Monday, 8 August 2016

ती अन मी

मी ग्लोबल गप्पा मारून कावलेला असतो, तिने तिच्या छोट्या जगालाच ब्रम्हांड मानलेलं असतं अन त्यात ती खुश असते.

स्मित देण्यासाठी माझ्या चेहऱ्याला व्यायाम होत आहे अशी माझी भावना असते, ती हास्याचा धबधबा असते.

मी कुठल्याही अनोळख्या प्रदेशाला भास्कर मंडलिकांची जहागीर असल्यासारखा वावरतो, ती औंध मध्ये पण कावरी बावरी होते.

मी कुठल्याही माणसाशी पटकन ओळख करतो पण नंतर ती ओळख टिकवून ठेवेल की नाही याची ग्यारंटी नसते, ती जपून ओळख करते आणि जीवापाड जपते.

मला कुणाला नाही म्हणायचं असेल माझे शब्द तोंडातल्या तोंडात घरंगळत राहतात, ती फडकन नाही म्हणून टाकते.

मी पोटाची खळगी भरण्यासाठी खातो, ती मनाला आनंद मिळावा म्हणून खाते.

कोणत्याही दुपारी ती बहुधा रजई मध्ये गुडूप झोपी जाते, मी मात्र क्रूड चे भाव ५० डॉलर्स आहेत तर सरकारने पेट्रोल चा भाव किती ठेवायला पाहिजे याचा हिशोब करत बसतो.

मी जितका वेळ काम करतो त्याच्या अर्धा वेळ ती काम करते. आणि मी जितके कमावतो त्याच्या.........नको ती दर्द भरी कहाणी

काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या हृदयाचे ठोके वाढतात, तिचे मिनिटाला ७२ च राहतात.

मला तिच्या बद्दलच्या भावना अशा जाहीरपणे मांडण्यात काही चूक वाटत नाही, ती मूकपणे प्रेम वर्षावत असते.

एक साम्य आहे मात्र

मला तिच्या बरोबर राहायला, बोलायला आवडतं आणि तिलाही बहुतेक माझ्या बरोबर राहायला, बोलायला आवडत असावं.

No comments:

Post a Comment