Monday 18 May 2020

सेंड ऑफ

मी जॉब करायचो तेव्हाची गोष्ट आहे. आमच्या कंपनीत एक मॅनेजर जॉईन झाला होता. काही दिवसातच श्रीनिवास कंपनीत पॉप्युलर झाला होता. त्याचं बोलणं, चालणं एकदम मस्त होतं. त्याला एक छोटी टीम दिली होती आणि एक नवा सेगमेंट डेव्हलप करायला दिला होता. ऑइल अँड गॅस सेगमेंट मध्ये प्रॉडक्ट विकायचं.

आमचा एम डी पूर्ण फ्रिडम द्यायचा काम करताना. त्याची फक्त एकच अपेक्षा होती. सेल्स फिगर्स आणि त्याला अचिव्ह करण्याचा काळ तुम्ही सांगायचा. तो त्यात अजिबात लुडबुड नाही करायचा. त्याला त्या वेळेत सेल्स ची फिगर दिसायला हवी. थोडक्यात गोल सेट करणे आणि ते जमवून आणणे याला तो खूप मान द्यायचा. श्री ने दीड वर्षाचा वेळ मागितला आणि सेल्स फिगर्स पण त्याने एम डी  ला सांगितली.

श्रीनिवासने, श्री म्हणू यात त्याला, काम धडाक्यात चालू केलं होतं. तो बोलताना आश्वस्त वाटायचं. एम आर एम मध्ये त्याचं प्रेझेंटेशन वर पब्लिक फिदा असायचं. कारण खूप सकारात्मकता असायची त्याच्या बोलण्यात. ऑइल अँड गॅस सेगमेंट साठी तो जे काही प्रयत्न करतोय त्याची व्यवस्थित माहिती श्री द्यायचा. आमचा बॉस ही त्याला थम्स अप द्यायचा. प्रकाश मशीन टूल सेगमेंट बघायचा.

श्री जॉईन झाल्यापासून चौथ्या महिन्याची एम आर एम चालू होती. आमचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन झाल्यावर श्री चं प्रेझेंटेशन चालू झालं. नेहमीप्रमाणे सकारात्मकता ठासून भरली होती त्याच्या बोलण्यात. पण यावेळेस एम डी च्या डोळ्यात श्री बद्दल दिसणारं कौतुक मला दिसत नव्हतं. आणि मला कारण कळलं. श्री चे प्रयत्न असले तरी सेल्स च्या फिगर मध्ये काही प्रॉमिसिंग दिसत नव्हतं.

एव्हाना माझी आणि श्री ची पण चांगली दोस्ती झाली होती. कारण तो माणूस म्हणून पण चांगलाच होता.

महिने सरले. आणि वार्षिक मिटिंग झाली. श्री बोलला जोरदार पण त्याचे रिझल्ट्स अजिबात प्रॉमिसिंग नव्हते. एम डी च्या चेहऱ्यावर यावेळेस चांगलीच नाराजगी दिसली. श्री ला जाणवली ती.

दीड वर्षांनी सुद्धा परिस्थितीत फारसा काही बदल झाला नव्हता. श्री चे प्रयत्न जारी असले तरी ऑइल अँड गॅस सेगमेंटचा सेल्स चा दुष्काळ काही सरला नाही. पुढे दोन तीन महिन्यात श्री ने खूप प्रयत्न केले पण यश काही लाभलं नाही.

शेवटी श्रीनिवास ने डिसेंबर मध्ये स्वतःहून राजीनामा दिला. मला वाईट वाटलं. मी एमडी कडे श्रीची रदबदली करायला गेलो आणि विनंती केली की श्री ला राजीनामा परत घ्यावा यासाठी एमडी ने शब्द टाकावा. मी एमडी ना म्हणालो "श्री स्वभावाने चांगला आहे, त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे, तो सिन्सिअरली प्रयत्न करत होता सेल्स करण्याचा."

एम डी  ने शांतपणे ऐकून घेतलं आणि मला सांगितलं "श्री सोडून चालला आहे, याचं मलाही वाईट वाटतंय. पण माझ्या मते मी त्याला टीम आणि काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण तरीही तो रिझल्ट्स आणू नाही शकला. Understand that good behavior and being positive can not be alternative to poor results. त्याच्या कामात मला काही प्रॉब्लेम वाटले, तो हुशार आहेच पण तरी त्याचं प्रोजेक्शन चुकलं किंवा त्याने जे प्रयत्न सांगितले ते इफेक्टिव्ह नाही ठरले. त्याच्या पेक्षा कमी हुशार लोकांनी केवळ बिझिनेस चा समजून उमजून पाठपुरावा केला आणि गोल्स अचिव्ह केले. Remember, perseverance always beats genius.  त्यामुळे त्याला मी अडवणार नाही. एक माणूस म्हणून मला ही त्याच्या बद्दल आदर आहेच. कदाचित नवीन ठिकाणी तो यशस्वी होईलही. पण इथे तो अयशस्वी ठरला हे सत्य आहे."

एम डी म्हणणं बिनतोड होतं. श्री ला दुःखी मनाने आम्ही सेंड ऑफ दिला.





No comments:

Post a Comment