Sunday 21 August 2016

डिझायनर

आज मी निवेआ चा एक डिओ आणला. उडवला. आणि माझं लक्ष वेधून घेतलं  ते त्याच्या बॉक्स च्या डिझाईन ने. (डिओ चा सुगंध घेऊन कुणी सुंदरी आली नाही हे समजून घ्याल). तर तो बॉक्स इतका सुंदर बनवला होता की डिओ व्यवस्थित त्यात बसत होता आणि त्या बॉक्स मधून बाहेर निघत होता. एकदम सुबक आणि सुलभ. हे प्रॉडक्ट डिझाईन.

एकंदरीत मला या डिझायनर मंडळी बद्दल अतीव आदर आहे. मग ते प्रॉडक्ट डिझायनर असो वा इंटेरियर डिझायनर असो. फॅशन डिझायनर असो वा मशीन डिझायनर असो. यांच्या सगळ्यांच्या नॉलेज बद्दल एक असूयामिश्रित आदर आहे. फॅशन डिझायनर बद्दल जास्त असूया आहे. कुठलीही गोष्ट बनवायची असेल तर या लोकांवर आपली दारो मदार असते. त्यांनी काम व्यवस्थित केलं तर जे त्याचं आउटपुट येतं त्याने आपण चकित होतो. डिझाईन चांगलं असेल तर जे प्रॉडक्ट बनतं ते देखणं तर असतंच पण त्याची युटिलिटी जास्त असते आणि लाईफ स्पॅन पण चांगला असतो.

अमेरिकेत क्रेडिट कार्ड खूप वापरायचे. एकेकाच्या पाकिटात पंचवीस तीस कार्ड सहज असायचे. आज आपल्याकडे पण दिसतात. आपल्या बँकेचं कार्ड पटकन त्या वॅलेट मधून हातात यावं म्हणून एका बँकेने कार्ड ला नॉच दिली होती ज्यायोगे पाकिटात हात घातला की ते कार्ड पटकन हातात यावं.

आता माझ्याकडे एक पेन आहे ज्याच्या मागच्या बाजूला यु एस बी स्टिक अडकवली आहे. बाहेरून वाटतं की  फक्त पेन आहे. कल्पना इतकी भारी की मी चकित झालो. स्विस नाईफ आठवते का? एका आयटम मध्ये कमीत कमी दहा टूल्स बसवले आहेत.

सँट्रो ला क्लच च्या शेजारी पाय ठेवायला एक गटटू असायचा. ascent ला पण होता. गाडी चालवताना त्यावर पाय ठेवला की एक रिलीफ मिळायचा. छोटीशी गोष्ट पण कौतुकास्पद.

ते मंगळ यान. बाबो! करोडो मैल जाऊन मंगळावर पोहोचायच्या वेळेची अचूकता काही मिली सेकंद होती. एका रोबस्ट डिझाईन चं उदाहरण.

माझा मित्र विवेक पत्की, इंटेरियर चं काम करतो. १९९९ मध्ये त्यानी माझ्या घरात दोन वार्डरोब बनवले. ९९ च्या मानाने त्याने दाबून पैसे घेतले होते. पण आज सतरा वर्ष झालीत, ते वार्ड रोब नवीन च दिसतात. इतकेच काय पण मी २००५ मध्ये घर बदललं तेव्हा जुन्या घरातून नवीन घरात ते वार्डरोब शिफ्ट केले तरी काहीही डॅमेज झालं नाही. हे खरं डिझाईन. आणि दोन वर्षांपूर्वी मी एका दुसऱ्या डिझायनर कडून काम करून घेतलं त्यात भरपूर फंक्शनल चुका आहेत.

माझ्या लिस्ट मध्ये राजेंद्र निसळ आहेत. पेंटा डिझायनर्स म्हणून त्यांची कंपनी आहे. २००२ ते २००४ मध्ये मी खूप स्पेशल पर्पज मशिन्स बनवल्या, काही ऑटोमेशन प्रोजेक्ट केले. नगर रोड च्या एका कंपनीसाठी आम्ही असेम्ब्ली लाईन बनवली. निसळ साहेबांचं डिझाईन. परवा गेलो होतो त्या कंपनीत. तब्बल १३ वर्षांनी ती लाईन काहीही प्रॉब्लेम शिवाय चालू आहे. स्पेशल पर्पज मशीन चं इतकं लाईफ हे कौतुकास्पद आहे हे जाणकार सांगतील. मला आठवतंय, निसळ साहेबांचं डिझाईन आलं की कळायचं, ये लंबी रेस का घोडा है.

एखाद्या गोष्टीचं अस्थेटिक, वापर करताना त्यात असलेल्या सोयी सुविधा, ती गोष्ट तुम्ही मेंटेन कशी करू शकता, त्याचा लाईफ स्पॅन यावर डिझाईन ची क्वालिटी ठरते.

आमच्याकडे वेगवेगळ्या देशात बनवलेले स्पिंडल रिपेयर ला येतात. ते करताना आम्हाला सहज कळतं की डिझाईन पॉईंट ऑफ व्हयू कुठला स्पिंडल चांगला बनवला आहे.

मी स्वतः कधीही डिझाईन मध्ये काम केलं नाही आहे. तिथे मी जास्त तारे तोडत नाही. म्हणजे तितकी पोच नाही माझी. कुठलाही डिझायनर, मग तो आमच्या फिल्ड मधला असो वा ब्रोशर बनवणारा, वा इंटेरियर असो, मी त्यांच्या कामात लुडबुड करत नाही. फंक्शनल गरज सांगतो आणि बाजूला होतो. कारण त्यांच्या कॅपॅबिलिटी वर मला जास्त भरोसा असतो. काही ठिकाणी लोकं त्या भरवशाला जगतात तर काही ठिकाणी फसतो.

चलो, आज की शाम, इन डिझायनर के नाम. आमचं आयुष्य तुम्ही नक्कीच सुसह्य करता. तुम्हाला आमचा मानाचा मुजरा.


Wednesday 17 August 2016

Working with idiots

परवा एक आर्टिकल वाचलं की तुम्ही जर मूर्ख लोकांसोबत काम करत असाल तर तुम्हाला हार्ट ऍटॅक ची शक्यता जास्त असते. आणि तुम्ही त्यात गचकू पण शकता. त्यात असं लिहीलं की सहकाऱ्यांचा बावळटपणा तुमच्या कळत न कळत तुमचा स्ट्रेस वाढवत असतो. बरं सिगारेट किंवा काही अरबट चरबट खाणं या व्यसनांवर तुम्ही कंट्रोल तरी ठेवू शकता. भांग पाडणे किंवा दात घासणे या व्यतिरिक्त व्यायाम जर करत नसाल तर ते ही करू शकता. आणि मग स्ट्रेस लेव्हल कमी करू शकता. पण जेव्हा तुमचा एखादा सहकारी डोकं वापरायचं नाही असं ठाण मांडून चुकांवर चुका करतो तेव्हा मात्र जमीन दुभंगून आपल्याला पोटात का नाही घेत असं वाटत राहतं. परत वर हा सहकारी अशा पोझिशन ला असेल की तुम्ही त्याला सांगूही शकत नाही अशा वेळेस अजून वांदे. लाकडं आणि गोवऱ्या च पाठवायच्या पुढे.

आणि वर हे संशोधनाअंती सिद्ध वगैरे झालं आहे म्हणे.

ही बातमी वाचल्यापासून मला जरा टेन्शन च आलं आहे.

नाही नाही, मला काही होणार नाही हो. मला माझ्या सहकाऱ्यांची काळजी लागली आहे. 😊😊

Monday 15 August 2016

नाटकं

मध्ये एका पोस्टवर नाटक हा विषय झाला अन मला माझ्या आयुष्यातील दोन नाटकं आठवली. म्हणजे अगदी खरीखुरी.

पहिलं नाटक अर्थात शाळेतलं. सी डी ओ मेरी हायस्कुल नासिक. बसवलं होतं भिसे बाईंनी. काही मला आता स्टोरी आठवत नाही, पण कुणी तरी मला पैशाला बुडवतो आणि मग कोर्टात केस होते वगैरे तत्सम गोष्टी होत्या. बाकी सगळ्यांनी खूप चांगली कामे केली होती बहुतेक. शेटजी चा रोल केलेला प्रसाद राजवाडे तर आजही अभिनेता म्हणून खपून जाईल. बाकी अस्मादिकांबद्दल काय बोलणार. गॅदरिंग पार पडल्यावर भिसे बाईंनी एकूणच माझ्या सादरीकरणा बद्दल उद्गार काढले "मंडलिकला अभिनय वगैरे कशाशी खातात हे अजून शिकायचं आहे पण त्याचं पाठांतर दांडगं आहे." भिसे बाई बहुतेक खरं बोलल्या कारण आजही मनात काय चालू आहे ते पटकन चेहऱ्यावर दिसतं. त्यातल्या त्यात टेन्शन तर जसंच्या तसं उतरतं. एक सोज्वळ पणाचा अभिनय सोडला तर आजही या क्षेत्रात कच्चा च आहे. हा प्रकार बहुधा सातवी ला झाला आणि त्याचा धसका बाकी सर आणि बाईंनी इतका घेतला की पुढचे तीन वर्षे नाटकात काम करतोस का हे विचारायला कुणी धजावलं नाही.

आणि मग डिप्लोमा ला औरंगाबाद ला गेलो. अभिनयाच्या क्षेत्रातील माझी शाळेतील झळाळती कारकीर्द इथल्या मित्रांना माहिती असणं शक्यच नव्हतं. माझा मित्र विवेक पत्की ला खूप खाज, नाटक बसवायची. तो स्वतः कसलेला अभिनेता, जिगिषा नावाच्या संस्थेशी निगडित. जिगिषा चे सगळेच आज ताकदीचे कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.  चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, प्रतिक्षा लोणकर, शुभांगी संगवई हे औरंगाबाद मध्ये धूम मचवत होते. मदर्स हाऊस, पौगंड या नाटकांनी वेगळे स्थान निर्माण केले होते.

 तर विवेकला नाटकाची भारी हौस. हमीदाबाईची कोठी मधला सत्तार (चुभूदे घे) तो भारी वठवायचा. त्याने मोठं धाडस केलं. आमच्यासारख्या ठोकळ्या ना घेऊन नाटक (की एकांकिका) बसवायचं ठरवलं. म....... मरणाचा, बहुतेक वामन केंद्रे लेखक. जोरकस तालमी करवून घ्यायचा. पार चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी या दोघांना आम्हाला अभिनय दिग्दर्शन करायला घेऊन यायचा. हे म्हणजे गाढवांना घोड्याच्या रेस मध्ये पळवण्यासाठी पेसी श्रॉफ ला ट्रेनिंग ला बोलावण्यासारखं होतं. आम्ही काय अभिनय शिकलो ते देव जाणे पण कुलकर्णी आणि दळवी यांना मात्र ठोकळ्यां ना अभिनय कसा शिकवायचा याच पुरतं ट्रेनिंग मिळालं असेल. बाकी गॅदरिंग मध्ये काय बाय लोकांनी सहन केलं असावं आणि विवेकची मेहनत फळाला आली असावी.

असो. आज हे आठवलं की हसू येतं. आयुष्य परत रिवाईंड झालं आणि कुणाला सॉरी म्हणायचं असेल तर म्हणून घ्या असं जर सांगितलं, कुठली चूक निस्तरायची असेल तर सावरा असं सांगितलं तर विवेक ला सॉरी म्हणेल आणि अभिनय करण्याची चूक झाली यासाठी कान पकडून उभा राहील.

पुढं आयुष्य एक मोठं नाटक झालं आहे. विध्यात्याच्या रंगमंचावर आलो आहे. एंट्री मारली तेव्हा कुणी दखल घेतली नाही, पूर्वार्ध तर संपला आहे. सगळी भिस्त उत्तरार्धावर वर आहे. एक्झिट होईल तेव्हा "याला आयुष्यात कधी अभिनय जमला नाही" असं जर भिसे बाईंसारखं  कुणी म्हंटलं तर ती खरं जगल्याची पावती असेल. 

Saturday 13 August 2016

15 August 2016

Some people will do anything to earn money and enhance their power-even become patriots and humanitarians.

१५ ऑगस्ट. याच दिवशी फाळणी झालेल्या आणि रक्ताळलेल्या आपल्या देशाला ब्रिटिशांकडूनच नव्हे तर ५६५ महाराजे, नवाब आणि हजारॊ जमीनदारांपासून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य, जे आजकाल आपण अध्याहृत धरतो, ते खरंतर आपल्या बापजाद्यांच्या देशाप्रतीच्या निष्ठा, अविरत प्रयत्न आणि बलिदान यामुळे मिळालं आहे याचा बऱ्याचवेळा विसर पडतो. "असंख्य बलिदानांतून मिळालेल्या उदात्त अशा स्वातंत्र्य या भावनेप्रती आपण संवेदनशील आणि सजग आहोत का?" आजच्या स्वातंत्र्यदिनी हा प्रश्न नक्कीच स्वतः ला विचारावासा वाटतो.

सत्तर एक वर्षांपूर्वी पारतंत्र्याच्या जोखडातून आम्ही भले मुक्त झालोही असू, पण एका जुनाट सामाजिक मानसिकतेच्या साखळदंडाने आपल्याला आजही जखडून ठेवलं आहे. आपला देश, भारत, हा खरंतर  आर्थिक निकषांवर, तंत्रज्ञ बाबींवर, सामर्थ्याच्या कसोटीवर खणखणीत वाजेल असा आहे. पण तरीही जागतिक स्तरावर असलेलं त्याचं निम्न स्थान हे अचंबित करते आणि खोटं कशाला सांगू, निराशही करते.

"None are more hopelessly enslaved than those who falsely believe they are free"

आपला इतिहास दैदिप्यमान आहे हेच जर आपण कवटाळून बसलो आणि त्याच्या कडून जर काही शिकलो नाही तर भूतकाळात केलेल्या चुका परत परत करत राहू. तसं बघितलं तर इतिहास हा नेहमीच राज्यकर्त्यांच्या मर्जीने लिहिला गेला. आज मात्र, आपण सामान्य जन, स्वतंत्र आहोत. आपल्या इतिहासाचा धांडोळा घेत त्या चुका परत होऊ नये यासाठी कटिबद्ध होण्यात खरे शहाणपण आहे.

आपला देश, भारत, एक सशक्त राष्ट्र बनण्याच्या कुवतीचा आहे. जगभर ज्या शांतीचा धोशा लावला जातो त्याचा खंदा पुरस्कर्ता आहे आपला देश. आता गरज आहे  शहाणपणाची आणि आत्मविश्वासाची. आपला देश हा खऱ्या अर्थाने सहिष्णू आहेच. मधल्या काळात विझलेली ज्ञानज्योत पुन्हा पेटवू यात. त्याच्या प्रकाशात उज्वल भविष्य दिसेल. आजही आपल्याकडे तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ यांची खाण आहे. गरज आहे ती यांनी मुक्त वातावरणात एकत्रित आव्हानांना सामोरे जाण्याची.

आपल्या स्वातंत्र्याइतकं महत्वाचं काहीच नाही. राजकारणाच्या वर, धर्मकारणाच्या वर, विचित्र पत्रकारितेच्या वर आणि समाजकारणाच्या वर स्वातंत्र्याचं स्थान अग्रणी आहे. आणि हे स्थान डळमळीत करणाऱ्या, पुरोगामित्वाचा मुखवटा खालून समाजात अंधाधुंद फैलावणाऱ्या, राष्ट्राभिमानाच्या नावाखाली समाजात दुही माजवणाऱ्या, माणसांनाच माणसाचं वैरी बनवणाऱ्या आणि आपसामध्ये भिती, दहशत, तिरस्कार, सूड अशा नकारात्मक गोष्टी रुजवणाऱ्या सगळ्याच घटकांना नाकारण्याचं सामर्थ्य आपल्यात येवो हीच १५ ऑगस्ट निमित्त शुभेच्छा.

If we cherish our freedom, then awaken we must to our own potential as a thriving diverse, united and secular India. All we need is to believe in ourselves, our innate good nature and watch the miracle unfold.

जयहिंद!!

संदर्भ: गुरविंदर सिंग यांचा लेख. स्वैर रूपांतर 

पार्टनर ३

मी आणि पार्टनर बसलो होतो. दोन दोन पेग रिचवल्यावर मी जरा हवेत तरंगायला लागलो. त्या धुंदीतच मी पार्टनर ला बोललो "कसं आहे माहित आहे का, मला बिझिनेस मध्ये जर दूर वरचं दिसतं. Sort of future, you know."

पार्टनर म्हणाला "तुला दूरवरचं दिसणं साहजिक आहे रे. कारण तू मनोऱ्यावर उभा आहेस. पण लक्षात ठेव, हा मानवी मनोरा आहे. तुझे आई वडील, बायको पोरं आणि तुझे सहकारी यांनी मिळून रचलेला. त्यांनी एकमेकांना खांदे देऊन भक्कम बनवलेला.  थोडक्यात तू यांच्या खांद्यावर उभा राहिला आहेस आणि म्हणून तुला दूरवरचं दिसतं आहे"

आणि वर हे ही म्हणाला की "फेसबुकवर हा किस्सा टाकताना बायका पोरं असं चुकून लिहिण्याची शक्यता आहे ते बायको पोरं असंच लिही"

शप्पथ सांगतो, या पार्टनरला साली धुंदी चढत नाही आणि वर  समोरच्याला जास्त झाली असेल तर तो ती उतरवतो. 

राजकारण आणि मी

आज एका मित्राने मेसेज पाठवला. म्हणाला "तुला राजकारणातील काही कळत नाही का? की तुला त्यावर मत व्यक्त करण्याची अक्कल नाही आहे. त्यावर काहीच पोस्ट नसते तुझी?" मित्र २०१५ नंतर यादीत आला असावा. कारण २०१४ साली निवडणुकांच्या काळात खूप पोस्ट असायच्या. अगदी माझा मित्र श्रीकृष्ण उमरीकर म्हणायचा "राजेश मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारतो आणि मग कंपनीत जाऊन बसतो. लोकं मारामाऱ्या करत बसतात" बरं त्यावेळेस चं समर्थन कुणाला तर केजरीवाल. कृष्णाचा तर दुश्मन तो. अजून धुव्वा.

मग मोदी सरकार (?) सत्तेवर आलं. आणि मग मत व्यक्त बंद केलं. म्हणजे सुरुवातीला काही मत व्यक्त करायचं. पण गेल्या दीड वर्षात काही विशेष टाकलं नाही. त्याला काही कारणं आहेत

१. एकतर आपण कितीही उरसफोड केली तरी त्याला काहीही महत्व नाही आहे हे जाणवलं. आणि आपल्याला आनंद नाही. बाकी गोष्टी ज्या मांडतो, त्यात बाकीच्यांच्या लेखी फारसं महत्व नसेल पण मला आनंद तर मिळतो.

२. बरं या मोठ्या लोकांबद्दल आपण काही लिहावं तर ते त्यांच्या पर्यन्त पोहोचणार नसतं आणि पोहोचलं तरी ते थोडी दखल घेणार. कशाला आपली वाफ दवडा.

३. I like my political views.......but not more than my friends. यावर बऱ्याच जणांचा आक्षेप असू शकतो. पण आता बऱ्याच मित्रांचे राजकीय विचार कळले आहेत. आणि ते त्यावर ठाम आहेत. खूप कमी फ्लोटिंग आहेत. खरं तर ठाम विचारांची लोकं या फ्लोटिंग मंडळींना डबल ढोलकी म्हणतात. संभ्रमित लोकं ही एक वेगळी fraternity आहे. मी त्याचा मेंबर आहे.

४. झालं असं आहे की लोकशाही मार्गाने सरकार निवडून दिलं आहे. आणि सरकार चालवणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे, अवघड काम आहे. म्हणजे चाळीस लोकांची धड सोसायटी मी चालवू नाही शकत लोकशाही मार्गाने. एवढा अगडबंब देश चालवायचा हे कसोटीचं काम. बघू २०१८ पर्यंत काय होतं ते. तसाही मी लौकिकार्थाने लोकांचं भलं करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या भांडवलशाही चा मॅक्रो लेव्हल चा प्रतिनिधी. हे लोकं सरकार कुठलंही असो, त्यांच्याविरुद्ध फारसं बोलत नाही. आणि GST येऊ घातलं आहे, म्हणजे हाताची घडी, तोंडावर बोट.

५. बाकी त्यावेळेस भाजप हा पक्ष म्हणून झेपला नाही आज ही फारसं सख्य नाही. हे गाईचं प्रकरण आणि बाकी एकूण च घोषणा याने त्यांच्या बद्दल शंका गडद केल्या आहेत. GST मुळे जर हे इश्यू झाकोळले गेले तर ठीक बुवा, नाहीतर गडबड आहे.

६. सध्या इतके डे साजरे केले जातात की इतर सटर फटर डे कडे लक्ष द्यायची गरज नाही वाटत. बाकी रिओ ऑलिम्पिक साठी दिलसे शुभेच्छा आहेतच.

७. खरं तर इतकी मोठी पोस्ट उगाच लिहिली कारण "की तुला राजकारणावर मत व्यक्त करण्याची अक्कल नाही आहे.?" या प्रश्नाचं उत्तर "हो, अक्कल नाही आहे" हे म्हणून गप्प बसलो असतो तरी ते संयुक्तिक झालं असतं.

८. सहा नंबर चा मुद्दा हा पोस्टला धरून नाही आहे. पण वेगळी पोस्ट कशाला म्हणून यात घुसडून टाकलं.

बाकी निवांत.

Monday 8 August 2016

ती अन मी

मी ग्लोबल गप्पा मारून कावलेला असतो, तिने तिच्या छोट्या जगालाच ब्रम्हांड मानलेलं असतं अन त्यात ती खुश असते.

स्मित देण्यासाठी माझ्या चेहऱ्याला व्यायाम होत आहे अशी माझी भावना असते, ती हास्याचा धबधबा असते.

मी कुठल्याही अनोळख्या प्रदेशाला भास्कर मंडलिकांची जहागीर असल्यासारखा वावरतो, ती औंध मध्ये पण कावरी बावरी होते.

मी कुठल्याही माणसाशी पटकन ओळख करतो पण नंतर ती ओळख टिकवून ठेवेल की नाही याची ग्यारंटी नसते, ती जपून ओळख करते आणि जीवापाड जपते.

मला कुणाला नाही म्हणायचं असेल माझे शब्द तोंडातल्या तोंडात घरंगळत राहतात, ती फडकन नाही म्हणून टाकते.

मी पोटाची खळगी भरण्यासाठी खातो, ती मनाला आनंद मिळावा म्हणून खाते.

कोणत्याही दुपारी ती बहुधा रजई मध्ये गुडूप झोपी जाते, मी मात्र क्रूड चे भाव ५० डॉलर्स आहेत तर सरकारने पेट्रोल चा भाव किती ठेवायला पाहिजे याचा हिशोब करत बसतो.

मी जितका वेळ काम करतो त्याच्या अर्धा वेळ ती काम करते. आणि मी जितके कमावतो त्याच्या.........नको ती दर्द भरी कहाणी

काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या हृदयाचे ठोके वाढतात, तिचे मिनिटाला ७२ च राहतात.

मला तिच्या बद्दलच्या भावना अशा जाहीरपणे मांडण्यात काही चूक वाटत नाही, ती मूकपणे प्रेम वर्षावत असते.

एक साम्य आहे मात्र

मला तिच्या बरोबर राहायला, बोलायला आवडतं आणि तिलाही बहुतेक माझ्या बरोबर राहायला, बोलायला आवडत असावं.

क्रायसिस

माणसाचं माणूसपण हे क्रायसिस मध्ये उठून दिसतं. आणीबाणीची परिस्थिती तो कशी हाताळतो यावर त्याची पत काय आहे ते दिसून येतं.

एकदा मी मुंबई हुन पुण्याला कार ने येत होतो. माझ्या समोरच्या कार च्या समोर बहुधा कुत्रा किंवा तत्सम प्राणी आला. त्या ड्रायव्हर ला इमर्जन्सी त ब्रेक मारावा लागला आणि मी काही माझी गाडी कंट्रोल करू नाही शकलो आणि समोरच्या कार ला मी ठोकली. मी विचार केला, झालं आता कार चा ओनर येऊन ठोकणार मला. म्हणजे अगदी फिजिकली नाही तर शिव्या खाव्याच लागणार. अहो पण काय आश्चर्य. तो ओनर खाली उतरला, मागे आला अन अक्षरश: हसत मला म्हणाला "काय मित्रा, उद्योग झाला का?" मी सॉरी वगैरे चालू केलं तर लागलीच तो म्हणाला "अरे, it was act of God. तुझ्या पण कंट्रोल बाहेर सिच्युएशन होती. मी अचानक ब्रेक मारला, तर तू तरी काय करू शकत होतास" परत वर म्हणाला "जा, आता उरलेला प्रवास सावकाश कर. गडबड नको करु" मी चकित झालो.

महाबळेश्वर ला आमच्या मित्राच्या गाडीने मायनर ऍक्सिडंट केला. मॉब गाडीवर चाल करून आला. परिस्थिती बिकट होती. माझे मित्र यतीन आणि आम्ही मागच्या गाडीत होतो. यतीन काही न बोलता गाडीतून उतरले आणि जवळच्या पोलीस स्टेशन ला जाऊन पोलिसांना घेऊन आले आणि पुढचा अनर्थ टळला.

एखाद्याशी भांडण होतं तेव्हाही आणीबाणीची परिस्थिती होते. अरे ला कारे म्हणत त्याचं रूपांतर कधी बाचाबाचीत होतं कळत नाही. आवाज चढतात, आपण काय बोलतो यावर नियंत्रण राहत नाही. भांडण कारणार्यापैकी एखादा क्रायसिस मॅनेजर असतो. मग तो म्हणतो ''दादा, तुम्ही वयाने जेष्ठ, कर्माने श्रेष्ठ. पण तरीही काही कारणामुळे तुमचा तोल गेला आहे. शनिवारी चहा प्यायला येतो तेव्हा बाकीचं भांडण करू" दादांना स्माईल देण्याशिवाय पर्याय राहत नाही.

मध्ये एकदा एक्स्प्रेस हाय वे वर माझ्या समोर दुसरी गाडी उलटी पलटी झाली होती. आम्ही गाडी साईड ला घेऊन तिथे पोहोचेपर्यंत एक गावातला माणूस तिथे येऊन डोकं शांत ठेवून सूचना देत होता आणि स्वतः काम पण करत होता. गाडी सरळ केली, जखमी ना बाहेर काढलं, एकाला त्याने इमर्जन्सीला फोन करायला सांगितलं. मला सांगितलं, तुम्ही जावा आणि समोरच्या टोल नाक्याला सांगा हे झालंय म्हणून.

लष्कर किंवा कमांडो कारवाई करतात तेव्हा नॉर्मल परिस्थिती नसतेच. तेव्हा जे डोकं शांत ठेवून ऍक्शन घेतात, अगदी स्वतः चा जीव जाऊ शकतो हे माहित असून सुद्धा. म्हणून ते आदरास पात्र.

बऱ्याचदा काम करताना काही मोठा प्रॉब्लेम येतो. हात पाय गळून जातात. पण तिथे डोकं शांत ठेवून जो सहकाऱ्यांचं मोराल शाबूत ठेवतो तो लीडर. यावेळेस मनातून हलला असेल तरी चेहऱ्यावर न दाखवणं एक कसब असतं. इंग्रजीत यावर एक वाक्य आहे Be brave. Even if you are not, pretend. No one can tell the difference. मानवी मनाच्या बऱ्याच भावनासाठी हे वाक्य चपखल बसतं.

क्रायसिस मॅनेजर. मला हेवा वाटतो अशा लोकांचा.