतं.

पुण्यात आलात आणि रहायला काही प्रॉब्लेम झाला तर कंपनीत राहू शकता हे आवाहान मी आमच्या एम्प्लॉईजला पहिल्या दिवसापासून करतोय. काल आमचा अतुल दीक्षित आला आणि त्याचं प्रायव्हेट हॉस्टेल अजून बंद आहे. तो म्हणाला की मी राहू शकतो का कंपनीत? कंपनीने आनंदाने परवानगी दिली. तो एकटाच कुठे राहणार कंपनीत, म्हणून मी त्याला म्हणालो की मी पण येतो तुझ्याबरोबर कंपनीत राहायला.

एका दगडात चार पक्षी मारले.

- तब्बल तीन महिन्याने घर सोडून राहणार.
- माझी ट्रॅव्हेल बॅग, जी पडून होती, तिला हवा लागणार.
- अतुल ला एक साथ म्ह्णून ते एक समाधान. 

ह्या सगळ्या सांगायच्या गोष्टी. पण आज संध्यकाळी, ते स्कॉच ब्राईट नको, ते सिंक नको, तो व्हॅक्युम क्लिनर नको आणि तो मॉप नको.

मै और मेरी तनहाई अक्सर ये बाते.......म्हणत फुल टाईमपास. 

Monday 25 May 2020

५२ वा वाढदिवस

कालच्या बावन्नव्या वाढदिवशी आश्चर्यकारकरित्या मला खूप शुभेच्छा आल्या. इथे फेसबुकवर तर आल्याच आल्या पण कंपनीतल्या मुलांनी माझ्याबद्दल फार छान लिहिलं. इथल्या मैत्रगणांशी माझी दोस्ती तर आहेच पण लॉक डाऊन ४ आणि त्यात रविवार यांनी पण हातभार लावला. अन त्यात कडी म्हणजे माझ्या पुस्तकाची प्रकाशिका सानिका वाडेकर, लोकप्रिय मिलिंद शिंदे, श्रीरंग जाधव आणि जयंत विद्वंस हा मित्रत्रिकोण, आपल्या कल्पक डिजिटल मार्केटिंग स्टाईलने वहाण ब्रँड तयार करणारा भूषण कांबळे, ज्यांच्यामुळे या लॉक डाऊन च्या निराशाजनक काळात खूप वेगळी कामं करायची संधी मिळाली ते आपलं घर चे संस्थापक आणि मित्र विजय फाळणीकर, लिहिण्याची चांगली रेंज असणारे हेरंब जोशी उर्फ बगुनाना यांनी फार दिलसे भावना व्यक्त केल्या. त्यांच्या बरोबरच ऋषिकेश मारणे, महेश चव्हाण, सारंग भालेराव, विनय वझे, जयंत अत्रे, प्रणव कुलकर्णी, सुजाता मुनोत यांच्या लिहिण्याने मी काल हरभऱ्याच्या झाडावर बसलो होतो. संध्यकाळी "बास झालं कौतुक. भांडी घासून घे" हा इशारा ऐकल्यावर आपसूक खाली उतरलो.

असो. अजून एक वर्ष गेलं. पण आव्हानं काही संपली नाही आहेत. गेल्या वर्षी एप्रिल पासून परिस्थिती बिघडली ती अजून काही जागेवर येत नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांची मालिका येत गेली. त्यांना तोंड देताना सेटको चे सहकारी, माझ्या घरची लोक आणि इतर मित्रमंडळीची खूप मदत झाली. त्या सगळ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.

टाईमलाईन, व्हाट्स अप आणि फोनवर शुभेच्छा आल्या त्यांचे पुन्हा आभार. या करोनाच्या संकटातून जग मुक्त होवो, ही प्रार्थना.

लेथ जोशी चित्रपटासाठी श्री वैभव जोशी यांनी फार सुंदर काव्य रचलं आहे. आमच्या कंपनीच्या एका कार्यक्रमात म्हंटली होती ही कविता. मेधा जाधव यांनी त्याचं व्हिडीओ रूपांतरण केलं आहे. तुम्हालाही आवडेल. 

Monday 18 May 2020

सेंड ऑफ

मी जॉब करायचो तेव्हाची गोष्ट आहे. आमच्या कंपनीत एक मॅनेजर जॉईन झाला होता. काही दिवसातच श्रीनिवास कंपनीत पॉप्युलर झाला होता. त्याचं बोलणं, चालणं एकदम मस्त होतं. त्याला एक छोटी टीम दिली होती आणि एक नवा सेगमेंट डेव्हलप करायला दिला होता. ऑइल अँड गॅस सेगमेंट मध्ये प्रॉडक्ट विकायचं.

आमचा एम डी पूर्ण फ्रिडम द्यायचा काम करताना. त्याची फक्त एकच अपेक्षा होती. सेल्स फिगर्स आणि त्याला अचिव्ह करण्याचा काळ तुम्ही सांगायचा. तो त्यात अजिबात लुडबुड नाही करायचा. त्याला त्या वेळेत सेल्स ची फिगर दिसायला हवी. थोडक्यात गोल सेट करणे आणि ते जमवून आणणे याला तो खूप मान द्यायचा. श्री ने दीड वर्षाचा वेळ मागितला आणि सेल्स फिगर्स पण त्याने एम डी  ला सांगितली.

श्रीनिवासने, श्री म्हणू यात त्याला, काम धडाक्यात चालू केलं होतं. तो बोलताना आश्वस्त वाटायचं. एम आर एम मध्ये त्याचं प्रेझेंटेशन वर पब्लिक फिदा असायचं. कारण खूप सकारात्मकता असायची त्याच्या बोलण्यात. ऑइल अँड गॅस सेगमेंट साठी तो जे काही प्रयत्न करतोय त्याची व्यवस्थित माहिती श्री द्यायचा. आमचा बॉस ही त्याला थम्स अप द्यायचा. प्रकाश मशीन टूल सेगमेंट बघायचा.

श्री जॉईन झाल्यापासून चौथ्या महिन्याची एम आर एम चालू होती. आमचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन झाल्यावर श्री चं प्रेझेंटेशन चालू झालं. नेहमीप्रमाणे सकारात्मकता ठासून भरली होती त्याच्या बोलण्यात. पण यावेळेस एम डी च्या डोळ्यात श्री बद्दल दिसणारं कौतुक मला दिसत नव्हतं. आणि मला कारण कळलं. श्री चे प्रयत्न असले तरी सेल्स च्या फिगर मध्ये काही प्रॉमिसिंग दिसत नव्हतं.

एव्हाना माझी आणि श्री ची पण चांगली दोस्ती झाली होती. कारण तो माणूस म्हणून पण चांगलाच होता.

महिने सरले. आणि वार्षिक मिटिंग झाली. श्री बोलला जोरदार पण त्याचे रिझल्ट्स अजिबात प्रॉमिसिंग नव्हते. एम डी च्या चेहऱ्यावर यावेळेस चांगलीच नाराजगी दिसली. श्री ला जाणवली ती.

दीड वर्षांनी सुद्धा परिस्थितीत फारसा काही बदल झाला नव्हता. श्री चे प्रयत्न जारी असले तरी ऑइल अँड गॅस सेगमेंटचा सेल्स चा दुष्काळ काही सरला नाही. पुढे दोन तीन महिन्यात श्री ने खूप प्रयत्न केले पण यश काही लाभलं नाही.

शेवटी श्रीनिवास ने डिसेंबर मध्ये स्वतःहून राजीनामा दिला. मला वाईट वाटलं. मी एमडी कडे श्रीची रदबदली करायला गेलो आणि विनंती केली की श्री ला राजीनामा परत घ्यावा यासाठी एमडी ने शब्द टाकावा. मी एमडी ना म्हणालो "श्री स्वभावाने चांगला आहे, त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे, तो सिन्सिअरली प्रयत्न करत होता सेल्स करण्याचा."

एम डी  ने शांतपणे ऐकून घेतलं आणि मला सांगितलं "श्री सोडून चालला आहे, याचं मलाही वाईट वाटतंय. पण माझ्या मते मी त्याला टीम आणि काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण तरीही तो रिझल्ट्स आणू नाही शकला. Understand that good behavior and being positive can not be alternative to poor results. त्याच्या कामात मला काही प्रॉब्लेम वाटले, तो हुशार आहेच पण तरी त्याचं प्रोजेक्शन चुकलं किंवा त्याने जे प्रयत्न सांगितले ते इफेक्टिव्ह नाही ठरले. त्याच्या पेक्षा कमी हुशार लोकांनी केवळ बिझिनेस चा समजून उमजून पाठपुरावा केला आणि गोल्स अचिव्ह केले. Remember, perseverance always beats genius.  त्यामुळे त्याला मी अडवणार नाही. एक माणूस म्हणून मला ही त्याच्या बद्दल आदर आहेच. कदाचित नवीन ठिकाणी तो यशस्वी होईलही. पण इथे तो अयशस्वी ठरला हे सत्य आहे."

एम डी म्हणणं बिनतोड होतं. श्री ला दुःखी मनाने आम्ही सेंड ऑफ दिला.





Sunday 17 May 2020

भानगडी

सालं या करोनावर लस आलीच नाही तर कसल्या खतरनाक भानगडी होतील, नाही?

हात मिळवायचा नाही. फक्त नमस्ते. उराउरी भेट तर लांबची गोष्ट.

फिरायचं असेल तर स्वतःच्या गाडीतून. पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी होईल. ट्रेन मध्ये सेकंड स्लीपर मध्ये एका कुपेत ६ च प्रवासी असतील.  केवढे अगडबंब रस्ते लागतील. गाड्याच गाडया. अहोरात्र. 

हॉटेलिंग बंद. सॉलिड पैसे वाचतील. आणलं तरी टेक अवे. कारोबार (कार-ओ-बार) करावा लागेल. 

क्रिकेट, फुटबॉल स्टेडियम ओस पडतील. उलटं होईल. स्टेडियम च्या भोवती मोठमोठे स्क्रीन्स असतील. आणि त्यात दिसतील ऑनलाईन प्रेक्षक. खेळाडूंना टीव्हीवर नाही पाहायचं तर खेळाडू प्रेक्षकांना टीव्हीत पाहतील. 

मंदिरं ओस पडतील. ऑनलाईन दर्शन फक्त. पेटीत दक्षिणा ऑनलाईन पेमेंट ने. ते काही आपण लोक सोडणार नाही.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी बंद पडतील. वारी, कुंभमेळे झाले तरी प्रातिनिधिक स्वरूपात होतील.


Saturday 16 May 2020

करोनाशी दोस्ती

बस झालं करोनाला घाबरणं. लस येईपर्यंत हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असणार आहे. आणि अशा बऱ्याच साथी येऊन गेल्या आहेत ज्यावर औषध सापडलं नाही आपण त्याच्या बरोबर जगणं शिकलो आहे. कुणास ठाऊक काही चांगल्या सवयी लागतील अन त्या प्रोसेस मध्ये बाकीचे आजार कमी होतील.

सोशल डिस्टंसिंग आणि जरा बरं वाटत नसेल तर गप घरी पडून राहणे हे कळीचे मुद्दे आहेत. त्याबरोबर पर्सनल हायजिन हे महत्वाचं असणार आहे.  लोकांना जास्त भेटाभेटीची भानगड नाही. घर-कामाची जागा-घर इथं फिजिकल अस्तित्व. बाकी सगळ्या गोष्टीवर तिलांजली. गर्दीच्या ठिकाणी तर नकोच नको. करोनाला थोडी कळतं, तुम्ही मंदिरात दर्शनाच्या लायनीत उभे आहेत की मॉल मध्ये गमजा मारताहेत.

आता शासनाने सुद्धा एक पेशंट सापडला तर तीन किमी चा एरिया सील करणं वगैरे भानगडी थांबवाव्या. त्या माणसाची फक्त चौकशी करून तो ज्यांना भेटला त्यांची टेस्ट करावी अन बाकी सोडून द्यावं. आभाळ फाटलं आहे, कुठं कुठं पळणार, पोलीस अन डॉक्टर लोक.

समाजाच्या लोकांनी सुद्धा जरा सद्सद्विवेक बुद्धी जागृत करावी. बिल्डिंग मध्ये एक करोना पेशंट सापडला सगळं संपलं असा आकांडतांडव करणं थांबवावं. हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर वेळेस गुलाबाचं फुल द्यायचं आणि तोच कर्मचारी जर पॉझिटिव्ह आला तर त्याला बिल्डिंग मध्ये परवानगी नाकारायची हा दुटप्पीपणा थांबवावा.

उगं आपले पेशंटचे मोठमोठे आकडे बघून डोकं खराब करून घेऊ नये. बघायचेच असेल तर त्यातून बरे झालेल्या पेशंटचे आकडे बघा, मरणाऱ्या लोकांपेक्षा खूप जास्त आहेत ते.

आपापल्या घरी परत जाणाऱ्या लोकांची काळजी घेऊ यात. विमानातून पुष्प वृष्टी छानच आहे. पण हेलिकॉप्टर मधून फूड पॅकेट्स या लोकांवर टाकायला पण बहुधा तितकाच खर्च येईल, नाही का? योग्य चॉईस करू यात.

चला, एका नवीन जीवन प्रणालीचा अंगीकार करू यात. कुणास ठाऊक करोनाशीच दोस्ती होईल.

आणि एकमेकांना मर्यादेपलीकडे दुखवायचं नाही हा दोस्तीचा नियम आहे.

Friday 1 May 2020

मुक्ती सोपान

आदरणीय मालती ताईंना सप्रेम नमस्कार

करोनाचे साम्राज्य सर्वत्र पसरले आणि वाटले "मुक्ती सोपान काय म्हणते?", कुंदा, माझी धाकटी बहीण कशी असेल म्हणून फोन केला आणि कळले की ती करंदीकर मॅडम कडे, म्हणजे तुमच्याकडे राहायला गेली आहे. जीव भांड्यात पडला. मी खरं तर तिची मोठी बहीण, पण तिला माझ्यापेक्षा तुमचाच आधार जास्त आहे. वेळोवेळी आपण तिच्यामागे सावली म्हणून उभ्या राहता याचे मनस्वी समाधान वाटते.

आमचे वडील कै श्री केशवराव डंक यांनी अनेक गरीब मुलांना आश्रय देऊन शिक्षण दिले. कित्येक गरिबांचे संसार उभे केले. या पार्श्वभूमीवर कुंदाला वृद्धाश्रमात ठेवताना खूप वाईट वाटत होते. तिला आपण कायम आपल्याबरोबर ठेवू शकत नाही या विचाराने मनाला यातना होत होत्या. पण आज ती आपल्या छत्र छायेखाली तिचं जीवन व्यतीत करते आहे यामागे आपला तर चांगुलपणा आहेच आणि वडिलांची पुण्याई सुद्धा आहे असं वाटते. अर्थात कुंदाने सुद्धा मनापासून तिथे काम करून सर्वांचे मन जिंकून घेतले. आलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या मार्गदर्शनाखाली ती व्यवस्थित राहते याचं समाधान मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.

सांगायचं तर आम्हा सर्व बहिणीत ती सगळ्यात श्रीमंताघरी दिलेली. अत्यंत समृद्ध घर होतं तिचं. पण दुर्दैव तिचं, नशिबाचे वासे फिरले आणि ती अक्षरश: एकटी झाली. तिच्यावर अशी वेळ यावी हा काळाचा महिमा पण आपल्याकडे राहून आयुष्याच्या उत्तरार्धात तिच्या आयुष्याला आकार मिळतोय हे पाहून मन भरून येतंय. आज ती आपल्याबरोबर राहून पुन्हा समृद्ध आयुष्य जगते आहे हे पाहून कृतार्थ वाटते.

बरेच दिवस आपल्याशी संवाद साधायचा होता. इतर काळात जगरहाटीमुळे आणि आपल्या कार्यमग्नतेमुळे ते शक्य झालं नाही. करोना मुळे आजकाल वेळ असतो, तेव्हा मनातले विचार शब्दबद्ध केले.

चि कुंदास अनेक आशीर्वाद. तुझी काळजी आता वाटत नाही कारण तुझ्यामागे समर्थ हात आहेत मालतीताईंचे. त्यांचा आधार हा मोलाचा. तू व्यवस्थित राहतेस, पण वडीलकीच्या नात्याने काळजी घे असं सांगावंसं वाटतं. बाकी ठीक. आमच्या सगळ्यांच्या तब्येती छान आहेत.

पुन्हा एकदा साऱ्यांना नमस्कार

कुमुद मंडलिक