Monday 15 August 2016

नाटकं

मध्ये एका पोस्टवर नाटक हा विषय झाला अन मला माझ्या आयुष्यातील दोन नाटकं आठवली. म्हणजे अगदी खरीखुरी.

पहिलं नाटक अर्थात शाळेतलं. सी डी ओ मेरी हायस्कुल नासिक. बसवलं होतं भिसे बाईंनी. काही मला आता स्टोरी आठवत नाही, पण कुणी तरी मला पैशाला बुडवतो आणि मग कोर्टात केस होते वगैरे तत्सम गोष्टी होत्या. बाकी सगळ्यांनी खूप चांगली कामे केली होती बहुतेक. शेटजी चा रोल केलेला प्रसाद राजवाडे तर आजही अभिनेता म्हणून खपून जाईल. बाकी अस्मादिकांबद्दल काय बोलणार. गॅदरिंग पार पडल्यावर भिसे बाईंनी एकूणच माझ्या सादरीकरणा बद्दल उद्गार काढले "मंडलिकला अभिनय वगैरे कशाशी खातात हे अजून शिकायचं आहे पण त्याचं पाठांतर दांडगं आहे." भिसे बाई बहुतेक खरं बोलल्या कारण आजही मनात काय चालू आहे ते पटकन चेहऱ्यावर दिसतं. त्यातल्या त्यात टेन्शन तर जसंच्या तसं उतरतं. एक सोज्वळ पणाचा अभिनय सोडला तर आजही या क्षेत्रात कच्चा च आहे. हा प्रकार बहुधा सातवी ला झाला आणि त्याचा धसका बाकी सर आणि बाईंनी इतका घेतला की पुढचे तीन वर्षे नाटकात काम करतोस का हे विचारायला कुणी धजावलं नाही.

आणि मग डिप्लोमा ला औरंगाबाद ला गेलो. अभिनयाच्या क्षेत्रातील माझी शाळेतील झळाळती कारकीर्द इथल्या मित्रांना माहिती असणं शक्यच नव्हतं. माझा मित्र विवेक पत्की ला खूप खाज, नाटक बसवायची. तो स्वतः कसलेला अभिनेता, जिगिषा नावाच्या संस्थेशी निगडित. जिगिषा चे सगळेच आज ताकदीचे कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.  चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, प्रतिक्षा लोणकर, शुभांगी संगवई हे औरंगाबाद मध्ये धूम मचवत होते. मदर्स हाऊस, पौगंड या नाटकांनी वेगळे स्थान निर्माण केले होते.

 तर विवेकला नाटकाची भारी हौस. हमीदाबाईची कोठी मधला सत्तार (चुभूदे घे) तो भारी वठवायचा. त्याने मोठं धाडस केलं. आमच्यासारख्या ठोकळ्या ना घेऊन नाटक (की एकांकिका) बसवायचं ठरवलं. म....... मरणाचा, बहुतेक वामन केंद्रे लेखक. जोरकस तालमी करवून घ्यायचा. पार चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी या दोघांना आम्हाला अभिनय दिग्दर्शन करायला घेऊन यायचा. हे म्हणजे गाढवांना घोड्याच्या रेस मध्ये पळवण्यासाठी पेसी श्रॉफ ला ट्रेनिंग ला बोलावण्यासारखं होतं. आम्ही काय अभिनय शिकलो ते देव जाणे पण कुलकर्णी आणि दळवी यांना मात्र ठोकळ्यां ना अभिनय कसा शिकवायचा याच पुरतं ट्रेनिंग मिळालं असेल. बाकी गॅदरिंग मध्ये काय बाय लोकांनी सहन केलं असावं आणि विवेकची मेहनत फळाला आली असावी.

असो. आज हे आठवलं की हसू येतं. आयुष्य परत रिवाईंड झालं आणि कुणाला सॉरी म्हणायचं असेल तर म्हणून घ्या असं जर सांगितलं, कुठली चूक निस्तरायची असेल तर सावरा असं सांगितलं तर विवेक ला सॉरी म्हणेल आणि अभिनय करण्याची चूक झाली यासाठी कान पकडून उभा राहील.

पुढं आयुष्य एक मोठं नाटक झालं आहे. विध्यात्याच्या रंगमंचावर आलो आहे. एंट्री मारली तेव्हा कुणी दखल घेतली नाही, पूर्वार्ध तर संपला आहे. सगळी भिस्त उत्तरार्धावर वर आहे. एक्झिट होईल तेव्हा "याला आयुष्यात कधी अभिनय जमला नाही" असं जर भिसे बाईंसारखं  कुणी म्हंटलं तर ती खरं जगल्याची पावती असेल. 

No comments:

Post a Comment