Saturday 13 August 2016

राजकारण आणि मी

आज एका मित्राने मेसेज पाठवला. म्हणाला "तुला राजकारणातील काही कळत नाही का? की तुला त्यावर मत व्यक्त करण्याची अक्कल नाही आहे. त्यावर काहीच पोस्ट नसते तुझी?" मित्र २०१५ नंतर यादीत आला असावा. कारण २०१४ साली निवडणुकांच्या काळात खूप पोस्ट असायच्या. अगदी माझा मित्र श्रीकृष्ण उमरीकर म्हणायचा "राजेश मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारतो आणि मग कंपनीत जाऊन बसतो. लोकं मारामाऱ्या करत बसतात" बरं त्यावेळेस चं समर्थन कुणाला तर केजरीवाल. कृष्णाचा तर दुश्मन तो. अजून धुव्वा.

मग मोदी सरकार (?) सत्तेवर आलं. आणि मग मत व्यक्त बंद केलं. म्हणजे सुरुवातीला काही मत व्यक्त करायचं. पण गेल्या दीड वर्षात काही विशेष टाकलं नाही. त्याला काही कारणं आहेत

१. एकतर आपण कितीही उरसफोड केली तरी त्याला काहीही महत्व नाही आहे हे जाणवलं. आणि आपल्याला आनंद नाही. बाकी गोष्टी ज्या मांडतो, त्यात बाकीच्यांच्या लेखी फारसं महत्व नसेल पण मला आनंद तर मिळतो.

२. बरं या मोठ्या लोकांबद्दल आपण काही लिहावं तर ते त्यांच्या पर्यन्त पोहोचणार नसतं आणि पोहोचलं तरी ते थोडी दखल घेणार. कशाला आपली वाफ दवडा.

३. I like my political views.......but not more than my friends. यावर बऱ्याच जणांचा आक्षेप असू शकतो. पण आता बऱ्याच मित्रांचे राजकीय विचार कळले आहेत. आणि ते त्यावर ठाम आहेत. खूप कमी फ्लोटिंग आहेत. खरं तर ठाम विचारांची लोकं या फ्लोटिंग मंडळींना डबल ढोलकी म्हणतात. संभ्रमित लोकं ही एक वेगळी fraternity आहे. मी त्याचा मेंबर आहे.

४. झालं असं आहे की लोकशाही मार्गाने सरकार निवडून दिलं आहे. आणि सरकार चालवणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे, अवघड काम आहे. म्हणजे चाळीस लोकांची धड सोसायटी मी चालवू नाही शकत लोकशाही मार्गाने. एवढा अगडबंब देश चालवायचा हे कसोटीचं काम. बघू २०१८ पर्यंत काय होतं ते. तसाही मी लौकिकार्थाने लोकांचं भलं करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या भांडवलशाही चा मॅक्रो लेव्हल चा प्रतिनिधी. हे लोकं सरकार कुठलंही असो, त्यांच्याविरुद्ध फारसं बोलत नाही. आणि GST येऊ घातलं आहे, म्हणजे हाताची घडी, तोंडावर बोट.

५. बाकी त्यावेळेस भाजप हा पक्ष म्हणून झेपला नाही आज ही फारसं सख्य नाही. हे गाईचं प्रकरण आणि बाकी एकूण च घोषणा याने त्यांच्या बद्दल शंका गडद केल्या आहेत. GST मुळे जर हे इश्यू झाकोळले गेले तर ठीक बुवा, नाहीतर गडबड आहे.

६. सध्या इतके डे साजरे केले जातात की इतर सटर फटर डे कडे लक्ष द्यायची गरज नाही वाटत. बाकी रिओ ऑलिम्पिक साठी दिलसे शुभेच्छा आहेतच.

७. खरं तर इतकी मोठी पोस्ट उगाच लिहिली कारण "की तुला राजकारणावर मत व्यक्त करण्याची अक्कल नाही आहे.?" या प्रश्नाचं उत्तर "हो, अक्कल नाही आहे" हे म्हणून गप्प बसलो असतो तरी ते संयुक्तिक झालं असतं.

८. सहा नंबर चा मुद्दा हा पोस्टला धरून नाही आहे. पण वेगळी पोस्ट कशाला म्हणून यात घुसडून टाकलं.

बाकी निवांत.

No comments:

Post a Comment